सूत श्रोत्यांना म्हणाले पुढे ऐका दक्षराजा शंकराचा सासरा असून सुद्धा तो आपल्या जावयाचा नेहमी द्वेष निंदा करीत असे. एकदा दक्ष राजानते महायज्ञ केला. त्यात शंकराला आमंत्रण नव्हते तरी पण पित्याचे घरचे कार्य म्हणून शंकराचा विरोध पत्करून पार्वती माहेरी यज्ञस्थानी गेली परंतु तीचा तिथे अपमाण झाला म्हणून तिने यज्ञकुंडात प्राण त्याग केला ही वार्ता कानी पडताच विरभद्र आपल्या सैन्यासह जावून दक्षयज्ञ उधळून लावला व दक्षाचे मुंडके उडवले. सर्व देवांनी शंकराची स्तुती करून शांत केले व दक्षाच्या घडाला बोकडाचे शिर लावून त्यास जिवंत केले. पुढे पार्वतीने हिमालयाच्या पोटी जन्म घेतला व शंकरही नंदीसह हिमालयात तपश्चर्येसाठी गेले. त्याच समयी तारकासुराच्या तारकाक्ष, विदहुन्माली व कमललोचन तीन पुत्रांनी शंकराला प्रसन्न करून वर प्राप्त केले होते. त्यांनी त्रिभूवनात सर्वत्र हाहाकार माजवीला होता वीरभद्रासह शंकरांनी त्यांच्याशी घनघोर युद्ध केले. दैत्याच्या स्त्रीया पतीव्रता आसल्यामुळे राक्षस मारले जाईनात. तेव्हा श्रीकरधराने बौद्धरूपाने दैत्यस्त्रियात प्रवेश करून वेदबाह्य चारवाक शास्त्र सांगितले त्यामुळे त्या व्यभिचारीनी बनून दैत्याचा प्रभाव नाहीसा झाला नंतर शंकराने सोडलेल्या पाशुपतास्त्राने असुर ठार झाले. परंतु तारकासुराचा वध शिवपुत्राकडून होणार आहे. हे लक्षात घेवून ब्रह्मादिक देवांनी शिवपार्वतीच्या विवाह संबंधी विचर करून मदनाला शंकराचा तपोभंग करण्यास सांगितले शंकराचा तपोभंग झाला परंतु त्यानी आपला तृतीय तेत्र उघडून मदनाला भस्म केले. ऋर्षीनी पार्वतीची इच्छा पूर्ण करण्यासाठी शंकरास विनंती केली नंतर शंकर तीची परीक्षा पाहण्यासाठी बटूवेशात आले व शंकराची निंदा करू लागले हे ऐकून पार्वती संतापून तू येथून चालता हो नाहीतर शाप देईल हे पाहून शंकरानी आपले रूप प्रगट केले. नंतर शंकर पार्वतीचा विवाह झाला. व ते कैलास पर्वतावर निघून गेले बराच काळ लोटूण पूत्र होत नाही. म्हणून देवानी शिवसदनी अतिथी अग्निस पाठविले. त्यांनी भिक्षा मागितली पार्वतीने शंकराच्या आज्ञेनुसार त्याचे अमोघ विर्य भिक्षा म्हणून दिले. ते अग्नीने प्राशन केले. त्यास गर्भराहीला. त्याची लाज वाटू लागली म्हणून त्यांनी तो गर्भ सहा ऋषीकन्या उदरी घातला त्याही गरोधर राहील्या त्यांनीही तो गर्भ काढून गंगेत टाकला ते सहा भाग एकत्र होऊन सहा तोंड व बारा हात असा दिव्य कुमार जन्माला आला शंकरानी त्यास आपला पुत्र म्हणून ओळखुन पार्वतीकडे दिले त्याचे नाव कार्तिक स्वामी ठेवण्यात आले नंतर कार्तिकस्वामीने तारकासुराचा वध केला. विवाह रहित राहुन मोठा तपस्वी झाला.
Shree Shivleelamrut Adhyay Terava (13) | श्री शिवलीलामृत : अध्याय तेरावा
श्रीगणेशाय नमः ।। जो सद्गुरू ब्रह्मानंद ॥ अपर्णाहृदयाब्जमिलिंद ।। स्मरारि गजास्यजनक प्रसिद्ध ॥ चरणारविंद नमूं त्याचे ॥१ ॥ स्कंदपुराणीं सूत ॥ शौनकादिकांप्रति सांगत ।। त्रेतायुगीं अद्भुत ।। कथा एक वर्तली ॥ २ ॥ दक्षप्रजापति पवित्र ।। आरंभिता झाला महासत्र ।। निंदोनि स्वामी त्रिनेत्र ।। सर्व निर्जर बोलाविलें ॥ ३ ॥ जगदात्मा सदाशिव ।। जयासी वंदिती पद्मज रमाधव ।। आम्नाय आणि वासव ।। स्तविती ज्यासी सर्वदा ॥४॥ शिवमहिमा नेणोनि अद्भुत ॥ दिवसनिशीं दक्ष निंदित ।। नरमुंडमाळा अपवित्र बहुत ।। गळां घालीत कैसा हा ॥५॥ करी ओलें गजचर्म प्रावरण ।। न कंटाळे दुर्गंधीनें मन ।। भिक्षा मागे नरकपाल घेऊन ।। वसे स्मशानीं सर्वदा ॥ ६ ॥ चिताभस्म अंगीं चर्चिलें ।।। विखार ठायीं ठायीं वेष्टिलें ।॥ भ्रष्ट तितुकें अंगिकारिलें ॥ सवें पाळे भूतांचें ॥७॥ अभद्र तितुकें अंगिकारिलें ।। यासी कोण म्हणतील भलें ।॥ ज्यासी जें योग्य नाहीं बोलिलें । तें दिल्हें येणें सर्वस्वें ॥८॥
श्री गणेशाला, श्री सरस्वतीला, श्री सद्गुरूनाथांना आणि भगवान श्री सांबसदाशिवास नमस्कार असो. कवी श्रीधर पिता आणि सद्गुरू ब्रह्मानंद ह्यांना वंदन करतात. तसेच अपर्णेचा हृदयस्वामी, श्री गणेश आणि षडानन ह्यांचा पिता असलेल्या भगवान शिवशंकरांना विनम्रभावे अभिवादन करतात. ।।१।। ते श्रवणार्थ समोर बसलेल्या लोकांना ते सांगतात की, स्कंदपुराणात आलेली सूतांनी शौनकादिकांप्रति त्रेतायुगात घडलेली जी अद्भुत कथा सांगितली, ती मी तुम्हाला सांगतो, ती ऐका. ।।२।। प्रजापती दक्षाने आपल्या नगरीत एक मोठा यज्ञ करण्याचे आयोजन केले. त्या यज्ञसमारंभासाठी त्याने इतर सर्व देवदेवता, ऋषीमुनी; ह्यांना खास आमंत्रण दिले. परंतु या कार्यासाठी दक्षाने भगवान शिव ह्यांना मात्र आमंत्रण दिले नाही. ।।३।। खरंतर तोच जगताचा आत्मा, तोच परमात्मा, त्यास विष्णू, ब्रह्मा, देव वंदन करतात, वेद ज्याचे स्तवन करतात. ।।४।। त्या शिवाचे महत्त्व न जाणता दक्ष त्याची नित्य निंदा करीत असे, तो म्हणे हा कसला असा गळ्यात नरमुंड माळा घालून मिरवतो. ।।५।। गजचर्म पांघरतो, हाती माणसाची कवटी घेऊन त्यात मिक्षा मागत फिरतो, नित्य स्मशानात राहतो. ।।६।। तो स्वतःच्या अंगास चिताभस्म काय लावतो, जे जे भ्रष्ट ते त्यास मात्र प्रिय. त्याच्या मागेपुढे असतात कोण तर भुते ! ।। ७|| जे जे म्हणून अस्वीकारण्यासारखे ते ह्याने स्वीकारलेले आहे. याला चांगला कोण म्हणणार? याने तर नको त्याला आणि नको ते देऊन टाकले आहे. ।।८।।
यासी देव म्हणेल कोण ।। क्रोधें संतप्त अनुदिन ।। तृतीय नेत्रीं प्रळयाग्न ।। वाटे त्रिभुवन जाळील ॥९॥ मस्तकीं वाहे सदा पाणी ॥ नाचत जाऊन निजकीर्तनीं ।॥ भक्त देखतां नयनीं ।। बैसे देवोनि अवघेचि ॥१०॥ दैत्यांसी देवोनियां वर । येणेंचि माजविलें अपार ॥ न कळे यासी लहान थोर ।। वाहन ढोर तयाचें ॥११॥ शिवनिंदा करावया कारण ।। एकदां दक्ष गेला कैलासालागून ।। शिवें नाहीं दिधलें अभ्युत्थान ॥ तेणें दुःखें क्षोभला ॥१२॥ ऐसा दक्ष शिवासी निंदी ।। यज्ञीं न पूजी विभाग नेदी ।। पुरली आयुष्याची अवधी ॥ तरीच हे बुद्धि उपजली ॥१३॥ शिवभजन न करी जो पतित ।। त्यावरी विघ्नें पडती असंख्यात ।। याग जप तप दान व्यर्थ ॥ उमानाथ नावडे जया ॥१४॥ जेणें निंदिला शिव दयाळ ॥ परम निर्दय तो दुर्जन खळ ॥ मनुष्यांमाजी तो चांडाळ ।। त्याचा विटाळ न व्हावा ।।१५।। असो दक्षकन्या दाक्षायणी ।। कैलासीं वाट पाहे भवानी ॥ म्हणे याग मांडिला पितृसदनीं ।। मज बोलावू न ये कां ॥१६॥ अपर्णा म्हणे त्रिनेत्रा ।। मी जाईन पित्याच्या सत्रा ।। तेणें सर्व कन्या पंचवक्त्रा ॥ सन्मानेंसीं बोलावल्या ।।१७ ।।
याला देव तरी कोणत्या अर्थाने म्हणावे. हा सदैव क्रोधित असतो, याच्या तिसऱ्या डोळ्यात तर ब्रह्मांडाला जाळून राख करेल असा प्रलयाग्नी आहे. ।।९।। त्याच्या जटेतून सतत पाण्याची धार पडते आहे, याचे जिथे कीर्तन चालते तिथे जाऊन हा नाचतो काय ! भक्तांनी जे मागावे ते त्यांना लगेच देतो काय ! ।।१०।। यानेच अनेक दैत्यांना नको नको ते वर दिले आणि मस्तवाल बनविले. याला भलेबुरे, लहानथोर काही कळत नाही. याचे वाहन ते काय, तर म्हणे बैल ! ।।११।। एकदा असाच शिवाचा हा निंदक दक्ष कैलासास त्याच्या भेटीस गेला, तेव्हा शिवांनी त्याचे स्वागत केले नाही, त्यामुळे तो रागावला होता. ||१२|| त्यामुळेच दक्ष शिवाची मनातून निंदा करीत असे, त्यास मान देत नसे, यज्ञास बोलावीत नसे. ‘विनाश काले विपरीत बुद्धी’ या न्यायानेच जणूकाही दक्ष हा असे वागत होता. ||१३|| शिवास भजत नाही, त्याचा उपहास करतो त्याच्यावर अनेक संकटे येतात. ज्याची शिवावर श्रद्धा नाही त्याची पूजा, होमहवन, दान, जप आणि तप हे सारे व्यर्थ आहे. ||१४|| जे शिवाची निंदा करतात ते निर्दय, शिष्ट आणि दुर्जन मानले जातात. त्यांना चांडाळ ठरवून त्यांचा स्पर्श विटाळ मानला जातो. ।।१५।। असो, तिकडे दक्षकन्या भवानी ही पित्याच्या कडील यज्ञाच्या आमंत्रणाची वाट पाहात होती. आपल्याला आमंत्रण का नाही याचा विचार करीत होती. ।।१६।। ती भगवान शिवास म्हणाली, “स्वामी, मी *माझ्या पित्याच्या घरी यज्ञकार्यास जाऊ इच्छिते. त्याने सर्व मुर्लीना यज्ञास बोलावले आहे.”।। १७।।
मज विसरला काय म्हणोन ।। तरी मी तेथवरी जाईन ॥ यावरी बोले भाललोचन ।। मृडानीप्रति तेधवां ॥१८।। म्हणे मृगलोचने ऐक गौरी ॥ पद्मजजनकसहोदरी ॥ लावण्यामृतसरिते अवधारीं ।। कदाहीं तेथें न जावें ।॥१९ ॥ तव पिता निंदक कुटिल ।। मम द्वेषी दुर्जन खळ ।। तूं जातांचि तात्काळ ।। अपमानील शुभानने ॥२०॥ ज्याच्या अंतरीं नाहीं प्रीती ।। त्याचें वदन न पाहावें कल्पांतीं ।॥ ऐसें त्र्यंबक बोले अंबिकेप्रती ।। तों नारद तेथे पातला ॥ २१ ॥ म्हणे पितृसदना जावयालागून ।। न पहावा कदाही मान ।। मग नंदीवरी आरूढोन ।। दाक्षायणी चालिली ॥ २२ ॥ सर्वे घेतले भूतगण ।। मनोवेगें पातली दक्षसदन ।। तंव मंडप शोभायमान ।। ऋषींसुरवरीं भरलासे ॥ २३ ॥ आपुलाल्या पूज्यस्थानीं ।। देव बैसविलें सन्मानेंकरूनी ।। एक सदाशिव वेगळा करूनी ॥ पूजिलें ऋषि सुरवर ॥ २४॥ जैसा उडुगणांत मिरवे अत्रिसुत ॥ तैसा दक्ष मध्यें विराजित ॥ शिवद्वेषीं परम अभक्त ।। कुंडीं टाकीत अवदानें ॥ २५ ॥ भवानी जवळी आली ते वेळे ॥ देखोनि सुरवर आनंदले ॥ परी दक्षाचे धुरें डोळे भरलें ।। कन्येकडे न पाहेचि ।। २६ ।।
कदाचित कार्याच्या गडबडीत पिताजी मला बोलवायला विसरले असतील, तरी मी जाते. लेकीस पित्याकडे जाण्यास आमंत्रणाची गरज काय? ।।१८।। तेव्हा भगवान शिव तिला म्हणाले, “प्रिये, तुझ्या पित्याने त्या कार्यासाठी आपल्याला आमंत्रण दिलेले नाही. बोलावलेले नाही. तू जाऊ नकोस.”।।१९।। हे बघ तुझा पिता हा माझा निंदक आहे, तो कुटिल आहे, तून बोलावता तिथे जाशील तर कदाचित तुझा तिथे अपमान होईल. ||२०|| ज्याच्या मनात प्रेम नाही अशाचे तोंडही पाहू नये हेच खरं. अशाप्रकारे शिव भवानीस समजावीत असताना अचानक तिथे नारदाची स्वारी आली. ||२१|| नारद पार्वतीस म्हणाले, “अगं वडिलांच्या घरी जायला लेकीला आमंत्रणाची गरजच काय? त्यात कसला आलाय मान सन्मान.” असे म्हणताच दाक्षायणी ही नंदीवर स्वार झाली आणि पित्याकडे येण्यास निघाली. ।। २२।। तिने आपल्या सोबत काही भूतगण घेतले आणि ती मनोवेगाने पित्या घरी आली, पाहते तो काय दारी भव्य मंडप, अनेक ऋषी देवता तिथे आलेल्या. ।।२३।। सर्व देव त्यांच्या त्यांच्या जागी सन्मानपूर्वक बसविलेले, त्या सर्वांची स्वागत पूजा होत होती, फक्त सांब सदाशिवास मात्र तिथे आमंत्रिले नव्हते. ||२४|| ज्याप्रमाणे नक्षत्रात चंद्र शोभून दिसतो, तसा दक्ष या यज्ञमंडपात बसलेला होता. तो यज्ञाच्या आहुत्याही देत होता. मात्र मनाने तो शिवाचा उपहास करणारा आणि शिवनिंदा करणारा होता. ।।२५।। भवानीस तिथे आलेले पाहून इतर देवांना आनंद झाला; पण दक्षाचे डोळे हे यज्ञाच्या धुराने भरलेले असल्याने त्यास आपली तिथे आलेली लेक दिसत नव्हती. ।।२६।।
नंदीव्ररोनि उतरूनी ।। पितयासमीप आली भवानी ।। दक्ष मुख मुरडोनी ।। घाली ग्रंथीं भ्रमंडळा ॥ २७ ॥ जगन्माता गुणनिधान ।। न्याहाळूनि पाहे पितृवदन ।॥ म्हणे थुरें भरले नयन ।। म्हणोनि न पाहे मजकडे ॥२८ ।। सकळ भगिनींचा सन्मान बहुत ।। दाक्षायणी तेव्हां देखत ।। जननीकडे विलोकीत ।। तेही न पाहे तियेतें ।॥ २९ ॥ मनांत दक्ष भावीत ।। ईस कोणें बोलाविलें येथ ।। कन्या आणि जामात ।। दृष्टीं मज नावडती ॥३०॥ आदिमाया प्रणवरूपिणी ।। अनंतब्रह्मांडांची स्वामिनी ।। तिचा अपमान देखोनी ।। भ्याले सकळ सुरवर ॥ ३१ ॥ म्हणती दक्ष भुलला यथार्थ ॥ हे ब्रह्मांड जाळील निमिषांत ।। अपमान देखोनि उमा तेथ ॥ क्रोधें संतप्त जाहली ॥ ३२ ॥ प्रलयवीज पृथ्वीवरी पडत ॥ तैसी उडी घातली कुंडात ॥ उर्वीमंडळ डळमळित ॥ होय कंपित भोगींद्र ॥३३॥ वैकुंठ कैलास डळमळी ।। कमलभवांडीं हांक वाजली ।। कृतांत कापे चळचळी ।। म्हणे बुडाली सृष्टि आतां ।। ३४ ।। हांक घेवोनि शिवगण ।। गेले शिवापाशीं धांवोन ॥ सांगती सर्व वर्तमान ॥ जें जें जाहलें दक्षगृहीं ।॥ ३५ ॥ ऐकतां क्षोभला उमाकांत ।। जेवीं महाप्रलयींचा कृतांत ।। हांक देवोनि अद्भुत ।। जटा आपटीत आवेशें ॥३६॥
भवानी नंदीवरून उतरली, पित्याच्या सन्मुख गेली, तिने त्यास वंदनही केले. तेव्हा त्याने मात्र तिच्याकडे मान वळवून न पाहता उलट कपाळास आठ्या घातल्या. ।।२७।। तेव्हा भवानीने असा विचार केला की, कदाचित धुराने डोळे भरल्याने पित्याने आपल्याकडे पाहिले नसेल. ।।२८।। पण जेव्हा दक्षाने इतर सर्व लेकींचा मानसन्मान करताना पाहिले; तेव्हा तिने सूचक नजरेने आईकडे पाहिले, तर तिनेही या लेकीकडे लक्षच दिले नाही. ।।२९।। तर तिकडे दक्ष मनात म्हणत होता की, हिला इथे कोणी बोलाविले होते? मला तर ही लेक आणि तिचा तो बैरागी पती हे नजरेसमोरही नको असतात. ।।३०।। त्या आदिमाया भवानीचा तो तसा यज्ञ मंडपात होत असलेला अनादर आणि अपमान पाहून इतर सर्व देवतांना अशी भीती वाटू लागली की, आता काय होणार? ।।३१।। ते म्हणू लागले, दक्ष ही चूक करतोय. या देवीचा अनमान, अपमान ह्याने ती क्रोधित झाली तर ती सर्व ब्रह्मांड जाळून टाकेल. तेव्हा त्या पित्याघरच्या अपमानाने देवीस प्रचंड क्रोध आला. ।।३२।। पृथ्वीवर एखादी प्रचंड वीज कोसळावी तशी सतीने काय होतेय हे कळायच्या आतच रागाच्या भरात धावत जाऊन त्या समोरच्या यज्ञकुंडातच उडी घेतली. तेव्हा पृथ्वी डळमळू लागली. शेष कापू लागला. ।।३३।। त्याबरोबर सर्व ब्रह्मांड डळमळू लागले. कैलास हलू लागला, आता ही सृष्टी बुडाली रे बुडाली असे यमराज म्हणू लागला. ।।३४।। तेव्हा शिवगणांनी धावत जाऊन दक्षाच्या यज्ञ मंडपात काय घडले ती वार्ता भगवान महादेवांना सांगितली. ।।३५।। ती वार्ता ऐकताच उमाकांताचा क्रोध हा अनावर झाला. त्यांनी भयानक रूप धारण केले. क्रोधाने डमरू नाद केला. आपल्या जटा आवेशांनी आपटल्या. ।।३६।।
तों अकस्मात वीरभद्र ।। प्रगटला तेथें प्रलयरुद्र ॥ वाटे प्रलयाग्नि आणि द्वादश मित्र ।। एकत्र होवोनि प्रकटले ॥३७॥ वाटे त्याचिया तेजांत ।। चंद्रसूर्य बुचकळ्या देत ।। आकाश असे आसुडत ॥ सडा होत नक्षत्रांचा ॥ ३८ ॥ कुंभिनी बुडाली देख ॥ चतुर्दश लोकीं गाजली हांक ।। दक्षगृहीं बलाहक ।। रक्तवर्षाव करीतसे ॥ ३९ ॥ अवचित उकलली क्षिती ।। दिवसा दिवाभीतें बोभाती ।। दक्षअंगींची सर्व शक्ती ।। निघोनि गेली तेधवां ॥४०॥ इकडे वीरभद्र शिवस्तवन । करोनि निघाला क्रोधायमान ।। एकवीस पझें दळ घेऊन ॥ मनोवेगें धांविन्नला ॥४१॥ साठ कोटि गण घेऊन ।। मागूनि धांविन्नला अपर्णाजीवन ।। पुढें शिवपुत्र धांवोन ।। ख्याति केली दक्षयागीं ॥ ४२ ॥ वारणचक्र असंभाव्य ॥ त्यावरी एकला लोटे कंठीरव ।। कीं विनायकें घेतली धांव ॥ अपार अही पाहोनी ॥४३॥ आला देखोनि वीरभद्र ।। पळों लागले देव समग्र ।। अवदानें सांडोनि सत्वर ।। ऋत्विज पळालें तेथेनियां ।।४४ ।। आकांतला त्रिलोक ॥ प्रळयकाळींचा पावक ।। दुमदुमिला ब्रह्मांडगोळक ।। शक्रादि देव कांपती ।।४५ ।।
तेव्हा त्या आपटलेल्या जटेतून वीरभद्र प्रकट झाला. त्याचे रूप इतके भयंकर होते की, जणू काय प्रलयकाळीचा अग्नीच किंवा बारा आदित्यांचे एकवटलेले तेजच. ।।३७।। त्या वीरभद्राच्या दिव्य तेजाने साक्षात चंद्रसूर्यही फिके पडले. आकाशात शिवगर्जनेचा जणू आसूड कडाडला आणि आकाशातून तुटलेल्या नक्षत्रांचा सडाच खाली पडला. ।।३८।। आता बुडाली, पृथ्वी बुदाली अशी चौदाही लोकांत हाक गेली. सर्व लोक गडबडले, इकडे दक्षाच्या घरावर ढगातून पाण्याची नाही तर रक्तांची धार पडू लागली. ।। ३९ ।। एकाएकी धरणी चिराळली, घुबडांचे अशुभ ओरडणे सुरू झाले, ते पाहून दक्षाच्या अंगातली शक्तीच गळाली. ।।४०।। तर तिकडे प्रभूची आज्ञा घेऊन, सोबत एकवीस पद्ये एवढी मोठी शिवसेना घेऊन वीरभद्र दक्षास शासन करण्यासाठी त्याच्या नगरीकडे धावला. ।।४१।। त्याच्या मागून स्वतः भगवान शंकर हे आपल्यासोबत साठ कोटी सेना घेऊन दक्षाच्या नगरीकडे निघाले. त्याआधीच तिथे आलेल्या शिवपुत्राने दक्षाच्या यागात मोठा पराक्रम गाजविला होता. ।।४२।। हत्तीच्या कळपावर सिंह तुटून पडावा, असंख्य सर्पावर गरुडाने आक्रमण करावे; ।।४३।। तसे वीरभद्राने आधीच सर्वांचा समाचार घेऊन सर्वांना पळवून लावले होते. सेनाच काय पण यज्ञाचे ब्राह्मणही स्वतःचा जीव वाचविण्यासाठी पळून गेले होते. ।।४४।। अवघ्या त्रैलोक्यात एकच हाहा:कार माजला. प्रलयकाळीचा अग्नी भडकावा, ब्रह्मांड डळमळावे, तसे देवही घाबरून भीतीने थरथर कापू लागले. ।।४५।।
एक मळमूत्र भयें विसर्जिती ।। धोत्रे गळालीं नेणती क्षितीं ।। कुक्कुटरूपें रोहिणीपती ।। पळता झाला तेधवां ॥४६ ।। शिखी होवोनियां शिखी ॥ पळता झाला एकाएकीं । यम आपुलें स्वरूप झांकी ।। बकवेष घेवोनियां ॥ ४७ ॥ नैऋत्यपति होय काक ॥ शशंक होय रसनायक ।। कपोत होवोनियां अर्क ।। पळता झाला तेधवां ॥ ४८ ॥ कीर होवोनि वृत्रारी ।। पळतां भय वाटे अंतरीं ।। नाना पक्षिरूपें झडकरी ।। नवग्रह पळाले ॥४९॥ पायाळावरी वीज पडत ।। दक्षावरी तेवीं अकस्मात ॥ महावीर शिवसुत ।। वीरभद्र पातला ॥५०॥ षड्बाहु वीर देदीप्यमान ॥ असिलता खेटक धनुष्य बाण ॥ त्रिशूळ डमरू शोभायमान ।। सायुध ऐसा प्रगटला ॥५१॥ पूषाचे पाडिले दांत ॥ भगदेवाचे नेत्र फोडीत ।। खांड मिशा उपडीत ॥ ऋत्विजांच्या तेधवां ॥५२॥ चरणीं धरूनि आपटिले ।। बहुतांचे चरण मोडिले ॥ कित्येकांचे प्राण गेले ॥ वीरभद्र देखतां ॥५३॥ मागूनि पातला शंकर ।। तेणें दक्षपृतना मारिली सत्वर ।। कुंडमंडप समग्र ।। विध्वंसूनि जाळिला ॥५४॥ देखोनियां विरूपाक्ष ।। भयभीत झाला दक्ष ।। पद्मजा आणि सहस्राक्ष ॥ पूर्वीच तेथूनि पळाले ॥५५॥
काही जणांनी तर तिथेच भीतीने मलमूत्र विसर्जन केले. कित्येकांची धोतरे सुटली, तर चंद्र कोंबड्याचे रूप घेऊन तिथून पळाला. ।।४६ ।। तिथून पळ काढताना कोणी आपल्याला ओळखू नये म्हणून अग्नीने मोराचे, तर यमाने बगळ्याचे रूप धारण केले. ॥४७॥ नैर्ऋती कावळ्याचे रूप घेऊन, तर वरुण ससाणा होऊन, सूर्य पारवा होऊन तिथून पसार झाले. ।।४८ ।। भयभीत झालेल्या इंद्राने पोपटाचे रूप धारण केले, तर नवग्रहांनी वेगवेगळ्या पशू-पक्ष्यांची रूपे घेऊन तिथून पळ काढला. ।।४९।। तिकडे एखाद्या पायाळू माणसावर जशी वीज कोसळावी तसा महावीर वीरभद्र हा दक्षावर चाल करून गेला. ।।५०।। पराक्रमी वीरभद्राच्या साही हातात तलवार, खेटक, धनुष्यबाण, त्रिशूल, डमरू ही आयुधे होती. तो जणू प्रतिशंकरच दिसत होता. ।।५१।। त्याने रागाच्या भरात पुषाचे दात पाडले, भगदेवाचे डोळे फोडले, दक्षाचा यज्ञ संपन्न करणाऱ्या ब्राह्मणांनाही त्याने शासन केले. ।।५२।। वीरभद्राने कित्येकांना पायास धरून फिरवले आणि धगरणीवर आपटून मारले, तर त्याने त्याच्या वाटेत येणाऱ्यांचे हातपाय तोडले. वीरभद्राचे ते भयानक रूप पाहून कित्येकांचे तर भीतीनेच प्राण गेले. ।।५३।। तोवर वीरभद्रामागोमाग आलेल्या शिवसेनेने दक्षाचा यज्ञमंडप जाळला. त्याच्या सेनेची मोठी कत्तल केली. ।।५४।। विरूपाक्षास पाहून दक्ष पुरताच भयभीत झाला. या गडबडीतच इंद्र आणि ब्रह्मदेवांनीही तिथून काढता पाय घेतला. ।।५५।।
वीरभद्र म्हणे शतमूर्खा दक्षा ।। त्वां निंदिलें कैसे विरूपाक्षा ।। तुज लावीन आतां शिक्षा ।। शिवद्वेषिया पाहें पां ॥५६॥ विद्युत्प्राय असिलता तीव्र ॥ ऊर्ध्वहस्तें महावीर ।। छेदिता झाला दक्षशिर ।। प्रलय थोर जाहला ।॥५७॥ दक्षशिर गगनीं उसळलें ।॥ वीरभद्रं पायांतळीं रगडिलें ॥ मग उमाधवापाशीं ते वेळें ॥ देव पातले चहूंकडोनी ॥ ५८ ॥ सकळ सुरांसहित कमळासन ।। करीत उमावल्लभाचे स्तवन ।। म्हणे वृषभध्वजा कृपा करून ।। दक्षालागीं ऊठवीं ।। ५९ ।। संतोषोनि कर्पूरगौर ।। म्हणे आणोनि लावा दक्षाचें शिर ॥ परी तें नेदी वीरभद्र ।। पायांतळी रगडिलें ॥ ६० ॥ म्हणे शिवद्वेषी दुराचार ।। त्याचा करीन ऐसा संहार ।। जो शिवनाम न घे अपवित्र ।। जिव्हा छेदीन तयाची ।। ६१ ।। जो न करी शिवार्चन ।। त्याचे हस्तचरण छेदीन ।। जो न पाहे शिवस्थान ।। त्याचे नयन फोडीन मी ॥ ६२ ॥ विष्णू थोर शिव लहान ।। हर विशेष विष्णु सान ॥ ऐसें म्हणे जो खळ दुर्जन ।। संहारीन तयातें ॥ ६३ ॥ सर्वथा नेदी मी दक्षशिर ।। काय करितील विधिहरिहर ।। मग मेषशिर सत्वर ।। दक्षालागीं लाविलें ॥६४॥
वीरभद्र दक्षास रागाने म्हणाला, “हे शतमूढा तू भगवान शंकरांचा अपमान केला आहेस, त्याम्ची निंदा केली आहेस. तुला मी आता चांगलीच शिक्षा घडवितो.” ।।५६।। असे म्हणत वीरभद्राने अत्यंत रागाने आपल्या हातीच्या प्रखर तलवारीच्या एकाच घावाने दक्षाचे शिर धडावेगळे केले. ।।५७।। तेव्हा ते दक्षाचे शिर हे उंच हवेत उडाले आणि खाली पडले ते वीरभद्राच्या पायाजवळच. तेव्हा वीरभद्राने ते आपल्या पायांनी रगडलं. तेव्हा सर्व देव धावत शिवाच्या भोवती गोळा झाले. ।।५८।। सर्व देव हे ब्रह्मदेवासह भगवान शिवांची स्तुती करून त्यांना विनवणी करू लागले की, “हे वृषभध्वजा, आपण कृपावंत व्हा आणि दक्षास उठवा” ।।५९।। तेव्हा दक्षास झालेले शासन, देवतांची स्तुती, विनवणी ऐकून भगवान शिवांना त्यांची दया आली. ते म्हणाले, “जा कोणीतरी जाऊन दक्षाचे शिर घेऊन या”. पण आता ते कसे आणणार? कारण वीरभद्राने तर ते त्याच्या पायाखाली रगडले होते. ।। ६० ।। तो म्हणत होता की, जे कोणी पापी दुराचारी शिवद्वेषी असतील, जे शिवनाम घेत नसतील त्यांच्या जिभा मी कापून टाकीन. ।।६१।। जे शिवपूजन करणार नाहीत, त्यांचे हातपाय तोडीन. जे शिवदर्शन घेणार नाहीत, त्याचे स्थान पाहणार नाहीत, त्यांचे मी डोळे फोडीन. ।।६२।। जे अभक्त शिव आणि विष्णू यांच्यात भेद करतील, जे एकास श्रेष्ठ अन् दुसऱ्यास कनिष्ठ म्हणतील, त्या पाप्यांचा मी क्रूर संहार करीन. ।।६३ ।। काय वाटेल ते झाले तरी त्या शिवद्वेषी दक्षाचे शिर देणार नाही, असे वीरभद्राने निक्षून सांगताच शेवटी दक्षास बोकडाचे शिर आणून ते लावण्यात आले. ।।६४।।
सजीव करोनियां दक्ष ।। तीर्थाटना गेला विरूपाक्ष ।। द्वादश वर्षे निरपेक्ष ।। सेवीत वनें उपवनें ।। ६५ ।। महास्मशान जें आनंदवन ।। तेथें शंकर राहिला येऊन ।। मग सहस्र वर्षे संपूर्ण ।। तपासनीं बैसला ॥ ६६ ॥ पुढें हिमाचलाचे उदरीं ।। अवतरली त्रिपुरसुंदरी ॥ शिवआराधना नित्य करी ।। हिमाचळीं सर्वदा ।। ६७ ।। हिमनगाची स्त्री मेनका ।। तीस पुत्र झाला मैनाकपर्वत देखा ।। पार्वती कन्या जगदंबिका ।। आदिमाया अवतरली ।। ६८ ।। ब्रह्मांडमंडपामाझारी ।। जिची प्रतिमा नाहीं दुसरी ।। कमलजन्मा वृत्रारी ।। त्यांसही दुजी करवेना ।।६९ ॥ तिचें स्वरूप पाहावया ।। येती सुर भूसूर मिळोनियां ।। जिचें स्वरूप वर्णावया ।। सहस्रवदना शक्ति नव्हे ॥ ७० ॥ मृग मीन कल्हार खंजन ।। कुरवंडी करावे नेत्रांवरून ।। अष्टनायिकांचें सौंदर्य पूर्ण ।। चरणांगुष्ठीं न तुळे जिच्या ॥ ७१ ॥ आकर्ण नेत्र निर्मळ मुखाब्ज ॥ देखोनि लज्जित होय द्विजराज ।। कंठीरव देखोनि जिचा माज ।। मुख न दावी मनुष्यां ॥ ७२ ॥ परम सुकुमार घनश्यामवर्णी ।। ओतिली इंद्रनीळ गाळूनी ॥ दंततेज पडतां मेदिनीं ।। पाषाण महामणी पैं होती ॥ ७३ ॥ आदिमाया प्रणवरूपिणी ॥ ते झाली हिमनगनंदिनी ।। अनंतशक्तींची स्वामिनी ॥ वेदपुराणीं वंद्य जे ॥७४॥
दक्षास सजीव करून भगवान शिव हे तिथून तीर्थासाठी म्हणून बारा वर्षांचा नेम करून निघून गेले. ।।६५।। त्यानंतर शिव हे वने, उपवने फिरत फिरत शेवटी आनंदवनातल्या महास्मशानात येऊन राहिले. ।। ६६ ।। तिकडे त्या पार्वती सतीने हिमालयाच्या पोटी जन्म घेतला. ती हिमालयात राहून नित्य शिव आराधना करू लागली. ।।६७।। हिमालयाची पत्नी मेनका हिला पुढे एक पुत्र झाला. तोच मैनाकपर्वत होय. त्या मेनकेची कन्या म्हणूनच सतीने त्या हिमकन्या रूपाने जन्म घेतला. ।।६८।। ती इतकी सुंदर आणि रूपवान होती की, तिच्यासारखी दुसरी स्त्री निर्माण करणे हे प्रत्यक्ष ब्रह्मदेवा, किंवा इंद्रासही शक्य झाले नाही. ।।६९।। केवळ तिचे अलौकिक असे सौंदर्य पाहण्यासाठी देवदेवता येत असत. तिच्या रूपाने वर्णन करणे सहस्र जिभांच्या शेषासही शक्य होत नव्हते. ।।७०।। तिच्या डोळ्यावरून हरीण, मासा, कमळ, खंजन पक्षी ह्यांची ओवाळणी करावी इतके ते सुंदर होते. अष्टनायकांच्या रूपाची सर तर तिच्या अंगठ्यासही येत नव्हती. ।।७१।। तिचे कमल नेत्र, तिचे मुखकमल हे पाहून स्वतः चंद्रही लज्जित होत असे. तिची कटी पाहून सिंहही खाली मान घालीत असे. ।।७२।। अत्यंत कोमल काया असलेली ती जणू काय नीलमणी घालून घडविली होती. तिच्या दंतपंक्तीच्या प्रकाशाने जमिनीवरचे खडेही रत्नाप्रमाणे चमकत. ।।७३।। ती जी आदिमाया पार्वती ही हिमकन्या झाली तिची स्तुती आणि गुणवर्णन हे वेद आणि शास्त्र पुराणांनी मुक्त कंठाने केले आहे. ।।७४।।
कोट्यनुकोटी मीनकेतन ।। सांडणी करावी नखांवरून।। आंगींचा सुवास संपूर्ण ।। ब्रह्मांड फोडोनि वरी जाय ॥७५॥ ब्रह्मादि देव मुळींहूनी ॥ गर्भी पाळी बाळें तीन्ही ।। बोलतां प्रकाश पडे सदनीं ।॥ निराळवर्णी कोमलांगी ॥७६ ॥ सहज बोलतां क्षितीं ॥ वाटे रत्नराशी विखुरती ।। पदमुद्रा जेथें उमटती ।। कमळें उठती दिव्य तेथें ।॥७७॥ त्या सुवासासी वेधोनि वसंत ॥ भोंवता गडबडां लोळत ॥ केवळ कनकलता अद्भुत ।। कैलासाहूनि उतरली ॥ ७८ ॥ नंदीसहित त्रिपुरारी ॥ येवोनि हिमाचळीं तप करी ।। शिवदर्शना झडकरी ।। हिमनग येता जाहला ॥ ७९ ॥ घालोनियां लोटांगण ।। करीत तेव्हां बहुत स्तवन ।। यावरी पार्वती येऊन ।। करीत भजन शिवाचें ॥ ८० ॥ साठ सहस्र लावण्यखाणी ।। सवें सखिया जैशा पद्मिणी ।। तयांसहित गजास्यजननी ।। सेवा करीत शिवाची ॥ ८१ ॥ द्वारीं सुरभिपुत्र रक्षण ॥ ध्यानस्थ सदा पंचवदन ।। लाविले पंचदश लोचन ॥ सदा निमग्न स्वरूपीं ॥ ८२ ॥ ताराकासुराचे पुत्र तिघेजण ।। तारकाक्ष विद्युन्माली कमललोचन ।। तिहीं घोर तप आचरोन ।। उमारमण अर्चिला ॥८३॥ सहस्रदळ कमळेंकरून ।। त्रिवर्ग पूजिती त्रिनयन ॥ सहस्रांत एक न्यून ॥ कमल झालें एकदां ॥८४॥
तिच्या सौंदर्यावरून कोट्यवधी मदन ओवाळून टाकावेत असे तिचे सौंदर्य होते. तिच्या अंगीच्या दिव्य सुवासाने अवघे ब्रह्मांड दरवळून गेले होते. ।।७५।। तिने स्वतःच्या गर्भात ब्रह्मादिक देवतांना बालक रूपाने पोसले होते. बोलताना तिच्या दंतपंक्तीचा सर्वत्र प्रकाश पसरत असे. तिची काया कोमल होती. ।।७६।। ती सहज बोलली तरी जमिनीवर रत्नांच्या राशी विखरून पडत. तिच्या पदचिन्हांच्या ठशांच्या जागी कमळे उगवत. ।।७७।। तिच्या देह सुगंधाभोवती वसंत ऋतू भुंगा घालीत असे. ती कैलासाहून खाली उतरलेली जणूकाही एखादी सुवर्णवेलच होती. ।।७८।। त्यावेळी याच हिमाचलयाच्या परिसरात भगवान शिव हे नंदीसहित येऊन तप करीत होते. तेव्हा त्यांच्या दर्शनास तो पर्वतराज हिमालय हा येत असे. ।।७९।। तेव्हा तो तिथे येऊन शिवाचे स्तवन, स्तुती करी. त्यावेळी त्याची कन्याही पित्यासोबत शिवदर्शनास येत असे आणि ती सुद्धा शिवपूजन, भजन आणि ध्यान करीत असे. ।।८०।। ती आपल्या साठ सहस्र सख्यांच्या सोबत तिथे येत असे आणि त्यांच्या सोबत ती गणेशमाता त्या शिवाची नित्य सेवाभक्ती करीत असे. ।।८१।। त्यावेळी शिवांनी सुरक्षेसाठी सुरभीपुत्र नंदी ह्याची नियुक्ती केलेली होती. तिथे शिव हा सदैव ध्यानावस्थेतच राहून ब्रह्मानंद रूपाचा आनंद घेत असे. ।।८२।। त्यावेळी तारकासुराच्या तीन पुत्रांनी ही शिवाराधना केली. त्यांची नावे तारकाक्ष, विद्युन्माली आणि कमललोचन अशी होती. ।।८३।। ते तिघेही शिवाची सहस्रकमलपुष्पे अर्पण करून पूजा करीत. एकदा त्या सहस्र संख्येत एका कमळाची उणीव आली. ।।८४।।
तिघेही काढूनि नेत्रकमळें ॥ शिवार्चन करिते झाले ॥ मागुती एक न्यून आलें ।। मग स्वशिरकमळे अर्पिलीं ॥८५॥ प्रसन्न होवोनि त्रिनेत्र ॥ तिघे उठविले तारकपुत्र ॥ तिघांसी दीधले अपेक्षित वर ।। झाले अनिवार त्रिभुवनीं ॥ ८६ ॥ तिघांसी चतुर्मुख प्रसन्न होऊनी ।। त्रिपुरें दिधलीं अंतरिक्ष-गमनी ।। दिव्य सहस्र वर्षे पाहातां शोधोनी ।। निमिषार्थे एक होती ।।८७ ।। इतुक्यांत जो धनुर्धर ।। मारील लक्ष्य साधूनि शर ।। त्रिपुरांसहित संहार ।। तुमचा करील निर्धारं ॥ ८८ ॥ यावरी त्या तिघांजणीं ॥ त्रिभुवन त्रासिलें बळेंकरूनी ॥ देव पळविले स्वस्थानाहूनी ।। पीडिली धरणी बहु पापें ॥८९॥ मग देव ऋषि सकळ मिळोन ।। वैकुंठपतीस गेले शरण ।। गरुडध्वज सर्वांसी घेऊन ।। शिवापाशीं पातला ॥९०॥ करितां अद्भुत स्तवन ।। परम संतोषला पंचवदन ॥ म्हणे मी झालों प्रसन्न ।। मागा वरदान अपेक्षित ॥९१ ।। म्हणती त्रिपुरें पीडिलें बहुत ।। देव ऋषि झाले पदच्युत ।। शिव म्हणे पाहिजे रथ ।। त्रिपुरमर्दनाकारणें ॥९२॥ तंव देव बोलती समस्त ॥ आम्ही सजोनि देतों दिव्यरथ ।। मग कुंभिनी स्यंदन होत ।। चक्रे निश्चित शशिमित्र ॥९३॥
तेव्हा त्या तिघांनीही आपापले नेत्रकमल अर्पण करून ती उणीव भरून काढली. पुन्हा कमी पडताच त्यांनी आपली शिरकमले शिवास अर्पण केली. ।।८५।। त्यामुळे भगवान शिव हे त्या तिघांवर प्रसन्न झाले. त्यांनी त्यांना उठविले आणि त्यांना हवा असलेला वरही दिला. त्यामुळे त्या वरप्राप्तीबरोबरच ते असुर पुत्र हे उन्मत्त झाले. ।।८६।। त्यांनी ब्रह्मदेवासही प्रसन्न करून घेत त्याच्याकडून अंतरिक्षात तीन नगरे मिळविली. तेव्हा ब्रह्मदेव त्यांना म्हणाले, हजारो वर्षांनंतर ही तिन्ही नगरे एका निमिषार्धात एकत्र येतील. ।।८७।। मात्र जो खरा निष्णात धनुर्धारी असेल तो शरसंधान साधून ही तिन्ही नगरे आणि तुम्ही तिघे ह्यांचा नाश करेल. ।।८८।। पुढे असे घडू लागले की, हे तिघे अवघ्या त्रिभुवनास गांजू लागले. त्रस्त करू लागले. त्यांनी देवतांना त्यांच्या स्थानावरून पळवून लावले, तर पृथ्वीवर पापसंहाराचा धडाकाच लावला. ।।८९।। त्यावेळी सर्व दुःखीकष्टी देव, ऋषी, मुनी, मानव हे भगवान विष्णूंना शरण गेले, विष्णूंनी त्यांची समस्या जाणून घेतली आणि कसलासा विचार करून त्या सर्वांना शिवाकडे नेले. ।।९०।। तेव्हा सर्वांनी शिवाची नानाप्रकारे स्तुती केली, त्याची स्तवने गायिली आणि त्यास प्रसन्न करून घेतले. तेव्हा प्रसन्न झालेला शिव त्यांना वर मागा असे म्हणाला. ।।९१।। तेव्हा ते म्हणाजे हे देवा, त्या त्रिपुरासुराच्या पुत्रांना आवर घालायला हवा. त्यांनी सर्वांना अत्यंत पीडा देऊन देवतांना स्थानभ्रष्ट केले आहे. तेव्हा तू त्यांचा वध कर. ।।९२।। त्यावर भगवान शिव म्हणाले, “त्यांचा संहार करण्यासाठी मला एक दिव्य रथ हवा आहे. “॥९३॥
मंदरगिरी अक्ष होत ।। स्तंभ झाले चारी पुरुषार्थ ।। चारी वेद तुरंग बलवंत ।। मूर्तिमंत पैं झाले।॥९४॥ सारथी विधि होत सत्वर ।। लाविले शास्त्रांचे वाग्दोर ॥ पुराणें तटबंद साचार ॥ उपपुराणें खिळे बहु ।।९५।। कनकाद्रि धनुष्य थोर ।। धनुर्ज्या होत भोगींद्र ॥ वैकुंठींचा सुकुमार ।। झाला शर तेजस्वी ॥९६ ।। रथीं चढतां उमानाथ ।। रसातळीं चालिला रथ ॥ कोणासी न उपडे निश्चित । मग नंदी काढीत शृंगानें ॥९७॥ मग स्यंदनीं एक चरण ॥ दुजा नंदीवरी ठेवुन ॥ अपार युद्ध करून ॥ त्रिपुरदळें संहारिलीं ॥९८॥ होतां युद्धाचें घनचक्र।। वीरभद्रं संहारिले असुर ।। परी अमृतकुंडें समग्र ।। दैत्यांकडे असती पैं ॥९९॥ अमृत शिंपितां अमित ।। सजीव होती सवेंचि दैत्य ।। शिवें मेघास्त्र घालूनि समस्त ।। अमृतकुंडें बुडविलीं ॥ १०० ॥ अंतराळीं त्रिपुरें भ्रमती ॥ लक्ष्य साधी मृडानीपती ।। दिव्य सहस्र वर्षे झालीं येचि रीतीं ।॥ न लवती पातीं कदापि ॥१०१॥ अंगीं लोटला घर्मपूर ॥ ते हे भीमरथी गंगा थोर ॥ नेत्रींचे जलबिंदु पडतां अपार ॥ रुद्राक्ष तेथें जाहले ॥१०२॥
तेव्हा सर्व देवदेवता म्हणाला, प्रभू, तसा दिव्य रथ आम्ही तुम्हास सजवून देतो. तेव्हा पृथ्वी हीच रथ झाली. चंद्र, सूर्य त्याची चाके झाली. मंदार पर्वत हा त्या रथाचा कणा झाला. चार पुरुषार्थ हे त्या रथाचे स्तंभ झाले, चार वेद हे त्याचे चार अश्व झाले. ।।९४।। स्वतः ब्रह्मदेव त्या रथाचा सारथी झाला. शास्त्रांची वचने त्याचे दोर झाले, पुराणे ही त्याची तटबंध, तर उपपुराणे हे त्या रथाचे खिळे झाली. ।।९५।। मेरू पर्वत हा धनुष्य, शेषनाग हा त्याची दोरी तर वैकुंठीचा राणा विष्णू हा त्या धनुष्यावरचा तेजस्वी बाण झाला. ।।९६।। अशा या सुसज्ज अशा रथावर उमानाथ चढले, त्याबरोबर त्यांच्या भाराने तो रथ रसातळास जाऊ लागला. त्यास वर काढणे कोणास जमेना. तेव्हा नंदीने आपल्या शक्तिशाली शिंगांनी तो रथ वर काढला. ।।९७।। मग शंकरांनी एक पाय त्या रथावर आणि दुसरा पाय त्या नंदीच्या पाठीवर ठेवला आणि शिवांनी त्या त्रिपुरासुरांच्या सैन्याशी महासंग्राम चालू केला. ।।९८।। या घनघोर युद्धात वीरभद्राने असुरांचा मोठ्या प्रमाणात संहार केला. मात्र अमृताची कुंडे दैत्यांकडे होती. ।।९९।। त्यामुळे त्यांनी त्या अमृत सिंचनाने आपली सेना पुन्हा उठविली. तेव्हा शिवांनी मेघास्त्र सोडून ती अमृतकुंडे बुडवून टाकली. ।।१००।। त्रिपुरासुर हे अंतराळात भ्रमण करू डागले. तेव्हा शंकरांनी अचूक लक्ष्य हेरले. डोळ्याचे पाते लवते न लवते तोच बऱ्याच वर्षांचा काळ निघून गेला. ।।१०१।। तेव्हा अतिकष्टाने श्रमाने शिवाच्या अंगातून घामाचे लोट वाहू लागले, त्याचीच पुढे भीमा नदी तयार झाली. शिवाच्या नेत्रांतून जे अश्रू खाली पडले त्याचेच रुद्राक्ष तयार ले. ।।१०२।।
दैत्यस्त्रिया पतिव्रता थोर ॥ तेणें असुरांसी जय अपार ॥ मग बौद्धरूपें श्रीकरधर ॥ दैत्यस्त्रियांत प्रवेशला ॥१०३॥ वेदबाह्य अपवित्र ॥ प्रगट केलें चार्वाकशास्त्र ॥ पतिव्रताधर्म मोडोनि समग्र ।। व्यभिचारकर्मे करविलीं ॥१०४॥ तेणें दैत्यांस झालें अकल्याण ॥ तंव इकडे शिवें लक्ष्य साधून ।। धनुष्यीं योजिला विष्णुबाण ।। पाशुपतास्त्र स्थापुनी ॥१०५ ॥ उगवले सहस्र मार्तंड ॥ तैसें अस्त्र चालिलें प्रचंड ॥ कीं उभारिला कालदंड ॥ संहारावया विश्वातें ॥१०६।। कीं प्रळयाग्नीची शिखा सबळ ।। कीं कृतांताची जिव्हा तेजाळ ।। कीं ते प्रळयमेघांतील ।। मुख्य चपला निवडिली ।।१०७।। कीं सप्तकोटिमंत्रतेज पाहीं ॥ एकवटलें त्या अस्त्राठायीं ।॥ देव दैत्य भयभीत हदयीं ।। म्हणती कल्पांत मांडिला ॥१०८ ॥ न्याससहित जपोनि मंत्र ॥ सोडोनि दिधलें दिव्यास्त्र ॥ नवखंडधरणी आणि अंबर ॥ तडाडलें ते काळीं ॥१०९॥ सहस्र विजा कडकडती ।। तैसी धांविन्नली अस्त्रशक्ती ।। भयें व्यापिला सरितापती ।। अंग टाकूं पहाती दिग्गज ॥११०॥ देव विमानें पळविती ॥ गिरिकंदरीं असुर दडती ॥ एक मूच्र्छना येवोनि पडती ॥ उठती ना मागुते ॥१११ ॥
युद्धात दैत्यांना जे अपूर्व असे यश मिळत होते, ते त्यांच्या पतिव्रता स्त्रियांमुळे. ही गोष्ट लक्षात येताच विष्णूंनी बौद्धरूप धारण केले आणि दैत्य खियांच्या मध्ये प्रवेश केला. ।।१०३।। त्याने चार्वाक शाखाचा पुरस्कार करून त्या पतिव्रता दैत्य स्त्रियांचे हातून अधर्म आणि पापाचरण घडविले. ।।१०४।। त्यामुळे त्यांचे पावित्र्य आणि सामर्थ्य हे भंग पावले, परिणामी दैत्यांचा पराभव झाला. त्यातच शंकरांनी पाशुपतास्त्र आणि रामबाण बाहेर काढला. ।।१०५।। सहस्र सूर्य उगवावेत तसे ते अस्त्र चालू लागले आणि दैत्यांचा प्रचंड मोठा संहार घडू लागला. । १०६।। प्रलयाग्नीच्या प्रचंड ज्वाला सगळीकडे उसळल्या, यमधर्माची जीभ मृत्यूच्या रूपाने वळवळू लागली, प्रलयकालीन मेघात जणू विजाच चमकू लागल्या. ।।१०७।। त्या अखात सात कोटी मंत्रांची शक्ती एकवटलेली असल्याने ते अत्र पाहून देव आणि दैत्य दोघही विचारात पडले की आता काय होणार? ।।१०८।। तिकडे शिवाने प्रथम न्यास केला आणि मग त्याने मंत्राचा जप करून दिव्यास्त्र सोडले. तेव्हा नवखंड पृथ्वी आणि आकाशालाही जागोजागी तडे गेले. ।।१०९।। सहस्र विजा कडाडाव्यात असे आवाज करीत ती शक्ती वेगाने आली तेव्हा सागराला भीती वाटू लागली, अष्ट दिशांचे हत्ती अंग टाकू लागले. ।।११०।। देवांनी पळ काढला, तर असुर हे कडेकपारीत लपून बसले. काहीजण त्या तेजाने आणि आवाजाने एकदा जे मूच्छित होऊन पडले ते पुन्हा उठलेच नाहीत. ।।१११।।
त्या अस्त्रं न लागतां क्षण ।। त्रिपुरें टाकिलीं जाळून ।। त्यांत तृतीय नेत्रींचा प्रळयाग्न ।। साह्य झाला तयातें ॥ ११२॥ तिन्ही ग्राम सेनेसहित ।। त्रिपुरें भस्म झालीं तेथ ।। देव शिवस्तवन करीत ।। चरण धरीत सप्रेमें ।। ११३ ।। त्यावरी त्रिपुरपिता तारकासुर ।। तेणें प्रलय मांडिला थोर ।। देव पळविले समग्र ।। चंद्रसूर्य धरूनि नेले ॥११४॥ भागीरथी आदि गंगा पवित्र ।। धरूनि नेत तारकासुर ।। देवांगना समग्र ।। दासी करोनि ठेविल्या ॥११५॥ ब्रह्मा विष्णु शचीवर ।। करिती एकांतीं विचार ।। म्हणती शिवउमा करावीं एकत्र ।। होईल पुत्र षण्मुख ॥ ११६ ॥ त्याचे हस्तें मरेल तारकासुर ।। मग बोलावूनि पंचशर ।। म्हणती तुवां जावोनि सत्वर ।। शिवपार्वती ऐक्य करीं ॥११७॥ हिमाचळीं तप करी व्योमकेश ।। मन्मथा तूं भुलवीं तयास ।। मग रतीसहित कुसुमेश ।। शिवाजवळीं पातला ॥११८ ।। पार्वतीच्या स्वरूपांत ।। रती तेव्हां प्रवेशत ।। वसंतें वन समस्त ।। शृंगारिलें तेधवां ॥ ११९ ॥ शिवाच्या मानसीं सतेज ।। प्रवेशला शफरीध्वज ।। पांखरें करिती बहु गजबज ।। शिवध्यान विक्षेपिती ॥१२०॥
त्या दिव्य अस्त्रास भरीत भर म्हणून शिवाच्या तिसऱ्या नेत्रातील अग्नी सहाय्यक झाला. शस्त्रांनी त्रिपुरासुरांचा नाश केला तर अन्नीने त्या असुरराजांची अंतरिक्षातील तिन्ही नगरे जाळून टाकली. ।।१२।। तिकडे जेव्हा त्रिपुरासुरांसह त्यांची त्रिपुरे नष्ट झाली, तेव्हा देवांनी शिवाच्या नावाचा जयजयकार केला, ते कृतज्ञतेने शिवचरण कवटाळू लागले. ।।११३।। मात्र झाले असे की या घटनेमुळे त्या त्रिपुरासुरांच्या पित्याने म्हणजेच तारकासुराने मात्र मोठे थैमान घालण्यास सुरुवात केली. त्याने स्वबळावर देवतांना हाकलून लावले आणि चंद्रसूर्यास आपल्या सोबत धरून नेले. ।।११४।। त्याने गंगेसारख्या पवित्र नद्यांना धरून नेले आणि असंख्य देवस्त्रियांना त्याने आपल्या दासी बनविले. ।।११५।। मग ब्रह्मदेव आणि विष्णू एकत्र आले. त्यांनी त्रिपुरासुराचा नाश केव्हा, कसा आणि कोणाच्या हातून होईल ह्याचा शोध घेतला. तारकासुराचा मृत्यू हा शिवपुत्राच्या हातून होणार असल्याने त्यांनी शिव आणि हिमकन्या उमा ह्यांचा संयोग घडविण्याचे प्रयत्न चालू केले. ।।११६।। तेव्हा नित्य शिव आराधनेसाठी जाणाऱ्या उमेच्या बद्दल शिवाचे मनात इच्छा निर्माण करण्याचे काम हे मदनावर सोपविण्यात आले. ।।११७।। देवता मदनास म्हणाल्या, शिव हिमालयात तपश्चर्या करीत आहेत. उमा त्यांच्या दर्शनास नित्य जाते, तू त्या उमा महेश्वांराचे मिलन घडवून आण. तेव्हा मदन हा रतीस सोबत घेऊन शिवापाशी गेला. ।।११८।। उमेच्या रूपात रतीने प्रवेश केला. इकडे मदनाने त्या वनप्रदेशात सर्वत्र वसंत ऋतू फुलविला. ।।११९।। तिकडे शिवाच्या मनात मदनाने प्रवेश केला. त्याबरोबर पक्ष्यांच्या किलबिलाटाने शिवाच्या ध्यानात व्यत्यय येऊ लागला. ।।१२०।।
ते पक्षी हांकावया नंदिकेश्वर ।। गेला होता तेव्हां दूर ।। तों पार्वती होवोनि कामातुर ।। पाठीसीं उभी मन्मथाच्या ॥ १२१ ॥ शिवें उघडिले नयन ।। तों पुढें देखिला मीनकेतन ।।॥ म्हणे माझ्या तपासी केलें विघ्न ।। मग भाललोचन उघडिला ॥ १२२ ॥ निघाला प्रलयवैश्वानर ।। भस्म केला कुसुमशर ।। फाल्गुनी पौणिमा साचार ।। काम जाळिला ते दिनीं ॥ १२३ ॥ शिवदूत भूतगण ।। महाशब्दें हांक देऊन ।। स्मरगृह शब्द उच्चारून ।। नानापरी उपहासिती ॥१२४॥ शिवाची आज्ञा तैंपासून ॥ फाल्गुनमासीं हुताशनी करून ।। जो हैं व्रत न पाळी पूर्ण ।। अवदसा जाण त्या बाधी ॥ १२५ ॥ ऐसा संहारूनि पंचशर ॥ विचार करूनि पंचवक्त्र ।। तत्काळ उठोनि कपूर्रगौर ।। गेला कैलाससदनासी ॥ १२६ ॥ रती शोक करी बहुत ।। मग समाधान करी निर्जरनाथ ॥ म्हणे कृष्णावतारीं तुझा कांत ।। रुक्मिणीउदरीं अवतरेल ॥१२७॥ कमलासनें कन्येसी भोगितां ।। कंदर्पास शाप दिधला होता ।। कीं शिवदृष्टीनें तत्त्वतां ।। भस्म होशील कामा तूं ॥ १२८ ॥ असो इकडे हिमनगकुमारी ।। शिवप्राप्तीलागीं तप करी ।। सप्तऋषि प्रार्थिती त्रिपुरारी ।। वरीं कन्या हिमनगाची ॥ १२९ ॥
त्या पक्ष्यांना दूर हाकलून लावण्यासाठी जेव्हा नंदी हा शिवापासून दूर गेला तेव्हा पार्वती कामातुर होऊन शिवाच्या पाठीजवळ जाऊन उभी राहिली. ।।१२१।। शिवाने जेव्हा नेत्र उघडले तेव्हा त्याने मदनास समोर उभा असलेले पाहिले. शिव म्हणाले, “मदना, तू माझ्या तपश्चर्येत विघ्न का आणलेस”? असे म्हणत त्यांनी आपला तिसरा नेत्र उघडला. ।।१२२।। तेव्हा त्यातून प्रचंड मोठा अग्नी उत्पन्न झाला आणि त्याने मदनास जागीच जाळून भस्मसात केले. तो शिवाने काम जाळलेला दिवस म्हणजेच फाल्गुन पौर्णिमा होय. ।।१२३।। तेव्हा शिवाचे दूत, भूतगण हे अपशब्द उच्चारीत मोठा आरडाओरडा करू लागले, बोंबा मारू लागले. ।।१२४।। तेव्हापासून शिवाच्या आज्ञेने होलिकोत्सव साजरा करण्याचा प्रघात सुरू झाला. जे कोणी हे व्रताचरण करीत नाहीत त्यांना अवदसा प्राप्त होते. ।।१२५।। याप्रकारे शिवांनी मदनाचा नाश केला आणि ते तो परिसर सोडून कैलासास निघून गेले. ।।१२६।। या घटनेने मदनाची पत्नी रती मात्र शोक करू लागली. तेव्हा इंद्राने तिचे समाधान केले. तो तिला म्हणाला, कृष्णावतारात तुझा पती हा रुक्मिणीच्या पोटी पुत्र म्हणून जन्मास येईल. ।।१२७।। ब्रह्मदेवाने कन्या सरस्वतीचा भोग घेताना कर्दपास शाप दिला होता की, तू शिवनेत्रातील अग्नीने भस्म होशील. ।।१२८।। त्याच वेळी हिमालयात हिमकन्या पार्वती ही शिव हाच आपल्याला पती म्हणून लाभावा म्हणून तप करीत होती. तेव्हा सप्तर्षी हे शिवाची आळवणी करू लागले की, हे देवा, तू हिमकन्या पार्वतीचा पत्नी म्हणून स्वीकार कर. ।।१२९।।
पार्वती तप करी जे वनीं ।। शिव तेथे गेला बटुवेष धरोनी ।। गायनाच्या छंदेंकरूनी ।। पुसे भवानीप्रति तेव्हां ॥१३० ।। कासया तप करिसी येथ ।। येरी म्हणे जो कैलासनाथ ।। पति व्हावा एतदर्थ ।। आचरे तप येथें मी ॥१३१॥ बटु बोले ते अवसरीं । तूं तंव हिमनगराजकुमारी ।। शंकर केवळ भिकारी ॥ महाक्रोधी दारुण ॥१३२॥ ओलें गजचर्म प्रावरण ।। शार्दूलचर्म नेसला सर्प भूषण ।। वसविलें महास्मशान ।। भूतगण सभोंवतें ॥ १३३ ॥ तरी विष्णु विलासी सगुण ।। त्यासी वरीं तूं ऐक वचन ।। तुज योग्य पंचवदन ।। वर नव्हे सर्वथा ।। १३४ ।। ऐकतां क्षोभली जगन्माता ।। म्हणे शिवनिंदका होय परता ।। वदन न दाखवीं मागुता ।। परम खळा द्वेषिया ॥ १३५ ॥ शिवनिंदक जो दुराचार ॥ त्याचा विटाळ न व्हावा साचार ।। तुज शिक्षा करीन निर्धार ॥ विप्र म्हणोनि राहिलें ॥ १३६ ॥ देखोनि दुर्गेचा निर्धार ॥ स्वरूप प्रगट करी कर्पूरगौर ।। पार्वतीनें करूनि जयजयकार ।। चरण दृढ धरियेले ।। १३७ ।। शिव म्हणे ते समयीं ।। प्रसन्न झालों माग लवलाहीं ।। अंबिका म्हणे ठाव देई ।। अर्धांगीं तुझ्या जगदात्म्या ॥ १३८ ॥
तेव्हा जिथे पार्वती शिवासाठी तप करीत होती, तिथे शिव एका बटूच्या रूपात गेला. तो पार्वतीस विचारू लागला की ।।१३०।। हे देवी, तू इथे कोणासाठी असे घोर तप करते आहेस? तेव्हा पार्वती त्यास म्हणाली की, “कैलासनाथ शिवशंकर हे मला माझ्या पतीच्या रूपात प्राप्त व्हावेत म्हणून मी ही तपसाधना करीत आहे.” ।।१३१।। त्यावर तो बटू तिला म्हणाला, “अगं तू तर हिमालयाची कन्या आहेस. तो शंकर तर बैरागी अन् महाक्रोधी आहे. ।।१३२।। तो हत्तीचे कातडे काय पांघरतो, वाघाचे कातडे काय नेसतो, सर्पाचे अलंकार घालतो आणि राहतो कुठे तर स्मशानात. त्याच्या सभोवती भुते वावरतात. ।।१३३।। अगं त्याच्यापेक्षा तो विष्णू बघ, तो पूर्ण विलासी आहे. अगं माझं वचन ऐक, तो विष्णूच तुला पती म्हणून योग्य आहे. तू त्याच्याशीच विवाह कर. हा बैरागी शंकर काही तुला योग्य नाही.” ।।१३४।। तेव्हा त्या बटूचे ते बोलणे ऐकून पार्वती रागावली. त्यास म्हणाली, “तू शिवनिंदक आहेस, तू दुष्ट आहेस, तू इथून निघून जा. पुन्हा मला तुझे तोंडही दाखवू नकोस.” ।।१३५।। अरे दुराचारी पापी, शिवनिंदकाचा विटाळही होऊ नये, तू खरंतर शिक्षेस पात्र आहेस, पण केवळ ब्राह्मण बटू आहेस, म्हणून मी तुला शिक्षा करीत नाही इतकेच. ।।१३६।। तेव्हा पार्वतीचा तो निर्धार पाहून शिवांनी आपले मूळ रूप प्रकट केले. तेव्हा आपल्याच उपास्य देवतेस समोर पाहून पार्वतीने त्यांच्या नावाचा जयजयकार केला आणि शिवचरणांस मिठी घातली. ।।१३७|| तेव्हा प्रसन्न झालेले शिव पार्वतीस म्हणाले, हे हिमकन्ये, मी तुझ्या तपश्चर्येवर प्रसन्न झालो आहे, काय हवा तो वर माग ।।१३८ ।। त्यावर ती अंबिका देवी म्हणाली, “प्रभो, मला आपली अर्धांगिनी होण्याचे भाग्य मिळावे.” ।।१३८।।
अवश्य म्हणोनि त्रिपुरारी ॥ कैलासासी गेला ते अवसरीं ।॥ पितृसदना झडकरी ॥ गेली तेधवां जगदंबा ॥१३९॥ मग सप्तऋषि ते वेळे ॥ शिवें हिमाचळा पाठविले ॥ हिमनगें ते आदरें पूजिले ।। षोडशोपचारें – करूनियां ॥ १४० ॥ अरुंधतीनें येऊन ॥ भवानी पाहिली अवलोकून ॥ म्हणे शिव आणि भवानी पूर्ण ।। जोडा होय निर्धारं ॥१४१॥ मन्मथ संवत्सर चैत्रमासीं ।॥ लग्न नेमिलें शुद्ध अष्टमीसी ।। निश्चय करूनि सप्तऋषि ।। स्वस्थानासी पातले ॥१४२॥ कधीं होईल शिवगौरी लग्न ।। इच्छिती ब्रह्मेद्रादि सुरगण ।। तारकासुराचा तो प्राण ।। शिवपुत्र घेईल कधीं ॥ १४३ ॥ इकडे नंदीसी पाठवूनि ते वेळे ।। सर्व देव शिवें बोलविले ।। घेवोनि त्रिदशांचे पाळे ॥ पाकशासन पातला ॥१४४॥ इंदिरेसहित इंदिरावर ॥ सावित्रीसहित चतुर्वक्त्र ।। अठ्ठ्याऐंशीं सहस्र ऋषीश्वर ।। शिष्यांसहित निघाले ॥ १४५ ॥ सिद्ध चारण गुहाक ॥ पितृगण मरुद्गण वसुअष्टक ।। एकादशरुद्र द्वादशार्क ।। यक्षनायक पातला ।।१४६।। आपुलाल्या वाहनीं बैसोन ।। लोकपाल निघाले संपूर्ण ॥ नवग्रह अष्टनायिका आदिकरून ।। किन्नर गंधर्व सर्वही ।।१४७।।
तेव्हा शिवांनी तिला ‘अवश्य’ असे अभिवचन दिले आणि ते कैलासास गेले. इकडे पार्वती आपल्या पित्याच्या घरी गेली. ।।१३९।। मग शिवांनी सप्तऋर्षीना हिमालयाकडे पाठविले. हिमालयाने आपल्याकडे आलेल्या त्या ऋषिवरांचा उचित आदर सन्मान केला. ।।१४०।। तेव्हा अरुंधतीने भवानीस पाहिले आणि ती हिमालयास म्हणाली की, शिव आणि पार्वती हे दोघेही परस्परांना अगदी अनुरूप आहेत, तेव्हा त्यांचा विवाह अवश्य घडवून आणावा. ।।१४१।। पुढे खरोखरच शिव-पार्वतीच्या विवाहासाठी मन्मथ संवत्सराच्या चैत्र महिन्यातील शुद्ध अष्टमी ही तिथी निश्चित करण्यात आली. त्या दोघांचा वार्निश्चय करवून सप्तऋषी हे आपापल्या स्थानी परत गेले. ।।१४२।। शिव-गौरी विवाह कधी संपन्न होणार, कधी त्यांना पुत्र होणार आणि त्या पुत्राच्या हातून तारकासुराचा वध होणार ह्याची सर्व देवदेवता आतुरतेने वाट पाहात होते. ।।१४३।। इकडे शिवांनी नंदीस पाठवून सर्व देवदेवतांना आपल्याकडे बोलावले. तेव्हा इंद्र अनेक देवतांना तिथे घेऊन आला. ।। १४४।। तिथे विष्णूं सह लक्ष्मी, ब्रह्मदेवासह सरस्वती आणि त्याच्या सोबत अठ्याऐंशी सहस्र ऋषिगण हे त्यांच्या शिष्य परिवारासह या मंगलकार्यास निघाले. ।।१४५।। त्याप्रमाणेच सिद्ध, चारण, गुह्यक, पितृगण, मरुद्गण अष्ठवसू, अकरा रुद्र, बारा आदित्य, हे सर्वजणही तिथे आले. ।।१४६।। तसे विमानारूढ होऊन तिथे अष्टदिशांचे स्वामी, नवग्रह, अष्टनायिका, यक्षकिन्नर, गंधर्व, हे सारेजण निघाले. ।।१४७।।
एवं सर्वांसहित शंकर ।। हिमाचलासी आला सत्वर ।। नगेंद्र येवोनि समोर ।। पूजोनि नेत सकळांतें ।।१४८ ।। दशसहस्र योजनें मंडप ।। उभविला ज्याचें तेज अमूप ।। सुवर्णसदनें देदीप्य ।। जानवशासी दीधलीं ॥१४९॥ शिवस्वरूप पाहतां समस्त । वऱ्हाडी होत विस्मित । एक म्हणती वृद्ध बहुत ॥ पुराणपुरुष अनादि ॥१५०॥ हा आहे केवळ निर्गुण ।। नवरी स्वरूपें अति सगुण ।। असो देवकप्रतिष्ठा करून ।। मूळ आला हेमाद्री ॥१५१॥ आद्यंत अवधें साहित्य ॥ कमलोद्भव स्वयें करीत ।। नवनिधी अष्ट महासिद्धी राबत ।। न्यून तेथें नसे कांहीं ।।१५२ ॥ असो नवरा मिरवीत ।। नेला आपुल्या मंडपांत ।। मधुपर्कादि पूजाविधी समस्त ।। हिमाचळ करीतसे ॥१५३॥ लग्नघटिका आली जवळी ॥ तंव ते शृंगारसरोवरमराळी ।। बाहेर आणिली हिमनगबाळी ।। उभी केली पटाआड ।।१५४।। लग्नघटिका पाहे दिनपती ।। मंगळाष्टकें म्हणे बृहस्पती ।। ॐ पुण्याहं निश्चितीं ।। कमलासन म्हणतसे ।।१५५ ।। असो यथाविधी संपूर्ण ॥ दोघां झालें पाणिग्रहण ।। होमासी करिती प्रदक्षिण ।। शिवशक्ती तेधवां ॥१५६॥
अशाप्रकारे आपल्यासोबत ह्या सर्व परिवारास घेऊन भगवान शिव है हिमालयाकडे आले. त्याने पुढे होऊन सर्वांचे उचित स्वागत केले. सर्वांची पूजा केली व त्यांना आदराने आपल्या सोबत घेऊन गेला. ।।१४८।। या व-हाडी मंडळींसाठी हिमालयाने दहा हजार योजने लांब इतका मोठा मांडव घालून तो अत्यंत सुंदरपणे सजविला होता. या सर्वांसाठी सुवर्ण सदने उभारली होती. ।।१४९।। शिव जामातास पाहून सर्वजण विस्मित झाले. कुणी तर असा अभिप्राय दिला की, हा हिमालयाचा जावई म्हणजे साक्षात पुराणपुरुषच आहे. ।।१५०।। हा तर निर्गुण आणि नवरी तर सगुण असो, तेव्हा देवदेवक ठेवून वरास बोलावण्यासाठी स्वतः हिमालय हा त्याच्याकडे आला. ।।१५१।। या मंगल विवाहाची प्रारंभापासून ते शेवटापर्यंतची सर्व व्यवस्था ब्रह्मदेवाने केली होती. त्यासाठी नवविधी आणि अष्ट महासिद्धी या जातीने राबत होत्या. त्यामुळे तिथे कशाचीच उणीव नव्हती. ।।१५२।। उचित समयी वधूवर हे वाजतगाजत मंडपात आले. हिमालयाने मधुपर्कादी सर्व पूजेची व्यवस्था करून ठेवली होती. ।।१५३।। जेव्हा लग्नघटिका समीप आली तेव्हा शृंगार सरोवरातील त्या हंसीरूपिणी पार्वतीस लग्नमंडपात आणण्यात आले, तिला पडद्यामागे उभी करण्यात आले. ।।१५४।। सूयनि या विवाहाची लग्नघटी पाहिली, बृहस्पतींनी मंगलाष्टका म्हटल्या, ब्रह्मदेवांनी पुण्याहवाचन केले. ।।१५५।। असो, याप्रकारे सर्व लग्न विधी रीतसर पार पडला, दोघांचे पाणी ग्रहण झाले. वधूवरांचे होमाभोवतीचे फेरे सुरू झाले. ।।१५६।।
इतुकें याज्ञिक झालें सर्वही ।। परी नोवरी कोणीं देखिली नाहीं ॥ प्रदक्षिणा करितां ते समयीं ॥ पदनख देखिलें विधीनें ॥१५७॥ कामें व्यापिला सूर्यजामात ।। पटपटां वीर्यबिंदु पडत ।। साठी सहस्र वालखिल्य तेथ ।। जन्मले क्षण न लागतां ॥१५८॥ अन्याय देखोनि थोर ।। मदनांतक कोपला अनिवार ।। ब्रह्माचें पांचवें शिर ।। छेदूनि टाकिलें तेधवां ॥१५९॥ झाला एकचि हाहा: कार ।। त्यावरी वैकुंठींचा सुकुमार ।। समाधान करी अपार ।। चतुर्वक्त्र नाम तैंपासुनि ॥१६०॥ असो यथाविधी सोहळे ।। चारी दिवस संपूर्ण जाहले ॥ सकळ देव गौरविले ॥ वस्त्रालंकारीं हिमनगें ॥१६१॥ सवें पार्वती घेऊनी ।। कैलासा आला शूलपाणी ॥ यावरी सर्व देव मिळोनी ॥ प्रार्थिते झाले विश्वनाथा ॥१६२॥ खुंटली विश्वाची उत्पत्ती ।। मन्मथ उठवी उमापती ।। मग तो मीनध्वज पुढती ॥ अनंग करोनि जीवविला ॥१६३॥ अंधकपुत्र तारकासुर ।। तेणें पळविले देव समग्र ।। शिवासी होईल कधीं पुत्र ।। देव समग्र वांच्छिती ।।१६४।। चारी युगेंपर्यंत ॥ शिव उमा एकांतीं रमत ।। परी नोहे वीर्यपात ।। नव्हे सुत याकरितां ॥१६५॥
पण इतके झाले तरी प्रत्यक्ष नवरीचे रूपसौंदर्य हे कोणीच पाहिले नव्हते. फक्त होमास प्रदक्षिणा घालत असताना ब्रह्मदेवास तिच्या चरणांचे दर्शन घडले. ।।१५७।। त्या तेवढ्याशा दर्शनाने त्याच्या मनात कामवासना जागी झाली आणि काय होतेय हे कळायच्या आतच त्याचे वीर्यपतन झाले. त्या वीर्यातूनच साठ सहस्र वालखिल्य ऋर्षीचा जन्म झाला. ।।१५८।। हा प्रकार पाहताच शंकरांचा क्रोध अनावर झाला. त्यांनी रागाच्या भरात ब्रह्मदेवाच्या पाचव्या मस्तकाचे छेदन केले. ।।१५८।। या प्रकाराने सर्वत्र एकच हाहा:कार उडाला. तेव्हा विष्णूंनी ब्रह्मदेवाचे सांत्वन केले. तेव्हापासून तो चार मुखांचा झाला. ।।१६०।। असो, चार दिवस मोठ्या धामधुमीत लग्न सोहळा पार पडला. हिमालयाने सर्वांचा वस्त्रालंकार देऊन प्रत्येकाचा डचित सन्मान केला. ।।१६१।। नंतर भगवान शिव हे पार्वतीस घेऊन कैलासलोकी आले. तेव्हा सर्व देवांनी त्यांची मुक्तकंठाने स्तुती केली आणि त्यांना प्रार्थना केली की ।।१६२।। हे उमामहेश्वरा, मदनाच्या जळून जाण्याने सर्व सृष्टीची उत्पत्ती थांबली आहे, तेव्हा कृपा करा आणि मदनास पुन्हा जिवंत करा. ती विनंती मान्य करून शंकरांनी मदनास पुन्हा जिवंत केले. ।।१६३।। इकडे मात्र सर्व लोक, देवदेवता या त्या अंधकाच्व्या पुत्राचा तारकासुराचा शिवपुत्राच्या हातून कधी एकदा नाश होतोय याची आतुरतेने वाट पाहात होत्या. ।।१६४।। शिव आणि उमा हे चार युगे होईपर्यंत एकांतात राहिले. पण *शिवाचे काही वीर्यपतन होईना आणि त्यामुळे शिवपुत्र प्राप्तीची संभावनाही कमी झाली. ।।१६५।।
तों तारकासुरें केला आकांत ॥ स्वर्ग जाळिलें समस्त ।। देवललना धरूनि नेत ।। दासी बहुत पैं केल्या ॥ १६६ ॥ देव शिवासी शरण जाती ।। तंव तीं दोघे एकांतीं रमती ।। देव ऋषि बाहेर तिष्ठती ।। प्रवेश कोणा नव्हेचि ॥ १६७ ॥ मग अग्नि आंत पाठविला ।। अतीतवेष तेणें धरिला ।। तो तृतीय नेत्रीं शिवाच्या राहिला ।। देवीं पाठविला मित्र म्हणोनि ॥ १६८ ॥ हांक फोडोनि भिक्षा मागत ।। शिव पार्वतीस आज्ञापीत ।। माझें वीर्य धरूनि अद्भुत ॥ भिक्षा देई अतीतातें ॥१६९॥ मग अमोघ वीर्य धरून ।। अग्नीस देत अंबिका आणोन ।। सांडलें जेथें वीर्य जाण ।। रेतकूप झाला तो ।।१७०।। तोचि पारा परम चंचळ ।। न धरवे कोणा हातीं तेजाळ ॥ असो कृशानूनें वीर्य तत्काळ ॥ प्राशन केलें तेधवां ॥१७१।। अग्नि झाला गरोदर ।। परम लज्जित हिंडे कांतार ।। तों साही कृत्तिका परम सुंदर ।। ऋषिपत्या देखिल्या ॥१७२ ।। त्या गंगेत स्नान करूनि ।। तापत बैसल्या साहीजणी ।। तंव अग्नीनें गर्भ काढूनी ।। पोटांत घातला साहींच्या ॥ १७३ ॥ साहीजणी झाल्या गर्भिणी ॥ परम आश्चर्य करिती मनीं ।। मग लज्जेनें गर्भ काढुनी ।। साहीजणींनी त्यागिला ॥१७४ ।।
तोवर इकडे त्या तारकासुराने सर्वांना दे माय धरणी ठाय केले. त्याने स्वर्ग जाळून टाकला, देवस्त्रियांना बळेच आपल्या दासी बनविल्या. ।।१६६।। तेव्हा पुनश्च खास विनंती करण्यासाठी सर्व देवता, ऋषी, मुनी हे शिवाकडे गेले. पण त्यावेळी ते दोघे एकांतात असल्याने कोणासही आत प्रवेश मिळेना. ।।१६७।। तेव्हा सर्वांनी विचारविनिमय केला आणि अग्नीस शिवाकडे एक मित्रदूत म्हणून पाठविले. तेव्हा अग्नी एका अतिथीचे रूप घेऊन शिवाकडे गेला. ।।१६८।। अग्नीने दाराशी जाऊन भिक्षेची मागणी केली. तेव्हा शिव पार्वतीस म्हणाले, “माझे अद्भुत वीर्य घेऊन जा आणि ते त्या दारी आलेल्या अतिथीस दे. त्यास हीच वीर्यभिक्षा घाल.” ।।१६९।। त्यानुसार खरोखरच अंबिकेने ते शिववीर्य आपल्या ओंजळीत घेतले आणि त्याचीच दारी आलेल्या अतिथीला भिक्षा घातली. ते वीर्य जिथे सांडले तिथे वीर्याची विहीर तयार झाली.।।१७०।। खरंतर तो चंचल असा पारा कोणालाच हातात धरता येत नाही, पण अग्नीने ते शिववीर्य तत्काळ प्राशन केले. ।।१७१।। त्यामुळे घडले मात्र असे की, ते वीर्य अग्नीच्या उदरात वाढू लागले. त्यास त्याची लाज वाटू लागली. तो तोंड लपवीत रानावनात फिरू लागला. त्याच वेळी त्याने सहा ऋषिकन्यांना पाहिले. ।।१७२।। त्या साहीजणी नुकतेच गंगेचे स्नान करून ऊन खात बसल्या होत्या. तेव्हा अग्नीने आपल्या पोटातील गर्भ हा त्या साही कन्यांच्या पोटात घातला. ।।१७३।। त्यामुळे त्या गरोदर राहिल्या. या गोष्टीची त्यांना जाणीव होताच त्या अतिलज्जित झाल्या. त्यांनी आपापल्या पोटीचा गर्भ हा तिथेच टाकून दिला. ।।१७४।।
साहींचें रक्त एक झालें ।॥ दिव्य शरीर तत्काळ घडलें ।। सहा मुखें हस्त शोभले । द्वादश सरळ तेजस्वी ॥१७५ ।। कार्तिक मासीं कृत्तिकायोगीं ।। कुमार जन्मला महायोगी ।। मयूरवाहन भस्म अंगीं ।। उपासीत शिवातें ॥ १७६ ॥ शिवें निजपुत्र जाणोनी । नेवोनि लाविला अपर्णास्तनीं ।। सप्त वर्षे मृडानी ।। लालन पालन करी त्याचें ॥ १७७ ॥ देवांसी सांगे वैश्वानर ।। शिवासी झाला स्कंद पुत्र ।। ऐकतां देव समग्र ।। तारकावरी चालिले ॥ १७८ ॥ सेना जयाची बहात्तर अक्षौहिणी ।। त्याचें नगर वेढिती सुधापानी ।। पृतनेसहित तेचि क्षणीं ।। तारकासुर बाहेर निघे ॥ १७९ ॥ इंद्रे स्वामीकार्तिकापासीं जाऊन ।। सेनापतित्व दीधलें संपूर्ण ।। दिव्य रथीं बैसवून ॥ अभिषेकिला कुमार ॥१८०॥ इकडे तारकासुर सुधापानीं ।॥ युद्ध करिती झोटधरणीं ।॥ देव त्रासिले दैत्यांनीं ।॥ आले पळोनि कुमाराकडे ॥१८१॥ स्कंदापुढें कर जोडून ।। देव करिती अपार स्तवन ।। रक्षीं तारकासुरापासून ।। शिवनंदन तोषला ।।१८२ ।। देवांचा वृत्तांत जाणोनि सकळ ।। कुमारें धरिलें रूप विशाळ ।। तो तारकासुर धांविन्नला प्रबळ ।। शिवकुमार लक्षूनी ॥१८३॥
त्या साही कन्यांचे रक्त एक झाले, त्यामुळे त्या साही गर्भातून एक दिव्य अशी सहा मुखांची आणि बारा हातांची एक देहाकृती तयार झाली. ।।१७९।। तोच कात्तिक मासातील कृतिका नक्षत्रावरचा कार्तिकयाचा जन्म होय. त्याचे वाहन हे मोर, तो अंगास भस्म लावित असे, तो शिवाराधनाही करीत असे. ।।१७६।। तेव्हा शिवांनी आपल्या या पुत्रास ओळखले. त्यास कैलासावर आणविले आणि त्यांनी पार्वतीस त्या बालकास स्नपान देण्यास सांगितले. तिनेही या शिवपुत्रास मोठ्या मायेने सात वर्षांचा होईपर्यंत उत्तम प्रकारे सांभाळले. ।।१७७।। शिवास पुत्र झाला आहे ही वार्ता अग्नीने सर्वदेवतांना दिली. तेव्हा तो समाचार ऐकून देवांनी आनंदाच्या भरात तारकासुरावर चाल केली. ।।१७८।।. देवसेनेने तारकासुराच्या नगरास वेढा घातला. त्याच्याकडे बहात्तर अक्षौहिणी इतकी सेब्ना होती. त्यामुळे तो आपली प्रबक़्ळ सेना घेऊन देवसेनेच्या समाचारास नगराबाहेर आला ।।१७९।। तेव्हा देवेंद्राने कुमार कार्तिकेयास आपल्या सेनेचा अधिपती बनविला. त्यास दिव्य विमानात बसवून त्याच्यावर अभिषेक करविला. ।।१८०।। इकडे तारकासुराने देवांच्या सेनेवर प्रतिहल्ला चढविला, पण तारकासुराचे सामर्थ्य मोठे असल्याने देवसेना पळत कार्तिकेयाकडे आली. ।।१८१।। त्यांनी स्कंदाची स्तुती केली, त्याचे स्तवन केले आणि त्यास रक्षणाची विनवणी केली. ।।१८२।। कार्तिकेयाने देवांदूतांकडून रणांगणीचा सर्व समाचार जाणून घेतला. त्याबरोबर कार्तिकयाने स्वसामर्थ्याने विशाल असे रूप धारण केले आणि तो मोठ्या आवेशाने तारकासुरावर चाल करून गेला. ।।१८३।।
तेहतीस कोटी सुरवर ।। उभे स्वामीचें पाठीं भार ।। तारकाअंगीं बळ अपार ।। दशसहस्र कुंजरांचें ॥१८४॥ तारकासुर अनिवार ॥ वर्षे सायकांचे संभार ।। स्वामीचे पाठीसीं सुर ।। लपती सत्वर जाऊनी ॥१८५॥ लक्षूनियां पाकशासन ।। तारकें शक्ति दिधली सोडून ।। प्रळयचपळेस मागें टाकून ।। मनोवेगें चालिली ॥१८६॥ भयभीत शक्र होऊन ॥ करी हरिस्मरण कर जोडून ॥ म्हणे हे इंदिरामानसरंजन ।। निवारीं येवोन शक्ति हे ॥१८७ ॥ ब्रह्मानंदा विश्वव्यापका ।। दशावतार चरित्रचालका ।। मधुमुरनर-कांतका ।। निवारीं प्रळयशक्ति हे ॥ ८८ ॥ वैकुंठींहूनि योगमाया ।। हरीनें धाडिली लवलाह्या ।। तिणें तें शक्ति परतुनियां ।। एकीकडे पाडिली ॥१८९ ॥ यावरी तारकें बाणांचे पूर ।। स्वामीवरी सोडिले अपार ।। मुख पसरोनि शिवकुमार ।। तितुके गिळिता जाहला ।।१९० ॥ नाना शस्त्रे अस्त्रशक्ती ।। तारकें सोडिल्या अनिवारगती ।। तितुक्या गिळिल्या सहजस्थितीं ।। शास्त्रसंख्यावदनानें ।।१९१।। कल्पांतरुद्रासमान ।। भयानक दिसे मयूरवाहन ।। तारकें ब्रह्मास्त्र दिधलें सोडून । तेंही गिळी अवलीलें ॥१९२॥ जितुके शस्त्रमंत्र निर्वाण ।। तितुके प्रेरीतसे चहूंकडून ।। प्रळयकाळासम शिवनंदन ॥ गिळी क्षण न लागतां ॥१९३॥
तेहतीस कोटी देव हे कार्तिकेयाच्या बाजूने युद्धास उभे राहिले. तारकासुरही काही कमी नव्हता, त्याच्या अंगी दहा हजार हत्र्तीचे बळ होते. ।।१८४।। तारकासुराने देव सैन्यावर बाणांचा वर्षाव करतात. सारे देव हे कार्तिक स्वामींच्या मागे लपले. ।।१८५।। तारकासुराने एक प्रचंड मोठी शक्ती इंद्राच्या रोखाने सोडली. ती शक्ती प्रलयकाळीच्या विजेसारखी वेगाने इंद्राच्या दिशेने येऊ लागली. ।।१८६।। त्यावेळी इंद्र घाबरला. तो हात जोडून श्रीहरीचे ध्यान करू लागला, देवा नारायणा, या शक्तीस आवर घाल अशी प्रार्थना करू लागला ।। १८७।। तो म्हणू लागला हे ब्रह्मानंदा ! हे दशावतारी नारायणा, हे मधु मूर दैत्य संहारकर्त्या, अरे धाव घे माझे या शकीपासून रक्षण कर. ।।१८८।। तेव्हा विष्णूंनी इंद्राची ती आर्त विनवणी ऐकली आणि आपल्या योगमायेस तिथे पाठवून ती इंद्राच्या रोखाने येणारी अमोघ शक्ती दुसरीकडे नेऊन टाकली. ।।१८९।। इकडे तारकासुराने कुमार कार्तिकेयावर बानांचा वर्साव केला पण कुमाराने आपले विशाल मुख पसरून ते सर्व बाण गिळून टाकले. ।।१९०।। तारकासुराने अस्त्र आणि शक्तींचा कार्तिकयाच्या विरुद्ध वापर केला. त्या सर्व शक्ती आणि ती अस्त्रे कुमाराने गिळून टाकली. ।।१९१ ।। या रणभूमीवर कार्तिकेय एखाद्या कल्पांत रुद्राप्रमाणे दिसू लागला. तारकासुराने जेव्हा कुमारावर ब्रह्मास्त्राचा प्रयोग केला तेव्हा त्याने आपल्या अंगीच्या दिव्य शक्तीने ब्रह्मास्त्रही सहजपणे गिळले. ।।१९२।। त्याच्यावर चारी बाजूंनी जी जी अस्त्र-शस्त्रे येत होती त्यांचा तो कौशल्याने समाचार घेत होता. ती गिळंकृत करीत होता. ।।१९३।।
मग निःशस्त्र तारकासुर ।। स्यंदनाहूनि उतरला सत्त्वर ।। स्वामीवरी धांवे अनिवार ।। सौदामिनीसारिखा ।।१९४॥ ऐसें देखोनि षडानन ।। कृतांताऐसी हांक देऊन ।। रथाखालीं उतरून ।। मल्लयुद्ध आरंभिलें ।।१९५।। सप्तदिनपर्यंत ।। युद्ध झालें परम अद्भुत ।। तारकासुर अत्यंत ।। जर्जर केला आपटोनि ॥१९६॥ पायीं धरोनि अवलीला ॥ चक्राकार भोवंडिला ॥ मग धरणीवरी आपटिला ।। चूर्ण झाला मृद्घटवत ॥१९७॥ निघोनि गेला प्राण ।। दुंदुभी वाजवी शचीरमण ।। पुष्पें वर्षिती सुरगण ।। कर जोडोन स्तुति करिती ।।१९८।। मारिला जेव्हां तारकासुर ।। तेव्हां सात वर्षांचा शिवकुमार ।। मग सेनापतित्व समग्र ।। इंद्रे त्यासी दीधलें ॥१९९॥ तारकासुराचें नगर ।। इंद्रं लुटिलें समग्र ।। देवस्त्रिया सोडविल्या सत्वर ।। सर्व देव मुक्त झाले ॥ २०० ॥ लागला तेव्हा जयवाद्यांचा घोष ।। कुमार गेला वाराणसीस ।। नमूनि शिवमृडानींस ।। सुख अपार दीधलें ॥२०१॥ मग झालें मौंजीबंधन ।। सर्व तीर्थं करी षडानन ।। मग कपाटर्टी बैसला जाऊन ।। अनुष्ठान करी सुखें ॥२०२।।
मग निशस्त्र झालेला तारकासुर हा रथाखाली उतरला आणि तो आवेशाने कुमाराच्या दिशेने धावत येऊ लागला. ।।१९४।। तेव्हा कुमाराने प्रचंड मोठी आआरोळी ठोकीत रथाखाली उडी घेतली आणि तो मल्लयुद्धासाठी तारकासुराशी झुंजू लागला. ।।१९५।। हे त्या दोघांचे युद्ध सात दिवस चालले. त्या दरम्यान कार्तिकयाने तारकासुरास अनेकदा उचलून आपटले आणि जर्जर केले. ।।१९६।। एका बेसावधक्षणी कार्तिकयाने त्याचा पाय धरला. त्यआपल्ता भोवती गरागरा फिरविले आणि जोराने जमिनीवर आपटले, तेव्हा एखादे मातीचे मडकेव जसे फुटावे तसा त्याचा चक्काचूर झाला. ।।१९७।। धरणीवर निश्चेष्ट पडलेला तारकासुर हा मेला आहे ह्याची खात्री होताच इंद्र विजयाचा नगारा वाजवू लागला. देवता त्याच्यावर पुष्पवृष्टी करू लागल्या. सारेजण त्याची मुक्तकंठाने स्तुती करू लागले. ।।१९८ ।। तारकासुराचा वध करणारा तो पराक्रमी शिवपुत्र हा अवघा सात वर्षांचा होता. इंद्राने त्यास देवसेनेचे सेनापतित्व बहाल केले. ।।१९९।। इंद्राने लगेच तारकासुराच्या नगराचा ताबा घेतला. त्याच्या बंदीशाळेतील स्त्रिया देव ह्यांना मुक्त केले. ।।२००।। सर्वत्र कार्तिकयाच्या पराक्रमाच्या नौबती वाजू लागल्या. मग कुमार काशीनगरास गेला आणि त्याने आपल्या माता-पित्यांचे दर्शन घेतले. आपल्या पराक्रमी पुत्रास भेटून त्यांना मोठा आनंद झाला. ।।२०१।। त्यानंतर कुमाराची मुंज करण्यात आली. तो पुढे तीर्थाटनासही निघून गेला. त्या काळात त्याने एकांतात अनुष्ठान केले. त्यामुळे त्यास आणि त्याच्यामुळे इतरांना अमूप सुख लाभले.।।२०२।।
षडाननास भवानी म्हणत ।। ब्रह्मचर्य केलें आजपर्यंत ।। आतां स्त्री करूनि यथार्थ ।। गृहस्थाश्रम करीं कीं ॥२०३॥ षडानन म्हणे अंबेप्रती ॥ सांग स्त्रिया कैशा असती ।। म्यां देखिल्या नाहीं निश्चितीं ।। कैसी आकृति सांगे मज ॥२०४॥ अपर्णा म्हणे सुकुमारा ।। मजसारिख्या स्त्रिया सर्वत्रा ।। ऐकतां हांसें आलें कुमारा ।। काय उत्तरा बोलत ।।२०५।। तुजसारिख्या स्त्रिया जरी ।। तुजसमान मज निर्धारीं ।। तुझ्या वचनासी मातुश्री ।। अंतर पडों नेदीं मी ॥२०६॥ ऐसें कुमार बोलोन ।। महाकपाटांत जाय पळोन ।। मग ते जगन्माता आपण ।। धरूं धाविन्नली तयातें ।।२०७।। नाटोपे कुमार ते क्षणीं ।। अंबा दुःखें पडे धरणीं ।। जे त्रिभुवनपतीची राणी ॥ वेदपुराणीं वंद्य जे ॥२०८॥ अरे तूं कुमारा दावीं वदना ।। आला माझ्या स्तनासी पान्हा ।। कोणासीं पाजूं षडानना ।। निजवदन दाखवीं ॥२०९॥ घेईं तुझें दूधलोणी ।। म्हणोनि कुमार वमी ते क्षणीं ।। बोले तेव्हां शापवाणी ॥ क्रोधेंकरूनि कुमार तो ॥२१०।। माझें दर्शना जी स्त्री येईल ।। ती सप्तजन्म विधवा होईल ।। स्वामिदर्शना पुरुष येईल ।। कार्तिकमासीं कृत्तिकायोगीं ।॥२११॥
एके दिवशी पार्वती कुमार कार्तिकेयास म्हणाली बाळ, इतके दिवस तू ब्रह्मचारी राहिलास. आता माझी इच्छा आहे की, तू एखाद्या सुंदरशा स्त्रीबरोबर विवाह करावास आणि गृहस्थाश्रम स्वीकारावास. ।।२०३।। तेव्हा कुमाराने मातेकडे चौकशी केली की, “माते, स्त्री ही कशी असते? ती कशी दिसते?” ।।२०४।। त्यावर पुत्रास समजावीत माता भवानी म्हणाली, “अरे बाळा, स्त्री ना, ती माझ्यासारखीच असते. सर्व स्त्रिया सारख्याच असतात. ।।२०५।। त्यावर कुमार आपल्या मातेस म्हणाला, “माते, तू आत्ताच मला सांगितलेस ना की, सर्व स्त्रिया या तुझासारख्याच असतात म्हणून. मग आता मी सर्व स्त्रियांना तुझ्यासारखेच मानीन. तू बिलकूल चिंता करू नकोस. मी तुझ्या बोलण्यात जराही अंतर पडू देणार नाही.”।।२०६।। असे बोलून कुमार परत दूर एकांत स्थानी जाऊन बसला. तेव्हा भवानी पुन्हा त्याचा शोध घेऊ लागली. ।।२०७।। पण तो काही सापडेना. तेव्हा मातेस पुत्राचा वियोग असह्य झाला आणि ती वेद आणि पुराणांनाही प्रिय आणि वंदनीय असलेली भवानी दुःखावेगाने धरणीवर पडली. ।।२०८।। ती म्हणू लागली, “बाळ कुमारा, अरे तू कुठे आहेस? मला तुझे मुख दाखव. मला भेट. माझ्या जवळ ये. अरे माझ्या स्तनाचा हा अमृतपान्हा मी तुझ्याशिवाय अन्य कोणास पाजू? ये रे ये षडानना ! ये लवकर ये.”।।२०९।। तेव्हा कुमार म्हणाला, हे तुझे दूध, लोणी तू परत घे. असे म्हणून त्याने ओकारी केली. तो क्रोधावला आणि त्याने शापवाणी उच्चारली. ।।२१०।। जी स्त्री माझ्या दर्शनास पुढे येईल ती सप्तजन्म विधवा होईल. जो मनुष्य कार्तिक महिन्याच्या कृत्तिका योगावर माझे दर्शन घेईल तो भाग्यवान ठरेल. तो धनाचा लाभार्थी होईल. त्यास वेदशास्त्र पारंगता प्राप्त होईल. मग तो उपेक्षित असो वा मातंग. सर्वांना समसमानच लाभ घडेल, असे बोलून तो परत एकांती निघून गेला. ।।२११।।
तो सप्तजन्म सभाग्य ।। होईल धनाढ्य वेदपारंग ।। अनामिक हो अथवा मातंग ।। दर्शनें लाभसमानचि ।।२१२।। स्वामीस ऋषि विनविती समस्त ।। भवानी तुजलागीं तळमळत ।। भेटोनि येई त्वरित ।। वाराणसीस जाऊनी ॥२१३॥ मग स्वामी आनंदवना जाऊनी ।। आनंदविली शिवभवानी ।। उभयतांचें समाधान करूनी ।। मागुतीं गेला पूर्वस्थळा ॥२१४॥ स्कंदपुराणर्णी कथा सूत ।। शौनकादिकांप्रति सांगत ।। ऐकतां विघ्नें समस्त ।। क्षणमात्रे दग्ध होती ॥२१५॥ अपर्णाहृदयाब्जमिलिंदा ।। श्रीधरवरदा ब्रह्मानंदा ।। पूर्णब्रह्मा अनादिसिद्धा ।। आनंदकंदा जगद्गुरु ।।२१६।। शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड ।। स्कंदपुराण ब्रह्मोत्तरखंड ।। परिसोत सज्जन अखंड ।। त्रयोदशाध्याय गोड हा ।।२१७ ।। ।। इति त्रयोदशाध्यायः ॥१३॥ ।। श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु ।।
तेव्हा सर्व ऋषिजन हे कार्तिकेयाची विनवणी करू लागले. ते म्हणू लागले, कुमार, माता भवानी तुझ्या भेटीसाठी, दर्शनासाठी व्याकूळ झाली आहे, तू एकदा तरी वाराणसीस जा आणि तिला भेटून ये. ।।२१३।। तेव्हा त्यांच्या त्या विनंतीचा मान राखून कुमार आनंदवनास गेला. त्याने मातेची भेट घेतली आणि तिला सुखावले. नंतर तो परतून स्वस्थानी परत आला. ।।२१४।। श्रीधर कवी म्हणतात की, स्कंद पुराणातली ही जी कथा सूतांनी ऋषिजनांस सांगितली ती कथा जे भक्त भाविक श्रद्धेने श्रवण करतात, त्यांची सर्व पापे जळून भस्मसात होतात. ।। २१५।। ते शिवाची स्तुती करीत म्हणतात की, हे ब्रह्मानंद सागरा, तू माझ्यावर कृपा करणारा आहेस. तू स्वानंदाचा कंद आहेस. तुला माझे शतशः प्रणाम असोत. ।।२१६।। स्कंद पुराणातील ब्रह्मोत्तर खंडातल्या शिवलीलामृताचा हा तेरावा अध्याय भाविक भक्त अखंड श्रवण करोत. ।।२१७।। || श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु ।।
अधिक माहितीसाठी आमच्या सोशल मीडिया ला फॉलो करा.
मराठी रसिक या आमच्या इंस्टाग्राम अकाउंट ला लाईक करा सुब्स्क्राईब करा. येथे तुम्हाला Shree Shivleelamrut Adhyay Terava संपूर्ण माहिती मराठी मध्ये मिळते.





