Shree Shivleelamrut Adhyay Chautha (4) । श्री शिवलीलामृत अध्याय चौथा (४)

Shree Shivleelamrut Adhyay Chautha

हा चौथा अध्याय असून आपण आधीचे ३ अध्याय वाचले नसतील तर अध्याय १ पासून सुरुवात करावी.

Shree Shivleelamrut Adhyay Pahila
Shree Shivleelamrut Adhyay Pahila
Shree Shivleelamrut Adhyay Dusara
Shree Shivleelamrut Adhyay Dusara
Shree Shivleelamrut Adhyay Tisara
Shree Shivleelamrut Adhyay Tisara

Shree Shivleelamrut Adhyay Chautha (Sar) । श्री शिवलीलामृत अध्याय चौथा (सार)

वेदव्यासशिष्य सुत पुढे सांगत होते. ते ऐका किरात देशी विमर्शन नामक राजा राज्य करीत होता. कुमुद्धती ही त्याची पट्टराणी होती. राजास मदीरा व मदिराक्षी याची फार आवड होती. तसा तो मोठा शिवउपासकही होता. हे पाहुन राणीने विचारले नाथ! तुम्ही शिवउपासनाही करता व तुमच्याकडून अधर्मही घडतो. हे कसे? राजाने पूर्व जन्मीचा वृत्तांत सांगितला. मी पूर्वी कुत्रा होतो महाशिवरात्रीस मला उपास पडला शिवमंदिराला प्रदक्षिणा घडल्या. व शिवदर्शन करता करता मृत्यु आला म्हणुन श्वानजन्मीचे काही संस्कार कायम आहेत. व शिवोपासनाही घडत आहे. राणीने तिचा पूर्वजन्म विचारला. राजा म्हणाला तू पूर्वी कपोती होती. शिवमंदीराला प्रदक्षीणा घडल्या व तुला मंदिरासमोर ससाण्याने ठार केले. म्हणून तु राणी झालीस. पुढे राणीने आपल्या दोघांचे पुर्वजन्मा विषयी विचारले. राजाने पुढील सहा जन्माबद्दल सांगितले व नंतर शिव लोकाची प्राप्ती होईल म्हणुन सांगितले हे ऐकुन राणीस अत्यानंद झाला. पुढे सुतांनी दुसरी गोष्ट सांगितली. पुर्वी उज्जयिनी नगरी चंद्रसेन नामक राजा होता. तो शिवउपासक होता. महाकाळेश्वराची मनोभावे पुजाविधी करत असेमणिभद्र नावाच्या त्याच्या मित्राने एक तेजस्वी मणी दिला. मणी प्रभावामुळे सर्व राज्यात समृद्धी व शांती नांदु लागली. परंतु इतर राज्यातील सर्व राजांनी उज्जीवणी नगरीला वेडा घातला व राजास मण्याची मागणी केली राजाला चिंता पडली म्हणून त्याने उज्जयनीतील महांकाळेश्वरालाच साकडे घातले व मंदिरात गेला. इकडे दोन्ही प्रधानाने सैन्यास आदेश दिले घनघोर युद्ध सुरू झाले. एक विधवा स्त्री आपल्या सहा वर्षांच्या मुलाला कडेवर घेवून राजाची चाललेली शिवपुजा बघत थांबली. नंतर घरी येवून घरकामला लागली. परंतु तीच्या मुलांनी दगड मांडून त्यालाच शिवपिंड समजून त्याची पुजा करू लागला. लहान लहान दगड घेवून फुल नैवेद्य वाहत होता व मुखाने शीवहरहर म्हणत होता इतक्यात आईने जेवन्यास हाका मारली तरी तो त्या पुजेत इतका रममान झाला होता की आईची हाक त्याला ऐकायला आली नाही.आई रागाने येवून तीने सर्व पुजा उधळून दिली व ओढत घरात नेले त्यायोगे तो बेशुद्ध पडला परंतु आईने काही लक्ष दिले नाही. ती तसीच झोपली मुलगा शुद्धीवर आला तेव्हा तो शंकराचा जप करून रडू लागला ही त्याची निष्काम भक्ती पाहुन भगवान शंकर प्रसन्न होऊन झोपडीच्या ठिकाणी सुंदर रत्नजडीत सोन्याचे शिवलिंग सहीत मंदिर निर्माण केले व मुलाला दर्शन दिले त्या शिवलिंगाची वार्ता शत्रु पक्षाला कळताच ते वैरभाव टाकून राजाकडे शिवदर्शनास आले. प्रत्यक्ष हनुमान प्रगट होऊन मुलाचे श्रीकर नाव ठेवून श्रीकृष्णावतार पुत्ररूपाने घेईल. तोच पुढे नंदराज म्हणून गोकुळात जन्माला आला.


Shree Shivleelamrut Adhyay Chautha । श्री शिवलीलामृत अध्याय चौथा

श्रीगणेशाय नमः ।। धराधरेंद्रनंदिनीमानससरोवर ।। मराळ उदार कर्पूरगौर ।। अगम्य गुण अपार ।। तुझे वर्णिती सर्वदा ।।१ ।। न कळे जयाचें मूळ मध्य अवसान ।। आपणचि सर्वकर्ता कारण ।। कोठें प्रगटेल ज्याचें आगमन ।। ठायीं न पडे ब्रह्मादिकां ॥ २ ॥ जाणोनि भक्तांचें मानस ।। तेथेंचि प्रगटे जगन्निवास ।। येचिविषयीं सूतें इतिहास ।। शौनकादिकांप्रति सांगितला ॥३॥ किरातदेशींचा राजा विमर्शन ।। परम प्रतापी शत्रुभंजन ॥ मृगया करीत हिंसक दारुण ।। मद्य-मांसीं रत सदा ।।४।। चतुर्वर्णांच्या स्त्रिया भोगीत ।। निर्दय अधर्मेंचि वर्तत ।। परी शिवभजनीं असे रत ।। विधीनें पूजित नित्य शिवासी ।।५ ।। त्याचे स्त्रियेचें नाम कुमुद्वती ।। परम चतुर गुणवती ।। पतीप्रति पुसे एकांतीं ।। कापट्यरीती टाकोनियां ॥ ६ ॥ म्हणे शिवव्रत आचरतां बहुवस ।। शिवरात्रि सोमवार प्रदोष ।। गीतनृत्य स्वयें करितां विशेष ।। शिवलीलामृत वर्णितां ।।७ ।।

श्री गणेश, देवो सरस्वती, श्री सद्गुरू नाथ आणि श्रीसांबसदाशिवास विनम्नभावे नमस्कार असो. धराधरेंद्रनंदिनी पार्वतीदेवी हिच्या मानस सरोवरातील हंसराजा, तुझे गुणवर्णन ते मी कसे करावे? तू उदार वृत्तीचा, कर्पूरगौर कांतीचा आणि वेदशास्त्रांनी वर्णिलेल्या गुणांनी परिपूर्ण असा देव आहेस. ।।१।। हे देवा, तुझे मूळ, मध्य आणि अंत ह्या तिन्ही गोष्टी अनाकलनीय अशा आहेत. तूच सकल कर्माचा कर्ता आहेस. तू केव्हा कुठे आणि करता प्रकट होशील ह्याचा थांगपत्ता हा ब्रह्मादिकांनाही लागत नाही. ।।२।। पण तुझी अशी ख्याती आहे की, तू निज भक्तांनी मात्र तुझ्या दर्शनाची मनोमन इच्छा करताच तू त्यांना दर्शन देण्यास प्रकट होतोस. यासंदर्भात सूतांनी शौनकादिक ऋर्षीना एक कथा निवेदन केली. ती कथा अशी की- ।।३।। किरात देशाचा एक राजा होता. त्याचे नाव विमर्शन. तो राजा आपल्या शत्रूचा त्याच्या अंगी असलेल्या पौरुषाने बीमोड करीत असे. या राजास शिकारीचा नाद होता. तसेच त्यास मद्य आणि मांसाहाराची मोठी आवड होती. ।।४।।त्याची भोगी वृत्ती इतकी प्रबळ होती की, तो चारी वर्णाच्या स्त्री भोगीत असे. या राजाच्या मनात दया म्हणून नव्हती. तो जरी अधर्मान वर्तन करीत असला, तरी त्याचे एक मात्र वेगळे वैशिष्ट्य होते. ते असे हा विमर्शन राजा नित्य विधिवत शिवाचे पूजन करीत असे. ।।५।। या राजाच्या राणीचे नाव कुमुद्वती असे होते. ती अत्यंत सुंदर, चतुर आणि गुणवान होती. एकदा तिने एकांतात कोणताच आडपडदा न ठेवता सरळसरळ आपल्या पतिदेवास म्हणजेच राजास विचारले की- ।।६।। “महाराज, तुम्ही एकीकडे तर भगवान शिवांची नित्य पूजाअर्चा करता, त्याचे भजन नामस्मरण करता, त्याचे गुणवर्णन करता, शिवलीलांचे वर्णन करतो. ॥७॥


दोषही घडती तुम्हांपासून ॥ इकडे शिवभजनीं सावधान ॥ मग तो राजा विमर्शन ।। वर्तमान सांगे पुरातन पैं ।॥८ ॥ मी पूर्वी पंपानाम नगरीं ।। सारमेय होतों सुंदरी ॥ तों माघ वद्य चतुर्दशी शिवरात्रीं ।। शिवमंदिरासमोर आलों ॥ ९ ॥ शिवपूजा पाहिली समस्त ।। द्वारीं उभे होते राजदूत ।। तिहीं दंड मारितां त्वरित ।। सवय पळत प्रदक्षिणा करीं ॥१० ॥ आणीक आलों परतोनी ।। बलिपिंड प्राप्त होईल म्हणोनी ।। मागुती दटावितां त्यांनी ।। प्रदक्षिणा केल्या शिवसदना ॥११॥ मागुती बैसलों येऊन । तंव तिहीं क्रोधे मारिला बाण ।। म्यां शिवलिंग पुढें लक्षून ।। तेथेंचि प्राण सोडिला ॥ १२ ॥ त्या पुण्यकर्मेकरून ।। आतां राजदेह पावलों जाण ।। परी श्वानाचे दुष्ट गुण ।। नाना दोष आचरें ॥१३॥ कुमुद्वती म्हणे तुम्हांसी पूर्वज्ञान ॥ तरी मी कोण होतें सांगा मजलागून ॥ मग तो बोले विमर्शन ।। कपोती होतीस पूर्वी तूं ॥१४॥

तर दुसरीकडे मात्र तुमच्यात अनेक दोष आणि दुर्गुणही आहेत. हे असे विरोधाभासाचे चित्र कसे काय?” ह्याचे कारण काय? तेव्हा राणीचा प्रश्न ऐकून आपल्या गतजन्माचे स्मरण असलेला तो राजा राणीस सांगू लागला. ।।८।। हे प्रियतमे, अगं गतजन्मी मी पंपा नावाच्या नगरीत एका कुत्र्याच्या रूपाने राहात होतो. एकदा असे घडले की, माघ शुद्ध चतुर्दशीच्या पुण्यपावन दिवशी मी अचानकपणे एका शिवमंदिरासमोर आलो. त्या दिवशी शिवमंदिरात शिवाची मोठी पूजा बांधली होती. ती पूजा मी पाहात असताना तिथे उभ्या असलेल्या रक्षकांनी मला पाहिले, देवालयासमोर आणि श्वान म्हणून त्यांनी माझ्या अंगावर दंड फेकून मारला. मी घाबरून भराभर त्या मंदिराभोवतीच फेऱ्या मारल्या आणि पुन्हा शिवमंदिरासमोर येऊन बसली. ।।१०।। मी मला तिथे बलिपिंड मिळेल ह्या आशेने आलो. पण राजदूतांनी पुन्हा दंड उगारताच मी पुन्हा मंदिरास प्रदक्षिणा घातल्या आणि पुन्हा आशाळभूतासारखा मंदिरासमोर येऊन बसलो. ||११||यावेळी मात्र मला समोर पाहताच त्यांनी दंड उगारला नाही तर सरळ बाण मारला आणि तो बाण मला जिव्हारी लागताच त्या शिवदर्शनाबरोबरच तिथेच मी प्राण सोडला. ||१२|| आणि हे प्रियतमे, त्याच पूर्वपुण्याईच्या बळावर मला या जन्मी हा राजाचा जन्म प्राप्तम झाला आहे. पण माझे गतजन्मातले श्वानाचे काही अवगुण हे मात्र अजून न गेल्यानेच माझ्या हातून ती तशी दुष्कर्म घडत आहेत, माझ्या अंगी ते दोष बाकी आहेत. ।।१३।। विमर्शन राजाचे ते बोलणे ऐकून राणीस मोठे आश्चर्य वाटले. ती म्हणाली, “स्वामी, आपणास तर मोठे पूर्वजन्मीचे ज्ञान आहे, होय ना? मग आता आपण मला हे सांगा की, मी मागच्या जन्मी कोण होते? माझ्या हातून असे कोणते पुण्य घडले?” तेव्हा राजा एकवार तिच्याकडे पाहून तिला सांगू लागला, हे राणी, गतजन्मी तू एक कपोत म्हणजेच कबुतराची मादी होतीस. ।।१४।।


मांसपिंड नेतां मुखीं धरून ।। पाठी लागला पक्षी श्येन ।। शिवालयास प्रदक्षिणा तीन ।। करून वैसलीस शिखरीं ॥१५॥ तूं श्रमलीस अत्यंत ।। तुज श्येनपक्षी मारीत ।। शिवसदनासमोर शरीर पडत ।। ती राणी सत्य झालीस तूं ॥१६ ।। मग कुमुद्वती म्हणे रायास ।। तूं त्रिकालज्ञानी पुण्यपुरुष ।। तुम्ही आम्ही जाऊं कोण्या जन्मास ।। सांगा समस्त वृत्तांत हा ॥ १७ ॥ यावरी तो राव म्हणे । ऐके मृगनेत्रे इभगमने ।। सिंधुदेशींचा नृप इंदुवदने ।। होईन पुढलिये जन्मीं मी ॥१८ ।। तूं जयानामें राजकन्या होसी ।। मजलागीं राजसे वरिसी ।। तिसरे जन्मीं सौराष्ट्रराव नेमेंसीं ।। होईन सत्य गुणसरिते ।।१९ ॥ तूं कलिंगकन्या होऊन ।। मज वरिसी सत्य जाण ॥ चौथे जन्मीं गांधारराव होईन । तूं मागधकन्या होऊन वरिसी मज ॥२०॥ पांचवे जन्मीं अवंतीराज ॥ दाशार्ह कन्या तूं पावसी मज ॥ सहावे जन्मीं आनर्तपति सहज ।। तूं ययातिकन्या गुणवती ।। २१ ।। सातवे जन्मीं पांड्यराजा होईन ।। तूं पद्मराजकन्या वसुमती पूर्ण ।। तेथें मी बहुत ख्याति करून ।। शत्रु दंडीन शिवप्रतापें ।॥२२ ।।

एकदा असे घडले की, तू तुझ्या चोचीत एक मांसाचा तुकडा घेऊन जात असताना एक बहिरी ससाणा तुझ्या मागे लागला. तेव्हा त्याच्या तावडीतून सुटण्वाच्या प्रयत्नात तू त्या शिवालयास तीन प्रदक्षिणा घातल्यास आणि त्याचे कळसावर विसावलीस. ।।१५।। तू अत्यंत दमलेली असतानाच त्या ससाण्याने तुला मारले आणि तू त्याच शिवालयाचे समोर खाली पडलीस. त्या अंतकाळच्या शिवदर्शनानेच तू या जन्मी माझी राणी झालीस. ।।१६।। तेव्हा राजाचे ते बोलणे ऐकून कुमुद्वती राणी राजास म्हणाली, “स्वामी, आपण तर त्रिकालज्ञानी दिसता. तेव्हा आता कृपा करा आणि मला आपल्या दोघांच्या पुढील काही जन्मांची माहिती द्या.”।।१७।। तेव्हा तो त्रिकालज्ञानी राजा थोडा भविष्याचा वेध घेऊन तिला सांगू लागला की, हे प्रियतमे, हे चंद्रमुखी, पुढील जन्मी मी सिंधू नगरीचा राजा होणार आहे. ।।१८|| त्याच वेळी तू जया नावाची राजकन्या होशील आणि तुझा आणि माझा विवाह होईल, हे गुणसंपन्ने, तिसऱ्या जन्मात मी सौराष्ट्र देशाचा राजा होईन. ।।१९||त्यावेळी तू कलिंगदेशाची राजकन्या म्हणून जन्म घेऊन माझ्याशी विवाह करशील. चौथ्या जन्मात मी गांधार देशाचा राजा आणि तू मगध देशीची राजकन्या होशील व आपला विवाह होईल. ||२०|| पाचव्या जन्मात मी अवंती नगरीचा राजा झालेला असेन, तर तू दाशार्ह राजाची कन्या होशील. सहाव्या जन्मात मी आनर्त देशाचा राजा असेन. तू त्यावेळी ययाती कुळात गुणवत्ती नावाने जन्मास येऊन आपला विवाह घडेल. ।।२१।। सातव्या जन्मात मी पांड्य देशाचा राजा आणि तू पद्मराजाची कन्या वसुमती होशील. त्या जन्मी मी शिवभक्ती करीन. माझा मोठा नावलौकिक होईल. मी अनेक शत्रूना जिंकून घेईन. ।।२२ ।।


महाधर्म वाढवीन ।। जन्मोजन्मीं शिवभजन करीन ।। मग त्या जन्मीं पुत्रास राज्य देऊन ।। तपास जाईन महावना ॥२३॥ शरण रिघेन अगस्तीस ।। शैवदीक्षा घेऊनि निर्दोष ।। शुभवदने तुजसमवेत कैलास – ।। पद पावेन निधरिं ॥ २४ ॥ सूत म्हणे शौनकादिकांप्रती ।। तितुकेही जन्म घेवोनि तो भूपती ।। ब्रह्मवेत्ता होऊनि अंतीं ।॥ अक्षय शिवपद पावला ॥ २५ ॥ ऐसा शिवभजनाचा महिमा ।। वर्णं न शके दुहिण सुत्रामा ।। वेदशास्त्रांसी सीमा ।। न कळे ज्याची वर्णावया ॥ २६ ॥ ऐकूनि शिवगुणकीर्तन ।। सद्गद न होय जयाचें मन ।। अश्रुधारा नयन ।। जयाचे कदा न वाहती ॥ २७ ॥ धिक् त्यांचे जिणें धिक् कर्म ।। धिक् विद्या धिक् धर्म ।। तो वांचोनि काय अधम ।। दुरात्मा व्यर्थ संसारी ॥२८॥ ऐक शिवभजनाची थोरी ।। उज्जयिनीनामें महानगरी।। राव चंद्रसेन राज्य करी ।। न्यायनीती करूनियां ।।२९ ।। ज्योतिर्लिंग महांकाळेश्वर ।। त्याचे भजनीं रत नृपवर ।। मित्र एक नाम मणिभद्र ॥ प्राणसखा रायाचा ॥३० ।।

त्या जन्मी मी धर्माचरण धर्मप्रचार करीन. आयुष्यभर शिवभजन करीन. शेवटी पुत्रास राज्य देऊन एका मोठ्या अरण्यात तपाचरणासाठी निघून जाईन. ।।२३।। तिथे मी अगस्ती ऋर्षीना शरण येईन. त्यांच्याकडून मला शिवदीक्षा प्राप्त होईल. मी कठोर शिवोपासना करून माझ्यासोवत तुला कैलासास घेऊन जाईन. ।।२४।। सूत शौनकादिक लोकांना म्हणाले की, सुजनहो, पुढे खरोखरच त्या विमर्शन राजाने जसे भाकित सांगितले, त्याप्रमाणेच अनेक जन्मोजन्मीचे सुख भोगून तो अंती ब्रह्मज्ञानी झाला आणि शेवटी त्यास शिवपद प्राप्त झाले. ।।२५।। लोकहो शिवाचा महिमा हा असा थोर आणि अवर्णनीय आहे. त्याचे वर्णन करण्यास वेदशास्त्रेही अपुरी पडतात. ।।२६।। भगवान शिवाचे कीर्तन ऐकून ज्याचे मन भक्तिभावाने भरून येत नाही, ज्याचे मन सद्गदित होत नाही, ज्याच्या मनात प्रभुप्रेमाचा पाझर फुटत नाही. ||२७||अशा अभागी दुर्दैवी जिवाच्या जगण्यात तरी काय अर्थ आहे? त्या दुरात्म्याचे जीवन हे व्यर्थ आहे. ||२८|| सुजनहो, आता मी तुम्हास त्या शिवभजनाची महानता सांगणारी आणखी एक कथा सांगतो ती ऐका. उज्जयिनी नावाच्या एका नगरात एक चंद्रसेन नावाचा राजा राज्य करीत होता. तो आपले राज्य मोठ्या न्यायाने आणि नीतिधर्माचे पालन करून चालवीत असे. ||२९|| तसेच राजा चंद्रसेन हा उज्जैनच्या श्री महाकालेश्वर नावाच्या ज्योतिर्लिंगाची खास पूजाअर्चा करीत असे. त्याचे मन शिवसेवेसाठी सदैव तत्पर असे. या राजाचा मणिभद्र नावाचा एक जिवश्चकंठश्च मित्र होता. ।।३०।।


मित्र चतुर आणि पवित्र ॥ देशिक सर्वज्ञ दयासागर ॥ शिष्य भाविक आणि उदार ।। पूर्वसुकृतॆ प्राप्त होय ॥३१॥ गृहिणी सुंदर आणि पतिव्रता ।। पुत्र भक्त आणि सभाग्यता ।। व्युत्पन्न आणि सुरस वक्ता ।। होय विशेष सुकृतें ॥ ३२ ॥ दिव्य हिरा आणि परीस ।। मुक्ताफळ सुढाळ सुरस ।। पिता ज्ञानी गुरु तोचि विशेष ।। हें अपूर्व त्रिभुवनीं ।॥ ३३ ॥ ऐसा तो राव चंद्रसेन ।। मित्र मणिभद्र अति सुजाण ।। तेणें एक मणि दिधला आणोन ॥ चंडकिरण दूसरा ॥ ३४॥ अष्टधातूंचा होता स्पर्श ।। होय चामीकर बावनकस ।। सर्पव्याघ्रतस्करवास ।। राष्ट्रांत नसे त्याकरितां ।॥ ३५ ॥ त्या मण्याचें होतां दर्शन ।। सर्व रोग जाती भस्म होऊन ।। दुर्भिक्ष शोक अवर्षण ।। दारिद्र्य नाहीं नगरांत ॥ ३६ ॥ तो कंठीं बांधितां प्रकाशवंत ।। राव दिसे जैसा पुरुहूत ॥ समरांगणीं जय अद्भुत ।। न ये अपयश कालत्रयीं ।। ३७ ।। जे करावया येती वैर ।। ते आपणचि होती प्राणमित्र ॥ आयुरारोग्य ऐश्वर्य अपार ।। चढत चालिलें नृपाचें ॥ ३८ ॥ भूप तो सर्वगुणी वरिष्ठ ।। कीं शिवभजनीं गंगेचा लोट । कीं विवेक भावरत्नांचा मुकुट ।। समुद्र सुभट चातुर्याचा ॥३९॥

तो चतुर, शुद्ध सात्विक आणि पवित्र विचारांचा होता. सर्वज्ञ आणि दयाळू असे सदगुरू आणि उत्तम मित्र हे मोठ्या मान्यानेच्च प्राप्त होतात ।।३१।। सोच्च सुंदर आणि पतिव्रता स्त्री लाभणे, मातृपितृभक्त पुत्र लाभणे, खरा विद्वान आणि चतूर वक्ता लामणे, ह्यासाठी सुद्धा पदरी विशेष असा पुण्याईचा देवा असावा लागतो. ॥३२॥ दिव्य हिरा, चांगला परीस, पाणीदार मोती, ज्ञानी पिता आणि विशेष पात्रतेचा सद्‌गुरु ह्या गोष्टी लाभणे हे अपूर्व आहे. ।।१३।। राजा चंद्रसेन आणि तो मणिभद्र हे दोघेही परस्परांचे चांगले सुजाण मित्र होते. या मणिभद्र मित्रानेच आपला मित्र राजा चंद्रसेन ह्यात एकः अत्यंत विव्य असा मणी भेट म्हणून दिला होता. ।।३४।। त्या मण्याचे असे वैशिष्ट्य होते की, त्या मण्याच्या संपर्कात आलेल्या कोणत्याही धातूचे तत्काळ सोने होत असे. तसेच या मण्याच्या प्राप्तीने साप, वाघ आणि चोर ह्यांच्यापासून भय राहात नसे. ।।३५।।। तसेच या मण्याच्या केवळ साध्या दर्शनानेही अनेक व्यार्थीचे निवारण होत असे. दुर्भाग्य आणि दारिद्रय ह्यांचे निरसन होत असे. ज्या नगरात हा मणी असेल तिथे कधीच दुष्काळ पडत नसे. तर उलट सुखशांती आणि सौख्य नांदत असे. ।। ३६ ।। तो दिव्यमणी कंठात बांधल्यावर राजा अत्यंत तेजस्वी दिसत असे आणि रणांगणात सर्वेच यश लाभत असे. तो कधीही पराभूत होत नसे. ।।३७|| जे कोणी चंद्रसेनाचे शत्रू म्हणून येत ते त्याचे मित्रच बनत. त्या मण्यामुळे चंद्रसेन राजाचे वैभव, त्याचा नावलौकिक वाढत होता. ||३८|| तसेच असा हा सद्गुणी, विवेकी, चतुर पराक्रमी असा राजा चंद्रसेन, ह्या सर्व गुणांवर कळस म्हणजेच तो एक महान शिवभक्त, शिवोपासक होता. ।। ३९।।


कीं वैराग्यसरोवरींचा मराळ।। कीं शांतिउद्यानींचा तपस्वी निर्मळ।। कीं ज्ञानामृताचा विशाळ ।। कूपचि काय उचंबळला ॥४०॥ ऐश्वर्य वाढतां प्रबळ ॥ द्वेष करिती पृथ्वीचें भूपाळ ॥ मणि मागों पाठविती सकळ ।। स्पर्धा बळें वाढवितीं ।॥४१ ।। बहुतांसि असह्य झालें ।। अवनीचे भूभुज एकवटले ।। अपार दळ घेवोनि आले ।। वेढिलें नगर रायाचें ॥४२ ।। इंदिरावर कमलदलनयन ।। त्याचें कंठीं कौस्तुभ जाण ।। कीं मृडानीवरमौळीं रोहिणीरमण ।। प्रकाशघन मणी तैसा ॥ ४३ ॥ तो मणी आम्हांसि दे त्वरित ।। म्हणोनि नृपांनीं पाठविले दूत ॥ मग राव विचारी मनांत ।। कैसा अनर्थ ओढवला ।।४४ ।। थोर वस्तूंचें संग्रहण ।। तेंचि अनर्थासी कारण ।। ज्याकारणें जें भूषण ।। तेंचि विदूषणरूप होय ।।४५ ।। अतिरूप अतिधन ।। अतिविद्या अतिप्रीति पूर्ण ॥ अतिभोग अतिभूषण ॥ विघ्नासि कारण तेंचि होय ।।४६ ।।

राजा चंद्रसेन म्हणजे जणूकाही वैराग्यरूपी सरोवरातला हंस, शांतिरूपी उद्यानातला थोर तपस्वी किंवा ज्ञानामृताची जणूकाही एक मोठी वापीच होता. ॥४०॥ अशा या राजाचे राजवैभव हे दिसामासांनी वाढत असल्याने, स्वाभाविकपणेच त्यास कळत नकळत त्याच्चा द्वेष करणारे शत्रूही निर्माण झाले. त्यांच्यातील प्रत्येकजण हा राजा चंद्रसेनाकडे त्या दिव्य मण्याची सातत्याने मागणी करू लागला आणि राजाच्या नकाराने त्याचे शत्रू वाढू लागले. तो मणी चंद्रसेनाकडून कसा मिळवायचा ह्यासाठी त्यांच्यात जणू स्पर्धाच चालू झाली. ।।४१।। राजा चंद्रसेन हा काही केल्या तो दिव्य मणि कोणास देण्यास तयार होत नव्हता. त्यामुळे त्याच्या विरोधात अनेक राजे हे एकत्र आले. त्यांनी सर्वांची मिळून एक प्रचंड मोठी अशी सेना तयार केली. त्या शत्रू सैन्याने राजा चंद्रसेनाच्या उज्जैन नगरीस सेनेचा वेढा घातला. ||४२|| कोणाच्या हाती लागू नये म्हणून आता तर त्या राजाने तो विव्यमणी आपल्याच गळ्यात धारण केला होता. तो विष्णूच्या गळ्यात वैजयंती माळ शोभावी किंवा भगवान शिवाच्या माथ्यावरील चंद्र जसा शोभून दिसावा तसा राजाच्या गळ्यात शोभून दिसत होता. ||४३|| तेव्हा अन्य राजांनी दूतामार्फत चंद्रसेन राजाकडे निरोप पाठविला की, राजन, जर पुढील अनर्थ टाळायचा असेल तर तू तो दिव्य मणी आमच्या स्वाधीन कर’. तेव्हा राजा मनोमन विचार करू लागला की, अरे काय हे या एका मण्यापायी हा केवढा मोठा अनर्थ ओढवला. ।॥४४॥ खरंच एखादी मौल्यवान वस्तू ही अर्थास कारणीभूत ठरते असे म्हणतात ते खरेच. कालपर्यंत जो मणी मला भूषणास्पद होता तोच आज या युद्धास कारणीभूत ठरावा. काय हा अनर्थ ? ।।४५ ।। नाही तरी जगात म्हणतात ते काही खोटे नाही. अतिसौंदर्य, रूप लावण्य, धन, प्रेम, विद्या, भोग आणि संभाषण हे विघ्नास कारणीभूत ठरते हेच खरे. ।।४६।।


बोले राव चंद्रसेन ।। मणि जरी द्यावा यांलागून ॥ तरी जाईल क्षात्रपण ।। युद्ध दारुण न करवे ।।४७ ।। ७६ आतां स्वामी महांकाळेश्वर ॥ करुणासिंधु कर्पूरगौर ॥ जो दीनरक्षण जगदुद्धार ।। वज्रपंजर भक्तांसी ।।४८ ।। त्यासी शरण जाऊं ये अवसरी ।। जो भक्तकाजकैवारी ।। जो त्रिपुरांतक हिमनगकुमारी ।। प्राणवल्लभ जगदात्मा ॥४९ ॥ पूजासामग्री सिद्ध करून ।। शिवमंदिरीं बैसला जाऊन ।। सकळ चिंता सोडोन ॥ विधियुक्त पूजन आरंभिलें ॥५०॥ बाहेर सेना घेऊनि प्रधान ।। युद्ध करीती शिव स्मरून ।। महायंत्रांचें नगरावरून ।। मार होती अनिवार ।॥५१॥ सर्व चिंता सोडूनि चंद्रसेन ।। चंद्रचूड आराधी प्रीतीकरून ।। करी श्रौतमिश्रित त्र्यंबकपूजन ।। मानसध्यान यथाविधि ।।५२ ।। बाहेर झुंजती पृथ्वीचे भूपाळ ।। परी चिंतारहित भूपति प्रेमळ ।। देवद्वारीं वाद्यांचा कल्लोळ ।। चतुर्विध वाद्ये वाजताती ॥५३॥ राव करीत महापूजन ॥ पौरजन विलोकिती मिळोन ॥ त्यांत एक गोपगृहिणी पतिहीन ।। कुमार कडिये घेऊन पातली । ॥५४॥

त्याबरोबर राजा असाही विचार करायला लागला की, आपण जर हा मणी त्यांना सहजासहजी दिला तर आपल्या क्षत्रीयत्वाला ते शोभा देणार नाही. बरं जर न द्यावा तर ह्या सर्वांचा रोष पत्करून पुढील संभाव्य महायुद्धास तोंड द्यावे लागेल तेव्हा आता काय करावे? ।।४८ ।। तेव्हा राजाने मनोमन विचार केला की, आता आपण आपल्या भक्त कैवारी श्री सांब सदाशिवासच शरण जाऊया. त्यास गाऱ्हाणे घालूया. तो भक्त कैवारी आहे. दीनदयाघन आहे. तो आपला रक्षक आहे. तो त्रिपुरांतक महादेव आपला पाठीराखा आहे. ।।४९|| तेव्हा राजाने त्यावेळी आपल्या मनाचा निश्चय केला. त्याने नित्याप्रमाणे पूजा साहित्य घेतले आणि तो त्या महाकालेश्वराच्या मंदिरात जाऊन आपला सर्व भार त्या सदाशिवाच्या चरणी वाहून एकाग्र चित्ताने आणि शांत मनाने भगवान शंकरांचे पूजन करू लागला. ।।५०।।नगराबाहेर हर हर महादेव अशी गर्जना करीत प्रधानाच्या आणि सेनापतीच्या अधिपत्याखाली राज्य रक्षणार्थ गेलेली सेना ही शत्रूशी युद्ध करू लागली. तिकडे परस्परांचा एकमेकांवर अस्त्र-शस्त्रांचा तुफानी मारा होत असताना ।।५१।। इकडे शिव मंदिरात मात्र राजा शांत चित्ताने भगवान शिवाची मनोभावे पूजा करीत होता. त्याचे मानसपूजन, ध्यान आणि स्तोत्रपठण हे अखंड चालू होते. ।॥५२॥ नगराबाहेर रणधुमाळी चालू होती, तर इकडे मंदिरात मात्र राजा चंद्रसेन हा शांत चित्ताने शिवपूजनात मग्न होता. मंदिरात मंगल वाद्ये वाजत होती. ।।५३।। त्याही संकट काळात ती राजाची शांत चित्ताने चाललेली पूजा नगरजन पाहात होते. त्या नगरवासियांच्या गर्दीतच एक गोपललना आपल्या मुलास कडेवर घेऊन ती पूजा पाहण्यासाठी तिथे आली. ।।५४।।


सहा वर्षांचा बाळ ।। राजा पूजा करितां पाहे सकळ ॥ निरखोनियां वाढवेळ ॥ गोपगृहिणी आली घरा ।।५५।। कुमार कडेखालता उतरून ॥ आपण करी गृहींचे कारण ।। शेजारी उद्वस तृणसदन ।। बाळ जाऊनि बैसला तेथे ॥५६॥ लिंगाकृति पाषाण पाहून ॥ मृत्तिकेची वेदिका करून । दिव्य शिवप्रतिमा मांडून ।। करी स्थापन प्रीतीनें ॥५७॥ कोणी दुजें नाहीं तेथ ।। लघुपाषाण आणोनि त्वरित ।। पद्मासनीं पूजा यथार्थ ।। पाषाणचि वाहे प्रीतीनें ॥५८ ॥ राजपूजा मनांत आठवून ।। पदार्थमात्राविषयीं वाहे पाषाण ।। धूप दीप नैवेद्य पूर्ण ।। तेणेंचिकरूनि करीतसे ॥५९॥ आर्द्र तृणपुष्प सुवासहीन ।। तेंचि वाहे आवडीकरून ।। नाहीं ठावुकें मंत्र ध्यान आसन ।। प्रेमभावें पूजीतसे ॥ ६० ॥ परिमळद्रव्यें कैंचि जवळी ।। शिवावरी मृत्तिका उधळी ।। मृत्तिकाच घेऊनि करकमळीं ।। पुष्पांजली समर्पित ॥६१ ॥ एवं रायाऐसें केलें पूजन ।। मग मानसपूजा कर जोडून ॥ ध्यान करी नेत्र झांकून ॥ शंकरीं मन दृढ जडलें ।॥ ६२ ॥

शव मंदिरातील ते राजाचे एकाग्रचित्ताने चाललेले शिवपूजन हे त्या गोपललनेने आणि तिच्या कडेवरील बालकानेही पाहिले. मग ती गवळण बापल्या घरी परतली. ।।५५|| तिने आपल्या कडेवरील बालकास खाली उतरविले आणि ती तिच्या नित्याच्या घरकामासाठी घरात निघून गेली. तेव्हा तो मुलगा घराशेजारच्या एका गवताच्या खोपटात जाऊन बसला. ||५६।। त्याने एक शिवलिंगाकार दगड सापडताच त्याचीच मातीच्याच वेदिकेवर शिवलिंग म्हणून स्थापना केली. ।।५७|| त्या मुलाजवळ अन्य काहीच नव्हते. तेव्हा त्याने छोटे छोटे मातीचे खडेच जमविले आणि तीच त्याची पुजासामग्री असे कल्पून तो त्याने राजाप्रमाणे शिवपूजन करू लागला. मातीच्याच वस्तू देवास अर्पण करू लागला. ।। ५८||| त्याने राजाला जशी पूजा करताना पाहिले होते तसा हा बालक ती पूजा करू लागला. तो पदार्थांच्या जागी माती अन् खडेच ते पदार्थ मानून शंकरास अर्पण करू लागला. त्याने राजाप्रमाणेच धूप, दीप, नैवेद्य इ. गोष्टी केल्या. ।।५९|| मोठ्या भक्तिभावाने त्या बालकाने कोवळे गवत आणि वासहिन फुले देवास वाहिली. त्याला मंत्र तर येत नव्हतेच. तो फक्त देवाचे नाव घेऊन साऱ्या मातीच्याच वस्तू, पण भक्तिभावाने देवास वाहात होता. ।।६०।। त्याच्याजवळ तर कोणतीच मासिक सुगंधी द्रव्ये नव्हती. तो देवावर अंगणातली मातीच उधळत होता आणि मातीचीच पुष्पांजली देवाच्या चरणांवर अर्पण करीत होता. ।।६१।। अशा प्रकारे मातीच्या शिवलिंगाची मातीनेच पूजा करून तो बालभक्त डोळे मिटून शंकराचे ध्यान करू लागला. ।।६२।।


मातेनें स्वयंपाक करून । ये बा करीं पुत्रा भोजन ॥ बहुवेळां हांक फोडोन ।। पाचारितां नेदी प्रत्युत्तर ॥ ६३ ॥ म्हणोनि बाहेर येवोनि पाहे ॥ तंव शून्यगृहीं बैसला आहे ।। म्हणे अर्भका मांडिले काये ।। चाल भोजना झडकरी ॥६४॥ परी नेदी प्रत्युत्तर ।। मातेनें क्रोधेंकरूनि सत्वर ।। त्याचें लिंग आणि पूजा समग्र ।। निरखूनियां झुगारिली ॥ ६५ ॥ चाल भोजना त्वरित ।। म्हणोनि हस्तकीं धरूनि ओढीत ।। बाळ नेत्र उघडोन पाहत ।। तंव शिवपूजा विदारिली ॥ ६६ ॥ अहा शिव शिव म्हणोन ।। घेत वक्षःस्थळ बडवून ।। दुःखें पडला मूर्च्छा येऊन ॥ म्हणें प्राण देईन मी आतां ॥ ६७ ॥ गालिप्रदानें देऊन ।। माता जाऊनि करी भोजन ॥ जीर्णवस्त्र पांघरून ॥ तृणशेजे पहुडली ॥६८॥ इकडे पूजा भंगली म्हणून ।। बाळ रडे शिवनाम घेऊन ।। तंव तो दयाळ उमारमण ।। अद्भुत नवल पैं केलें ॥६९॥ तृणगृह होतें जें जर्जर ।। झालें रत्नखचित शिवमंदिर ।। हिऱ्यांचे स्तंभ वरी शिखर ॥ नानारत्नांचे कळस झळकती ।।७० ।।

तिकडे त्याच्या आईने स्वैपाक तयार केला आणि ती त्यास जेवायला ये म्हणून हाका मारू लागली. पण तिच्या हाकेत मात्र त्याच्याकडून उत्तर येत नव्हते. ।।६३।। तेव्हा हा बाहेर काय करतोय म्हणून तिने बाहेर येऊन पाहिले तर हा पोर पार ध्यानात रमलेला. त्याच्यासमोर ती मातीची पूजा. ती त्यास म्हणाली, “अरे, तू हे काय मांडले आहेस? चल चटकन जेवून घे”।।६४।। परंतु त्याच्याकडून मात्र कोणताच प्रतिसाद मिळत नाही म्हटल्यावर तिला त्याचा राग आला. तिने एकदा त्याच्याकडे आणि त्याच्या पूजेकडे पाहिले, आणि रागारागाने त्याची ती पूजा मोडून टाकली, उधळून टाकली. ।।६५।। चल जेवायला असे म्हणून ती त्यास हाताला धरून ओढत नेत असताना त्या बालकाने ती आपली मोडलेली, उधळून टाकलेली पूजा पाहिली. ।।६६।। तेव्हा हाय रे शिवा, असे म्हणून तो छाती बडवून रडू लागला. दुःख करू लागला. त्या दुःखाने त्याला मूर्च्छा आली. देवा, तुझी पूजा मोडली. आता मी पण माझे प्राण देतो, असे तो म्हणू लागला. ।।६७।।त्या बालकास तसाच तिथे सोडून त्याची आई घरात गेली, जेवली आणि चटईवर फाटके पांघरूण घेऊन झोपली. ।। ६८ ।। इकडे आपली शिवपूजा उधळली म्हणून व्यथित झालेला तो बाळ शोक करीत असताना, तो रडून मूच्छित होऊन पडलेला असताना त्या बालभक्ताच्या मानसपूजेने संतुष्ट झालेल्या शंकरांनी एक अद्भुत असे नवल केले. ॥६९।। त्यांनी जिथे त्यांचे गवताचे खोपटे होते तिथे एक दिव्य रत्नजडित अशा शिव मंदिराची उभारणी केली. त्या मंदिरास हिऱ्याचे खांब आणि नाना रत्नांनी मढलेला असा कळस होता. ।।७०।।


चारी द्वारें रत्नखचित ।। मध्यें मणिमय दिव्यलिंग विराजत ।। चंद्रप्रभेहूनि अमित ।। प्रभा ज्योतिर्लिंगाची ।।७१ ।। नेत्र उघडोनि बाळ पाहत ।। तंव राजोपचारें पूजा दिसत ।। सिद्ध करोनि ठेविली समस्त ।। बाळ नाचत ब्रह्मानंदें ।॥ ७२ ॥ यथासांग महापूजन ।। बाळें केलें प्रीतीकरून ।। षोडशोपचारें पूजा समर्पून ।। पुष्पांजली वाहतसे ॥ ७३ ॥ शिवनामावळी उच्चारीत ।। बाळ कीर्तनरंगीं नाचत ।। शिव म्हणे माग त्वरित ॥ प्रसन्न झालों बाळका रे ॥ ७४ ॥ बाळक म्हणे ते वेळीं ।॥ मम मातेनें तुझी पूजा भंगिली ।। तो अन्याय पोटांत घालीं ।। चंद्रमौळी अवश्य म्हणे ॥७५ ।। मातेसी दर्शना आणितों येथ ।। म्हणोनि गेला आपुले गृहांत ।। तंव तें देखिलें रत्नखचित ।। माता निद्रिस्त दिव्यमंचकीं ।॥७६ ।। पहिलें स्वरूप पालटून ।। झाली ते नारी पद्मीण ॥ सर्वालंकारेंकरोन ॥ शोभायमान पहुडली ॥७७॥ तीस बाळकें जागें करून ।। म्हणे चाल घेई शिवदर्शन ।। तंव ती पाहे चहूंकडे विलोकून ॥ अद्भुत करणी शिवाची ।।७८ ।।

त्या रत्नजडित चार दरवाजे असलेल्या सुंदर शिव मंदिरातील शिवलिंगही मोठे सुंदर असे होते. त्याचे तेज सर्वत्र पसरले होते. ।।७१।। देवांनी त्यास हाक मारून जागे केले. त्याने समोर पाहिले तो काय भव्य शिव मंदिर आणि आत राजोपचाराप्रमाणे सर्व पूजा साहित्याची तयारी, ते पाहून तो बालक अत्यानंदाने नाचू लागला. ।। ७२ ।। त्या गोपपुत्राने त्या सर्व साहित्याने राजाप्रमाणेच भगवान शिवाची यथासांग भक्तिभावाने पूजा केली. ।।७३।। तो शिवनामाच्या गजरात आनंदाने नाचू लागला. तेव्हा भगवान शंकर हे त्यास दर्शन देत म्हणाले, “बाळा, अरे तुझ्या भक्तिभावाने केलेल्या पूजेने मी तुझ्यावर अतिप्रसन्न झालो आहे, तुला काय हवा तो वर माग”. ।। ७४।।तेव्हा तो बालक देवास हात जोडून म्हणाला, “हे भोलेनाथा, माझ्या मातेने तुझी पूजा उधळून टाकली, तिच्या या अपराधाबद्दल तू तिला क्षमा कर. तिचा अपराध पोटी घाल. तिच्यावर दया कर.” तेव्हा त्या बालकाची ती विनवणी ऐकून देव त्यास “ठीक आहे” असे म्हणाले. ।।७५|| देवा, तुझ्या दर्शनासाठी मी आईला घेऊन येतो, असे म्हणून तो आपल्या घरात गेला तर काय, ते घरही भव्य वास्तूत परिवर्तित झालेले, आणि आपली माता एका मंचकावर पहुडलेली त्याने पाहिली. ।। ७६|| तिचे रूपही पूर्ण पालटून गेले होते. ती वस्त्रालंकारांनी नटलेली होती. तिने नाना अलंकारा, आभूषणे धारण केली होती. ॥७७॥ तेव्हा त्या बालकाने मातेस जागे केले आणि शिवदर्शनास चल असे म्हणून तिला उठविले. तेव्हा ती त्या सगळ्या चमत्काराकडे विस्मयित होऊन पाहू लागली. ।।७८।।


हृदयीं धरून दृढ बाळ ॥ शिवालया आली तात्काळ ॥ म्हणे धन्य तूं शिव दयाळ ॥ धन्य बाळ भक्त हा ॥७९॥ गोपदारा गेली राजगृहा धांवून ।। चंद्रसेना सांगे वर्तमान ॥ राव वेगें आला प्रीतीकरून ।। धरी चरण बाळकाचें ॥ ८० ॥ शंकराची अद्भुत करणी ।। राव आश्चर्य करूनि पाहे नयनीं ।। नागरिक जनांच्या श्रेणी ।। धांवती बाळ पाहावया ॥८१॥ दिगंतरीं गाजली हांक बहुत ।। बाळकासी पावला उमानाथ ।। अवंतीनगरा येती धांवत ।। जन अपार पाहावया ।।८२ ।। चंद्रसेन रायाप्रती ।। नृप अवनीचें सांगोनि पाठविती ॥ धन्य धन्य तुझी भक्ती ॥ गिरिजावर प्रसन्न तूतें ।॥८३॥ आम्ही टाकूनि द्वेष दुर्वासना ।। तुझ्या भेटीस येऊं चंद्रसेना ।। तो बाळ पाहूं नयना ।। कैलासराणा प्रसन्न ज्यासी ॥८४॥ ऐसें ऐकतां चंद्रसेन ।। प्रधानासमवेत बाहेर येऊन ।। सकळ रायांसी भेटून ॥ आला मिरवत घेऊनी ।।८५ ।। अवंतीनगरीची रचना ।। पाहतां आश्चर्य वाटे मना ।। सप्तपुरींत श्रेष्ठ जाणा ।। उज्जयिनी नाम तियेचें ॥ ८६ ॥

तिने मोठ्या कौतुकाने आपल्या बालकास पोटाशी धरले आणि ती लगबगीने शिव मंदिरात देवदर्शनास आली. हात जोडून आपल्या अपराधाची क्षमा मागत ती म्हणाली, “हे भोलेनाथा, खरंच तू धन्य आहेस. तुझी भक्ती करणारा हा माझा बाळही धन्य आहे”. ।। ७९ ।। त्यानंतर ती गवळण धावत धावत चंद्रसेन राजाकडे गेली. तिने राजास सारा वृत्तांत सांगितला. तेव्हा शिवभक्त राजा चंद्रसेन धावतच तिथे आला. ते मंदिर, ते शिवलिंग पाहून राजाने त्या बालकाचे पाय धरले. ॥८०॥ त्या बालकाच्या भक्तीने प्रसन्न झालेल्या महादेवांनी घडविलेला तो चमत्कार पाहून राजा विस्मित झाला. ही वार्ता तोवर नगरात पोहोचताच नगरजनांचे लोंढे ते मंदिर, तो चमत्कार पाहायला तिथे गोळा होऊ लागले. ||८१।। नगरातील एका बालभक्तास भगवान शिव प्रसन्न झाल्याची, तो चमत्कार घडल्याची वार्ता नगराबाहेरही पसरली. असंख्य लोक त्या नगरीतला तो दिव्य चमत्कार पाहायला धाव घेऊ लागले. ।।८२।।। ही वार्ता जेव्हा बाहेरच्या शत्रू राजांच्या कानावर गेली तेव्हा त्यांनाही मोठे आश्चर्य वाटले. ते राजाच्या शिवभक्तीची प्रशंसा करू लागले. हे राजा, तू धन्य आहेस. भगवान शिव तुझ्यावर प्रसन्न आहेत. ।। ८३|| इतकेच नाही तर आम्ही ते मंदिर, ते शिवलिंग आणि त्या बालभक्तास पाहू इच्छितो, परवानगी असावी, अशी चंद्रसेन राजास त्यांनी विनंती केली. ।।८४|| तेव्हा चंद्रसेन राजास मोठा आनंद झाला. तो स्वतः नगराबाहेर गेला आणि आपल्या शत्रू राजांना मित्र बनवून त्यांना ते मंदिर पाहायला घेऊन आला. ।।८५।। अवंती नगरीची ती सुंदर रचना पाहून सर्व राजांचे डोळे – दिपले. सप्त मोक्षपुऱ्यांतील प्रसिद्ध असलेल्या त्या नगरीचे नाव म्हणजेच उज्जयिनी. ।।८६।।


राजे सकळ कर जोडून ।। शिवमंदिरापुढे घालिती लोटांगण ।। त्या बाळकासी वंदून ।। आश्चर्य करिती सर्वही ॥८७॥ म्हणती जैं शिव प्रसन्न ।। तैं तृणकुटी होय सुवर्णसदन ।। शत्रु ते मित्र होऊन ।। वोळंगती सर्वस्वें ।।८८ ॥ गृहींच्या दासी सिद्धि होऊन ।। न मागतां पुरविती इच्छिलें पूर्ण ।। आंगणींचे वृक्ष कल्पतरु होऊन ॥ कल्पिलें फळ देती ते ॥८९॥ मुका होईल पंडित ॥ पांगुळ पवनापुढे धांवत ।। जन्मांध रत्नें पारखीत ।। मूढ अत्यंत होय वक्ता ॥९०॥ रंक-भणंगा भाग्य परम॥ तोचि होईल सार्वभौम ।। न करितां सायास दुर्गम ।। चिंतामणि येत हातां ॥ ९१ ॥ त्रिभुवनभरी कीर्ति होय ।। राजे समग्र वंदिती पाय ।। जेथे जेथें खणूं जाय ॥ तेथें तेथें निधानें सांपडती ॥९२॥ अभ्यास न करितां बहुवस ।। सांपडे वेदांचा सारांश ।। सकळ कळा येती हातास ।। उमाविलास भेटे जेव्हां ॥९३ ।। गोपति म्हणे गोरक्षबाळा ॥ तुजसी गोवाहन प्रसन्न झाला ॥ गो विप्र प्रतिपाळीं स्नेहाळा ॥ धन्य नृपराज चंद्रसेन ॥९४॥

ते भव्यदिव्य मंदिर, त्यातील शिवलिंग हे पाहून सर्व राजांना मोठा आनंद झाला. त्यांनी तिथे नतमस्तक होत दर्शन घेतले. तसेच जण त्या बालभक्तासही मोठ्या आदराने भेटू लागले. सर्वांनी त्याचे आणि त्याच्या शिवभक्तीचे कौतुक केले. ||८७|| तेव्हा ते म्हणाले, “हे राजा, खरेच हा बालक धन्य आहे. त्याच्या भक्तिस्तव देव प्रसन्न झाले. त्यांनी हे मंदिर आणि हा प्रासाद घडविला. खरंच तुम्ही दोघेही धन्य आहात”. अशा राजाचे कोणी शत्रू का होतील, ते तर त्याचे मित्रच होतील. ।।८८।। राजा, तुझ्यासारख्याच्या घरी तर सिद्धीही दासी होतील. तुझ्या दारात कल्पवृक्ष उगवतील आणि तुला हवे ते प्राप्त होईल. ।।८९।।। अरे त्या शिवकृपेने काय होणार नाही. मुका बोलू लागेल, अडाणी पंडित होईल, जो जन्मांध आहे तो रत्नपारखी होईल, मूढ विद्वान वक्ता होईल, शिवकृपेने हे सर्व काही होईल. ||१०||जो रंक आहे, त्याचा भाग्योदय होईल, कोणतेही सायास न करताही शिवकृपेने त्यास चिंतामणी लाभेल. ।।९१|| अवघ्या त्रिभुवनात अशा शिवभक्ताची कीतीं दुमदुमेल. भूलोकीचे सर्व राजे त्त्यास वश होतील. अशा भाग्यवंतास तो खणू जाईल तिथे द्रव्याचे साठे हाती लागतील. ।।९२|| त्यास विशेष अभ्यास न करता अल्प प्रयत्नातच वेदांचा अर्थ ज्ञात होईल. त्यास प्रत्यक्ष उमामहेश्वरांची दर्शन भेट घडेल. सर्व प्रकारची नाना कौशल्ये त्यास प्राप्त होतील. ।।९३।। एकीकडे चंद्रसेन राजास असे बोलल्यानंतर ते सर्व राजे त्या गोप बालकास म्हणाले की, “हे गोपनंदना, तुझे भाग्य अतिथोर आहे. तुला तो वृषभवाहन असलेला कैलासपती प्रसन्न झाला आहे. गो आणि ब्राह्मण ह्यांचे रक्षण करणारा या नगरीचा राजा चंद्रसेन हासुद्धा तुझ्यासारखाच धन्य आहे. “।।९४।।


यात्रा दाटली बहुत ।। सर्व राजे आश्चर्य करीत ।। तों तेथे प्रगटला हनुमंत ।। वायुसुत अंजनीप्रिय जो ॥९५॥ जो राघवचरणारविंदभ्रमर ॥ भूगर्भरत्नमानससंतापहर ।। वृत्रारिशत्रुजनकनगर ।। दहन मदनदमन जो ॥९६॥ द्रोणाचळउत्पाटन ।। ऊर्मिलाजीवनप्राणरक्षण ॥ ध्वजस्तंभीं बैसोन ।। पाळी तृतीय नंदन पृथेचा ॥ ९७ ॥ ऐसा प्रकटतां मारुती ।। समस्त क्षोणीपाळ चरणीं लागती ।। राघवप्रियकर बाळाप्रती ।। हृदयीं धरूनि उपदेशी ॥ ९८ ॥ शिवपंचाक्षरी मंत्र ।। उपदेशीत साक्षात रुद्र ।। न्यास मातृका ध्यानप्रकार ।। प्रदोष सोमवारव्रत सांगे ।।९९ ।। हनुमंतें मस्तकीं ठेविला हात ।। झाला चतुर्दशविद्यावंत ।। चतुःषष्टिकळा आकळीत ।। जैसा आमलक हस्तकीं ॥१००॥ त्याचें नाम श्रीकर ।। ठेविता झाला वायुकुमर ।। सकळ राव करिती जयजयकार ।। पुष्पें सुरवर वर्षती ॥१ ॥ यावरी अंजनीहृदयाब्जमिलिंद ।। श्रीकरास म्हणे तुज हो आनंद ।। तुझे आठवे पिढीस नंद ।।॥ जन्मेल गोपराज गोकुळीं ॥२॥ त्याचा पुत्र पीतवसन ।। होईल श्रीकृष्ण कंसदमन ।। शिशुपालांतक कौरवमर्दन ।। पांडवपालक गोविंद ॥ ३ ॥

याप्रकारे सर्व शिवभक्त हे त्या स्थानी गोळा झाले असताच आणखी एक दिव्य असा चमत्कार घडला. तिथे अचानक शिव रुद्रावतारी अंजनीपुत्र हनुमान हा अचानक प्रकट झाला. ।।९५।। सीतेच्या प्राणसख्याचे ताप हरण करणारा, इंद्रजिताच्या पित्याची लंकानगरी वहन करणारा, मवनाचे दमन करणाऱ्या श्री रामरायांच्या चरणांचा दास असलेला असा तो हनुमान. ।।९६|| ज्याने द्रोणागिरी आणून लक्ष्मणाच्या प्राणाचे रक्षण केले, ज्याने महाभारताच्या धर्मयुद्धात कुंतीच्या पुत्राच्या रथावरील ध्वजस्थानी बसून त्या अर्जुनाचे रक्षण केले. ||९७|| असा महापराक्रमी श्री हनुमान त्या स्थानी प्रकट होताच सर्व राजे, नगरवासी आणि त्या बालभक्ताने त्याचे पदवंदन केले. तेव्हा रामास प्रिय असलेल्या त्या रामभक्ताने शिवास प्रिय झालेल्या त्या गोपपुत्रास मोठ्या प्रेमाने आपल्या प्रेममिठीत घेतले. त्यास उपदेश केला. ।।९८।।जो स्वतःच शिवाचा रुद्रावतार होता त्या हनुमंताने त्या गोपपुत्रास शिवपंचाक्षरी मंत्र, न्यास, मातृका, ध्यान पद्धती, शिवाचे प्रदोष व्रत, शिवनाम महिमा ह्यासंदर्भात माहिती दिली.।।९९।। हनुमंताने त्या गोपपुत्राच्या मस्तकावर आपला वरदहस्त ठेवताच तो बालक चौदा विद्या आणि चौसष्ट कला ह्यात पारंगत झाला. ||१००|| इतकेच नाही तर प्रत्यक्ष हनुमंतानेच त्या बालकाचे ‘श्रीकर’ असे नाव ठेवले. तेव्हा त्याच नावाने सर्वांनी त्याचा मोठा जयजयकार केला. ||१०१|| तेव्हा तो अंजनी मातेचा बाळ अर्थात श्री हनुमान त्या श्रीकरास म्हणाला, “बा श्रीकरा, हे गोपनंदना, आता तुला हे ऐकून अत्यानंद होईल की, तुझ्या आठव्या पिढीत गवळ्याचा राजा नंद हा जन्मास येईल. ।।१०२|| त्याचा पुत्र हा साक्षात महाविष्णूंचा आठवा अवतार असेल. तोच कंस, शिशुपाल ह्यांचा वध करील. तर तोच पांडवांचा रक्षणकर्ता भगवान श्री गोपालकृष्ण असेल. ।।१०३।।


श्रीहरीच्या अनंत अवतारपंक्ती ।। मागें झाल्या पुढेही होती ।। जेवीं जपमाळेचे मणी परतोनि येती ।। अवतारस्थिति तैसीच ॥ १०४ ॥ कीं संवत्सर मास तिथि वार ।। तेचि परतती वारंवार ।। तैसा अवतार धरी श्रीधर ।। श्रीकरा सत्य जाण पां ॥१०५॥ ऐसें हरिकुळभूषण बोलून ॥ पावला तेथेंचि अंतर्धान ।। सर्व भूभुज म्हणती धन्य धन्य ।। सभाग्यपण श्रीकराचें ॥ १०६ ॥ ज्याचा श्रीगुरु हनुमंत ।। त्यासी काय न्यून पदार्थ ।। श्रीकर चंद्रसेन नृपनाथ ।। बोळवीत सर्व भूपांते ॥ १०७ ॥ वस्त्रे भूषणें देऊनी ।। बोळविलें पावलें स्वस्थानीं ।। मग सोमवार प्रदोष प्रीतीकरुनी ॥ श्रीकर चंद्रसेन आचरती ॥१०८॥ शिवरात्रि उत्साह करिती ।। याचकांचे आर्त पुरविती ॥ शिवलीलामृत श्रवण करिती ।। अंती शिवपदाप्रती पावले ॥१०९॥ हा अध्याय करितां पठण ।। संतति-संपत्ति-आयुष्यवर्धन ॥ शिवार्चनीं रत ज्याचें मन ।। विघ्नें भीति तयासी ।।११० ।। शिवलीलामृतग्रंथ वासरमणी ॥ देखोनि विकासती सज्जनकमलिनी ।। जीव-शिव चक्रवाकें दोनी ।। ऐक्या येती प्रीतीनें ॥१११॥

या सृष्टीचा जो पालक, चालक तो हे असे नाना अवतार घेतो आणि पुढेही घेणारच आहे. त्याचे हे भक्तरक्षणाचे कार्य अशा अवतारातूनच चालू असले त्या अवतारांचे तेच प्रयोजन असते. हे ईश्वराचे अवतार परत परत घडत असतात. ||१०४ || ज्याप्रमाणे वर्ष, मास, तिथी, नक्षत्रे ही पुन्हा पुन्हा येतात व जातात तसेच हे ईश्वराचे अवतार कार्य सतत चालू असते. हे बाल श्रीकरा, अरे तो श्रीहरी ह्या भक्तांच्या कारणेच अनेक अवतार घेत आला आहे आणि तो पुढे तुमच्याच कुळात पुढे जन्म घेईल.” ॥१०५।। हे आणि असे भाकित वर्तवून तो अंजनीचा पुत्र श्री हनुमान हा बोलता बोलता अंतर्धान पावला. तेव्हा त्या गोष्टीस साक्षीदार असलेले सर्व राजे आणि नगरजन श्रीकरास म्हणाले की, “तू खरोखरच धन्य आहेस.” ।।१०६।। खरंच ज्याला साक्षात हनुमानच गुरुस्थानी लाभला तो धन्यच नाही का? यानंतर तिथे जमलेल्या सर्व राजांचा उचित सन्मान करून चंद्रसेन राजाने त्यांना प्रेमपूर्वक निरोप दिला. ।।१०७॥वस्त्रालंकारांनी सर्वांना सन्मानित केल्यावर जो तो आनंदाने स्वस्थानी परत गेला. त्यानंतर त्या श्रीकराने आणि राजा चंद्रसेनाने भगवान शिवाच्या कृपाप्रसादासाठी सोमवार प्रदोष व्रताचे आचरण चालू केले. ||१०८|| त्या नगरीत महाशिवरात्रीचा उत्सव, शिवलीलामृताची पारायणे, शिव कीर्तने इत्यादी ह्यांचे मोठ्या श्रद्धेने श्रवण करीत तो राजा आणि श्रीकर हे पुढे शिवपदास जाते झाले. ।।१०९।। या अध्यायाचे पठण केले असता संतती, संपत्ती यांची वृद्धी होते. अशा शिवभक्ताचे मन शिवाराधनेत तल्लीन होते. त्यास कशाचेच भय राहात नाही. ।।११०।। या शिवलीलामृत ग्रंथरूपी सूर्यास पाहून सज्जनरूपी कमळे विकसित होतात. इथे जीव आणि शिव ह्यांचे मिलन होते. ।।१११।।


निंदक दुर्जन अभक्त ॥ ते अंधारी लपती दिवाभीत ।। शिवनिंदकांसी वैकुंठनाथ ।। महानरकांत नेऊनि घाली ॥११२॥ विष्णुनिंदक जे अपवित्र ॥ त्यांसी कुंभीपाकीं घाली त्रिनेत्र ।॥ एवं हरिहरनिंदकांसी सूर्यपुत्र ।। नाना प्रकारें जाच करी ॥११३॥ ब्रह्मानंदा यतिवर्या ।। श्रीभक्तकैलासाचल – निवासिया ।। श्रीधरवरदा मृडानीप्रिया ॥ तुझी लीला वदवीं तूं ॥११४॥ शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड ।। स्कंदपुराण ब्रह्मोत्तरखंड ।। परिसोत सज्जन अखंड ॥ चतुर्थाध्याय गोड हा ।।११५।।

।। श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु ।।

जे दुर्जन, अभक्त, निंदक आहेत ते उजेडास घाबरणाऱ्या घुबडासारखे लपून राहतात. जे शिवनिंदक आहेत त्यांना वैकुंठनाथ हा नरकात नेऊन घालतो. ।।११२।। जे महाविष्णूचे निंदक आहेत अशा लोकांना ब्रिनेत्रधारी भगवान शिव हे कुंभीपाकी नेऊन घालतात. अशाप्रकारे शिव आणि विष्णू निंदकास नाना प्रकारचे कष्ट भोगावे लागतात. ।।११३।। श्रीधर स्वामी म्हणतात की, हे ब्रह्मानंद यतिवर्या, भक्तिरूपी कैलासावर निवास करणाऱ्या, हे मृडानीच्या प्रियकरा, ही श्रीकराची रसाळ कथा तूच माझ्या मुखातून वदवून घेतली आहेस.।।११४।। स्कंदपुराणातील ब्रह्मोत्तर खंडातील हा चौथा शिवलीलामृताचा अध्याय इथे संपूर्ण होतो, त्याचे भक्तभाविक मोठ्या श्रद्धेने श्रवण करोत. ।।११५।।

।। श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु ।।


Shree Shivleelamrut Adhyay Pahila
Shree Shivleelamrut Adhyay Pahila
Shree Shivleelamrut Adhyay Dusara
Shree Shivleelamrut Adhyay Dusara
Shree Shivleelamrut Adhyay Tisara
Shree Shivleelamrut Adhyay Tisara

अधिक माहितीसाठी आमच्या सोशल मीडिया ला फॉलो करा.

मराठी रसिक या आमच्या इंस्टाग्राम अकाउंट ला लाईक करा सुब्स्क्राईब करा. येथे तुम्हाला संपूर्ण माहिती मराठी मध्ये मिळते.

Scroll to Top