Shree Shivleelamrut Adhyay Pachava (Sar) । श्री शिवलीलामृत अध्याय पाचवा(सार)
पुढे सुतानी प्रदोषव्रताची महती सांगण्यास सुरवात केली. ते म्हणाले पूर्व काळी विदर्भ देशात सत्यरथ राजा राज्य करीत असता एक वेळ शालवदेशाच्या राजाने त्यावर स्वारीकरून युद्धात त्याला ठार केले व सर्व राज्य घेतले. ही वार्ता त्याच्या गरोदर राणीला कळताच तीने अरण्यात पलायण केले. तिने त्या अरण्यात एका मुलाला जन्म दिला. तहाणेने व्याकूळ झाल्यामुळे मुलाला तेथेच ठेवून एका सरोवरापाशी पाणी पित असता एका मगरीने तीला ठार केले.
त्याच रस्त्याने उमा नामक विधवा ब्राह्मणीचे लक्ष त्या मुलाकडे गेले ते रडत असलेले पाहुन त्याला जवळ घेतले इकडे तिकडे पाहु लागली याचे आई, बाप कोणी दिसतात का ? पण कोणी दिसेना तेव्हढ्यात यतिवेशात भगवान शंकर येवून हा मुलगा राजपूत्र व क्षत्रीय असुन याचा तू सांभाळ केल्यास तुझा भाग्योदय होईल असे बोलून ते गुप्त झाले पुढे ती आपल्या पुत्रासह ह्या राजपुत्राला घेवून निघाली.
तिने आपल्या पुत्राचे नाव शुचिव्रत व राजपुत्राचे नाव धर्मगुप्त ठेवले. फिरता फिरता ती एक चक्र नगरी आली तेथे शिवालयामध्ये शांडिल्यऋषीच्या मार्गदर्शनाखाली यज्ञ चालू होता ही तेथे गेली. धर्मगुप्ताकडे पाहुन ऋषी म्हणाले हा राजपूत्र असून भिक्षा मागत आहे हे ऐकून तिने मुनीचे पाय धरले व त्याचे विषयी वृत्तांत विचारला ऋषी म्हणाले. हा विदर्भ देशीचा राजा सत्यरथ त्याचा पिता आहे. तो शिवपूजा टाकून युद्धास गेला परत पुजा न करता भोजन केले म्हणून अल्पायुषी झाला. याच्या आईने सवतीला मारले म्हणून मगरीने तीचा बदला घेवून ठार केले आणी धर्मगुप्ताने पूर्व जन्मी कोणतेच शिवव्रत केले नाही म्हणुन तो आई-वडीलांला जन्मताच पारखा झाला आपल्या पुत्राविषयी विचारले असता ते म्हणाले या शुचिव्रताने पूर्वी अन्यायाने धन संपत्ती मिळवीली म्हणून तो आता दरिद्री झाला.
हे ऐकून उमा आपल्या पुत्रासह ती शरण गेली ऋषींनी शिवमंत्राचा उपदेश देवून प्रदोष व्रत येथेच राहुन करा पुढे ते शिवउपासना व प्रदोष व्रत करू लागले एके दिवशी नदी काठी सुवर्ण मोहरांनी भरलेला घडा सापडला त्यांची वृद्धी झाली दोघे वनविहार करित असता आपल्या सख्यासह गंधर्व राजाची कन्या अंशुमती भेटली. धर्मगुप्ताचे सौंदर्य पाहुन अंशुमती भाळली व हाही तीचे स्वरूप पाहुन आकर्षित झाला. दोघांनी एकांत बोलणी केली पुढे अंशुमतीच्या पित्याने त्यांचे मोठ्या थाटामाटात लग्न करून धन, संपत्ती, सैन्य दिले. त्याच जोरावर शाळवराजाला मारून पित्याचे राज्य परत मिळविले. व पुष्कळ वर्षे राज्य करून सुरज नामक पुत्राला राज्यभार थोपून तो पत्नीसह कैलासाला गेला.
श्री शिवलीलामृत : अध्याय पाचवा
श्री गणेशाय नमः ।। सदाशिव अक्षरें चारी ।। सदा उच्चारी ज्याची वैखरी ।। जो नित्य शिवार्चन करी ।। तो उद्धरी बहुतां जीवां ॥१ ॥ बहुत प्रायश्चित्तांचे निर्धार ।। शास्त्रवक्ते करितीं विचार ।। परी जे शिवनामें शुद्ध साचार ।। कासया इतर साधनें त्यां ॥ २ ॥ नामाचा महिमा परमाद्भुत ।। त्यावरी प्रदोषव्रत आचरत ।। त्यांसी सर्वसिद्धि प्राप्त होत ।। सत्य सत्य त्रिवाचा ॥ ३ ॥ तुष्टि पुष्टि धृति आयुष्यवर्धन ।। संतति संपत्ति दिव्य ज्ञान ॥ पाहिजे तिंही प्रदोषव्रत पूर्ण ॥ यथासांग करावें ॥४॥ प्रदोषव्रत भावें आचरितां ।। या जन्मीं प्रचीत पहावी तत्त्वतां ॥ दारिद्र्य आणि महाव्यथा ।। निःशेष पळती षण्मासांत ॥५॥ एक संवत्सरें होय ज्ञान ।। द्वादशवर्षी महद्भाग्य पूर्ण ॥ हैं जो असत्य मानील व्यासवचन ।। त्यासीं बंधन कल्पांतवरी ।। ६ ।।। त्याचा गुरु लटिकाच जाण ।। त्याची दांभिक भक्ति लटिकेंच ज्ञान ।। उमावल्लभचरणीं ज्याचें मन ॥ त्याहूनि पावन कोणी नाहीं ॥७॥
श्री गणेशाला, श्री सरस्वतीला, श्री सद्गुरू नाथांना आणि भगवान श्री सांबसदाशिवास नमस्कार असो. जो सदाशिव या चार पुण्यकारक अशा अक्षरांचा उच्चार करतो, जो नित्य भगवान शिवाचे पूजन करतो, असा नित्य शिवोपासक हा स्वतःबरोबरच अनेकांचा उद्धार करतो. ।।१।। शास्त्रवक्ते हे पाप विमोचनासाठी नाना प्रकारच्या प्रायश्चित्तांचा विचार करतात. पण जे नित्य शिवनामाचा जप करतात, ते इतके पवित्र आणि शुद्ध असतात की, त्यांना इतर कोणत्या बाह्य साधनांची आवश्यकता नसते. ||२|| शिवनामाचा महिमा हा तर थोर आहेच; त्यातच शिव प्रदोष व्रताचे आचरण जर घडेल तर त्या भक्त उपासकास सर्व सिद्धी प्राप्त होतात, हे त्रिवार सत्य आहे. ।।३।।
अशा उपासकास तुष्टि पुष्टि, दीर्घायुष्य हे तर लाभतेच, तसेच त्यास संतती आणि संपत्ती व दिव्य अशा आत्मज्ञानाचीही प्राप्ती होते. ।।४।। शिव प्रदोष व्रत हे इतके प्रभावी आहे की, त्याचे आचरण केले असता याच जन्मात त्याचा प्रत्यय येतो. केवळ सहा महिन्यांच्या उपासनेने दुःख, दारिद्र्य आणि दुर्धर यातना दूर होतात ।।५।। हे व्रत एक वर्षभर केले असता ज्ञान प्राप्ती होते. बारा वर्षे म्हणजेच एक तप जर है प्रदोष व्रत केले तर महद्भाग्याचा लाभ होतो, हे महर्षी व्यासांचे वचन जो असत्य मानील तो जगाच्या अंतापर्यंत बंधनात राहील. ||६|| अशा व्यक्तीचा गुरू हा खोटा म्हणावा लागेल. त्यांची भक्ती ही दांभिक आणि देखाव्याची ठरेल, ज्याचे चित्त हे शिव भजनी रमले आहे, त्याच्याविणा अन्य कोणीही शुद्ध पवित्र मानू नये.।।७।।
मृत्यु गंडांतरें दारुण ।। प्रदोषव्रतें जाती निरसोन ।। येविषयीं इतिहास जाण ।। सूत सांगे शौनकादिकां ।।८।। विदर्भदेशींचा भूभुज ।। सत्यरथनामें तेजःपुंज ॥ सर्वधर्मरत पराक्रमी सहज ।। बंदीजन वर्णिती सदा ॥९ ।। बहु दिवस राज्य करीत ।। परी शिवभजनीं नाहीं रत ।। त्यावरी शाल्य देशींचा नृपनाथ ।। बळे आला चालूनियां ॥१०॥ आणिक त्याचे आप्त ।। क्षोणीपाळ साह्य झालें बहुत ।। सप्त दिवसपर्यंत ।। युद्ध अद्भुत जाहलें ।।११।। हा एकला ते बहुत ।। समरभूमीसी सत्यरथ ।। धारातीर्थी पावला मृत ।। शत्रू नगरांत प्रवेशले ।।१२।। राजपत्नी गरोदर राजस ।। पूर्ण झाले नवमास ।। एकलीच पायीं पळतां वनवास ।। थोर अनर्थ ओढवला ।।१३।। परम सुकुमार लावण्यहरिणी ।। कंटक-सरांटे रुतती चरणीं ।। मूच्र्छना येऊनि पडे धरणीं ।। उठोनि पाहे मार्गे पुढें ।॥१४॥ शत्रु धरितील अकस्मात ।। म्हणोनि पुढती उठोनि पळत ।। किंवा ते विद्युल्लता फिरत ।। अवनीवरी वाटतसे ॥१५॥ वस्त्रं-अलंकार-मंडित ।। हिऱ्यांऐसें दंत झळकत ।। जिचा मुखेंदु देखतां रतिकांत ।। तन्मय होवोनि नृत्य करी ॥१६॥
प्रदोष व्रताचे आचरण केले असता अपमृत्यू आणि गंडांतरे टळतात. यासंदर्भात सुतांनी शौनकादिकांना एक सुंदरशी कथा सांगितली. ती अशी- ।।८।। विदर्भ देशात सत्यरथ नावाचा एक धर्मपरायण, तेजःपुंज पराक्रमी असा राजा राज्य करीत होता, त्याचे प्रशंसक त्याचे नित्य गुणगान करीत. ।।९।। या राजाने अनेक वर्षे राज्य केले, नाना सुखोपभोग घेतले; पण त्याच्या मनात शिवभजनाची मात्र गोडी नव्हती, एकदा या संत्यरथ नावाच्या राजावर शाल्व वेशाचा दुसरा एक राजा चाल करून आला. ।।१०।। शाल्व देशाच्या राजास त्याच्या अन्य आप्त राजांनीही मदत केली. सत्यंरथ आणि त्याची ही प्रबळ शत्रूसेना ह्यांच्यात जवळजवळ सात दिवस तुंबळ युद्ध झाले. ।।११।। सत्यरथ हा एकटा पडल्याने त्याला या युद्धात वीरमरण आले. शत्रू सैन्याने सत्यरथाच्या नगरीचा ताबा घेतला. सेना नगरीत घुसली ।।१२।। तेव्हा राणी इंदुमती ही गरोदर होती. तिच्या पोटी राज्याचा वारस वाढत होता. तिचे नऊ मास अगदी पूर्ण होत आले होते. त्यामुळे जिवाच्या रक्षणासाठी त्या राणीने धावतपळत रानावनाची वाट धरली होती, त्यातच एक अनर्थ घडला. ।।१३।। त्या अत्यंत कोमल, नाजूक आणि त्या तशा अवघडलेल्या राणीस त्या वनाच्या वाटेत अनेक काटे रुतले, दगड टोचले, तिला वारंवार मूर्च्छा येऊ लागली आणि ती खाली पडू लागली. आपल्या मागेपुढे कोणी दिसतेय का म्हणून पाहू लागली. ।।१४।। आपण शत्रूच्या हाती लागू नये म्हणून ती पडत उठत आणि एखाद्या विजेसारखी इकडेतिकडे धावत होती. ||१५|| तिच्या अंगांवर सुंदर वस्त्रालंकार होते, तिच्या दंतपंक्ती हिऱ्यासारख्या चमकत होत्या, तिचा मुखचंद्रमा अत्यंत विलोभनीय होता. ।।१६।।
पहा कर्माची गती गहन ।। जिच्या अंगुष्ठीं न पडे सूर्यकिरण ।। ते गरोदर हिंडे विपिन ।। मृगनेत्री गजगामिनी ॥१७॥ वनीं हिंडें महासती ।। जेवीं नैषधरायाची दमयंती ।। कीं भिल्लीरूपें हैमवती ।। दुस्तरवनीं तैसी हिंडें ॥ १८ ॥ कर्मनदीच्या प्रवाहीं जाण ॥ पडली तीस काढील कोण ।। असो एका वृक्षाखालीं येऊन ।। परम व्याकुळ पडियेली ॥१९॥ शतांचीं शतें दासी ।। ओळंगती सदैव जियेपासीं ।। इंदुमती नाम जियेसी ।। भूमीवरी लोळत ॥ २० ॥ चहूंकडे पाहे दीनवदनी ।। जिव्हा मुख वाळलें न मिळे पाणी ।। तों प्रसूत झाली तेंचि क्षणीं ।। दिव्य पुत्र जन्मला ॥ २१ ॥ तृषेनें तळमळी अत्यंत ।। कोण उदक देईल तेथ ॥ बाळ टाकूनि उठत बैसत ॥ गेली एका सरोवरा ॥ २२ ॥ उदकांत प्रवेशली तेच क्षणीं ।॥ अंजुळी भरूनि घेतलें पाणी ।। तंव ग्राहें नेली ओढोनि ।। विदारूनि भक्षिली ॥२३॥ घोर कर्माचें विंदान ।। वनीं एकला रडे राजनंदन ।। तंव उमानामक विप्रपत्नी जाण ।। विगतधवा पातली ॥ २४ ॥ माता पिता बंधु पाहीं ।। तियेलागीं कोणी नाहीं ।। एक वर्षाचा पुत्र तीसही ।। कडिये घेवोनि आली तेथें ।॥ २५ ॥
पण कर्माची गती कशी विचित्र असते पाहा. एरवी सूर्यकिरणांनाही जिच्या अंगठ्याचे दर्शन घडणार नाही तीच राणी मृगनयना, तीच गजगामिनी आता मात्र त्या गरोदर असलेल्या अवस्थेत रानात हिंडत होती. ।।१७।। ज्याप्रमाणे नैषधराजाची दमयंती किंवा भिलिणीच्या रूपातील सती पार्वती ह्या रानावनात फिरल्या तशीच ही सत्यरथाची प्रियपत्नी आता रानात फिरत होती. ||१८|| अशी कर्मनदीच्या प्रवाहात पडलेल्या, दमलेल्या, श्रमलेल्या त्या अभागिनीला कोण आणि कशी बाहेर काढणार? ती त्या विकल अवस्थेत एका वृक्षाखाली येऊन पडली. ||१९|| ज्या इंदुमती राणीच्या मागे पुढे अनेक दासी झुलत असत, तीच राणी आता मात्र वनात अत्यंत दयनीय अवस्थेत एकटीच पडली होती. ।।२०।। या असह्य धावपळीने ती घामाघूम झाली होती, तिच्या घशाला कोरड पडली होती. ती दीनवाण्या नजरेने कोठे पाणी दिसते का म्हणून पाहात होती. त्यातच ती प्रसव पावली आणि तिने एका पुत्रास जन्म दिला. ।।२१।। त्या अवस्थेत तिला पाणी तरी कोण देणार, तसेच बाळास तिथे ठेवून ती पडत उठत जवळच्याच सरोवराच्या काठी गेली. ।।२२।। ती सरोवरात गेली, पाणी पिण्यासाठी तिने ओंजळ भरली आणि त्याचवेळी एका मगरीने तिचा पाय धरला, तिला खाली खेचली, तिला फाडून खाल्ले व आपली भूक भागविली. ॥२३॥ कर्मगती कशी असते पाहा, इकडे ते नवजात बालक मातेसाठी रडत होते. त्यावेळी अचानक एक उमा नावाची विधवा ब्राह्मण स्त्री तिथे आली. ||२४|| तिला मातापिता, आप्त, बंधू कोणीच नव्हते. होते ते एक वर्षांचे छोटे बालक. ते तिच्या कडेवर होते. ॥२५॥
तों नाहीं केलें नालच्छेदन ।। ऐसें बाळ उमा देखोन ।। म्हणे अहा रे ऐसें पुत्ररत्न ।। कोणी टाकिलें दुस्तर वनीं ॥ २६ ॥ म्हणे कोण जाती कोण वर्ण ॥ मी कैसें नेऊ उचलून ।। जावें जरी टाकून ।। वृक व्याघ्र भक्षितील कीं ।॥ २७ ॥ स्तनीं दाटूनि फुटला पान्हा ॥ नेत्रीं ढाळीत अश्रुजीवना ।। बाळ पुढें घेऊनि ते ललना ।। मुखकमळीं स्तन लावी ॥ २८ ॥ संशयसमुद्रीं पडली वेल्हाळ ।। म्हणे नेऊं कीं नको बाळ ॥ तंव तो कृपाळु पयः फेनधवल ।। यतिरूप धरूनि पातला ॥ २९ ॥ उमेलागीं म्हणे त्रिपुरारी ।। बाळ नेई संशय न धरीं ॥ महद्भाग्य तुझें सुंदरी ॥ क्षत्रिय राजपुत्र तुज सांपडला ॥३०॥ कोणासी न सांगें हे मात ।। समान पाळीं दोघे सुत ॥ भणंगासी परीस होय प्राप्त ॥ तैसें तुज जाहलें ॥३१॥ अकस्मात निधी जोडत ।। कीं चिंतामणि पुढें येऊनि पडत ।। कीं मृताच्या मुखांत ।। पडे अमृत पूर्वदत्तं ॥३२॥ ऐसें बोलोनि त्रिपुरारी ॥ गुप्त झाला ते अवसरीं ।॥ मग दोघे पुत्र घेवोनि ते नारी ।। देशग्रामांतरीं हिंडत ॥ ३३ ॥
उमेने ते नाळही न कापलेले, रडणारे बालक पाहिले आणि ती मनाशी विचार करू लागली, ‘अरेरे हे असे सुंदर पुत्ररत्न कोणी बरं असे वनात टाकून दिले असेल?’ ।।२६।। तसेच ती असाही विचार करू लागली की, या बाळाची जात काय? त्याचा वर्ण काय? मी या बाळास असे टाकून कशी जाऊ? ह्याला असे टाकले तर त्यास लांडगे, वाघ आपली शिकार बनवतील. ||२७|| हा असा विचार करीत असतानाच तिच्या स्तनात प्रेमपान्हा भरून आला. तिचे मातृहृदय त्या बाळाच्या केविलवाण्या रडण्याने कळवळले, तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. तिने चटकन पुढे होत त्या बालकास जवळ घेतले आणि त्यास स्तनास लावले. ।। २८ ।। काय करावे, ह्या बालकास आपल्या सोबत घेऊन जायचे, का असेच वनात टाकून जायचे, असा ती मनोमन विचार करीत असताना अचानक तिथे कृपाळू भगवान शंकर हे एका यतिवेषात प्रकट झाले. ||२९|| ते यतिरूप भगवान शंकर उमेस म्हणाले, “हे विप्रललने, तू हे बाळ निःसंकोचपणे तुझ्यासोबत घेऊन जा. तुझे भाग्य अत्यंत थोर आहे म्हणून तुला हे पुत्ररत्न लाभले आहे. ” ।।३०।। मात्र तू एक कर ह्या गोष्टीची कोठेही वाच्यता करू नकोस. तू या पुत्ररूपी परिसाचा स्वतःच्या मुलाप्रमाणेच सांभाळ कर. त्यातच तुझे आणि त्याचे कल्याण होईल.।।॥३१॥ अचानकपणे एखाद्यास धन सापडावे किंवा रत्न म्हणून प्रत्यक्ष चिंतामणीच हाती यावा; निजलेल्या भाग्यवंताच्या मुखात अमृताची धार पडावी तसेच हे तुझ्याबाबतीत झाले आहे असे समज ||३२|| असे बोलून ते यतिराज गुप्त झाले. त्यांच्या आज्ञेप्रमाणे उमेने त्या बालकास आपल्या कडेवर घेतले आणि ती आपल्या दोन्ही मुलांना घेऊन गावोगाव हिंडत राहिली. ।।३३।।
ब्रह्मपुत्राचें नाम शुचिव्रत ।। राजपुत्राचें नाम ठेविलें धर्मगुप्त ।। घरोघरीं भिक्षा मागत ।। कडिये खांदीं घेऊनियां ॥ ३४ ॥ लोक पुसतां उमा सांगत ।। माझे पोटीचें दोघे सुत ।। ऐसी हिंडता हिंडत ।। एकचक्रनगरा पातली ॥ ३५ ॥ घरोघरीं भिक्षा मागत ॥ शिवालय देखिलें अकस्मात ।। आंत द्विज दाटले बहुत ॥ शांडिल्य त्यांत मुख्य ऋषि ॥ ३६ ॥ तो शिवाराधना करिती विधियुक्त ॥ तों उमा आली शिवालयांत ।। क्षण एक पूजा विलोकीत ।। तों शांडिल्य ऋषी बोलिला ।॥३७॥ अहा कर्म कैसें गहन ।। हा राजपुत्र हिंडे दीन होऊन ।। कैसें विचित्र प्राक्तन ।। उमा वचन ऐकती झाली ।। ३८ ।। ऋषीचें चरण उमा धरीत ।। म्हणे याचा सांगा पूर्ववृत्तांत ।। त्रिकालज्ञानी महासमर्थ ॥ भूतभविष्यज्ञान तुम्हां ॥ ३९ ॥ याची माता पिता कोण ।। आहेत कीं पावलीं मरण ।। यावरी शांडिल्य सांगे वर्तमान ॥ याचा पिता जाण सत्यरथ ।।४० ।। तो पूर्वी होता नृप जाण ।। प्रदोषसमयीं करी शिवार्चन ।। तो शत्रु आले चहूंकडोन ।। नगर त्याचें वेढिलें ॥ ४१ ।।
उमेने आपल्या मुलाचे नाव शुचिव्रत, तर या नव्या बालकाचे नाव धर्मगुप्त असे ठेवले. दोन्ही मुलांना घेऊन ती गावोगाव हिंडत भिक्षा मागून उदरनिर्वाह करीत असे. ।।३४।। तिला कोणी विचारले असता हे दोन्ही माझेच पुत्र आहेत असे ती लोकांना सांगत असे. एकदा ती अशीच भटकत भटकत एकचक्र नावाच्या एका नगरीत आली. ।।३५।। त्या नगरीत भिक्षा मागत दारोदार फिरत असताना तिने एक शिवमंदिर पाहिले. त्या मंदिरात अनेक ब्राह्मण गोळा झाले होते. त्यातच शांडिल्य नावाचे एक महान ऋषिवरही होते. ||३६|| तिथे शिवाची विधिवत पूजाअर्चा चालू होती. नेमकी त्याच वेळी उमा ही आपल्या दोन्ही मुलांना सोबत घेऊन तिथे शिवदर्शनास आली. ||३७|| तेव्हा तिच्या सोबतच्या एका मुलाकडे रोखून पाहात शांडील्य ऋषी म्हणाले, “अरे काय हे प्राक्तन, एक राजपुत्र हा असा दारोदार भिक्षा मागत फिरावा”. त्यांचे ते बोलणे उमेने ऐकले. ||३८|| ते ऐकून ती चटकन पुढे झाली. ऋर्षीचे चरण वंदन करून ती म्हणाली, “ऋषिवर, आपण तर त्रिकालज्ञानी आहात, आपण मला ह्या मुलाची पूर्ण माहिती सांगा”. ।। ३९ ।। या मुलाचे नेमके आईवडील कोण? ते जिवंत आहेत का नाही? हे सांगा. तेव्हा शांडिल्य ऋषी म्हणाले, “हे विप्रस्त्रिये, या बालकाच्या पित्याचे नाव राजा सत्यरथ असे आहे.” ।।४०|| राजा सत्यरथ हा पूर्वजन्मीचा एक राजा. एकदा राजा शिव प्रदोष व्रताची पूजा करीत असताना अचानक त्याच्यावर शत्रूनी हल्ला केला. नगरास सैन्याचा वेढा पडला. ।।४१।।
शत्रूची गजबज ऐकून ।। उठिला तैसीच पूजा सांडोन ।। तंव प्रधान आला पुढें धांवोन ।। शत्रु धरोनि आणिले ॥४२॥ त्यांचा शिरच्छेद करून ॥ पूजा पूर्ण न करितां उन्मत्तपणें । तैसाच जाऊनि करी भोजन ।। नाहीं स्मरण विषयांधा ॥ ४३ ॥ त्याकरितां या जन्मीं जाण ।। सत्यरथ अल्पायुषी होऊन ।। अल्पवयांत गेला मरोन ।। म्हणोनि पूजन न सोडावें ।॥ ४४ ॥ याच्या मातेनें सवत मारिली ।। ती जळीं विवशी झाली ।। पूर्ववैरें वोढोनि नेली ।। क्रोधें भक्षिली विदारुनी ।।४५ ।। हा राजपुत्र धर्मगुप्त ।। याणें कांहींच केलें नाहीं शिवव्रत ॥ म्हणोनियां मातापितारहित ।। अरण्यांत पडियेला ।।४६ ।। याकरितां प्रदोषकाळीं ।॥ अव्यग्र पूजावा इंदुमौळी ॥ पूजन सांडूनि कदाकाळीं ।॥ सर्वथाही न उठावें ।॥४७॥ नवानीस बैसवूनि कैलासनाथ ॥ प्रदोषकाळीं पुढें नृत्य करीत ।। वाग्देवी वीणा वाजवीत ॥ वेप रुहूत वाजवीतसे ॥४८ ॥ अंबुजसंभव ताल सांवरी ॥ भार्गवी गातसे मधुरस्वरीं ॥ मृदंग वाज धुकैटभारी ॥ नृत्यगती पाहूनियां ॥४९॥
तेव्हा तो राजा ते शिवाचे प्रदोष पूजन तसेच अर्धे टाकून राज्य रक्षणासाठी उठला. त्याच्या मदतीस प्रधान धावून आला. प्रधानाने शत्रूस धरून आणले. ।।४२।। शत्रूस समोर पाहताच राजाचा क्रोध अनावर झाला. त्याने तिथेच शत्रूचा शिरच्छेद केला. ती पूजा तशीच टाकून उठलेल्या राजाने ती पूर्ण न करताच तो भोजनास गेला आणि पूजा करायची राहूनच गेली. ||४३|| त्या अपराधाची शिक्षा म्हणूनच की काय, पण या जन्मी सत्यरथ राजा हा अल्पायुषी ठरला. त्यास लवकरच वीरमरण आले. यासाठी कोणीही कोणत्याही कारणासाठी कधीही शिवपूजा ही अर्ध्यात सोडू नये. ।।४४||. तसेच त्या सत्यरथाची पत्नी राणी इंदुमती हिने म्हणजेच या मुलाच्या मातेने तिच्या एका सवतीस मारले होते. तीच तिची सवत ही त्या सरोवरातील मगर. तिने गतजन्मीचा सूड घेत राणीस पाण्यात ओढून घेतले आणि तिची शिकार केली. ।।४५|| या बालकाच्या हातून त्याच्या गतजन्मात कोणतीच शिवपूजा त्याचे हातून न घडल्यामुळेच त्यास असे जन्मतःच अनाथ होऊन रानावनात पडावे लागले. ।।४६|| यासाठीच प्रत्येकाने एक गोष्ट ध्यानी धरावी की, कधीही शिवप्रदोष पूजा ही अर्धी सोडू नये, अर्ध्यातून उठू नये. शिवाराधनेशिवाय राहू नये. ।।४७ || प्रदोष काळ हा फार महत्त्वाचा असतो. त्यावेळी भगवान शिव हे कैलासावर भवानीस सन्मुख बसवून तिच्यासमोर नृत्य करीत असतात. त्यावेळी सरस्वती वीणा वाजवीत असते, तर इंद्र बासरी वाजवीत असतो. ।।४८ ।। या शिवनर्तनाच्या वेळी ब्रह्मदेव हे वाद्यांचा ठेका धरतात. लक्ष्मी सुस्वर गायन करते, तर विष्णू हे त्या नृत्यास अनुसरून मृदंगाचे वादन करीत असतात. ।।४९।।
यक्षपति शिवप्राणमित्र ।। हस्त जोडोनि उभा समोर ।। यक्षगण गंधर्व किन्नर ।। सुरासुर उभे असती ॥५०॥ ऐसा प्रदोषकाळींचा महिमा ॥ अगोचर निगमागमां ।। मग काय बोले उमा ।। मम पुत्र दरिद्री कां झाला ।।५१ ।। तुझ्या पुत्रं प्रतिग्रह बहुत ।। पूर्वी घेतले दुष्ट अमित ।। दान केलें नाहीं किंचित ।। शिवार्चन न करी कदा ॥ ५२ ॥ परान्ने जिव्हा दग्ध यथार्थ ॥ दुष्ट प्रतिग्रहें दग्ध हस्त ।। स्त्रीअभिलार्षे नेत्र दग्ध होत ।। मंत्रासी सामर्थ्य मग कैंचें ॥ ५३ ॥ मग उमेनें पुत्र दोन्ही ।। घातले ऋषीचें चरणीं ।। तेणें पंचाक्षर मंत्र उपदेशुनी ।। प्रदोषव्रत उपदेशिलें ॥५४॥ पक्षप्रदोष शनि प्रदोष ।। महिमा वर्णिला अतिविशेष ।। निराहार असावें त्रयोदशीस ।। दिवसा सत्कर्म आचरावें ॥ ५५ ॥ तीन घटिका झालिया रजनी ।। प्रदोषपूजा आरंभावी प्रीतीकरूनी ।। गोमयें भूमी सारवूनी ।। दिव्य मंडप उभारिजे ॥ ५६ ॥ चित्रविचित्र वितान ।। कर्दळीस्तंभ इक्षुदंडेंकरून ।। मंडप कीजे शोभायमान ॥ रंगमाळा नानापरी ॥५७॥ शुभ्र वस्त्र नेसावें आपण ।। शुभ्र गंध सुवाससुमन ॥ मग शिवलिंग स्थापून ।। पूजा करावी विधियुक्त ॥ ५८ ॥
शिवाचा परममित्र कुबेर त्यावेळी हात जोडून समोर उभा असतो. तर त्याचवेळी यक्ष, किन्नर, देवदानव हे सर्वजण ते शिवनृत्य पाहात समोर उभे असतात. ।।५०।। हा प्रदोष काळ आणि त्यावेळचे शिवपूजन यांचा महिमा अत्यंत थोर असून, तो सगळ्यांनाच उकलतो असे नाही. तेव्हा ऋषींचे ते बोलणे ऐकून विनम्रपणे उमा त्यांना म्हणाली, “ऋषिवर, या बालकाचा तर पूर्व इतिहास समजला. माझा पुत्र तो मात्र दरिद्री का बरं झाला, ते सांगा. ।॥५१॥ तेव्हा शांडिल्य ऋषी म्हणाले, “हे विप्रस्त्रिये, तुझ्या पुत्राने त्याच्या गतजन्मात अनेक दानेही स्वीकारली, पण त्याने स्वतःस पुण्य लाभावे असे दान कधीच केले नाही. तसेच त्याच्या हातून कोणतीच शिवाराधनाही घडली नाही. ।।५२।। त्याचे काय आहे, परान्नाने जीभ पोळते, दुष्ट लोकांकडून दान स्वीकारले तर हात पोळतात, परस्त्रीची अभिलाषा धरली तर नेत्रातील दृष्टी पोळते, मग मंत्रामध्ये शक्ती म्हणून ती कशी राहणार?॥५३॥ तेव्हा शरणागत भावाने त्या उमेने आपल्या दोन्ही पुत्रांना ऋषींच्या चरणांवर घालून ह्याचे कल्याण करा, अशी त्यांना आर्त विनवणी केली. तेव्हा शांडिल्य ऋषींनी त्यांना शिवपंचाक्षरी मंत्राची दीक्षा दिली. त्यांना शिवाचे प्रदोष व्रत कसे करायचे, ह्याचा उपदेश केला. ।।५४।। त्याबरोबरच ऋषींनी उमेसह त्या मुलांना पक्षप्रदोष, शनिप्रदोष, सोमप्रदोष ह्यांची माहितीही दिली. तसेच त्यांना शिवप्रदोष पूजेचा सर्व विधी, आहाराचे नियम हा सर्व भाग नीट समजावून सांगितला. ।।५५।। ते म्हणाले, या शिवप्रदोष पूजेसाठी रात्री तीन घटिका झाल्यावर प्रारंभ करावा. जागा गोमयाने सारवून त्यावर मंडप उभारावा. ।।५६।। मंडपास रंगीबेरंगी दिवे लावावेत. कर्दळीचे खांब उभारावेत. मांडव पानाफुलांनी सुशोभित करावा. ।।५७।। शुभ्रवस्त्र धारण करावे. शिवपूजनास नाना प्रकारची सुगंधित फुले घ्यावीत, उचित स्थानी शिवलिंग स्थापना करून त्याची विधिवत पूजा करावी, ।।५८।।
प्राणायाम करून देखा ।। अंतर्बाह्य न्यास मातृका ।। दक्षिणभागीं पूजावें मुरांतका ।। सव्यभागीं अग्नि तो ॥५९॥ वीरभद्र गजानन ।। अष्ट महासिद्धि अष्ट भैरव पूर्ण ॥ अष्ट दिक्पालपूजन ।। सप्तावरणीं शिवपूजा ।। ६० ।। यथासांग शिवध्यान ।। मग करावें पूजन ।। राजोपचारें सर्व समर्पून ।। करावें स्तवन ॐ शिवाचें ॥ ६१ ॥ जय जय गौरीनाथ निर्मळ ।। जय कोटिचंद्रसुशीतळ ।। सच्चिदानंदघन अढळ ।। पूर्णब्रह्म सनातन ॥६२॥ ऐसें प्रदोषव्रत ऐकवून ।। बाळ उपदेशिले दोघेजण ।। मग ते एकमनेंकरून ।। राहते झाले एकचक्रीं ॥ ६३ ॥ चार महिनेपर्यंत ।। दोघेहीं आचरती प्रदोषव्रत ।। गुरुवचनें यथार्थ ।। शिवपूजन करिती पैं ।॥ ६४॥ शिवपूजा न द्यावीं सर्वथा ॥ न द्यावें प्रसादतीर्था । शतब्रह्महत्यांचें पाप माथां ।। होय सांगता शांडिल्य ॥ ६५ ॥ सर्व पापांहूनि पाप थोर ।। शिवपूजेचा अपहार ।। असो ते दोघे किशोर ।। सदा सादर शिवभजनीं ।॥ ६६ ॥ ब्रह्मपुत्र शुचिव्रत ॥ एकला नदीतीरीं क्रीडत । दरडी ढांसळतां अकस्मात ॥ द्रव्यघट सांपडला ॥६७॥ घरासी आला घेऊन ।। माता संतोषली देखोन ।॥ म्हणे प्रदोषव्रताचा महिमा जाण ॥ ऐश्वर्य चढत चालिलें ॥ ६८ ॥
प्रथम प्राणायाम करावा मंग अंतर्बाह्य न्यास करावा. मातृकाची स्थापना करावी. शिवलिंगाच्या उजवीकडे विष्णुची, तर डावीकडे अग्नीची स्थापना करावी. ॥५९॥ तसेच तिथे श्री गजानन, वीरभद्र, असत महासिद्धी, अष्टभैरव, अष्टदिग्पाल ह्यांचेसहित शिवाचे पूजन करावे. ।।६०।। प्रथम शिवध्यान,मग शिवपूजा, धूपदीप, पुष्प नैवेद्यादिक गोष्टी शिवास अर्पण कराव्यात. नंतर शिवस्तवन करावे. ।। ६१।। जय जय गौरीनाथ निर्मळ, जय कोटिचंद्र सुशीतळ, सच्चिदानंदधन अढळ, पूर्णब्रह्म सनातन शंभू हो! अशी शिवस्तुती गावी. ।।६२।। याप्रकारे शांडिल्य ऋषींनी त्या मातापुत्रांना त्या प्रदोष व्रताची सर्व माहिती दिली, त्या दोन्ही मुलांना शिवनामाचा उपदेश दिला, त्यांचे माथी वरदहस्त ठेवला. त्यानंतर ते तिघेही त्याच नगरीत राहू लागले. ।।६३।। ज्याप्रकारे गुरू शांडिल्य ऋषी ह्यांनी उपदेश केला त्यानुसार त्या त्या प्रदोष व्रताचे चार महिने आचरण केले. शिवशंकरांनी मनोभावे पूजाअर्चा केली. ।।६४।। आपली शिवपूजा अन्य कोणास देऊ नये. त्याचा तीर्थप्रसावही अभक्तास देऊ नये, नाहीतर शंभर ब्रह्महत्येचे पाप माथी लागते. ।।६५।। शिवपूजेच्या अपहाराचे पाप हे अन्य कोणत्याही पापापेक्षा अत्यंत थोर आहे. हे जाणून की, काय पण ते दोघेही बंधू आपल्या शिवपूजनाचा, आराधनेचा नित्यनेम चालवीत होते. ।। ६६।। एकदा असे घडले की, उमेचा पुत्र शुचिव्रत हा एकटाच नदीच्या किनारी खेळत असताना अचानक तेथील एक दरड कोसळली आणि त्या दरडीत त्यास एक भलामोठा धनाचा हंडा सापडला. ।। ६७।। तो सापडलेला धनाचा हंडा घेऊन शुचिव्रत घरी आला. ते पाहून त्याच्या मातेस मोठा आनंद झाला. ती भगवान शंकरामा, हात जोडीत म्हणाली, “देवा, हा तुझ्याच प्रदोष पूजेचा प्रसाद आहे. “।।६८।।
राजपुत्रास म्हणे ते समयीं ।। अर्ध द्रव्यविभाग घेई ।। येरू म्हणे सहसाही ।। विभाग न घेई अग्रजा ॥६९॥ या अवनींतील धन ॥ आमुचेंच आहे संपूर्ण ॥ असो ते दोघे शिवध्यान शिवस्मरण ।। न विसरती कदाही ॥७०॥ यावरी एकदां दोघेजण ॥ गेले वनविहारालागून ॥ तों गंधर्वकन्या येऊन ।। क्रीडतां दृष्टीं देखिल्या ॥ ७१ ॥ दोघे पाहती दुरूनी ।। परम सुंदर लावण्यखाणी ।। शुचिव्रत म्हणे राजपुत्रालागुनी ।। परदारा नयनीं न पाहाव्या ।।॥ ७२ ॥ दर्शनें हरती चित्त ।। स्पर्शनें बळवीर्य हरीत ।। कौटिल्यदंभसंयुक्त ।। महाअनर्थ-कारिणी ।।७३ ।। ब्रह्मसुतासी तेथें ठेवून ।। राजपुत्र चालिला सुलक्षण ॥ स्वरूप सुंदर मन्मथाहून । आकर्णनयन कोमलांग ॥७४॥ जवळी येवोनि पाहात ।। तंव मुख्य नायिका विराजित ।। अंशुमती नामें विख्यात ।। गंधर्वकन्या पद्मिनी ॥ ७५ ॥ कोद्रविण नामा गंधर्वपती ।। त्याची कन्या अंशुमती ॥ पिता पुसे महेशाप्रती ॥ हे कन्या अर्पू कोणातें ॥७६॥ मग बोले हिमनगजामात ।। धर्मगुप्त सत्यरथाचा सुत ।। तो माझा परम भक्त ।। त्यासी देई अंशुमती ॥७७॥
तेव्हा शुचिव्रत धर्मगुप्तास म्हणाला, “तू यातला अर्धा वाटा घे”. त्यावर धर्मगुप्त म्हणाला, “नको थोरल्या भावाचा असा धनाचा वाटा मोठ्या भावाने घेऊ नये”।।६९।। त्यानंतर तो धर्मगुप्त अथात राजपुत्र म्हणाला की, या भूमीतर सर्व धन हे तर माझेच आहे. ती तशी धनप्राप्ती झाली तरीही त्यांची व्रताचरणाची शिवसेवा आणि स्मरणपूजा ही नित्य चालूच होती. ।। ७० ।। पुढे एकदा असे घडले की, ते दोघे भाऊ वनविहारासाठी गेले असता त्यांनी त्या वनात एका गंधर्वकन्येस तिच्या दासींसोबत क्रीडा करीत असताना पाहिले. ।।७१|| तेव्हा चटकन आपली नजर दुसरीकडे फिरवीत शुचिव्रत म्हणाला, “असे सुंदर स्त्रियांकडे पाहू नये.”।।७२ ।। त्यांच्याकडे पाहिले तरी मन आकर्षित होते. त्यांचा स्पर्श झाला तर शक्ती आणि वीर्य हरण होते. स्त्रिया या अत्यंत लबाड आणि ढोंगी, नाटकी असतात. स्त्रीमुळेच मोठे अनर्थ घडतात. ।। ७३ ।। तेव्हा “ठीक आहे. तसे आहे तर तू इथेच थांब,” असे म्हणून राजपुत्र धर्मगुप्त हा त्या कन्यांच्या दिशेने निघाला. तो देखणा, मदनासारखा सुंदर आणि सुकुमार होता.।।७४।। त्याने जवळ जाऊन पाहिले तर त्या गंधर्वकन्यांची मुख्य नायिका अंशुमती नावाची प्रसिद्ध अशी पद्मिनी होती. ।।७५|| अंशुमती ही कोद्रविण नावाच्या गंधर्व राजाची कन्या. तिच्या पित्याने आपल्या उपास्य देवतेस म्हणजेच भगवान शंकरांना विचारले होते की, प्रभू, मी माझी उपवर कन्या ही कोणास द्यावी? ।।७६।। तेव्हा देवांनी त्यास सांगितले होते की, सत्यरथ राजाचा पुत्र धर्मगुप्त हा माझा भक्त आहे. तू त्यास तुझी कन्या दे.।।७७।।
हें पूर्वीचें शिववचन ॥ असो यावरी अंशुमती पाहे दुरोन ॥ न्याहाळीत राजनंदन ॥ वाटे पंचबाण दूसरा ।। ७८ ।। क्षीरसिंधूत रोहिणीरमण ।। काय आला कलंक धुवोन ।। तैसें राजपुत्राचें वदन ।। अंशुमती न्याहाळी ॥७९॥ बत्तीसलक्षणसंयुक्त ॥ अजानुबाहू चापशरमंडित ।। विशाळ वक्षःस्थळ चालत ।। करिनायक ज्यापरी ॥८०॥ ऐसा तो गुणाढ्य देखूनि त्वरित ।। अंशुमती सखयांप्रति सांगत ।। तुम्ही दुज्या वनाप्रति जाऊनि समस्त ॥ सुमनें आणावीं सुवासें ॥ ८१ ॥ अवश्य म्हणोनि त्या ललना ।। जात्या झाल्या आणिका वना ॥ अंशुमती एकली जाणा ।। राजपुत्रा खुणावीत ।।८२ ।। भूरुहपल्लव पसरून ॥ एकांतीं घातलें आसन ॥ वरी वृक्षडाहाळिया भेदून ॥ भूमीवरी पसरिल्या ॥८३॥ असो तेथें बैसला येऊन ।। राजपुत्र सुहास्यवदन । विशाळ भाळ आकर्णनयन ॥ आरक्त ओष्ठ सुकुमार ॥८४॥ मंजुळभाषिणी नेत्रकटाक्षबाणीं ॥ विंधिली ते लावण्यहरिणी ।। मनोजमूर्छना सांवरूनी ।। वर्तमान से तयातें ॥ ८५ ॥ श्रृंगारसरोवरा तुजपासीं ।। मी वास करीन राजहंसी ।। देखतां तव वदन दिव्यशशी ॥म मानसचकोर नृत्य करी ।।८६ ।।
हे असे पूर्वीचे शिववचन होते. इकडे अंशुमतीने त्या मदनासम सुंदर राजपुत्रास पाहताच तिला तो जणू दुसरा मदनच भासला. ।। ७८ ।। जणूकाही क्षीरसागरात चंद्राने डुबकी मारून स्वतःचा कलंक दूर करून यावे, अशा त्या सर्वांगसुंदर अशा राजपुत्राकडे अंशुमती देहभान विसरून पाहतच राहिली. ।।७९।। तो बत्तीस गुणांनी परिपूर्ण, आजानुबाहू, धनुष्यधारी, रुंद छातीचा धीट तेजस्वी कुमार तिला मनोमन भावला. ||८०|| अशा त्या राजकुमारास पाहून अंशुमती आपल्या सख्यांना म्हणाली, तुम्ही सर्व जी दुसऱ्या ठिकाणी जागी आणि सुवासिक फुले वेचून घेऊन या. ।।८१ ।। अवश्य असे म्हणून तिच्या अन्य सख्या तिच्यापासून दूर गेल्या. आता एकटीच असलेल्या अंशुमतीने धर्मगुप्तास खूण करून आपल्या जवळ बोलाविले, ।॥८२॥ तिने झाडांची पाने अंथरून एक आसन तयार केले आणि तिने वृक्षांच्या झावळ्या तोडून त्या जमिनीवर पसरल्या. ||८३|| तिच्या संकेताप्रमाणे राजपुत्र तिथे आला. उभतांची नजरानजर झाली. भव्य कपाळ, रुंद छाती, मोहक अंगकांती असलेला तो राजकुमार तिच्याजवळ येऊन बसला. ||८४।। त्याच्या मंजुळ आवाजांने आणि नेत्रकटाक्षांनी ती पुरतीच घायाळ झाली. ती मधुर स्वरात त्याची विचारपूस करू लागली. ।। ८५ || ती त्यास म्हणाली, “हे शृंगारसरोवरा, मी तुझ्याच जवळ राहू इच्छिते. तुला पाहताच माझा मनमयूर हा आनंदाने नर्तन करायला आगला आहे. ।।८६।।
तव मुखाब्ज देखतां आनंद ।। झेंपावती मम नेत्रमिलिंद ।। कीं तव वचन गर्जतां अंबुद ।। मम चित्तशिखी नृत्य करी ॥८७ ।। कवि-गुरूंहूनि तेज विशाळ ॥ आत्मकंठींचीं काढिली मुक्ताफळमाळ ।। कंठीं सूदली तत्काळ ।। चरणीं भाळ ठेवीत ॥ ८८ ॥ म्हणे मी कायावाचामनेंकरून ।। तुझी ललना झालें पूर्ण ।। यावरी धर्मगुप्त वचन ।। काय बोलता जाहला ॥८९॥ मी जनकजननीविरहित ।। राज्यभ्रष्ट दरिद्री अत्यंत ।। तव पित्यासी कळतां मात ।। घडे कैसें वरानने ॥९० ॥ यावरी म्हणे अंशुमती ।। तीन दिवसां येईन या स्थळाप्रती ।। तुम्हीं यावें शीघ्रगती ।। लग्नसिद्धी साधावया ॥ ९१ ॥ ऐसें बोलूनि ते चातुर्यराशी ॥ वेगें आली पितयापासीं ।॥ झालें वर्तमान सांगे त्यासी ।। तो परम मानसीं संतोषला ।।९२ ॥ राजपुत्र गेला परतोन ।। बंधूप्रती सांगे सर्व वर्तमान ।। शांडिल्यगुरूचें वचन स्मरून । म्हणती प्रसाद पूर्ण त्याचा हा ॥९३॥ गुरुचरणीं ज्याचें मन ।। त्यासी ऐश्वर्यासी काय न्यून।। काळमृत्युभयापासून ।। सर्वदा रक्षी देशिक तो ॥९४॥ यावरी ते दोघे बंधु येऊन ।। मातेसी सांगती वर्तमान ।। येरी म्हणे धन्य धन्य शिवभजन ।। फळ देत चालिलें ॥९५ ॥
तुझ्या सुंदरशा मुखकमळाभोवती माझे मन भुंग्यासारखे पिंगा घालते आहे. तुझे मेघासारखे धीरगंभीर आवाजाचे बोलणे माझ्या मनमयूरास सुखावते आहे. ।॥८७॥ असे बोलत असताना तिने आपल्या गळ्यातील एक मौलिक मोत्यांची माळ काढून ती त्याच्या गळ्यात घातली आणि त्याच्या पायावर तिने प्रेमभराने मस्तक ठेवले. ।।८८।। आणि ती त्यास म्हणाली. “हे राजपुत्रा, मी काया वाचा मने माझे सर्वस्व तुला अर्पण केले आहे. आता शास्त्रानुसार जे काही उचित असेल ते तू कर.”। ।।८९ ।। त्यावर शांत, धीरगंभीर वाणीने तो तिला म्हणाला, “हे कमलनयने, मला आईवडील नाहीत, मी राज्यभ्रष्ट आहे, मी अत्यंत गरीब आहे हे जर तुझ्या पित्यास कळले तर काय होईल?”।।९०।। त्यावर काहीसा विचार करीत ती म्हणाली, “हे राजपुत्रा, मी तीन दिवसांनी पुन्हा याच जागी येईन. त्यावेळी तूसुद्धा विवाहाच्या सर्व तयारीनिशी इथे ये.” ।।९१|| असे बोलून ती गंधर्वकन्या आपल्या पित्याकडे निघून गेली. तिने जेव्हा पित्यास हा सकल वृत्तांत सांगितला तेव्हा त्यास पूर्वीच्या शिववचनाची आठवण होऊन अत्यंत समाधान वाटले.।।९२।। इकडे धर्मगुप्तही परत गेला. त्याने आपल्या भावास ती वार्ता दिली. तेव्हा दोघांनाही शांडिल्य गुरूंच्या शब्दाची आठवण झाली. ।॥९३।। म्हणतात ना, जो गुरूचरणी लीन आहे त्यास ऐश्वर्याची कसली कमतरता? गुरू तर त्याचे प्रत्यक्ष काळापासूनही रक्षण करतो. ।।९४।। त्या मुलांनी घरी जाऊन जेव्हा आपल्या मातेस हा वृत्तांत दिला तेव्हा ती म्हणाली, “बाळांनो, हा सारा त्या शिवभजनाचा आणि पूजनाचा प्रताप बरं!”।।९५।।
यावरी तिसरे दिवशीं ।॥ दोघेही गेले त्या वनासी ।। गंधर्वराज सहपरिवारॅसी ।। सर्व सामुग्री घेऊनि आला ।।९६ ।। दृष्टीं देखतां जामात ।। गंधर्व आनंदसमुद्रीं पोहत ।। छत्र सेना सुखासन त्वरित ।। धाडूनि उमा आणविली ॥ ९७ ॥ यावरी यथासांग लग्न ।। चारी दिवस झालें पूर्ण ॥ कांहीं एक पदार्थ न्यून ।। पडिला नाहीं तेधवां ।॥९८॥ स्वर्गीच्या दिव्य वस्तु अमोलिक सतेज ।। विहिणीस देत गंधर्वराज ।। लक्ष रथ दहा सहस्र गज ॥ तेजःपुंज एक लक्ष वाजी ॥९९॥ एक लक्ष दासदासी ।। अक्षय कोश रत्नराशी ।। अक्षय भाते देत शक्तीसी ।। दिव्य चाप बहुसाल ॥१००॥ अपार सेना संगें देत । एक सेनापति गंधर्व बळिवंत ॥ उमा दोघां पुत्रांसमवेत ।। मान देवोन बोळविली ।।१०१।। सुखासनारूढ अंशुमती ।। पतीसवें चालली शीघ्रगती ।। कनकवेत्रपाणी पुढें धांवती ।। वाहनासवें जियेच्या ॥१०२॥ चतुर्विध वाद्यांचे गजर ।। चतुरंग चालिला दळभार ।। येऊनि वेढिलें विदर्भनगर ।। सत्यरथ पितयाचें ॥१०३॥ नगरदुर्गावरूनि अपार ।। उल्हाटयंत्रांचा होत भडिमार ॥ परी गंधर्वांचें बळ फार ॥ घेतलें नगर क्षणार्थे ।।१०४।।
त्यानंतर त्या गंधर्व कन्नेच्या बोलवण्याप्रमाणे ते दोघे बंधुही तिसऱ्या दिवशी त्याच स्थानी गेले. कन्येच्या विवाहाची सर्व तयारी करून ठेवली होती. ।।९६।। जसे का त्या गंधर्वराजाने धर्मगुप्तास पाहिले; तसा त्याच्या मनातील आनंदसागर उचंबळून आला. त्याने त्वरित छत्र, मेणा पाठवून वरमाईस, म्हणजेच उमेस मोठ्या सन्मानाने तिथे आणले. ।।९७|| त्यानंतर तिथे चार दिवसांचा मोठा लग्नसोहळा पार पडला. त्या कार्यात कशाचीच व कोणतीच कमतरता पडली नाही. ।।९८|| कोद्रविण गंधर्वराजाने वरमाईस अनेक अमौलिक वस्त्रालंकार दिले. त्याने आपल्या जावयास एक लक्ष रथ, दहा हजार हत्ती आणि एक अत्यंत तेजस्वी असा घोडा दिला. ।।९९|| तसेच अनेक दासदासी, धनसंपती याबरोबरच गंधर्वराजाने धर्मगुप्तास उपयुक्त ठरेल असे अस्त्रशस्त्रांचे साठे, युद्धसामग्रीही दिली.।।१००।। त्याने प्रचंड मोठ्या सैन्यासह एक बलशाली सेनापतीही जामातास दिला. त्याने जामात, त्याचा धाकटा भाऊ आणि माता ह्यांचा उचित सन्मान करून त्यांची मोठ्या प्रेमाने पाठवणी केली. ।। १०१ ।। भाग्यवती गंधर्वकन्या अंशुमती ही एका भव्य रथात पतिसवे बसून तिच्या सासरी निघाली, तेव्हा सेवकवर्ग तिच्या रथामागून धावू लागला. ||१०२|| विवाहानंतर धर्मगुप्ताने प्रथम आपल्या विराट गंधर्व सैन्यासह आपल्या विदर्भानगरीस वेढा घातला. ।।१०३॥ नगरीच्या रक्षणार्थ जरी किल्ल्यावरून तोफांचा मारा करण्यात आला तरी धर्मगुप्ताच्या प्रचंड सैन्यापुढे शत्रूचा टिकाव लागला नाही. त्यांनी शत्रूस निकामी करून आपल्या नगरीचा ताबा घेतला. ।।१०४।।
जेणें पूर्वी पिता मारिला जाण । त्याचें नाम दुर्मर्षण ।। तो जिताचि धरूनि जाण ।। आपला करून सोडिला ॥१०५॥ देशोदेशींचें प्रजाजन ।। धांवती करभार घेऊन ।। उत्तम मुहूर्त पाहून ।। सिंहासनारूढ जाहला ॥ १०६ ॥ माता उमा बंधु शुचिव्रत ।। त्यांसमवेत राज्य करीत ।। दहा सहस्र वर्षेपर्यंत ।। यशवंत राज्य केलें ।।१०७।। शांडिल्य गुरु आणून ।। शतपद्म अर्पिलें धन ।। रत्नाभिषेक करून ।। अलंकार वस्त्रे दीधलीं ।।१०८ ।। दुर्भिक्ष जळशोष अवर्षण ।। आधिव्याधि वैधव्य मरण ।। दुःख शोक कलह विघ्न ।। राज्यांतूनि पळालीं ॥१०९॥ प्रजा भूदेव दायाद ॥ देती रायासी आशीर्वाद ।। कोणासही नाहीं खेद ।। सदा आनंद घरोघरीं ।॥ ११०॥ ऐसा अंशुमतीसमवेत ।। धर्मगुप्त राज्य करीत ।। यौवराज्य शुचिव्रतातें देत ॥ पारिपत्य सर्व करी ॥१११॥ ऐसें दहा सहस्र वर्षे राज्य करून ॥ सुदत्तपुत्रासी राज्य देऊन ॥ चिंतितां मनीं उमाधवचरण ॥ दिव्य विमान धाडिलें ॥११२॥ दिव्य देह पावोनि नृपती ॥ माता- बंधूंसमवेत अंशुमती ।। शिवविमानीं बैसती ।। करीत स्तुति शिवाची ॥११३॥ कैलासपदासी जाऊन ।।
ज्या दुर्मर्षण राजाने आपल्या पित्यास ठार मारले, त्यास धर्मगुप्ताने बंदी बनविले. पण त्याचा वध न करता त्यास समज देऊन सोडून देण्याचे औदार्य धर्मगुप्ताने दाखविले. ॥१०५।। सत्यरथ राजाचा पुत्र हा विदर्भ नगरीत परत आला आहे ही वार्ता सर्वत्र पसरताच अनेक राजे आपणहून करभार देण्यासाठी तिथे आले, पुढे एका शुभमुहूर्तावर धर्मगुप्त हा राज्यासनावर बसला. ।।१०६|| धर्मगुप्ताने आपली माता उमादेवी, बंधु शुचिव्रत ह्यांच्यासह पुढे वहा हजार वर्षे सुखाने यशवंत होत राज्यकारभार चालविला. ||१०७|| राजाने आपले गुरू शांडिल्य ह्यांना सन्मानाने राजवाड्यात बोलावून घेतले. त्यांना शतपद्म धन अर्पण केले. वस्त्रालंकार दिले. त्यांना रत्नाभिषेक केला. ।।१०८।। गुरू शांडिल्य यांच्या कृपाप्रसादाने दुष्काळ, पाणीटंचाई, अवर्षण, आधी व्याधी, वैधव्य, मृत्यू, दुःख, दोष, क्लेश, नाना प्रकारची विघ्ने ही सर्व त्या राज्यातून हद्दपार झाली. ||१०९|| नगरातील विप्र, ऋषी, मुनी आप्तेष्ट ह्यांनी धर्मगुप्तास अनेक शुभाशीर्वाद दिले. कोणाला कशाचीच उणीव राहिली नाही. विदर्भ नगरीची सारी प्रजा आणि राजा हे भगवान शिवाच्या कृपेने सुखी समाधानी झाले. ।।११०|| अशाप्रकारे आता धर्मगुप्त राजा हा राणी अंशुमतीसह आनंदाने राज्य करू लागला. त्याने शुचिव्रतास युवराजपद दिले. तोही नगरीच्या प्रजाजनांची मोठी काळजी घेऊ लागला. ।।१११।। श्रीधर कवी सांगतात की, याप्रकारे धर्मगुप्ताने पुढे वहा हजार वर्षे राज्य केले. मग आपला पुत्र सुदत्त ह्यास राज्यकारभार सोपवून तो वनात उमा-महेश्वराच्या तपसाधनेसाठी गेला. त्याच्या तपाने प्रसन्न झालेल्या शिवांनी त्याच्यासाठी दिव्य असे विमान धाडले. ।।११२।। राजा धर्मगुप्त हा दिव्य देह धारण करून पत्नी, माता आणि आपला बंधू ह्यांच्यासह त्या विमानात बसला. ।।११३।।
जगदात्मा शिव विलोकून ॥ जयजयकार करून ।। लोटांगणें घालिती ॥११४॥ दीनबंधु जगन्नाथ ।। पतितपावन कृपावंत ।। हृदयीं धरूनि समस्त ।। अक्षयपदीं स्थापिलीं ।। ११५ ।। हें धर्मगुप्ताचें आख्यान ।। करिती जे श्रवण पठण ।। लेखन रक्षण अनुमोदन ।॥ तरी पंचवदन रक्षी तयां ।। ११६ ।। सकळ पापां होय क्षय ।। जेथें जाय तेथें विजय ।। धनधान्यवृद्धि होय ।। ऋण जाय निरसूनी ॥ ११७ ॥ प्रदोषमहिमा अद्भुत ।। जे आचरती ऐकूनि ग्रंथ ।। तेथें कैंचें दारिद्र्य मृत्य ।। सत्यसत्य त्रिवाचा ।।११८ ॥ ज्याच्या घरीं शिवलीलामृत ग्रंथ ।। त्याची शिव पाठी राखीत ।। सदा हिंडे उमाकांत ।। अंतीं शिवपद प्राप्त तया ॥११९॥ हा ग्रंथ आम्रवृक्ष सुरस ।। पद्यरचनाफळें आलीं पाडास ।। कुतर्कवादी जे वायस ।। मुखरोग त्यांस नावडे ।।१२० ॥ जय जय ब्रह्मानंदा विरुपाक्षा ।। श्रीधरवरदा सर्वसाक्षा ।। दुष्टकर्ममोचका कर्माध्यक्षा ।। न येसी लक्षा निगमागमां ॥ १२१ ॥ शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड ॥ स्कंद पुराण ब्रह्मोत्तरखंड ॥ परिसोन सज्जन अखंड ।। पंचमाध्याय गोड हा ॥ १२२ ॥ ॥ श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु ।।
ते दिव्य विमान त्या सर्वांना कैलास पर्वतावर घेऊन गेले. तिथे त्यांनी भगवान शिवशंकरांचे दिव्य दर्शन घेत त्यांना दंडवत घातले. ।। ११४|| तेव्हा त्या दीनदयाधन कृपावंत कैलासनाथांनी त्या सर्वांना मोठ्या प्रेमाने आपल्याजवळ घेतले. त्यांना आपल्यापाशी अक्षयपदावर स्थापिले. ।।११५।। या धर्मगुप्ताच्या आख्यानाचे जे पठण करतील, त्यांचे रक्षण आणि त्यास अनुमोदन देतील त्या सर्वांवर भगवान शिव हे कृपा करतील, त्यांचे सर्वतोपरीने रक्षण करतील. ।।११६।। त्यांच्या सर्व पापांचा क्षय होऊन, त्यांचे घरात धनधान्य यांची वृद्धी होईल. असे भाग्यवंत कर्जमुक्त होतील. त्यांना सर्व कार्यात यश लाभेल. ।।११७।। या ग्रंथात वर्णन केलेला शिवप्रदोष पूजेचा महिमा वाचून, ऐकून जे भक्त त्यानुसार ते व्रताचरण करतील त्यांना दारिद्र्य व अपमृत्यू येणार नाही, हे त्रिवार सत्य आहे. ||११८।। ज्या घरात हा शिवलीलामृत ग्रंथ आहे, जिथे त्याचे वाचन व पठण चालते त्यांच्या पाठीशी शिव सदैव उभा असतो. त्यांना अंती शिवपदाची प्राप्ती होते. ।। ११९।। हा ग्रंथ म्हणजे एक रसाळ असा आम्रवृक्ष आहे. त्यास पद्यरचनारूप अनेक फळे आलेली आहेत. जे निंदक कुतर्कवादी आहेत, त्यांना मुखरोग झालेला असल्याने त्यांना ही रसाळ फळे गोड कशी लागणार? ।।१२०|| शेवटी रचनाकार म्हणतात, हे ब्रह्मानंदरुपी विरूपाक्षा, तू मला वरदान दिलेस. तू सर्वसाक्षी आहेस. तू वाईट कर्मापासून दूर करविणारा आहेस. तू अगमानिगमाच्या आटोक्यात येणारा नाहीस. ।।१२१|| स्कंद पुराणातील ब्रह्मोत्तर खंडातील शिवलीलामृताचा हा पाचवा अध्याय भाविकभक्त प्रेमादराने श्रवण करोत. ||१२२|| || श्री सांबसदाशिवार्पणमस्तु ।।
अधिक माहितीसाठी आमच्या सोशल मीडिया ला फॉलो करा.
मराठी रसिक या आमच्या इंस्टाग्राम अकाउंट ला लाईक करा सुब्स्क्राईब करा. येथे तुम्हाला संपूर्ण माहिती मराठी मध्ये मिळते.