दुर्गेचे नाव कात्यायनी (Devi Katyayani) कसे पडले यामागे एक कथा आहे. कत नावाचे एक प्रसिद्ध महर्षी होते. त्यांना कात्य नावाचा पुत्र झाला. या कात्याच्या गोत्रात प्रसिद्ध महर्षी कात्यायनाचा जन्म झाला. त्यांनी अनेक वर्ष भगवतीची कठोर तपस्या केली. भगवतीने त्यांच्या घरी जन्म घ्यावा अशी त्यांची इच्छा होती. भगवतीने त्यांच्या या प्रार्थनेचा स्वीकार केला.
काही काळानंतर जेव्हा महिषासुराचा अत्याचार पृथ्वीवर वाढला तेव्हा ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तीन देवतांनी आपल्या तेजाचा काही अंश देऊन महिषासुराच्या विनाशासाठी एका देवीला उत्पन्न केले. महर्षी कात्यायनाने या देवीची सर्वप्रथम पूजा केली म्हणून या देवीला कात्यायनी देवी असे नाव पडले. अश्विन कृष्ण चतुर्थीच्या दिवशी या देवीने महर्षी कात्यायनाच्या घरी जन्म घेतला होता. सप्तमी, अष्टमी आणि नवमी हे तीन दिवस महर्षी कात्यायन यांच्या घरी पूजा ग्रहण करून दशमीच्या दिवशी देवीने महिषासुराचा वध केला होता. अशी ही कथा पुराणात आहे.
कात्यायणी देवीचे स्वरुप
ऋषी कात्यायण यांच्या घरी देवी प्रकट झाल्यामुळे देवीला कात्यायणी नावाने संबोधले जाते. देवी भाविकांप्रति अत्यंत उदार असल्याचे मानले जाते. कात्यायणी देवीच्या पूजनाने भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात. तसेच दुर्गा सप्तशतीमध्ये कात्यायणी देवीचा उल्लेख महिषासुरमर्दिनी असा केल्याचे सांगितले जाते. कात्यायणी देवीचे स्वरुप चतुर्भुज आहे. देवीच्या एका हातात खड्ग आणि दुसऱ्या हातात कमळ आहे. तर दोन हात अभय मुद्रा आणि वर मुद्रेत आशिर्वादरुपी आहेत. कात्यायणी देवीचे स्वरुप दयाळू आणि भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारे असल्याचे सांगितले जाते.
कात्यायणी देवीचे पूजन
दुर्गा देवीच्या पूजनासह कात्यायणी देवीचे पूजन करताना गंगाजल, कलावा, नारळ, कलश, तांदूळ, लाल वस्त्र, धूप, दीप, नैवेद्य अर्पण करावे. कात्यायणी देवीला मध अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे देवीच्या पूजनात तसेच नैवेद्यात मधाचा आवर्जुन समावेश करावा, असे सांगितले जाते. तसेच देवीला मालपुआचा नैवेद्यही प्रिय असल्याचे म्हटले जाते.
कात्यायणी देवीचा मंत्र
कात्यायणी देवीचे पूजन केल्यानंतर खाली दिलेल्या मंत्रांचा यथाशक्ती आणि यथासंभव जप करावा, असे सांगितले जाते.
कंचनाभा वराभयं पद्मधरां मुकटोज्जवलां।
स्मेरमुखीं शिवपत्नी कात्यायनी नमोस्तुते॥
कात्यायणी देवी मंदिर
दिल्लीच्या छतरपूर येथे असलेले कात्यायणी देवीचे पीठ प्रसिद्ध आहे. एका कथेनुसार, श्रीराम आणि श्रीकृष्ण यांनीही कात्यायणी देवीचे पूजन केले होते. ब्रजमंडळातील गोपिकांनी श्रीकृष्ण पती म्हणून मिळावा, यासाठी कात्यायणी देवीचे पूजन केले होते, असे सांगितले जाते. देवीचा अवतार धारण्यामागील मुख्य उद्देश धर्माची पुनर्स्थापना, संरक्षण असल्याचे म्हटले जाते. कात्यायणी देवीचे पूजनाने सुयोग्य जोडीदार प्राप्त होऊ शकतो. तसेच विवाहात येणाऱ्या अडचणी, समस्या दूर होतात. भाविकांना सुख, समृद्धी प्राप्त करणे सुलभ होते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.
Devi Katyayani अधिक माहितीसाठी आमच्या सोशल मीडिया ला फॉलो करा.
मराठी रसिक या आमच्या इंस्टाग्राम अकाउंट ला लाईक करा सुब्स्क्राईब करा. येथे तुम्हाला संपूर्ण माहिती मराठी मध्ये मिळते.