श्री शिवलीलामृत अध्याय अकरावा (११) | Shree Shivleelamrut Adhyay Akrava (11)

Shree Shivleelamrut Adhyay Akrava
Shree Shivleelamrut Adhyay Aathava
Shree Shivleelamrut Adhyay Aathava
Shree Shivleelamrut Adhyay Navava
Shree Shivleelamrut Adhyay Navava
Shree Shivleelamrut Adhyay Dahava
Shree Shivleelamrut Adhyay Dahava

श्री शिवलीलामृत अध्याय अकरावा (सार) । Shree Shivleelamrut Adhyay Akrava (Sar)

सूत पुढे श्रोत्यांना कथा सांगू लागले. काश्मीर देशात भद्रसेन नावाचा राजा व त्याचा विश्वासून प्रधान होता या दोघांना पूत्ररत्न होते. ते दोघेही मित्र असुन लहानपणापासुन शिवभजनाची आवड व विरक्त राहत असत अंगाला भस्म व ऋद्राक्ष घालने यांना आवडत असे हे पाहून राजा व प्रधान यांना चिंता पडली पुढे काय होणार. एके दिवशी राजाकडे पराशर ऋषी आले. राजाने आपली चिंता ऋषींना सांगितली ऋर्षीनी अन्तरज्ञानाने पाहिले. व म्हणाले राजा हे शिवभक्त का आहेत त्याची पूर्व कथा सांगतो. पूर्वी याचदेशी नंदिग्रामी महानंदा नावाची एक वेश्या आई-भाऊ समवेत राहत होती. तिने-एक कोंबडा व एक माकड पाळले होते. तेच हे तुझा पूत्र सुधर्म व प्रधान पुत्र तारक तुमच्या पोटी जन्माला आले. आहेत कारण महानंदा ही शिवभक्त होती तीने आपल्या नृत्य शाळेत एका शिवलिंगाची स्थापना करून ऋषी ब्राह्मणांना कथा पुराण सांगत असत ते हे पूजा व्रत व कथा पुराण कोंबडा-माकड यांचा कानावर पडत असे. त्यांना तिच्या बरोबर शिवभजन घडत होते. एके दिवशी शंकराणे तीची परीक्षा घेतली सौदागराचा वेश घेवून ते तीच्या घरी गेले. त्याचे रूप पाहुन ती वेडावली. व त्याचे स्वागत करून तीन दिवस मी तुमचीच आहे म्हणून सांगितले याने आपले दिव्यलिंग तिच्याकडे दिले व चांगले ठेव हा माझा प्राण आहे. हे जर जळाले किंवा भंगले तर मि अग्नीकाष्ट घेईल तिने ते लिंग नृत्यशाळेत ठेवले दोघे आसणी बसले. रात्री नृत्यशाळेला अग्नी लागला व तें लिंग जळून भस्म झाले. ति धावत आली प्रथम माकड व कोंबडा सोडला ते वणात पळून गेले पुढे सौदगराने अग्निकाष्ट घेतले. ही देखिल सर्वस्वाचा त्याग करून अग्नित उडी टाकली तेवढ्यात शंकर प्रसन्न झाले व वर मागण्यास सांगिले तिन कुटूंबातील सर्वासह नंदिग्रामी सर्वांचा उद्धार करा म्हणून विनंती केली तिची ती ईच्छा पूर्ण केली. राजा हे त्या कोंबडा आणी माकड यांना उत्तम जन्म मिळाले ते सर्वांना शिवभजनाला लावतील. परंतु वाईट एवढेच आहे की ते आज पासुन सातव्या दिवशी मृत्यु पावतील पूढे ऋषींनी राजास रूद्राध्यायाची पारायण कर म्हणून सांगितले सहस्त्र घटस्थापना करून ब्राह्मण हस्ते रूद्रघोष चालू केला सातवे दिवशी राजपूत्र बेशुद्ध पडला तेंव्हा पाराशर ऋषर्षीनी त्याचे अंगावर रूद्रोदक शिंपडले त्या योगे तो शुद्धीवर आला सर्वांना आनंद झाला पुढे सुधर्माने शिवदुतांनी प्राण कसे परत आणले त्याचा सर्व अनुभव पराशरांना सांगितला. व नारद तेथे प्रगट होऊन तो अनुभव खरा आहे म्हणून सांगितले. पूढे राजाने सुधर्मास गादिवर बसवले व प्रधान पूत्रास प्रधान पद दिले तो प्रधानासह वनात गेला व कालांतराने त्यांना शिवलोकांची प्राप्ती झाली.


श्री शिवलीलामृत अध्याय अकरावा (११) | Shree Shivleelamrut Adhyay Akrava (11)

श्री गणेशाय नमः ।। धन्य धन्य तेचि जन ।। जे शिवभजनीं परायण ।। सदा शिवलीलामृत श्रवण ।। अर्चन सदा शिवाचें ॥१ ॥ सूत म्हणे शौनकादिकांप्रती ॥ जे रुद्राक्षधारण भस्म चर्चितीं । त्यांच्या पुण्यासी नाहीं मिती ॥ त्रिजगतीं तेचि धन्य ॥ २ ॥ जो सहस्र रुद्राक्ष करी धारण ।। त्यासी वंदिती शक्रादि सुरगण ॥ तो शंकरचि त्याचें दर्शन ।। घेतां तरती जीव बहु ॥ ३ ॥ अथवा षोडश षोडश दंडीं जाण ॥ बांधावे रुद्राक्ष सुलक्षण ॥ शिखेमाजीं एक बांधावा पूर्ण ॥ शिवस्वरूप म्हणवुनी ॥४॥ त्यावरोनि करितां स्नान ॥ तरी त्रिवेणी स्नान केल्यासमान ॥ असो द्वादश द्वादश मनगटीं पूर्ण ॥ रुद्राक्ष बांधिजे आदरें ॥५ ॥ कंठीं बांधावे बत्तीस ।। मस्तकाभोंवतें चौवीस ।। सहा सहा कर्णी पुण्य विशेष ।। बांधितां निर्दोष सर्वदा ॥ ६ ॥ अष्टोत्तरशतमाळा ।। सर्वदा असावी गळां ।॥ एकमुखी रुद्राक्ष आगळा ॥ पूजितां भाग्य विशेष ॥७ ॥ पंचमुख षण्मुख अष्टमुख ।। चतुर्दशमुख लक्ष्मीकारक ॥ सकळ मंत्र सुफळ देख ।। रुद्राक्षजप नित्य करितां ।॥८॥

श्री गणेशाला, श्री सरस्वतीला, श्री सद्‌गुरूनाथांना आणि भगवान श्री सांबसदाशिवास नमस्कार असो. या अध्यायाचा प्रारंभ करताना सूत म्हणतात कि, जे भक्त शिव भजनात रमतात, जे शिवलीलामृताचे सश्रद्ध श्रवण करतात. जे सदैव शिवाची पूजाअर्चा करतात, ते खरोखरच धन्य होत. ।॥१॥ त्यातही जे शिवास प्रिय असणारे भस्म माथी लावतात. जे आपल्या अंगावर रुद्राक्ष धारण करतात, अशा शिवभक्तांच्या पुण्यास तर गणतीच नाही. ते तिन्ही लोकांत धन्य होत. ||२|| जे आपल्या अंगावर सहस्र रुद्राक्ष धारण करतात त्यांना देवदेवता, सूरगणही वंदन करतात. त्यास प्रति शिवरूप मानून त्याचे दर्शन घेतात. अशा रुद्राक्ष धारकाच्या दर्शनानेही कित्येक जीव उद्धरून जातात. ।।३।। प्रत्येक दंडा. सोळा-सोळा रुद्राक्ष बांधावेत, तसेच शिवस्वरूप रुद्राक्ष हा शेंडीस बांधावा. ||४|| त्यावरून केले जाणारे स्नान हे त्रिवेणी संगमी स्नान केल्याचे पुण्य पदरात घालते. बारा रुद्राक्ष हे प्रत्येक मनगटांत बांधावेत. ।।५।। गळ्यात बत्तीस, मस्तकाभोवती चोवीस आणि दोन्ही कानांत कुंडलाप्रमाणे सहा-सहा रुद्राक्ष बांधले असता सर्व दोष नाहीसे होतात. ||६|| शिवोपासकाच्या गळ्यात एकशे आठ रुद्राक्ष मण्यांची माळ असावी. एकमुखी रुद्राक्ष हा अत्यंत दुर्मीळ असून, त्याची पूजाही विशेष भाग्यकारक आणि लाभदायक आहे. ।। ७|| रुद्राक्ष हे पाच-सहा आणि आठ मुखांचेही असतात. चौदा मुखांचा रुद्राक्ष हा धन देणारा आहे. रुद्राक्षाच्या माळेवर केलेले मंत्र हे सफल होतात. ।।८।।


नित्य रुद्राक्षपूजन ।। तरी केलें जाणिजे शिवार्चन ॥ रुद्राक्षमहिमा परम पावन ।। इतिहास ऐका येविषयीं ।।९।। काश्मीर देशींचा नृप पावन ॥ नामाभिधान भद्रसेन ॥ विवेकसंपन्न प्रधान ।। परम चतुर पंडित ।। १० ।। प्रजा दायाद भूसुर ।। धन्य म्हणती तोचि राजेश्वर ।। लांच न घे न्याय करी साचार ।। अमात्य थोर तोचि पैं ।॥११॥ सुंदर पतिव्रता मृदुभाषिणी । पूर्वदत्तें ऐसी लाधिजे कामिनी ।। सुत सभाग्य विद्वान गुणी ॥ विशेष सुकृतें पाविजे ॥१२॥ गुरु कृपावंत सर्वज्ञ थोर ॥ शिष्य प्रज्ञावंत गुरुभक्त उदार ।। वक्ता क्षमाशील शास्त्रज्ञ सुरस फार ॥ विशेष सुकृतें लाहिजे ॥१३॥ श्रोता सप्रेम चतुर सावधान ।। यजमान साक्षेपी उदार पूर्ण ॥ काया आरोग्य सुंदर कुलीन ।। पूर्वसुकृतें प्राप्त होय ।।१४।॥ असो तो भद्रसेन आणि प्रधान ।। बहुत करितां अनुष्ठान ।। दोघांसी झाले नंदन ।। शिवभक्त उपजतांचि ॥ १५ ॥ राजपुत्र नाम सुधर्म ।। प्रधानात्मज तारक नाम ।। दोघे शिवभक्त निःसीम ।। सावधान शिवध्यानीं ॥१६॥ बाळें होऊनि सदा प्रेमळ ।। अनुराग चितीं वैराग्यशीळ ।। लौकिकसंगें ध्रुव अमंगळ ॥ त्यांची संगती नावडे त्यां ॥१७ ।।

नित्य केले जाणारे रुद्राक्ष पूजन हे शिवपूजेसमानच आहे. रुद्राक्षाचा महिमा हा अतिथोर आहे. त्यासंदर्भात मी तुम्हास एक कथा सांगतो, ती लक्षपूर्वक श्रवण करा. ।।९।। पूर्वी काश्मीर देशात एक भद्रसेन नावाचा विवेकसंपन्न, चतुर आणि ज्ञानी असा राजा राज्य करीत होता. ।।१०।। त्या राजाची प्रजा, त्याचे आप्त, राज्यातले ब्राह्मण हे नेहमी असे म्हणत की, भद्रसेन राजा हा धन्य आहे. त्याचा अमात्य कोणत्याही प्रकारची लाच न घेता, योग्य असेच न्यायदान करतो. त्याचा प्रधान सुद्धा खूप चांगला आहे. ।।११।। या राजास पूर्व सुकृताने सुंदर पतिव्रता अशी गोड बोलणारी पत्नी लाभलेली आहे, तसेच त्यास त्याच्या भाग्याने एक सुपुत्रही आहे. ।।१२।। कृपावंत, प्रज्ञावंत आणि श्रेष्ठ असे गुरू, गुरूभक्त शिष्य आणि विद्वान गुणवान पुत्र ह्या गोष्टी मह‌द्भाग्यानेच प्राप्त होतात. ||१३|| तसेच प्रेमळ, सदैव सावधचित्त असलेला श्रोता, उदारवृत्तीचा यजमान, निरोगी सुंदर हेसुद्धा गत पुण्याईनेच प्राप्त होत असते. ||१४|| असो, या भद्रसेन राजा आणि कर्तव्यदक्ष प्रधान ह्या दोघांनाही एक-एक पुत्र होते. ते दोघेही जन्मतःच शिवभक्त होते. ।।१५।। राजपुत्राचे नाव सुधर्म असे होते, तर प्रधानाच्या मुलाचे नाव तारक असे होते. हे दोघेही जन्मापासूनच शिवाचे निस्सीम भक्त होते. ते सदासर्वदा शिवध्यानातच रमलेले असत. ।।१६।। त्यांचे स्वभाव अतिप्रेमळ होते. त्यांच्या वृत्ती या वैराग्यपूर्ण होत्या. त्यांना लौकिक हेतूने जवळीक साधणाऱ्यांची संगत आवडत नसे. ।।१७।।


पंचवर्षी दोघे कुमर ।। लेवविती वस्त्रे अलंकार ।। गजमुक्तमाळा मनोहर ।। नाना प्रकारें लेवविती ॥१८॥ तंव ते बाळ दोघेजण ।। सर्वालंकारउपाधी टाकून ।। करिती रुद्राक्षधारण ।। भस्म चर्चिती सर्वांगीं ।॥१९॥ आवडे सर्वदा एकांत ॥ श्रवण करिती शिवलीलामृत ।। बोलती शिवनामावळी सत्य ।। पाहणें शिवपूजा सर्वदा ।। २० ।। आश्चर्य करिती राव प्रधान ।। यांस कां नावडे वस्त्रभूषण ।। करिती रुद्राक्षभस्मधारण ।। सदा स्मरण शिवाचें ॥ २१ ॥ विभूति पुसोनि रुद्राक्ष काढिती ।। मागुती वस्त्रे भूषणें लेवविती ॥ ते सवेंचि ब्राह्मणांसी अर्पिती ।। घेती मागुती शिवदीक्षा ॥ २२ ॥ शिक्षा करितां बहुत ।। परी ते न सांडिती आपुलें व्रत ।। राव प्रधान चिंताग्रस्त ।। म्हणती करावें काय आतां ॥२३॥ तों उगवला सुकृतमित्र ।। घरासि आला पराशर ॥ सर्वे वेष्टित ऋषींचें भार ॥ अपर सूर्य तेजस्वी ॥२४॥ जो कृष्णद्वैपायनाचा जनिता ।। त्रिकाळज्ञानी प्रतिसृष्टिकर्ता ।। जो वसिष्ठाचा नातू तत्त्वतां ॥ राक्षससत्र जेणें केलें ॥२५॥ जेवीं मनुष्यें वागती अपार ॥ तैसेंचि पूर्वी होते रजनीचर ॥ ते पितृकैवारें समग्र ।। जाळिलें सत्र करूनियां ॥ २६ ॥

ते दोघेही कुमार हे जेव्हा पाच वर्षांचे झाले तेव्हा त्यांना वस्त्रे, अलंकार घालून त्यांच्या गळ्यात मोत्यांच्या माळा घालण्यात आल्या. ।।१८।। मात्र त्यावेळी त्या दोन्ही कुमारांनी ते राज वस्त्रालंकार हे काढून टाकले आणि अंगी रुद्राक्ष धारण करून सर्वांगी भस्म विलेपन केले. ।।१९।। त्यांना नित्य एकांत आवडत असे. शिवपूजा, शिवध्यान आणि शिवनामाचा ध्यास त्यांना लागलेला होता. सतत शिवपूजनाचा सोहळा पाहणे त्यांना आवडे. ।।२०।। अंगी रुद्राक्ष धारण करायचे. भाळी विभूती लावायची, सदैव शिवनामाचा जप करायचा, सतत शिव ध्यानात रमून जायचे, ह्याच गोष्टींची विशेष गोडी होती. याचेच राजा आणि प्रधान ह्यांना मोठे आश्चर्य वाटत असे. ।। २१ ।। एकदा राजाने त्यांच्या अंगची विभूती पुसून त्यांना वस्त्रालंकार घातले, तर त्याम्नी ते काढून टाकले आणि ते वस्त्रालंकार त्यांनी ब्राह्मणांना दान करून टाकले. ।।२२।। त्यांच्या याकृती बद्दल त्यांना शिक्षा करून दूर करण्याचा प्रयत्न करूनही पाहिला गेला, पण त्यात काही यश आले नाही. तेव्हा आता काय करावे असा प्रश्न राजापुढे पडला. ।। २३ ।। तोच एक दिवस मोठ्या भाग्याने राजाकडे त्यांचे कुलगुरू पराशर ऋषी हे आपल्या काही शिष्यांच्या सोबत आले. ||२४|| हे पराशर ऋषी कोण? तर ते कृष्णद्वैपायन व्यासाचे पिता, त्रिकाळज्ञानी, राक्षसांचे संहारकर्ते, प्रतिसृष्टी निर्माण करणारे आणि जे वसिष्ठांचे नातू. ते पराशर ऋषी भद्रसेन राजाच्याकडे येते झाले. ।॥२५॥ ज्याप्रमाणे मनुष्य हा पशूसमान वर्तणूक करतो, अयोग्य अधर्म अनीतीने वागतो; त्याप्रमाणे गैरवर्तन करणाऱ्या अनेक राक्षसांना पराशरांनी यज्ञ करून जाळून टाकले होते. ।।२६।।


जनमेजयें सर्पसत्र केलें ।। तें आस्तिकें मध्येंचि राहविलें ।। पराशरासी पुलस्तीनें प्रार्थिलें ।। मग वांचले रावणादिक ॥ २७॥ विरंचीस दटावूनि क्षणमात्रं ॥ प्रतिसृष्टि केली विश्वामित्रं ॥ तेवीं पितृकैवारें पराशरें ।॥ वादी जर्जर पैं केले ॥ २८ ॥ ते सांगावी समूळ कथा ।। तरी विस्तार होईल ग्रंथा ।। यालागीं ध्वनितार्थ बोलिलों आतां ।। कळलें पाहिजे निर्धारें ।॥। २९ ।। ऐसा महाराज पराशर ।। ज्याचा नातू होय शुकयोगींद्र ।। तो भद्रसेनाचा कुलगुरु निर्धार ॥ घरां आला जाणोनी ॥ ३० ॥ राव प्रधान सामोरे धांवती ।। साष्टांग नमूनि घरासी आणिती ।। षोडशोपचारीं पूजिती ।। भाव चित्तीं विशेष ।। ३१ ।। समस्तां वस्त्रं भूषणें देऊन ।। राव विनवी कर जोडून ॥ म्हणे दोघे कुमर रात्रंदिन ॥ ध्यान करिती शिवाचें ॥ ३२ ॥ नावडती वस्त्रे अलंकार ॥ रुद्राक्षभस्मावरी सदा भर ॥ वैराग्यशील अणुमात्र ।। भाषण न करिती कोणासी ॥३३॥ इंद्रियभोगांवरी नाहीं भर ।। नावडे राजविलास अणुमात्र ।। गजवाजियानीं समग्र ।। आरूढावें आवडेना ॥३४॥ पुढें हे कैसें राज्य करिती ।। हैं आम्हांसी गूढ पडलें चित्तीं ।॥ मग ते दोघे कुमर आणोनि गुरुप्रती ॥ दाखविलें भद्रसेनें ॥३५॥

ज्याप्रमाणे जनमेयजयाने केलेला सर्प यज्ञ हा आस्तिकाने मध्यस्थी करून थांबविला व सर्पाना अभयदान दिले. तसेच पराशरासही पुलस्तीने प्रार्थना करून ते राक्षसांना जाळणे थांबविले म्हणून तर रावणादिक राक्षस हे वाचले. ||२७|| विश्वामित्रांनी ब्रह्मदेवास बाजूस सारून जशी प्रतिसृष्टी निर्माण केली, तद्वत पित्याचा कैवार घेऊन पराशरानेही आपल्या शत्रूला जर्जर केले. ||२८|| ही सर्व कथा जर विस्ताराने सांगायची म्हटली तर कथाविस्तार होईल म्हणून ती इथे थोडक्यात सांगितली.।।२९।। असा जो पराशर ऋषी जो राजा भद्रसेनाचा कुलगुरू, तो मोठ्या परमभाग्याने राजाकडे येता झाला. ।।३०।। राजाने आणि प्रधानाने मोठ्या विनम्रपणे पुढे होऊन त्यांचे स्वागत केले. त्यांची षोडशोपचार पूजा केली. सोबतच्या ऋषिवरांचाही उचित असा आदरसत्कार केला. ||३१|| तेव्हा राजाने सर्वांना वस्त्रालंकार दिले, राजा भद्रसेनाने त्या दोन्ही कुमारांना त्यांच्यासमोर आणून उभे केले आणि कुलगुरूंना विनंती केली की, ‘महाराज, हे दोन्ही कुमार रात्रंदिवस शिवाचेच ध्यान करतात. ।।३२।। त्यांना वस्त्रालंकार आवडत नाहीत. ते नित्य रुद्राक्ष आणि भस्म धारण करतात. ते वैराग्य वृत्तीचे असून, कोणाशीही फारसे भाषणही करीत नाहीत. ।।३३।। त्यांचा इंद्रियभोगाकडे कल नाही. त्यांना राजविलास, राजभोग पसंत नाहीत. त्यांना हत्ती, घोडेवैभव काहीही प्रिय नाही. ॥३४।। त्यामुळेच हे दोघेही पुढे कसे राज्य करतील? आमच्यामागे या राज्याचा कारभार कसा सांभाळतील? ह्याची आम्हास चिंता वाटते. तेव्हा हे मुनिवर, आपण एकदा या दोन्ही कुमारांना आपल्या कृपावंत नजरेने पाहावे.” असे म्हणून राजाने त्यांना पुढे केले. ।।३५।।


गुरूनें पाहिलें दृष्टीसीं ।॥ जैसें मित्र आणि शशी ॥ तैसें तेजस्वी उपमा तयांसी ।। नाहीं कोठें शोधितां ॥ ३६ ॥ यावरी बोले शक्तिसुत ॥ म्हणे हे कां झाले शिवभक्त ॥ यांची पूर्वकथा समस्त ।। ऐक तुज सांगतों ।॥ ३७ ॥ पूर्वी काश्मीरदेशांत उत्तम ।। महापट्टण नंदिग्राम ।। तेथील वारांगना मनोरम ।। महानंदा नाम तियेचें ॥ ३८ ॥ त्या ग्रामींचा तोचि भूप ॥ पृथ्वीमाजी निःसीम स्वरूप ।। ललिताकृति पाहोनि कंदर्प ॥ तन्मय होवोनि नृत्य करी ॥ ३९ ॥ जैसा उगवला पूर्णचंद्र ॥ तैसें तिजवरी विराजे छत्र ।। रत्नखचित यानें अपार ।। भाग्यापार नाहीं तिच्या ॥४०॥ रत्नमय दंडयुक्त ॥ चामरें जीवरी सदा ढळत ।। मणिमय पादुका रत्नखचित ।। चरणीं जिच्या सर्वदा ॥ ४१ ॥ विचित्र वसनें दिव्य सुवास ।। हिरण्मय रत्नपर्यंक राजस ।। चंद्ररश्मिसम प्रकाश ।। शय्या जिची अभिनव ।।४२ ।। दिव्याभरणीं संयुक्त ।। अंगीं सुगंध विराजित ।। गोमहिषीखिल्लारें बहुत ।। वाजी गज घरीं बहुवस ॥ ४३ ॥ दास दासी अपार ।। घरीं माता सभाग्य सहोदर ।। जिचें गायन ऐकतां किन्नर ।। तटस्थ होती कोकिळा ॥४४॥

जेव्हा पराशर ऋषर्षीनी त्या कुमारांकडे पाहिले तेव्हा त्यांना ते चंद्रसूर्यासारखे तेजस्वी अन ज्यांच्यासाठी कोणतीही उपमा शोधूनही सापडणार नाही असे भासले. ।।३६।। पराशरांनी त्या दोन्ही पुत्रांना आपल्या दिव्य दृष्टीने एकवार पाहिले. क्षणभर डोळे मिटले. भूत, भविष्य आणि वर्तमानाचा वेध घेतला आणि ते म्हणाले, “राजन, ह्या वोघांच्याही शिवभक्तीचे, वैराग्यवृत्तीचे, अनासक्ततेचे कारण काय? ते मी प्रथम तुम्हास सांगतो, ते तुम्ही ऐका.”।।३७।। पूर्वी काश्मीर देशात नंदिग्राम नावाचे एक महानगर होते. तिथे महानंदा नावाची एक वारांगना राहात होती. ।। ३८ ।। तीच त्या गावाची मुख मानली जात असे. ती अत्यंत रूपवान, गुणवान होती. तिचे देखणे रूप पाहून प्रत्यक्ष मदनही तिच्यापुढे नृत्य करीत करीत असे. ||३९|| तिच्या वैभवाचा पूर्ण चंद्रोदय झाला होता. तिच्याकडे भरपूर धनसंपत्ती, दासदासी होत्या. तिच्याकडे वैभवाला कसलीच सीमा नव्हती. ।।४० ।। रत्नजडित दंड असलेल्या चवऱ्या तिच्यावर ढाळल्या जात. तिच्या पायांत नेहमी रत्नजडित मणिमय अशा पादुका असत. ।।४१।। तिची वस्त्रे नानाविध रंगांची आणि दिव्य सुवासिक अशी असत. तिचा पलंग हा सोन्याचा होता. त्यावर चंद्रकिरणांची प्रभा पडावी अशी तिची शय्या होती. ।।४२।। दिव्य अशा वस्त्रालंकारांनी सुशोभित असलेल्या तिच्या अंगाचा सुवास सर्वत्र पसरत असे. तसेच तिच्याकडे विपुल असे समृद्ध गोधनही होते. तसेच हत्ती, घोडे सुद्धा तिच्याकडे होते. ।।४३।। तिच्या अनेक दास दासी होत्या. तिला आई अन एक भाऊ होता. तिचे गायन इतकेव सुस्वर असे की, ते ऐकताच प्रत्यक्ष किन्नर आणि कोकिळाही स्तब्ध होत असत. ।।४४।।


जिच्या नृत्याचें कौशल्य देखोन ।। सकळ नृप डोलविती मान ।। तिचा भोगकाम इच्छन ।। भूप सभाग्य येती घरा ॥४५॥ वेश्या असोनि पतिव्रता ।। नेमिला जो पुरुष तत्त्वतां । त्याचा दिवस न सरतां ।। इंद्रासही वश्य नव्हे ।।४६ ।। परम शिवभक्त विख्यात ।। दानशीळ उदार बहुत ।। सोमवार प्रदोषव्रत ।। शिवरात्र करी नेमेंसी ॥ ४७ ॥ अन्नछत्र सदा चालवीत ।। नित्य लक्षत्रिदळें शिव पूजीत ।। ब्राह्मणहस्तें अद्भुत ।। अभिषेक करवी शिवासी ॥४८॥ याचक मनीं जें जें इच्छीत ।। तें तें महानंदा पुरवीत ।। कोटि लिंगें करवीत ।। श्रावणमासीं अत्यादरें ॥ ४९ ॥ ऐक भद्रसेना सावधान ।। कुक्कुट मर्कट पाळिलें प्रीतीकरून ।। त्यांच्या गळां रुद्राक्ष बांधोन ।। नाचूं शिकविलें कौतुकें ।॥ ५० ॥ आपुलें जें कां नृत्यागार ।। तेथें शिवलिंग स्थापिलें सुंदर ।। कुक्कुट मर्कट त्यासमोर ।। तेथेंचि बांधी प्रीतीनें ॥ ५१ ॥ करी शिवलीलापुराणश्रवण ।। तेंही ऐकती दोघेजण ।। सवेंचि महानंदा करी गायन ।। नृत्य करी शिवापुढें ।॥५२॥

तिचे विलक्षण असे नृत्यकौशल्य पाहून मोठमोठे राजे माना डोलवत. तिच्याशी अंगसंग करण्याच्या हेतूने, तिची भोगेच्छा धरून अनेक पुरुष तिच्याकडे येत असत. ।।४५।। ती स्वतः वेश्या असूनही मोठी पतिव्रता होती. ती अशा अर्थाने की, तिने एकदा का एकास नियुक्त केले असेल तर त्या दिवशी ती इंद्रासही वश्य होत नसे. ।।४६ ।। ती विख्यात परम शिवभक्त होती. ती दानशूर आणि उदार वृत्तीची होती. ती नेहमी शिवाचे सोम प्रदोषव्रत करीत असे. तसेच प्रत्येक महिन्याच्या शिवरात्रीस आणि माघ महिन्याच्या महाशिवरात्रीस ती खास शिवपूजा करीत असे. ।।४७।। त्या दिवशी ब्राह्मणांच्या हस्ते शिवपूजन, रुद्राभिषेक इत्यादी धर्मकृत्ये करवून घेत असे. नित्य शिवाची बिल्वपूजा करीत असे. ।।४८।। तिच्या दारी येणारा याचक जे जे म्हणून मागेल ते ती त्यास देत असे. दर श्रावण महिन्यात कोटी शिवलिंगे तयार अरून त्यांचे पूजन ती करीत असे. ।।४९।। हे राजन, हे भद्रसेना आता मी काय सांगतो ते नीट ऐक. तिने मोठ्या प्रेमाने आपल्या महाली एक कोंबडा आणि एक माकड पाळले होते. त्या प्राण्यांच्या गळ्यात रुद्राक्ष बांधून तिने त्यांना शिवनामात नाचायला शिकविले होते. ।।५०।। आपल्या नृत्यशाळेत तिने एका सुंदरशा शिवालयाची उभारणी केली होती. त्या शिवालयातील शिवलिंगासमोरच ती महानंदा या कुक्कुट आणि मर्कटास बांधून ठेवीत असे. ।।५१।। महानंदा जेव्हा शिवपुराण श्रवणास बसत असे तेव्हा त्या दोघांना ती सोबत घेऊन बसत असे. तसेच ती शिवापुढे नृत्यगायन सेवाही समर्पित करीत असे. ।।५२।।


महानंदा त्यांसी सोडून ।। नृत्य करवी कौतुकें करून । त्यांच्या गळां कपाळीं जाण ।। विभूति चर्ची स्वहस्तें ।॥ ५३ ॥ एवं तिच्या संगतीकरून ।। त्यांसही घडतसे शिवभजन ।। असो तिचें सत्त्व पाहावयालागोन ।। सदाशिव पातला ॥५४॥ सौदागराचा वेष धरिला ।। महानंदेच्या सदना आला ।। त्याचें स्वरूप देखोनि ते अबला ।। तन्मय झाली तेधवां ॥५५॥ पूजा करोनि स्वहस्तकीं ।। त्यास बैसविलें रत्नमंचकीं ।। तों पृथ्वीमोलाचें हस्तकीं ।। कंकण त्याच्या देखिलें ।॥५६ ।। देखतां गेली तन्मय होऊन ।। म्हणे स्वर्गीची वस्तु वाटे पूर्ण ।। विश्वकर्त्यानें निर्मिली जाण ।। मानवी कर्तृत्व हैं नव्हे ।।५७ ।। सौदागरें तें काढून ।। तिच्या हस्तकीं घातलें कंकण ।। येरी होवोनि आनंदघन ।। नेम करी तयासीं ।॥५८॥ पृथ्वीचें मोल हैं कंकण ।। मीही बत्तीसलक्षणी पद्मिण ॥ तीन दिवस संपूर्ण ॥ दासी तुमची झालें मी ।।५९ ।। तयासी तें मानलें ।। सवेंचि त्यानें दिव्यलिंग काढिलें ।। सूर्यप्रभेहूनि आगळें ।॥ तेज वर्णिलें नवजाय ।।६०।।

शिवापुढे स्वतःची नृत्यसेवा सादर करताना ती त्या दोघांनाही मुक्त करीत असे आणि त्यांच्याकडून शिवापुढे नृत्य करवून घेत असे. स्वतःच्या हाताने ती त्यांच्या कपाळी भस्म, विभूती लावत असे. ।।५३।। याप्रकारे त्या दोघांनाही तिच्या संगतीने शिवभजनाचा लळा लागला होता. असो. एकदा असे झाले की, आपल्या या शिवभक्त महानंदेचे सत्त्व पाहण्यासाठी भगवान सदाशिव हे तिच्याकडे आले. ।।५४|| भगवान तिच्याकडे एका सौदागराचे रूप धारण करून आले. त्यांचे ते रूप पाहून महानंदा देहभान विसरून त्यांच्याकडे पाहातच राहिली. ।। ५५।। तिने त्याच्या हातास धरून त्या सौदागरास आपल्या मंचकावर बसविले. त्याची आगत स्वागत पूजा केली. हे करीत असताना महानंदेने त्या सौदागराच्या हातात एक कंकण पाहिले. ।।५६।। ते दिव्य कंकण पाहून ती इतकी तन्मय होऊन गेली की, जणू काय एखादी स्वर्गलोकीची अप्राप्त वस्तूच पाहावी. ते दिव्य कंकण ही तिच्या लेखी कोणा मानवाची नव्हे तर प्रत्यक्ष विश्वकर्त्याचीच निर्मिती होती. ।। ५७|| त्या सौदागराने जेव्हा तिच्यावर प्रसन्न होत आपल्या हातीचे ते दिव्य कंकण तिच्या हाती घातले. तेव्हा ती आनंदी झाली आणि तिने त्याच्याशी एकनिष्ठ राहण्याचा नेम केला. ।।५८।। ती म्हणाली, “हे पृथ्वीचे मोल असलेले दिव्य कंकण मला देणाऱ्या हे परमपुरुषा, मी तुला वचन देते की, मी आजपासून तीन दिवसांसाठी संपूर्णतः तुझी आणि तुझीच दासी होऊन राहीन. “।।५९|| तेव्हा सौदागरानेही ते मान्य केले आणि आपल्या हातीचे ते दिव्य कंकण काढून त्याने तिच्यापुढे केले. त्याचे तेज सूर्यकांतीहून निराळे असे अवर्णनीय होते. ।।६०।।


लिंग देखोनि ते वेळीं ।। महानंदा तन्मय झाली ॥ म्हणे जय जय चंद्रमौळी ॥ म्हणोनि वंदी लिंगातें ॥६१ ॥ म्हणे या लिंगाच्या प्रभेवरूनी ।। कोटि कंकणें टाकावीं ओवाळूनी ।। सौदागर म्हणे महानंदेलागूनी ।। लिंग ठेवीं जतन हैं ॥ ६२ ॥ म्हणे या लिंगापाशीं माझा प्राण ॥ भंगलें की गेलें दग्ध होऊन । तरी मी अग्निप्रवेश करीन ।। महाकठिण व्रत माझें ॥६३॥ येरीनें अवश्य म्हणोन ॥ ठेविलें नृत्यागारीं नेऊन ।। मग दोघे करिती शयन ।। रत्नखचित मंचकीं ॥ ६४ ॥ तिचें कैसें आहे सत्त्व ।। धैर्य पाहे सदाशिव ।। भक्त तारावया अभिनव ।। कौतुकचरित्र दाखवी ॥६५॥ त्याच्या आज्ञेकरून ॥ नृत्यशाळेसी लागला अग्न ।। जन धांवों लागले चहूंकडोन ।। एकचि हांक जाहली ॥ ६६ ॥ तीस सावध करी मदनारी ।। म्हणे अग्नि लागला ऊठ लवकरी ।। येरी उठली घाबरी ।। तंव वातात्मज चेतला ॥६७ ।। तशामाजी उडी घालून ॥ कंठपाश त्यांचे काढून ॥ कुक्कुट मर्कट दिधले सोडून ॥ गेले पळोन वनाप्रती ।।६८ ।। नृत्यशाळा भस्म झाली समग्र ॥ मग शांत झाला सप्तकर ॥ यावरी पुसे सौदागर ॥ महानंदेप्रति तेधवां ॥६९॥

तिचा तो भाव पाहिला आणि सौदागराने महानंदेस एक दिव्यलिंग दिले. ते दिव्यलिंग पाहून महानंदा तन्मय झाली. तिने मोठ्या आनंदाने जय जय चंद्रमौळी असे म्हणून त्या लिंगास वंदन केले. ।।६१।। त्या लिंगाचे ते अलौकिक तेज पाहून ती म्हणाली, “स्वामी, या कंकणासारखी कोटी कंकणे यावरून ओवाळून टाकावीत.” असे हे आहे. त्यावर सौदागर तिला म्हणाला की, “तू हे लिंग प्राणापेक्षाही जपून ठेव. ” ।।६२।। पुढे तो असेही म्हणाला की, “हे प्रिये, हे लिंग म्हणजे माझा जीव की प्राण आहे. जर का चुकून जरी हे लिंग भंगले किंवा ते दग्ध झाले तर मी अग्निप्रवेश करीन, माझे व्रत हे महाकठीण आहे.”।।६३।। त्यावेळी महानंदेने सौदागरास आपण हे लिंग नीट जतन करू असे वचन दिले. तिने ते लिंग नेऊन आपल्या नृत्यशाळेत ठेवले. मग दोघे शयनगृहात गेले आणि तेथील रत्नखचित मंचकावर पहुडले. ।। ६४ ।। तेव्हा त्या सौदागराच्या म्हणजेच भगवान शिवांच्या मनात तिची परीक्षा घेण्याचा विचार आला. त्यांनीच एक अभिनव घटना घडवून आणली. ।।६५।। त्यांच्याच इच्छेने त्या नृत्यशाळेस अकस्मात अग्नी लागला. सर्वत्र एकच धावपळ झाली. ।।६६ || तेव्हा त्या मदनारी शिवाने तिला जागे केले. प्रिये ऊठ, अग्नी लागलाय, असे तो तिला म्हणाला. तोवर अग्नीने मोठाच भडका उडाला. ||६७ || तेव्हा महानंदेने प्रथम कुक्कुट, मर्कट यांना जे बांधून ठेवले होते, त्यांना मुक्त केले. ते दोघेही अग्नीचे ते भयानक रूप पाहून भीतीने दूर वनात पळून गेले. इकडे मात्र तोवर संपूर्ण नृत्यशाळा जळून भस्मसात झाली. ।। ६८ ।। थोड्या वेळाने अग्नि काहीसा शांत झाल्यावर सौदागराने महानंदेस विचारले, माझे दिव्य लिंग सुरक्षित आहे ना? ।।६९।।


माझें दिव्यलिंग आहे कीं जतन ।। महानंदा घाबरी ऐकोन ॥ वक्षःस्थळ घेत बडवून ।। म्हणे दिव्यलिंग दग्ध झालें ॥७०॥ सौदागर बोले वचन ॥ नेमाचा आजि दुसरा दिन ॥ मी आपुला देतों प्राण ॥ लिंगाकारणें तुजवरी ॥ ७१ ॥ मग त्रिचरण चेतविला ॥ आकाशपंथें जाती ज्वाळा ॥ सौदागर सिद्ध झाला। समीप आला कुंडाच्या ॥ ७२ ॥ अतिलाघवी उमारंग ॥ जो भक्तजनभवभंग ॥ उडी घातली सवेग ।। ॐनमः शिवाय म्हणवुनी ॥ ७३ ॥ ऐसें देखतां महानंदा ।। बोलाविलें सर्व ब्रह्मवृंदा ।। लुटविली सर्व संपदा ।। कोशसमवेत सर्वही ॥७४॥ अश्वशाळा गजशाळा संपूर्ण ॥ सर्व संपत्तिसहित करी गृहदान ।। महानंदेनें स्नान करून ।। भस्म अंगीं चर्चिलें ।॥ ७५ ॥ रुद्राक्ष सर्वांगीं लेऊन ।। हदयीं चिंतिलें शिवध्यान ।। हर हर शिव म्हणवून ॥ उडी निःशंक घातली ॥ ७६ ॥ सूर्यबिंब निघे उदयाचळीं ।। तैसा प्रगटला कपाळमौळी ॥ दशभुज पंचवदन चंद्रमौळी ।। संकटीं पाळी भक्तांतें ।॥७७॥

तेव्हा महानंदा छाती बडवून घेत म्हणाली, “महाराज, क्षमा असावी. पण अचानक लागलेल्या या अग्नीमुळे आपले ते दिव्यलिंग दग्ध झाले आहे”।॥७०॥ महानंदेचे ते शब्द ऐकले आणि सौदागर तिला म्हणाला, “अरेरे हे काय झाले! त्या लिंगाशिवाय तर मी जगूच शकत नाही. आज तर नेमाचा दुसरा दिवस आहे. ते दिव्य लिंग हे माझे सर्वस्व होते. आता त्या लिंगासाठी मी माझा देह त्याग करतो.” ।। ७१।। फक्त तसे बोलून सौदागर थांबला नाही तर त्याने खरोखरच अग्नी चेतविला. त्याच्या ज्वाळा आकाशाच्या दिशेने उंच उंच जाऊ लागल्या. सौदागर सिद्ध झाला. तो त्या अग्निकुंडाच्या जवळ आला. ।।७२।। तो उमारंग सदाशिव हा अतिलाघवी आहे. तो भक्तांची संसार बुद्धी नाहीशी करतो. त्या सदाशिवरूपी सौदागराने खरोखरच एकवार शिवनामाचा जयजयकार केला आणि त्याने त्या धगधगत्या अग्निकुंडात उडी घेतली. ।॥७३॥ ते पाहून महानंदेनेही लगेच ब्रह्मवृंदांना बोलावून घेतले. सर्वस्व त्यागाचा संकल्प केला. एका क्षणात विरक्तमनाने तिने तिच्या सर्व धनसंपदा, वैभव ह्यांचा त्याग करून ते सर्व वैभव, ती संपत्ती ही दान करून टाकली. ।।७४।। तिने तिची अश्वशाळा, गजशाळाही दान केली. सारे काही लुटविले. मग तिने स्नान केले. धवल वस्त्र परिधान केले. अंगी भस्म चर्चिले.।।७५|| गळ्यातला रुद्राक्ष वंदन करून कपाळी लावला. तिने मनोमन भगवान शिवांचे ध्यान केले आणि एका दृढ निश्चयाने हर हर शिव म्हणून तिनेही त्या धगधगत्या अग्नीत उडी घेतली.।॥७६॥ त्याबरोबर प्राचीवर जसे रविबिंब उदयाला यावे तसे भक्तरक्षक भगवान शिव हे त्या अग्निज्वालेतून प्रगट झाले. तो दहा हातांचा, पाच मुखांचा मस्तकी चंद्राची कोर असलेला भक्तवत्सल भगवान भक्ताच्या रक्षणास धावून आला. ॥७७॥


माथां जटांचा भार ॥ तृतीयनेत्रीं वैश्वानर ।। शिरीं झुळझुळ वाहे नीर ॥ अभयंकर महाजोगी ।॥७८॥ चंद्रकळा तयाचें शिरीं ।॥ नीळकंठ खट्वांगधारी ॥ भस्म चर्चिलें शरीरीं ॥ गजचर्म पांघुरला ॥७९॥ नेसलासे व्याघ्रांबर ।। गळां मनुष्यमुंडांचे हार ॥ सर्वांगीं वेष्टित फणिवर ॥ दशभुजा मिरवती ।।८० ॥ वरचेवर कंदुक झेलीत ।। तेवीं दहा भुजा पसरोनी अकस्मात ।। महानंदेसी झेलूनि धरीत ।। हदयकमळीं परमात्मा ॥८१॥ म्हणे जाहलों मी सुप्रसन्न । महानंदे माग वरदान ॥ ती म्हणे हैं नगर उद्धरून ।। विमानीं बैसवीं दयाळा ॥ ८२ ॥ माताबंधूंसमवेत ।। महानंदा विमानीं बैसत ।। दिव्यरूप पावोनि त्वरित ।। नगरासमवेत चालली ॥ ८३ ॥ पावलीं सकळ शिवपदीं ।। जेथें नाहीं आधिव्याधी ।। क्षुधातृषाविरहित त्रिशुद्धी ।। भेदबुद्धि कैंची तेथें ॥८४॥ नाहीं काम क्रोध द्वंद्व दुःख ॥ मद मत्सर नाहीं निःशंक ।। जेथींचें गोड उदक ॥ अमृताहूनि कोटिगुणें ॥८५॥ जेथें सुरतरूंची वनें अपारें ।। सुरभींचीं बहुत खिल्लारें ।। चिंतामणींची धवलागारें ॥ भक्तांकारणें निर्मिलीं ।॥८६॥

त्याच्या मस्तकावर जटाभार होता, नेत्रात अग्नी दिसत होता. त्याच्या जटांतून गंगा झुळुझुळु वाहात होती. असा तो महायोगी आपला सव्यकर उंचावून तिच्यासमोर आला. ।। ७८|| त्याच्या शिरी चंद्राची कोर शोभत होती, त्याच्या निळ्या कंठाभोवती सर्पमाळा शोभत होत्या. त्याने भस्म धारण केले होते, अंगावर गजचर्म पांघरले होते. ।॥७९॥ त्याच्या कटीस व्याघ्रांबर शोभत होते, तर गळ्यात नरमुंडमाळा, असा हा फणिवर तिच्यासाठी आपले दाही हात पसरून धावला होता. ॥८०॥ त्याने त्या धगधगत्या अंग्नीकुंडात उडी टाकणाऱ्या महानंदेस एखादा चेंडू वरच्यावर झेलावा त्याप्रमाणे अग्नित पडण्याआधीच झेलले आणि आपल्या हृदयाशी लावले. ||८१|| शिव महानंदेस म्हणाले, “हे महानंदे, तुझ्या भक्ती आणि समर्पण भावावर मी अतिशय प्रसन्न झालो आहे. तुला काय हवा तो वर माग.” त्यावर ती म्हणाली, “हे देवाधिदेवा महादेवा, आता एकच मागणे आहे. आपण माझा, माझ्या कुटुंबीयांचा आणि या नगरीचा उद्धार करा.” ।।८२।। तेव्हा भगवान ‘तथास्तु’ असे म्हणताच ती माताबंधू ह्यांच्यासह सर्व नगरीसहित उद्धरून गेली. ।।८३ ।। ती सर्वांसह अंती त्या शिवलोकास गेली जेथे कोणत्याही प्रकारच्या आधी व्याधीचा त्रास नाही, जिथे कोणती उपाधी नाही, जिथे तहानभुकेचेही भान नाही किंवा कोणत्याच प्रकारचा भेदही नाही. ।।८४।॥ ज्या ठिकाणी काम, क्रोध, मद, मोह, मत्सर यातले काहीच राहात नाही. जिथले पाणीसुद्धा अमृतासमान असते. ॥८५॥ जिथे भक्तांसाठी कल्पवृक्षाच्या बागा आहेत, जिथे कामधेनूची अनेक खिल्लारे आहेत, जिथे भांडारीही चिंतामणींनी भरलेली आहेत. ।।८६।।


जेथें वोसणतां बोलती शिवदास ।। तें तें प्राप्त होय तयांस ।। शिवपद सर्वदा अविनाश ।। महानंदा तेथें पावली ॥८७॥ हे कथा परम सुरस ।। पराशर सांगे भद्रसेनास ।॥ म्हणे हे कुमर दोघे निःशेष ।। कुक्कुट मर्कट पूर्वीचें ॥८८॥ कंठीं रुद्राक्षधारण ॥ भाळीं विभूति चर्चुन ॥ त्याच पूर्वपुण्येंकरून ।। सुधर्म तारक उपजले ।।८९ ॥ हे पुढें राज्य करितिल निर्दोष ।। बत्तीसलक्षणी डोळस ।। शिवभजनीं लाविती बहुतांस ।। उद्धरतील तुम्हांतें ॥ ९० ॥ अमात्यसहित भद्रसेन ।। गुरूसी घाली लोटांगण ।॥ म्हणे इतुकेन मी धन्य ।। सुपुत्र उदरीं जन्मलें ॥ ९१ ॥ भद्रसेन बोलत पुढती ।। हे राज्य किती वर्षे करिती ।। आयुष्यप्रमाण किती ।। सांगा यथार्थ गुरुवर्या ॥ ९२ ॥ बहुत करितां नवस ।। एवढाचि पुत्र आम्हांस ।। परम प्रियकर राजस ।। प्राणांहून आवडे बहु ।। ९३ ।। तुमच्या आगमनें करून ।। स्वामी मज समाधान ।। तरी या पुत्राचें आयुष्यप्रमाण ॥ सांगा स्वामी मग तत्त्वतां ।॥९४॥

ज्या स्थानी येणारा शिवभक्त हा त्या एका शिवनामाशिवाय अन्य कशाचाच ध्यास धरत नाहीत. जिथे त्यांना जे हवे ते सर्वकाही न मागता प्राप्त होते, अशा त्या सर्वसुखदायक अशा शिवपदास महानंदा जाती झाली. ।।८७|| महानंदेची ही कथा सांगितल्यानंतर पराशर ऋषी म्हणाले, “हे राजा, माझ्या दिव्य दृष्टीने मी तुला खात्रीने सांगतो की, हे दोघे राजपुत्र आणि प्रधानपुत्र म्हणजेच गतजन्मीचे कुक्कुट, मर्कट आहेत. ॥८८॥ तिने त्यांच्या कंठी रुद्राक्ष बांधून, त्यांच्या भाळी विभूती चर्चुन त्यांना शिव उपासना करायला लावली. त्या पुण्याईच्या ठेव्यामुळेच ते या जन्मात सुधर्म आणि तारक म्हणून उपजले आहेत. ।। ८९ ।। हे राजन, हे दोघेही पुढे उत्तम प्रकारे राज्यकारभार करतील. ते स्वतः तर शिवोपासना करतीलच, पण ते इतरांनाही शिव भजनाची गोडी लावतील. ते तुमच्या कुळाचा नक्कीच उद्धार करतील.” ।।९० ।। गुरुमुखातून ते मुलांचे भाग्य ऐकले आणि भद्रसेनराजा आणि प्रधान ह्यांनी पराशर ऋषींस लोटांगण घालीत म्हटले, खरंच आमच्या परमभाग्यानेच आम्हास असे सुपुत्र लाभले आहेत. ।।९१।। पुढे त्या हर्षित झालेल्या राजाने ऋषींना असे विचारले की, “महाराज, आम्हास प्राणप्रिय असणाऱ्या या माझ्या सुपुत्राचे आयुष्यमान किती? तो किती वर्षे हे टाज्य भोगील, हे सांगावे.” ।।९२।। कारण मोठ्या नवसाने आम्हास हा पुत्र झाला आहे, तो आम्हास अत्यंत प्रिय आहे, त्याचे भविष्य जाणण्यास आम्ही उत्सुक आहोत. ।।९३।। गुरुदेवा, तुमच्या आगमनाने मला मोठे समाधान झाले आहे, तरी आपण सत्वर मला सुपुत्राचे आयुष्यमान किती ते सांगा. ।।९४।।


ऋषि म्हणे मी सत्य बोलेन देख ।। परी तुम्हांसी ऐकतां वाटेल दुःख ।। हे सभा सकळिक ॥ दुःखार्णवीं पडेल पैं ।।९५ ।। प्रत्ययसदृश बोलावें वचन ।। नातरी आंगास येतें मूर्खपण ।॥ तुम्हां वाटेल विषाहून ।। विशेष ते गोष्टी ।।९६ ।। भद्रसेन म्हणे सत्य वचन ॥ बोलावया न करावा अनमान ।॥ तरी तुझ्या पुत्रासी बारा वर्षे पूर्ण ॥ झाली असती जाण पां ॥९७॥ आजपासोनि सातवे दिवसीं ।॥ मृत्यु पावेल या समयासी ॥ राव ऐकतां धरणीसी ॥ मूर्च्छा येऊनि पडियेला ॥९८॥ अमात्यसहित त्या स्थानीं ।॥ दुःखाग्नींत गेले आहाळोनी ।। अंतःपुरीं सकळ कामिनी ।। आकांत करिती आक्रोशें । ९९ ॥ करूनियां हाहा:कार ।। वक्षःस्थळ पिटी नृपवर ॥ मग रायासी पराशर ॥ सावध करोनि गोष्ट सांगे ॥१००॥ नृपश्रेष्ठा न सोडीं धीर ॥ ऐक एक सांगतों विचार ॥ नैं पंचभूतें नव्हतीं समग्र ।। शशिमित्र नव्हते तें ॥१०१॥ नव्हता मायामय विकार ॥ केवळ ब्रह्ममय साचार ॥ तेथें झालें स्फुरण जागर ॥ अहं ब्रह्म म्हणोनियां ॥१०२॥ ते ध्वनि माया सत्य ॥ तेथोनि जाहलें महत्तत्त्व ॥ मग त्रिविध अहंकार होत ।। शिवइच्छेंकरूनियां ॥१०३॥

तेव्हा राजाच्या नजरेला नजर न देता काहीशा दुःखित स्वरात ते म्हणाले, “राजा, मला असे वाटते की, तू हा प्रश्न मला विचारू नयेस आणि मी त्याचे उत्तरही देऊ नये. कारण हे राजा, मी जे बोलेन ते सत्यच असेल. पण ते सत्य ऐकून ही सर्व सभा मात्र दुःखात पडेल. तो समाचार ऐकून तुम्हाला अतिशय दुःख आणि क्लेष होतील.” ।।९५।। ज्याची प्रचिती येते तेच बोलणे हे उत्तम, अन्यथा ते मूर्खपणाचे ठरते. माझे बोलणे हे तुम्हास विपाहूनही भयानक असे वाटेल. ।।९६ || त्यावर भद्रसेन राजा ऋषींना म्हणाला की, महाराज, आपण कोणताच अनमान न करता जे काही असेल ते स्पष्टपणे सांगा. तेव्हा पराशर ऋषी म्हणाले की, “राजा, तुझा पुत्र हा आता बारा वर्षांचा झाला आहे. ॥९७॥ त्यामुळे आजपासून बरोबर सातवे दिवशी याच वेळी तुझा हा पुत्र मृत्यू पावणार आहे. ” हे ऐकताच भद्रसेन राजा मूच्छित होऊन राजसभेतच कोसळला. ।।९८।। ती वार्ता ऐकून सारेजणच दुःखीकष्टी झाले. त्या समाचाराने अंतःपुरात एकच आकांत उठला. ।।९९|| तेव्हा शोकाकुल अन् मूर्च्छित झालेल्या भद्रसेनास सावध करीत अन् धीर देत पराशर ऋषी त्यास म्हणाले, ।।१००।। ‘हे राजन, तू असा धीर सोडू नकोस. मी काय सांगतो ते ऐक. जेव्हा पंचमहाभूते किंवा अगदी चंद्र-सूर्य-तारेही नव्हते, ।।१०१।। जेव्हा मायेचा कोणताच विकार नव्हता, केवळ सर्वत्र ब्रह्मानंदच भरलेला होता, तिथे प्रथम अहं ब्रह्म हे पहिले स्फुरण झाले. ।।१०२।। तो ध्वनी हा मायास्वरूप होता, त्यातूनच पुढे महतत्त्व आणि शिवईच्छेनेच सत्त्व रज आणि तम ह्या त्रिगुणांची उत्पत्ती झाली. ।।१०३॥


सत्त्वांशें निर्मिला पीतवसन ।। रजांशें सृष्टिकर्ता द्रुहिण ।। तमांशें रुद्र परिपूर्ण ।। सर्वस्थित्यंत करविता ॥१०४॥ विधीसी म्हणे सृष्टि रचीं पूर्ण ॥ येरू म्हणे मज नाहीं ज्ञान ॥ मग शिवे ७तयालागून ।। चारी वेद उपदेशिले ॥१०५॥ चहूं वेदांचे सार पूर्ण ॥ तो हा रुद्राध्याय परम पावन ।। त्याहूनि विशेष गुह्यज्ञान ।। भुवनत्रयीं असेना ॥ १०६ ॥ बहुत करीं हा जतन ।। त्याहूनि आणिक थोर नाहीं साधन ।। हा रुद्राध्याय शिवरूप म्हणून ।। श्री शंकर स्वयें बोले ॥१०७ ॥ जे रुद्राध्याय ऐकती पढती ।। त्यांच्या दर्शनें जीव उद्धरती ।। मग कमलोद्भव एकांतीं ।। सप्तपुत्रां सांगे रुद्र हा ॥१०८ ॥ मग सांप्रदायें ऋषीपासोन ।। भूतलीं आला अध्याय जाण ।। थोर जप तप ज्ञान ।। त्याहूनि अन्य नसेचि ।।१०९ ॥ जो हा अध्याय जपे संपूर्ण ।। त्याचेनि दर्शनें तीर्थं पावन ॥ स्वर्गांचें देव दर्शन । त्याचें घेऊं इच्छिती ॥११०॥ जप तप शिवार्चन ।। याहूनि थोर नाहीं जाण ।। रुद्रमहिमा अगाध पूर्ण ॥ किती म्हणोनि वर्णावा ॥११॥ रुद्रमहिमा वाढला फार ।। ओस पडिलें भानुपुत्रनगर ।। पाश सोडोनि यमकिंकर ।। रिते हिंडों लागले ॥१२॥

त्या त्रिगुणांतून सत्त्व गुणातून विष्णू, रजो गुणातून ब्रह्मा आणि तमोगुणातून आवि, अंत्य, मध्य घडविणाऱ्या रुद्राची निर्मिती झाली. ||१०४|| त्यानेच ब्रह्मदेवास सृष्टीरचनेचा आदेश विला, पण ब्रह्मा म्ह‌णाला की, मला या विषयाचे ज्ञान नाही. तेव्हा शिवाम्नी त्यास चार चेव सांगितले, त्यातून बोध केला. ।।१०५॥ त्या चारी वेदांचे जे सार म्हणजेच पवित्र असा रुद्राध्याय आहे. त्याहून विशेष आणि गुह्य असे ज्ञान तिन्ही लोकांत अन्यत्र कोठेच नाही. ।।१०६।। हे सर्व ज्ञान कळायला हवे, कारण त्याशिवाय जगात अन्य श्रेष्ठ असे काहीच नाही. हा रुद्राध्याय म्हणजे माझेच स्वरूप आहे असे भगवान शिवांनी सांगून ठेवले आहे. ॥१०७॥ जे कोणी या रुद्राध्यायाचे पठण, श्रवण करतात त्यांच्या दर्शनाने जीवांचा उद्धार होतो. हे रुद्राध्यायाचे गुह्य पुढे ब्रह्मदेवाने आपल्या सात पुत्रांना आणि ते गुप्त राखण्यासाठी एकांतात सांगितले. ||१०८|| त्यानंतर पराशरांनी राजास हेसुद्धा सांगितले तोच रुद्राध्याय हा पुढे ऋषींकडे सांप्रदायिक परंपरेने आलेला आहे. त्यापेक्षा अन्य काही श्रेष्ठ जपतप किंवा ध्यान नाही हे लक्षात घ्यावे. ।।१०९।। जे ज्ञानी पुरुष या रुद्राध्यायाचा जप करतात, त्यांच्या दर्शनाने तीर्थांनाही पवित्रता येते, स्वर्गातले देवही त्याचे दर्शन घेऊ इच्छितात. ।।१०।। जप, तप आणि विद्यार्जन हे ज्या रुद्राध्यायापेक्षा श्रेष्ठ नाही, त्या रुद्राध्यायाची महती ती काय आणि किती वर्णन करावी. ||१११।। जेव्हा रुद्र महिमा हा फार वाढला तेव्हा यमपुरी ओस पडली. यमदूत केवळ हातात मृत्युपाश घेऊनच फिरू लागले. ।।११२।।


मग यमें विधिलागीं पुसोन ।। अभक्तिकृत्या निर्मिलीं दारुण ।। तिणें कुतर्कवादीं भेदी लक्षुन ।॥ त्यांच्या हदयीं संचरली ॥११३॥ त्यांसी मत्सर वाढविला विशेष ॥ वाटे करावा शिवद्वेष ।। तेणें ते जावोनि यमपुरीस ।। महानरकीं पडले सदा ॥११४॥ यम सांगे दूतांप्रती ।। शिवद्वेषी जे पापमती ।। ते अल्पायुषी होती ।। नाना रीतीं जाचणी करा ॥ ११५ ॥ शिव थोर विष्णु लहान ।। हरी विशेष हर गौण ।। ऐसें म्हणती जे त्यांलागून ।। आणोनि नरकीं घालावें ॥११६॥ रुद्राध्याय नावडे ज्यांसी ।। कुंभीपाकीं घालावें त्यासीं ॥ रुद्रानुष्ठानें आयुष्यासी ॥ वृद्धि होय निर्धारें ॥११७॥ याकरितां भद्रसेना अवधारीं ।॥ अयुत रुद्रावर्तनें करीं ।। शिवावरी अभिषेक धार धरीं ।॥ मृत्यु दूरी होय साच ॥११८॥ अथवा शत घट स्थापून ॥ दिव्य वृक्षांचे पल्लव आणून ।। रुद्रं उदक अभिमंत्रून ।। अभिषिंचन पुत्रा करीं ॥ ११९ ॥ नित्य दहा सहस्र आवर्तनें पूर्ण ॥ क्षोणीपाळा करीं सप्तदिन ।। रायें धरिले दृढ चरण ॥ सद्गद होवोनि बोलत ॥१२०॥ सकल ऋषिरत्नमंडित पदक ॥ स्वामी तूं त्यांत मुख्य नायक ॥ काळ मृत्यु भय शोक ॥ गुरु रक्षी त्यांपासूनि ॥ १२१ ॥

तेव्हा यमाने ब्रह्मदेवास सांगून लोकांच्या मध्ये दारुण अभक्ती निर्माण केली. लोकांच्या मनात भेद, कुतर्क ह्यांनी प्रवेश केला. ।।११३।। लोकांच्या मनात मत्सर वाढू लागला, ते शिव द्वेष करू लागले आणि ते परिणामी महानरकात जाऊन पडले. ।।११४|| तेव्हा यमाने आपल्या दूतांना असा आदेश दिला की, शिवाचे द्वेष करणारे लोक कोण आहेत, त्यांची तुम्ही नीट तपासणी करा, नाना प्रकारे चाचणी करा. ।।११५।। जे हरीहरात भेद करतात, त्यांना लहानमोठा ठरवतात, त्यांना आणून नरकात घाला. ।।११६।। ज्यांना रुद्राध्याय नकोसा वाटतो त्यांना कुंभीपाकी घाला. मात्र जे रुद्राध्यायाचे पठण करतील त्यांच्या आयुष्याची वृद्धी होईल. ।।११७|| यासाठी हे भद्रसेन राजा, माझे तुला हेच सांगणे आहे की, तू तुझ्या पुत्रासाठी रुद्राची दहा हजार आवर्तने कर, शिवावर अभिषेकाची धार धर, म्हणजे शिवकृपेने पुत्राचा अपमृत्यू निश्चित टळेल. ।।११८॥ किंवा शंभर घटांची विधिवत स्थापना करून त्यातील पाणी हे रुदाध्ययाचा जप करत असताना पुत्रावर शिंपडण्याचे कार्य कर. ।।११९।। हे राजा, तू सात दिवस रोज दहा हजार रुद्रावर्तने कर, असे ऋषींनी सांगताच राजाने सद्गद होऊन त्यांचे चरण धरले आणि तो म्हणाला. ।॥१२०॥ “हे गुरुराया, ऋषींच्या रत्नांनी भरलेल्या तबकातील तूच सर्वात श्रेष्ठ आहेस. तूच प्रमुख आहेस. निज भक्तांचे दुःख आणि शोक ह्यापासून रक्षण करणारा तूच आहेस. ।।१२१।।


तरी त्वां आचार्यत्व करावें पूर्ण ॥ तुजसवें जे आहेत ब्राह्मण ॥ आणिक सांगती ते बोलावून ।। आतांचि आणितों आरंभीं ॥ २२ ॥ मग सहस्र विप्र बोलावून ॥ ज्यांची रुद्रानुष्ठानीं भक्ति पूर्ण ।। न्यासध्यानयुक्त पढून ।। गुरूपासून जे आलें ॥२३॥ परदारा आणि परधन ।। ज्यांसी वमनाहूनि नीच पूर्ण ।। विरक्त सुशील गेलिया प्राण ।। दुष्टप्रतिग्रह न घेती ॥ २४ ॥ जे शापानुग्रहसमर्थ ।। सामर्थ्य चालों न देती मित्ररथ ।। किंवा साक्षात उमानाथ ।। पुढें आणोनि उभा करिती ।। २५ ।। ऐसे लक्षणयुक्त ब्राह्मण ।। बैसला व्यासपिता घेऊन ।। सहस्र घट मांडून ।। अभिमंत्रोनि स्थापिलें ।। २६ ।। स्वर्धनीचें सलिल भरलें पूर्ण ।। त्यांत आम्रपल्लव घालून ।। रुद्रघोषं गर्जिन्नले ब्राह्मण। अनुष्ठान दिव्य मांडिलें ।। २७ ।। शास्त्रसंख्या झाले दिवस ।। सातवें दिवशीं माध्याह्रीं आला चंडांश ।। मृत्युसमय येतां धरणीस ।। बाळ मूर्च्छित पडियेला ॥ २८ ॥ एक मुहूर्त निचेष्टित ॥ चलनवलन राहिलें समस्त ।। परम घाबरला नृपनाथ ।। गुरु देत नाभीकारा ॥२९॥ रुद्रोदक शिंपोन ॥ सावध केला राजनंदन ।। त्यासी पुसती वर्तमान ।। वर्तलें तेंचि सांगत ॥ १३०॥

तेव्हा माझी तुला हीच विनंती आहे की, या कार्याचे आचार्यत्व हे तूच करावे. तुझ्यासारखेच आणि तू सांगशील तितके ब्राह्मण मी इथे बोलावून आणतो. ।।१२२।। मग पराशरांच्या सांगण्यावरून राजाने जे रुद्रपठणात पारंगत आहेत, जे शिवभक्त आहेत, ज्यांनी न्यास ध्यानयुक्त पठण हे गुरूकडून ज्ञात करून घेतले, अशा सहस्त्र ब्राह्मणांना राजाने बोलावले. ।।१२३।। त्या विप्रांना परधन आणि परस्त्री ही वमनाप्रमाणे होती. ते सर्वजण सुशील आणि वैराग्य वृत्तीचे होते. त्यांनी कधीही अयोग्य दान स्वीकारले नव्हते. ।।१२४।। ते शापानुग्रहास समर्थ होते. त्यांनी जर शाप दिला तर सूर्याचा रथही अडवण्याची ताकद त्यांच्यात होती आणि कृपानुग्रह केला तर साक्षात उमापती हा पुढे आणून उभा करण्याइतके तपोबल त्याच्या पाठीशी होते. ।।१२५।। अशा शुभ लक्षणांनी युक्त असलेल्या एक हजार ब्राह्मणांनासोबत पराशर ऋर्षी हे त्या कार्यास बसले. त्यांनी विधिवत सहस्र घट स्थापून त्यांची पूजा केली. ।।१२६।। त्या घटात त्यांनी गंगेचे पवित्र पाणी भरले. त्यात आम्रपलव घालून ब्राह्मणवर्ग रुद्रघोष करू लागले. एक दिव्य असे अनुष्ठान मांडले गेले. ।।१२७।। कालगनणेनुसार सहा दिवस पूर्ण झाले. सातव्या दिवशी माध्यान्ह समय येताच राजपुत्र हा धरणीवर मूच्छित होऊन पडला. ।।१२८।। तो साधारणपणे एक मुहूर्त निश्चेष्ट पडून राहिला. त्याच्या शरीराची कोणतीच हालचाल घडत नव्हती. ते पाहून भद्रसेन राजा पुरताच घाबरून गेला. तेव्हा पराशर गुरुदेवांनी त्यास खुणेनेच चिंता करू नकोस असे सांगितले. ।।१२९।। मग गुरुदेव पुढे आले, त्यांनी ते रुद्राभिमंत्रित पाणी त्या राजकुमाराच्या अंगावर शिंपडले, त्यास सावध केले आणि बाळ, काय झाले, असे विचारले. तेव्हा तो म्हणाला, ।।१३०।।


एक काळपुरुष भयानक थोर ।। ऊर्ध्व जटा कपाळी शेंदूर ।। विक्राळ दाढा भयंकर ।। नेत्र खदिरांगरासारिखे ॥ ३१ ॥ तो मज घेऊनि जात असतां ।। चौघे पुरुष धांवोनि आले तत्त्वतां ।। पंचवदन दशभुज त्यांची साम्यता ।। कमळभवांडीं दुजी नसे ॥ ३२ ॥ ते तेजें जैसे गभस्ती ।। दिगंततम संहारिती ।। भस्म अंगी व्याघ्रांबर दिसती ।। दशहस्तीं आयुधें ।॥ ३३ ॥ ते महाराज येऊन ॥ मज सोडविलें तोडोनि बंधन ॥ त्या काळपुरुषासी धरून ॥ करीत ताडण गेलें ते ॥३४॥ ऐसें पुत्रमुखींचें ऐकतां उत्तर ।। भद्रसेन करी जयजयकार ॥ ब्राह्मणांसी घाली नमस्कार ॥ आनंदाश्रु नेत्रीं आले ॥ ३५ ॥ अंगीं रोमांच दाटले ।। मग विप्रचरणीं गडबडां लोळे ।। शिवनाम गर्जत तये वेळे ।। देव सुमनें वर्षती ।। ३६ ।। अनेक वाद्यांचे गजर ।। डंका गर्जे अवघ्यांत थोर ।। मुखद्वयाचीं महासुस्वर ।। मृदंगवायें गर्जती ।। ३७ ।। अनेक वाद्यांचे गजर ।। शिवलीला गाती अपार ॥ शृंगें भृंगें काहाळ थोर ॥ सनया अपार वाजती ॥३८॥ चंद्रानना धडकती भेरी ।। नाद न माये नभोदरीं ।। असो भद्रसेन यावरी ।। विधियुक्त होम करीतसे ॥ ३९ ॥

एक भयानक असा काळपुरुष आता आला होता, त्याचे डोळे निखाऱ्यासारखे होते, त्याच्या जटा मस्तकावर बांधलेल्या आणि त्याने कपाळी शेंदूर लावलेला होता. ।।१३१।। तो मला त्याच्यासोबत घेऊन जात असताना तिथे चार पुरुष धावून आले. त्या चौघांनाही सारखी दिसणारी पाच मुखे आणि दहा हात होते. त्यांच्यातील साम्यास ब्रह्मांडात तुलना नव्हती. ।।१३२|| त्यांच्या अंगावर व्याघ्रांबरे होती. अंगी भस्माच्या खुणा होत्या. गळ्यात रुद्राक्षांच्या माळा आणि मुखी हर हर शंकर हे नाम आणि हातात शस्त्रे होती. ।।१३३।। त्यांनी मला त्या काळपुरुषाच्या हातातून सोडवून घेतले आणि त्या काळपुरुषास ते त्यांच्यासोबत मारत मारत घेऊन गेले. ।।१३४।। पुत्रमुखीचे हे शब्द ऐकताच राजा भद्रसेनाचा आनंद गगनात मावेना. त्याने शिवनामाचा एकच जयजयकार केला. आपल्या बाळाचे प्राणरक्षण करणाऱ्या गुरूंसह सर्व विप्रांचे राजाने आभार मानले. त्याच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले. ।।१३५।। त्याचे अंगी रोमांच उभे राहिले. राजा ब्राह्मणांच्या पायांवर लोळण घेऊ लागला. त्यावेळी शिवनामाचा गजर करीत देव *पुष्पवृष्टी करू लागले. ।।१३६।। त्याबरोबर नगरात मंगल वाद्ये वाजू लागली. सर्वत्र एक नवे चैतन्य, एक नवा उत्साह पसरला. शिवनामाचा डंका सर्वत्र वाजू लागला. दोन मुखांची मृदंग वाद्ये सुस्वरात वाजू लागली. ।।१३७|| सर्वत्र वाद्यांचा गजर होऊ लागला. लोक आनंदाने शिवलीला गाऊ लागले, शिवनामाचा जयजयकार चालू झाला. शिंगे, भुंगे, सनया, झांजा या वाजू लागल्या. ।।१३८।। चंद्राकार चामड्याची वाद्ये वाजू लागली. * नौबती निनादू लागल्या, ते वाद्यांचे स्वर पार आकाशी जाऊन भिडले. राजाने विधिवत होम संपन्न केला. ।।१३९।।


षड्स अन्ने शोभिवंत ॥ अलंकार दिव्य वस्त्रं देत ॥ अमोलिक वस्तु अद्भुत ।। आणोनि अर्पी ब्राह्मणांसी ॥१४० ।। दक्षिणेलागीं भांडारें ॥ मुक्त केलीं राजेंद्रे ॥ म्हणे आवडे तितुकें भरा एकसरें ।। मागें पुढें पाहूं नका ॥४१॥ सर्व याचक केलें तृप्त ।। पुरे पुरे हेचि ऐकिली मात ॥ धनभार झाला बहुत ।। म्हणोनि सांडिती ठायीं ठायीं ॥ ४२ ॥ ब्राह्मण देती मंत्राक्षता ।। विजय कल्याण हो तुझिया सुता ।। ऐसा अति आनंद होत असतां ॥ तों अद्भुत वर्तलें ॥४३॥ वसंत येत सुगंधवनीं । कीं काशीक्षेत्रावरी स्वर्धनी ।। कीं श्वेतोत्पलें मृडानी ॥ रमणलिंग अर्चिजे ॥४४॥ कीं निर्देवास सांपडे चिंतामणी ।। कीं क्षुधितापुढें क्षीराब्धी ये धांवुनी ॥ तैसा कमलोद्भवनंदन ते क्षणीं ।॥ नारदमुनी पातला ।।४५ ।। वाल्मीक सत्यवतीनंदन ।। औत्तानपादी कयाधुहृदयरत्न ।। हे शिष्य ज्याचें त्रिभुवनीं जाण ॥ वंद्य जे कां सर्वांतें ॥ ४६ ॥ जो चतुःषष्टिकळाप्रवीण निर्मळ ॥ चतुर्दशविद्या करतलमळ ।। ज्याचें स्वरूप पाहतां केवळ ॥ नारायण दुसरा कीं ॥४७॥ हैं कमलभवांड मोडोनि ॥ पुनः सृष्टि करणार मागुतेनी ॥ अन्याय विलोकितां नयनीं ।। दंडें ताडील शक्रादिकां ॥४८॥

राजा भद्रसेनाने मोठ्या आनंदाने ब्राह्मणांना षड्स अन्न, वख, धन ह्याचे मोठ्या प्रमाणावर दान केले. ।।१४० ।। विप्रांना दानदक्षिणा देण्यासाठी राजाने भांडार खुले केले. तो सर्वांना म्हणाला, हे आणि जेवढे हवे तेवढे घेऊन जा, अनमान करू नका, मागेपुढे पाहू नका. ।।१४१।। अशा प्रकारे राजाने सर्व याचकांना अगदी पुरे पुरे म्हणे पर्यंत संतुष्ट केले. त्या लोकांना त्या धनाचा इतका भार झाला की, त्यातील काही धन हे सांडू लागले. ।।१४२।। या सर्व प्रकाराने संतुष्ट झालेले ब्राह्मण राजास मंत्राक्षता देऊ लागले. राजा, तुझा हा पुत्र विजयी होवो, त्याचे सदैव कल्याण होवो, असा आशीर्वाद देऊ लागले. असा हा आनंदोत्सव घडत असतानाच आणखी एक दिव्य घटना घडून आली. ।।१४३।। सुगंध वनात वसंत ऋतू यावा. खुद्द काशीतच गंगा प्रकट व्हावी, धवल पुष्पांनी शिव लिंगाची पूजा करावी. ।।१४४।। किंवा दैवहिनास चिंतामणी सापडावा, भुकेल्या जिवास क्षीरसागर मिळावा, तसा त्यावेळी तिथे महर्षी नारदांचे त्या राजदरबारात आगमन झाले. ।।१४५|| वाल्मीकी, वेदव्यास, ध्रुव, प्रल्हाद हे ज्याचे त्रिभुवनवंद्य सत्शिष्य आहेत, असा तो ब्रह्मदेवाचा पुत्र नारदमुनी हा तिथे येता झाला. ।।१४६।। जो ६४ कलांत निपुण आहे, जो तळहातावरील आवळ्याप्रमाने चौदा विद्या जपणारा आहे, जो प्रत्यक्ष नारायणाचेच दुसरे रूप आहे. ।।१४७|| हे ब्रह्मांड मोडून पुन्हा निर्माण करू शकणारा, अधर्म, अनीती, अन्याय दिसताच इंद्रादिकांनाही ताडण करणारा, ।।१४८।।


तो नारद देखोनि तेचि क्षणीं ।। कुंडांतूनि मूर्तिमंत निघे अग्नि ।। दक्षिणाग्नि गार्हपत्य आहवनीं ।। उभे ठाकले देखतां ॥४९॥ पराशरादि सकळ ब्राह्मण ॥ प्रधानासहित भद्रसेन ।। धांवोनि धरिती चरण ।। ब्रह्मानंदें उचंबळलें ॥ १५० ॥ दिव्य गंध दिव्य सुमनीं ।। षोडशोपचारें पूजिला नारदमुनी।। राव उभा ठाके कर जोडोनी ॥ म्हणे स्वामी अतींद्रियद्रष्टा तूं ॥ ५१ ॥ त्रिभुवनीं गमन तुझें सर्व ।। कांहीं देखिलें सांग अपूर्व ।। नारद म्हणे मार्गां येतां शिव- ।॥ दूत चौघे देखिलें ॥ ५२ ॥ दशभुज पंचवदन । तिंही मृत्यु नेला बांधोन ।। तुझ्या पुत्राचें चुकविलें मरण ।। रुद्रानुष्ठानें धन्य केलें ॥ ५३ ॥ तव पुत्ररक्षणार्थ ते वेळां ।। शिवें वीरभद्र मुख्य पाठविला ।। मज देखतां मृत्युस पुसू लागला ।। शिवसुत ऐका तें ।॥५४॥ तूं कोणाच्या आज्ञेकरून ।। आणीत होतास भद्रसेननंदन ।। त्यास दहा सहस्र वर्षे पूर्ण ।। आयुष्य असे निश्चयें ॥५५ ।। तो सार्वभौम होईल तत्त्वतां ।। रुद्रमहिमा तुज ठाऊक असतां ।। शिवमर्यादा उल्लंघूनि तत्त्वतां ।। कैसा आणीत होतासी ॥५६ ॥ मग चित्रगुप्ता पुसे सूर्यनंदन ।। पत्रिका पाहिली वाचून ।। तंव द्वादशवर्षी मृत्युचिन्क ।। गंडांतर थोर होतें ॥५७ ।।

असा नारदमुनी हा त्या जागी आलेला पाहून तेथील यज्ञकुंडातील दक्षिणाग्नी, गार्हपत्य आणि आहवनीय असे अग्नी त्याच्यासमोर येऊन उभे राहिले. ।।१४९|| तेव्हा नारदांचे दर्शनासाठी पराशरादिक ऋषी, राजा, प्रधान हे सर्वजण पुढे झाले. राजा भद्रसेनास तर अपूर्व असा आनंद झाला. ।।१५०।। राजाने नारदमुनींचे मोठ्या प्रेमाने स्वागत केले. दिव्य चंदन, फुले, फळे अर्पण करून त्यांचे पूजन केले. त्यांना प्रार्थना करीत राजा म्हणाला, “हे मुनीवर, आपण अतेंदरीय आहात.” ।।१५१।। आपला अवघ्या त्रिभुवनात संचार असतो. तेव्हा आपण जर काही अपूर्व असे पाहिले असेल तर कृपया ते आम्हास निवेदन करा”. तेव्हा नारद म्हणाले की, “मी येत असता मला वाटेत चार शिवदूत दिसले. ।।१५२।। पाच मुखांच्या आणि दहा हातांच्या त्या दूतांनी मृत्युदेवास बांधून नेले आणि त्यांनी तुझ्या पुत्राचे मरण चुकविले. रुद्रानुष्ठान हे खरंच धन्य आहे. ।।१५३।। हे राजन, तुझ्या पुत्राच्या रक्षणासाठी शिवांनी वीरभद्रास पाठविले होते. मला पाहताच त्यांनी त्या यमदूतास काय विचारले ते ऐक. ।।१५४।। “तू कोणाच्या आज्ञेवरून भद्रसेन राजाच्या पुत्रास आणत होतास? त्याला तर दहाहजार वर्षांचे आयुष्य आहे.।।१५५।। तो खरोखर सार्वभौम राजा होणार आहे. तुला रुद्रमाहात्म्य ठाऊक नाही का? शिवमर्यादा ओलांडून तू त्यास कसा घेऊन चालला होतास? ।।१५६।। मग त्या मृत्यू देवतेने चित्रगुप्तास बोलावून राजपुत्राची जन्मपत्रिका तपासून पाहिली. त्यात बाराव्या वर्षी गंडांतर दाखविणारे मृत्युचिन्ह होते.।।१५७।।


तें महत्पुण्यें निरसुनि सहज ।। दहा सहस्र वर्षे करावें राज्य ।। मग तो सूर्यनंदन महाराज ।। स्वापराधे कष्टी बहू ।। ५८ ।। मग उभा ठाकूनि कृतांत ।। कर जोडोनि स्तवन करीत ।। हे अपर्णाधव हिमनगजामात ।। अपराध न कळतां घडला हा ॥ ५९ ॥ ऐसें नारदें सांगतां ते क्षणीं ।॥ रायें पायांवरी घातलीं लोळणी ।। आणिक सहस्र रुद्र करूनी ।। महोत्साह करीतसे ॥ १६० ॥ शतरुद्र करितां निःशेष ।। शतायुषी होय तो पुरुष ।। हा अध्याय पढतां निर्दोष ॥ तो शिवरूप याचि देहीं ॥ ६१ ॥ तो येथेंचि झाला मुक्त ।। त्याच्या तीर्थे तरती बहुत ।। असो यावरी ब्रह्मासुत ।। अंतर्धान पावला ॥ ६२ ॥ आनंदमय शक्तिनंदन ।। रायें शतपद्म धन देऊन ।। तोषविला गुरु संपूर्ण ॥ ऋषींसहित जाता झाला ॥ ६३ ॥ हें भद्रसेनआख्यान जे पढती ।। त्यांसी होय आयुष्य संतती ।। त्यांसी काळ न बाधे अंतीं ।। वंदोनि नेती शिवपदा ॥ ६४॥ दशशत कपिलादान ॥ ऐकतां पढतां घडे पुण्य ॥ केलें असेल अभक्ष्यभक्षण ।। सुरापान ब्रह्महत्या ।। ६५ ।। एवं महापापपर्वत तत्त्वतां ।। भस्म होती श्रवण करितां ॥ हा अध्याय त्रिकाळ वाचितां ।। गंडांतरें दूर होती ॥ ६६ ॥

पण ते मृत्यू गंडांतर हे रुद्रानुष्ठनाच्या पुण्याईने सहज दूर झाले आहे, आता तो राजपुत्र दहा हजार वर्षांचे आयुष्य जगणार आहे. हे समजताच यमराज कष्टी झाला. ।।१५८ ।। तेव्हा यमराज वीरभद्रास म्हणाला, महाराज, क्षमा असावी. माझ्याकडून चुकून हा अपराध घडला आहे. ।।१५९।। असे नारदांनी सांगताच भद्रसेनाने मोठ्या आनंदाने त्यांच्या पायी मिठी घातली. त्यानंतर प्रसन्नचित्त झालेल्या राजाने आणखी एक सहस्र रुद्राचा कार्यक्रम घडवून आणला. ।।१६०।। श्रीधर कवी सांगतात की, शत रुद्र केले असता तो भाग्यवान पुरुष शतायुषी होतो. हा रुद्राध्याय वाचला असता तो मनुष्य याच देही शिवरूप होतो. ।।१६१।। त्यास या जन्मातच मुक्ती मिळते. त्यांच्या चरणतीर्थाने अन्य जीवांचाही उद्धार होतो, असे सांगून नारदमुनी अंतर्धान पावले. ।।१६२।। या सर्व घटनेने पराशर ऋषर्षीना मोठा आनंद झाला. राजाने त्यांना शतपद्म धन देऊन संतुष्ट केले. मग सर्वांना शुभाशीर्वाद देऊन पराशर ऋषी आपल्या सोबतच्या ऋषी गणांबरोबर निघून गेले. ।।१६३|| जे भक्त भाविक हे भद्रसेनाचे आख्यान पठण करतात, त्यांना दीर्घायुष्य आणि संतती लाभ होतो. त्यांना मृत्यूची बाधा न होता अंतकाली शिवदूत येऊन त्यांना वंदन करून शिवपदास घेऊन जातात.।।१६४।। या अध्यायाचे श्रवण वा पठण केले असता त्या उपासकास दहा हजार कपिला गायी दान केल्याचे पुण्य मिळते. तसेच अशा पठणाने अभक्ष्यभक्षण, मद्यपान, ब्रह्महत्या ।।१६५।। यासारख्या महापातकांचा नाश होतो. हा अध्याय त्रिकाल पठण केला असता गंडांतर दूर होते. ।।१६६।


यावरी कलियुगीं निःशेष ॥ शिवकीर्तनाचा महिमा विशेष ।। आयुष्यहीन लोकांस ।। अनुष्ठान हेंचि निर्धारं ॥६७॥ मग तो राव भद्रसेन ॥ सुधर्म पुत्रासी राज्य देऊन ।।। ॥ युवराज्य तारकालागून ।। देता झाला ते काळीं ॥६८॥ मग प्रधानासमवेत राव जाणा ॥ जाता झाला तपोवना ॥ शिवअनुष्ठान रुद्रध्याना ।। करितां महारुद्र तोषला ॥६९॥ विमानीं बैसवूनि त्वरित ॥ राव प्रधान नेले मिरवित ।। विधिलोक वैकुंठीं वास बहुत ॥ स्वेच्छेंकरूनि राहिले ॥ १७० ॥ शेवटीं शिवपदासी पावून ।। राहिलें शिवरूप होऊन ।। हा अकरावा अध्याय जाण ।। स्वरूप एकादश रुद्रांचें ॥ ७१ ॥ हा अध्याय करितां श्रवण ।। एकादश रुद्रां समाधान ।। कीं हा कल्पद्रुम संपूर्ण ॥ इच्छिलें फळ देणार ॥ ७२ ॥ मृत्युंजयजप रुद्रानुष्ठान ।। त्यासी न बाधे ग्रहपीडा विघ्न ।। पिशाचबाधा रोग दारुण ।। न बाधीच सर्वथाही ॥७३॥ येथें जो मानील अविश्वास ।। तो होईल अल्पायुषी तामस ।। हें निंदी तो चांडाळ निःशेष ॥ त्याचा विटाळ न व्हावा ॥ ७४ ॥ त्यास प्रसवोनि वांझ झाली माता ।। त्याची संगती न धरावी तत्त्वतां ।। त्यासीं संभाषण करितां ।। महापातक जाणिजे ॥७५ ॥

या कलियुगी शिवकीर्तनाचा महिमा विशेष आहे. कलियुगी शिवनाम हेच तारक आहे.।।१६७।। त्यानंतर राजाने सुधर्म पुत्रास राज्य देऊन प्रधानाच्या पुत्रास युवराजपद दिले.।।१६८|| आपला राज्यकारभार पुत्राच्या हाती सोपवून राजा तपोवनात गेला. तिथे त्याने रुद्रध्यान आणि शिव अनुष्ठान केले. त्याने प्रत्यक्ष महादेव हे राजावर प्रसन्न झाले. ।।१६९।। त्यांनी राजा भद्रसेन आणि त्याचा प्रधान यांना विमानात बसवून ब्रह्मलोकी, विष्णूलोकी नेले. तेथे ते सुखाने निवास करून राहिले. ।।१७० ।। त्यानंतर त्यांना शेवटी शिवलोकास नेण्यात आले. शिवलोकी. ते तेथे शिवरूप होऊन राहिले. हा अकरावा अध्याय म्हणजे साक्षात एकादश रुद्रांचे रूपच आहे. ।।१७१।। या अध्यायाच्या श्रवणाने एकादश रुद्र केल्याचे समाधान प्राप्त होते. हा अध्याय म्हणजे मनोवांच्छित फलप्राप्ती करून देणारा जणू दुसरा कल्पवृक्षच आहे. ।।१७२।। जे भक्त मृत्युंजय जप करतात, रुद्रानुष्ठान करतात, त्यांना भूतपिशाच्च बाधा, भीषण रोग यांची जराही भीती राहात नाही. ।।१७३।। मात्र जो अभक्त या सर्वाबद्दल साशंक असेल, जो अविश्वासी असेल तो अल्पायुषी होईल. अशा चांडाळाचे दर्शन घेऊ नये. त्याची संगती धरू नये. ।।१७४।। अशा जीवास जन्म देणारी त्याची माता ही वांझ ठरते. त्याची कधीही संगत करू नये, त्याच्याशी साधे संभाषणही करू नये. तसे करणे हे महापातक होय. ।।१७५।।


ते आपुल्या गृहास न आणावे ।। आपण त्यांच्या सदनासी न जावें ।। ते त्यजावे जीर्वेभावें ।। जेवीं सुशीळ हिंसकगृक ॥ ७६ ॥ जो प्रत्यक्ष भक्षितो विष ।। जे मूर्ख बैसती त्याचे पंक्तीस ॥ त्यांसी मृत्यु आला या गोष्टीस ।। संदेह कांहीं असेना ॥ ७७ ॥ असो सर्वभावें निश्चित ।। अखंड पाहावें शिवलीलामृत ।। हें न घडे जरी त्वरित ।। हा अध्याय तरी वाचावा ॥७८॥ या अध्यायाचें करितां अनुष्ठान ।। तयासी नित्य रुद्र केल्याचें पुण्य ।। त्याचे घरीं अनुदिन । ब्रह्मानंद प्रगटेल ।॥७९ ॥ अपर्णाहृदयाब्जमिलिंद ।। श्रीधरस्वामी तो ब्रह्मानंद ।। जो जगदानंदमूळकंद ॥ अभंग न विटे कालत्रयीं ॥१८०॥ शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड ।। स्कंदपुराण ब्रह्मोत्तरखंड ।। परिसोत सज्जन अखंड ॥ एकादशाध्याय गोड हा ॥१८१ ॥

।। श्री सांबसदाशिवार्पणमस्तु ।।

अशा मनुष्यप्राण्याच्या घरी आपण जाऊ नये किंवा त्यास आपल्या घरी आणू नये. जसा कोणी सज्जन हा हिंसकाचे घरी जाणे टाळतो तसे यांना टाळावे. ।।१७६ ।। जो प्रत्यक्ष विष भक्षण करतो त्याच्या पंक्तीस जे जे बसतात ते मूर्ख मृत्युमुखी पडतात. याबाबत कोणताही संशय मनात बाळगू नये. ।।१७७।। असो, त्यापेक्षा भक्तांनी आत्मकल्याणार्थ शिवलीलामृत या ग्रंथाचे वाचन करावे. सर्व ग्रंथ जरी वाचता आला नाही तरी फक्त या एका अकराव्या अध्यायाचे वाचन तरी करावे. ।।१७८ ।। या अध्यायाचे अनुष्ठान केले असता त्या भक्तास नित्य रुद्र पठण केल्याचे पुण्य मिळते. त्याच्या घरी साक्षात त्या ब्रह्मानंदाचा निवास होतो. ।।१७९ ।। तो अपर्णाहृदयाब्जमिलिंद हाच माझा ब्रह्मानंद आहे. अभंग आणि अवीट आहे, ते कधीही विटणारे नाही. ।।१८० ।। स्कंद पुराणातील ब्रह्मोत्तर खंडातल्या शिवलीलामृताचा अकरावा अध्याय भाविक शिवभक्तगण अखंडितपणे श्रवण करू देत. ।।१८१।।

।। श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु ।।


अधिक माहितीसाठी आमच्या सोशल मीडिया ला फॉलो करा.

मराठी रसिक या आमच्या इंस्टाग्राम अकाउंट ला लाईक करा सुब्स्क्राईब करा. येथे तुम्हाला Shree Shivleelamrut Adhyay Aathava संपूर्ण माहिती मराठी मध्ये मिळते.


Shree Shivleelamrut Adhyay Aathava
Shree Shivleelamrut Adhyay Aathava
Shree Shivleelamrut Adhyay Navava
Shree Shivleelamrut Adhyay Navava
Shree Shivleelamrut Adhyay Dahava
Shree Shivleelamrut Adhyay Dahava
Scroll to Top