Shree Shivleelamrut Adhyay Dusara (Sar) । श्री शिवलीलामृत अध्याय दुसरा (सार)
श्रीसुत शौनकादिकांना पुढे सांगत होते. भगवान शंकर एवढा भोळा आहे की, ज्याने नामस्मरण व पूजा न जानता केली तरी तो भोलानाथ प्रसन्न होतो. महाशिवरात्रीव्रताचा महिमाही असाच आहे. त्याविषयी एक कथा सांगतात. विद्यनाम पर्वतावर एक व्याध राहात होता. त्याने अनेक पशुपक्षांची हत्या केल्यामुळे पापीष्ट झाला होता. एकादा भले पहाटे उठून आपली शस्त्रे घेऊन शिकारीसाठी जंगलात जात होता. तो दिवस नेमका महाशिवरात्रीचा होता. तो रस्त्याने जात असता अनेक लोक एका शिवालयात जमलेले दिसले तो थोडा वेळ तेथे थांबला. आणी हे पाहून लोकांना पाहत हसत शिवहरहर असे म्हणत जंगलात गेला. तेव्हा दिवसभर भटकूनही त्याला शिकारी मिळाली नाही. न कळत उपवास घडला रात्र झाली. रित्या हाती घरी परत कसे जावं म्हणून रात्र येथेच काढावी असा विचार करून एका सरोवराकाठी असलेल्या झाडावर चढला.
ते झाड बिल्ववृक्षाचे होते. स्वापदाची वाट पाहू लागला. डोळ्याआड आलेली बिल्वपत्र तोडुन खाली टाकु लागला. त्या झाडाखाली एक शिवलींग होते. ती पाने नेमकीत्यावर पडत होती व थट्टेने हरहर असे म्हणत होता. शिकारीची वाट पाहत होता म्हणून न कळत जागरण पडले. दिवसभर उपवास घडला व नकळत शिवपूजन नामस्मरण घडले. तो पापमुक्त झाला. तेव्हा एक हरिण तेथे आले व्याधाने धनुष्य जोडले. हे पाहुन हरण म्हणाली ! माझा काही दोष नसता का मारतोस त्यावर, मी गर्भिणी आहे. तीची मनुष्यवाणी ऐकून यात काही वैशिष्ट्य आहे. म्हणून तो म्हणाला ! तू परत जर आली नाही तर काय करू! हरणीने सर्व वृत्तांत सांगून शपत घेवून ती प्रसूत होऊन मी परत येते म्हणून व्याधाने तिला सोडले.
परत तो बिल्वदळ तोडून खाली टाकू लागला.थोड्यावेळाने आनखी दोन तिन हरणी येवून शपथा घेवून परत येवू म्हणून व्याधाने सोडून दिल्या. सकाळ झाली हरणाचा सर्व परीवार सरोवरा काठी आला व व्याधाचे हृदय कळवळले. तो त्यांना नमस्कार करून म्हणाला, मी तुमच्या दर्शनाने धन्य झालो आहे तुम्हीच माझे गुरू आहात. मला क्षमा करा इतक्यात तेथे दिव्य विमान आले व्याधाला शिवगनांनी विमानात बसविले तो दिव्य स्वरूप झाला तसेच सर्व हरीणासही पूर्व स्वरूप प्राप्त होऊन ते ही विमानात बसले सर्वांनी व्याघाची स्तुती कली. त्याला भगवान शंकरांनी पवित्र अक्षय स्थान दिले.
Shree Shivleelamrut Adhyay Dusara । श्री शिवलीलामृत अध्याय दुसरा
श्रीगणेशाय नमः ।। जेथें सर्वदा शिवस्मरण ।। तेथें भुक्ति मुक्ति सर्वकल्याण ।। नाना संकटें विघ्नें दारुण ।। न बाधती कालत्रयीं ।। १ ।। संकेतें अथवा हास्येंकरून ।। भलत्या मिसें घडो शिवस्मरण ।। न कळतां परिसासी लोह जाण ।। संघटतां सुवर्ण करी कीं ॥ २ ॥ न कळतां प्राशिलें अमृत ।। परी अमर करी कीं यथार्थ ।। औषधी नेणतां भक्षित ।। परी रोग सत्य हरी कीं ।॥ ३ ॥ शुष्कतृणपर्वत अद्भुत ॥ नेणतां बाळक अकस्मात ।। अग्निस्फुल्लिंग टाकीत ।। परी भस्म यथार्थ करी कीं ॥४॥ तैसें न कळतां घडे शिवस्मरण ।। परी सकळ दोषां होय दहन ।। अथवा विनोदेंकरोन ।। शिवस्मरण घडो कां ।।५।। हे कां व्यर्थ हांका फोडिती ॥ शिव शिव नामें आरडती ।। अरे कां हे उगे न राहती ।। हरहर गर्जती वेळोवेळां ॥ ६ ।। शिवनामाचा करिती कोल्हाळ ॥ माझें उठविलें कपाळ ॥ शिव शिव म्हणतां वेळोवेळ ।। काय येतें यांच्या हातां ।।७।। ऐसी हेळणा करी क्षणक्षणीं ।। परी उमावल्लभनाम ये वदनीं ।। पुत्रकन्यानामेंकरूनी ।। शिवस्मरण घडो कां ॥८॥
श्री गजानन, देवी सरस्वती, श्री सद्गुरूनाथ आणि श्री भगवान सांबसदाशिव ह्यांना नमस्कार असो. ज्या ठिकाणी सदैव शिवस्मरण चालते, तिथे भोगमुक्ती आणि आनंद व सर्व प्रकारचे कल्याण हे घडत असते. तिथे कोणत्याही प्रकारची संकटे किंवा बाधा ह्या टिकून राहात नाहीत ।।१।। हे शिवस्मरण गमतीने हास्य विनोदाने जरी घडले तरी जसा परिसाचा चुकून जरी स्पर्श झाला तरी लोखंडाचे सोने होते, त्याप्रमाणे इथेही उपासकाचे ह्या स्मरणाने कल्याणच घडते ||२|| समजा की नकळत औषध घेतले तरी रोग बरा होतो, अमृताचे प्राशन केले तर अमरत्व प्राप्त होतेच की? ॥३३॥ वाळलेल्या गवताच्या गंजीवर एखाद्या बालकाने अजाणतेपणे जरी काडी टाकली तरी ती गंजी जळून जातेच. ||४|| त्याप्रमाणे उपायकाच्या हातून अगदी अजाणतेपणे जरी शिवनामाचे स्मरण घडले, तर त्याच्या महादोषांचे निराकरण हे होतेच. इतकेच नव्हे तर अगदी सहज गमतीने, चेष्टेने जरी शिवनामाचा जप केला तरी जपकर्त्याचे कल्याणच घडत असते. ।।५।। हे लोक असा शिवनामाचा गजर का करत आहेत? ते गप्प का राहात नाहीत. ते हर हर महादेव अशी गर्जना, शिव शिव असे उच्चारण का बरे करतात ? ।।६।। हा असा नामाचा गलबला माजवून या लोकांनी तर माझे डोके उठवले आहे. त्यांना हे असे सतत शिव शिव म्हणून काय लाभ होणार आहे हेच कळत नाही. ।।७।। या आणि अशाप्रकारे त्या शिवनामाची, जपाची निर्भर्त्सना करत असताना जरी ते शिवनाम मुखी आले. मुलामुलीच्या नावाने त्यांना हाका मारताना जरी हे शिवनाम मुखी आले तरीदेखील उत्तमच।।८।।
महाप्रीतीनें करितां शिवस्मरण ।। आदरें करितां शिवध्यान ।। शिवस्वरूप मानूनि ब्राह्मण ।। संतर्पण करी सदा ।।९ ।। ऐसी शिवीं आवडी धरी ।। त्याहीमाजी आली शिवरात्री ।। उपवास जागरण करी ।। होय बोहरी महत्पापा ।॥१०॥ ते दिवशीं बिल्वदळें घेऊन ॥ यथासांग घडलें शिवार्चन ।। तरी सहस्रजन्मींचें पाप संपूर्ण ॥ भस्म होऊन जाईल ॥ ११ ॥ नित्य बिल्वदळे शिवासी वाहत ।। त्याएवढा नाहीं पुण्यवंत ।। तो तरेल हें नवल नव्हे सत्य ॥ त्याच्या दर्शनें बहुत तरती ।।१२।। प्रातःकाळीं घेतां शिवदर्शन ।। यामिनीचें पाप जाय जळोन ।। पूर्वजन्मींचे दोष गहन ।। माध्याह्रीं दर्शन घेतां नुरती ॥१३॥ सायंकाळीं शिव पाहतां सप्रेम ।। सप्तजन्मींचें पाप होय भस्म ।। शिवरात्रीचा महिमा परम ।। शेषही वर्ण शकेना ॥१४॥ कपिलाषष्ठी अर्थोदय संक्रमण ।। महोदय गजच्छाया ग्रहण ।। इतुकेही पर्वकाळ ओंवाळून ।। शिवरात्रीवरूनि टाकावे ॥ १५ ॥ शिवरात्री आधींच पुण्यदिवस ।। त्याहीवरी पूजन जागरण विशेष ।। त्रिकाळपूजा आणि रुद्रघोष ॥ त्याच्या पुण्यासी पार नाहीं ॥ १६ ॥ वसिष्ठ विश्वामित्रादि मुनीश्वर ।। सुरगण गंधर्व किन्नर ॥ सिद्ध चारण विद्याधर ।। शिवरात्रिव्रत करिताती ।।१७।।
तशातच जर कोणी खरोखरच मनापासून हे नाम जपेल, शिवध्यान करेल, ब्राह्मणास शिवरूप मानून त्यास भोजन देईल, तर उलट फारच उत्तम ।।९।। अशाप्रकारे शिवनामाची आवड मनी बाळगली, त्यातच भरीस भर शिवरात्रीचा उपवास केला, जागरण घडले तर अशा भक्तभाविकांची सर्व महापापेही जळून भस्मसात होतात. ||१०|| शिवरात्रीच्या मुहुर्तावर जर बिल्वपत्रे वाहून शिवाचे पूजन घडले, नामस्मरण घडले तर हजारो जन्मांतली पापे भस्मसात होतात. ।।११।। नित्यनेमाने बिल्वपत्रांनी शिवाचे पूजन करणारी व्यक्ती ही पुण्यवान मानावी. तो स्वतः तर या भवसागरातून तरून जातोच; पण त्या पुण्यवान व्यक्तीच्या दर्शनाने इतरांचाही उद्धार होतो. ।।१२।। प्रातःकाळी शिवाचे दर्शन घेतल्यास रात्रीच्या समयी घडलेली, माध्यान्ह काळी दर्शन घेतल्यास पूर्वजन्मीची घोर अशी पातकेही नाहीशी होतात. ||१३|| संध्यासमयी शिवाचे दर्शन घेतले असता सप्तजन्मीच्या पापांचा नाश होतो. शिवरात्रीचे माहात्म्य वर्णन करण्यासाठी शेषासही शक्य होत नाही. ।।१४।। एका शिवरात्रीचे महत्त्व इतके आहे की, त्यावरून कपिलाषष्ठी, अध्रोदय, संक्रांत, महोदय, गजछाया, सूर्य आणि चंद्राचे ग्रहण यासारख्या पुण्यपावन पर्वणी काळही ओवाळुन टाकावा. मुळातच शिवरात्र हा महान पुण्यकारक असा दिवस आहे. त्या दिवशी शिवदर्शन, पूजन, शिव नामस्मरण, जागरण इत्यादी घडल्यास जे पुण्य पदरी पडते; त्या पुण्यास पार नाही. ।।१६।। प्रत्यक्ष वसिष्ठ, विश्वामित्र, गर्ग, आदी ऋषीमुनी, देवदेवता, देवगण, यक्ष, किन्नर सिद्ध विद्याधर इ. मंडळी ही आवर्जून हे शिवरात्रीचे व्रत करतात. ।।१७।।
यदर्थी सुरस कथा बहुत ।। शौनकादिकां सांगे सूत ।। ती श्रोतीं ऐकावी सावचित्त ।। अत्यादरें करूनियां ॥१८॥ तरी मासांमाजी माघमास ॥ ज्याचा व्यास महिमा वर्णी विशेष ।। त्याहीमाजी कृष्णचतुर्दशीस ।। मुख्य शिवरात्रि जाणिजे ॥१९॥ विंध्याद्रिवासी एक व्याध ।। मृगपक्षिघातक परमनिषिद्ध ।। महानिर्दय हिंसक निषाद ॥ केले अपराध बहु तेणें ॥ २० ॥ धनुष्यबाण घेऊनि करीं ।। पारधीस चालिला दुराचारी ॥ पाश वागुरा कक्षेसी धरी ॥ कवच लेत हरितवर्ण ॥२१॥ करी गोधांगुलित्राण ।। आणिकही हातीं शस्त्रसामुग्री घेऊन । काननीं जातां शिवस्थान ।। शोभायमान देखिलें ॥२२॥ तंव तो शिवरात्रीचा दिन ॥ यात्राआली चहूंकडून ॥ शिवमंदिर श्रृंगारून ।। शोभा आणिली कैलासींची ॥ २३ ॥ शुद्धरजतमगटवर्ण ।। देवालय झळके शोभायमान ।। गगनचुंबित ध्वज पूर्ण ।। रत्नजडित कळस तळपताती ॥२४॥ मध्यें मणिमय शिवलिंग ।। भक्त पूजा करिती सांग ।। अभिषेकधारा अभंग ।। विप्र धरिती रुद्रघोर्षे ॥ २५ ॥ एक टाळ मृदंग घेऊन ।। सप्रेम करिती शिवकीर्तन ॥ श्रोतें करटाळी वाजवून ।। हरहर शब्दें घोष करिती ।॥ २६ ॥
श्रीधर कवी म्हणतात की, यासंदर्भात सूतांनी जी एक अत्यंत सुंदर अशी कथा शौनकादिकांना सांगितली. तीच कथा आता मी तुम्हा श्रोत्यांना सांगतो. तुम्ही ती एकाग्र चित्ताने श्रवण कर. ||१८|| सर्व मासांमध्ये माघ मास हा अत्यंत थोर असे व्यासांनीच सांगून ठेवले आहे. त्यातही कृष्ण चतुर्दशी हा दिवस म्हणजे महाशिवरात्रीचा पर्वकाळ असे सांगितले आहे. ।।१९।। विंध्य पर्वताच्या परिसरात एक पारधी राहात होता. तो अतिशय क्रूर आणि हिंसक वृत्तीचा होता. तो अनेक निरपराध प्राण्यांची हिंसा करीत असे. ||२०|| एकदा हा दुराचारी पारधी वनात शिकारीसाठी चालला होता. त्याने हरित वस्र परिधान केले होते. त्याच्या खांद्यास धनुष्यबाण आणि सावज पकडण्याचे जाळे होते. ।।२१।। असा हा हाती दोरी, शस्त्रे इत्यादी वस्तू घेऊन शिकारीस निघालेला पारधी या वनात चाललेला असताना त्याने वाटेत एक शोभिवंत असे शिवमंदिर पाहिले. ।।२२।। तो नेमका महाशिवरात्रीचा दिवस असल्याने त्या मंदिरात शिवभक्तांची मोठी यात्रा जमली होती. संपूर्ण शिवमंदिर हे उत्सवाच्या निमित्ताने सुशोभित करण्यात आले होते. त्यास जणू प्रति कैलासाची दिव्य शोभा प्राप्त झाली होती. ॥२३॥ ते शिवमंदिर शुद्ध चांदीसारखे चमकदार दिसत होते. त्याचा रत्नजडित कळस शोभुन दिसत होता. तर कळसावरची ध्वजा ही आकाशात डौलाने फडकत होती. ||२४|| मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात मणिमय असे शिवलिंग होते, भक्तभाविक त्याची मनोभावे पूजा करीत होते. एकीकडे रुद्राचा घोष चालू होता, तर दुसरीकडे त्या शिवलिंगावर सतत अभिषेकाची जलधारा पडत होती. ॥२५॥ मंदिरात कोणी टाळ मृदंगावर शिवकीर्तन करीत होते, तर कोणी हर हर असा जयघोष करीत होते ॥२६॥
नाना परिमळद्रव्यसुवास ।। तेणें दशदिशा दुमदुमिल्या विशेष ।॥ लक्ष दीपांचे प्रकाश ।। जलजघोष घंटारव ।। २७ ।। शशिमुखा गर्जती भेरी ।। त्यांचा नाद न माये अंबरी ।। एवं चतुर्विध वाद्ये नानापरी ।। भक्त वाजविती आनंदै ॥ २८ ॥ तों तेथे व्याध पातला ।। समोर विलोकी सर्व सोहळा ।। एक मुहूर्त उभा ठाकला ।। हांसत बोलिला विनोदें ।॥ २९ ॥ हे मूर्ख अवघे जन ।। येथे द्रव्य काय व्यर्थ नासोन ।। आंत दगड बाहेर पाषाण ।। देवपण येथे कैंचें ॥ ३० ॥ उत्तम अन्न सांडून ।। व्यर्थ कां करिती उपोषण ।। ऐसिया चेष्टा करीत तेथून ।। काननाप्रती जातसे ॥ ३१ ॥ लोक नामें गर्जती वारंवार ।। आपणही विनोदें म्हणे शिव हरहर ।। सहज सव्य घालूनि शिवमंदिर ।। घोर कांतार प्रवेशला ॥३२॥ वाचेसी लागला तोचि वेध ।। विनोदें बोले शिव शिव शब्द ।। नामप्रतापें दोष अगाध ॥ झडत सर्व चालिले ॥३३॥ घोरांदर सेवितां वन ।। नाढळतीच जीव लघुदारुण ।। तों वरुणदिग्वधूचें सदन ।। वासरमणि प्रवेशला ।। ३४ ।। निशा प्रवर्तली सबळ ।। कीं ब्रह्मांडकरंडां भरलें काजळ ।। कीं विशाळ कृष्णकंबळ – ।। मंडप काय उभारिला ।। ३५ ।।
नाना प्रकारच्या सुगंधी द्रव्यांच्या सुगंधाने, पुष्पांनी सारा परिसर सुगंधित झालेला होता. मंदिरात असंख्य दीप उजळलेले होते. तिथे एक सारखा शंख आणि घंटानाद चालू होता ||२७|| मंदिरात विविध वाद्य वाजत होती आणि सर्वत्र शिव नामाचा एकच जयघोष चालू होता ॥२८॥ अशा त्या शिवमंदिराजवळ तो पारधी आला. त्याने ते सुशोभित मंदिर, ती भाविकांची गदीं पाहिली. ते पाहून तो काहीशा चेष्टेने तिथे थोडा उभा राहिला. तो सर्व प्रकार त्याने पाहिला आणि तो स्वतःच्या मनाशीच म्हणू लागला. ।। २९।। काय हे लोक वेडे आहेत ते आपले द्रव्य, वेळ इथे या पाषाणाची पूजा करण्यात का वाया घालवत आहेत? याचा काही उपयोग आहे का? ।।३०।। काय है लोक उत्तम अन्न खायचे सोडून उपास काय करतात? हे असे पूजा, भजन, नामस्मरण काय करतात? काय तर म्हणे शिव शिवः ||३१|| असे म्हणत सहज त्याने त्या मंदिरास उजवी घातली आणि तो आपला त्याच्या शिकारीच्या कामासाठी वनाच्या दिशेने निघून गेला ।।३२।। त्या पारध्याने त्या लोकांना जे शिव शिव नाम उच्च्चारताना ऐकले होते; तेच शिवनाम थट्टेने, चेष्टेने, मस्करीने घेत घेत तो पारधी शिकारीसाठी त्या दाट जंगलात शिरला ।।३२।। काहीशा चेष्ठेने, थट्टेने तो पारधी ते जे शिव शिव असे नाम तोंडाने म्हणत होता. त्या नामाचाच त्याला चाळा लागला. तो तेच नाम जपत त्या वनात शिकारीसाठी निघाला. ||३३|| त्या दिवशी तो त्या घनदाट अशा अरण्यात शिरला खरा, पण त्याला संपूर्ण दिवसात हवी तशी एकही शिकार मात्र मिळाली नाही. ||३४|| हळूहळू संध्याकाळ होत आली. घरती रात्रीची काळी चादर ओढून घेऊ लागली. ।।३५।।
विगतधवा जेवीं कामिनी ।। तेवीं न शोभे कदा यामिनी ।। जरी मंडित दिसे उडुगणीं ।। परी पतिहीन रजनी ते ॥३६॥ जैसा पंडित गेलिया सर्भेतून ॥ मूर्ख जल्पती पाखंडज्ञान ॥ जेवी अस्ता जातां सहस्रकिरण ।। उड्डुगणें मागें झळकती ॥ ३७ ॥ असो ऐसी निशा दाटली सुबद्ध ।। अवघा वेळ उपवासी निषाद ।। तों एक सरोवर अगाध ॥ दृष्टीं देखिलें शोधितां ॥ ३८ ॥ अनेक संपत्ती सभाग्यसदनीं ।। तेवीं सरोवरीं शोभती कुमुदिनी ।। तटीं बिल्ववृक्ष गगनीं ।॥ शोभायमान पसरला ॥ ३९ ॥ योगभ्रष्ट कर्मभूमीसी पावती जनन ।। तेवीं बिल्वडाहाळिया गगनींहून ॥ भूमीसी लागल्या येऊन ।। माजी रविशशिकिरण न दिसे ॥४०॥ त्यांत तम दाटलें दारुण । माजी बैसला व्याध जाऊन ।। शरासनीं शर लावून ।। कानाडी ओडोन सावज लक्षी ॥ ४१ ॥ दृष्टीं बिल्वदळे दाटली बहुत ।। तीं दक्षिणहस्तें खुडोनि टाकीत ।। तो तेथे पद्मजहस्तें स्थापित ।। शिवलिंग दिव्य होतें ॥४२ ।। त्यावरी बिल्वदळे पडत ।। तेणें संतोषला अपर्णानाथ ।। व्याधासी उपवास जागरण घडत ।। सायास न करितां अनायासें ।॥४३।।
ती रात्र म्हणजे एखाद्या सुंदर, पण विधवेसारखी वाटत होती. त्या रात्री आकाशात नक्षत्रे होती, पण रजनीच्या भाळावरचा चंद्रमा मात्र नव्हता. ॥३६॥ ज्याप्रमाणे भरसभेतून विद्वान पंडित निघून गेल्यावर मग पाखंडी लोक आपले ज्ञान पाजळू लागतात, तसा सूर्याचा अस्त झाल्यावर नक्षत्रे चमकू पाहात होती. ||३७|| अशा या रात्री तो पारधी मात्र उपाशी होता, कष्टी होता. मनासारखी शिकार मिळाली नाही. तो निराश होता. तोच त्यास एक सरोवर दिसले ||३८|| ते सरोवर एखाद्या भाग्यवंत माणसाच्या घरात जशी अनेक प्रकारची संपत्ती असावी तसे नाना प्रकारच्या कमळांनी ते सरोवर भरलेले व सुशोभित होते ।।३९।।
जसे योगभ्रष्टांनी प्रारब्ध भोगण्यासाठी धरणीवर जन्म घ्यावा, तसे मोठमोठे विशाल बिल्ववृक्ष हे आकाशातून फांद्याच्या रूपाने खाली झुकले होते. त्यामुळे सूर्य किंवा चंद्राचा प्रकाश हा खाली पोहचत नव्हता. ।।४० ।। अशा त्या अंधारात तो पारधी शिकारीच्या आमिषाने सरोवराकाठच्या एका वृक्षावर चढून कोणी श्वापद सरोवरावर पाणी पिण्यास येतेय काय, ह्याची वाट पाहात बसला. ॥४१॥ नेमकी त्याच्यासमोर एक वृक्षाची फांदी आणि पाने येत होती, म्हणून त्याने त्या फांदीची पाने खुडून ती वृक्षाखाली टाकायला सुरुवात केली. नेमके त्याच वृक्षाच्या खाली श्री ब्रह्मदेवांनी स्थापन केलेले एक शिवलिंग होते ।।४२।। सहज चाळा म्हणून मुखाने शिवनाम घेत तो पारधी जी पाने खुडून खाली टाकत होता ती पाने नेमकी बेलाचीच होती अन् ती त्या वृक्षाखालच्या शिवपिंडीवर अवचित पडत होती. त्या पूजेने अपर्णानाथ हे त्याच्यावर प्रसन्न होत होते. त्यातच त्यास उपवास आणि जागरणही घडत होतेच. ।।४३ ।।
वाचेसी शिवनामाचा चाळा ।। हर हर म्हणे वेळोवेळां ।। पापक्षय होत चालिला ।। पूजन स्मरण सर्व वाचेसी घडलें ।।४४ ।। एक याम झालिया रजनी ।। तों जलपानालागीं एक हरिणी। आली तेथे ते गर्भिणी ॥ परम सुकुमार तेजस्वी ॥४५ ॥ व्याध तिनें लक्षिला दुरून ।। कृतांतवत् परम दारुण ।। आकर्ण ओढिला बाण ।। देखोनि हरिणी बोलतसे ॥ ४६ ॥ म्हणे महापुरुषा अन्यायाविण ।। कां मजवरी लाविला बाण ।। मी तंव आहे गर्भीण ।। वध तुवां न करावा ॥ ४७ ॥ उदरात गर्भ सूक्ष्म अज्ञान ।। वधितां दोष तुज दारुण ।। एक रथभरी जीव वधिता सान ॥ तरी एक बस्त वधियेला ॥४८ ।। शत बस्त वथितां एक ॥ वृषभहत्येचे पातक ।। शत वृषभ तैं गोहत्या देख ।। घडली शास्त्र वदतसे ।।४९ ।। शत गोहत्येचे पातक पूर्ण ।। एक वधितां होय ब्राह्मण ।। शत ब्रह्महत्येचें पातक जाण ।। एक स्त्री वधिलिया ॥५०॥ शत स्त्रियांहूनि अधिक ॥ एक गुरुहत्येचें पातक ॥ त्याहूनि शतगुणी देख ।। गर्भिणी एक वधिलिया ।।५१ ।। तरी अन्याय नसतां ये अवसरीं ।। मज मारिसी कां वनांतरी ॥ व्याध म्हणे कुटुंब घरीं ।। उपवासी वाट पाहत ।। ५२ ।।
तो मुखाने जे शिवनाम जपत होता त्यामुळे त्याच्या पापांचा नाश होत होता. नकळत त्याचे हातून शिवनामस्मरण आणि शिव बिल्व पूजन घडत होते. ।।४४।। अशाप्रकारे त्याचा हा उपक्रम चालू असताना रात्रीचा एक प्रहर निघून गेला. त्याच वेळी अचानक एक सुंदर आणि गर्भवती असलेली एक हरिणी तिथे पाणी पिण्यासाठी आली. ।।४५।। त्या हरणीस पाहताच पारध्याने आपल्या हातातील धनुष्याची दोरी ओढली, बाण सज्ज केला. तेव्हा त्या हरणीस तो पारधी यमासारखा भासला. तेव्हा त्याच्याकडे पाहात ती हरिणी मनुष्यवाणीने त्यास म्हणाली. ।।४६।। “हे महापुरुषा, अरे मी तर तुझा कोणताच अपराध केलेला नाही. मग तू माझी शिकार का करतोस? हे बघ, मी गर्भवती आहे, तू मला मारू नकोस. माझी शिकार करू नकोस. ।।४७।। तू माझ्यासह माझ्या उदरातील गर्भाचा वध केलास, तर तुला महान पाप लागेल. एक रथ भरून शूद्र जीवांना मारणे हे एका बोकडास मारण्यासारखे असते. ।।४८।। शंभर बोकड मारले तर एक बैल आणि शंभर बैल मारले तर एक गाय मारल्यासारखे असते, हे शास्त्र वचन तुला माहीत नाही का रे? ।।४९।। शत गायींचा वध हा एका ब्राह्मणाच्या वधासारखा असतो. शंभर ब्राह्मणांचा वध हा एका स्त्रीच्या वधासारखा असतो रे॥५०॥ शत स्त्रियांच्या हत्येहूनही अधिक पाप हे एका गुरूच्या हत्येने लागते. गुरूची हत्या करण्यापेक्षा शंभरपट अधिक पाप हे एका गर्भवतीचा वध केला असता लागते. ।।५१।। असे असताना मी निरपराध असताना तू मात्र माझी शिकार का करतो आहेस? त्यावर तो पारधी तिला म्हणला, कारण घरी माझे कुटुंब, मुले ही उपाशी आहेत, ती माझी वाट पाहात आहेत. ॥५२॥
मीही आजि निराहार ।। अन्न नाहींच अणुमात्र ।। परी मृगी होऊनि सुंदर ।। गोष्टी वदसी शास्त्रींच्या ॥५३॥ मज आश्चर्य वाटतें पोटीं ।॥ नराऐशा सांगसी गोष्टीं ।॥ तुज देखोनिया दृष्टीं ।। दया हृदयीं उपजतसे ॥५४॥ पूर्वी तूं होतीस कोण ॥ तुज एवढें ज्ञान कोठून ।। तूं विशाळनेत्री रूपलावण्य ।। सर्व वर्तमान मज सांगे ॥५५ ।। मृगी म्हणे ते अवसरीं ।। पूर्वी मंथन करितां क्षीरसागरीं ।। चतुर्दश रत्नें काढिली सुरासुरीं ।। महाप्रयत्लेंकरूनियां ॥५६ ।। त्यांमाजी मी रंभा चतुर ।। मज देखोनि भुलती सुरवर ।। नाना तपें आचरोनि अपार ।। तपस्वी पावती आम्हांतें ।॥ ५७ ॥ म्यां नयनकटाक्षजाळे पसरून ।। बांधिले निर्जरांचे मनमीन ।। माझिया अंगसुवासा वेधून ॥ मुनिभ्रमर धांवती ॥ ५८ ॥ माझे गायन ऐकावया सुरंग ॥ सुधापानी धांवती कुरंग ।। मी भोगीं स्वर्गांचे दिव्य भोग ।। स्वरूपें न मानीं कोणासी ॥५९ ॥ मद अंगीं चढला बहुत ।। शिवभजन टाकिलें समस्त ।। शिवरात्री सोमवार प्रदोषव्रत ।। शिवार्चन सांडिले म्यां ॥६०॥ सोडोनियां सुधापान ।। करूं लागलें मद्यप्राशन ।। हिरण्यनामा दैत्य दारुण ।। सुर सोडोनि रतलें त्यासीं ।। ६१ ।।
तसे आज भीही दिवसभर उपाशीच आहे. हे हरिणी, तरीही मला मात्र एका गोष्टीचे नवल वाटते आहे की, तू मात्र एक पशू असून, तू या सर्व शास्त्राच्या नीती आचरणाच्या गोष्टी कशा केल्यास ? ।।५३।। एखाद्या मानवाप्रमाणे तुला असलेले हे शास्त्राचे ज्ञान ऐकून, पाहून मी आश्चर्यचकित झालो आहे. तू या गोष्टी कशा करू शकतेस? तुला पाहून माझ्या मनात दया का निर्माण होते आहे? ।।५४।। “हे हरिणी, तू नेमकी कोण आहेस? तुला हे सारे ज्ञान कुठून आणि कसे बरे आप्त झाले आहे? तू इतकी सुंदर आणि ज्ञानी कशी आहेस? हे तू मला सांग. “।॥५५॥॥ तेव्हा त्या पारध्याच्या त्या प्रश्नाचे उत्तर देताना ती हरिणी त्यास म्हणाली, “पूर्वी सागर मंथनाचे वेळी देव आणि दैत्य ह्यांनी सागर मंथनातून चौदा रत्ने बाहेर काढली हे तुला माहीत आहे ना?”।।५६।। त्यामध्ये रंभा नावाचे जे रत्न वर निघाले ती मीच. मला पाहून देवदेवतांनाही भुल पडते. नाना प्रकारची तपसाधना करणारे लोकही आमच्यापाशी येतात. ।।५७।।
मी माझ्या नेत्रकटाक्षाने अनेक देवांना घायाळ केले आहे, मोहित केले आहे. माझ्या अंगाचा सुवास हा मुनिरूपी भ्रमरांना माझ्याकडे ओढून आकर्षित करून आणत असतो. ।। ५८ ।। माझे गायन ऐकायला कुरंग येत. मी स्वर्गीय सुखभोग भोगत होते. मला नकळत माझ्या सौंदर्याचा, तारुण्याचा, रूपाचा गर्व झाला. मी कोणास जुमानिशी झाले. ।। ५९।। माझ्या अंगी जो माज चढला त्याचा परिणाम म्हणूनच की काय, पण मी शिवभजन, शिवस्मरण, चिंतन ह्यापासूनही परावृत्त झाले. ।। ६० ।। शिव नामामृताचे अमृतपान करायचे सोडून मी प्रत्यक्ष मद्यपान करू लागले. देवांशी अंगसंग करायचे सोडून मी एका हिरण्य नावाच्या दैत्याबरोबर रममाण झाले. ।।६१।।
ऐसा लोटला काळ अपार । मृगयेसी गेला तो असुर ॥ त्या दृष्टासंगे अपर्णावर – ॥ भजनपूजन विसरलें ॥ ६२ ॥ मनासी ऐसें वाटलें पूर्ण ॥ असुर गेला मृगयेलागून ॥ इतुक्यांत घ्यावें शिवदर्शन ।। म्हणोनि गेलें कैलासा ॥ ६३ ॥ मज देखतां हिमनगजामात ।। परम क्षोभोनि शाप देत ।। तूं परम पापिणी यथार्थ ।। मृगी होई मृत्युलोकीं ॥६४॥ तुझ्या सख्या दोघीजणी ॥ त्या होतील तुजसवें हरिणी ।। हिरण्य असुर माझिये भजनीं ।॥ असावध सर्वदा ॥ ६५ ॥ तोही मृग होऊनि सत्य ।। तुम्हांसींचि होईल रत ।। ऐक व्याधा सावचित्त ।। मग म्यां शिव प्रार्थिला ।। ६६ ।। हे पंचवदना विरूपाक्षा ।। सच्चिदानंदा कर्माध्यक्षा ।। दक्षमखदळणा सर्वसाक्षा ।। उःशाप देई आम्हांते ॥६७॥ ॥ भोळा चक्रवर्ती दयाळ ।। उःशाप वदला पयःफेनधवल ।। द्वादश वर्षे भरता तात्काळ ।। पावाल माझिया पदातें ॥६८॥ मग आम्ही मृगयोनीं ।। जन्मलों ये कर्मअवनीं ।। मी गर्भिणी आहे हरिणी ।। प्रसूतकाळ समीप असे ॥६९॥ तरी मी आपुल्या स्वस्थळा जाऊन ।। सत्वर येतें गर्भ ठेवून ॥ मग तूं सुखें घेई प्राण ॥ सत्य वचन है माझें ॥७० ।।
अशाप्रकारे बराच मोठा काळ वाया गेला. एक दिवस तो हिरण्य दैत्य शिकारीसाठी दूर गेला, त्या दुष्टाच्या नादी लागून मी माझ्या शिवभजन, पूजन ह्या हितकारी गोष्टी पार विसरून गेले होते. ।।६२।। आणि अचानकपणे मला माझ्या उपास्य दैवताची, भगवान शिवांची आठवण आली. तो दैत्य दूर गेलेला होताच, मी तीच संधी साधून कैलास पर्वतावर भगवान शिवांचे दर्शनास गेले. ।।६३।। पण मला समोर पाहताच भगवान माझ्या त्या निंद्य कृत्यामुळे माझ्यावर क्रोधित झाले. त्यांनी मला शाप दिला की, हे रंभे, तू भूलोकी हरिणी होशील. ।।६४।। तुझ्याबरोबरच तुझ्या दोघी सख्या आणि माझ्या शिव भजनापासून जो सदैव दूर असतो तो हिरण्य राक्षस तुम्ही सर्वजण मृगयोनीत जन्मास जाल. ।। ६५ ।। तो राक्षसही हरिण होऊन तुमच्याशीच रममाण होईल. हा शाप ऐकताच मी भगवान शिवास शरण गेले. मी त्यांना प्रार्थना केली की।।६६।। हे भोलेनाथा, हे सदाशिवा, मला माझ्या दुष्कर्माचा पस्तावा होतो आहे. तू सर्व कर्मांचा साक्षीदार आहेस. हे देवा, तू माझ्यावर कृपा कर आणि आम्हास उःशाप दे.।। ६७|| तेव्हा भगवान भोलेनाथ म्हणाले, “बारा वर्षे पूर्ण होताच तुम्ही माझ्या चरणाशी याल आणि तुमचा उद्धार होईल” ।।६८।। हे पारध्या, त्यानंतर आम्ही त्या शिव शापाप्रमाणे सर्वजण ह्या मृग योनीत जन्मास आलो. हे महापुरुषा, मी गर्भवती आहे. माझा प्रसूत काळही आता अगदीजवळ आलेला आहे. ।। ६९।। तेव्हा तू मला परवानगी दे मी स्वस्थानी जाते, या गर्भास जन्म देते आणि पुन्हा परत येते. मग तू माझी शिकार कर. मी तुला परत येण्याचे वचन देते. ।।७०।।
मृगी बोलिली सावचित्त ॥ त्यावरी तो व्याध काय बोलत ।। तूं गोड बोलसी यथार्थ ।। परी विश्वास मज न वाटे ॥७१ ॥ नानापरी असत्य बोलोन ॥ करावें शरीराचें संरक्षण ॥ हैं प्राणिमात्रासी आहे ज्ञान ।। तरी तूं शपथ वदें आतां ॥ ७२ ॥ महत्पापें उच्चारून ।। शपथ वर्दे यथार्थ पूर्ण ।। यावरी ते हरिणी दीनवदन ।। वाहत आण ऐका तें ॥७३॥ ब्राह्मणकुळीं उपजोन ॥ जो न करी वेदशास्त्राध्ययन ।। सत्यशौचवर्जित संध्याहीन ॥ माझे शिरीं पातक तें ॥७४॥ एक वेदविक्रय करिती पूर्ण ॥ कृतघ्न परपीडक नावडे भजन । एक दानासीं करिती विघ्न ।। गुरुनिंदाश्रवण एक करिती ॥ ७५ ॥ रमावर उमावरांची निंदा ॥ त्या पापाचीं मज होय आपदा ॥ दान दिधलें जे ब्रह्मावृंदा ॥ हिरोनि घेती माघारें ।॥७६ ।। एक यतिनिंदा करिती । एक शास्त्रं पाहती द्वैत निर्मिती ॥ नाना भ्रष्टमार्ग आचरती ॥ स्वधर्म आपुला सांडोनियां ॥ ७७ ॥ देवालयामाजी जाऊनी ।। हरिकथापुराणश्रवणीं ।॥ जे बैसती विड घेउनी ।। ते कोडी होती पापिये ॥ ७८ ॥ जे देवळांत करिती स्त्रीसंभोग । कीं स्त्री भ्रतारांसीं करित वियोग ।। ते नपुंसक होऊनि अभाग्य ।। उपजती या जन्मीं ॥७९॥
ती हरिणी बिचारी ते सारे अगदी मनापासून बोलत होती. त्यावर तो पारधी तिला म्हणाला, तू अत्यंत गोड बोलते आहेस. परत येईन असे वचन देते आहेस, पण मला हे खरे वाटत नाही. ।। ७१ || कारण नाना प्रकारचे असत्य भाषण करून स्वतःचे रक्षण करण्याचे ज्ञान हे प्रत्येक मात्रास असते. तू पण तसेच कशावरून करत नसशील? तरी तुझ्या शब्दावर विश्वास ठेवून मी तुला सोडावे असे वाटत असेल तर तू परत येशील अशी शपथ घे.।॥७२॥ तेव्हा मोठमोठ्या पापांची ग्वाही देत ती हरिणी मी पुन्हा परत येईन अशी शपथ घेऊ लागली. ।। ७३।। ती म्हणाली, “ब्राह्मण कुळात जन्म घेऊनही जो वेदशास्त्रे ह्यांचे अध्ययन करीत नाही, जो शुचिता पाळत नाही, जो स्नान संध्या करीत नाही. त्या ब्राह्मणास लागणारी सर्व पापे ही मला मी शपथ मोडली तर लागतील. ।। ७४|| द्रव्याच्या मोबदल्यात केलेले वेदपठण, दुसऱ्याचे न स्मरलेले उपकार, इतरांना विनाकारण दिलेली पीडा, कुणाच्या भजनात आणि दानात आणलेले विघ्न, गुरूची केलेली निंदाः ।।७५।। हरी आणि हर ह्याच्यात भेद केल्याने वाट्यास येणारी संकटे, दुसऱ्याचे हिरावून घेतलेले दान ह्या कर्मांची जी पापे आहेत ती सर्व मला लागतील. ।। ७६|| कोणा यतीची, संन्याशाची निंदा केल्याचे, देवतांमध्ये द्वैतभाव राखल्याचे, स्वधर्माचा त्याग केल्याचे पाप मला लागेल. || ७७|| देवळातील हरी कीर्तन श्रवणाचे वेळी विडा खाल्ल्याने जसे पापी लोकांच्या अंगावर क्जोद उठते.।।७८।। जे देवळासारख्या पवित्र स्थानी स्त्री संभोग करतात, जे पती आणि पत्नी यांना विभक्त करतात, ते अभागी जीव नपुंसक म्हणून जन्मास येतात. ।।७९।।
वर्मकर्मे निंदा करीत ॥ ते जगपुरीषभक्षक काग होत ।। शिष्यांसी विद्या असोनि न सांगत ।। ते पिंगळा होत निधरिं ॥८०॥ अनुचित प्रतिग्रह ब्राह्मण घेती ।। त्यानिमित्तं गंडमाळा होती ।। परोत्राच्यगच्या वळूनि आणिती ।। ते अल्पायुषी होती या जन्मीं ॥८१॥ जो राजा करी प्रजापीडण ।। तो या जन्मीं व्याघ्र कां सर्प होय दारुण ।। वृथा करी साधुछळण ।। निर्वंश पूर्ण होय त्याचा ।।८२ ।। स्त्रिया व्रतनेम करीत ।। भ्रतारासी अव्हेरीत ।। धनधान्य असोनि वंचित ।। त्या वाघुळा होती या जन्मीं ।॥८३॥ पुरुष कुरूप म्हणोनियां त्यागिती ।। त्या या जन्मीं बालविधवा होती ।। तेथेंही जारकर्म करिती ।। मग त्या होती वारांगना ।।८४ ॥ ज्या भ्रतारासी निर्भर्सिती ।। त्या दासी किंवा कुलटा होती ।। सेवक स्वामीचा द्रोह करिती ।। ते जन्मा येती श्वानाच्या ॥८५॥ सेवकांपासूनि सेवा घेऊन । त्यांचें न दे जो वेतन ।। तो अत्यंत भिकारी होऊन ।। दारोदारीं हिंडतसे ॥ ८६ ॥ स्त्रीपुरुष गुज बोलतां ।। जो जाऊनि ऐके तत्त्वतां ।। त्याची स्त्री दुरावे हिंडतां ।। अन्न न मिळे तयातें ॥८७॥ जे जारण मारण करिती ।। ते भूत प्रेत पिशाच होती ।। यती उपवासें पीडिती ।। त्यांतें दुष्काळ जन्मवरी ।।८८।।
जे दुसऱ्याच्या वर्मस्थानांची निंदा करतात ते लोक विष्ठा भक्षण करणारे कावळे होतात, जे स्वतःस असलेले ज्ञान हे शिष्यांना इतर जनांना सांगत नाहीत ते पिंगळा होतात. ।।८० ।। जे ब्राह्मण द्रव्यलोभापायी अयोग्य दानाचा स्वीकार करतात त्यांना गंडमाळाचे विकार होतात. जे दुसऱ्याच्या गोधनाची चोरी करतात ते अल्पायुषी होतात. ।।८१।। जो राजा आपल्या प्रजेचा छळ करतो तो पुढील जन्मी वाघाच्या किंवा सर्पाच्या योनीत जन्मास जातो. जो विनाकारण साधू-संतांचा छळ करतो, त्याचा वंश विस्तार होत नाही. ||८२|| ज्या स्त्रिया इकडे व्रताचरण करतात आणि दुसरीकडे पतीचा अनादर अव्हेर करतात, ज्या घरातील लोकांची फसवणूक करतात त्या स्त्रिया पुढील जन्मी वटवाघूळ होतात. ||८३||
आपला पती कुरूप आहे म्हणून ज्या स्त्रिया त्याचा त्याग करतात त्या बालविधवा होतात. तिथेही वामाचार करतात, कोणी तर चक्क वारांगना होतात. ।।८४|| ज्या स्त्रिया आपल्या पतीचा तिटकारा करतात, त्या दासी किंवा कुलटा होतात. जे सेवक मालकाशी द्रोह करतात ते श्वानाच्या जन्मास जातात. ।।८५।। जे सेवकाची सेवा तर घेतात, पण त्यास त्याचा मोबदला देत नाहीत, ते भिकारी होतात आणि दारोदार हात पसरत फिरतात. ।॥८६ ।। जे पती-पत्नीचा गुप्त संवाद ऐकतात, त्याची पत्नी त्यास सोडून निघून जाते. तो चतकोर अन्नासही मोदाद होतो. ||८७|| जे जारण मारण, उच्चाटन असे अघोरी मार्ग ते भूत, प्रेत, पिशाच्च योनीत जन्मास जातात. ।।८८||
स्त्री रजस्वला होऊनी ।। गृहीं वावरे जे पापिणी ।। पूर्वज रुधिरीं पडती पतनीं ।। त्या गृहीं देव पितृगण न येती ॥८९॥ जे देवाच्या दीपांचें तेल नेती ।। ते या जन्मीं निपुत्रिक होती ॥ ज्या रांधितां अन्न चोरोनि भक्षिती ।। त्या मार्जारी होती या जन्मीं ॥ ९० ॥ ब्राह्मणांसी कदन्न घालून ।। आपण भक्षिती षड्रसपक्वान्न ।। त्यांचे गर्भ पडती गळोन ॥ आपुलिया कर्मवशें ॥९१ ॥ जो मातापित्यांसी शिणवीत ।। तो ये जन्मीं मर्कट होत । सासूश्वशुरां स्नुषा गांजित ।। तरी बाळक न वांचे तियेचें ॥९२ ।। मृगी म्हणे व्याधालागून ।। जरी मी न ये परतोन । तरी हीं महत्पापें संपूर्ण ॥ माझ्या माथां बैसोत ॥९३॥ हे मिथ्या गोष्ट होय साचार ।। तरी घडो शिवपूजेचा अपहार ।। ऐसी शपथ ऐकतां निर्धार ।। व्याध शंकला मानसीं ।।९४ ।। म्हणे पतिव्रते जाईं आतां ।। सत्वर येईं निशा सरतां ।। हरिणी म्हणे शिवपदासी तत्त्वतां ।। पुण्यवंता जाशील ।।९५ ॥ उदकपान करूनि वेगीं।॥ निजाश्रमा गेली ते कुरंगी ।। इकडे व्याध दक्षिणभागीं ।। टाकी बिल्वदळे खुडूनियां ॥९६॥ दोन प्रहर झाली यामिनी ।। द्वितीय पूजा शिवें मानुनी ।। अर्धपाप जळालें मुळींहुनी ।। सप्तजन्मींचें तेधवां ।।९७ ।।
जी रजस्वला खी पापबुद्धीने घरात वावरते, तिच्या रक्तातून पूर्वज पतन पावतात. त्या हरी देव किंवा पितर गण येत नाहीत. ।।८९।। जे पायी देवळातील देवाच्या दिव्याचे तेल चोरतात ते या जन्मी निपुत्रिक होतात. ज्या स्त्रिया स्वैपाक करत असताना अन्न चोरून खातात त्या मांजरीच्या जन्मास जातात. ||९०।। दारी आलेल्या अतिथी किंवा ब्राह्मणास वाईट अन्न घालून स्वतः मात्र चांगले अन्न भक्षण करतात त्या खियांचे गर्भपतन होते. ।।९१।। जो आपल्या मातापित्यास कष्ट देतो, त्यांचा अनादर करतो, तो या जन्मी मर्कट होतो. जी सून आपल्या सासू-सासऱ्यांचा छळ करते तिची संतती वाचत नाही. ||२२|| इतके सांगून ती हरिणी त्या पारध्यास म्हणाली की, बाबारे मी जर तुला शब्द देऊनही परत आले नाही तर मला ही सर्व पापे लागतील. ।।९३।। जर मी हे असे खोटे बोलले, असत्याने वागले तर प्रत्यक्ष शिवपूजा मोडल्याचे पाप माझ्या हातून घडल्यासारखे होईल. म्हणून मी शपथेवर सांगते की, मी नक्की परत येईन. हरिणीचे ते शब्द ऐकले आणि तो पारधी निःशंक झाला. ।।९४।।
तो तिला म्हणाला, “हे पतिव्रते, जा. मात्र तू दिल्या वचनाप्रमाणे नक्कीच परत ये.” तेव्हा त्या पारध्याचे ते शब्द ऐकून ती हरिणी त्यास म्हणाली, “हे दयावंता, तू निश्चितच आयुष्याच्या अंती त्या शुभ शिवपदास जाशील. ।।९५।। असे बोलून निश्चिंत मनाने पाणी पिऊन ती हरिणी निघून गेली. इकडे तो पारधी पुन्हा शिवनामाचा जप करीत आणि एकेक पान खुडून ते खाली टाकत बसला ।।९६।। तोवर रात्रीचे दोन प्रहर पूर्ण आले आणि तेव्हा भगवंतांनी त्या पारख्याची ती दोन प्रहराची शिवपूजा मान्य करून घेत त्याचे समजन्माचे पाप समूळ जाळून टाकले. ।।९७।।
नामीं आवड जडली पूर्ण ॥ व्याध करी शिवस्मरण ॥ मृगीमुखें ऐकिलें निरूपण॥ सहज जागरण घडलें तया ॥९८॥ तों दुसरी हरिणी अकस्मात ।। पातली तेथें तृषाक्रांत ॥ व्याधें बाण ओढितां त्वरित ।। करुणा भाकी हरिणी ते ॥९९ ॥ म्हणे व्याधा ऐक ये समयीं ।। मज कामानळें पीडिलें पाहीं ।। पतीसी भोग देऊनि लवलाहीं ॥ परतोनि येतें सत्वर ॥१००॥ व्याध आश्चर्य करी मनांत ।। म्हणे शपथ बोलोनि जाई त्वरित ।। धन्य तुमचे जीवित्व ।। सर्व शास्त्रार्थ ठाउका ॥१०१ ॥ वापी तडाग सरोवर ॥ जो पतित मोडी देवागार ॥ गुरुनिंदक मद्यपानी दुराचार ॥ तीं पापें समग्र मस्तकीं माझ्या ॥१०२॥ महाक्षत्रिय आपण म्हणवित ।। समरांगणीं मागें पळत ।। वृत्ति हरी सीमा लोटित ॥ ग्रंथ निंदित महापुरुषांचे ॥१०३॥ वेदशास्त्रांची निंदा करी ॥ संतभक्तांसी द्वेष धरी ॥ हरिहरचरित्रे अव्हेरी ।। माझें शिरीं तीं पापें ।।१०४।। धनधान्य असोनि पाहीं ।॥ पतिलागीं शिणवी म्हणें नाहीं ।। पति सांडोनि निजे परगृहीं ।। तीं पापें माझिया माथां ॥१०५ ॥
आता त्या पारध्याच्या मुखातून घडणारे ते नामस्मरण हा एक चाळा राहिला नव्हता, तर ती त्याच्या मनाची एक आवडी झाली होती. आता त्याच्या मनासच त्या शिवनामजपाचा ध्यास लागला होता. त्याचे नामस्मरण, चिंतन आणि जागरण ह्या तिन्ही गोष्टी अगदी सहज घडत होत्या. ।।९८।। हे असे घडत असतानाच पुन्हा एक दुसरी हरिणी पाण्यासाठी तिथे आली. तिला पाहून पारध्याने आपला बाण सज्ज केलेला पाहून तीसुद्धा त्याच्याकडे जीवदानाची याचना करू लागली. ||९९|| ती म्हणाली, “हे पारध्या, थोडा थांब, मला मारू नकोस. मी आत्ता कामविकाराने पछाडलेली आहे. मला जाऊ दे आणि पतीस भोग देऊन येऊ दे.”।॥१००॥ त्या दुसऱ्या हरिणीचे ते बोलणे ऐकून त्या पारध्यास पुन्हा आश्चर्य वाटले. तो त्या हरिणीस म्हणाला की, “तू शपथ घे आणि मगच जा”. मला माहीत आहे की, तूसुद्धा सर्व शास्रार्थ जाणणारी आहेस. ।।१०१||
त्यावर ती दुसरी हरिणीसुद्धा शास्त्रीय दाखले देत म्हणाली, जो जलाशयांची, देवाच्या मंदिरांची मोडतोड करतो; जो प्रत्यक्ष गुरूची निंदा करणे, मद्यपान करणे, अशी पाप कर्म करतो, ते पापही शब्द देऊनही परत आले नाही तर माझ्या माथी लागतील. ||१०२|| जो महाक्षत्रीय असूनही रणांगणातून माघार घेतो, जो दुसऱ्याच्या उपजीविकेचे साधन हरण करतो, जो अन्यायाने वागतो, जो थोरांच्या चरित्राची निंदा करतो, ।।१०३।। वेदशास्त्राचा अनादर, संतांचा द्वेष, हरी आणि हर यांच्या अवमान, ही सर्व पापे मला लागतील. ।।१०४।। जी स्त्री घरात धनधान्य असूनही पतीस नाही असे खोटे सांगते, जी स्वतःच्या पतीस सोडून परपुरुषाबरोबर शय्या करते त्याची पापे माझ्या माथी लागतील. ।।१०५।।
पुत्र स्नुषा सन्मार्ग वर्ततां ।। त्यांसी व्यर्थचि गांजिती जे न पाहतां ।। ते कुरूप होती तत्त्वतां ।। हिंडतां भिक्षा न मिळेचि ।। १०६ ।। बंधु बंधु जे वैर करिती ।। ते या जन्मीं मत्स्य होती ।। गुरूंचे उणें जे पाहती ।। त्यांची संपत्ति दग्ध होय ॥ १०७ ॥ जे मार्गस्थांचीं वस्त्रे हरिती ।। ते अतिशूद्र प्रेतवस्त्रे पांघरती ।। आम्ही तपस्वी म्हणोनियां अनाचार करिती ।। ते घुले होती मोकाट ।। १०८ ।। दासी स्वामीची सेवा न करी ।। ती ये जन्मीं होय मगरी ।। जो कन्याविक्रय करी ॥ हिंसकयोनीं निपजे तो ॥१०९॥ स्त्री भ्रताराची सेवा करीत । तीस जो व्यर्थचि गांजित ॥ त्याचा गृहभंग होत ॥ जन्मजन्मांतरीं न सुटे ।।११० ।। ब्राह्मण करी रसव्रिकय ॥ घेता देता मद्यपी होय ।। जो ब्रह्मवृंदा अपमानिताहे ।। तो होय ब्रह्मराक्षस ।।१११।। एके उपकार केला ।। जो नष्ट नाठवी त्याला ।। तो कृतघ्न जंत झाला ।। पूर्वकर्मे जाणिजे ॥११२॥ विप्र श्राद्धीं जेवुनी ।। स्त्रीभोग करी ते दिनीं ।। तो श्वानसूकरयोनीं ।। उपजेल निःसंशयें ।॥११३॥ व्यवहारीं देहांत बैसोन ॥ खोटी साक्ष देई गर्जेन । पूर्वज नरकीं पावती पतन ।। असत्य साक्ष देतांचि ।।११४।। दोगी स्त्रीया करून ।। एकीचेच राखी जो मन ।। तो गोचीड होय जाण ।। सारमेयशरीरी ।।११५।।
आई-वडिलांशी चांगले वागणाऱ्या मुला आणि सूनांना जे नावे ठेवतात ते पुढे कुरूप होतात. त्यांना दारोवार भीक मागूनही अन्न मिळत नाही. ।।१०६।। जे भाऊ एकमेकांशी वैर भावनेने वागतात ते पुढील जन्मी मासे होतात, जे प्रत्यक्ष गुरूचेही उणेदुणे काढतात त्यांची सर्व संपत्ती जळून जाते. ।।१०७|| जे दुष्ट लोक वाटसरूस अडवून त्यांची वस्त्रे हरण करतात, त्यांना पुढील जन्मात प्रेतावरची वस्त्रें घालण्याची वेळ येते. जे स्वतःस तपस्वी म्हणवून घेतात आणि कृतीने मात्र अत्यंत गैरवर्तन करतात, त्यांना पुढचा जन्म सुरवंटाचा मिळतो. ||१०८।। जी दासी स्वामीसेवा करीत नाही ती पुढे मगर होते. जो नीच मनुष्य आपल्याच कन्येचा विक्रय करतो तो पुढच्या जन्मात हिंस्र पशू होतो. ||१०९|| जी स्त्री पतीची सेवा करीत असते, तरीही तिचा पती हा तिचा छळ करीत असेल तर त्यांची ताटातूट होते. ||११०।। जो ब्राह्मण दूध, तेल, द्रव्य ह्यांची विक्री करतो किंवा जो ते विकत घेतो ते दोघेही पुढील जन्मी गारुडे होतात. जो ब्रह्मवृंदांचा अवमान करतो, तो ब्रह्मराक्षस होतो. ।।१११।। जो केलेल्या उपकाराचे स्मरण राखत नाही तो किळसवाण्या कृमी किंवा जंतांच्या जन्मास जातो. ॥११२।। जे विप्र श्राद्धपक्षाचे भोजन करून त्याच दिवशी स्त्री संग करतात ते पुढे श्वान किंवा सुकर योनीत जन्मास जातात. ।।११३॥ जे कोणी धनाच्या लोभाने खोटी साक्ष देतात ते नरकात जातात. ।।११४|| जे दोन पत्नी असताना एकीचेच लाड करतो, तिचीच फक्त मर्जी राखतो असा मनुष्य पुढील जन्मी गोचिड होतो ॥११५॥
पूर्वजन्मीं कोंडी उदक ।। त्याचा मळमूत्रनिरोध देख ।। करितां साधुनिंदा आवश्यक ।। सत्वर दंत भन्ग होती ॥११६॥ देवालयीं करी भोजन ।। तरी ये जन्मीं होय क्षीण ।। पृथ्वीपतीची निंदा करितां जाण ।। उदरीं मंदाग्नि होय पैं ।।११७ ।। ग्रहणसमयीं करी भोजन ।। त्यासी पित्तरोग होय दारुण ।। परबाळे विकी परदेशीं नेऊन ।। तरी सर्वांगी कुष्ठ भरे ॥११८॥ जी स्त्री करी गर्भपातन ।। ती उपजे वंध्या होऊन ॥ देवालय टाकी पाडोन ।। तरी अंगभंग होय त्याचा ।।११९।। अपराधाविण स्त्रीसी गांजिताहे ।। त्याचें ये जन्मीं एक अंग जाये ।। ब्राह्मणाचें अन्न हरिती पापिये ।। त्यांचा वंश न वाढे कधी ।।१२० ।। गुरु संत माता पिता ।। त्यांसी जो होय निर्भर्सिता ।। तरी वाचा जाय तत्त्वतां ।। अडखळे बोलतां क्षणक्षणां ॥१२१॥ जो ब्राह्मणांसी दंड मारी।। त्यासी व्याधितिडका लागती शरीरी ॥ जो संतांसी वादविवाद करी ।। दीर्घदंत होती त्याचे ॥१२२ ।। देवदारींचे तरुवर ।। अश्वत्थादि वृक्ष साचार ।। तोडितां पांगुळ होय निर्धार ।। भिक्षा न मिळे हिंडतां ॥१२३॥ जो सूतकान्न भक्षित ।। त्याचे उदरीं नाना रोग होत ।। आपणचि परिमळद्रव्य भोगी समस्त ॥ तरी दुर्गंधी सत्य सर्वांगीं ॥१२४॥ ब्राह्मणाचें ऋण न देतां ।। तरी बाळपणीं मृत्यू पावे पिता ।। जलवृक्षछाया मोडितां ।। तरी एकही स्थळ न मिळे त्यांते ।।१२५।।
जो दुसऱ्यास पाण्यावाचून वंचित करतो त्यास मूत्रविकार होतात. जो साधूसंतांची निंदा करतो त्याचे दात पडतात. ।।११६।। जो मनुष्य देवालयात भोजन करतो तो पुढे अपंग होतो. जो राजाची निंदा करतो त्यास भूक मंदावण्याचा विकार जडतो. ।।११७।। जे दुराचारी ग्रहण काळात अन्न ग्रहण करतात त्यांना पित्ताचे विकार होतात. जे मुले-मुली ह्यांचा विक्रय करतात ते कुष्ठी होतात. ।।११८।। जी स्त्री स्वतःचा गर्भपात करवून घेते ती पुढील जन्मी वांझ होते. जे देवालयांची मोडतोड करतात ते अर्धांगवायूच्या झटक्याने बाधित होतात. ।।११९।। जो पत्नीची कोणतीही चूक नसताना तिचा छळ करतो, त्याचे एक अंग निकामी होते. जे गरीब ब्राह्मणाचे अन्न लुबाडतात त्यांचा वंश विस्तार होत नाही. ।।१२०।। जे गुरू, माता, पिता ह्यांची निर्भर्त्सना करतात त्यांची वाचा जाते. ।।१२१।। जे विप्रजनांस नाहक दंड करतात त्यांना संधीवाताची पीडा होते. जे सत्पुरुषांशी उगाच वादविवाद करतात त्यांचा दंतक्षय होतो. ।।१२२|| जे देवळासमोरचे वृक्ष तोडतात, ते पांगळे होतात. त्या अभाग्यांना भीकही कोणी घालत नाही. ।।१२३।। जो सुतक असलेल्या घरातले अन्न ग्रहण करतो त्यास पोटाचे नाना विकार होतात. जो सुगंधी द्रव्याचा स्वार्थीपणाने उपयोग करतो त्याच्या सर्वांगास दुर्गंधी येते. ।।१२४।। जो विप्राकडून घेतलेले कर्ज फेडत नाही त्याचे पितृछत्र लवकर जाते. जो पाणवठ्याजवळचे सावली देणारे वृक्ष तोडतो, त्यास कोठेही राहण्यास जागा मिळत नाही. ।।१२५।।
ब्राह्मणासी आशा लावून ।। चाळवी नेदी कदा दान ।। तो ये जन्मीं अन्न अन्न ॥ करीत हिंड घरोघरीं ॥ १२६ ॥ जो पुत्रद्वेष करीत ।। आणि दरिद्रियाचें लग्न मोडीत ।।॥ तरी खीसी सल राहे पोटांत ।। वंध्या निश्चित संसारीं ॥ २७ ॥ जेणें ब्राह्मण बांधिले निग्रहून । त्यासी सांडसें तोडी सूर्यनंदन ।। जो नायके कथाग्रंथ पावन ।। बधिर होय जन्मोजन्मीं ॥ २८ ॥ जो पीडी मातापितयांस ।। त्याचा सर्वदा होई कार्यनाश ।। एकासी भजे निंदी सर्व देवांस ।॥ तरी एकचि पुत्र होय त्यासी ॥ २९ ॥ जो चांडाळ गोवध करी ।। त्यासी मिळे कर्कशा नारी ।। वृषभ वधितां निर्धारीं ।। शतमूर्ख पुत्र होय त्यासी ।।१३० ।। उदकतृणेविण पशु मारीत ।। तरी मुक्याचि प्रजा होती समस्त ।। जो पतिव्रतेसी भोगू इच्छित ।। तरी कुरूप नारी कर्कशा मिळे ॥१३१ ॥ जो पारधी बहु जीव संहारी ॥ तो फेंपरा होय संसारी ।। गुरूचा त्याग जो चांडाळ करी ।। तो उपजतांचि मृत्यु पावे ॥ १३२ ॥ नित्य अथवा रविवारी मुते रवीसमोर ।। त्याचे बाळपणीं दंत भग्न केश शुभ्र ॥ जे मृत बाळासाठी रुदती निर्धार ।। त्यांसी हांसतां निपुत्रिक होय ॥१३३॥ हरिणी म्हणे व्याधालागून ॥ मी सत्वर येतें पतीसी भोग देऊन ॥ न यें तरी हीं पार्पे संपूर्ण ।। माझ्या माथां बैसोत पैं ।। १३४ ।।
जो गतजन्मी ब्राह्मणास अन्नाची अभिलाषा लावून ते देत नाही तो या जन्मी अन्नान्नदशा भोगतो. ।। १२६|| जो पुत्राचा द्वेष करतो, लग्नकार्यात मोठता घालतो, त्याच्या पत्नीच्या पोटात गाठ होते. ।।१२७|| जो ब्राह्मणास बंदीशाळेत घालतो, त्याचे यमलोकी लचके तोडले जातात. जो पवित्र कथांचे श्रवण करीत नाही तो बहिरा होतो. ।। १२८ ।। जो मातापित्याचे हाल करतो त्याच्या कार्याचा नाश होतो, त्यास यश मिळत नाही. जो एकाच देवाची भक्ती करून इतर देवतांची निंदा करतो त्यास पुढील जन्मी एकच पुत्र लाभतो. ।।१२९|| जो गोहत्या करतो त्यास पुढील जन्मी कजाग पत्नी मिळते. जो वृषभाची हत्या करतो तो पुढे शतमूर्ख होतो. ।।१३०|| जे चारा-पाण्याशिवाय गुरांना उपाशी मारतात त्यांची प्रजा मुकीच जन्मास येते. जो पतिव्रता स्त्रीची भोगेच्छा धरतो त्यास कुरूप व दुष्ट पत्नी लाभते. ।।१३१।। जो पारधी निरपराध जिवांची हत्या करतो, त्यास फेफरे येते. जो गुरूचा त्याग करतो त्यास जन्मतःच मृत्यू येतो. ॥॥१३२॥ जो नित्य किंवा आदित्यवारी सूर्याकडे पाहून मूत्र विसर्जन करतो, त्याचे दात लवकर पडतात, केस लवकर पिकतात. तो पुढील जन्मी निपुत्रिक होतो. ।।१३३|| हा इतका शास्रार्थ सांगून ती हरिणी म्हणाली की, मी पतीस भोग देऊन नक्की परत येते. नाहीतर मला ही सर्व पापे लागतील ।।१३४।।
व्याध मनांत शंकोन ॥ म्हणे धन्य धन्य तुमचें ज्ञान ।। सत्वर येईं गृहासी जाऊन ।। सत्य संपूर्ण सांभाळीं ॥ १३५ ॥ जलपान करूनि वेगीं ।॥ आश्रमा गेली ते कुरंगी ।। तों मृगराज तेचि प्रसंगीं ।। जलपानार्थ पातला ।। १३६ ।। व्याधें ओढिला बाण ।। तों मृग बोले दीनवदन ।। म्हणे माझ्या स्त्रिया पतिव्रता सगुण ।। त्यांसी पुसोन येतों मी ॥ १३७ ॥ शपथ ऐकें त्वरित ।। कीर्तन करिती प्रेमळ भक्त ।। तो कथारंग मोडितां निर्वश होत ।। तें पाप सत्य मम माथां ॥ १३८ ॥ ब्रह्मकर्म वेदोक्त ॥ शूद्र निजांगें आचरत ॥ तो अधम नरकीं पडत ।। परधर्म आचरतां ॥ १३९ ॥ तीर्थयात्रेसी विघ्नें करीं ।। वाटपाडी वस्त्र द्रव्य हरी ।। तरी सर्वांगीं व्रण अघोरीं ।। नरकीं पडे कल्पपर्यंत ॥ १४० ॥ शास्त्रकोशीं नाही प्रमाण ।। कूटकविता करी क्षुद्र लक्षून ।। हरिती ब्राह्मणांचा मान ।। तरी संतान तयांचे न वाढे ॥ १४१ ॥ हरिदिनीं शिवदिनीं उपोषण ।। विधियुक्त न करी द्वादशी पूर्ण ।। तरी हस्त पाद क्षीण ।। होती त्याचे निर्धारं ॥ १४२ ॥ एक शिवहरिप्रतिमा फोडिती ।। एक भगवद्भक्तां विघ्नें करिती ।। एक शिवमहिमा उच्छेदिती ।। नरकीं होती कीटक ते ॥१४३ ॥ मातृद्रोही त्यासी व्याधी भरे ।। पितृदोही पिशाच विचरे ।। गुरुद्रोही तत्काळ मरे ।। भूतप्रेतगनी विचरे तो ।।११४।।
तेव्हा तो पारधी तिला म्हणाला, “हे हरिणी, मी तुझ्या शब्दावर विश्वास ठेवतो, पण तू मात्र तुझा दिलेला शब्द पाळ.”।।१३५।। तेव्हा निर्भय झालेली ती हरिणी पाणी पिऊन आपल्या घरी गेली. तोच त्या जागी एक तहानलेला मृगराज पाणी पिण्याच्या उद्देशाने त्या सरोवराच्या काठी आला. ।।१३६।। त्यास पाहून त्या पारध्याने आपला धनुष्यबाण सज्ज केला. तेव्हा तो मृगराज पारध्यास म्हणाला, “हे पारध्या थांब, माझी शिकार करू नकोस. घरी माझ्या सद्गुणी स्त्रिया आहेत. मी त्यांचा निरोप घेऊन येतो, मग तू मला मार.” ।। ३७।। आता माझी शपथ ऐक. भजन, कीर्तनाचा रसभंग केल्याचे जे पाप लागते ते पाप मी न आल्यास मला लागेल. ।।१३८ ।। जो शूद्र व्रतीने ब्रह्मकर्माचे आचरण करतो, तो अधम नरकात जातो. ।।१३९।। जो तीर्थयात्रेस चाललेल्याचे मार्गात विघ्न आणतो, वाटमारी करतो, त्याच्या सर्वांगावर फोड उठतात, तो नरकात खिचपत पडतो. ।।१४०||
जो धर्मशास्त्रांचा अनादर करतो, इतरांना कमी लेखतो, ब्राह्मणाचा मान राखत नाही, त्याची संतती वाढत नाही.।।१४१।। जो हरी आणि हर यांच्या विशेष दिवशी उपवास करत नाही त्याच्या हातापायातले अवसान जाते, तो लुळापांगळा होतो. ।।१४२।। जे देवाच्या मूर्ती भग्न करतात, भक्तिमार्गात अडथळा आणतात, शिव माहात्म्य मानत नाहीत ते नरकात कीडे होऊन पडतात. ।।१४३।। जो मातेशी द्रोह करतो त्यास व्याधी ग्रासते. जो पित्याचा द्रोह करतो तो पिशाच्च होतो. जो गुरू द्रोह करतो तो तत्काल मरण पावतो. ।।१४४।।
विप्र आहार बहुत जेविती ।। त्यासी जो हांसे दुर्मती ।। त्याचे मुखीं अरोचक रोग निश्चिती ।। न सोडिती जन्मवरी ॥१४५॥ एक गोविक्रय करिती ।। एक कन्याविक्रय अर्जिती ।। ते नर मार्जार मस्त होती ।। बाळें भक्षिती आपुलीं ।॥ १४६ ॥ जो कन्या भगिनी अभिलाषी ।। कामदृष्टीं न्याहाळी पतिव्रतेसी ।। प्रमेहरोग होय त्यासी ।। कीं खडा गुह्यांत दाटत ।।१४७ ।। प्रासादभंग लिंगभंग करी ।। देवांची उपकरणें अलंकार चोरी ।। देवप्रतिष्ठा अव्हेरी ।। पंडुरोग होय तेथें ।॥ १४८ ॥ एक मित्रद्रोह विश्वासघात करिती ।। मातृपितृहत्या गुरूसी संकटीं पाडिती ।। ब्रह्मवध गोवध न वारिती ।। अंगीं सामर्थ्य असोनियां ।।१४९ ।। ब्राह्मण बैसवोनि बाहेरी ।। उत्तमान्न जेविती गृहांतरी ।। सोयऱ्यांची प्रार्थना करी ।। संग्रहणी पोटशूळ होती तयां ।। १५० ।। एक कर्मभ्रष्ट पंचयज्ञ न करिती ।। एक ब्राह्मणांची सदनें जाळिती ।। एक दीनासी मार्गी नागविती ॥ एक संतांचा करिती अपमान ।।१५१ ।। एक करिती गुरुछळण ।। एक म्हणती पाहों याचें लक्षण ॥ नाना दोष आरोपिती अज्ञान ।। त्यांचें संतान न वाढे ॥१५२॥ जो सदा पितृद्वेष करी ।। जो ब्रह्मवृंदांसी अव्हेरी ।। शिवकीर्तन ऐकतां त्रासे अंतरी ।। तरी पितृवीर्य नव्हे तो ।।१५३ ।। शिवकीर्तनीं नव्हे सादर ।॥ तरी कर्णमूळरोग निर्धार ॥ नसत्याचि गोष्टी जल्पे अपार ।। तो दर्दुर होय निर्धारें ॥१५४॥
जो भोजन करीत असलेल्या ब्राह्मणांची भरपंक्तीत निंदा करतो, त्याच्या मुखात अनेक रोग होतात. ।।१४५।। जे गोविक्रय करतात, पैसे घेऊन कन्येचा विवाह करून देतात, ते पुढील जन्मी मांजरीच्या जन्मास जाऊन स्वतःचीच पिल्ले भक्षण करतात. ।।१४६।। जे मुलीची, बहिणीची अभिलाषा घरतात,पतिव्रता स्त्रीकडे वाईट नजरेने पाहतात त्यांना गुप्तेइंद्रियाचे रोग होतात. ।। १४७ || जे देवालये, शिवलिंगे फोडतात, देवाची पूजा उपकरणी चोरतात, देवास मानत नाहीत ते पंडुरोगाने ग्रस्त होतात. ।।१४८ ।। जे मित्रद्रोह, विश्वासघात, मातृपितृ हत्या करतात, जे गुरूस संकटात लोटतात, जे विप्र आणि गोहत्येस प्रतिकार करीत नाहीत. ।।१४९|| जे ब्राह्मणास उपाशी ठेवून स्वतः अन्न ग्रहण करतात, सग्यासोयऱ्याची मनधरणी करतात त्यांना पोटशूळाची व्याधी ग्रासते. ।।१५०।। जे कोणी कर्मभ्रष्ट होऊन पंचयज्ञ करत नाहीत, जे ब्राह्मणांची घरे जाळतात, संतांचा अवमान करतात, ।।१५१।। जे कोणी गुरूचा छळ करतात, त्याची लक्षणे तपासून पाहतात, त्याच्यावर नाना प्रकारचे आरोप करतात, त्यांच्या संततीची वृद्धी होत नाही. ॥१५२॥ जे पित्याचा द्वेष करतात, ब्रह्मवृदांचा अव्हेर करतात, शिवकीर्तन श्रवण करत नाहीत, ते कुणाही पित्याचा औरस पुत्र असू शकत नाहीत. ॥१५३॥ ज्याला शिव कीर्तन ऐकायला प्रिय वाटत नाही, तो कानाच्या विकारांचा बळी होतो. जो कीर्तनात नको ती बाष्कळ बडबड करतो तो पुढील जन्मी बेडूक होतो. ॥१५४॥
शिवकीर्तन किंवा पुराणश्रवण ।। तेथें शयन करितां सर्प होय दारुण ।। एक अतिवादक छळक जाण ।। ते पिशाचयोनी पावती ॥१५५॥ एकां देवार्चनीं वीट येत ।। ब्राह्मण पूजावया कंटाळत ।। तीर्थप्रसाद अव्हेरीत ।। त्यांच्या आंखुडती अंगशिरा ॥ १५६ ॥ मृग म्हणे ऐसीं पायें अपार ।। मम मस्तकीं होईल परम भार ।। मग पारधी म्हणे सत्वर ।। जाईं स्वस्थाना मृगवर्या ॥ १५७ ॥ व्याध शिवनामें गर्जे ते क्षणीं ।। कंठ सद्गदित अश्रु नयनीं ।॥ मागुती बिल्वदळें खुडोनी ।। शिवावर टाकीतसे ॥ १५८ ॥ चौं प्रहरांच्या पूजा चारी ।। संपूर्ण झाल्या शिवजागरीं ।। सप्तजन्मींचीं पापें निर्धारीं ।। मुळींहूनी भस्म झालीं ॥१५९॥ तों पूर्वदिशा मुख प्रक्षाळीत ॥ सुपर्णाग्रज उदय पावत ।। आरक्तवर्ण शोभा दिसत ।। तेंचि कुंकुम प्राचीचें ॥१६० ।। तों तिसरी मृगी आली अकस्मात ॥ व्याध देखिला कृतांतवत ।। म्हणे मारूं नको मज यथार्थ ।। बाळासी स्तन देऊनि येतें मी ॥ १६१ ॥ व्याध अत्यंत हर्षभरित ।। म्हणे ही काय बोलेल शास्त्रार्थ ।। तो ऐकावया म्हणत ।। शपथ करूनि जाय तूं ॥ १६२ ॥ यावरी मृगी म्हणे व्याधा ऐक ।। जो तृणदाहक ग्रामदाहक॥ गोब्राह्मणांचें कोंडी उदक। क्षयरोग त्यासी न सोडी ॥१६३॥
जे शिव कीर्तनात डुलक्या घेतात, झोपतात ते सर्प होतात. जे अनावश्यक वादविवाद करतात ते पिशाच्च योनीत जातात. ।।१५५।। जे कोणी देवाची, ब्राह्मणांची पूजा करण्याचा कंटाळा करतात; जे देवाचा तीर्थप्रसाद अव्हेरतात त्यांच्या अंगातील शिरा आखडून जातात. ।।१५६।। इतके सांगून तो मृगराज पारध्यास म्हणाला की, मी जर दिल्या वचनाप्रमाणे परत आलो नाही तर मला ही सर्व पापे लागतील. म्हणून मला घरी जाऊन येऊ दे. ।।१५७।। तेव्हा पारध्याने त्या मृगास जाऊ दिले. त्याचा कंठ दाटून आला. त्या प्राण्याचे ते ज्ञान ऐकून तो आश्चर्यचकित झाला आणि पुन्हा त्याने ते शिवनाम आणि बिल्वार्पण कार्य चालू केले. ।।१५८।। अशाप्रकारे नकळत त्या पारध्याच्या हातून रात्रीच्या चारी प्रहराच्या चार पूजा संपन्न झाल्या आणि त्याच्या सर्व पापांना नाश झाला. ।।१५९।। तोवर तिकडे हळूहळू पूर्व दिशा उजळू लागली. सूर्याचे प्राचीवर आगमन होऊ लागले आणि सर्वत्र आरक्त असा रंग पसरून दिव्य शोभा दिसू लागली. ।।१६०।। तोच तिथे तिसरी हरिणी आली, तिला पाहताच पारधी सरसावला. तेव्हा ती त्यास म्हणाली, हे महापुरुषा, मला मारू नकोस. मी माझ्या बालकांना स्तनपान देऊन येते. मग तू मला मार. ।।१६१।। तेव्हा पारध्याने त्या हरिणीसही शपथ घेऊन जा असे सांगितले आणि आता ही हरिणी कोणता शास्त्रार्थ सांगते ते ऐकायला तो आतुर झाला. ।।१६२।। त्यावर ती हरिणी सांगू लागली की, जो गवताची गंजी पेटवितो, गावे जाळतो, गो-ब्राह्मणाचे पाणी तोडतो त्या अभाग्यास अंती क्षयरोगाची बाधा होते. ।।१६३।।
ब्राह्मणांचीं सदनें हरिती देख ।। त्यांचे पूर्वज रौरवीं पडती निःशंक ।। मातृपुत्रां विघडती एक ।। स्त्रीपुरुषां विघड पाडिती ॥१६४॥ देवब्राह्मण देखोन ॥ खालती न करिती कदा मान ।। निंदिती बोलती कठोर वचन ।। यम करचरण छेदी तयांचे ॥१६५॥ परवस्तु चोरावया देख ॥ अखंड लाविला असे रोख ।। साधुसन्मानें मानी दुःख ॥ त्यासी नेत्ररोगतिडका न सोडिती ॥६६॥ पुस्तकचोर ते मुके होती ॥ रत्नचोरांचे नेत्र जाती ।। अत्यंत गर्वी ते महिष होती ।। पारधी निश्चिती श्येनपक्षी ।। १६७ ।। भक्तांची जो निंदा करीत ।। त्याचें मुखीं दुर्गंधी घाणीत ।। जो मातापितयांसी ताडीत ।। लुला होत यालागीं ॥१६८ ॥ जो अत्यंत कृपण ।। धन न वेंची अणुप्रमाण ।। तो महाभुजंग होऊन । घुसघुसीत बैसे तेथें ॥१६९॥ भिक्षेसी यतीश्वर आला ।। तो जेणें रिता दवडिला ॥ शिव त्यावरी जाण कोपला ।। संतती संपत्ती दग्ध होय ॥१७० ॥ ब्राह्मण बैसला पात्रावरी ॥ उठवूनि घातला बाहेरी ॥ त्याहूनियां दुराचारी ॥ दुसरा कोणी नसेचि ॥ १७१ ॥ ऐसा धर्माधर्म ऐकोन ॥ पारधी सद्गद बोले वचन ।। स्वस्थळा जाई जलपान करून ।। बाळांसी स्तन देऊन येईं ॥ १७२॥ ऐसें ऐकोनि मृगी लवलाह्या ।। गेली जलप्राशन करूनियां ॥ बाळे स्तनीं लावूनियां ॥ तृप्त केली तियेनें ॥१७३॥
जे ब्राह्मणाची घरे लुबाडतात ते रौरवात खिचपत पडतात. जे माता आणि पुत्रात कलह निर्माण करतात, पती-पत्नीत मांडणे लावतात, ।।१६४।। जे देव, ब्राह्मणांना मान देत नाहीत, जे त्यांची निंदा करतात, त्यांचे हातपाय यमलोकात तोडले जातात. ।।१६५।। जे दुसऱ्याची वस्तू चोरतात, साधूची निंदा करतात, सज्जनांच्या सन्मानाचा ज्यांना हेवा, मत्सर वाटतो त्यांना नेत्ररोग होतात. ।।१६६।। जे पुस्तक चोरतात, त्यांचा अपहार करतात, जे उद्दामपणे वागतात ते म्हशीच्या जन्मास जातात. आज पारधी असतात ते पुढे बहिरी ससाणा होतात. ।।१६७॥ जे भक्तभाविकांची निंदा करतात. मातापित्यास मारतात ते लुळेपांगळे होतात. ।। १६८|| जो अत्यंत कंजूष वृत्तीचा असतो, जो थोडेही धन सत्कर्मास खर्च करत नाही तो सर्प होऊन धनावर बसून फुत्कार सोडतो. ।।१६९।। जे दारी आलेल्या अतिथीला, यति मिक्षा न देता विन्मुख परत पाठवितात, त्यांच्यावर भगवान शिव कोप करतात. त्यांची संतती व संपत्ती लयास जाते. ।।१७० || जो पानावरून ब्राह्मणास उठवितो त्याच्यासारखा अन्य दुराचारी शोधूनाही सापडत नाही. ।।१७२।। त्या तिसऱ्या हरिणीचे ते शास्त्रज्ञानं ऐकून पारधी तिला म्हणाला, जा पाणी पी. घरी जा बालकांना स्तनपान दे आणि तू शपथेप्रमाणे परत ये. ।।१७२।। अशाप्रकारे पाणी पिऊन तृप्त ती हरिणी घरी गेली, तिने आपल्या बालकांना स्तनपान दिले. ।।१७३।।
वडील झाली प्रसूत ।॥ दुसरी पतीची कामना पुरवीत ॥ मृगराज म्हणे आतां त्वरित ॥ जाऊं चला व्याधापासीं ।॥१७४ ॥ मृग पाडसांसहित सर्वहीं ।॥ व्याधापासीं आलीं लवलाहीं ।। मृग म्हणे ते समयीं ।। आधीं मज वधीं पारधिया ॥ १७५ ॥ मृगी म्हणे हा नव्हे विधी ॥ आम्ही जाऊं पतीच्या आधीं ॥ पाडसें म्हणती त्रिशुद्धी ॥ आम्हांसी वधीं पारधिया ॥ १७६ ॥ त्यांची वचनें ऐकतां ते क्षणीं ॥ व्याध सद्गद झाला मनीं ।॥ अश्रुधारा लोटल्या नयनीं ।॥ लागे चरणीं तयांच्या ॥ १७७ ॥ म्हणें धन्य जिणें माझें झालें ।। तुमचेनि मुखें निरूपण ऐकिलें ।॥ बहुतां जन्मींचें पाप जळालें ।। पावन केलें शरीर ॥ १७८ ॥ माता पिता गुरु देव ।। तुम्हीच आतां माझे सर्व ।। कैंचा संसार मिथ्या वाव ।। पुत्रकलत्र सर्व लटकें ।॥ १७९॥ व्याध बोले प्रेमेंकरून ।। आतां कधीं मी शिवपद पावेन ।। तों अकस्मात आलें विमान ॥ शिवगण बैसले त्यावरी ॥ १८० ।। पंचवदन दशभुज ।। व्याघ्रांबर नेसले महाराज ।। अद्भुत तयांचें तेज ।। दिकचक्रामाजी न समाये ।।१८१ ।। दिव्य वाद्ये वाजविती किन्नर ।। आलाप करिती विद्याधर ।। दिव्य सुमनांचे संभार ।। सुरगण स्वर्ये वर्षती ।॥१८२॥
याप्रमाणे परत येण्याची शपथ घेऊन गेलेली पहिली हरिणी प्रसूत झाली, दुसरीने पतीची भोगकामना पूर्ण केली, तिसरीने बालकाना स्तनपान करविले, तेव्हा तो मृगराज आपल्या परिवारास म्हणाला, चला आता आपण दिल्या शब्दानुसार त्या पारध्याकडे जायला हवे. ।।१७४।॥ तेव्हा तो मृगराज तिन्ही हरिणी आणि आपल्या पाडसांसह येऊन त्या पारध्याच्या समोर उभा राहिला आणि आधी मला मार असे म्हणू लागला. ।।१७।। तेव्हा त्या तिन्ही हरिणी पुढे आल्या आणि पतीच्या आधी आम्हास मार म्हणून आग्रह करू लागल्या. ।।१७७|| त्यावेळी त्यांची ती एकमेकांसाठी मरण्याची तयारी पाहून पारध्याचा कंठ दाटून आला. त्याचे मन दया आणि करुणेने भरून आले. त्याच्या डोळ्यांतून अश्रुधारा वाहू लागल्या आणि त्यानेच त्या मृग परिवारास नम्म्र वंदन केले. ॥१७८॥ तो त्यांना म्हणाला, आता माझ्यासाठी तुम्हीच माता, पिता, गुरू आहात. तुम्ही दिलेल्या ज्ञानाने मला हा संसार लटका आहे हे समजले आहे. आता कसले घरदार ? ।।१७९ ।। तेव्हा पारधी त्यांना म्हणाला, आता माझ्या मनात एकच इच्छा आहे की, मी कधी एकदा शिवपदास जाईन ? तितक्यात तिथे शिवलोकीहून एक विमान आले. त्या विमानात शिवगण बसलेले होते. ||१८०|| त्यांचे महाराज तर पंचमुखी व्याघ्रांबरधारी आणि दहा हातांचे आणि दिव्य तेज रूपधारी होते. त्यांच्या तेजाने साऱ्या दिशा उजळल्या होत्या. ।।१८१।। त्याच वेळी देवदूत, नर, किन्नर हे गायन करीत होते, मंगल वाद्ये वाजत होती, देव पुष्पवृष्टी करीत होते. ।।१८२।।
मृगें पावलीं दिव्य शरीर ॥ व्याध करी साष्टांग नमस्कार।। मुखें म्हणे जयजय शिव हर हर ।। तो शरीरभाव पालटला ।।१८३ ।। परिसीं झगडतां लोह होय सुवर्ण ।। तैसा व्याध झाला दशभुज पंचवदन ।। शिवगणीं बहुत प्रार्थन ।। दिव्य विमानीं बैसविला ॥१८४॥ मृगें पावली दिव्य शरीरें ।॥ तींही विमानीं आरूढलीं समग्र ।। व्याधाची स्तुति वारंवार ।। करिती सुरगण सर्वही ॥ १८५ ॥ व्याध नेला शिवपदाप्रती ।। तारामंडळीं मृगे राहती ।। अद्यापि गगनीं झळकती ।। जन पाहती सर्व डोळां ।।१८६ ।। सत्यवतीहृदयरत्नखाणी ।। रसभरित बोलिला लिंगपुराणीं ।। तें सज्जन ऐकोत दिनरजनीं ।। ब्रह्मानंदेंकरूनियां ॥१८७॥ धन्य तें शिवरात्रिव्रत ॥ श्रवणें पातक दग्ध होत । जे हैं पठन करिती सावचित्त ।। धन्य पुण्यवंत नर तेचि ।।१८८ ।। सज्जन श्रोते निर्जर सत्य ।। प्राशन करोत शिवलीलामृत ।। निंदक असुर कुतर्की बहुत ॥ त्यांसी प्राप्त कैंचे हैं ।॥ १८९ ॥ कैलासनाथ ब्रह्मानंद ।। तयांचे पदकल्हार सुगंध ॥ तेथे श्रीधर अभंग षट्पद ॥ रुंजी घालीत शिवनामें ॥१९०॥ शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड॥ स्कंदपुराण ब्रह्मोत्तरखंड ।। परिसोत सज्जन अखंड ॥ द्वितीयोऽध्याय गोड हा ॥१९१ ॥
।। श्रीसांबसदाशिवार्पणम ।।
सारे घडत असतानाच त्या सर्व मृग परिवारास दिव्य देहत्व प्राप्त झाले. पारध्याने त्यांना विनम्रभावे वंदन केले. तो मुखाने एकच शिवनामाचा जयजयकार करू लागला. त्याबरोबर त्याचा देहही पालटला. ।। १८३।। ज्याप्रमाणे परिसाच्या स्पशनि लोहाचे सुवर्ण होते तसा पारध्याचा देह दिव्यरूपी झाला. त्यास शिवगणांनी मोठ्या आदराने त्या विमानात बसविले. ||१८४।। ती दिव्य देह प्राप्त झालेली हरणे त्या पारध्याचे आभार मानू लागली. त्यांचा उद्वार झाला, त्यांना त्यांचे दिव्य देह प्राप्त झाले. ते सर्वजण विमानारूढ होऊन शिवनामाचा गजर करू लागले. ||१८५|| अशाप्रकारे त्या पारध्याचा उद्धार झाला. तो शिवपदास जाता आला. त्या हरणांना भगवान शिवांनी तारांगणात स्थान दिले. ती तारांगणात चमकू लागली. ।।१८६।। या कथेचे सरस्वतीपुत्र व्यास यांनी लिंग पुराणात मोठे रसाळ वर्णन केलेले आहे. शिवभक्तांनी त्याच्या श्रवण पठणाचा अवश्य लाभ घ्यावा ।।१८७।। असे हे शिवरात्रीचे व्रत आणि त्याचा महिमा सांगणारे कथानक श्रवण करतात ते शिवभक्त धन्य होत. ।।१८८|| ते सज्जन आणि श्रोते खरोखरच शिवस्वरूप आहेत, जे शिवलीलामृताचे श्रवण करतात. जे कुतर्कवादी आहेत त्यांना या अमृताची श्रवण करतात. जे कुतर्कवादी आहेत त्यांना या अमृताची चव ती काय ? ।।१८९।। श्री ब्रह्मानंद हेच कैलासनाथ असून, त्यांच्या पदकमलावर हा श्रीधररूपी भ्रमर गुंजन करीत आहे. ।।१९० ।। स्कंद पुराणातील ब्रह्मोत्तर खंडातल्या या श्री शिवलीलामृताचा हा दुसरा अध्याय इथे पूर्ण होतो. ।।१९१||
|| श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु ।।
अधिक माहितीसाठी आमच्या सोशल मीडिया ला फॉलो करा.
मराठी रसिक या आमच्या इंस्टाग्राम अकाउंट ला लाईक करा सुब्स्क्राईब करा. येथे तुम्हाला संपूर्ण माहिती मराठी मध्ये मिळते.