Shree Shivleelamrut Adhyay Tisara (3) । श्री शिवलीलामृत अध्याय तिसरा (३)

Shree Shivleelamrut Adhyay Tisara

हा तिसरा अध्याय असून आपण आधीचे २ अध्याय वाचले नसतील तर अध्याय १ पासून सुरुवात करावी.

Shree Shivleelamrut Adhyay Pahila
Shree Shivleelamrut Adhyay Pahila
Shree Shivleelamrut Adhyay Dusara
Shree Shivleelamrut Adhyay Dusara

Shree Shivleelamrut Adhyay Tisara (Sar) । श्री शिवलीलामृत अध्याय तिसरा (सार)

शौनकादिकांना सुत पुढे म्हणाले ऐंका इक्ष्वाकुवंशी मित्रसहनाम चक्रवर्ती राजा होऊन गेला. तो एकदा जंगलात शिकारीला गेला असता त्याचे हातुन एका राक्षसाचा वध झाला. तेंव्हा त्याच्या भावांनी बंधु वधाचा सुड घेण्याचे ठरवून मनुष्यरूपाने राजाकडे आला व मी चांगला स्वयंपाकी आहे म्हणून कामाला राहिला. एके दिवशी राजाकडे वसिष्ठ ऋषी आले असता राजाने त्यांचा सत्कार करून भोजनास थांबविले. सुड घेण्यास हि संधी आहे म्हणून त्या राक्षसाने नरमांस शिजवून उत्तम स्वयंपाक केला व वशिष्ठासह सर्वांना वाढला वसिष्ठाना ही गोष्ट समजली. तत्क्षणी ते संतापून त्यांनी तूं निर्जन स्थानी राक्षस होऊन नरमांस भक्षण करशील असा शाप दिला. माझी काही चुक नसतां राजाही क्रोधाविष्ठ होऊन प्रतिशाप देण्यासाठी हातात पाणी घेतले. परंतु त्याची राणी दमयंतीने रोखले. नंतर राजाने आपल्या हातातले पाणी स्वतः त्याच्या पायावर टाकून घेतले त्यामुळे त्याचे पाय काळे झाले. पुढे त्याला कल्माषपाद नाव पडले. खरा प्रकार समजल्यावर वसिष्ठ शांत झाले व तू बारा वर्षांनी राक्षस योनितून मुक्त होशील असा उःशाप दिला. पुढे कल्माषपाद ऋषीशापे राक्षस होऊन वनात भटकू लागला त्याला एक ब्राह्मण जोडपे दिसले. त्यांनी ब्राह्मणास खाऊन टाकले त्यामुळे ब्राह्मण पत्नीने त्यास शाप दिला बारा वर्षांनी शाप मुक्त होऊन घरी जाशील पत्नी संग होताच मृत्यु पावशील. कालांतराने तो शापमुक्त होऊन घरी आला व स्त्रीयांना सर्व वृतांत सांगितला. त्यांना अपार दुःख झाले पुढे तो बेचैन होऊन नगर सोडले व वनांतरी भटकू लागला त्याची व गौतम ऋषीची भेट झाली तेंव्हा राजाने सर्व हकीकत सांगितली व त्यातून मुक्त होण्याचा मार्ग विचारू लागला. गौतमांनी राजास गोकर्ण क्षेत्रास जाण्यास सांगितले व त्या क्षेत्राची कथा सांगितली. रावणाने आत्मलिंग नेत असता मध्येच लघुशंका आली ते गुराखीरूपी गणेशाचे हाती दिले. त्यांनी ते वेळ लागला म्हणुन खाली ठेवले. काही केल्या उपटे ना तेच गोकर्णक्षेत्र होय पुढे ऋषींनी एक अत्यंत पापीणी स्त्रीची कथा सांगितली ती गोकर्णक्षेत्री आली तीला कशी उपासना घडली व ती पापी असुन मुक्त कशी झाली व शिवलोकी कशी प्राप्ती झाली. नंतर राजा गौतमऋषीच्या सांगण्यावरून गोकर्णास गेला व शिवउपासना करून पापमुक्त होऊन शिवलोकी प्राप्त झाला.

श्री शिवलीलामृत : अध्याय तिसरा

श्रीगणेशाय नमः ।। जय जय शिव मंगलधामा ।। निजजनहृदय आरामा। चराचरफलांकितद्रुमा ।। नामाअनामातीत तूं ॥१॥ इंदिरावरभगिनीमनरंजना ।। षडास्यजनका शफरीध्वजदहना ।। ब्रह्मानंदा भाललोचना ।। भवभंजना त्रिपुरांतका ॥ २ ॥ हे शिव सद्योजात वामघोरा ।। तत्पुरुषा ईशान ईश्वरा ।। अर्धनारीनटेश्वरा ।। गिरिजारंगा गिरीशा ।।३ ॥ गंगाधरा भोगिभूषणा ।। सर्वव्यापका अंधकमर्दना ।। परमातीता निरंजना ।। गुणत्रयविरहित तूं ॥४॥ हे पयः फेनधवल जगज्जीवन ॥ द्वितीयाध्यायीं कृपा करून ।। अगाध सुरस आख्यान ।। शिवरात्रिमहिमा वर्णविला ॥५॥ यावरी कैसी कथेची रचना ।। वदवीं पंचमुकुट पंचानना ।। शौनकादिकां मुनिजनां ।। सूत सांगे नैमिषारण्यां ॥६॥ इक्ष्वाकुवंशी महाराज ।। मित्रसहनामें भूभुज ।। वेदशास्त्रसंपन्न सतेज ।। दुसरा बिडौजा पृथ्वीवरी ॥७ ॥

श्री गणेश, देवी सरस्वती, कृपावंत श्री सद्‌गुरूनाथ आणि श्रीसांबसदाशिवास नमस्कार असो. हे मंगलधामा श्री शिवा, तुला नमन असो. तू निज भक्तांच्या हृदयी निवास करणारा, चराचर सृष्टीची फळे धारण करणारा वृक्षराज आहेस. तू नामातही आहेस आणि नामातीतही आहेस. ।।१।। तू विष्णूंची बहीण पार्वती तिचे मनोरंजन करणारा, कार्तिकेयाचा पिता आहेस. तू मदनास जाळले आहे, तू ब्रह्मानंद स्वरूप असून, तू त्रिनेत्रधारी आहेस. तू भवसागराच्या तापांचा नाश करणारा आणि त्रिपुराराराचा वध करणारा आहेस. ।।२।। हे शिवशंकरा, तू सद्योजात, वामदेव, अघोर, तत्पुरुष, ईशान अशा पंचमुखांच्या नावांनी ओळखला जातोस. तूच अर्धनारीनटेश्वर आहेस, तूच गिरीजेचा पती आणि कैलासावर निवास करणारा कैलासपती आहेस. ।।३।। तू तुझ्या मस्तकावर गंगा धारण केली आहेस, तुझ्या गळ्यात सर्वांचे हार आहेत, तूच अंधकासुराचा वध केला आहेस. तू सर्व परिमितीच्यापलीकडला, मलरहित आणि त्रिगुणमुक्त असा आहेस. ।।४।। तू दुधाच्या फेसासारखा धवल आहेस. तूच या सकल जिवांचे जीवन आहेस. हे देवा,तूच माझ्यावर कृपा करून मागच्या दुसऱ्या अध्यायात माझ्याकडून एक सुंदेर आख्यान बंदवून घेतलेस. ।।५।। हे पंचानना, यापुढचा हा तिसराअध्यायही सुंदर कथा सांगून तू माझ्या मुखाने वदवून घे. सूतांनी शौनकादिक ऋषींना जी कथा पुढे निवेदन केली ती अशी की ।।६।। इश्वाकू कुळातएक मित्रसह नावाचा वेदशास्त्रसंपन्न, पराक्रमी असा राजा होऊन गेला. तो म्हणजे जणूकाही पृथ्वीतलावरचा दुसरा इंद्रच होय. ।।७।।


पृतनावसनेंकरून ।। घातलें उर्वीसी पालाण ॥ प्रतापसूर्य उगवला पूर्ण ।। शत्रुभगणें मावळलीं ॥८॥ तो एकदां मृगयाव्याजेंकरून ॥ निघाला धुरंधर चमू घेऊन । घोरांदर प्रवेशला विपिन ।। तों सावर्जे चहुंकडून उठलीं ।।९ ।। व्याघ्र वृक रीस वनकेसरी ।। मृग मृगी वनगौ वानर वानरी ।। शशकजंबुकांच्या हारी ।। संहारीत नृपवर ।।१० ॥ चातक मयूर बदक ।। कस्तूरीकुरंग जवादिबिडालक ।। नकुल राजहंस चक्रवाक । पक्षी श्वापदें धांवती ॥११॥ नृपें मारिले जीव बहुवस ।। त्यांत एक मारिला राक्षस ।। महाभयानक तामस ।। गतप्राण होऊनि पडियेला ॥१२॥ त्याचा बंधु परम दारुण ।। तो लक्षिता झाला दुरोन ।। मनीं कापट्य कल्पून ।॥ म्हणे सूड घेईन बंधूचा ॥१३॥ मित्रसह पातला स्वनगरास ।। असुरें धरिला मानववेष ।। कृष्णवसनवेष्टित विशेष ।। दर्वी स्कंधीं घेऊनियां ॥१४॥ नृपासी भेटला येऊन ।। म्हणे मी सूपशास्त्रीं परम निपुण ।। अन्न शाका सुवास करिन ।। देखोन सूर नर भुलती ।।१५।। राये ठेविला पाक सदनी ।। त्यावरी पितृतिथी लक्षुनी ।। गुरु व शिष्ट घरा लागुनी ।। नृपश्रेष्ट्ये आणिला ।।१६।।

त्याने जणू आपल्या प्रचंड पराक्रमी सैन्याचे या पृथ्वीस पांघरूणच घातले होते. त्याचा प्रतापसूर्य असा काही चमकत होता की, त्यामुळे शत्रूरूपी नक्षत्रे ही जशी झाकोळून गेली होती. ।।८।। एकदा हा राजा शिकार करण्याच्या निमित्ताने आपली सेना घेऊन घनदाट अशा अरण्यात गेला. तेव्हा राजाची चाहूल लागताच वनातील असंख्य श्वापदे इतस्ततः धावू लागली. ।।९।। त्यातील वाघ, सिंह, लांडगे, अस्वले, हरीण, रानगायी, वानरे, ससे, कोल्हे जे जे म्हणून राजाच्या शिकारीच्या टप्प्यात आले त्यांची राजा शिकार करीत सुटला. ।।१०।। त्यावेळी वनात चातक, मोर, बगळे, कस्तुरीमृग, रानमांजरे, बोके, मुंगूस, राजहंस पक्षी असे प्राणी-पक्षी हे वाट दिसेल त्या दिशेने धावत सुटले. ।।११।। मित्रसह राजाने अनेक प्राण्यांची शिकार केली. त्यातच राजाच्या हातून एका भयानक अशा राक्षसाचाही वध झाला. ||१२|| त्या राक्षसाचा त्या राक्षसाचा भाऊ पण त्याच वनात होता. तो अत्यंत क्रूर होता. त्याने जेव्हा राजास आपल्या भावाचा वध करताना दुरून पाहिले, तेव्हा त्याने मनोमन निश्चय केला की, माझ्या भावाची हत्या करणाऱ्या राजाच्या या कृत्याचा सूड मी नक्कीच घेणार ||१३|| जेव्हा मित्रसह राजा आपल्या नगरीस परत आला तेव्हा तो राक्षसही मनुष्य वेश धारण करून राजाच्या मागोमाग राजाच्या नगरीत आला. त्याने अंगावर काळ्या रंगाची वस्त्रे परिधान केली आणि स्वैपाकाची साधने खांद्यावर घेऊन तो राजाकडे आला. ।।१४।। त्याने राजाची भेट घेतली आणि तो म्हणाला, “हे राजन, मी स्वैपाक कला निपुण आहे. मी तुला असे पदार्थ शिजवून खाऊ घालीन की ज्यामुळे देवदेवताही प्रसन्न होतील.” ।।१५।। त्याचे ते बोलणे ऐकून राजा खूश झाला. त्याने त्याची पाकगृहात आचारी म्हणून नेमणूक केली. एकदा असे घडले की, पितृ‌श्राद्धाच्या निमित्ताने राजाने वशिष्ठ गुरूंना खास पाचारण केले होते. ।।१६।।


भोजना आला अब्जजनंदन ॥ तों राक्षसें कापट्य स्मरून ।। शाकांत नरमांस शिजवून ।। ऋषीस आणून वाढिलें ॥१७॥ त्रिकालज्ञानी वसिष्ठमुनी ।। सकळ ऋषींमाजी शिरोमणी ।। कापट्य सकळ जाणुनी ।। मित्रसह शापिला ॥१८॥ म्हणे तूं वनीं होईं राक्षस ।। जेथें आहार न मिळे निःशेष ।। मी ब्राह्मण मज नरमांस ।। वाढिलें कैसें पापिया ॥१९॥ राव म्हणे मी नेणें सर्वथा ।। बोलावा सूपशास्त्रीं जाणता ।। तंव तो पळाला क्षण न लागतां ।। गुप्तरूपें वना आपुल्या ॥२०॥ राव कोपला दारुण ।। मज शापिलें काय कारण । मीही तुज शापीन म्हणोन ॥ उदक करीं घेतलें ॥२१॥ तंव रायाची पट्टराणी ।। मदयंती नामें पुण्यखाणी ।। रूपें केवळ लावण्यहरिणी ।। चातुर्य उपमे जेवीं शारदा ॥२२॥ मदयंती म्हणे राया ।। दूरदृष्टीं पाहें विचारूनियां ॥ शिष्यें गुरूसी शापावया ।। अधिकार नाहीं सर्वथा ।।२३।। गुरूसी शाप देतां निर्धारीं ।॥ आपण नरक भोगावें कल्पवरी ।। राव म्हणे चतुर सुंदरी ।। बोललीस साच तें ॥२४।।

ज्यावेळी वशिष्ठ मुनी राजाकडे त्या पितृश्राद्धाच्या निमित्ताने भोजनास आले, तेव्हा या नव्या आचाऱ्याने ती संधी साधून मुनीवरांना भोजनपात्रात नरमांस शिजवून ते भाजीतून वाढले. ||१७|| पण झाले असे की, वशिष्ठ मुनी हे त्रिकालज्ञानी असल्याने त्यांना आपल्या भोजनपात्रात नरमांस शिजवून वाढलेले आहे, ही गोष्ट लक्षात आली. तेव्हा अत्यंत क्रोधित झालेल्या वशिष्ठ मुनींनी राजा मित्रसह यास शाप देत म्हटले, ।।१८।।” हे राजन, अरे मी ब्राह्मण, तू मला भोजनास बोलावून माझ्या पानात नरमांस वाढलेस? हे कृत्य तू कसे केलेस? मी तुला शाप देतो की, तू जिथे अन्नाचा कणही मिळणार नाही अशा वनात राक्षस होऊन राहशील”. ।।१९।। तेव्हा विनम्रभावाने राजा म्हणाला, “क्षमा असावी मुनीवर, पण मला याची जराही कल्पना नाहीय. हे कृत्य त्या नव्या आचाऱ्याचे असणार. थांबा, मी त्यास बोलावतो”. पण इकडे राजा असे म्हणेपर्यंत तो राक्षस दूर वनात पळून गेला. ।।२०।। राजास ही वार्ता समजली, आपला त्यात कसलाच अपराध नसताना मुनीवरांनी आपल्याला तो तसा शाप द्यावा ह्याचा राजास मोठा राग आला. मी निरपराध असताना मला का शाप द्यावा म्हणून मीही तुम्हास शाप देतो, असे म्हणून राजा हा वशिष्ठ मुर्नीना शाप देण्यास तयार झाला. ।।२१।। तेव्हा रूप, चातुर्य आणि गुणवंत अशा राणीने पुढे येत राजास त्याचा क्रोध आवरण्यास सांगितले. ।।२२।। राणी मदयंती राजास म्हणाली, “महाराज, तुम्ही जरा दूर दृष्टीने विचार करा. तुम्ही तुमच्या गुरूस असे शाप देणे हे उचित नाही, ते धर्मास अनुसरून नाही. गुरूला शाप देण्याचा शिष्यास थोडाही अधिकार असत नाही. ।।२३।। उलट जो कोणी अविचाराने प्रत्यक्ष गुरूला शाप देतो त्यास कल्पांतापर्यंत नरकवास भोगावा लागतो.” तेव्हा थोडा विचार करताच राजास ती गोष्ट पटली. ।।२४।।


म्हणे हैं उदक खालीं टाकूं जरी ।। तरी पीक न पिके दग्ध होय धरित्री ।। मग आपुल्याचि प्रपदांवरी ।। जल टाकी मित्रसक ॥ २५ ॥ तो जानुपर्यंत चरण ॥ दग्ध झाले कृष्णवर्ण ॥ कुष्ठ भरला मग तेथून ।। कल्माषपाद नाम त्याचें ॥ २६ ॥ वसिष्ठं जाणोनि वृत्तांत ।। रायासी उःशाप देत ॥ म्हणे द्वादशवर्षी होसील मुक्त ॥ येसी स्वस्थाना आपुल्या ॥२७॥ गुरु पावला अंतर्धान ॥ मग कल्माषपाद राक्षस होऊन ॥ क्षुधाकांत निशिदिन ।। वनीं भक्षी जीव सर्व ॥२८॥ परम भयानक असुर । विशाळ देह कपाळीं शेंदुर ।। विक्राळ वदन बाहेर शुभ्र ।। दंतदाढा वाढलिया ॥२९॥ जीव भक्षिले आसमास ।। वनीं हिंडतां तो राक्षस ।। एक ब्राह्मणकुमर डोळस ।। द्वादश वर्षी देखिला ॥३०॥ सर्वे त्याची ललना चिमणी ।। दोधें क्रीडती कौतुकें वनीं ।। तंव तो ब्राह्मणपुत्र राक्षसें धरूनि ॥ भक्षावया सिद्ध झाला ॥३१ ॥

तेव्हा राजाने गुरूंना शाप देण्यासाठी हातात जे उदक घेतले होते ते कुठे टाकायचे असा त्यास प्रश्न पडला, कारण ते पाणी जमिनीवर टाकले तर जामिनोत पिके घेणार नाहीत. तेव्हा राजाने ते पाणी शेवटी स्वतःच्या पायांवर टाकले. ||२५|| त्याचा परिणाम असा झाला की, राजाचे दोन्ही पाय जळाले आणि त्यावरूनच त्या राजाचे दुसरे नाव कल्माषपादा’ असे पडले. ॥२६॥ तोवर इकडे वसिष्ठांना जेव्हा हे समजले की, ह्यात खरोच्चरच राजाचा कोणताच दोष नाही तर हे कृत्य त्या राक्षसाचे आहे. त्याने भावाच्या सुडासाठी हे कृत्य केले आहे. तेव्हा वसिष्ठांनी राजास उःशाप विला, “हे राजा, बारा वर्षाच्या कालावधीनंतर तू शापमुक्त होऊन पुन्हा तुझ्या पहिल्या रूपात परत येशील.” ||२७|| हा असा उःशाप देऊन वसिष्ठ मुनी अंतर्धान पावले. दुसऱ्याच क्षणी तो मित्रसह राजा हा एका घोर रानावनात राक्षस होऊन पडला, त्यास भूक भागविण्यासाठी वन्य पशूप्राणी ह्यांचे भक्षण करण्याची वेळ आली. ।॥२८॥ राजा मित्सत्राह हा एक अत्यंत भयानक असा राक्षस बनला होता. त्याचा तो विशाल देह, शेंदूरचर्चित कपाळ, ते अक्राळ-विक्राळ तोंड ते दात, भयंकर दाढा ह्यामुळे तो फारच भेसूर दिसत होता. ।। २९ ।। तो वनात अनेक प्राण्यांची हत्या करून त्याचे मांस भक्षण करून रक्त पिऊन वनात फिरत असे. राजा राक्षस रूपात असाच वनात फिरत असताना त्याने एके दिवशी एका बारा वर्षांच्या ब्राह्मण पुत्रास त्या वनात पाहिले. ।।३०।। त्या ब्राह्मण कुमाराबरोबरच त्याची एक नवीनच लग्न झालेली पत्नी होती. ते दोघे त्या वनात आनंदाने विहार करीत होते. तोच तो राक्षस त्यांच्यापुढे आला आणि त्याने त्या ब्राह्मण पुत्रास आपले भक्ष्य बनविण्यासाठी पकडले आणि तो त्यास खाण्यास तयार झाला. ।।३१।।


तंव त्याची वधू काकुळती येत ॥ अरे तूं मित्रसह राजा पुण्यवंत ॥ गोब्राह्मणप्रतिपाळक सत्य ।। माझा कांत मारूं नको ॥३२॥ गडबडां लोळे सुंदरी ॥ करुणा भाकी पदर पसरी ।। सवेंचि जाऊनि चरण धरी ।। सोडीं झडकरी पति माझा ॥ ३३ ॥ पतीस भक्षू नको राजेंद्रा ।। महत्पाप घेऊं नको एकसरा ।। स्वर्गमार्ग तरी चतुरा ।। कैसा पावसी अंतकाळीं ॥ ३४॥ ऐसी करुणा भाकितां कामिनी ।। निर्दयें भक्षिला तेच क्षणीं । अस्थिपंजर टाकूनि ॥ तियेपुढें दीधला ॥ ३५ ॥ तंव ती दुःखेंकरूनी ।। आक्रोशें कपाळ पिटी धरणीं ।। मृत्तिका घेऊनि घाली वदनीं ।। कोण वनीं सांवरी तीतें ॥ ३६ ॥ मग तिनें शाप दिधला रायातें ।। जो अलोट विधिहरिहरांतें ।॥ म्हणे मदयंतीसंगसुरतें ।। प्राण जाईल तेचि क्षणीं ॥३७ ॥ कोणे एके स्त्रीचा संगसोहळा ।। तुज न घडो रे चांडाळा ।। ऐसा शाप वदोनि ते वेळां ॥ केल्या गोळा अस्थि पतीच्या ।। ३८ ।। तात्काळ प्रवेशली अग्नी ।। इकडे द्वादशवर्षी शापमुक्त होऊनी ।। रावस्वनगरा येउनी ।। वर्तमान सांगे स्रियेशी ।।३९।।

तेव्हा त्या विप्राची पत्नी ही मोठ्या काकुळतीने त्या राक्षसास म्हणाली, “अरे मित्रसह राजा, अरे तू गो-ब्राह्मणांचा, प्रजेचा रक्षणकर्ता आहेस. तू पुण्यवान आहेस. तू माझ्या पतीस मारू नकोस.” ।।३२।। पतीच्या प्राणाची भीक मागत ती तरुणी त्या राक्षसरूपी राजासमोर पदर पसरून, राजाचे पाय धरून पतीच्या प्राणाची भीक मागू लागली. त्यास सोडण्याची विनंती करू लागली. ।।३३।। ती राजास म्हणाली, “हे राजन, तू माझ्या पतीस मारू नकोस, त्याचे भक्ष्य करू नकोस, मोठ्या पापाचा धनी होऊ नकोस. नाहीतर तुला अंतकाली स्वर्गप्राप्ती होणार नाही.” ।।३४।॥ एकीकडे ती विप्रपत्नी राजास अशी विनवणी करीत असताना तिकडे मात्र राक्षसरूपी राजाने मोठ्या निर्दयपणे त्या ब्राह्मणपुत्रास कच्चे खाल्ले आणि त्याची हाडे त्या पतिव्रते समोर टाकली.।।३५।। तेव्हा ते दृश्य पाहून ती विप्र पत्नी अत्यंत दुःखी झाली. तोंडात माती घालुन पती साठी विलाप करू लागली. या वनात तिला सावरणारे कोणीच नव्हते.।।३६।। रडत रडत तिने राजास शाप दिला की, हे राजा, तू जेव्हा तुझ्या पत्नीशी संग करायला जाशील तेव्हा, तुझा मृत्यू होईल॥३७॥ ते पापी, दुराचारी अधमी राजा तुला कोणत्याच स्त्रीचा संग घडणार नाही, असा शाप देत रडत रडत तिने आपल्या पतीच्या अस्थी गोळा केल्या. ।।३८।। तिने त्या अस्थींनाच अग्नी देऊन त्यात ती सती गेली. पुढे असाच त्या शाप वाणीचा बारा वर्षांचा काळ पूर्ण होताच राजा शापमुक्त होऊन पुन्हा मित्रसह राजाच्या रूपात आपल्या नगरीत परत आला. त्याने मोठ्या दुःखित अंत:करणाने ती घटना आणि तो नवा शाप आपल्या मदयंती राणीस सांगितला. ।।३९।।


येरी कपाळ पिटी आक्रोशेंकरून ॥ म्हणे झालें वंशखंडन ॥ पतीसी म्हणे ब्रह्मचर्य धरून ॥ प्राण आपुला रक्षीं कां ।।४० ॥ अनिवार अत्यंत मन ।। न करीं कोणे स्त्रियेसीं संभाषण ।। खदिरांगाराची सेज आजपासून ।। झाली तुजलागीं जाण पां ॥४१ ।। परम तळमळी राजेंद्र ।। जैसा सांपळां कोंडिला व्याघ्र ।। कीं महाभुजंगाचे दंत समग्र ।। पाडोनि गारुडी दीन करी ॥४२ ।। कीं नासिकीं वेसण घालून ।। महावृषभ करिती दीन ।। कीं वनीं निरंकुश वारण ।। धरूनि क्षीण करिती मग ॥ ४३ ॥ तैसा कल्माषपाद भूप ।। होऊनि राहिला दीनरूप ।। पुढें प्रकाशावया कुळदीप ।। आपण धर्मशास्त्र पाहातसे ।।४४ ।। तेथींचें पाहोनि प्रमाण ।। वसिष्ठं मदयंतीस भोग देऊन ।। अमोघ वीर्य पडतां पूर्ण ।। दिव्य पुत्र जाहला ।।४५ ।। तेणें पुढें वंश चालिला ।। असो तो राव मृगयेसी निघाला ।। यथारण्य तथा गृह वाटे नृपाला ।। भोग त्यजिले सर्वही ।।४६ ।। मनांत मनोजविकार उठत ।। विवेकांकुशें कामइभ आवरीत ।। म्हणे स्त्रीस वैधव्य मज मृत्य ।। तें कर्म सहसा न करावें ।॥४७ ।।

तेव्हा राणी आपले कपाळ बडवून घेत आता आपलासा वंशच बुडाला असे म्हणून अपार शोक करू लागली. आता राजापुढेही केवळ ब्रह्मचर्यपणाचे पालन करून आपला जीव वाचविण्याशिवाय अन्य उपायच राहिला नाही. ॥४०॥ यामुळे राजाचे मन अत्यंत कष्टी झाले. तो कोणाच स्त्रीशी बोलेनासा झाला. त्याची शैय्या ही आता खंदिरागाची झाली. ।। ४१॥ एखांद्या वाघास पिंजऱ्यात कोंडावे, सापाचे दात काढावेत, त्यास गारुडयाने खेळवावे तशी राजाची अत्यंत केविलवाणी अवस्था झाली. ॥४२॥ भल्यामोठ्या बैलास नाकी वेसण घालावी, उन्मत्त गजराजास अंकुशाच्या धाकाने गलितगात्र करावे, अगदी तशीच त्या राजाची अवस्था झाली. ॥४३॥ बिचाऱ्या दुर्देवी कल्माषपाद राजा मोठा दीन, क्षीण झाला. त्याला आपल्या वंश विस्ताराची चिंता लागली. तो आपल्या हातून घडलेल्या पापाचे परिमार्जन व्हावे म्हणून धर्मशास्याचा आधार शोधू लागला. ।॥४४॥ राजा मित्रसहचा हा विचित्र पेचप्रसंग जेव्हा वसिष्ठ ऋषींना समजला, तेव्हा त्यांनी राणी मदयंती हीस भोग दिला. तेव्हा त्या ऋषीच्या अमोघ दिव्य अशा वीर्यापासून राणीस एक पुत्र झाला. ॥॥४५॥ त्या पुत्राने पुढे मित्रसह राजाचा वंश पुढे चालविला. राजाचे मन तर कशातच लागत नव्हते. त्याला आता राजवाडा आणि वन सारखेच होते. त्याने सर्व सुखांचा त्याग केला होता. ॥॥४६॥ राजाच्या मनात जेव्हा जेव्हा काम विकार जागा व्हायचा तेव्हा त्यान तो विवेकाचा अंकुश टोचून वठणीवर आणावा लागे. ही कृती करताना राजास पत्नीचे सौभाग्य आणि स्वतःचा जीव वाचवताना अत्यंत मानसिक यातना सहन कराव्या लागत होत्या. ॥४७।।


आपुली कर्मगती गहन ।। प्राक्तन विचित्र दारुण ।। देवावरी काय बोल ठेवून ।। भोगिल्याविण न सुटेचि ।।४८ ।। ऐसा राव उदासयुक्त ।। वनीं हिंडतां मागें पाहत ।। तों पिशाच भयानक अत्यंत ।। रायापाठीं उभें सदा ।।४९ ।। दांपत्ये पूर्वी मारिलीं ।। ती ब्रह्महत्या पाठीसी लागली ।। राजा तीर्थे हिंडतां सकळी ॥ परी कदाकाळी न सोडी ॥ ५० ॥ न सोडी स्वप्नीं जागृतींत ।। महाविक्राळ दांत करकरां खात ।। रायें व्रतें केलीं बहुत ।। दान देत बहुसाल ।।५१ ।। ऐसा हिंडतां राव भागला ।। मिथुलानगरासमीप आला ।। वनश्री देखतां आनंदला ।। परी ब्रह्महत्या पाठीसी उभी ॥५२॥ वृक्ष लागले बहुत ।। आम्रवृक्ष फळभारें डोलत ।। पोफळी रातांजन विराजित ।। केळी नारळी खर्जुरिया ॥५३॥ चंपक जाई जुई मालती ।। मोगरे पुन्नागराज शेवंती ।। मलयागर कृष्णागर जाती ॥ जपा करवीर कोविदार ॥५४॥ वड पिंपळ औदुंबर ।। पारिजातक बकुळ देवदार ।। कपित्थ बिल्व अंजीर ।। अर्जुन पिचुमंद कदंब ते ॥५५।। ऐसिया वनामाजी नृपती ।। एक क्षण पावला विश्रांती ।। परी ते पाठीसी पापमती ।। ब्रह्महत्या उभी असे ।।५६ ।।

पण स्वतःच्याच प्राक्तनापुढे राजा लाचार होता. कर्माची गती त्यास खेळवत होती. आता देव किंवा दैव ह्यांना बोल न लावता प्राप्त भोग हे भोगण्याशिवाय राजाकडे कोणताच अन्य पर्याय नव्हता. ।।४८ ।। एके दिवशी असाच दुःखीकष्टी राजा हा शिकारीच्या निमित्ताने वनात गेला. तेव्हा राजास त्या वनात आपल्या मागे एक अत्यंत भयानक असे पिशाच उभे राहिलेले दिसले. ।।४९।। राजाच्या हातून मागे जी विप्रकुमार आणि स्त्री ह्यांची हत्या झाली होती, तीच ब्रह्महत्या आता त्याच्या मागे पिशाचायाच्या रूपाने उभी राहिली होती. त्यापासून सुटका व्हावी म्हणून राजाने अनेक तीर्थयात्रा केल्या, पण तरीही ती ब्रह्महत्या काही त्याची पाठ सोडत नव्हती. ।।५० ।। रात्री स्वप्नात असताना किंवा दिवसा जागेपणीही ती ब्रह्महत्या ते अक्राळविक्राळ रूप घेऊन सदैव राजाच्या मागे-पुढेच उभी असे. त्यापासून जिवाची सुटका व्हावी म्हणून राजाने अनेक व्रतवैकल्ये केली. दानधर्म केला. ह्यात अनेक वर्षांचा काळ लोटून गेला. ।।५१।। एकदा या आणि अशाच प्रयत्नांच्या भटकंती काळात राजाचे अचानकपणे मिथिला नावाच्या नगरीस येणे झाले. तेथील सुंदर वनराई पाहून राजाच्या मनास थोडे बरे वाटले. पण तिथेही ती ब्रह्महत्या त्याच्या पाठीस उभी होतीच. ।।५२।। त्या रम्य परिसरात नारळ, पोफळी, केळी, खजूर आणि आंबा ह्या सारखे अनेक वृक्ष बहरलेले, फुललेले होते. ।।५३।। तसेच त्या भागात जाई, जुई, चाफा, शेवंती, मोगरा, चंदन, जास्वंदी, कण्हेर ह्यासारखी फुलझाडेही फुललेली होती. त्यांनी तो परिसर रंगीत अन् सुगंधित झालेला होता. ।।५४।। वड, पिंपळ, उंबर, पारिजातक, बकूळ, देवदार, बेल, कवठ, अंजीर ह्यासारखी झाडेही होती. ।। ५५।। त्या रम्य आणि फळाफुलांनी समृद्ध असलेल्या वनात राजाने थोडीशी विश्रांती घेतली. तिथेही ती ब्रह्महत्या सावलीसारखी त्याच्याबरोबर होतीच. ।।५६।।


तो उगवला भाग्यवासरमणी ।। कीं निधान जोडे रंकालागुनी ।। कीं क्षुधितापुढें उचंबळोनी ।। क्षीराब्धि जैसा पातला ॥५७ ।। कीं मरतियाच्या मुखांत ।। अकस्मात घातले अमृत ।। कीं चिंताग्रस्तासी प्राप्त ।। चिंतामणी जाहला ।॥ ५८ ॥ तैसा तापसियांमाजी मुकुटमणी ।। शिष्यमांदी सर्वे घेऊनि ।। महाराज तपस्वी गौतममुनी ।। तये स्थानीं पातला ॥५९॥ रायें घातलें लोटांगण ।। दाटला अष्टभार्वेकरून ।। उभा ठाकला कर जोडून ।। करी स्तवन प्रीतीनें ।। ६० ।। सहज होतां संतदर्शन ।। पापें संहरती संपूर्ण ।। तूं विलोकिसी जरी कृपा करून ॥ तरी रंक सहस्रनयन होय ॥ ६१ ॥ यावरी तो महाराज गौतम ।। कल्माषपादा पुसे कुशलक्षेम ।। राज्य राष्ट्रज प्रजा अमात्य परम ॥ सुखेंकरून नांदती कीं ॥६२॥ ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र ।। स्वधर्म आचरती कीं समग्र ।। पशु सेवक पुत्र कलत्र ।। समस्त सुखरूप आहेत कीं ।। ६३ ।। राव म्हणे आपुले कृपेंकरून ।। समस्त आहेत क्षेमकल्याण ।। परंतु आलासी वाटते दुरून ।। आनंदघन दिसतोसी ॥ ६४ ॥ तुझ्या दर्शनें मज वाटे सत्वर ।। ब्रह्महत्या दूर होईल समग्र ।। मग पूर्वकर्म आपुलें दुस्तर ॥ ऋषीप्रती निवेदिलें ॥६५।।

तोच असे घडले की, अचानक भाग्योदय व्हावा, निर्धनास अपार द्रव्य लाभावे, भुकेल्या जिवाच्या समोर क्षीरसागर यावाः ।।५६।। मृत्युपंथात लागलेल्या जिवाचे तोंडात कोणीतरी अमृताची धार धरावी, चिंताग्रस्त माणसाला अचानक चिंतामणी सापडावा, ।।५७|| त्याप्रमाणे त्या रम्य परिसरात राजास तपस्वींचे मुकुटमणी असे जे गौतम ऋषी यांचे परम भाग्याने दर्शन झाले. ते आपल्या काही शिष्य परिवारासह नेमके त्याच भागात आले होते. ।।५९।। गौतम ऋषींना सन्मुख पाहताच राजा त्यांच्याकडे धावला त्याने त्यांचे चरण वंदन केले, हात जोडून त्यांना नम्र अभिवादन केले आणि राजा त्यांची स्तुती करीत उभा राहिला. ।।६०।। साधू, संत आणि सत्पुरुषांच्या दर्शनाचा हाच प्रभाव आहे. त्यांच्या दर्शनाने सर्व पापे नष्ट होतात त्यांच्या एका कृपाकटाक्षानेच अगदी रंकाचाही राव होतो. ।।६१।। तेव्हा चरणांवर नतमस्तक झालेल्या राजास गौतम ऋर्थीनी मोठ्या प्रेमाने विचारले, “राजन, तुझ्या राज्यात सारे मंगल कुशल आहे ना?” ।।६२।। राजा, तुझ्या राज्यात विप्र, क्षत्रीय, वैश्य, शूद्र सारेजण त्यांच्या त्यांच्या स्वधर्माप्रमाणे आचरण करीत आहेत ना? तू तुझे पुत्र, राणी, प्रजा हे सारे सुखी आहेत ना? ।।६३|| तेव्हा मोठ्या विनम्रतेने राजा त्यांना म्हणाला, ऋषिवर, आपल्या कृपाप्रसादाने सर्व काही क्षेमकुशल आहे. मुनिवर, आपण फार दूरचा प्रवास करून आलेले आहात, असे दिसतेय. तरीही आपले दिव्य दर्शन हे नक्कीच सुखकारक आहे. ।।६४।। महाराज, मला असा विश्वास वाटतोय की, आपल्या दर्शनाने, कृपाप्रसादाने माझ्याही मागे लागलेली ब्रह्महत्या नक्कीच दूर होईल, असे माणून राजाने आपला सारा पूर्व इतिहास गौतम ऋषींना सांगितला. ।।६५।।


गौतम म्हणे परम पवित्र ॥ भूकैलास गोकर्णक्षेत्र ॥ तेथूनि मी आलो अपार ।। महिमा तेथींचा न वर्णवे ।।६६ ।। ॐकाररूपे कैलासनाथ ।। भवानीसहित तेथें नांदत ॥ सुर असुर किन्नर सेवीत ।। अर्थमात्रापीठ जें ॥६७॥ त्या गोकर्णीचे शिवदर्शन ।। ब्रह्मादिकां दुर्लभ जाण ।। तेथें इंदिरेसहित जनार्दन ।। तप गहन आचरत ॥ ६८ ॥ कोटिसूर्याची प्रभा ।। मृडानीसहित शिव उभा ।। केवल्यगर्भीचा पूर्ण गाभा ।। तेथींची शोभा न वर्णवे ॥ ६९ ॥ इंद्र सनकादिक ब्रह्मपुत्र ।। तेथेचि वसती अहोरात्र ।। जेथींचे पाषाण तरुवर ।। समग्र निर्जर अवतरले ॥ ७० ॥ सत्यवतीहृदयरत्न ।। जेथें करी अनुष्ठान ।। वसिष्ठ भृगु जामदग्य ।। गोकर्णक्षेत्रीं सदा वसती ।।७१ ।। पहावया मृडानीनायक ।। मंडपघसणी होतसे देख ।। नारद तुंबरु गायक ॥ जेथें गाती शिवलीला ।। ७२ ।। गोकर्णाभोंवतें समग्र ।। उभे अखंड देवांचें भार ।। मुखें गर्जती शिव हर हर ।। आनंद थोर होतसे ॥ ७३ ॥ ऋषि करिती वेदघोष ।। अष्टनायिकांचें नृत्य विशेष ।। किन्नर गंधर्व गायक सुरस ।। तोषविती महेशातें ।॥७४॥ तें अति उत्तम स्थान ॥ तेजोमय प्रकाश गहन ।। नाना वृक्ष लागले सघन ।। कैलासभुवन प्रत्यक्ष ।।७५ ।।

त्यावर गौतम ऋषी राजास म्हणाले, हे राजा, मी नुकताच भूलोकीच्या कैलास नगरीस जाऊन आलो आहे. ते स्थान इतके पवित्र आहे की, त्याचा महिमा वर्णन करता येणार नाही. ।। ६६।। कारण हे राजा, ॐ कार रूपाने तिथे साक्षात श्री आदिनाथ हे पार्वतीसह निवास करतात. ते स्थान म्हणजे अर्थमात्रापीठ आहे. तिथे देवदेवता, यक्ष, किन्नर, गण, गंधर्व आदी त्या देवतेची नित्य सेवा करतात. ।। ६७|| त्या स्थानाचे नाव ‘गोकर्ण महाबळेश्वर’ असे असून, तेथील शिवाचे दर्शन हे ब्रह्मादिकासही दुर्मीळ असे आहे तिथे विष्णूसुद्धा लक्ष्मीसह घोर तपश्चर्या करीत आहेत. ।।६८।। या क्षेत्रीच्या शिवलिंगात कोटी सूर्याची प्रभाही कमी पडेल अदसे भगवान शिव हे देवी पार्वतीसह त्या लिंगस्थानी विराजमान आहेत. तेथील दिव्यशोभा ही अवर्णनीय अशी आहे. ।।६९।। तिथे इंद्र, ब्रह्मा, मरिची, सनकादिक देवता या रात्रंदिन निवास करून आहेत. इथले वृक्ष, लता, पाषाण हेही देवतास्वरूप आहेत. ।।७०।। नारद, व्यास, भृगू, वशिष्ठ, जमदग्नी ह्यांच्यासारखे ऋषिवर या क्षेत्री बास करून आहेत ।।७१।। येथील शिव भवानीच्या दर्शनासाठी अनेकांची विलक्षण दाटी झालेली आहे. इथे नारद, तुंबर, गंधर्व हे नित्य शिवलीलेचे मधुर गायन करीत असतात. ।।७२।। गोकर्ण नगरीच्या भोवती देवतांचे अनेक समूह हे अविरत उभे आहेत, सर्वांच्या मुखी तेच एक शिव शिव असे मंगलकारक नाम आहे. ।।७३।। इथे ऋषिजन सतत वेदाचे पठण करीत असतात, अष्टनायिका नृत्यसेवा सादर करतात. तर किन्नर, गंधर्व हे इथे शिवचरणी गायन सेवेची प्रस्तुती करतात. ।।७४।। हे एक अत्यंत पवित्र असे स्थान असून, ते दिव्य अशा तेजाने झळाळते आहे. हे स्थान म्हणजे भगवान शिवांचे भूलोकीचे प्रति कैलास आहे.।।७५।।


शुभ्र सिंहासन लखलखित ।। चारी द्वारें मणिमयखचित ।। ऐरावतारूढ अमरनाथ ।। पूर्वद्वारी तिष्ठतसे ॥७६ ।। दक्षिणेसी रक्षी सूर्यनंदन ।। पश्चिमेसी वारुणीरमण ।। उत्तरेसी वैश्रवण ।। प्राणमित्र शिवाचा ।। ७७ ।। कर्पूरगौर भवानीसहित ।। घवघवीत तेजें विराजित । भूकैलास साक्षात ॥ माहेर संत साधकांचें ॥ ७८ ॥ त्या मूर्तीचें करावें ध्यान ।। त्याभोंवतें महासिद्धीचे पूजन ।। त्याभोंवतें कात्यायनी आवरण ।। अष्टभैरव पूजिजे ॥ ७९ ॥ द्वादश मित्र एकादश रुद्र ।। तेथेंचि वसती अहोरात्र ।। अष्टवसु दिक्पाल समग्र ।। जोडोनि कर उभे तेथें ।॥ ८० ॥ अष्टसिद्धि नवनिधि कर जोडुनी ।। अखंड आराधिती पिनाकपाणी ।। रायासी म्हणे गौतममुनी ।। मीही वसतों सदा तेथें ।॥ ८१ ॥ वरकड क्षेत्रीं लक्ष वरुर्षे जाण ।। तप आचरला निर्वाण ।। गोकर्णी एक दिन ।। होय प्रसन्न सदाशिव ॥ ८२ ॥ अमावास्या संक्रांति सोमवार ।। प्रदोष पर्वकाळ शिववासर ।। समुद्रस्नान करितां समग्र ।। फळ होय सकळ तीर्थांचें ॥८३॥ रावण कुंभकर्ण बिभीषण ।। यांहीं पूर्वी केलें तेथे अनुष्ठान ।। तें निर्वाणलिंग दशाननें जाण ।। कैलासाहूनि आणिलें ॥८४॥

इथे शिवाचे सिंहासन लखलखीत आणि शुभ्र आहे. चारी दिशांची या मंदिराची दारे ही रत्नजडित आहेत. इथे ऐरावतावर विराजमान असलेला इंद्र हा स्थान रक्षणार्थ सिद्ध आहे. ॥७६॥ दक्षिण विशेचे रक्षण स्वतः यमराज करीत असून, पश्चिमेस वारुणीपती तर उत्तरेस कुबेर सेवेस सज्ज आहे. ॥७७॥ या स्थानी कर्पूरगौर कांती असलेला भवानीचा पती हा तेजस्वरूपात इथे विराजित्त आहे. हे स्थान म्हणजे जणू भूलोकीचे कैलासच आहे. हे साधू-संत आणि शिव भक्तांचे माहेर आहे. ॥७८॥ इथे प्रथम शिवमूर्तींचे दर्शन घ्यावे, इथल्या अष्टसिद्धीचे पूजन करावे, इथे असणाऱ्या कात्यायनी आवरणांचीही पूजा करावी।। ७९॥ बारा आदित्य, अकरा रुद्र, अष्टवसू, दिक्पाल हे सारेजण इथे शिवसेवेस तत्पर आहेत. या पिनाकपाणीपाशी अष्टसिद्धी, नवनिधी ह्या हात जोडून उभ्या आहेत. ॥८०॥ गौतम मुनी राजास म्हणाले, “हे राजा, हे स्थान मलासुद्धा अतिप्रिय असल्याने मलाही इथेच निवास करायला आवडते.” ॥८१॥ हे राजा, अन्य तीर्थक्षेत्री एक लक्ष वर्ष खडतर तप करून जे फल प्राप्त होते, ते फळ या गोकर्ण क्षेत्री एक दिवस उपासना केल्यास प्राप्त होते. भगवान शिव अशा उपासकावर अतिप्रसन्न होतात.” ||८२।। अमावास्या, संक्रांत, सोमवार, प्रदोष, पर्वकाळ अशा शुभ दिवशी या स्थानी येऊन इथे स्नानाविक पुण्य कर्मे केली असता सर्व पुण्य पदरी पडते. ।।८३॥ हे गोकर्ण महाबळेश्वराचे शिवलिंग हे साक्षात दशाननाने भगवान शिवाकडून आणलेले लिंग असून, त्याचे स्वतः रावण, बंधू विभीषण, कुंभकर्ण यांनीही पूजन केले आहे. ।।८४।।


गणेशें स्थापिलें तें लिंग ॥ ऋषीं म्हणती सूतातें कथा सांग ॥ ऐकावया लीला सुरंग ॥ श्रवण वाट पाहती ।।८५ ।। यावरी सूत वक्ता निपुण ।। रावणमातेसी कैकसी अभिधान ।। ती नित्य लिंगपूजनाविण जाण ।। उदक प्राशन न करीच ।। ८६ ।। पंचधान्यांचें पिष्ट करून ।। लिंग करी कामना धरून ।। व्हावें रावणाचें कल्याण ।। जय संपूर्ण प्राप्त व्हावा ॥८७॥ शक्रे तिचें लिंग नेऊन ।। समुद्रीं टाकिलें द्वेर्षेकरून ।। त्यालागीं रात्रंदिन ।। रावणमाता अन्न न घे ॥८८॥ रावण म्हणे मातेलागून ।। मी मुख्य आत्मलिंग आणितों जाऊन ।। कैलासाप्रती द्विपंचवदन । जाता झाला साक्षेपें ।॥ ८९ ॥ तप आचरला दारुण ।। जो चतुःषष्टिकलाप्रवीण ।। जेणें वेदांची खंडे करून ।। सारासार निवडिलें ।॥९० ।। चतुर्दशविद्यापारंगत ।। शिवासी आवडे अत्यंत ।। दशमुखें गायन अद्भुत ।। केलें त्यानें स्वामीपुढें ।॥९१ ।। आपुलें शिर छेदूनि स्वहस्तें ।। शिरांच्या तंती करूनि स्वरयुक्त ।। दशमुख गात प्रेमभरित ।। उमानाथ संतोषे जेणें ।॥९२॥

या लिंगाची स्थापना ही श्री गजाननाने केलेली आहे. असे सांगतात शौनिकादिकांनी सुतास त्या लिंग स्थापनेची कथा आम्हांस सांगा, ती ऐकण्यास आमचे कान आतुर आहेत असे सांगितले. ।।८५ ।। तेव्हा सुतांनी जी कथा निवेदन केली ती अशी- रावणाची माता कैकसी ही नित्य शिवलिंगाची पूजा केल्याशिवाय मुखात पाण्याचा घोटही घेत नसे. ।।८६ || ती पाच प्रकारच्या धान्यांचे पीठ एकत्र करून त्याचे शिवलिंग तयार करून त्या शिवलिंगाची आपला पुत्र रावण ह्याचे कल्याण व्हावे म्हणून मनापासून पूजन करीत असे. ।।८७|| एकदा मात्र असे घडले की, इंद्राने द्वेषाच्या भावनेने कैकसीने पूजेसाठी तयार केलेले शिवलिंग नेऊन समुद्रात टाकून दिले. त्यामुळे कैकसीच पूजेस्तव शिवलिंग नसल्याने ती अन्नपाण्याशिवाय राहू लागली. ।।८८।। ही वार्ता जेव्हा रावणास समजली तेव्हा तो मातेजवळ येऊन तिला म्हणाला, “माते, तू चिंता करू नकोस. मी कैलासास जातो आणि शिवांचे मुख्य लिंगच तुला पूजेसाठी आणून देतो.” असे म्हणून रावण लगेच कैलासाकडे निघाला. ।। ८९ ।। रावण हा चौदा विद्या आणि चौसष्ट कला ह्यात अत्यंत निपुण होता. तो कैलासास आला. त्याने तिथे घोर तप चालू केले. रावण अत्यंत बुद्धिमान असल्याने त्याने वेदांचे अध्ययन करून त्यातून सारासार निवडले होते. ।।९०।। जे लोक वेदांचा अभ्यास करतात, त्याचे वाचन मनन चिंतन अध्यतन करतात; ते शिवास अत्यंत प्रिय आहेत. त्यामुळेच रावणावर शिव हे खूश होतेच. त्यातच त्याने त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी सुस्वर अशा शिवस्तुतीचे गायन चालू केले, ।।९१।। रावणाने आपल्याच हातांनी आपले शिर छेदून आणि शिरांच्या तारा करून त्याचे वाद्य करून मोठ्या प्रेमभावाने शिवांचे गुणगायन करू लागला. तेव्हा उमानाथ त्याच्यावर प्रसन्न झाले. ।।९२।।


राग उपराग भार्यासहित ।। मूच्र्छना शरीर कंपित ।। सप्तस्वर ताल संगीत ।। शास्त्रप्रमाण गातसे ।।९३ ।। गद्यपद्यरचना नाना कळा ।। गीत प्रबंध अखंड नाममाळा ।। गातां प्रीतीनें शिवलीला ।। शंभु तोषला अद्भुत ॥९४॥ म्हणे प्रसन्न झालों दशमुखा ॥ इच्छित माग तुज प्रिय जें कां ।। दशकद्वयनयन म्हणे कामांतका ।। आत्मलिंग मज देईं ॥ ९५ ॥ या त्रिभुवनांत जे सुंदर ।। ऐसी ललना देई सुकुमार ।। ऐकूनि संतोषला कर्पूरगौर ।। भोळा उदारचक्रवर्ती ॥९६॥ कोटि चंद्रसूर्यांची प्रभा पूर्ण ॥ ऐसें लिंग काढिलें हृदयांतून ।। कीं ब्रह्मानंदरस मुरोन ॥ दिव्य लिंग ओतिलें ॥९७॥ सहस्र बालसूर्य न पावती सरी ।। ऐसी प्रभा पडली दशदिशांतरीं ।। दिधलें रावणाचें करीं ।। जें अतर्क्स ब्रह्मादिकां ॥ ९८ ॥ जें मुनिजनांचें ध्येय ध्यान ।। जें सनकादिकांचें देवतार्चन ॥ वेद शास्त्र पुराण ॥ दिव्य लिंग वर्णिती ॥९९॥ जें त्रिगुणातीत परब्रह्म ।। जें अज अजित अनाम ॥ सच्चिदानंद निर्वाणधाम ॥ योगी आराम पावती जेथें ॥१००॥

रावणाचे ते विविध रागदारीतील सुस्वर असे गायन, तो घेत असलेल्या ताना, त्याचे तालासुराचे ज्ञान सुस्वर गायन हे शिवांचे मनास भावू लागले. ।।९३।। आपल्या या शिव आराधनेत रावणाने गद्य-पद्य, गीत नामोच्चारण ह्या सर्वांचाच उत्तम असा वापर केला, त्यामुळे त्याच्या या भक्तिभावाने केलेल्या प्रचंड सेवेने शंकर भगवान त्याच्यावर अतिप्रसन्न झाले. ।।९४।। भगवान त्यास म्हणाले, हे दशानना, तुझ्या गायन सेवेवर मी अतिप्रसन्न झालो आहे. तुला जे हवे असेल ते तू माग. मी ते तुला देईन. तेव्हा वीस नेत्रकमल असलेला रावण हा सदाशिवांना म्हणाला, हे प्रभू, मला तुमचे आत्मलिंग हवे आहे. ।।९५।। तसेच “हे शिवा, मला अवघ्या त्रिभुवनात सुंदर असेल अशी स्त्री दे.” रावणाची ही इच्छा ऐकून प्रभू संतुष्ट झाले. ।।९६।। तेव्हा रावणाच्या मागणीप्रमाणे भगवान शिवांनी कोटी सूर्याची प्रभा ज्याचेवरून ओवाळून टाकावी असे आपले दिव्य आत्मलिंग हे हृदयातून काढले आणि ते रावणास दिले. ९७।। सहस्र सूर्यांनाही ज्याची सर येणार नाही अशी विलक्षण प्रभा त्या आत्मलिंगाची पसरली होती. असे ते दिव्य लिंग प्रभूनी रावणाचे हाती दिले. मात्र शिवांनी हे असे का करावे ह्याचा तर्क ब्रह्मदेवासही विचार करून लागला नाही. ।। ९८।। खरे म्हणजे ते शिवांचे आत्मलिंग हे मुनिजनांचे ध्येयाचा विषय होते, सर्व देव देवता ह्या त्याचेच पूजन करीत. त्याच आत्मलिंगावे दिव्य वर्णन वेद शास्त्रे आणि पुराणे ह्यांनी मुक्त कंठाने केलेले आहे. ।।९९।। जे त्रिगुणातीत आहे, जे परब्रह्म आहे, जे आदि अनंत आहे, अजेय स‌त्चित आनंददायी आहे, असे ते शिवलिंग म्हणजेच जिथे योगी यांचेही मन रमते असे स्थान ।।१००।।


अनंत ब्रह्मांडें विचित्रे ॥ जेणें रचिलीं इच्छामात्रं ॥ ज्याकारणें भांडती वेदशास्त्रं ।। तें दिव्य लिंग पुरातन ॥१०१॥ तें लिंग रावणें हातीं घेऊन ।॥ म्हणे हे त्रिलोचन त्रिदोषशमन ।। लावण्यसागरींचं निधान ।। त्रिभुवनसुंदर ललना दे ॥ १०२ ॥ जी अपर्णेची अपरप्रतिमा ।। ऐसी देईं मज सर्वोत्तमा ।। सच्चिदानंद पूर्णब्रह्मा ।। नामा-अनामातीत तूं ॥१०३॥ शिव म्हणे इची प्रतिमा विशेष ॥ निर्मू न शके विधीश ॥ भोळा चक्रवर्ती महेश ॥ म्हणे हेचि नेई अपर्णा तूं ॥१०४॥ रावणें अवश्य म्हणोनी । स्कंधीं घेतली स्कंदजननी ।। दिव्यलिंग हातीं घेऊनी ।। लंकानाथ चालिला ।।१०५ ॥ दक्षिणपंथें जातां सत्वर ।। गजबजिले सकळ सुरवर ।। गजानन स्कंद वीरभद्र ।। नंदिकेश्वर तळमळती ॥१०६॥ म्हणती हे सदाशिव त्रिनयन ।। हें कैसें तुझें उदारपण ।। भवानी बैसलासी देऊन ॥ पंचवदन हांसतसे ॥१०७॥ म्हणे तियेचा कैवारी वैकुंठनाथ ।। तो धांवेल आतां स्नेहभरित ।। इकडे भवानी स्तवन करीत ॥ हे पद्यजतात धांव वेगीं ॥१०८॥

ज्याने आपल्या स्वसामर्थ्याने या ब्रह्मांडाची रचना केली, ज्याच्या मूळ स्वरूपाबाबत वेदशास्त्र पुराणातही विविध मतभिन्नता आहे, असे ते अवर्णनीय असे पुरातन असे शिवाचे आत्मलिंग होते. ।।१०१|| असे हे दिव्य लिंग जेव्हा रावणास प्राप्त झाले तेव्हा रावण म्हणाला, हे त्रिनेत्रधारी शिवशंकरा, माझ्या पहिल्या मागणीप्रमाणे तू मला तुझे आत्मलिंग तर आता दिले आहेसच. आता मला माझ्या दुसऱ्या मागणीप्रमाणे सर्वांगसुंदर अशी त्रिभुवन सुंदर स्त्री दे. ।।१०२।। ती सुंदर स्त्री म्हणजे तुझ्या या पार्वतीची जणू दुसरी प्रतिमाच असायला हवी. हे सर्वात्मका ! तुला काय अशक्य आहे? तू सत् चित आनंदस्वरूप आणि नामअनामापासून वेगळा असा आहेस. ।।१०३।। तेव्हा भगवान शंकर रावणास म्हणाले की, “रावणा, अरे या पार्वतीसारखी दुसरी सुंदर स्त्री निर्माण करण्याचे सामर्थ्य तर प्रत्यक्ष त्या ब्रह्मदेवाकडेही नाही. तो अशी दुसरी कोणी अन्य स्त्री निर्माणच करू शकत नाही. तेव्हा तू या माझ्या पार्वतीलाच तुझ्यासोबत घेऊन जा.”।।१०४।। तेव्हा रावणास तर अत्यंत आनंद झाला. त्याने अवश्य असे म्हटले. त्याने एका खांद्यावर त्या स्कंदजननीस घेतले आणि हातात ते शिव आत्मलिंगही सोबत घेऊन रावण त्वरित लंकेच्या दिशेने निघाला. ।।१०५|| रावणास असे पार्वतीस आणि शिव आत्मलिंगास घेऊन दक्षिण दिशेस जाताना पाहून गणेश, कार्तिकय, वीरभद्र, नंदी आणि असंख्य शिवगणांना अत्यंत वाईट वाटले. ते पार्वती मातेच्या वियोगाने तळमळू लागले. ||१०६ || ते सारेजण म्हणू लागले, “प्रभो, अहो हे कसले असे तुमचे औदार्य! तुम्ही प्रत्यक्ष तुमची भार्या त्या दशाननास देऊन बसलात?” तेव्हा त्यांचे ते बोलणे ऐकून भगवान गालातल्या गालात हसू लागले. ||१०७॥ ते म्हणाले, “मी माझ्या भक्तास दिलेला शब्द खरा केला. त्या पार्वतीचा कैवारी नारायण हा तिचे रक्षण करील. त्याची चिंता मी का करावी?” इकडे रावण पार्वतीस लंकेकडे घेऊन जात असताना पार्वती भगवान नारायण ह्यांची सोडवणुकीसाठी आर्त प्रार्थना करू लागली. ।।१०८।।


वारिजनयना इंदिरावरा ।। निगमागमवंद्या सुहास्यवक्त्रा ।। हे नीलपयोधरगात्रा ।। धांव वेर्गी सोडवी मज ।।१०९।। हे मधुकैटभनरकमुरभंजना ।। हे दशावतारधरा पीतवसना ।। हे मदनांतकमानसरंजना ।। हे जनार्दना जगद्‌गुरु ॥ ११०॥ हे कोटिमनोजतात श्रीधर ।। असुरमर्दन परम उदार ।। ऐसें स्तवन ऐकतां सर्वेश्वर ।। विप्ररूपें आडवा आला ॥११॥ म्हणे धन्य धन्य द्विपंचवदना ।। कोठें मिळविली ऐसी ललना ।। दशमुख म्हणे हे अपर्णा ।। सदाशिवें दीधली ॥११२॥ विप्र म्हणे खाली उतरून ।। न्याहाळूनि पाहें इचें वदन ।। रावण पाहे तंव ते कुलक्षण ।। अत्यंत कुरूप देखिली ।।११३।। भुवयांस आंठी अमंगळ पूर्ण ।। वृद्ध गाल बैसले दंतहीन ।। गदगदां विप्र हांसे देखून ॥ टाकोनि रावण चालिला ।।११४।॥ मग रमाधवें तयें स्थळीं ।। स्थापिली माता भद्रकाळी ।। इकडे असुर शिवाजवळी ॥ म्हणे स्त्री अमंगळ कैसी दीधली ।।११५।।

हे कमलनयना, हे बैकुंठनिवासी नारायणा, तू धावत ये आणि माझे रक्षण कर. मला या रावणाच्या हातून सोडवः ।।१०९॥॥ हे मधुकैटभ आदी दैत्याचा वध करणाऱ्या नारायणा, हे पुरुषोत्तमाऽ, हे मेघश्यामा, धाव माझे रक्षण कर. हे जनार्दना, सत्वर धाव घे. तुझ्या भगीनीची हाक ऐकून तिच्या रक्षणासाठी सत्वर ये. ।।११०॥ शिवभार्या आणि आपली भगिनी पार्वती हिची ही करुणामय हाक ऐकताच तो सर्वेश्वर भगवान नारायण हा एका ब्राह्मणाचे रूप धारण करून रावणाच्या वाटेत त्यास आडवा आला. ।।१११।। तो ब्राह्मण रावणास म्हणाला, “हे दशानना, अरे इतकी सुंदर स्त्री तुला कोठे आणि कशी मिळाली?” तेव्हा रावणाने सांगितले की, ही सुंदर स्त्री सदाशिवाने मला दिली आहे. ।।११२|| तेव्हा तो ब्राह्मण रावणास म्हणाला, अरे एकदा तिला खांद्यावरून खाली उत्तरव आणि तिचा चेहरा नीट पाहा तरी की, ती खरोखरच सुंदर आहे का नाही? कारण अरे या देवांचा काही भरवसा नाही.” ।॥११३॥ तेव्हा रावणाने खरोखरच पार्वतीस खांद्यावरून खाली उतरवले आणि पाहिले तर काय? त्याला ती अत्यंत कुरूप विसली ।।११३।। तिच्या भुवयांना आठ्या पडल्या होत्या. म्हातारपणाने गालफाडे बसली होती. दात पडले होते, ती जख्खड म्हातारी दिसत होती तिला पाहून अरे ही काय सुंदर स्त्री आहे का? असे म्हणून तो ब्राह्मण हसू लागला. तिचे ते रूप पाहून रावणासही मोठे आश्चर्य वाटले. त्याने तिला तिचेच सोडून दिली आणि रावण मागे फिरला. ।॥११४॥ मग भगवान विष्णूंनी त्याच जागी माता भद्रकालीची स्थापना केली. रावण हा कैलासाल परत आला आणि शिवास म्हणू लागला, “हे सदाशिवा, तू अशी अमंगळ अशी स्त्री मला देऊन माझी फसवणूक का बरे केलील? “॥११५॥


शिव म्हणे सत्य वचन ॥ ते तुज नाटोपे कौटाळीण ।। अनंत ब्रह्मांडें दावून ।। सर्वेचि लपवील तत्त्वतां ॥११६॥ मग श्रीधरें आंगींची मळी काढून ॥ स्वहस्तें निर्मिली रूपसंपन्न ।। मयासुराचें उदरीं जाण ॥ उत्पन्न झाली तेंच पैं ।॥११७॥ तिच्या स्वरूपाची प्रति ।। नाहीं नाहीं त्रिजगतीं ।। अंगींच्या सुवासें धांवती ।। काद्रवेयचक्रे प्रीतीनें ॥ ११८ ॥ तिचें नाम मंदोदरी ॥ तिची प्रतिमा नाहीं उर्वीवरी ।। विंशतिनेत्राचे चत्वरीं ।॥ पट्टद्महिषी पतिव्रता ॥ ११९ ॥ मयासुर करील कन्यादान ॥ वरी एक शक्ति देईल आंदण ।। सप्तकोटीमंत्रांचे गहन ॥ सामर्थ्य असे जियेमाजी ॥१२०॥ ते निर्वाणसांगातीण शक्ती ॥ तुज प्राप्त होईल लंकापती ।। महाशत्रूवरी निर्वाणीं ती ॥ प्रेरवी त्वां सत्य पैं ॥१२१॥ ऐसें ऐकतांचि रावण ।। परतला लिंग घेऊन ।। पूर्वस्थळासी आला जाण ।। तों गजानन गायी राखी ॥१२२ ।। गजाननाचें स्तवन ।। देव करिती कर जोडून । म्हणती दिव्य लिंग सोडवून ॥ स्थापीं अक्षयी गणपती ॥१२३॥

त्यावर भगवान शिव हे त्यास समजावून म्हणाले, “बा दशानना, हे मात्र खरेच आहे, अरे ती मायावी, कपटी, नाना रूप धारिणी स्त्री तुझ्यासाठी योग्य नव्हतीच. अरे ती मोठी फसवी आहे. ती ब्रह्मांडाची रचना तर करतेच, पण स्वतः मात्र अव्यक्त राहते. ” ।।११६।। मग सदाशिवांनी स्वतःच्या देहाच्यापासून एक दुसरी सुंदर स्त्री निर्माण करून ती मयासुराच्या घरी जन्मास घातली. ।।११६।। मग भगवान शिव रावणास म्हणाले, “रावणा, मी निर्माण केलेली ही सुंदर स्त्री मयासुर हा तुला पत्नी म्हणून अर्पण करील. तिच्या रूप लावण्याची आणि गुणांची सर अन्य स्त्रीला येणार नाही. तिच्या देहसुगंधाने सर्वजण तिच्याकडे आकृष्ट होतील. ।।११८॥ हे दशानना, त्या मयासुराच्या कन्येचे नाव मंदोदरी असे असून तिच्या सारखी दुसरी स्त्री भूलोकी असणार नाही. तीच तुझ्याशी विवाह करेल आणि तुझी पट्टराणी मंदोदरी होईल. ।।११९॥ तसेच हे रावणा, जेव्हा तो मयासुर तुला ही कन्या अर्पण करेल त्याबरोबरच तो तुला आणखी एक अमोघ अशी शक्तीपण देईल. जिच्यात सप्तकोटी मंत्रांचे सामर्थ्य सामावलेले असेल. ।।१२० ।। त्या शक्तीचा तुला अत्यंत निर्वाण क्षणी मोठा आधार मिळेल. ती शक्ती तुझे महाबलाढ्य शत्रूपासून संरक्षण करील. ॥१२१॥ भगवान शिवाचे हे आशीर्वादपर वचन ऐकून रावण सुखावला आणि तो ते आत्मलिंग घेऊन लंकेकडे परत निघाला. तेव्हा रावणास वाटेत एक गुराखी पोर आपली गुरे राखील असलेला दिसला. ।।१२२।। इकडे सर्व देवदेवतांनी श्री गणेशास तू गुराखी रूपात ते शिवाचे आत्मलिंग रावणाच्या कडून काहीही करून परत मिळव अशी प्रार्थना करू लागले. ।।१२३॥


ऐसा देवीं प्रार्थिला एकदंत ॥ तंव रावणासी मूत्र लागलें बहुत ।। पुढें पाऊल न चालवत ।। चरफडीत मूत्रभरें ।॥१२४॥ भूमीवरी लिंग न ठेवावें ॥ ऐसें पूर्वी सांगितले उमाधर्वे ।। हातीं घेऊनि लघुशंकेसी बैसावें ।। हेही कर्म अनुचित ॥ १२५ ॥ तंव तो सिद्धिबुद्धींचा दाता ।। विप्रवेर्षे गायी राखितां ।। त्यासी लंकानाथ म्हणे तत्त्वतां । लिंग हातीं धरीं हैं ।॥ १२६ ॥ विप्र म्हणे लंकापती ।। माझ्या गायी रानोरानीं पळती ।। तुझ्या मूत्रशंकेस वेळ किती ।। लागेल हें न कळे मज ॥ १२७ ॥ रावण म्हणे न लागतां क्षण ।। येतों मूत्रशंका करून । विप्र म्हणे तीन वेळां बाहीन ॥ न येसी तरी लिंग टाकीन भूमीवरी ॥१२८॥ अवश्य म्हणे लंकापती ।। लिंग देत विप्राच्या हातीं ।॥ दूर जाऊनि एकांतक्षितीं ।। लघुशंकेस बैसला ।। १२९ ।। अगाध गजमुखाचें चरित्र ।। जो साक्षात अवतरला इंदिरावर ।। शिवउपासना करावया पवित्र ।। जाहला पुत्र शंभूचा ॥ १३० ॥ असो रावणासी मूत्राचे पूर॥ लोटले न सांवरती अनिवार ।। एक घटिका लोटतां इभवक्त्र । हांक फोडी गर्जोनी ॥१३१ ॥ माझ्या गायी गेल्या दूरी ।। हें आपलें लिंग घेई करीं ।॥ रावण न बोलेचि निर्धारीं ।। हस्तसंकेतें थांब म्हणे ॥१३२॥

विघ्नहराची अशी प्रार्थना करताच तिकडे रावणास लघुशंका आली. त्यास एकही पाऊल पुढे टाकवेना. त्याच्या जिवाची पार तडफड होऊ लागली. ।।१२४।। कारण त्यास शिवांनी आत्मलिंग देताना हे लिंग तू चुकूनही जमिनीवर ठेवू नकोस असे निक्षून सांगितले होते. बरं ते लिंग हाती घेऊन त्यास लघुशंकेसही कसे बसता येणार? तो मोठ्या चिंतेत पडला. ।।१२५।। तेव्हा अचानक त्यास एक गुराखी पोर समोर दिसला. रावण त्या गुराख्याच्या मुलास म्हणाला, “बाळ, थोडा वेळ एवढे हे लिंग हाती धर, मी लघुशंका करून येतो”. ।।१२६।॥ तेव्हा गुराखीरूपी गजानन त्यास म्हणाला, “माझ्या गायी रानात चरत आहेत, तुझ्या लघुशंकेस किती वेळ लागेल काय सांगावे? मला काही तेवढा वेळ हे लिंग घेऊन उभे राहणे शक्य होणार नाही.” ।।१२७॥ तेव्हा रावण म्हणाला, “अरे फार वेळ लागणार नाही. मी लगेच येतो, मात्र तू हे लिंग खाली मात्र ठेवू नकोस”. तेव्हा तो गुराखी म्हणाला. “मी तुला तीनवेळा हाक मारीन, जर तू तेवढ्यात आला नाहीस तर मात्र मी हे लिंग जमिनीवर ठेवीन.” ।।१२८|| तेव्हा अवश्य म्हणून रावणाने ते लिंग गणेशरूपी गुराख्याच्या हाती दिले आणि तो लघुशंकेस गेला. ।।१२९।। श्री गजाननाची किमया ही औरच! तो भगवान शिवांची सेवा करण्यासाठीच त्यांचा पुत्र झालेला. ।।१३० ।। इकडे रावणाचा मात्र मुत्राचा महापूर काही केल्या आवरेना. जशी का जवळजवळ एक घटिका होत आली तसा तो गुराखी रावणास हाका मारू लागला. ।।१३१।। “अरे माझ्या गाई बघ दूर गेल्या. तू लवकर ये आणि हे लिंग घे, असे म्हणून त्यास हाका मारू लागला. रावण हातानेच खुणा करून थांब थांब असे सांगू लागला. ।।१३२।।


दुसरी घटिका झाली पूर्ण ॥ हांक फोडी गजानन ।॥ एवं घटिका झाल्या तीन ।। कदापि रावण न उठेचि ॥ १३३॥ जैसें पाखंडियाचें कुमत ।। न सरेचि वारितां पंडित ।। तैसें रावणाचें मूत्र न सरे सत्य ।। पुनः एकदंत हांक फोडी ॥ १३४ ॥ राक्षसा आपुलें लिंग सांभाळीं ।॥ म्हणोनि ठेविलें भूमंडळीं ।। अक्षय स्थापिलें कदाकाळीं ।॥ ब्रह्मादिकां उपटेना ॥ १३५ ॥ पृथ्वीसहित अभंग ।। एकचि झालें दिव्य लिंग ।। रावण धांवे सवेग ।। अशौच अपवित्र क्रोधभरें ॥ १३६ ॥ लिंग उपटितां डळमळी कुंभिनी ।। महाबळे दशमुख पाहे उपटोनी ।। परी न उपटे तयालागुनी ।। अखंड अभंग जाहलें ॥ १३७ ।। गुप्त जाहला गजानन ।। गायी पृथ्वींत जाती लपोन ।। रावणें एक गायीचा कर्ण ॥ धांवोनियां धरियेला ॥ १३८ ॥ तोही न उपडे तयालागून ।। मग तेथेंचि केलें लिंगपूजन ।। गोकर्ण महाबळेश्वर तेथून ॥ नाम जाण पडियेलें ॥१३९॥ रावणमाता तेथे येऊन । ते नित्य करी शिवपूजन ।। आदिलिंग हें जाणोन ॥ करिती अर्चन सुरऋषी ॥१४० ॥

होता होता दुसरी घटिकाही पूर्ण व्हायला आली. तेव्हा गुराखीरूपी गजाननाने पुन्हा हाका मारल्या, तरीही रावणाचे मूत्र आवरेना आणि तो काही परत येईना. ।।१३३।। रावणाचे मूत्र काही संपेना आणि इकडे गुराख्याचा हात मात्र अवघडला. तेव्हा त्याने एक दोन करीत तीन हाका मारल्या खऱ्या, पण रावण काही येईना. ।।१३४।। तेव्हा गजाननाने त्यास हाक देत म्हणाले, “मी तीन हाका मारूनही तू आला नाहीस. आता घे तुझं तूच हे लिंग सांभाळ.” असे म्हणून त्या गुराख्याच्या पोराने (गजाननाने) ते शिवलिंग सरळ जमिनीवर ठेवले. ।।१३५।। ते लिंग खाली ठेवताच ते जमिनीत जाऊन रुतले. तेव्हा त्या अपवित्र अशा अवस्थेतच रावण हा तिथे धावत आला. ।। १३६।। त्याने ते जमिनीवर ठेवलेले आणि जमिनीस चिकटलेले शिवलिंग उपटून पिळवटून वर काढण्याचा प्रयत्न केला; पण त्यास काही यश आले नाही. ते लिंग काही जागेवरचे हलेना. ।।१३७॥ तेवढ्यात इकडे तो गुराखीरूपी गजानन, त्या गायी सारे काही गुप्त झाले. तेव्हा रावणाने एका गायीचा कान धरला, त्यास तोही उपटता आला नाही. उलट लिंग वर पिळवटून काढण्याच्या प्रयत्नात त्यास गायीच्या कानासारखा आकार आला. ।।१३८ ।। मग तिथेच रावणाने त्या लिंगाची पूजा केली. तेव्हापासून ते स्थान हे गोकर्ण महाबळेश्वर या नावाने प्रसिद्ध झाले. ।।१३९॥ पुढे तर रावणाची माता कैकसी ही इथेच येऊन त्या शिवलिंगाची पूजाअर्चा, उपासना करू लागली. भगवान शिवांचे ते आत्मलिंग जे श्री गजाननाने रावणाकडून काढून घेत तिथे प्रस्थापित केले, त्या दिव्य लिंगाची देवदेवता तिथे येऊन भक्तिभावाने पूजा करू लागले. ।।१४०।।


रावण कुंभकर्ण बिभीषण ।। तेथेंचि करिती अनुष्ठान ॥ त्याच्या बळेंकरून ।। देव जिंकिले रावणें ॥१४१॥ मयासुर मंदोदरी आणि शक्ती ॥ देता झाला रावणाप्रती ।। लक्ष पुत्र नातू गणती ॥ सवा लक्ष जयाचे ॥१४२ ॥ इंद्रजीताऐसा पुत्र ।। अष्टादशाक्षौहिणी सेनाभार ॥ जेथींच्या अनुष्ठानें अपार ।। रावण पावला संपत्ती ॥१४३॥ गौतम म्हणे राजोत्तमा ।। ऐसा गोकर्णीचा थोर महिमा ।। वर्णं न शके मघवा ब्रह्मा ।। येणें आम्हां तेथूनि जाहलें ॥१४४॥ मिथुलेश्वराच्या यागाकारणें ।। आम्ही येत असतां त्वरेनें ।। अद्भुत एक वर्तलें तुजकारणें ।। कथा तेचि सांगतों ॥ १४५ ॥ एक वृक्ष न्यग्रोध विशाळ । त्याखालीं आम्ही बैसलों सकळ ।। तों एक चांडाळीण अमंगळ ॥ अति अपवित्र देखिली ।।१४६ ।। सर्वरोगवेष्टित पूर्ण ।। जन्मांध गलितकुष्ठ भरलें जाण ॥ किडे पडले सर्वांगीं व्रण ॥ दुर्गंधी उठली चहूंकडे ॥१४७॥ रक्तपिती भरोन ।। हस्तपाद बोटें गेलीं झडोन ।। परम कुश्चित कुलक्षण ।। कैंचें अन्न उदक तियेतें ।॥१४८ । दंतहीन कर्णहीन ।। गर्भीच तियेचे गेले लोचन ।। कर्ण नासिक झडोन ॥ किडे पडले बुचबुचित ।।१४९।।

हे राजन, पुढे तर ह्या लिंगाचे पूजन हे रावण, बिभीषण, कुंभकर्ण ह्या कैकसीच्या पुत्रांनीही त्यांच्या त्यांच्या कल्याणासाठी केले. या शिवलिंगाच्या आराधनेने आणि पूजनानेच रावण हा कालांतराने देवदेवतांवर विजय मिळवू शकला. ।।१४१।। शिवाच्या आशीर्वादाप्रमाणे पुढे मयासुराने आपली कन्या मंदोदरी ही रावणास दिली. तसेच त्यास एक अमोघ अशी शक्तीही दिली. पुढे रावण हा अनेक पुत्रांचा पिता आणि नातवांचा आजा झाला. ।।१४२।। या शिवलिंगाच्या अनुष्ठानाने, पूजनानेच रावणास इंद्रजितासारखा पराक्रमी पुत्र प्राप्त झाला. तसे, त्यास अठरा अक्षौहिणी सैन्य आणि अपार संपत्ती आणि सोन्याची लंका प्राप्त झाली. ।।१४३।। इतके सांगून गौतम ऋषी राजास म्हणाले, “हे राजा, आम्ही आता त्याच क्षेत्राहून येत आहोत. त्या गोकर्ण महाबळेश्वर तीर्थाचा महिमा वर्णन करणे हे देवादिकांनाही अशक्य आहे”. ।। १४४।। हे राजा, मिथिलेश्वराच्या एका महान यज्ञकार्यासाठी आम्ही तिथूनच येत असताना तिथे आम्ही एक अद्भुत अशी घटना घडताना पाहिली. ।।१४५।। हे राजा, त्या पवित्र क्षेत्री एका वटवृक्षाखाली आम्ही मंडळी बसलो असताना आम्हास तिथे एक चांडाळीण दिसली. ।।१४६।. ती जन्मतःच आंधळी आणि देहाने अनेक व्याधिग्रस्त होती. तिच्या सर्वांगावर अनेक जखमा झालेल्या होत्या. त्यात पू आणि किडे झालेले होते. ।।१४७ ।। कुष्ठरोगाने तिच्या हातापायांची बोटे झडली होती. तिला अनेक दिवस अन्नपाणीही मिळालेले नव्हते. ।।१४८।। तिची काया, नाक, कान, कुरूप झाल्याने भयानक दिसत होती. तिच्या देहास दुर्गंधी येत होती. ।।१४९।।


अंगींचे चर्म गेले झडोन ।। वस्त्र पडलें गळोन ॥ धुळींत लोळे चांडाळीण ॥ पाप पूर्वीचे भोगीत ॥ १५० ॥ तिचा मरणकाळ जवळी आला जाण ॥ वरतें पाहिलें आम्ही विलोकून ॥ तों शिवं धाडिलें दिव्य विमान ।। तियेलागीं न्यावया ॥ १५१ ॥ दशभुज पंचवदन ।। शिवदूत बैसलें चौघे जण ।। कोटिसूर्यतेज विराजमान ।। प्रभा शशिसमान एकाची ॥१५२॥ कोणी अग्नितेजें विराजत ॥ भालचंद्र शोभिवंत ।। दिव्य विमान लखलखित ।। वाद्ये वाजती चतुर्विध ।॥१५३॥ अष्टनायिका नृत्य करिती ।। किन्नर गंधर्व शिवलीला गाती ।। गौतम म्हणे ऐक नृपती ।। मग तयांप्रती पूसिले ॥१५४॥ हें दिव्य विमान घेऊन ।। कोणाचें करूं जातां उद्धरण ।। ते म्हणती तया चांडाळिणीलागून ॥ शिवें आणू पाठविले निजपदा ।॥१५५॥ मग म्यां तयांसी पुसिले ॥ इणें पूर्वी काय तप केलें ॥ मग ते शिवदूत बोलिले ।। पूर्वजन्मींचा वृत्तांत ।।१५६ ॥ पूर्वी केकयनामा ब्राह्मण ॥ त्याची कन्या सुमित्रा जाण ॥ आपुल्या सौंदर्यगर्वेकरून ।। कोणासही मानीना ।।१५७ ।।

तिची कातडी पार झाडून गेली होती. अंगावर लज्जारक्षणा इतके फाटके वस्त्रही धड नव्हते. तिचे अंगवस्त्र धुळीने पार माखले होते. ती या आणि अशाप्रकारे पूर्वजन्मीची पापे भोगीत होती. ।। १५०|| तिचा मृत्यू अगदी जवळ आला होता. तेव्हा आम्हास आकाशमागनि तिला घेण्यासाठी शिवलोकीहून एक विमान आलेले दिसले. ।।१५१॥ त्यात पाच मुखे आणि दहा हात असलेले शिवदूत बसलेले होते. त्यांचे तेज हे कोटी सूर्याहूनही अधिक देदीप्यमान होते. त्यापैकी एका शिवदूताची कांती ही चंद्राप्रमाणे शीतल अन् रूपेरी होती. ।।१५२।। एकाची कांती ही अग्नीच्या तेजासारखी तेजस्वी होती, तर त्याच्या मस्तकावर चंद्र शोभून दिसत होता. ते विमान अत्यंत तेजस्वी दिसत होते. त्यात शिवदूत हे चर्म, तंतु, वायू आणि धातू ह्यांची वाद्ये वाजवीत होते. ।।१५३।। त्या विमानात अष्ट नायिका नृत्य करीत होत्या, तर गणगंधर्व हे सु-स्वर गायन करीत होते. गौतम ऋषी म्हणाले, त्यांना तिथे तसे आलेले पाहून आम्ही त्या शिव दूतांना प्रश्न केला. ।।१५४|| हे शिवदूतांनो, तुम्ही कोणाचा उद्धार करण्यासाठी? कोणा भाग्यवंत जीवास शिवलोकी घेऊन जाण्यासाठी हे विमान घेऊन आला आहात? तेव्हा ते म्हणाले, आम्ही ह्या चांडाळणीचा उद्धार करून तिला शिवलोकास घेऊन जाण्यासाठी आलो आहोत. ।।१५५।। गौतम ऋषी म्हणाले, तेव्हा मी त्यांना विचारले हिने पूर्वी असे कोणते पुण्य केले, कोणते तप केले? तेव्हा त्यांनी तिचा पूर्व वृत्तांत सांगितला. ।।१५६।। पूर्वी एक केकय नावाचा ब्राह्मण होता. त्याला एक मुलगी होती, तिचे नाव सुमित्रा. ती अत्यंत सुंदर आणि रूपवान अशी स्त्री होती. तिला आपल्या सौंदर्याचा, रूपाचा गर्व होता. ।।१५७।।


ही बाळपणीं विधवा झाली ।। तारुण्यमदें स्वधर्म विसरली ।। जारकर्म करूं लागली ।। बायें शिकविल्या नायके ।। १५८ ॥ तों हे जाहली गरोदर ।। लोक निंदा करिती समग्र ।। मग बापें केश धरूनि सत्वर ।। बाहेर घातलें इयेसी ।।१५९ ।। मग ही हिंडतां देशांतर ।। कोणीएक सभाग्य शूद्र ।। त्यानें इते स्त्री करूनि सत्वर ।। समग्र द्रव्य ओपिलें ॥ १६० ॥ तेणें अपत्यें झालीं बहुत ।। ही अत्यंत मद्य-मांसीं रत ।। पुष्ट जाहली बहुत ।। घूर्णित लोचन उघडीना ।। १६१ ।। शूद्र घेवोनि दासीदास ॥ गेला क्षेत्रीं कृषिकर्मास ।। हे क्षुधित आठवूनि मांसास ।। शस्त्र घेवोनि चालिली ॥१६२॥ मद्ये माजली नुघडी लोचन ।। हा बस्तचि आहे म्हणोन ।। गोवत्साचे कंठीं जाण ।। पापिणी सुरी घालीतसे ॥ १६३ ॥ तें अट्टहासें ओरडत ।। गायी हुंबरोनि अनर्थ करीत ।। इणें कंठ छेदोनि गृहांत ।। वत्स नेलें त्वरेनें ।॥१६४॥ डोळे उघडूनि पाहे पापिणी ।। मग गोवत्स ओळखिलें ते क्षणीं ।॥ तेव्हां तिने शिव शिव उच्चारूनि ॥ म्हणे करणी न कळतां केली ॥१६५ ।। मग अर्थ वत्समांस भक्षून ॥ उरलें टाकी बाहेर नेऊन ।। लोकांत उठविलें पूर्ण ॥ गोवत्स मारिलें व्याघ्रानें ।।१६६ ।।

ती दुर्दैवाने बालपणीच विधवा झाली. अपार सौंदर्य आणि तारुण्य लाभलेल्या सुमित्रेने वाममार्गाचे आचरण केले. ती जारकर्म करू लागली. पित्याने कितीही शिकविल्या तरी हिताच्या चार गोष्टी ती काही ऐकत नसे. ।।१५८।। पुढे असे घडले की, ती गैरवर्तणुकीतच गर्भवती राहिली. तेव्हा तिच्या पित्याने मात्र तिला आपल्या घरातून हाकलून दिले. ।।१५९।। तेव्हा ती गावोगाव केविलवाणी फिरत असताना कोणा एका शूद्राने तिच्याशी विवाह केला, तिला संपत्ती लाभली. ।।१६० ।। त्या शूद्रापासून तिला अनेक मुलेबाळे झाली. ती मांस भक्षण करू लागली, मद्य पिऊ लागली. त्याच धुंदीत मन्न राहू लागली. ।।१६१।। एकदा तिचा पती हा शेतकामासाठी गेला असता इकडे सुमित्रास खूप भूक लागली. ती मांस मिळते का म्हणून शोधू लागली. ते काही मिळेना, तेव्हा ती हातात शस्त्र घेऊन निघाली. ।।१६२|| भक्ष्याच्या शोधात आणि मद्याच्या धुंदीत तिने बोकड समजून ते शस्त्र एका निरपराध गायीच्या वासरावर चालविले आणि वासरू मारले. ।।१६३।। गाय बिचारी केविलवाणी ओरडत असताना तिने त्या वासरास मारून त्याचे मुंडके घरी नेले. ।।१६४।। पुढे जेव्हा तिने घरी नीट पाहिले तेव्हा तिच्या लक्षात आले की, तिने मद्याच्या धुंदीत ज्याची मान कापली तो बोकड नव्हता तर ते गायीचे वासरू होते. तेव्हा मात्र शिव शिव मी हे काय केले, माझ्या हातून हे असे काय घडले, असे ती म्हणाली. ।।१६५|| तिला भूक अनावर झालेली असल्याने तिने त्या वासराचे अर्धे मांस खाल्ले आणि उरलेले घराबाहेर टाकून कोणा वाघाने वासरू मारले, असा तिने लोकांत बोभाटा केला. ।।१६६।।


त्यावरी ही काळें मृत्यु पावत ॥ तों येऊनियां यमदूत ।। इयेसी नेलें मारीत ।। बहुत जाचिती निर्दयपणें ॥१६७॥ कुंभीपाकीं घालिती ।। असिपत्रवनीं हिंडविती ।। तप्तभूमीवरी लोळविती ।। स्तंभ कवटाळविती तप्त जे कां ॥ १६८ ॥ चित्रगुप्तासी पुसे सूर्यनंदन ।। इचें कांहीं आहे कीं नाहीं पुण्य ॥ ते म्हणती शिवनाम उच्चारून ।। गोवत्सवध इणें केला ॥ १६९ ॥ मग यमें दिधलें लोटून ।। चांडाळयोनींत पावली जनन ।। गर्भाध कुश्चळ कुलक्षण ॥ विष्ठामूत्रे भरली सदा ॥१७० ॥ श्वानाचें उच्छिष्ट भक्षी जाण ।। तंव मायबापें गेलीं मरोन ॥ मग ही हातीं काठी घेऊन ॥ गांवोगांवी हिंडतसे ॥ १७१ ॥ तो शिवरात्र पर्वकाळ लक्षून ।। गोकर्णक्षेत्राप्रति संपूर्ण ।। यात्रा चालिली घोष गहन ।। नानाविध वाद्यांचा होतसे ।। १७२ ।। शिवनामाचा घोष अपार ॥ शिवभक्त करिती वारंवार ॥ त्यांच्या संगें ही दुराचार ॥ चांडाळीही चालिली ।॥१७३॥ गोकर्णक्षेत्रा गेली चांडाळी ॥ पडली भद्रकाळीच्या देवळाजवळी ॥म्हणे मज अन्न द्यावें ये वेळीं ।। बहुत पापिणी मी आहे ॥१७४॥ हांका फोडीत हात पसरोन ।। तों प्रदक्षिणा करिती भक्तजन ॥ एकें बिल्वपत्र नेऊन ॥ तिचे हातीं घातलें ।।१७५ ।।

पुढे कालांतराने ती स्त्री मरण पावली असता तिला यमदूतांनी यमलोकी नेले आणि तिचे तिथे अत्यंत हाल केले. ।।१६७|| यमदूतांनी तिला कुंभीपाकी घातले, काटेरी वनातून हिंडविले, तिला तप्त जमिनीवर लोळविले, तापलेल्या खांबांना मिठ्या मारायला लावल्या. ।।१६८॥ तिला पापाचे शासन दिले. यमराजाने चित्रगुप्तास तिचे काही पुण्य आहे का म्हणून विचारले. तेव्हा तो म्हणाला की, वासराचा जेव्हा हिने वध केला तेव्हा तिने शिवनामाचे उच्चारण केले होते इतकेच तिचे पुण्य आहे. ।।१६९।। तेव्हा त्या तेवढ्याशा पुण्याईच्या बळावर यमाने तिला चांडाळ योनीत जन्मास घातले. विष्ठा आणि मूत्र ह्यांनी बरबटलेल्या देहाने ती जेव्हा जन्मास आली, तीसुद्धा कुरूप, ओंगळ आणि जन्मांध ।।१७०।। तिला श्वानाने तोंड लावलेले अन्न खावे लागे. पुढे तिचे मायबाप मरून गेले आणि ती निराधार होऊन गावोगावी फिरू लागली. ||१७१।। एकदा ती तिच्या भाग्याने फिरत फिरत ह्या गोकर्ण महाबळेश्वर क्षेत्रात आली. त्यावेळी इथे मोठी शिवोत्सवाची यात्रा चालू होती. ।।१७२ || इथे अनेक शिवभक्त हे सतत शिवनामाचा जयघोष करीत होते. इथल्या त्या यात्रेकरूंच्या गर्दीत तीसुद्धा या क्षेत्रात फिरत असताना तिच्या कानी ते शिवनाम पडत होते. ।।१७३।। ती चांडाळीण इथे मद्रकालीच्या देवळाजवळ येऊन पडली. ती येणाऱ्याजाणाऱ्यांकडे अन्नाची मागणी करू लागली. ।।१७४।॥ ती लोकांपुढे हात पसरत असताना कोणा माणसाने तिच्या हातावर एक बेलाचे पान ठेवले. ती आपल्या हातावर कोणीतरी काहीतरी दिले आहे हे लक्षात येताच ते काय हे चाचपून पाहू लागली. ।।१७५।।


ते त्रिदळ चांचपोन पाहत ।। मुखीं घालावयाची नाहीं वस्त ॥ म्हणोनि रार्गे भिरकावीत । ते पडत शिवलिंगावरी ॥१७६ ।। शिवरात्रीस उपोषण ।। बिल्वदळें घडलें शिवपूजन ।। शिवभक्तांसर्वे जागरण ।। घडलें संपूर्ण चांडाळीस ॥ १७७ ॥ शिवनामें गर्जती जन ।। हेही करीत तैसेंचि स्मरण ।। ती ही वडाखालीं येऊन ।। पडली आहे चांडाळी ॥ १७८ ॥ ऐसा तिचा पूर्ववृत्तांत ।। गौतमें सांगितला समस्त । मग ती दिव्य देह पावोनि बैसत ॥ शिवविमानीं तेधवां ॥ १७९ ॥ आपुलें पूर्वकर्म आठवून ॥ करूं लागली शिवस्मरण ।। मग शिवगणीं नेऊन ।। शिवपदीं स्थापिली ।।१८० ॥ गौतम म्हणे ऐक राया सादर ।। तूं गोकर्णाप्रति जाई सत्वर ।। शिवरात्रीस पार्वतिपरमेश्वर ।। त्रिदळेंकरूनि अर्ची कां ॥१८१॥ ऐसें बोलोनि गौतम मुनी ।। गेला जनकाच्या यागालागुनी ।। कल्माषपाद तेचि क्षणीं ।॥ गोकर्णक्षेत्रीं पातला ॥१८२॥ शिवरात्रीस दिव्य लिंग ।। मित्रसहरायें पूजिलें सांग ।। अंतरीं सप्रेम अनुराग ॥ उमारंग संतोषला ॥१८३॥

ती ते चाचपून पाहात असताना तिच्या लक्षात आले की, ही खाण्याची वस्तू नाही, म्हणून तिने रागारागाने ते बेलाचे पान समोर भिरकावून दिले. नेमके ते पान हे शिवपिंडीवर जाऊन पडले. ।।१७६ ।। याप्रकारे तिला नेमके शिवरात्रीच्या निमित्ताने शिवपूजन, बिल्वपत्र अर्पण, उपवास आणि पवित्र स्थानाचा निवास घडला. ।।१७७ || ती चांडाळीण तिथे एका वडाच्या झाडाखाली पडली असताना तिच्या कानी लोक उच्चारीत असलेल्या शिवनामाचा गजर येत होता. तीसुद्धा तेच नाम स्मरत होती. ।। १७८ ।। गौतम ऋषी म्हणाले की, हा असा तिचा पूर्व इतिहास सांगितल्यावर शिवगण म्हणाले की, त्या चांडाळणीस हेच पुण्य लाभले म्हणून शिवांनी तिच्यासाठी हे विमान पाठविले आहे. असे म्हणून त्यांनी तिला त्या विमानात घेताच शिवस्मरण करणाऱ्या चांडाळणीचा देह दिव्य झाला. ।।१७९ ।। आपला सारा पूर्व इतिहास आठवत असताना शिवनामाचा जप करीत ती शिवलोकी गेली आणि शिवपदास जाऊन पोहोचली. ।।१८० ।। हा कथाभाग सांगून गौतम ऋषी राजास म्हणाले, “हे राजा, माझाही तुला हाच सल्ला आहे की, तू त्या पुण्यपावन अशा गोकर्ण क्षेत्री जा. तिथे शिवरात्रीस शिवाची बिल्वपत्राने शिवाराधना कर. पार्वतीपती महादेव तुझे कल्याण करील. तू शापमुक्त होशील.”।।१८१।। इतके सांगून गौतम ऋषी हे जनकाकडच्या त्या यज्ञकार्यासाठी निघून गेले. इकडे तो राजा हा ऋषिवरांच्या मार्गदर्शनाप्रमाणे गोकर्ण क्षेत्री येता झाला. ||१८२ ।। मित्रसह राजाने त्या क्षेत्री निवास केला. शिवरात्र पर्वणी साधून शिवोपासना केली. त्याच्या भक्तीवर भगवान शिव संतुष्ट झाले. ।।१८३।।


ब्रह्महत्येचें पातक विशेष ॥ जाऊनि राव झाला निर्दोष ।। तों कैलासाहूनि आदिपुरुष ।। पाठवीत दिव्य विमान ॥१८४॥ विमानीं बैसले शिवगण ।। परम तेजस्वी देदीप्यमान ।। अनंत विजांचे रस पिळोन ॥ मूर्ति ओतिल्या वाटतें ।॥ १८५ ॥ अनंत वाचें गर्जती एक वेळां । तेणें रंगसुरंग दाटला ।। दिव्यसुमनांच्या माळा ।। वर्षती वरूनि वृंदारक ॥ १८६ ॥ मित्रसह दिव्य देह पावोन ।। झाला दशभुज पंचानन ।। इंद्रचंद्रादिपदें ओलांडून ।। नेला मिरवत शिवपदा ।।१८७ ।। सरूपता मुक्ति पावोन ।। शिवरूपीं मिळाला आनंदघन ।। धन्य शिवरात्रिव्रत पावन ।। धन्य गोकर्ण शिवमंदिर ॥ १८८ ॥ गौतमऋषि परम धन्य ।। तेणें इतिहास सांगितला पावन ।। धन्य श्रोते तुम्ही सज्जन ।। श्रवणीं सादर बैसलां ।।१८९ ।। मानससरोवर वेष्टित ।। मराळ जैसे विराजित ।। कीं निधानाभोंवतें समस्त ।। साधक जैसें बैसती ॥१९० ॥ तरी पंडित तुम्ही चतुर ।। तुमचें अवधान दिव्यालंकार ॥ देवोनि गौरवा श्रीधर ॥ ब्रह्मानंदेंकरूनियां ॥ १९१ ॥ श्रीमद्भीमातटविलासा ।। ब्रह्मानंदा आदिपुरुषा ।। श्रीधरवरदा कैलासविलासा ॥ कथारस वदवीं पुढें ॥१९२॥ श्री शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड ॥ स्कंदपुराण ब्रह्मोत्तरखंड ॥ परिसोत सज्जन अखंड ॥ तृतीयाध्याय गोड हा ॥ १९३॥

श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु ॥

तेव्हा शिवकृपाप्रसादाने राजाच्या मागची ब्रह्महत्या दूर झाली. राजा शापमुक्त झाला. तेव्हा कैलासाहून भगवान शिवांनी तिथे एक दिव्य विमान पाठविले. ।।१८४।। त्या विमानात बसलेले शिवगण हे अत्यंत तेजस्वी आणि देदीप्यमान होते. अनेक विजांचा रस एकत्र करून त्याच्या तेजस्वी मूर्ती घडवाव्यात असे त्याचे देह होते. ।।१८५|| तेव्हा तिथे अनेक मंगल वाद्ये वाजू लागली. आनंदाचे वातावरण असताना आकाशातून देवदेवता पुष्पवृष्टी करू लागल्या. ।।१८६ ।। शिवकृपेने त्या मित्रसह राजाचा देह दिव्य झाला. त्यास शिवगणांनी मिरवत मिरवत चंद्रलोक, इंद्रलोक असे करीत शिवलोकी नेला. ।।१८७।। मित्रसह राजास सरूपता मुक्तीचा लाभ घडलेले ते क्षेत्र, तेथील शिवाराधना, पुण्यपावन असे शिव मंदिर हे खरोखरच श्रेष्ठ आहे. ।।१८८।। श्रीधर कवी म्हणतात की, धन्य ते गौतम ऋषी की, ज्यांनी राजास ह्या स्थानाचा दिव्य महिमा सांगितला. तोच मीही तुम्हास या अध्यायात निवेदन केला आणि तुम्ही त्याचे श्रवण केलेत. ||१८९|| ज्याप्रमाणे मानस सरोवराचे भोवती राजहंस बसलेले असतात तसे तुम्ही आर्त श्रवणार्थी आहात. १९०।। श्रोतेजनहो, आपण ज्ञानी पंडित आहात, तुम्ही अवधानरूपी दिव्यालंकार देऊन या श्रीधराचा गौरव करा. ।।१९१।। भीमातीरी शोभून दिसणाऱ्या हे ब्रह्मानंद आदिपुरुषा, श्रीधरास वर देणाऱ्या हे कैलासपती महादेवा, तू माझ्यावर कृपा कर आणि पुढील अध्यायाची उत्तम कथा वदवून घे. ।।१९२।। स्कंद पुराणातील ब्रह्मोत्तर खंडातल्या या श्री शिवलीलामृताचा हा तिसरा अध्याय इथे पूर्ण होतो. ।।१९३||

|| श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु ।।


Shree Shivleelamrut Adhyay Pahila
Shree Shivleelamrut Adhyay Pahila
Shree Shivleelamrut Adhyay Dusara
Shree Shivleelamrut Adhyay Dusara

अधिक माहितीसाठी आमच्या सोशल मीडिया ला फॉलो करा.

मराठी रसिक या आमच्या इंस्टाग्राम अकाउंट ला लाईक करा सुब्स्क्राईब करा. येथे तुम्हाला संपूर्ण माहिती मराठी मध्ये मिळते.

Scroll to Top