श्री शिवलीलामृत अध्याय बारावा (१२) | Shree Shivleelamrut Adhyay Barava (12)

Shree Shivleelamrut Adhyay Barava
Shree Shivleelamrut Adhyay Navava
Shree Shivleelamrut Adhyay Navava
Shree Shivleelamrut Adhyay Dahava
Shree Shivleelamrut Adhyay Dahava
Shree Shivleelamrut Adhyay Akrava
Shree Shivleelamrut Adhyay Akrava

Shree Shivleelamrut Adhyay Barava |श्री शिवलीलामृत अध्याय बारावा (सार)

सुत अशाप्रकारे शिवकथा सांगत होते व श्रोते त्यात रममान होऊन ऐकत होते. सुत म्हणाले सज्जन हो पुढील कथा ऐका. दक्षिण देशाला अमंगळ नामक गांव होते. तेथील लोकही अमंगळ म्हणजे अधर्मी होते. त्याच गावात एक विदुर व बहुला नामक ब्राह्मण जोडपे राहात होते ते दोघेही अनितिच्या मार्गाने वागत होते. पती वेश्याच्या अधिन झाला होता व पत्नी व्यभिचार करी होती. विदुर मरण पावल्यानंतर त्याच्या पापकर्मामुळे यम यातना भोगुन तो पिशाच योनीस आला व विध्याचळ पर्वतावर भूकेने व्याकुळ होऊन पिशाच होऊन संचार करू लागला. इकडे त्याच्या मृत्युनंतर बहुलेस एक मुलगा झाला. त्याचा पिता कोण हेही तीला माहीत नव्हते. ती कांही यात्रेकरू बरोबर गोकर्णक्षेत्री गेली तिर्थस्नान करून कोकर्णाचे दर्शन घेतले. तेथे पुराणकथा चालू होती ती ऐकण्यास बसली. नेमके व्यभिचारीनी स्त्रीयांना मरनोत्तर यमदुत कशा यातना करतात अनेक शिक्षा देतात निरूपण पुराणीकांनी सांगितले तीला पश्चाताप झाला व पुराणीकाला भेटून सर्व आपणाकडून घडलेले पाप सविस्तर सांगितले नंतर त्या पुराणीक ब्राह्मणाने तीला शिवमंत्राचा उपदेश देवून शिवलिलेच्या कथा सांगितल्या त्या योगे ती शिवउपासना करून पवित्र होऊन शिवकृपेने दिव्य विमानी बसुन गेली तीचा उद्धार झाला. शिवचरणी जागा मिळाली. पावर्तीच्या उपदेशाने ती पर्वतावर जाऊन पिशाच्च पतीला शिवकीर्तन ऐकवून त्याचाही उद्धार केला. सुत पुढे भस्मासुराची कथा सांगतात. एकदा भगवान शंकर अंगाला भस्म लावित असता त्यात खडा सांपडला व त्यातून एक राक्षस उत्पन्न झाला. त्यास भस्मासूर असे नाव देवून रोज नवीन चिताभस्म आनुन देण्याचे काम सांगितले. त्याप्रमाणे त्याने केले परंतु पुढे तो उन्मत होऊन आपण त्रिभुवनावर राज्य करावे असा त्याचे मनात विचार आला त्याने भस्म कुठेच मिळत नाही म्हणून शंकरास सांगितले तेंव्हा मला वर द्या मी ज्याच्या डोक्यावर हात ठेविन तो भस्म होईल पार्वतीने विरोध करून ही शंकराणी त्यास वर दिला. तो उन्मत होऊन सर्वांना भस्म करू लागला देवगणादि सर्व भयभित झाले. व त्यांनि श्रीविष्णु ची प्रार्थना केली विष्णु सर्वांना घेवून कैलासाला शंकराकडे गेले तेव्हढ्यात भस्मासुरही तेथे आलाच शंकराचे मस्तकावर हात ठेवण्यास धावला व पार्वतीची मागणी करू लागला विष्णुने मोहिनीचे रूप घेतले व शंकराने वटवृक्षाचे रूप धारण केले भस्मासुर मोहिनीला पाहून मोहित झाला. त्याला मोहिनीने लग्नापूर्वी नृत्य करायला सांगितले त्याप्रमाणे मोहिनीने आपल्या मस्तकावर हात ठेवला तसा त्यानेही आपल्या मस्तकावर हात ठेवताच भस्म झाला. भगवान शंकरावरील संकट टळले सर्वांनी विष्णुची स्तुती केली.


श्री शिवलीलामृत : अध्याय बारावा

श्रीगणेशाय नमः ॥ ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्रवर्ण ॥ ब्रह्मचारी गृहस्थ वानप्रस्थ पूर्ण ।। स्त्री बाल वृद्ध तरुण ।। सर्वं शिवकीर्तन करावें ॥१ ॥ शिवस्मरण नावडे अणुमात्र ।। तो अंत्यजाहूनी अपवित्र ।। तो लेइला वस्त्रे अलंकार ॥ जेवीं प्रेत शृंगारिलें ॥२॥ तेणें भक्षिलें जें अन्न त्र ।। ॥ जैसें पशु भक्षिती यथेष्ट तृण ।। जैसे मयूराअंगीं नयन ।। तैसेचि नेत्र तयाचे ।। ३ ।। वल्मिक छिद्रवत कर्ण ।। द्रुमशाखावत हस्त चरण ।। त्याची जननी व्यर्थ जाण ॥ विऊनी वांझ जाहली ॥४॥ जो शिवभजनाविण ।। तो जावो समुद्रांत बुडोन ॥ अथवा भस्म करो वडवाग्न । कां सर्प डंखो तयासी ॥५॥ तरी श्रवणीं धरावी आवडी ।। जैसी पिपीलिका गुळासी न सोडी ॥ अर्थ तुटे परी न काढी ।। मुख तेथूनि सर्वदा ।। ६ ।। कीं चुकला बहुत दिवस सुत ।। तेवढाचि पोटीं प्रीतिवंत ।। त्याची शुभवार्ता ऐकतां अकस्मात ।। धांवती मातापिता जेवीं ॥७॥ अमृताहूनि वाड ॥ गोष्टी लागती कर्णासी गोड ॥ तैसें कथाश्रवणीं ज्यांचें न पुरे कोड ॥ सर्व टाकोनि जाईजे ॥८॥

श्री गणेशाला, श्री सरस्वतीला, श्री सद्‌गुरूनाथांना आणि भगवान श्री सांबसदाशिवास नमस्कार असो. कवी, श्रीधर सांगतात की, शिवभजन, शिवकीर्तन हे चारी वर्णाचे लोक, आबाल, स्त्रीपुरुष, ब्रह्मचारी वा गृहस्थाश्रमी लोक यापैकी कोणीही अन् केव्हाही करावे. ।।१।। ज्याला शिवमजन आवडत नाही. जो शिवनाम घेत नाही, तो अत्यंजाहूनही अपवित्र असा मानावा. असा मनुष्य हा जिवंत असला तरी तो शृंगारलेल्या प्रेतासारखाच मानावा. ।।२।। त्याचे अन्नभक्षण हे प्राण्याच्या गवताच्या चर्वणासारखे असते. त्याचे डोळे म्हणजे मोराच्या पिसाऱ्यावरील दृष्टी नसलेल्या डोळ्यांसारखे निरर्थक असतात. ।।३।। त्याचे कान म्हणजे जणूकाही वारुळाची भोके, त्याचे हायपाय म्हणजे जणू झाडाच्या फांद्या. अशा अभक्तास जन्म देऊनही खरं म्हणजे त्याची माता ही वांझच म्हणावी लागेल. ।।४।। जो शिवाचे भजन प्रिय मानीत नाही, ते करीत नाही तो समुद्रात बुडून जावा. अग्नीत जळून जावा किंवा त्याचा सर्पदंशाने मृत्यू व्हावा. ।।५।। म्हणून प्रत्येकानेच शिवभजनाची खास आवड धरावी. मुंगी गुळाला एकदा का चिकटली तर ती ओढून काढली तर अर्धी तुटते, पण तोंडातला गूळ काही सोडत नाही ।।६।। किंवा अनेक दिवसांनी भेटलेली आई आणि मुलगा किंवा मुलगी जसे एकमेकांकडे धावत जातात ।।७।। तसे अमृताहून गोड असलेले हे शिवनाम, शिवकीर्तन ऐकण्यासाठी जो खरा शिवभक्त आहे; शिवोपासक आहे. त्याने इतर सर्व कामे बाजूला टाकून त्या श्रवणास जावे. ।।८।।


गांवास गेला प्राणनाथ ।। प्रिय पतिव्रता वाट पाहात ॥ तों पत्र आलें अकस्मात ॥ धांवे श्रवण करावया ।।९ ।। निर्धनासी सांपडे धन ।। कीं जन्मांधासी आले नयन ।। कीं तृषेनें जातां प्राण ।। जीवन शीतळ मिळालें ॥१०॥ ऐसें ऐकावया कथा पुराण ॥ धांवावें सर्व काम टाकून ॥ चिंता निद्रा दूर करून ।। श्रवणीं सादर बैसावें ॥ ११ ॥ वक्ता पंडित चातुर्यखाणी ।। नमावा तो सद्गुरु म्हणोनी ।। कीं हा शंकरचि मानूनी ॥ धरिजे पूजनीं आदर ॥१२॥ सुरभीच्या स्तनांतूनि अवधारा ।। सुटती जैशा सुधारसधारा ।। तैसा वक्ता वदतां शिवचरित्रा ॥ कर्णद्वारें प्राशिजे ॥१३॥ वक्ता श्रेष्ठ मानावा अत्यंत ।। न पुसावें भलतें पाखंड मत ।। नसते कुतर्क घेवोनि चित्त ।। न शिणवावें सर्वथा ॥१४॥ न कळे तरी पुसावें आदरें ।। सांगेल तें श्रवण करावें सादरें ।। उगेंचि छळितां पामरें ।। तरी ते पिशाचजन्म पावती ॥१५ ॥ वक्त्यासी छळितां अवधारा ॥ तरी दोष घडे त्या नरा ।। पुराणिकावेगळें नमस्कारा ॥ न करावें सभेत कोणासी ॥ १६ ॥ मध्येंच टाकूनि कथाश्रवण ॥ उगाच गर्वं जाय उठोन ॥ तरी तो अल्पायुषी जाण ।। संसारी आपदा बहु भोगी ॥१७॥

ज्याप्रमाणे एखादी पतिव्रता ही गावाला गेलेल्या पतीचे आलेले पत्र वाचायला धावत जाते. ।।९।। ज्याप्रमाणे दरिद्री माणसास धन सापडावे, आंधळ्याला दृष्टी मिळावी, तहानलेल्या जीवास थंड शीतल जल मिळावे; ।।१०।। तसे हे शिवकीर्तन असल्याने या शिवपुराण कथा श्रवणासाठी सर्वांनी आवडीने धाव घ्यावी. चिंता आणि आळस दूर सारून त्या श्रवणास जावून बसावे. ।।११।। शिवकथा निवेदन करणारा वक्ता हा ज्ञानी, चतुर मानावा. त्यास गुरुस्वरूप मानून, शिवरूप मानून त्यास भक्तिभावाने वंदन करावे. ।।१२।। ज्ञानी वक्त्याचे निवेदन हे गायीच्या स्तनातून सुटणाऱ्या अमृतधारा मानून त्याचे शांत चित्ताने कानाद्वारे श्रवण करावे. ।।१३।। निवेदक, वक्ता, कीर्तनकार हा ज्ञानी मानावा. त्यास नसते प्रश्न विचारू नयेत. उगाच कुतर्क करू नयेत. ।।१४।। समजा एखादा भाग हा आपल्याला कळला नाही, समजला नाही तर तो विनयाने विचारावा. तो जे सांगत असेल ते आदराने ऐकावे. जे वक्त्यास उगाच त्रास देतात ते पिशाच्च योनीत जन्मास जातात. ।।१५।। जो नाहक वक्त्यास छळतो, त्रास देतो त्यास दोष लागतो. कीर्तन सभेत एका पुराणिकाशिवाय अन्य कोणासही नमस्कार करू नये. ।।१६।। जो उगाच अर्धे कथाश्रवण टाकून उठून जातो तो अल्पायुषी होतो. त्यास संसारात खूप कष्ट भोगावे लागतात. ।।१७।।


कुटिल खळ पापी धूर्त ॥ तो मुख्य श्रोता न करावा यथार्थ ॥ दुग्ध पितां सर्वांगीं पुष्ट होत । परी नवज्वरिता विषवत तें ।॥ १८ ॥ तैसा श्रवणीं बैसोन ।। कुतर्क घेवोनि करी कथाखंडण ।। त्याचें व्यर्थ गेलें श्रवण ।। नरकासी कारण पुढें केलें ॥१९॥ कथेंत न बोलावें इतर ।। मन करावें एकाग्र ।। कथेची फलश्रुति साचार ।। तरीच पावती बैसतां ॥ २० ॥ वस्त्रे अलंकार दक्षिणासहित ।। वक्ता पूजावा प्रीतीं अत्यंत ।। धन देतां कोश बहुत ॥ भरे आपुला निर्धारं ॥ २१ ॥ रत्नें देतां बहुत ।। नेत्र होती प्रकाशवंत ।। अलंकारें प्रतिष्ठा अत्यंत ।। श्रोतयांची वाढतसे ॥ २२ ॥ एवं पूजितां षोडशोपचार ।। तेणें तुष्टमान होय उमावर ।। जे जे पदार्थ अर्पावें साचार ।। त्यांचे कोटिगुणें प्राप्त होती ।। २३ ।। त्यासी कदा नाहीं दरिद्र ।। शेवटीं स्वपदा नेईल भालचंद्र ।। कथेसी येतां पाउलें टाकी निर्धार ।। पापसंहार पदोपदीं ॥ २४ ॥ मस्तकीं उष्णीष घालूनि ऐकती ।। तरी जन्मांतरीं बाळपक्षी होती ॥ म्हणाल उष्णीष काढितां न ये सभेप्रती ।। तरी मुख्य पल्लव सोडावा ॥ २५ ॥ जे विडा घेवोनी ऐकती ।। तरी यमकिंकर त्यांसी जाचिती ।। नाना यातना भोगविती ।। मूळ व्यासवचन प्रमाण हैं ॥ २६ ॥

श्रोता हा कपटी, पापी, दुष्ट असू नये. दूध पिणे हे जरी शरीरास पोषक असते तरी ज्याला विषमज्वराचा ताप आलाय त्यास ते विषासमान ठरते. ।।१८।। त्याप्रमाणे उगाच श्रोत्याने मनात कुटील भाव धरून कथेत खंड पाडला तर ते श्रवण वाया जाते. त्याने कोणताच पुण्यलाभ होत नाही. उलट अशी व्यक्ती नरकाची धनी होते. ।।१९।। जर कथा कीर्तनात अन्य काहीही न बोलता एकाग्र चित्ताने ते श्रवण केले तर त्याची उचित फलप्राप्ती श्रोत्यास मिळू शकते. ।।२०।। कथा सांगणाऱ्या कीर्तनकारास, पोथी वाचकास, निवेदकास, उचित वस्त्रे, अलंकार, दक्षिणा द्यावी. त्यास जे जे आपण देऊ त्याच्या कितीतरी जास्त पटीने ती गोष्ट आपल्याला पुन्हा प्राप्त होत असते. ।। २१।। जर दानात रत्ने दान केली तर दात्याचे डोळे हे रत्नासारखे तेजस्वी होतात, जर अलंकार दिले तर प्रतिष्ठा वाढते. ।।२२।। वक्त्याचे यथोचित आदरातिथ्य केले, त्याचे पूजन सन्मान केला तर त्याने उमामहेश्वरास परम संतोष होतो. आपण वक्त्यास जे जे देऊ त्याच्या कितीतरी पटीने तो भगवान आपल्यास देत असतो. ।।२३।। अशा दात्यास कधीही दारिद्रय येत नाही. त्यास शेवटी भगवान स्वपदास नेतात. कथा श्रवणासाठी आपण श्रद्धेने जेवढी पावले चालून जातो, त्या प्रत्येक पावलागणिक आपल्या एकेका पापाचा नाश होतो. ।।२४।। जे कोणी डोक्यावर पागोटे घालून शिवकीर्तन ऐकतात ते पुढील जन्मात बगळे म्हणून जन्मतात. जर डोईचे पागोटे काढणे हे गैरसोयीचे असेल तर किमान त्याचा पदर तरी सोडावा. ।। २५ ।। जे मुखातील विडा खात खात श्रवण करतात त्यांना यमदूत छळतात; त्यांना यातना भोगाव्या लागतात. ।।२६।।


एक बैसती उगेच श्रवणीं ।। निद्रा मोडावी बहुत प्रकारेंकरूनी ।। अंतर सद्गद नेत्रीं यार्वे पाणी ।। मग निद्रा कैंची स्पर्शल ॥ २७ ॥ वरी जीवन कार्य व्यर्थ लावून ॥ जैसें एकांतीं द्रव्य आपुलें पूर्ण ।। तेथें घडतां जागरण ।। निद्रा न ये प्राणियां ॥ २८ ॥ निद्रा लागली दारुण । तरी उभे ठाकावें कर जोडून ।। निद्रा न ये तो उपाय करून ॥ मुख्य श्रवण करावें ॥ २९ ॥ वक्त्याहूनि उंच आसन तत्त्वतां ।। तेथें न बसावें धरुनि अहंता ।। हें न मानिती ते काग तत्त्वतां ।। जगपुरीष भक्षिती ॥ ३० ॥ जे बैसती वीरासन घालून ॥ ते होती वृक्ष अर्जुन ।। पाय पसरिती त्यांसी सूर्यनंदन ॥ शुष्ककाष्ठं झोडी बळें ॥३१ ॥ जे सांगतांही न ऐकती ।। बळेंचि जेठा घालूनि बैसती ।। त्यांसी यमदूत बांधोनि नेती ।। नेऊनि टाकिती नरककुंडीं ॥ ३२ ॥ जो श्रवणीं निजे दाटून ।। तो उपजे अजगर होऊन ।। बैसे नमस्कार केलियावांचून ।। वंशवृक्ष होय तो ॥३३॥ कथेत बोले भलत्या गोष्टी ।। तो मंडूक होय सदा वटवटी ।। हर्षं टाळिया न वाजवी हट्टी ।। होय कष्टी संसारी ॥ ३४ ॥ जे शिवकीर्तन हेळसिती ॥ ते शतजन्मीं सारमेय होती ।। दुरुत्तरें बोलती निश्चितीं ॥ जन्मा येती सरडाच्या ॥ ३५ ॥

जे सहज म्हणून श्रवणास बसतात त्यांनी प्रयत्नपूर्वक झोप टाळावी. श्रवणी इतके रंगून जावे की, डोळ्यांत पाणी यायला हवे. तसे झाले तर झोप येण्याचा प्रश्नच राहात नाही. ।।२७।। उगाच डोळ्याला पाणी लावून श्रवणास बसण्यात काय अर्थ आहे? ज्याप्रमाणे आपले धन सोबत घेऊन बसले तर झोप येत नाही. ।। २८।। जर अगदीच झोप अनावर झाली तर अशावेळी उठून उभे राहावे. शिवकीर्तनात झोप येणार नाही ह्याची पूर्ण काळजी घ्यावी. त्यासाठी नाना उपाय करावेत. ।।२९।। कीर्तन सभेत कधीही वक्त्यापेक्षा उंच आसनावर श्रोत्यांनी बसू नये. असे वर्तन करणारे पापी लोक पुढील जन्मी कावळ्याच्या जन्मास जातात आणि विष्ठा भक्षण करतात. ।। ३० ।। जे कीर्तनात वीरासन घालून बसतात ते अर्जुनवृक्षाच्या रूपाने जन्म घेतात. जे पाय पसरून बसतात त्यांना यम शासन करतो. ।।३१।। जे खुरमांडी घालून बसतात, त्यांना यमदूत बांधून नेतात आणि नरकात टाकतात. ।।३२।। जे श्रवण करीत असतानाही झोपतात ते अजगराच्या जन्मास जातात. जे वक्त्यास वंदन न करता कीर्तनास बसतात ते वेळूचे झाड होतात. ।।३३।। जे कथा कीर्तनाचे वेळी भलत्याच गोष्टीत रमतात ते पुढील जन्मी बेडूक होतात. जे टाळी वाजवीत नाहीत, ते संसार प्रपंचात कष्टी होतात. ।।३४।। जे शिवभजनाची हेटाळणी करतात ते कुत्र्याच्या जन्मास जातात. जे शिवकथेत दुरुत्तरे करतात ते सरड्याच्या जन्मास जातात. ।।३५।।


जे श्रवणीं न होती सादर ॥ ते अन्य जन्मीं होती सूकर ॥ जे उच्छेदिती शिवचरित्र।। ते वृकयोनी पावती ॥ ३६ ॥ वक्त्यासी देतां आसन ॥ शिवसन्निध बैसे जावोन ॥ वस्त्रं देतां अन्न ।। प्राप्त होय तयातें ।॥३७॥ करितां कथापुराण श्रवण ॥ भक्ति वैराग्य ये अंगी पूर्ण ॥ यदर्थां कथा सुगम जाण ।। जेणें अनुताप उपजे मनीं ॥ ३८ ॥ दक्षिणेकडे ग्राम एक अमंगळ ॥ त्याचें नांव मुळींच बाष्कळ ॥ सर्वधर्मविवर्जित केवळ ।॥ स्त्रीपुरुष जारकर्मी ॥ ३९ ॥ धर्म नाहींच अणुमात्र ॥ अनाचारी परम अपवित्र ।। जपतपविवर्जित अग्निहोत्र ॥ वेदशास्त्र कैंचें तेथें ॥४०॥ वेद आणि शास्त्र ॥ हे विप्राचें उभय नेत्र ॥ एक नाहीं तरी साचार ॥ एकाक्ष तयासी बोलिजे ॥ ४१ ॥ वेदशास्त्र उभयहीन ॥ तो केवळ अंधचि जाण ।। असो त्या नगरींचें लोक संपूर्ण ।। सर्व लक्षणीं अपवित्र ॥४२ ॥ तस्कर चाहाड आणि जार ।। मद्यपी मार्गघ्न दुराचार ।। मातापितयांचा द्रोह करणार ।॥ एवं सर्वदोषयुक्त जे ॥४३॥ त्या ग्रामींचा एक विप्र ।। नाम तयाचें विदुर ।। वेश्येसी रत अहोरात्र ।। कामकर्दमीं लोळत ॥४४॥

जे अभक्त शिव कीर्तनास सादर होत नाहीत ते सूकर योनीत जन्म पावतात. जे नाहक शिवकथेबद्दल मनात नको त्या आशंका बाळगतात ते लांडग्याच्या जन्मास जातात. ।।३६।। जो भक्त कथा निवेदकास उत्तम आसन प्रदान करतो त्यास अंती शिवासन्निध स्थान मिळते. जे वक्त्यास वस्त्र दान करतात त्यांना अन्नाला कधीच कमतरता पडत नाही. ।।३७।। शिवकथेचे एकाग्र चित्ताने श्रवण केले तर उपासकाच्या मनात वैराग्य जागते, भक्ती फुलून येते. श्रीधर कवी म्हणतात. आता यासंदर्भात तुम्हास एक कथा सांगतो, ती ऐका. त्याने तुमच्या मनात अनुताप उत्पन्न होईल. ।। ३८।। दक्षिण भागात एक अत्यंत गलिच्छ असे गाव होते. त्या गावातले स्त्रीपुरुष हे धर्माचरण करीत नव्हते. उलट तेथील त्रीपुरुष हे प्रामुख्याने जारकर्मी होते. ।।३९।। त्या गावात धर्म म्हणून नव्हताच, सर्वत्र अनाचार आणि पापाचरणाचेच साम्राज्य होते. जपजाप्य, वेदपठण हे तर नव्हतेच. ।।४०।। खरं म्हणजे वेद आणि शास्त्र हे ब्राह्मणाचे दोन डोळे. यापैकी कोणताही एक डोळा जर त्यास नसेल तर त्याला एकाक्षच म्हणतात. ।।४१।। आणि ज्याच्याकडे या दोन्ही गोष्टी नाहीत म्हणजेच ज्यास खऱ्या अर्थाने दृष्टी नाही तो तर आंधळाच म्हणायला हवा. एकूणच काय तर या गावात सुलक्षणी लोकांची चांगलीच वानवा होती. इथला प्रत्येकजण हा दूषित होताच. ।।४२।। चोरी, चहाडी, बदफैली, वाटमारी, अनीती, कपट, दुराचार, मातृ-पितृ द्रोह अशा सर्व प्रकारच्या दोषांनी इथले लोक भरलेले होते. ।। ४३ ।। त्या गावात एक विदुर नावाचा ब्राह्मण राहात होता. तो त्याच गावातील एका वेश्येच्या घरीच नेहमी पडलेला आणि कामकर्दमी लोळत असायचा. ।।४४।।


त्याची स्त्री बहुला नाम ।। तीही जारिणी अपवित्र परम ॥ एके जारासीं असतां सकाम ।। भ्रतारें जपोनि धरियेली ॥४५ ।। जार पळाला सत्वर ।। तीस भ्रतारें दिधला मार ॥ यथेष्ट लत्तामुष्टिप्रहार ॥ देतां बोले काय ते ॥४६ ॥ म्हणे तूं झालासी जार ।। मीही तेंचि करितें निरंतर ।। मग बोले तो विप्र विदुर ।। तुवां द्रव्य अपार मिळविलें ॥४७॥ तें द्रव्य दे मजलागून ।। मी देईन वारांगनेसी नेऊन । ती म्हणे मी देऊं कोठून ।। ऐकतां मारी पुढती तो ॥४८ ॥ मग तिचे अलंकार हिरोनि घेत ॥ घरची सर्व संपत्ति नेत ।। ते वारांगनेसी देत ।। तेही समर्पी जारातें ॥४९॥ ऐसें दोघेही पायें आचरत ।। तों विदुर विप्र पावला मृत्यु ।। यमदूतीं नेला मारीत ॥ बहुत जाचिती तयातें ॥ ५० ॥ कुंभीपाकादि परम दुःख ॥ भोगूनियां तो शतमूर्ख ।। मग विंध्याचळाच्या दरींत देख ।। भयानक पिशाच जाहला ।।५१ ।। आळेपिळे अंगासी देत ।। हिंडे क्षुधातृषापीडित ।। रक्तवर्ण अंग त्याचें समस्त ॥ जेवीं शेंदूर चर्चिला ।।५२ ।। वृक्षासी घेत टांगून ।। सर्वेचि हांक देत फिरे वन ॥ रक्तपिती भरोन ॥ सर्वांग त्याचें नासलें ॥५३॥

त्याच्या बायकोचे नाव बहुला, तीही जारिणी व अपवित्र होती. ती पण एका परपुरुषाशी संबंध ठेवून होती. एकदा त्या ब्राह्मणाने आपल्या पत्नीस एका दुसऱ्या जारासोबत पाहिले. ।।४५।। तो जार पळून गेला, पण त्या ब्राह्मणाने मात्र त्याच्या बायकोस मार मार मारले, तेव्हा ती त्यास म्हणाली. ।।४६।। तू तरी वेगळे काय करतोस? तूसुद्धा जारकर्मच करतोस. तिचं बोलणं ऐकून त्यास राग आला. तो बहुलेला म्हणू लागला, तू आजवर जे धन कमविले आहेस ते मला दे. तिने त्या गोष्टीस नकार देताच त्याने पुन्हा तिला मारले. ।।४८।। विदुराने आपल्या पत्नीस मारले, झोडले, तिची निर्भर्त्सना केली. तिच्याकडून धन, अलंकार, दागिने हे काढून घेतले आणि त्याने ते धन ते दागिने हे सर्व त्या वेश्येस दिले. इकडे बहुलेनेही आपले धन जारास दिले. ।।४९।। अशाप्रकारे ते उभयता पापकर्म करीत असताना पुढे कालांतराने तो विदुर हा मृत्यू पावला. त्याला यमदूतांनी मारत नेले आणि त्यास भरपूर यमयातना भोगाव्या लागल्या. ॥५०।। त्या यातना सहन करून त्याचा कर्मभोग काही सरेना, म्हणूनच की काय यमदूतांनी त्यास पिशाच्च योनीत जन्मास घातले. तो विंध्याचळाच्या पर्वतरांगांत एक भयानक पिशाच्च होऊन राहू लागला. ।।५१।। रानावनात भुकेला होऊन भटकू लागला. पण त्याला काही खायला मिळेना, त्याचे आधीच विद्रुप असणारे अंग आणखीनच नासले. त्याचे अंग शेंदूर फासल्यासारखे लालभडक दिसू लागले. ।।५२।। तो कधी स्वतःस झाडास उलटे टांगून घेई, तर कधी आरडत ओरडत फिरत असे. त्याचे अंग महारोगाने नासले. ।।५३।।


कंटकवन परम दुर्धर ॥ न मिळे कदा फलमूलआहार ॥ आपुल्या पापाचें भोग समग्र ।। भोगी विदुर विप्र तो ॥५४॥ इकडे बहुला धवरहित ।। एक होता तियेसी सुत ।। तो कोणापासोनि झाला त्वरित ।। तें स्मरण नाहीं तियेसी ।॥ ५५ ॥ तंव आलें शिवरात्रिपर्व ॥ गोकर्ण यात्रेसी चालिले सर्व ।। नाना वाद्यै वाजती अभिनव ।। ध्वजा पताका मिरविती ॥ ५६ ॥ शिवनामें गर्जती दास ।। वारंवार करिती घोष ।। कैंचा उरेल पापलेश ।। सर्वदा निर्दोष सर्व जन ॥५७॥ त्यांच्या संगतीं बहुला निघत ।। सर्वे घेवोनि धाकटा सुत ।। गोकर्ण क्षेत्र देखिलें पुण्यवंत ।। झाले पुनीत सर्व जन ।।५८ ।। बहुलेनें स्नान करून ।। घेतलें महाबळेश्वराचें दर्शन ।। पुराणश्रवणीं बैसली येऊन ।। तों निरूपण निघालें ॥५९॥ जी वनिता जारीण ॥ तीस यमदूत नेती धरोन ॥ लोहपरिघ तप्त करून ॥ स्मरगृहामाजी घालिती ॥६०॥ ऐसें बहुला ऐकोनी ।। भयभीत झाली तेचि क्षणीं ॥ अनुताप अंगीं भरोनी ।। रडों लागली अट्टाहासें ॥६१ ॥ मग पुराणिकासी समस्त ।। आपुला सांगे वृत्तांत ॥ झाले जे जे पापांचे पर्वत ।। ते निजमुखें उच्चारी ॥ ६२ ॥

जिथे ना फळे ना आहार मिळणार अशा काटेरी रानावनात तो विदुर भटकू लागला, नाना क्लेश भोगू लागला. ।।५४।। इकडे बहुलेस एक मुलगा झाला. पण तो नेमका कोणापासून हेच तिला कळत नव्हते. ।।५५।। असाच काही काळ लोटला आणि महाशिवरात्रीचे एक पर्व आले. त्यानिमित्याने सर्वजण गोकर्ण महाबळेश्वराच्या यात्रेस तिथे आले. ते क्षेत्र त्या उत्सवाच्या निमित्ताने सजले नटले होते. ।।५६।। तिथे आलेले शिवभक्त शिवनामाचा एकसारखा गजर करीत होते, त्यामुळे तिथे पापाचा लवलेश नव्हता. सर्वजण त्या शिवनाम स्मरणाने दोषमुक्त झाले होते. ।।५७।। त्या शिवभक्तांच्या सोबत बहुलाही आपल्या मुलास घेऊन त्या क्षेत्री आली. त्या क्षेत्रीच्या पुण्यपावन अशा शिवलिंग दर्शनाने सर्व लोक पावन होत होते. ।।५८।। तेव्हा तिथे आलेल्या बहुलेने पवित्र स्नान केले, गोकर्ण महाबळेश्वराचे दर्शन घेतले आणि ती तिथेच सुरू असलेल्या शिवकीर्तनास जाऊन बसली. त्यावेळी नेमके असे कथा निरूपण चालू होते की, ।।५९।। एका जारिणीस यमदूत यमलोकी घेऊन जातात, तिला तिथे अनेक यमयातना भोगाव्या लागतात. एक लोखंडी सळई तापवून ती तिच्या गुप्तांगात घालतात. ।।६०।। हे वर्णन ऐकताच बहुला अत्यंत भयभीत झाली. तिला तिच्या आजवरच्या दुष्कर्माची तीव्र जाणीव झाली. ती भर कीर्तन सभेत मोठमोठ्याने रडू लागली. ।।६१।। पुराणिकांनी तिला तिच्या रडण्याचे कारण विचारताच तिने दुःखित अंतःकरणाने आपली सर्व हकिकत सांगितली. ।।६२।।

अंतकाळीं यमकिंकर ।॥ ताडण करतील मज अपार ।। ते वेळीं मज कोण सोडविणार ।। दुःख अपार सोसूं किती ॥६३॥ स्वामी माझें कांपतें शरीर ॥ काय करूं सांगा विचार ॥ गळां पाश घालूनि यमकिंकर ।। करिती मार तप्तशस्त्रं ॥ ६४ ।। नानापरी विटंबविती ।। असिपत्रवनीं हिंडविती ।। उफराटें बांधोनि टांगिती ॥ नरककुंडीं अधोमुख ॥ ६५ ॥ ताम्रभूमी तापवून । त्यावरी लोळविती नेऊन ।। तीक्ष्ण शस्त्रे आणोन ।। पोटामाजी खोंविती ॥ ६६ ॥ तीक्ष्ण धूम्र करून ।। वरी टांगिती नेऊन ।। भूमींत मज रोवून ।। तप्तशरें मार करिती ।॥ ६७ ॥ तप्तशूळावरी घालिती ।। पायीं चंडशिळा बांधिती ।। महानरकीं बुडविती ।। सोडवी कोण तेथूनी ।। ६८ ।। बहुलेसी गोड न लागे अन्न ।। दुःखें रडे रात्रंदिन । म्हणे मी कोणासी जाऊं शरण ।। आश्रय धरूं कोणाचा ॥ ६९ ॥ कोण्या नरकीं पडेन जाऊन ।। मग त्या ब्राह्मणाचें धरी चरण ।। सद्गुरु मज तारी येथून । आलें शरण अनन्य मी ॥ ७० ॥ मग गुरू पंचाक्षर मंत्र ।। सांगे बहुलेप्रती सत्वर ।। शिवलीलामृत सुरस फार ॥ श्रवण करावी शिवद्वारीं ।॥ ७१ ॥ मग तिणें सर्व ग्रंथ ।। गुरुमुखें ऐकिले प्रेमयुक्त॥ श्रवणभक्ति अवघ्यांत ।। श्रेष्ठ ऐसें जाणिजे ॥७२॥

ती त्यांना म्हणू लागली, “महाराज, जेव्हा माझ्या अंतकाळी मलाही ते यमदूत असेच मारीत नेतील तेव्हा मला कोण सोडवील? मला ते दुःख, त्या यातना कशा सहन होतील? ।।६३।। महाराज, माझे शरीर त्या भीतीने थरथर कापते आहे. मी आता काय करू ते सांगा. उद्या मलाही ते यमदूत असेच मारीत नेतील आणि ते भयानक असे शासन करतील. ।।६४।। माझी नाना प्रकारे छळवणूक करतील, मला तलवारीच्या पात्यावर हिंडवतील, मला उफराटे टांगतील, तेव्हा मी काय करू?” ।।६५।। मला तापलेल्या पत्र्यावर लोळवतील, माझ्या अंगात तप्त शस्त्रे खुपसतील. माझी सालडी काढतील. ।। ६६।। मला उलटे टांगून धुरी देतील. जमिनीत पुरून माझ्या अंगावर तीक्ष्ण बाणांचा वर्षाव करतील. ।।६७।। मला तापलेल्या सूळावर चढवतील, माझ्या पायांना दगड बांधून मला नरकात बुडवतील, तेव्हा माझी सोडवणूक कोण करेल ? ।।६८।। पुढे आपले कसे होणार या कल्पनेनेच बहुलेला अन्नपाणी गोड लागेना. तिला काही सुचेना एकसारखी रडू लागली. मी कोणास शरण जाऊ असा विचार करू लागली. ।।६९।। महाराज, माझे पुढे काय होईल? मी कोणत्या नरकात जाईन, असे म्हणत तिने पुराणिकांचे पाय धरले. ती म्हणाली, महाराज, मी आपल्याला शरण आले आहे. मला तरणोपाय सांगा. ।।७०।। तेव्हा त्या पुराणिकास बहुलेची कीव आली. त्यांनी बहुलेस ॐ नमः शिवाय या मंत्राचा उपदेश केला. तिला त्यांनी त्याच शिव मंदिरात शिवलीला ऐकवली. ।। ७१ ।। तिने मोठ्या श्रद्धेने तो शिवलीलामृत ग्रंथ श्रवण केला. श्रवण भक्ती हीसुद्धा कशी श्रेष्ठ आणि पतितोद्धारक आहे, हे त्यांनी तिला सांगितले. ।।७२।।


सत्संगें होय निःसंग ।। निःसंगें निर्मोह सहज मग ।। निर्मोहत्वें निश्चित उद्वेग ।। कैंचा मग तयासी ॥७३।। बहुला झाली परम पवित्र ।। शिवनाम जपे अहोरात्र ।। दोष न उरे तिळमात्र ।। शुचिर्भूत सर्वदा ।।७४ ।। तव्याचा जाय बुरसा ।। मग तो सहजचि होय आरसा ।। कीं लोह लागतां परिसा ।। चामीकर सहजचि ।।७५ ।। कीं अग्नींत काष्ठ पडलें ।। मग तें सहजचि अग्निमय झालें ॥ गंगेसी वोहळ मिळालें ॥ गंगाजळ सहजचि ॥७६ ॥ जप करितां पाप जाय निःशेष ॥ ज्ञानाहूनि ध्यान विशेष ॥ श्रवणाहूनि मननास ।। सतेजता सहजचि ॥ ७७ ॥ मननाहूनि निदिध्यास ॥ त्याहूनि साक्षात्कार सरस ।। मग तो शिवरूप निर्दोष ।। संशय नाहीं सर्वथा ॥ ७८ ॥ बहुला निर्दोष होऊन ॥ श्रवणें झाली सर्वपावन ॥ जिव्हेनें करूं लागली शिवकीर्तन ॥ मग कैंचें बंधन तियेसी ॥ ७९ ॥ श्रवणें थोर थोर पावन होत ।। श्रवणें याच जन्मीं मुक्त ॥ नलगे तीर्थाटन श्रम बहुत ।। श्रवणें सार्थक सर्वही ।।८० ॥ ज्यासी न मिळे सत्समागम श्रवण ।। त्यानें करूं जावें तीर्थाटन ।। नलगे अष्टांगयोगसाधन ।। करावें श्रवण अत्यादरें ॥ ८१ ॥

त्यानंतर बहुलेस सज्जनांचा सहवास आणि नामस्मरणाची गोडी लागली. त्या सत्संगाने तिच्या मनात भक्ती फुलू लागली, वैराग्य जागे होऊ लागले. तिचे मन हळूहळू निर्मोही होऊ लागले. ।। ७३ ।। त्या शिवोपासनेने बहुला पवित्र आणि पावन होत गेली. ती रात्रंदिवस शिवनामाचा जप आणि शिवाचे ध्यान करू लागली. त्यामुळे तिच्या पापांचा नाश होत गेला आणि ती पवित्र शुद्ध निर्मळ झाली. ।।७४।। ज्याप्रमाणे तव्याची बुरशी घासून काढली की, तो आरश्यासारखा स्वच्छ होतो. परिसाच्या स्पर्शाने लोहाचे सोने होते. ।।७५।। अग्नीत पडलेले काष्ठ अग्निरूप होते. गंगेला मिळालेला ओहळ जसा सहजपणेच गंगारूप होऊन जातो. ।।७६।। त्याप्रमाणे शिवनामाचा जप, तप, ध्यान, दर्शन, श्रवण, भजनपूजन करून बहुला निर्दोष झाली. तिला पावित्र्याचे तेज लाभले.।। ७७।। मननापेक्षा ध्यास हा जास्त श्रेष्ठ असतो, त्यापेक्षा घडणारा साक्षात्कार हा आणखी बरा. असा जर शिवरूपाचा साक्षात्कार झाला तर मग तो जीव हा प्रत्यक्ष शिवरूप होण्यास तो काय आणि कितीसा वेळ लागणार ? ।। ७८ ।। शिवोपासनेमुळे बहुलेचा पतितोद्धार झाला, ती पवित्र झाली आणि नित्य शिवकीर्तनात रमू लागली. ।। ७९ ।। श्रवणभक्ती ही खरोखरच अतिश्रेष्ठ आहे, तिच्यामुळे जीव पावन होतो. तो प्राप्त नर जन्मातच मुक्त होतो. श्रवण साधनेने त्याचे कल्याण होत असल्याने त्यास तीर्थाटनाचे नाहक कष्ट करावे लागत नाहीत. ।।८०।। ज्याला सत्संगाचा किंवा श्रवणाचा लाभ होत नाही त्याने स्वउद्धारार्थ तीर्थयात्रा कराव्यात. जो आदरयुक्त श्रवणभक्ती करतो त्यास अष्टांग योग करण्याचीही गरज नसते. ।।८१।।


योग याग व्रत साधन ।। नलगे कांहींच करावें जाण ॥ नवविधा भक्ति पूर्ण ।। श्रवर्णेचि हाता येतसे ॥८२ ।। चारी वर्ण चारी आश्रम ।। श्रवणेंचि पावन परम ।। असो बहुलेसी संतसमागम ।। सर्वांहूनि थोर वाटे ।।८३ ।। गुरूची सेवा अखंड करी ।। त्यावरी राहिली गोकर्णक्षेत्रीं ।। जटावल्कलाजिनधारी ।। तीर्थी करी नित्य स्नान ॥८४॥ सर्वांगीं भस्मलेपन ।। करी पुण्यरुद्राक्षधारण ।। सर्व आप्त सोडोनियां जाण ।। गुरुसेवा केली तिनें ॥ ८५ ॥ नित्य गोकर्णलिंगाचें दर्शन ।। गोकर्णक्षेत्र पुण्यपावन ।। तेथींचा महिमा विशेष पूर्ण ॥ तृतियाध्यायीं वर्णिला ।।८६ ॥ स्वयातिकीर्तिपुष्टिवर्धन ।। बहुलेनें तिन्ही देह जाळून ।। तेंचि भस्म अंगीं चर्चुन ।। झाली पावन शिवरूपी ॥ ८७ ॥ शंकरें विमान धाडिलें ते काळीं ॥ बहुला शिवपदाप्रति नेली ।। एवढी पापीण उद्धरिली ।। चतुर्दश लोक नवल करिती ।।८८ ।। सदाशिवापुढें जाऊन ।। बहुलेनें केलें बहुत स्तवन ।। मग अंबेची स्तुति करितां पावन ।। झाली प्रसन्न हिमनगकन्या ॥८९॥

त्यास यज्ञ याग, होमहवने, व्रताचरण किंवा ईश्वर कृपेसाठी अन्य कोणतीच साधने करावी लागत नाहीत. श्रवणभक्ती ही नवविधा भक्तीतील एक श्रेष्ठ भक्ती आहे. ।।८२।। श्रवणाच्या उपासनेने चारी वर्गाच्या आणि वारी आश्रमांतील लोकांचा उद्धार होतो. ते पावन होतात. असो. बहुलेस मात्र अन्य कोणत्याही गोष्टीपेक्षाही संत सहवास हाच जास्त प्रिय होता. ।।८३।। बहुला त्या पवित्र गोकर्णक्षेत्री राहून गुरूची सेवा अखंड करू लागली. नित्य पवित्र स्नान करून ती अंगावर वल्कले धारण करीत असे, भस्म लेपन करीत असे. ।।८४ ।। तिने आपल्या सर्व स्वकियांचा त्याग केला आणि ती अंगी भस्म धारण करून रुद्राक्ष अंगी लेवून एकनिष्ठेने गुरूसेवा करू लागली. ।।८५ ।। ती तिसऱ्या अध्यायात ज्या पवित्र गोकर्ण क्षेत्राची कथा सांगितली आहे; तिथे निवास करून नित्य गोकर्ण महाबळेश्वर लिंगाचे दर्शन घेऊ लागली. ।।८६ ।। तिने कीर्ती, पुष्टी आणि वृद्धी याची तमा न बाळगता सर्व वासनांची, देहाची होळी केली आणि वैराग्य विरक्तीचं भस्म तिने अंगी लावले, त्यामुळे ती शिवरूप झाली. ।।८७।। त्यामुळेच एवढी मोठी पापीण, तीसुद्धा शिवनामाच्या प्रभावाने पुनीत झाली. भगवान शिवांनी तिच्यासाठी विमान पाठविले, तिला उद्धरून आपल्या कैलासलोकी नेले. ।।८८।। त्या शिवलोकी जाताच ती भगवान शिवाचे पुढे उभी राहिली, ती त्यांचे भक्तिभावाने स्तवन करू लागली. शिवापाठोपाठ बहुलेने माता पार्वतीचेही स्तवन केले, तिची स्तुती गायली. तेव्हा देवी पार्वतीही बहुलेवर प्रसन्न झाली. ।।८९।।


म्हणे इच्छित वर माग त्वरित ।। येरी म्हणे पति पडला अधोगतींत ।। कोठें आहे न कळे निश्चित ।। पावन करोनि आणीं येथें ॥ ९० ॥ मग ते त्रिजगज्जननी ।। अंतरीं पाहे विचारूनी ।। तों विंध्याचळीं पिशाच होऊनी ।। रडत हिंडे पापिष्ठ ॥ ९१ ॥ मग बहुलेसी म्हणे भवानी ॥ जाई सवें तुंबर घेऊनी ।। पतीस आणी विंध्याद्रीहुनी ।॥ श्रवण करवीं शिवकथा ॥ ९२ ॥ मग गेली विंध्याचळा ।। तंव पिशाच नग्न देखिला ।। धरोनि वृक्षासी बांधिला ।। तुंबरें बळेंकरोनियां ॥ ९३ ॥ मग वल्लिका काढून ।। सप्तस्वर मेळवून ।। आरंभिलें शिवकीर्तन ॥ ऐकतां पशुपक्षी उद्धरती ॥९४॥ शिवकीर्तनरसराज ।। तुंबरें मात्रा देतां सतेज ।। सावध झाला विदुर द्विज ।॥ म्हणे मज सोडा आतां ॥ ९५ ॥ मग सोडितांचि धांवोन ।। धरिले तुंबराचें चरण ।॥ म्हणे स्वामी धन्य धन्य ।। केलें पवन पापियातें ॥ ९६ ॥ स्त्रियेसी म्हणे धन्य तूं साचार ।। केला माझा आजि उद्धार ।। मग तुंबरें शिवपंचाक्षर ।। त्यासी मंत्र उपदेशिला ।।९७ ।। त्याचा करितां जप ।। तंव विमान आलें सतेजरूप ।। विदुर झाला दिव्यरूप ।। स्त्रीसहित विमानीं बैसला ॥९८॥

तिने बहुलेस वर माग असे सांगितले. तेव्हा बहुला म्हणाली, “हे माते, माझे भाग्य थोर म्हणून मला तुमच्या चरणी ठाव मिळाला. पण माझा पती मात्र अजून कुठेतरी असेच दुराचरण करीत फिरतो आहे. माते, तू कृपावंत हो आणि त्यास पावन करून इथे घेऊन ये.”।।९० ।। तेव्हा देवी जगजननीने क्षणभर डोळे मिटले. तिच्या पतीचा शोध घेतला तेव्हा तिला तो विंध्याचल पर्वतावर पिशाच्च होऊन फिरत असताना दिसला. ।।९१।। तेव्हा देवी भवानी ही बहुलेला म्हणाली, “बहुले, तुझा पती हा विंध्याचल पर्वताच्या परिसरात पिशाच्च होऊन फिरतो आहे. तू असं कर, तू तुंबरास तुझ्याबरोबर घेऊन जा. त्याच्या मदतीने त्याला शिवमहिमा ऐकव आणि त्यास इथे घेऊन ये. “।।९२।। देवीच्या आज्ञेनुसार बहुला तुंबरास घेऊन त्या विंध्याचल पर्वतावर आली, तिने आपल्या पतीस पाहिले, त्यास तुंबराने धरून एका वृक्षास बांधले. ।॥९३॥ मग तुंबराने अत्यंत सु-स्वरात त्याच्यासमोर शिवमहिमा गाऊन त्यांनी त्यास श्रवणभक्तीच्या मार्गास लावले. ।।९४।। हळूहळू त्या श्रवणाने त्याच्या मनोवृत्ती पालटू लागल्या. तो सावध झाला आणि विदुर ब्राह्मण तुंबरास आता मला सोडा असे म्हणू लागला. ।।९५।। तेव्हा तुंबराने त्यास बंध मुक्त करताच त्याने तुंबराचे पाय धरले, आपला उद्धार करणाऱ्या त्या तुंबरास विदुर धन्यता देऊ लागला. तुम्ही माझ्यासारख्या पाप्याचा उद्धार केलात असे म्हणत त्याचे आभार मानू लागला. ।।९६।। नंतर विदुर विप्र हा आपल्या पत्नीचे आभार मानू लागला. तिने आपली सोडवण केली म्हणून तो तिची स्तुती करू लागला. तुंबराने दिलेल्या शिवपंचाक्षरी मंत्राने त्याचा उद्धार झाला. ।।९७|| त्या सिद्ध शिवमंत्राचा जप करीत असतानाच शिवलोकीचे विमान त्याला घेण्यासाठी आले. विदुर – दिव्यरूप झाला आणि स्त्रीसहित विमानी बसला. ।।९८।।


आणिलीं शिवापाशीं मिरवत ।। दोघंहीं शिवचरणीं लागत ॥ लवण जळीं विरत ।। तैसीं मिळत शिवरूपीं ॥९९॥ जळीं विराली जळगार ॥ नभीं नाद विरे सत्वर ।। तैसीं बहुला आणि विदुर ।। शिवस्वरूप जाहलीं ॥१००॥ ज्योती मिळाली कर्पूरीं ।। गंगा सामावली सागरीं ।। ब्रह्मस्वरूपीं निर्धारीं ।॥ विरालीं ऐक्य होऊनियां ॥ १०१ ॥ शिवमंत्र शिवकथाश्रवण ॥ शिवदीक्षा रुद्राक्षधारण ।। भस्मलेपनें उद्धरोन ।। गेलीं किती संख्या नाहीं ॥ १०२ ॥ भस्मांतूनि निघाला भस्मासुर ।। शिवद्रोही परम पामर ।। त्याचा कैसा केला उद्धार ।। तें चरित्र सांगा कैसें ॥ १०३ ॥ हे शिवपुराणीं कथा सुरस ।। श्रोतीं ऐकावी सावकाश ।। कैलासीं असतां महेश ।। प्रदोषकाळीं एकदां ॥१०४॥ भस्म स्वकरीं घेऊन ।। अंगीं चर्ची उमारमण ।। तंव एक खडा लागला तो शिवें जाण ॥ भूमीवरी ठेविला ।। १०५ ।। नवल शिवाचें चरित्र ।। तेथेंचि उत्पन्न झाला असुर ।। नाम ठेविलें भस्मासुर ।। उभा सदा कर जोडुनि ॥ १०६ ॥ म्हणे वृषभध्वजा सदाशिवा ।। मज कांहीं सांगिजे सेवा ।। शंभु म्हणे नित्य येधवां ।। चिताभस्म आणोनि देइंजे ॥१०७॥

तुंबर त्या विमानातून त्या दोघांना शिवलोकी घेऊन आला. तेव्हा दोघेही शरणागत भावाने शिवचरणी लीन झाले. पाण्यात पडलेले मीठ जसे पाण्याशी एकरूप होते तसे ते दोघे शिवरूपात एकरूप झाले.।।९९।। पाण्यात गार विरून जावी, आकाशात ध्वनी विरून जावा त्याप्रमाणे ते दोघे शिवरूप झाले. ।।१००।। कापूर हा जसा त्याच्या ज्योतीत मिसळून जातो, गंगा सागराशी एकरूप होते, त्याप्रमाणे ते दोघेही ब्रह्मस्वरूप झाले. ।।१०१।। सूत सांगतात की, अशा या पुण्यपावन शिवनामाने, शिवकथा श्रवणाने, शिवभक्तीने, भस्मधारण करण्याने आजवर कितीतरी जिवांचा उद्धार झाला त्याची गणतीच करता येत नाही. ।।१०२।। तेव्हा कोणा आर्त आणि जिज्ञासू अशा श्रोत्याने सूतांना असा प्रश्न केला की, “महाराज, ती भस्मासुराची कथा काय आहे? ती ऐकण्याची आमची इच्छा आहे. आपण कृपावंत होऊन ती कथा आम्हास सांगा. ।।१०३।। त्यावर सूत म्हणाले, श्रोतेहो, यासंदर्भात शिवपुराणात एक गोष्ट आली आहे ती मी तुम्हास सांगतो, ऐका. एकदा भगवान शिव हे सायंकाळच्या प्रदोष वेळी स्वतःच्या हातानी भस्म विलेपन करीत होते. ।।१०४।। भगवान स्वतःच्या हातांनी सर्वांगास भस्म विलेपन करीत असताना, अचानक त्यांच्या हाताला त्या भस्मात एक खडा लागला. भगवान शिवांनी तो खडा भूमीवर ठेवला. ।।१०५।। आणि काय आश्चर्य, त्या भस्माच्या खड्यातून एक राक्षस प्रगट झाला आणि त्यांचे समोर हात जोडून उभा राहिला. महादेवांनी भस्मातून व्यक्त झाला म्हणून त्याचे नाव भस्मासुर असे ठेवले. ।।१०६।। त्याने हात जोडून विनंती केली, “हे प्रभू, या आपल्या सेवकाला काहीतरी सेवा करण्याची संधी द्या. ।।१०७।।


नित्य नूतन आणीं भस्म ।। हीच सेवा करीं उत्तम ।। ऐसी आज्ञा होतां परम ।। भस्मासुर संतोषला ।।१०८ ।। कर्मभूमीस नित्य येवोन ॥ वसुंधरा शोधी संपूर्ण ॥ जो शिवभक्तपरायण ।। लिंगार्चन घडलें ज्यासी ॥१०९॥ शिवरात्री सोमवार प्रदोष ॥ सदा ऐके शिवकीर्तन सुरस ॥ त्याचेंच भस्म भवानीश ॥ अंगिकारी आदरें ॥११०॥ जे कां भक्त अभेद प्रेमळ । त्यांच्या मुंडांची करी माळ ॥ स्मशानीं वैराग्य वाढे प्रबळ ।। म्हणोनि दयाळ राहे तेथें ॥११॥ लोक स्मशानाहूनि घरा येती ।। वैराग्य जाय विषयीं जडे प्रीती ।। म्हणोनि उमावल्लभं वस्ती ॥ केली महास्मशानीं ॥ १२ ॥ पंचभूतें तत्त्वांसहित ।। पिंडब्रह्मांड जाळोनि समस्त ।। सर्व निरसूनि जें उरत ।। स्वात्मसुख भस्म तेंचि ॥ १३ ॥ तेंचि ब्रह्मानंदसुख सोज्वळ ।॥ तें भस्म चर्ची दयाळ ॥ तो अमूर्तमूर्त कृपाळ ।। षड्विकाररहित जो ॥१४॥ अस्ति जायते वर्धते विपरिणमते ।। अपक्षीयते निधन ष‌ड्विकार समस्त ।। शिव परब्रह्म शाश्वत ।। विकाररहित निर्विकार जो ॥१५॥ जो षड्गुणैश्वर्यसंपन्न ।। यश श्री कीर्ति विज्ञान ॥ औदार्य वैराग्य संपूर्ण ।। ऐसें कोठें असेना ।। १६ ।।

तेव्हा विरक्त, भगवान शिवांनी आपल्यासाठी रोज चिताभस्म आणून देण्याची कामगिरी त्या भस्मासुरावर सोपविली. त्या आज्ञेने त्या भस्मासुरास अत्यंत आनंद झाला. ।।१०८।। मग काय ! तो पृथ्वीवर संचार करू लागला आणि चिताभस्म शोधू लागला. जे भक्त शिवाची भक्ती करतात, शिवलिंगाची पूजाअर्चा करतात. ।।१०९।। जे शिवरात्र प्रदोष सोमवारचे व्रत करतात, जे आर्त भावाने रसभरित शिवकीर्तन श्रवण करतात, त्यांनी दिलेल्या भस्माचा महेश मोठ्या आनंदाने स्वीकार करतात. ।।११०।। आपले हरीहर भेद न मानणारे भक्त आपल्याला किती प्रिय आहे हे दर्शवीत महादेव त्यांची माला आपल्या गळ्यात धारण करतात आणि मुद्दाम स्मशानात वस्त करतात, कारण स्मशानातच माणसाच्या मनात खरे वैराग्य जागत असते. ।।१११।। स्मशानातून घरी परत आले की, ते वैराग्य निघून जाते आणि पुन्हा मनुष्य विषय वासनांच्या मध्ये गुंतून जातो. त्या उमामहेश्वराने म्हणून काशीसारख्या महास्मशानात निवास केला आहे. ।।११२।। पंचमहाभूतांचा देह आणि ब्रह्मांड जे जाळून जे खाली शिल्लक उरते तेच भस्म. ।।११३।। ते ब्रह्मानंद सुखरूपी भस्म जे शिवास अत्यंत आवडते. त्या भस्माच्या धारणेनेच तो भगवान व्यक्त अव्यक्त असूनही षडविकार रहित राहतो. ।।११४।। हे षडविकार म्हणजे जन्म, वृद्धी, अस्ति, परिपक्वता, क्षीणता आणि निधन हे होत. तो अविनाशी शिव हा यापेक्षा पूर्णपणे अलिप्त आणि निर्विकार आहे. ।।११५।। तो यश, कीतीं, संपत्ती, साक्षात्कार, औदार्य आणि वैराग्य या प्रकारच्या गुणांनी संपन्न आहे. ह्या गोष्टी अशा एकत्वाने त्याच्याशिवाय अन्य कोणात पाहायला मिळणार? ।।११६।।


आणिक ष‌ट्चिन्हीं मंडित ।। तीं ऐका सर्वज्ञ पंडित ।। कर्तृत्व नियंतृत्व भोक्तृत्व ।। विभुत्व साक्षित्व सर्वज्ञत्व पैं॥१७॥ या चिन्हीं मंडित शुद्ध ॥ शंकर परिपूर्ण ब्रह्मानंद ॥ मायाचक्रचाळक शुद्ध ।। त्रिविधभेदरहित जो ॥१८॥ भक्तरक्षणार्थ सगुण ॥ शंभु झाला चैतन्यघन ।। तेणें भस्मासुर निर्मून ।। धाडिला भस्म आणावया ॥१९॥ ऐसें नित्य आणितां चिताभस्म ।। असुर मातला मदें परम ।। गो-ब्राह्मण देखे मनुष्य उत्तम ॥ म्हणे संहारूनियां टाकूं हे ॥१२०॥ हे संहारूनियां सकळ ।। असुरराज्य करावें सबळ ।। जाऊनियां निर्जरमंडळ ॥ शक्र कमलोद्भव जिंकावें ॥२१॥ विष्णु आणि धूर्जटी ।। हेही संहारावें शेवटीं ।। त्रिभुवन जिंकल्यापाठीं ॥ मीच इंद्र होईन ॥ २२ ॥ ऐसी मनीं बाधोनि गांठीं ।। कैलासा गेला तो कपटी ॥ म्हणे ऐकतोसी धूर्जटी ॥ भस्म सृष्टीं न मिळे कोठें ॥२३॥ चार लक्ष मनुष्ययोनि पाहें ।॥ नित्य सव्वालक्ष घडामोड होये ।। शोधिली सर्व अवनी हे ।। परी भस्म शुद्ध न मिळेचि ॥ २४ ॥ ऐसी कपटभक्ति दावी परम ।। म्हणे माझा टळतो नित्यनेम ।। तुज अर्पावें चिताभस्म ।। तरी एक वर्म सुगम असे ॥ २५ ॥

तो शिव कर्तृत्व, नियंतृत्व, मोक्तृत्व, विमुत्व, साक्षित्व आणि सर्वज्ञत्व या गुणांनी परिपूर्ण असा आहे. ।।११७।। या सर्व लक्षणांनी सुशोभित असणारा हा महादेव पूर्ण ब्रह्मानंदाचे सुख देणारा आहे. तो त्रिगुणरहित आहे. ।।११८।। भगवान शिव हा आपल्या भक्तांच्या रक्षणार्थ सदैव सिद्ध असतो. त्याच्याच लीलेने तो भस्मासुर निर्माण झाला आणि देवांनी त्यास ती नित्य चिताभस्म आणून देण्याची सेवा करण्यास सांगितले. ।।११९।। नित्य चिताभस्म आणून देणाऱ्या त्या भस्मासुराच्या मनातील असुरी वृत्तीने उचल खाल्ली. तो गोब्राह्मण व देव देवता ह्यांचा संहार करून असुर राज्य निर्माण करण्याचे स्वप्न पाहू लागला. ।।१२०।। गोब्राह्मण, देवता ह्यांना ठार मारून भूलोकी असुरांचे साम्राज्य तयार करायचे, मग देवलोक, इंद्रलोक, स्वर्गलोक जिंकायचा असा तो विचार करू लागला. ।।१२१।। इतकेच नाहीतर प्रत्यक्ष विष्णू आणि शिव यांनी मारून आपण सारे त्रिभुवनच जिंकायचे असा त्याचा विचार होता. ।।१२२।। असा विचार करून हे महादेवा मला सहजासहजी तुझ्यासाठी हवे असणारे चिताभस्म मिळत नाही असे सांगण्यासाठी तो शिवाकडे गेला. ।।१२३।। तो म्हणू लागला, “हे देवा, मनुष्ययोनीची संख्या ही चार लक्ष इतकी आहे, त्यातून रोज सव्वा लक्ष जन्ममृत्यू घडतात. त्यामुळे मला पृथ्वीवर अनेकदा शोधून चिताभस्म मिळत नाही.” ।।१२४।। “देवा, त्यामुळे माझा तुला नित्य चिताभस्म देण्याच्या सेवेत खंड पडतो रे, तेव्हा हे देवा, यावर एक उपाय करायला हवा, असे मनात कपटी भाव ठेवून तो प्रायूं लागला. ।।१२५।।


म्हणे हरा पंचवदना ।। विरुपाक्षा त्रिपुरच्छेदना ॥ उमावल्लभा नागभूषणा ।। वरप्रदान वे मातें ।। २६ ।। मज देई एक वर ।। ज्याच्या माथां ठेवीन कर ।। तो भस्म व्हावा निर्धार ।। कार्य फार साधे येणें ।॥२७ ।। म्हणोनि लोटांगण घालीत ॥ इतुकें माझें चालवी व्रत ॥ निष्कपट शिव भोळानाथ ॥ वर द्यावया सिद्ध झाला ॥२८॥ मग बोले हिमनगराजकुमारी ॥ हा नष्ट परम दुराचारी ॥ यासी वर देतां धरित्री ।। भस्म करील निर्धारं ॥२९॥ महाशब्द करावयाची हौस ॥ तो पातला फाल्गुन मास ।। आधींच वाटपाड्या चोरास ॥ निरोप दिधला भूभुजें ॥१३० ॥ आधींच जारकर्मी रत ।। त्यासी प्रभुत्व दिधलें स्त्रीराज्यांत ।। कीं मद्यपियासी दावीत ।। सिंदीवन साक्षेपें ॥३१॥ मर्कटासी मद्यपान ॥ त्यांत झालें वृश्चिकदंशन ।। त्याहीवरी भूत संचरले दारुण ।। मग अन्योन्य वर्ते जेवीं ॥ ३२ ॥ यालागी हा तामसी असुर ॥ यासी न द्यावा कदापि वर ।। षडास्य गजास्य वीरभद्र ।। नंदिकेश्वर हेंचि सांगे ॥३३॥ परम भोळा शंकर ॥ म्हणे आमचें लेंकरूं भस्मासुर ॥ यास द्यावा अगत्य वर ॥ तो अन्यन्त्र राहाटी न करीच ॥३४॥

तेव्हा हे भगवंता, तू असेच कर, ना तू मलाच एक वरदान दे ना. म्हणजे माझा नेमही मोडणार नाही आणि तुलाही प्रिय असलेले भस्म मिळेल.”।।१२६।। देवा, तू मला असा वर दे की, मी ज्याच्या डोक्यावर हात ठेवीन तो प्राणी जळून भस्म व्हावा. म्हणजे माझे कार्य सोपे होईल. ।।१२७।। अशी विनंती करीत त्याने शिवचरणी लोटांगण घातले, तेव्हा भोळा शंकर हा त्या आपल्या सेवेकऱ्यास तो हवा असणारा वर देण्यास तयार झाला. ।।१२८।। तेव्हा हलक्या आवाजात भवानी शिवास म्हणाली, “प्रभू, हा भस्मासुर असुरी वृत्तीचा आहे, तो दुष्ट दुराचारी आहे, तो तुमच्या कडून वर घेईल आणि नंतर सकल पृथ्वीच भस्मसात करून टाकील.” ।।१२९।। आधीच एखाद्यास बोंबा मारण्याची फार हौस असावी आणि त्यात फाल्गुन मास यावा. आधीच वाटमारी करणाऱ्यास राजाने नेमके धन द्यावे. ।।१३०|| आधीच जो व्यभिचारी वृत्तीचा आहे, त्यासच स्त्री राज्याचा प्रमुख करावा किंवा दारुड्यालाच दुकानाचा मालक करावे असे घडू नये ।।१३१।। माकडास दारू पाजली, त्यातच त्याला विंचू चावला तर काय होणार, त्यातच त्याला भुताने झपाटले अशी एकात एक भर पडत गेली तर जो विनाश होतो तेच या भस्मासुराचे बाबतीत होईल. ।।१३२।। हे सदाशिवा, भस्मासुर असुर आहे, तामसी वृत्तीचा आहे, दुष्ट दुराचारी आहे, त्यास आपण असा वर देऊ नका. असे गणेश, कार्तिकेय आणि नंदी ह्यांनीही शिवास सांगितले. ।।१३३।। पण भगवान शिव हणाले, अरे भस्मासुर हा माझे लेकरू आहे. त्याने मागितल्यावर त्यास हवे ते न देणे हे योग्य नाही, ते द्यायलाच हवे, तो त्याचा गैरवापर करणार बाही. ।।१३४।।


म्हणे बाळका तुज दिधला वर ॥ ऐसें ऐकतांचि असुर ।। उडे नाचे आनंद थोर ।। त्रिभुवनामाजी न समाये ॥ ३५ ॥ मृत्युलोकासी आला सत्वर ।। मग करीत चालिला संहार ।। संत भक्त गो विप्र ।। शोधून भस्म करीतसे ॥३६ ।। मस्तकीं हस्त ठेवितां तत्काळ ।। भस्म होय नलगे वेळ ।। ऋषिचक्र शोधूनि सकळ ।। भस्म करी एकदांचि ॥ ३७ ॥ छप्पन्न देश शोधीत ।। चमूसहित भूभुज समस्त ।। भस्म करी क्षणांत ।। थोर अनर्थ ओढवला ॥ ३८ ॥ कुटुंबासहित ब्राह्मण ।। गिरिविवरीं बैसती लपोन ।। पृथ्वीस उद्वस संपूर्ण ।। बाहेर कोण न फिरेचि ॥ ३९ ॥ जैसा श्येनपक्षी अकस्मात ॥ पक्षी धरोनि संहारीत ।। तैसा अंतरिक्षं येवोनि त्वरित ।। मस्तकीं हस्तस्पर्श करी ॥१४० ।। महायोद्धा रणपंडित ।। समरीं जिंकी कृतांत ।। परी भस्मासुरापुढें बलहत ।। कांहींच न चले युक्ती त्यां ॥ ४१ ॥ जैसा पाखांडी खळ तत्त्वतां ।। तो नावरे बहुतां पंडितां ।। तैसी त्या असुरापुढें पाहतां ।। न चले युक्ती कवणाची ॥४२ ॥

असे म्हणून अखेर भक्तप्रेमापोटी त्यास हवा तो वर देत शिव त्यास म्हणाले, बाळ भस्मासुरा, मी तुला हवा असणारा वर दिला आहेऽऽ तथास्तु, देवाचे ते शब्द ऐकले मात्र आणि भस्मासुरास मोठा असुरी आनंद झाला. तो अत्यानंदाने नाचू लागला. त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला. ।।१३५।। तो वर मिळाला आणि मग काय! वरप्राप्ती झाल्याबरोबर तो भस्मासुर प्रथम भूलोकी आला. त्याने तेथे आपल्या मनाप्रमाणे अनेक प्राणी-मात्रांना त्यांच्या मस्तकी हात ठेवून मारायला सुरुवात केली. त्याने गोब्राह्मण, संतसज्जन, ऋषीमुनी ह्यांच्या नाशाचा एकच सपाटा लावला. ।।१३६।। त्याने ज्याच्या मस्तकावर हात ठेवला तो भस्म होत असल्याने त्याने मोठ्या प्रमाणात प्रथम ऋषी समूह हा नाश केला. त्यामुळे मोठा अनर्थ उद्भवला. ।।१३७।। छपन्न देशांचा शोध घेते फिरणाऱ्या त्या भस्मासुराने सर्व सैन्यासह अनेक राजे जाळून भस्मसात केले, त्यामुळे मोठा अनर्थ उद्भवला. ।।१३८।। ब्राह्मणांची कुटुंबे ही गिरी कंदरात, पर्वत गुफात लपून बसली. पाहता पाहता धरा ओस दिसू लागली. सारेजण लपून दडून बसले, कोणीच बाहेर पडेनात. ।।१३९।। त्यातूनही चुकून जरी एखादा जीव बाहेर पडलाच तर बहिरी ससाण्याने जशी शिकार साधावी तसा तो आकाशातून येत असे आणि त्या जीवाच्या माध्यावर हात ठेवून त्यास भस्मसात करीत असे. ।।१४०।। एखाद्या योद्धयाने युक्षात साआत यमासच जिंकावे तसाच हा प्रकार घडू लागला. सारेजण त्या भस्मासुरासमोर हतबल झाले. कोणासच काय करावे हेच सुचेना. ।।१४१।। ज्याप्रमाणे एखादा पाखंडी मनुष्य हा मी मी म्हणणाऱ्या विद्वानांनाही आवरता येत नाही, तसे त्या भस्मासुरापुढे कोणाचेच काही चालत नव्हते. ।।१४२।।


असुर करितो नित्य संहार ॥ शिवासी न कळे समाचार ॥ भस्म नेऊनि दे सत्वर ।। महानम्र होय तेथें ।॥४३ ।। सवेंचि ये मृत्युलोका ।। मनीं धरिला ऐसा आवांका ।। त्रिदशांसहित शचीनायका ।। भस्म करावें यावरी ॥४४॥ मग कमलोद्भव कमलावर ।। शेवटीं भस्म करावा गंगाधर ।। उमा त्रिभुवनांत सुंदर ।। हिरोनि घ्यावी वृद्धाची ॥ ४५ ॥ पृथ्वी पडली उद्वस ।। मिळाल्या प्रजा ऋषी आसमास ।। सर्वांचें भय पावलें मानस ।। पुरुहुतास शरण आलें ॥४६ ॥ मग मघवा सकळांसहित ।। पद्मजाप्रति गाऱ्हाणें सांगत ।। तो म्हणे क्षीराब्धिजामात ।। ।।। त्यास सांगू चला आतां ॥ ४७ ॥ अक्षज नाम इंद्रियज्ञान ।। तें ज्यानें केलें आधीं दमन ॥ म्हणोनि अधोक्षज नाम त्यालागून ।। अतींद्रियद्रष्टा तो ॥४८॥ ऐसा जो अधोक्षज ।। जवळी केला वैकुंठराज ।। गाऱ्हाणें सांगती प्रजा द्विज ।। भस्मासुराचें समस्त ।।४९ ।। मग समस्तांसहित नारायण ।। शिवाजवळी सांगे वर्तमान ।। भस्मासुरें जाळून ।। भस्म केले सर्वही ॥ १५० ॥ उरलों आम्ही समस्त ।। इतुक्यांचाही करील अंत ।। सदाशिवा तुझाही प्रांत ।। बरा न दिसें आम्हांतें ।॥५१ ।।

बरं, दुसरी गोष्ट अशी की, ही भस्मासुराची अशी वरदानाचा गैरवापर करीत असल्याची वार्ता भगवान शिवांकडे पोहचत नव्हती. कारण भस्मासुर हा त्याला केलेल्या आज्ञेनुसार रोज भस्म पुरवीत असे आणि अत्यंत आज्ञाधारकासारखा समोर उभा राही. ।।१४३।। मृत्युलोकी हाहा:कार माजवल्यावर त्या भस्मासुराने आपली पावले स्वर्गलोकाकडे वळवली. आता तर त्याने शचीनायक इंद्र यांनाच भस्म करायचा विचार चालू केला. ।।१४४।। त्यानंतर कमलाकर (विष्णू) आणि गंगाधर (शिव) ह्यांना भस्मसात करून ती त्रिभुवन सुंदरी उमाच आपण हिरावून घ्यायची तो स्वप्ने पाहू लागला. ।।१४५।। भस्मासुराच्या या कृत्याने पृथ्वी ओस पडली. सर्वसामान्य जनता, ऋषी, मुनी हे सारे भयभीत झाले. ते इंद्रास शरण गेले. ।।१४६।। तेव्हा इंद्र त्या सर्वांना सोबत घेऊन ब्रह्मदेवाकडे गेला. त्यांनी त्यास तो वृत्तांत निवेदन केला. तेव्हा ब्रह्मा त्यांना म्हणाला की, मला वाटते ह्यावर उपाय काढण्यासाठी आपण वैकुंठी त्या रमानाथाकडे जाऊ या.।।१४७।। तो महाविष्णू हा अतिंद्रीयद्रष्टा आहे, तो इंद्रियांचे दमन करणारा आहे. ।।१४८।। ब्रह्मदेवाच्या सूचनेनुसार ते सारेजण हे खरोखरच वैकुंठ नगरीस गेले आणि त्यांनी आपले गाऱ्हाणे त्यांना निवेदन केले. ।।१४९।। तेव्हा भगवान विष्णू हे प्रथम त्या सर्वांना घेऊन कैलास लोकी गेले. त्यांनी महादेवांची भेट घेतली आणि त्यांना तो भस्मासुराचा प्रताप सांगितला. ।।१५०।। पुढे तर त्या देवता आदिनाथांना असेही म्हणाल्या की, निदान अजून तरी त्या भस्मासुराच्या तडाख्यातून आम्ही वाचलो आहोत. देवा, आम्हास तर तुझाही सारा परिसर आणि भक्तगण हे सुरक्षित आहेत असे वाटत नाही. ।।१५१।।


हैमवती करी जतन ।। ऐकोनि हांसला भाललोचन ॥ म्हणे भस्मासुरास मरण॥ जवळी आलें यावरी ॥ ५२ ॥ तुम्ही जावें स्वस्थाना सत्वर ।। ऐसें बोले जो कर्पूरगौर ।। तों अकस्मात आला असुर ।। भस्म घेऊन तेधवां ॥५३॥ आपुलें गाऱ्हाणें आणिलें येथ ।। मिळालें ते देखिलें समस्त ।। असुर मान तुकावीत ।। सरड्याऐसी तयांवरी ॥५४॥ म्हणे जे जे आले येथ ॥ उद्यां भस्म करीन समस्त ।। मग क्रोधें बोले उमानाथ ।। भस्मासुरासी तेधवां ॥५५॥ अरे तूं अधम असुर ॥ केला पृथ्वीचा संहार ॥ तुज आम्हीं दिधला वर ।। परिणाम त्याचा बरा केला ॥५६॥ असुर क्रोधें बोले ते समयीं ।। तुझी सुंदर दारा मज देईं ।। नातरी तव मस्तकीं लवलाहीं ।। हस्त आतांचि ठेवितों ॥५७॥ भवानी उठोनि गेली सदनांत ।। असुर ग्रीवा तुकावीत ॥ शिवाच्या माथां ठेवोनि हस्त ॥ तुज नेईन क्षणार्थे ॥५८॥ शिवमस्तकीं ठेवावया कर॥ वेगें धांविन्नला भस्मासुर । प्रजा आणि ऋषीश्वर ।॥ पळू लागले दशदिशा ॥५९॥ जो भक्तजनभवभंग ।। मायालाघवी उमारंग ॥ पळता झाला सवेग ।। घोरांदर वन घेतलें ॥ १६० ॥

पुढे तर त्यांनी शिवास असेही सांगितले की बाबारे, आता तू स्वतःला आणि तुझ्या प्रिय पत्नीसही सांभाळ. देवांचे हे बोलणे ऐकून महादेवास हसू आले आणि ते म्हणाले, आता मात्र त्या भस्मासुराचा मृत्यू जवळ आलाय. ।।१५२।। तुम्ही आता आपापल्या स्थानी परत जा, असे सांगत असताना अचानक तो भस्मसुर हा तिथे आला. ।।१५३।। त्याने त्याच्या विरुद्ध शिवशंकराकडे तक्रार घेऊन आलेल्या सर्वांना पाहिले आणि तो सर्वाना उद्देशून म्हणाला. ।।१५४।। जे जे कोणी आज इथे माझ्याविरुद्ध तक्रार घेऊन आलेले आहेत त्यांना मी उद्या भस्म करीन. ।।१५५।। भस्मासुराचे ते बोलणे ऐकून शिवांना राग आला. ते म्हणाले, भस्मासुरा, तू हा असा वराचा गैरवापर करतो आहेस हे चांगले नाही. अरे आम्ही तुला वर दिला तर आता तू तो वर आमच्या विरोधातच वापरतो आहेस? ।।१५६।। त्यावर तो असुरही रागाने म्हणाला, “महादेवा, तू तुझी पत्नी मला दे, नाहीतर मी तुझ्याही मस्तकावर माझा हात ठेवतो आणि तुलाच जाळून भस्मसात करतो.” ।।१५७।। तेव्हा त्याचे ते बोलणे ऐकून भवानी त्वरित उठली व घरात जाऊ लागली. ते पाहून भस्मासुर तिला म्हणाला, आता त्या शिवासच भस्मसात करून तुला कसा घेऊन जातो ते बघच आता. ।।१५८।। आणि खरोखरच भस्मासुर हा जेव्हा शिवाच्या दिशेने निघाला तेव्हा तिथे जमलेले ऋषीमुनी आणि इतरजण हे पळू लागले. ।।१५९।। इतकेच नाही तर भस्मासुर हा शिवाच्या मागे लागल्याने शिवसुद्धा धावत सुटला आणि तो एका घोर अशा अरण्यात गेला. ।।१६०।।


पाठीं लागला भस्मासुर ॥ म्हणे जोगड्या उभा धरीं धीर ।। आजि तुझा करीन संहार ।। रक्षा लावीन अंगासी ॥६१ ।। वेदशास्त्रा न कळे पार ।। मायाचक्रचाळक अगोचर ।। त्यासी पामर भस्मासुर ।। थरीन म्हणे निजबळें ॥६२॥ जो ब्रह्मादिक देवांचें ध्यान ॥ सनकादिकांचें देवतार्चन ।। त्यासी भस्मासुर आपण ।। धरीन म्हणे पुरुषार्थं ॥ ६३ ॥ त्यास वाटे धरीन मी आतां ।। दिसे जवळी परी नाटोपे सर्वथा ।। ऐसा कोटि वर्षे धांवतां ॥ न लगे हाता सर्वेश्वर ॥ ६४ ॥ उणे पुरे शब्द बोलत ।। शब्दां नातुडे गिरिजाकांत ।। तर्क कुतर्क करितां बहुत ।। हांक फोडितां नातुडे ॥ ६५ ॥ वेदशास्त्रांचा तर्क चांचरे ।। घोकितां शास्त्रज्ञ झाले म्हातारे ।। सकळ विद्या घेतां एकसरें ॥ मदनांतक नाटोपे ॥ ६६ ॥ जे प्रेमळ शुद्ध भाविक ॥ त्यांचा विकला कैलासनायक ॥ उमेसहित त्यांचें घरीं देख ।। वास करी सर्वदा ।। ६७ ।। तप बळ विद्या धन ।। या बळें धरूं म्हणती ते मूर्ख पूर्ण ॥ कल्पकोटि जन्ममरण ।। फिरतां गणित न होय ॥ ६८ ॥

भस्मासुर हा शिवाच्या मागे लागला. त्यास म्हणू लागला, अरे जोगड्या, थांब! आता मीच तुला जाळून भस्म करतो आणि तुझी राख मी माझ्या अंगास लावतो. ।।१६१।। असे म्हणत ज्याच्या पार हा वेदशास्त्रांना लागत नाही, जो स्वतःच या मायाचक्राचा चालक आहे, त्या अगम्य अगोचर अशा शिवशक्तीला मी धरीन, पकडेन असे म्हणू लागला. ।।१६२।। ज्याचे ध्यान अप्रत्यक्ष ब्रह्मादिक देवता करतात त्या शिवास उन्मत्त भस्मासुर हा मोठ्या फुशारकीने मी तुला धरीन असे म्हणत त्यांच्या मागे धावत होता. ।।१६३।। आता मी या शिवास धरीन, तो माझ्या कवेत आहे असे वाटत होते; पण शिव पुढे आणि तो मागे असे धावत असताना अनेक वर्षे लोटली तरी त्यास काही शिवास धरता किंवा पकडता आले नाही. ।।१६४।। तो अनेक अयोग्य वाईट शब्दांनी शिवाचा उपहास करीत होता, त्यास नावे ठेवीत होता, नसते कुतर्क करीत होता आणि थांब थांब असे म्हणत त्याच्या मागे फिरत होता. ।।१६५।। ज्याच्या आकलनासाठी वेदशास्त्रांनी मोठा आटापिटा केला, ज्याला शोधताना नाना शास्त्रेही म्हातारी झाली, ज्याचे आकलन करण्यास अनेक विद्या अपुऱ्या पडल्या तो शिव मात्र काही केल्या भस्मासुरास आटोपत नव्हता, सापडत नव्हता.।।१६६।। जे शुद्ध निर्मळ भक्तिभावाचे असतात, जे त्यास शरणागत भावान आकळू पाहतात, त्यांनाच तो भोळा सांब सदाशिव भेटतो, आकळतो, सापडतो. तो अशा प्रेमळ भक्तांचे घरी स्वतः निवास करतो. ।।१६७।। तप करून, विद्या, धन आणि शक्ती सामर्थ्याच्या बळावर जर कोणी मी त्यास धरीन असे म्हणतात ते मूर्ख होत. कारण जन्मजन्मांतरीचे कित्येक फेरे काटले तरी तो शिव उमगत नाही, त्याचे खरे स्वरूप आकळत नाही. ।।१६८।।


असो अहंकारें भस्मासुर ।। धांवतां नाटोपे शंकर ।। इकडे भवानी इंदिरावर ॥ बंधु आपुला स्तवी तेव्हां ॥६९॥ म्हणे कमलोद्भवजनका कमलनयना ।। कमलनाभा असुरमर्दना ।। कमलधारका शेषशयना ।। कमलाभरणा कमलाप्रिया ॥ १७० ॥ जगद्वंद्या जगद्व्यापका ।। जनजराजन्ममोचका ।। जनार्दना जगरक्षका ।। जगदुद्धारा जलाब्धि-शयना ॥ ७१ ॥ ऐसें ऐकतां माधव ।। मोहिनीरूप धरोनि अभिनव ।। शिवमनरंजन केशव ।। आवड आला असुरातें ॥ ७२ ॥ शिव न्यग्रोध होऊनि देख ।। दुरूनि पाहता झाला कौतुक ॥ मोहिनी देखतां असुर निःशंक ॥ भुलोनि गेला तेधवां ॥७३॥ विमानीं पाहती समस्त देव ।। म्हणती हें कैंचें रूप अभिनव ।। अष्टनायिकांचें वैभव ।। चरणांगुष्ठीं न तुळेचि ।।७४ ।। नृत्य करीत मोहिनी ।। असुर तन्मय झाला देखोनी ॥ म्हणे ललने तुजवरूनी ।। कमला अपर्णा ओंवाळिजे ॥७५ ॥ तुझें देखतां वदन ।॥ वाटे ओंवाळूनि सांडावा प्राण ।। तुवां नयनकटाक्ष-बाणेंकरून ।। मनमृग माझा विंधिला ।।७६ ।।

अतो, तिकडे भस्मासुर हा शिवाचा पाठलाग करत होता, तर इकडे पार्वतीने आपला भाऊ लक्ष्मीधर अर्थात भगवान महाविष्णू ह्याचे ध्यान करून ती त्याचे स्तवन करू लागली.।।१६९।। ती म्हणू लागली, “हे ब्रह्मदेवाच्या जन्मा, हे नारायणा, हे कमलनयना, हे कमलप्रिया, हे शेषशयना, हे असुरमर्दका, मी तुझे ध्यान करते आहे. ।।१७०।। तू जगन्नायक आहेस, तू विश्ववंद्य आहेस, तू जरामरण ह्यातून सोडविणारा आहेस, तू विश्वपालक आणि रक्षकही आहेस, माझी हाक ऐकून धाव घे, माझे रक्षण कर. माझे सौभाग्य सांभाळ.” ।।१७१।। पार्वतीची आर्त हाक कानी येताच भगवान विष्णूंनी मोहक असे मोहिनीचे रूप घेतले. शिवामान धावणाऱ्या त्या भस्मासुराच्या वाटेत येऊन ती लावण्यवती, रूपयौवना, अत्यंत मोहक, मादक अशी मोहिनी येऊन उभी राहिली. ।।१७२।। तिकडे विष्णूस मोहिनीचे रूप घेऊन आलेले पाहताच शिवाने एका वटवृक्षाचे रूप घेतले आणि तो आता त्या नारायणाची लीला पाहू लागाला इकडे त्या सर्वांगसुंदर अशा सुंदरीस पाहून भस्मासुर भुलून गेला. ।।१७३।। विमानातून आता या शिवनारायणाच्या अद्भुत लीलेत काय घडते हे पाहण्यासाठी देवदेवता आकाशी गोळा झाल्या आणि म्हणू लागल्या की, अहो, हे कसले विलक्षण सुंदर रूप. या मोहिनीच्या रूपास तर अष्टनायकांच्या सुंदरतेची तर हिच्या अंगठ्याशीही तुलना होऊ शकणार नाही, असे दिव्य आणि नावाप्रमाणेच मोहिनी घालणारे आहे. ।।१७४ ।। जेव्हा ती मोहिनी नृत्या करीत करीत त्या भस्मासुराच्या जवळ आली तेव्हा तिचे ते नृत्य पाहून तो भान विसरला. तो तिच्या सौंदर्याची वाहवा करीत महणाल्या, हे ललने, तू तर इतकी सुंदर आहे की, तुझ्यावरून त्या पार्वती, लक्ष्मी ओवाळून टाकाव्यात. ।।१७५।। तुला पाहताच जीव ओवाळून बाटो तुल्याएका नेत्रकटाक्षाने माख्या मनाचा मृग हा क्षणोक्षणी घायाळ होतो आहे. ।।१७६।।


तुझें पदकमळ जेथें उमटलें ।। तेथें सुवास घ्यावया वसंत लोळे ।। तुवां पसरोनि शृंगारजाळें ।। आकळिलें चित्तमीना ।। ७७ ।। मज माळ घालीं सत्वर ।। तुझें दास्य करीन निरंतर ।। मायावेषधारी मुरहर ।। हास्यवदनें बोलतसे ॥७८ ।। म्हणे मी तुज वरीन त्वरित ।। पैल तो न्यग्रोधतरु दिसत ।। माझें त्यांत आहे आराध्य ॐ दैवत ।। नवस तेथे केला म्यां ॥ ७९ ॥ लग्नाआधीं पतिसहित ।। तेथें करावें गायन नृत्य ।। परी मी जेथें * ठेवीन हस्त ।। तुवां तेथेंचि ठेवावा ॥१८०॥ मी जे दावीन हावभाव। तूं ही तैसेंचि दावीं सर्व। तेथें अणुमात्र उणें पडतां देव ॥ क्षोभेल मग तुजवरी ॥८१॥ महाखडतर माझें दैवत ।। सकळ ब्रह्मांड जाळील क्षणांत ।। असुर तियेसी अवश्य म्हणत ॥ सांगसी तैसा वर्तेन मी ॥८२॥ ऐसा भुलवूनि तयासी ।। आणिला तो वटच्छायेसी ।। मग नमूनि दैवतासी ।। आरंभी नृत्य मोहिनी ॥ ८३ ॥ मोहिनी नृत्य करीत ।। अष्टनायिका तटस्थ पाहत ।। किन्नर गंधर्व तेथ ।। गायन ऐकतां भुलले ॥८४॥

हे सुंदरी, तुझी पावले जिथे उमटतात तिथला सुगंध गोळा करण्यासाठी वसंत ऋतू लोळण घेतो. हे मनमोहिनी, तुझ्या रूपाच्या जाळ्यात माझा मनरूपी मासा पूर्णपणे अडकला आहे. ।।१७७|| हे सुंदरी, तू माझ्या गळ्यात वरमाला घाल. मी तुझे दास्यत्व लगेच स्वीकारीन. भस्मासुराचे ते बोलणे ऐकले आणि त्या मोहिनी रूप धारण केलेल्या विष्णू भगवंतास क्षणभर हसू आले. ।।१७८ ।। तेव्हा ती मोहिनी भस्मासुरास म्हणाली की, मसासुराज, मी तुझा स्वीकार करीन, पण पलिकडे त्या वटवृक्षावर माझी आराध्य देवता आहे, त्या देवतेस मी नवस केला आहे की, ।।१७९।। मी त्या देवतेस असा नवस केला आहे की, मी लग्नाआधी माझ्या पतीसह तुझ्यासमोर नृत्य करून तुला प्रसन्न करून घेईन. मगच विवाह करीन. तेव्हा तू माझ्याबरोबर तिथे चल. माझ्यासोबत नृत्य कर. मी करेन तसे हावभाव, हातवारे कर. मी जिथे जिथे हात ठेवीन तिथे तूही हात ठेव. ।।१८०।। मात्र लक्षात ठेव, यात जर थोडीशी जरी चूक झाली तरी माझं आराध्य दैवत हे कोपेल आणि मग त्या देवतेकडून आपल्या विवाहास मान्यता मिळणार नाही.” ।।१८१।। माझी दैवत हे अतिशय उग्र आहे, त्यास जराही चूक चालत नाही. तो क्रोधित झाला तर सर्व ब्रह्मांद जाळून टाकेल. तेव्हा मी जसे करीन तसेच तू कर. ।।१८२।। असे सांगत बोलत मोहिनीने त्या असुरास भुलवून आपल्याबरोबर त्या वटवृक्षस्थानी आणले. तिथे वास करीत असलेल्या आपल्या आराध्य देवतेस वंदन केले आणि मोहिनी त्यासमोर नृत्य करू लागली. ।।१८३।। त्यावेळी ते मोहिनीचे नृत्य पाहण्यासाठी स्वर्गलोकीच्या अष्टनायका गोळा झाल्या. तिचे गायना इकून तर गंधर्वही भुलून गेले. ।।१८४।।


देव सर्व षट्पद होऊनी ।। सुवासा तिच्या वेधूनि ॥ गुप्तरूपें गुंजारव करिती वनीं ।। परी ते कामिनी कोणा नेणवे ॥८५ ॥ तिचें सुस्वर ऐकतां गायन ।। विधिकुरंग गेला भुलोन ।। कुंभिनी सोडूनि करावया श्रवण ।। कद्रुतनय येऊं पाहे ॥ ८६ ॥ मोहिनी जेथें ठेवी हस्त ।। असुरही तैसेंच करीत ।। आपुलें मस्तकीं ठेवीत ।। आत्मकर मोहिनी ॥८७॥ मग असुरेंही आपुलें शिरीं हात ॥ ठेविता भस्म झाला तेथ ॥ मोहिनीरूप त्यागूनि भगवंत ॥ चतुर्भुज जाहला ।॥ ८८ ॥ वटरूप सोडोनि देख ॥ प्रगट झाला तेथें मदनांक ।। हरिहर भेटले झाले एक ॥ देव वर्षती सुमनमाळा ॥८९॥ मोहिनीरूप जेव्हां धरिलें ॥ पाहोनि शिवाचें वीर्य द्रवलें ।। भूमीवरी पडतां अष्टभाग झाले ।। अष्टभैरव अवतार तें ॥१९० ।। असित अंगार चंड क्रोध ॥ उन्मत्त कपाल भीषण प्रसिद्ध ।। संहारभैरव आठवा सुप्रसिद्ध ॥ अंशावतार शिवाचे ॥९१ ।। भस्मासुर वधिला हे मात ।। प्रगटतां त्रैलोक्य आनंदभरित ।। हस्त धरोनि रमाउमानाथ ।। येते झाले कैलासा ॥९२॥ अंबिका तात्काळ प्रगटोन ॥ करी हरिहरांतें वंदन ।। दोन्ही मूर्ति बैसवून ।। करी पूजन हैमवती ॥९३॥

सर्व देव हे भृंगररूप घेऊन मोहिनीच्या अंगीच्या सुवासाचा आनंद घेऊ लागले. मात्र इकडे मोहिनी ही नृत्यात इतकी गर्क होती की, तिला अवतीभवतीचे भानच नव्हते. ।।१८५।। तिचे गायन ऐकून ब्रह्मदेवरूपी हरीण भुलून गेले. शेषासही पृथ्वी खाली ठेवून ते गायन ऐकायला वर येण्याचा मोह होऊ लागला. ।।१८६।। तर इकडे त्या मोहिनीवर खरोखरच भुललेला भस्मासुर तिच्यासोबत ती करेल तसे हावभाव करीत नृत्य करू लागला. तो तिच्याप्रमाणेच ती ठेवील तिथे तिथे आपला हात ठेवत असतानाच ।।१८७।। अचानकपणे मोहिनीने आपला हात स्वतःच्या मस्तकावर ठेवला, तसेच त्या भस्मासुराने करताच त्यास लाभलेल्या वरदानाच्या प्रभावाने तो स्वतःच जळून भस्मसात झाला. त्याबरोबर विष्णूंनी आपले मूळ चतुर्भुज रूप धारण केले. ।।१८८।। तेव्हा त्या वटवृक्षातून हर अर्थात शिव हेसुद्धा प्रगट झाले. त्या हरीहराच्या दिव्य भेटीवर स्वर्गस्थ देवतांनी पुष्पवृष्टी केली. ।।१८९।।त्या मोहिनीच्या रूपास पाहून शिवाचे वीर्यपतन झाले. त्याचे आठ भाग होऊन त्यातून शिवाच्या अष्टभैरवांचा आविष्कार झाला. ।।१९०।। ते अष्टभैरव हे असितांगार, चंड, क्रोध, उन्मत्त, कपाल, भीषण आणि संहार ह्या नावांचे शिवाचे अंशावतार होत.।।१९१।। भस्मासुराच्या वधाची वार्ता त्रैलोक्यात पसरताच सर्वांना आनंद झाला. नंतर हरी आणि हर हे दोघेही मोठ्या समाधानाने, आनंदाने कैलासास आले. ।।१९२।। तेव्हा तिथे अंबिकेने पुढे येऊन त्या दोघांचे स्वागत केले. त्यांना आसनस्थ करून त्यांचे भक्तिभावाने उचित प्रकारे पूजन केले. ।।१९३।।


हरिहर नारायण नागभूषण ॥ शिव सीतावल्लभ नाम सगुण ।। पंचवदन पन्नगशयन ।। कर्पूरगौर कमलोद्भवपिता ॥९४॥ पिनाकपाणि पीतांबरधर ।। नीलकंठ नीरदवर्णशरीर ।। वृंदारकपति वृंदावनवासी मधुहर ॥ गोवाहन हर गोविंद ॥ ९५ ॥ चंद्रशेखर शंखचक्रधर ॥ विश्वनाथ विश्वंभर ॥ कपालनेत्र कमनीयगात्र ॥ लीला विचित्र दोघांची ॥ ९६ ॥ मुरहर मायामल्लहर ।। व्यालभूषण मोहहर्ता श्रीधर ॥ अंधकमर्दन अघबकहर ।। असुरमर्दन दोघेही ॥९७॥ सिद्धेश्वर सिंधुजावर ॥ निःसंसार निरहंकार ।। नगतनयावर नंदकिशोर ॥ ईशान ईश्वर इंदिरापती ॥ ९८ ॥ क्षीरवर्णतनु क्षीराब्धिशयन ।। एक ब्रह्मादिवंद्य एक ब्रह्मानंदपूर्ण ॥ त्या दोघांसी पूजोन ॥ आनंदमय जगदंबा ॥९९॥ आतां श्रोते सावधान ।। पुढें सुरस कथा अमृताहून ॥ वीरभद्रजन्म शिवपार्वतीलग्न ।। आणि षडाननजन्म असे ॥ २००॥ शिवलीलामृत ग्रंथ सिंहस्थ ॥ गौतमी स्वधुनी भेटों येत ॥ या अध्यायीं कैलास-वैकुंठनाथ ।। एके ठायीं मिळाले ॥२०१ ॥

हरी हा नारायणरूप, तर हर हा नागभूषण विभूषित. शिव हा निर्गुण तर सीतापती श्रीराम हा सगुण, शिव हा पंचमुखी, तर हरी हा शेषशायी, शिव गौर, तर हरी ब्रह्मदेवाचा जनक. ।।१९४ ।। हाती धनुष्य, त्रिशूल धारण केलेला शिव, तर पितांबरधारी नारायण शिवाचा कंठ निळा, तर हरी मेघासारखा. शिव पार्वतीचा, तर हरी हा लक्ष्मीचा पती. शिवाचे वाहन नंदी, तर हरीचे गरुड ।।१९५।। एकाचे मस्तकावर चंद्र तर दुसऱ्याचे हाती शंख चक्र गदा पद्म. एक त्रिनेत्रधारी, तर दुसरा नाना रूपधारी लीला नाटकी ।। १९६।। शिव हा मूरदैत्याचा, तर विष्णू हा मणिमल्लाचा संहारक, शिव हा नागभूषणांनी नटलेला, तर विष्णू हा कौस्तुभ मणी धारण करणारा. शिव अघासुराचा, तर विष्णू हा नाना दैत्यांचा संहारक. असे ते दोघेही असुर संहारकच. ।।१९७।। सिद्धेश्वर शिव विरागी, तर विष्णू हा अहंकाररहित. शिव हा हिमकन्येचा पती, तर विष्णू सागरकन्येचा लक्ष्मीचा पती. ।। १९८।। शिव हा दुधासारख्या रंगाचा, तर विष्णू तर क्षीरसागरातच पहुडणारा. विष्णू हा ब्रह्मादिक देवतांना प्रिय, तर शिव हा सर्वांचाच ब्रह्मानंद, अशा त्या दोघा हरी-हराची पूजा अंबिकेने मोठ्या भक्तिभावाने केली. ।।१९९।। सूत म्हणतात की, श्रोते हो, आता यापुढे तर आणखी रसाळ असे शिवलीला कथन येणार आहे, त्या कथेत आपण वीरभद्र, पार्वती विवाह आणि कार्तिकयाचा जन्म हा भाग ऐकणार आहोत. ।।२००।। शिवलीलामृत ग्रंथ ही जणू एक सिंहस्थ पर्वणी आहे. त्यावेळी गंगा आणि गोदावरीचा संगम होईल. या अध्यायात हरी आणि हर ह्यांची एकत्र झालेल्या भेटीचा भाग आपण ऐकला. ।।२०१।।


तरी ह्या सिंहस्थीं भाविक जन ।। ग्रंथगौतमीं करिती स्नान ॥ अर्थजीवनीं बुडी देवोन ।। अघमर्षर्णी निमग्न जे ॥२०२॥ श्रीधर स्वामी ब्रह्मानंद ।। सुखावला तेथेंचि प्रसिद्ध ॥ जेथें नाहीं भेदाभेद ।। अक्षय अभंग सर्वदा ॥ २०३ ॥ शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड ।। स्कंदपुराण ब्रह्मोत्तरखंड ।। परिसोत श्रोते अखंड ।। द्वादशाध्याय गोड हा ।।२०४ ।। ।।श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु ।।

पुढील त्या सिंहस्थ पर्वणीचे औचित्य साधून भक्तभाविक त्या पवित्र गंगेत स्नान करोत. ।।२०२।। श्रीधरस्वामी हे या ब्रह्मानंदानेच सुखावले. शिव आणि विष्णू हे अभेद्य आहेत हे त्यांच्या चांगलेच लक्षात आले. ते एकरूप अभंग आणि चिरंतर आहेत ह्याची खात्री झाली. ।।२०३।। हा स्कंद पुराणातील ब्रह्मोत्तर खंडातील शिवलीलामृताचा बारावा अध्याय शिवभाविक भक्त अखंड अनुसंधानाने श्रवण करोत. ।।२०४।। श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु ।।


अधिक माहितीसाठी आमच्या सोशल मीडिया ला फॉलो करा.

मराठी रसिक या आमच्या इंस्टाग्राम अकाउंट ला लाईक करा सुब्स्क्राईब करा. येथे तुम्हाला Shree Shivleelamrut Adhyay Barava संपूर्ण माहिती मराठी मध्ये मिळते.

Shree Shivleelamrut Adhyay Navava
Shree Shivleelamrut Adhyay Navava
Shree Shivleelamrut Adhyay Dahava
Shree Shivleelamrut Adhyay Dahava
Shree Shivleelamrut Adhyay Akrava
Shree Shivleelamrut Adhyay Akrava
Scroll to Top