श्री शिवलीलामृत अध्याय दहावा (१०) | Shree Shivleelamrut Adhyay Dahava (10)

Shree Shivleelamrut Adhyay Dahava
Shree Shivleelamrut Adhyay Satava
Shree Shivleelamrut Adhyay Satava
Shree Shivleelamrut Adhyay Aathava
Shree Shivleelamrut Adhyay Aathava
Shree Shivleelamrut Adhyay Navava
Shree Shivleelamrut Adhyay Navava

श्री शिवलीलामृत अध्याय दहावा (१०) (सार) | Shree Shivleelamrut Adhyay Dahava (10) Sar

सुत म्हणाले श्रोतेहो ऐका दुसरी आणखी एक कथा तुम्हाला सांगतो. आर्नत देशात देवरथ नामक विद्वाण बाह्मण होता. त्याला शारदा नावाची सुंदर अशी कन्या असुन योग्य असा वर पाहून बाराव्या वर्षी त्यांने तीचे लग्न करून दिले व कांही दिवसं ते तेथेच राहीले. शारदेचा पती नदीवर स्नानासाठी गेला असता येतांना रस्त्यात त्याला एक विषारी सापाने दंश केला. तेंव्हा तो तेथेच मृत्युमुखी पडला. असे शारदेला व देवरथाला कळताच दोघेही त्याचेकडे धावली. शारदा पतीच्या अंगावर पडून मोठमोठ्याने आक्रोश करून रडू लागली. देवरथाने तीला सावरले व पुढील रितीप्रमाणे उत्तरकार्य उरकले. पुढे अनेक दिवस निघून गेले. एकदा शारदा घरी एकटीच असता नैधृवनामक अंधऋषी तीच्या घरी आले. तीने त्यांचे यथा योग्य आदर सत्कार केला. व नमस्कार केला ऋर्षीना तीला सौभाग्य वाढो व पुत्रवतीभव असा आशिर्वाद दिला. हे ऐकून ती हसली व खिन्न झाली. आणी म्हणाली महाराज ! हे कसे शक्य आहे. मी विधवा आहे. त्यावर ऋषी म्हणाले माझा आशिर्वाद फुकट जाणार नाही.

तेव्हढ्यात तीचे आईवडीलादि सर्व मंडळी घरी आली. त्यांनाही सर्व हकीकत कळाली. ते म्हणाले ही गोष्ट शक्य नाही तेंव्हा ऋषीनी शापित गोष्टी ऋषीमुनींच्या आशिर्वादाने कशा निवृत्त झाल्या त्यांना अशा अनेक गोष्टी सांगितल्या. त्यानंतर ऋषी त्याचे घरी मुक्कामी राहीले व षडक्षरमंत्राचा उपदेश देवून उमा महेश्वराचे व्रत करण्यास सांगितले. त्याप्रमाणे तिने मंत्रजप व व्रतयथाविधी एक वर्षे करून ऋषीने व्रताचे उद्यापण यथासांग केले एके दिवशी रात्री शारदा गुरू समवेत गुरूमहेश्वराचे चिंतन करत असता देविने दर्शन दिले दोघांनी नमस्कार केला ती प्रसन्न होऊन वर माग म्हणून सांगितले. ऋषींनी देविस सर्व हकीकत सांगून माझा आशीर्वाद सत्य कर म्हणून सांगितले देविने शारदेचा पूर्वजन्माचा वृत्तांत सांगून हिचा पती दुरवर आहे. तो हीच्या वियोगाने तळमळत आहे परंतु हिला तो स्वप्नात भोग देवून. त्यापासून शारदानंदन नामक जग‌त्विख्यात पूत्र प्राप्ती होईल. असे सांगून देवी अदृष्य झाली. त्याप्रमाणे शारदेला पुत्र झाला लोक निंदा करू लागले परंतु आकाशवाणी झाली शारदा निर्दोष आहे जो हिची निंदा करील त्यास किडे पडतील गोकर्णक्षेत्री पतीपत्निची पूत्रासह भेट झाली. कालांतराने मरणोत्तर दोघेही शिवलोकास प्राप्त झाले.


श्री शिवलीलामृत अध्याय दहावा (१०) | Shree Shivleelamrut Adhyay Dahava (10)

श्रीगणेशाय नमः ।। कामगजविदारकपंचानना ।। क्रोधजलदविध्वंसप्रभंजना ।। मदतमहारका चंडकिरणा ।। चंद्रशेखरा वृषभध्वजा ॥ १ ॥ मत्सरदुर्धरविपिनदहना ।। दंभनगछेदका सहस्रनयना ।। अहंकार अंधकारसुरमर्दना ।। धर्मवर्धना भालनेत्रा ।। २ ।। आनंदकैलासनगविहारा ।। निगमागमवंद्या सुहास्यवक्त्रा ।। दक्षमखदलना आनंदसमुद्रा ।। ब्रह्मानंदा दयानिधे ॥ ३ ॥ नवमाध्यायाचे अंतीं ॥ उद्धरिला शबर सिंहकेतनृपती ।। यावरी सूत शौनकादिकांप्रती ।। नैमिषारण्यीं सांगत ।।४ ।। आनर्तदेशीं वास्तव्य करीत ।। एक द्विज नामें देवरथ ।। वेदाध्ययनी शास्त्ररत ।। पंडित आणि वंशज होय ॥५॥ त्याची कन्या चातुर्यखाणी ।। शारदा नामें कमलनयनी ।। जिचें स्वरूप देखोनी ।। जन होती तटस्थ ।। ६ ।। तंव ते झाली द्वादशवर्षी ।। पित्यानें लग्न करूनि संभ्रमेसीं ।। पद्मनाभ द्विजासी ।। देता झाला विधियुक्त ।। ७ ।। तोही परम अधीत ब्राह्मण ।। सभाग्य आणि वेदसंपन्न ।। जयाची विद्या पाहोन ।। राजे होती तटस्थ ॥८॥

श्री गणेशाला, श्री सरस्वतीला, श्री सद्‌गुरूनाथांना आणि भगवान श्री सांबसदाशिवास नमस्कार असो. हे कामना, वासनारूपी हत्तीला आपल्या धाकात ठेवणाऱ्या वनराज सिंहा, रागरूपी ढगांना आपल्या शक्तीने पळवून लावणाऱ्या प्रभंजना ! मदनरूपी अंधाराचा नाश करणाऱ्या प्रकाशसूर्या, हे चंद्रशेखरा, तू नंदीवर विराजमान असतोस. ||१|| मत्सररूपी वनास जाळणारा, दंभ पर्वताचा भेद करणारा, अहंकारसुराचा वध करणारा आणि धार्मिक वृत्तीची वृद्धी करणारा असा तू भगवान शंकर आहेस. ||२|| आनंदरूपी कैलास पर्वतावर विहार करणाऱ्या, निगमागमास ही वंदनीय असणाऱ्या, दक्षराजाच्या यज्ञाचा नाश करणाऱ्या, आनंदरूपी सागरा, तू पूर्ण ब्रह्मानंद आणि दयासागर आहेस. ||३|| नवव्या अध्यायात सुतांनी शौनकादिकांना ती शबर भिल्ल आणि राजा सिंहकेत ह्यांच्या उद्धाराची अद्भुत कथा निवेदन केलेली आपण ऐकली. ||४|| आता या अध्यायात एक नवी कथा ऐका – आनर्तदेशात एक देवरथ नावाचा वेदाध्यायी ब्राह्मण राहात होता. तो एका उच्च अशा कुळातला होता. ।।५।। त्यास शारदा या नावाची एक सुंदर अशी मुलगी होती. ती अत्यंत रूपवान होती, चतुर होती, लोक तिच्या रूपाकडे टक लावून पाहात राहात. ।।६।। ती कन्या बारा वर्षांची होताच तिच्या पित्याने तिचे पद्मनाभ नावाच्या एका विप्र पुत्राशी लग्न लावून दिले. ।।७।। पद्मनाभ हा वेदविद्या पारंगत, सद्‌गुणी भाग्यवान असा होता. त्याचे विद्याकौशल्य पाहून राजे थक्क होत. ।।८।।


लग्नसोहळा जाहलियावरी ।। कांहीं दिवस होता श्वशुरघरीं ।। सायंकाळीं नदीतीरीं ।। संध्यावंदनार्सी तो गेला ।।९ ।। परतोनि येतां अंधार ।। पायास झोंबला दुर्धर विखार ।। तेथेंचि पडिलें कलेवर ।। नगरांत हांक जाहली ।।१० ।। मातापितासमवेत ।। शारदा धांवोनि आली तेथ ।। गतप्राण देखोनि प्राणनाथ ।। शरीर घालीत धरणीवरी ।। ११ ।। म्हणे विद्याधनाचें सतेज ।। आजि बुडालें माझें जहाज ।। वोस पहली सेज ।। बोलों गुज कोणासीं ॥१२॥ माझें बुडालें भांडार ।। सर्परूपें वरी पडला तस्कर ।। दग्ध झालीं आभरणें समग्र ।। म्हणोनि टाकी तोडोनियां ।।१३।। देखोनि शारदेची करुणा ।। अश्रु आले जनांचिया नयनां ।। म्हणती अहा पशुपते भाललोचना ।। हे आतां करील काय ॥ १४ ॥ मग त्या विप्राचें करूनि दहन ।। माता पिता बंधु आप्त जन ।। शारदेस संगें घेऊन ।। सदनाप्रति गेले ते ।।१५।। कित्येक दिवस झालियावरी ।। घरचीं कार्यास गेलीं बाहेरी ।। शारदा एकली मंदिरीं ।॥ तंव एक अपूर्व वर्तलें ॥१६॥ नैधृव नामें ऋषीश्वर ।। वृद्ध तपस्वी गेले नेत्र ।। शिष्य हातीं धरोनि पवित्र ।। सदना आला शारदेच्या ।।१७।।

लग्न समारंभ झाल्यावर तो पद्मनाभ हा जावई काही दिवस सासऱ्याचे घरीच मुकाम करून होता. एके दिवशी संध्याकाळच्या सुमारास तो नदीतीरी संध्यावंदनासाठी म्हणून गेला. ।।९।। संध्यावंदन करून परत येतेवेळी अंधारात त्याच्या पायास एक विषारी साप चावला आणि त्याचा वाटेतच मृत्यू झाला. ही वार्ता गावात आली. ।।१०।। तेव्हा आपल्या मातापित्यासह शारदाही त्या जागी धावत धावत आली. आपल्या पतीस मृतावस्थेत पाहून तिने धरणीवर अंग टाकले. ।।११।। ती म्हणू लागली की, “विद्याधनरूपी माझे जहाज बुडाले, आता माझी शय्या ओस पडली, आता मी कोणाबरोबर गुजगोष्टी करू?”।।१२।।” “माझे भाग्यरूपी भांडार हे त्या काळसर्पाने चोरले. माझे सौभाग्य लुटले. आता ह्या अलंकाराचे मोल ते काय?” असे म्हणत ती अंगावरचे दागिने काढून टाकू लागली. ।।१३।। शारदेचा तो दारुण शोक पाहून तिथे जमलेल्या लोकांनाही फार वाईट वाटले. ते म्हणू लागले की, हे भालचंद्रा, हे पशुपती देवा, अरे आता ही दुर्दैवी कन्या काय करेल? ।।१४।। मग लोकांनी शोक आवरला. पद्मनाभाचे अंत्यसंस्कार केले आणि शारदेस बरोबर घेऊन तिचे मातापिता, आप्त हे सारेजण स्वगृही परत आले. ।।१५।। पुढे काही काळाने एकदा घरची सर्व मंडळी ही काही कामानिमित्ताने घराबाहेर गेली असताना एक अघटित नवल घडले. ।।१६।॥ एक नैधृव नावाचे एक वयोवृद्ध आणि अंध असे ऋषी आपल्या काही शिष्यांच्या सोबत शारदेच्या घरी आले. ।।१७।।


शारदा आसन देऊनि सत्वर ।। पूजन करोनि करी नमस्कार ।। नैधृव म्हणे सौभाग्य वाढो अपार ।। हो तुज पुत्र वेदवक्ता ॥१८ ॥ विप्रास न दिसे केवळ अंध ।। अमोघ वदला आशीर्वाद ।। हांसोनि शारदा करी खेद ।। शोक करी दुःखभरें ।॥१९॥ म्हणे हें अघटित घडे केवीं पूर्ण ।। सांगितलें पूर्ववर्तमान ।। नैधृव म्हणे माझें वचन ॥ असत्य नोहे कल्पांतीं ॥२०॥ माझे जिव्हेबाहेर आलें ।। तें माघारें न सरे कदाकाळें ।। माझें तपानुष्ठान वेगळें ।। अघटित तेंचि घडवीन ॥२१ ।। घरींचीं बाहेरूनि आलीं त्वरित ।। माता पिता बंधु समस्त ।। समूळ कळला वृत्तांत ।। म्हणती विपरीत केवीं घडे ॥२२॥ ऋषीचा आशीर्वाद अमोघ पवित्र ।। क्षणें रंकाचा करी सहस्रनेत्र ।। शापें न लगतां क्षणमात्र ।। कुळासहित संहारीत ॥२३॥ शापबळेंचि विशेष ।। सर्प केला राजा नहुष ।। यादवकुळ निःशेष ॥ भस्म झाले ब्रह्मशापें ॥२४॥ ब्राह्मणीं क्षोभोनि निर्धारीं ।॥ शक्राची संपत्ति घातली सागरीं ॥ ब्रह्मशापें मुरारी ।। अंबऋषीचे जन्म घेत ॥ २५ ॥ विधिहरिहर चित्तीं ।। ब्रह्मशापाचें भय वाहती ।। विप्रशापें राव परीक्षिती ।। भस्म झाला क्षणार्थे ॥ २६ ॥

तेव्हा त्या सुसंस्कारित शारदेने त्यांना आसन दिले. त्यांचे पाद्यपूजन केले, नमस्कार केला. तेव्हा त्यांनी तिला “सौभाग्यवती भव! पुत्रवती भव! ” असा आशीर्वाद दिला. ||१८|| आपल्याला नमस्कार करणारी समोरची स्त्री ही कशी आहे हे त्या अंध ऋषिवरांना दिसले नव्हते. त्यांनी आपल्या अमोघ वाणीने तो तसा आशीर्वाद तर दिला, तो ऐकून एकीकडे तर शारदेस हसू येऊ लागले, तर दुसरीकडे ती खेद करू लागली. ।।१९।। तेव्हा तिने सारी सत्य परिस्थिती निवेदन केली आणि म्हणाली, “महाराज, अहो मी तर बालविधवा, मग असे असताना तुमचा हा आशीर्वाद आता खरा कसा होणार?” ।।२०।। तेव्हा ते ऋषी म्हणाले की, “एकदा माझ्या मुखातून गेलेला शब्द हा कल्पांतीही खोटा होणार नाही. माझी तपश्चर्या ही खरी आहे, मी माझ्या तपोबळावर अघटित असे घडवून दाखवीन. “||२१|| तेवढ्यात तिच्या घरचे बाहेर गेलेले सारेजण घरी परत आले. तिच्या आई, वडील, भाऊ ह्यांना जेव्हा ही गोष्ट समजली तेव्हा ते म्हणू लागले की, “छे! हे असे विपरीत कसे बरे घडून येईल?” ।।२२।। ऋर्षीच्या मुखातून निघालेला आशीर्वाद हा अमोघ असतो. तो पवित्र असतो. त्यामुळे रंकाचा राव होतो. तसेच जर आशीर्वादाच्या ऐवजी शाप मिळाला तर तो शाप कुळाचाही संहार करतो. ।।२३।। शापाच्या सामध्यनिच राजा नहुष हा सर्प झाला. विप्र शापानेच अवघ्या यादव कुळाचा नाश झाला. ||२४|| ब्राह्मणाच्या शापवाणीबरोबरच इंद्राची सारी संपत्ती ही एका क्षणात सागरात बुडाली, तर राजा अंबरीषास मिळालेल्या शापाकारणेच भगवंतास अवतरित व्हावे लागले. ।। २५ ।। प्रत्यक्ष ब्रह्मा, विष्णू आणि महेश ह्या तिन्ही देवांनाही ब्राह्मणाच्या शापाची भीती वाटते. विप्राच्या शापानेच परिक्षित राजा हा जळून भस्मसात झाला. ।।२६।


जमदग्नीचा क्रोध परम ।। चौघे पुत्र केलें भस्म ॥ स्त्रिया असतां पांडुराजसत्तम ।। भोग नाहीं सर्वदा ।।२७।। विप्रशापाची नवल गती ।। साठ सहस्र सगर जळती ।। कुबेरपुत्र वृक्ष होती ।। नारदशापेंकरोनियां ॥ २८॥ कृष्णासहित यादवकुळ ॥ ब्रह्मशापें भस्म झालें सकळ ॥ दंडकाऐसा नृपाळ ।। क्षणमात्रै दग्ध केला ।।२९ ।। ब्रह्मशाप परम दृढ ।। नृगराज केला सरड ।। धराधरशत्रु बळप्रचंड ॥ सहस्र भर्गे त्या अंगीं ॥३०॥ क्षयरोगी केला अत्रिनंदन ॥ मेदिनीवसनाचें केलें आचमन ।। शाप देवोनि सूर्यनंदन ।। दासीपुत्र केला पैं ॥ ३१ ॥ पाषाणाचे करिती देव ।। रंकाचेही करिती राव ।। मंत्राक्षता टाकितां नवपल्लव ।। कोरड्या काष्ठा फुटले कीं ॥ ३२ ॥ ब्राह्मण थोर त्रिजगतीं ।। हैं ब्रह्मांड मोडोनि पुन्हां घडती ।। यावरी नैधृव तियेप्रती ।। बोलता झालां तें ऐका ॥३३॥ म्हणे ऐकें शारदे यथार्थ ।। तूं धरीं उमामहेशव्रत ।। षडक्षरमंत्र विधियुक्त ।। नित्य जप करावा ॥ ३४॥ म्हणें या व्रताचें फळ होय पूर्ण ।। तंववरी मी येथेंचि राहीन ।। मग त्याच्या अंगणांत मठ करून ।। राहता झाला नैधृव तो ॥३५॥

जमदग्नी ऋर्षीच्या क्रोधित शापवाणीने त्याचे चार पुत्र भस्म झाले. अनेक उत्तम अशा स्त्रिया असूनही पांडुराजास त्यांचा भोग घेता आला नाही. ।।२७।। सगर राजाचे साठ हजार पुत्र हेसुद्धा विप्र शापानेच जळून भस्मसात झाले. नारदाच्या शापानेच कुबेराचे पुत्र हे वृक्षयोनीत जन्मास गेले. ।।२८।। ब्राह्मणाच्या शापामुळेच कृष्णाच्या यादव कुळाचाही -हास झाला. विप्र शापाने दंडक नावाचा प्रबळ राजाही शापदग्ध झाला. ||२९|| ब्राह्मणाचा शाप हा अतिशय वाईट, त्यामुळेच नृगराजास सरडा व्हावे लागले. गौतम ऋर्षीच्या शापामुळेच इंद्राच्या अंगास शंभर शते पडली. ||३०|| गुरुच्या शापामुळेच प्रत्यक्ष चंद्रासही क्षयरोग लागला. अगस्ती ऋषींनी तीन आचमनात सागर पिऊन टाकला, मांडव्याच्या शापानेच यमधर्मास दासीपुत्र विदूर म्हणून जन्म घ्यावा लागला. ||३१|| ऋर्षीच्या, तपस्वीयांच्या शापात इतकी मोठी ताकद असते की, ते एका क्षणात रावास रंक करतात. त्यांचे सामर्थ्य असे असते की, त्यांनी टाकलेल्या मंत्राक्षतांनी वठलेल्या वृक्षासही नवी पालवी फुटते. ।।३२।। या आणि अशा उदाहरणावरून हेच सिद्ध होते की, ब्राह्मण, ऋषी, तपस्वी हेच जगात श्रेष्ठ आहेत. त्यांच्यात ब्रह्मांड रचण्याचे आणि मोडण्याचे सामर्थ्य असते. आता ते अंध नैधृव ऋषी हे त्या शारदेस काय म्हणाले ते ऐका. ||३३|| ते म्हणाले, “बाळ शारदे, आता मी काय सांगतो ते नीट ऐक. तू उमामहेश्वराचे व्रत धर. ‘ॐ नमः शिवाय ‘या सिद्ध शिव मंत्राचा नित्य जप कर.” ।।३४।। पुढे ते तिला असेही म्हणाले की, तुझे हे व्रत पूर्ण होऊन तुला त्याचे इच्छित फळ प्राप्त होईपर्यंत मी तुझ्याच अंगणात राहीन. असे म्हणून खरोखरच एक छोटी झोपडी बांधून ते ऋषी शारदेच्या घराजवळच राहू लागले. ।।३५।।


म्हणे व्रताचा आरंभ प्रेमेंसीं । करावा जाण चैत्रमासीं ।। अथवा मार्गशीर्षंसीं ।। शुक्लपक्षीं करावा ।। ३६ ।। पाहोनि सुमुहूर्त सोमवार ।। अष्टमी चतुर्दशी परिकर ।। पूजावा उमामहेश्वर ।। एक संवत्सर नेमेंसीं ।। ३७ ।। गुरुवचन शारदा ऐकोन ।। तैसेंचि करी न पडे न्यून ॥ नैधृवगुरुपासून ।। षडक्षर मंत्र घेतला ।। ३८ ।। दिव्य शिवमंदिर करून ॥ वरी दिधलें शुभ्र वितान ।। चारी स्तंभ शोभायमान ।। नाना फळें शोभताती ॥ ३९ ॥ अष्टगंधें सुवाससुमनें ।॥ भूमि शोधूनि रंगमाळा आस्तरणें ।। षोडशवर्ण यंत्रकरणें ।। अष्टदळें तयामाजीं ॥४० ।। तयामाजीं चतुर्दळ ।। त्यावरी घालोनि तांदुळ ।। वरी घट स्थापूनि अढळ ।। शोभा बहुत आणिजे ॥ ४१ ॥ उमामहेश प्रतिमा दोन्हीं ।। स्थापिजे सुवर्णाच्या करोनी ।। मग एकनिष्ठा धरूनि ।। षोडशोपचारीं पूजिजे ॥४२॥ यथासांग ब्राह्मणसंतर्पण ।। सुवासिनी पूजिजे प्रीतीकरून ।। षड्रस चतुर्विध अन्न ॥ द्यावें भोजन तृप्तीवरी ॥४३॥ पुराणश्रवण कीर्तन ॥ येणेंचि करावें जागरण ।। गुरुवचनीं विश्वास पूर्ण ।। धरूनि वर्तणें सर्वदा ॥ ४४ ॥ कुदेंदुवर्ण केवळ ।। कर्पूरगौर पयः फेनधवल ।। ज्योतिर्मय शुभ्र तेजाळ ॥ रजतवर्ण निर्मळ जो ॥४५ ।।

ते म्हणाले, “बाळे, चैत्र किंवा मार्गशीर्ष ह्या उत्तम मासात शुक्लपक्षात ह्या व्रतास सुरुवात करावी. ।। ३६।। व्रत प्रारंभासाठी सोमवारचा दिवस असावा. त्या दिवशी अष्टमी किंवा चतुर्दशी तिथी असल्यास उत्तमच. हे शिवोपासनेचे व्रत हे एक वर्ष करावे.” ।। ३७।। या आणि अशाप्रकारे त्या ऋर्षीनी शारदेस जसे सांगितले त्यात कोणतीच उणीव न पडू देता ती ते व्रताचरण करू लागली. तिने ऋर्षीकडून शिवमंत्राची दीक्षा घेतली. ।।३८ ।। तिने या पूजेसाठी एका छोट्या शिव मंदिराची उभारणी केली. पुढे मांडव घालून तो नाना प्रकारे सुशोभित केला. ।।३९।। या पूजा व्रताची माहिती देताना ऋर्षीनी तिला सांगितले होते की, पूजेस अष्टगंध, सुवासिक फुले असावीत. पूजास्थान सारवून रांगोळ्यांनी सुशोभित करावे, फुलांच्या माळा मंडपी लावाव्यात, सोळा वर्णाचे यंत्र तयार करावे, त्यात आठ पाकळ्या असाव्यात. ।।४० ।। तांदळाच्या आसनावर कलश स्थापित करावा. त्यास पानाफुलांनी सजवावे. ।।४१।। मग उमा आणि महेश्वर यांच्या सुवर्णप्रतिमा तिथे ठेवून त्या दोघांचे मनोभावे षोडशोपचार पूजन करावे. ।।४२।। यथासांग विप्रभोजन आणि सुवासिनी पूजनाचा कार्यक्रम करावा. त्यांना षड्रसयुक्त अशा चार पक्वान्नांचे भोजन घालून तृप्त करावे, दक्षिणा द्यावी. ।।४३।। त्या दिवशी शिवपुराण, शिवकीर्तन श्रवण करावे, रात्री शिवाचे भजन करावे, जागरण करावे. आपल्या सद्‌गुरूंच्या वचनावर पूर्ण विश्वास ठेवून हे व्रत आचरावे. ।।४४।। जो चंद्रासारखा नितळ आहे, ज्याचा वर्ण कापरासारखा आहे, जो दुधाच्या फेसासारखा धवल आहे, जो तेजस्वी तर आहेच, पण जो चांदीच्या वर्णासारखा आहे. ।।४५।।


म्हणे व्रताचा आरंभ प्रेमेंसीं । करावा जाण चैत्रमासीं ।। अथवा मार्गशीर्षंसीं ।। शुक्लपक्षीं करावा ।। ३६ ।। पाहोनि सुमुहूर्त सोमवार ।। अष्टमी चतुर्दशी परिकर ।। पूजावासूर्यकोटिसम तेज विराजित ॥ शुभ्र आभरणीं भूषित ।। जगदानंदकंद गुणातीत ।। स्वर्धनी विराजत मस्तकीं ॥४६॥ शुभ्र जटामुकुटमंडित ।। सर्प मणियुक्त विराजित ।। किशोरचंद्र भाळीं मिरवित ।। भस्मचर्चित शुभ्र दिसे ॥४७॥ उन्मीलित भाललोचन ।। केयूरांगद शुभ्र वीरकंकण ।। मुंडमाळा शोभायमान ।। दिसतीं लोचन सूर्येदुवत् ।।४८ ।। दिव्य गरुडपाचूहूनि वरिष्ठ ।। विराजमान दिसे नीलकंठ ।। दशभुज आयुधें सघट ॥ झळकती प्रळयचपळेऐसीं ।।४९ ।। खट्वांग त्रिशूळ कपाल डमरू ।। अंकुश पाश घंटा नागधरू।। पिनाक पाशुपत कमल तेजाकारू ।। शुभ्रवर्ण आयुधें ।॥५०॥ शुभ्र तेजस्वी शार्दूलचर्मवसन ।। शुभ्र स्फटिकवर्ण गजाजिन ।। मणिमय शुभ्र सिंहासन ।। नाना रत्नें विराजित ॥५१ ॥ कैलासगिरी शुभ्रवर्ण ।। वरी मंडप शुभ्र सहस्रयोजन ।। स्तंभविरहित सहस्रकिरण ।। गगनीं जेवीं प्रकाशे पैं।॥५२॥ ऐरावताहूनि विशाळ शुभ्र ॥ पुढें शोभे नंदिकेश्वर ।। मणिमय कुंडलें सुंदर ।। शेष तक्षक झळकती ।।५३ ।। ब्रह्मानंदसुख मुरोन ।। ओतिलें शिवस्वरूप सगुण ।। आतां भवानीचें ध्यान ।। शारदा ध्यानीं आणीत ।।५४ ।।

ज्याचे तेज हे कोटी सूर्याहूनही जास्त आहे, जो शुभ्र वस्त्रालंकारांनी शोभून दिसतो आहे, जो या विश्वाची आनंद ठेव आहे, जो गुणातीत आहे, ज्याच्या मस्तकी पवित्र गंगा निवास करून आहे. ।।४६|| ज्याच्या मस्तकी जटांचा मुकुट शोभतो आहे, ज्याने सर्पालंकार धारण केले आहेत, ज्याचे मस्तकावर चंद्र आहे, जो शुभ्र भस्मांकित आहे.।॥४७॥ ज्याच्या भाळीचा तृतीय नेत्र हा अर्थोन्मिलित आहे, ज्याने केयूर आणि वीरकंकण परिधान केली आहेत, ज्याच्या गळ्यात मुंडमाळा आहेत. ज्याचे दोन्ही डोळे हे चंद्रसूर्यासारखे आहेत. ||४८|| ज्याचा कंठ निळा आहे, ज्याने आपल्या दाही हातांत विविध प्रकारची आयुधे धारण केली आहेत. ॥४९॥ ज्यात खट्ठांग, त्रिशूल, कपाल, डमरू, अंकुश, पाश, नागचिन्हांकित घंटा, धनुष्य, पाशुपत अस्त्र आणि कमळ ह्यांचा समावेश आहे. ॥५०॥ ज्याने शुभ्र वाघ्रचर्म परिधान केले आहे, ज्याने स्फटिक वर्णाच्या हत्तीचे चर्म पांघरले आहे. जो रत्नांकित जडलेल्या आसनावर विराजमान झालेला आहे. ।।५१।। शुभ्रवणीय कैलास पर्वतावर सहस्र योजने लांब असलेला ज्याला खांब नाहीत असा ज्याचा सभामंडप आहे, जो आकासशातील सूर्या प्रमाणे चमकतो आहे. ||१२|| इंद्राच्या ऐरावतापेक्षाही अतिशय शुभ्र असलेला नंदी ज्याचे वाहन आहे, ज्याच्या गळ्यात शेष आणि तक्षक नागरूपी कंठभूषणे तळपत आहेत. ॥५३॥ ज्या सगुण रूपात तो अवघा ब्रह्मानंद एकवटलेला आहे, अशा भगवान शिवाचे शारदा मनोमन ध्यान करते, त्यास वंदन करून त्याचे पूजन करून शारदा आता तिच्या डोळ्यासमोर त्या माता पार्वतीचे रूप आणते. ॥५४॥


बाला तन्वंगी सुंदर ।। विराजमान चंद्रशेखर ।। चतुर्भुज पाशांकुशधर ।। गदापायुक्त जे ।। ५५ ।। सुरतरुसुमनमाळायुक्त ।। मल्लिका-बकुळ कमळीं विराजित ।। इभमुक्तावतंस डोलत ।। शोभा अद्भुत कोण वर्णी ।। ५६ ।। हरिमध्या भुजंगवेणीं ।॥ जलजवदना आकर्णनयनीं ।। द्वादशादित्यशोभा जघनीं ।। कांची वरी झळकतसे ॥ ५७ ॥ मागें स्त्रिया वर्णिल्या बहुत ।। निःसीमरूपलक्षणयुक्त ।। ओंवाळूनि टाकाव्या समस्त ।। जिच्या पादांगुष्ठावरूनी ।।५८ ।। कोटिमन्मथशोभा साजिरी ।। त्रिभुवनजननी त्रिपुर सुंदरी ।। ब्रह्मांड फोडोनियां वरी ।। आंगींचा सुवास धांवत ॥५९ ।। पदमुद्रा जेथें उमटती ।। तेथें आरक्त कमळे उगवती ।। द्विजपंक्तींचा रंग पडतां क्षितीं ।। खडे होती दिव्यमणी ॥ ६० ॥ या ब्रह्मांडमंडपांत देख ।। ऐसें स्वरूप नाहीं आणिक ॥ शशि मित्र द्विमुख ।। जिच्या तेजें शोभती ॥ ६१ ॥ विधिशक्रादि बाळें अज्ञान ।। स्नेहें निजगर्भी करी पाळण ।। समस्त त्रिभुवन लावण्य ॥ ओतिलें स्वरूप देवीचें ॥ ६२॥ विशाळ ताटकें प्रभाघन ।। ओतिलीं शशिमित्रतेज गाळून ।। गंडस्थळीं प्रभा पूर्ण ।। पडली झळके अत्यंत ।। ६३ ।।

ती कशी आहे, तर ती अत्यंत सुंदर, सडपातळ, मस्तकी चंद्रकोर ल्यालेली आहे. तिच्या चार हातांत गदा, अंकुश, पाश आणि पद्म आहे. ।।५५।। जिची अंगकांत ही कल्पवृक्षाच्या फुलांनी, मोगरा, बकूळ आणि धवल कमळांनी शोभून दिसते आहे. जिने हत्तीच्या गंडस्थळातील मोत्यांचे दागिने परिधान केलेले आहेत, त्या देवीचे रूपवर्णन ते काय करावे? ।।५६।। ती सिंहकटी असून, तिच्या पाठीवरची रुळणारी वेणी ही नागिणीसारखी आहे, तिचा चेहरा हा कमळासारखा आहे, तर तिच्या कमरेवर बारा आदित्यांची शोभा असलेला कमरपट्टा आहे. ।।५७ ।। यापूर्वी ज्या कोणा स्त्रियांचे सौंदर्यवती म्हणून वर्णन केले असेल तर सर्वांना या भवानीच्या पायाच्या अंगठ्यावरून ओवाळून टाकावे अशी ही अधिक सुंदर आहे. ।।५८|| कोट्यवधी मदनाचे सौंदर्य हे या त्रिभुवन सुंदरीस लाभले आहे. तिच्या अंगीच्या सुवासाने अवघे ब्रह्मांड भरून गेले आहे. ।।५९।। तिच्या पावलांचे जिथे ठसे उमटतात तिथे रक्तवर्णीय कमळे उगवतात आणि तिच्या दंतपंक्तीचा प्रकाश जिथे पडतो तिथले खडेही दिव्य मणी होतात. ।। ६० ।। या सकल ब्रह्मांडात तिच्यासारखे सौंदर्य आणखी कुणापाशी नाही. चंद्र, सूर्य आणि अग्नी हेसुद्धा तिच्यामुळेच शोभून दिसतात. ।।६१।। इंद्र ब्रह्मादिक बालकांचे ती आपल्या गर्भात संगोपन करते. सकल विश्वातली अत्युच्च अशी जी सुंदरता ती या देवीच्या ठायी एकवटली आहे. ।। ६२|| तिच्या कानातली कर्णफुले ही जणूकाही चंद्रसूर्याच्या तेजापासूनच तयार केलेली आहेत. त्याचा तिच्या गालावर पडणारा प्रकाश अत्यंत शोभून दिसतो आहे. ।।६३।।


बिंबाधर अतिरक्त ॥ नासिकींचें वरी डोलतां मुक्त ॥ प्रवाळचि केवळ भासत ।। तेज अमित न वर्णवे ॥६४॥ नेत्रांजनप्रभा पडली मुक्तशिरीं ।। तो गुंजेऐसें दिसे क्षणभरी ।। जगन्माता हास्य करी ।। तो रंग दिसे शुभ्र मागुती ॥ ६५ ॥ ओळीनें बैसल्या हंसपंक्ती ।। तैसें द्विज हांसतां झळकती।। मुक्त शुभ्रवर्ण मागुती ।। हैमवतीचे झळकती ॥ ६६ ॥ दंतपंक्ती शुभ्र अत्यंत ॥ अधरप्रभेनें आरक्त भासत ।। डाळिंबबीज पक्व शोभत ।। क्षणैक तैसे दीसती ॥६७॥ कंठींचे मुक्ताहार संपूर्ण ।। दिसती इंद्रनीळासमान ।। श्यामलांगप्रभा देदीप्यमान ।। मुक्तांमाजी बिंबली ॥ ६८ ॥ कमंडलु तेजस्वी सुंदर ।। तेवीं विश्वजननीचें पयोधर ।। कुमार आणि इभवक्त्र ।। ज्यांतील अमृत प्राशिती ॥ ६९ ॥ प्रळयचपळा गाळोनि समग्र ।। रंगविलें वाटे देवीचें अंबर ।। मुक्तलग कंचुकी प्रभाकर ॥ बाहुभूषणें झळकती ।।७० ।। इंद्रनीलकीलवर्णां ।। लीलावेषधारिणी ॥ भक्तानुग्रहकारिणी ।। प्रलयरूपिणी आदिमाता ।।७१ ॥ आदिपुरुषाची ज्ञानकळा ॥ घडी मोडी ब्रह्मांडमाळा ॥ जिचें स्वरूप पाहतां डोळां ।। जाश्वनीळा धणी न पुरे ॥ ७२ ॥

तिचा खालचा ओठ इतका लाल आहे की, त्याच्या प्रकाशाने तिच्या नाकातील नथीतला मोती हा प्रवाळासारखा दिसतो आहे. ।।६४ || त्या मोत्याच्या डोक्यावर देवीच्या डोळ्यातील काजळाची प्रभा पडली आहे, तो मोती गुंजेसारखा दिसत आहे. ती जेव्हा सुहास्य करते तेव्हा त्या हास्याने तो पुन्हा शुभ्र दिसतो. ।।६५।। या हेमवतीचे शुभ्र दात हे एका रांगेत बसलेल्या हंसाप्रमाणे झळकत आहेत. ।। ६६ ।। तिच्या शुभ्र दातांवर तिच्याच लालसर ओठांची पडलेली प्रभा ही त्या दातांना डाळिंबाच्या दाण्यासारखे खुलवत आहे. ।।६७|| तिच्या गळ्यातला मोत्याचा हार हा इंद्रनीळ मण्यासारखा चमकतो आहे, कारण त्यावर तिच्याच श्यामल देहकांतीची प्रभा पडलेली आहे. ।। ६८ ।। तिचे स्तन हे कमंडलूसारखे अमृताने भरलेले असून, त्यातले अमृतपान हे तिची बालके गणेश आणि कार्तिकय हे करतात ।।६९।। प्रलय काळीच्या चकाकणाऱ्या विजा गाळून जणूकाही तिचे वस्त्र तयार केले आहे असे वाटते. तिच्या कंचुकीस दिव्य मोत्यांचे घोस लावले आहेत. तिच्या बाहू भूषणांची शोभा अवर्णनीय आहे. ।। ७० || इंद्रनीलाप्रमाणे वर्ण असलेली, लीलावेष धारण करणारी, निज भक्तांवर कृपा करणारी, अशी ही आदिमाया शक्ती देवता आहे. ।।७१|| ही आदिपुरुषाची चित्कला हीच ब्रह्मांडाची रचना करते, तीच ते रचते आणि मोडतेही. तिचे ते अनुपम असे रूप पाहून शिवाचेही समाधान होत नाही. ।।७२।।


कृत्तिकापुंज झळके गगनीं ।॥ तैसे जलजघोंस डोलती कर्णी ।। अरुणसंध्यारागा उणें आणी ॥ कुंकुमरेखा आरक्तपणें ॥७३॥ विश्वप्रळयीं शिव सगुणपण ।। टाकोनि होतां तत्काळ निर्गुण ।। परी तिचें सौभाग्य गहन ।। ताटंककुंकुममहिमा हा ॥ ७४ ॥ दोन वेळां वरिलें कर्पूरगौरा ।। भवानीनें लाविला कपाळीं बिजवरा ।। तांबूलरेखांकित वदनचंद्रा ।। अपार कवि वर्णिती ॥ ७५ ॥ प्रयागी त्रिवेणी जैसी ।। अंबेची वेणी शोभे तैसी ।। कृष्णवर्ण कुरळ निश्चयेंसी ।। आदित्यनंदिनी होय ते।।७६ ।। शुभ्र हार गुंफिला दिव्यसुमनीं ।। तेचि ब्रह्मांडावरूनि स्वर्धनीं ।। माजी आरक्तपुष्पें दिसती नयनीं ।। पद्मजनंदिनी गुप्त ते ।। ७७ ।। मूद राखडी मच्छकच्छादि अलंकार ॥ हे प्रयागीं तळपती जळचर ॥ केशाग्रीं गुच्छ विशाळ थोर ।। सागराकार शोभती ॥ ७८ ॥ काय ब्रह्मांडें गुंफिलीं सकळ ।।।। तेचि डोलत मोहनमाळ ।। जीवशिव दोन्ही तेजाळ ॥ आवरोनि धरिले दोन पक्षी ॥७९॥ अक्षय सौभाग्य नव्हे खंडन ।। म्हणून वज्रचूडेमंडित कर जाण ॥ दशांगुळीं मुद्रिका बंधु जनार्दन ।। दशावतार नटलासे ॥८०॥ पायीं नेपुरें पैजण ।। गर्जतां शिव समाधि विसरून ।। पाहे मुखचंद्र सावधान ॥ नेत्रचकोरें करूनियां ॥८१॥

तिच्या कानात डुलणारे कमळाचे गुच्छ हे आकाशातील नक्षत्रांसारखे खुलतात. तिच्या भाळीची कुंकुमरेषा ही संध्यासमयीच्या लालसर रंगासही फिके पाडते. ।।७३।। ज्यावेळी विश्वाचा प्रलय होतो त्यावेळी तो शिव हा सगुणत्व त्यागून निर्गुण होतो, त्यामुळे हिचे सौभाग्यत्व अबाधित असेच राहते. ।।७४।। तिने दोनवेळा शिवाबरोबर विवाह केला आहे, तेव्हा तिने कपाळी बिजवरास धारण केले होते. तिच्या ओठी रंगलेल्या विड्याचे वर्णन करण्यासाठी अनेक कवी पुढे सरसावतात. ।।७५।। या देवीच्या वेणीची गुंफण म्हणजे जणू प्रयाग क्षेत्रीचा त्रिवेणी संगमच होय. तुझे काळेभोर कुरळे केस म्हणजे जणू काय यमुनेचे पाणीच. ।। ७६ ।। तिच्या गळ्यातील शुभ्रफुला’चा हार म्हणजे जणू ब्रह्मांडातून वाहणारी गंगा आणि त्यातील गुंफलेली लालसर फुले म्हणजे जणू गुप्त असलेली पद्मजनंदिनी देवी सरस्वतीच होय. ।। ७७|| तिचे दिव्यालंकार म्हणजे जणू त्या प्रयाग तीर्थातले जलचर, तिच्या केसाच्या अग्रभागी असलेले फुलांचे गुच्छ हे सागराप्रमाणे शोभून दिसत आहेत. ।। ७८ ।। सकल ब्रह्मांडे एकत्र गुंफून केलेली मोहनमाळ तिच्या उरोभागावर शोभते आहे, जीवशिवरूपी तिचे दोन्ही स्तन म्हणजे तर जणू एखाद्या हिंदोळ्यावर आवरून बसलेले पक्षीच होत. ।। ७९ ।। ही देवी अखंड सौभाग्यवती असून, तिने तिच्या हातात अक्षय चुडा भरलेला आहे. तिच्या दाही बोटांतील अंगठ्या म्हणजे जणू नारायणाच्या दशावतारांची खूण आहे. ।।८०|| तिच्या पायातील पैंजणाचा मंजूळ ध्वनी होऊ लागला की, शिव हासुद्धा आपल्या समाधीवस्थेतून जागा होतो आणि त्याच्या नेत्ररूपी चकोरांनी तिच्या मुखचंद्रमाकडे एकटक पाहात बसतो. ।।८१।।


भक्त जे कां एकनिष्ठ ।। पायीं दोल्हारे जोडवीं अनुवट ।। ऐसें स्वरूप वरिष्ठ ।। शारदा ध्यात ब्रह्मानंदें ।। ८२ ।। ऐसें एक संवत्सरपर्यंत ।। आचरली उमामहेश्वरव्रत ।। नैधृव उद्यापन करवीत ।। यथाविधिप्रमाणें ।।८३ ।। अकरा शतें दांपत्य ।। वस्त्र अलंकार दक्षिणायुक्त ।। पूजोनि शारदा हर्षभरित ।। तंव रवि अस्त पावला ।।८४ ।। जप ध्यान कीर्तन करीत ।। शारदा गुरूजवळी बैसत ।। अर्थयामिनी झालिया अकस्मात ॥ भवानी तेथें प्रगटली ॥ ८५ ॥ असंभाव्य तेज देखोनी ।। नैधृवासी नेत्र आले तेंचि क्षणीं ।। नैधृव शारदा लागती चरणीं ।। प्रेमभावें करूनियां ॥ ८६ ॥ देवीचें करिती स्तवन ।। उभे ठाकती कर जोडून ।। परी त्या दोघांवांचून । आणिक कोणी न देखती ।॥८७॥ जय जय भवानी जगदंबे ।। मूळप्रकृति प्रणवस्वयंभे ।। ब्रह्मानंददायिनी सर्वारंभे ।। चिद्विलासिनी तूं माये ।।८८ ॥ धराधरेंद्रनंदिनी ।। सौभाग्यसरिते हेरंबजननी ।। भक्तहृदयारविंदचिन्मयखाणी ।। वेदपुराणीं वंद्य तूं ॥८९॥

या देवीचे जे परमभक्त आहेत ते तिच्या पायातील दोल्हारे आणि जोडव्यांसारखे शोभून दिसणारे आहेत. या आणि अशा शब्दात त्या आदिमाया पार्वतीची स्तुती करून शारदा तिचे नित्य ध्यान करीत असे. ।।८२ ।। अशाप्रकारे नित्यनेमाने शिवपार्वतीची पूजा करायची, त्यांचे ध्यान करायचे, जप करायचा हे व्रत शारदेने एक वर्षभर केले. तेव्हा त्या अंध नैधृवा नामक ऋर्षीनी तिच्या त्या व्रताची यथासांग सांगता करून उद्यापनाचा कार्यक्रमही घडवून आणला. ।।८३। तेव्हा तिने अकराशे दांपत्यांना शिवपार्वती मानून त्यांचे पूजन केले त्यांना भोजन दिले आणि त्यांचा वस्त्रालंकार देऊन उचित सन्मान केला. ।।८४।। सांगतेच्या दिवशी शारदा ही आपल्या सद्‌गुरू सन्निध शिवोपासना करीत असताना मह्यरात्रीच्या सुमारास सचानक तिच्या समोर देवी भवानी प्रकट झाली ।।८५।। त्या देवीच्या दिव्य प्रगटना बरोबरच आणखी एक गोष्ट घडली. देवीच्या दिव्य तेजाचे किरण हे त्या अंध ऋर्षीच्या नेत्रात पडताच त्यांना दृष्टी प्राप्त झाली. त्या आनंदाबरोबर त्या गुरू, शिष्याच्या जोडीने सद्गद् होऊन देवी भवानीस मोठ्या विनयाने नमस्कार केला.।।८६|| त्यादोघांनीही नमन करून उभे राहात देवीची स्तुती चालू केली. विशेष आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे देवीचे दर्शन फक्त त्या दोघांनाच होत होते. त्यांच्याशिवाय अन्य कोणासही देवी दिसत नव्हती. ||८७|| तेव्हा त्या देवीची स्तुती करीत ते म्हणू लागले की, हे भवानी जगदंबे, तूच मूळ प्रकृती आहेस, तू प्रणवरूपिणी आहेस, तू ब्रह्मासानंदापद देणारी आहेस, सकल विश्वाचा प्रारंभ हा तूच असून, तूच प्रत्येकाच्या हृदयातली चिद्विलासिनी शक्ती आहेस, माते तुझा जयजयकार असो. ।।८८।। हे देवी तू हिमालयाची कन्या आहेस, तू सौभाग्याची गंगा आहेस, तू बाल गणेशाची जननी आहेस, तू वेदवंद्य आणि भक्त हृदयीची चिद्विलासिनी शक्ती आहेस. ।।८९।।


तुझिये कृपें निश्चितीं ॥ गर्भाधासी नेत्र येती ।। मागें सांडूनि पवनगती ।। पांगुळ धांवती कृपें तुझ्या ॥९० ॥ मुके होतील वाचाळ ॥ मूर्ख पंडित होय तात्काळ ।। रत्नें होती सिकताहरळ ।। गारा होती चिंतामणी ।।९१ ।। भवभयहारके भवानी ।। भक्तपालके मनोल्हासिनी ।। वेदमाते द्विजजनरंजनी ।। वेधलें ध्यानीं ब्रह्मादिक ॥ ९२ ॥ त्रिपुरसुंदरी त्रिभुवनजननीं ।। दोषत्रयहारके त्रितापशमनीं ।। त्रिकाळ जे सादर तव ध्यानीं ।। त्रिदेहविरहित ते ॥९३ ।। शिवमानससरोवरमराळिके।। जय जय विज्ञानचंपक-कलिके। सकळ ऐश्वर्यकल्याणदायके ।। सर्व व्यापके मृडानी ॥९४॥ ऐसें ऐकतां सुप्रसन्न ।। देवी म्हणे माग वरदान ।। नैधृवें वृत्तांत मुळींहून ।। शारदेचा सांगितला ॥९५ ॥ मम मुखांतूनि वचन आलें ।॥ तें अंबे पाहिजे सत्य केलें ।। तुवां जरी मनीं धरिलें ।। तरी काय एक न करिसी ॥ ९६ ॥ यावरी शिवजाया बोले वचना ।। हे शारदा पूर्वी शुभानना ।। द्रविडदेशीं विप्रकन्या ।। नाम भामिनी इयेचें ॥९७॥

हे देवी, तुझ्या कृपेनेच अंधासही दृष्टी लाभते आणि पांगळाही उंच पर्वत चढून जातो.।।९० ।। तुझ्या कृपेनेच मुका बोलू लागतो, मूर्ख हा ज्ञानी पंडित होतो, वाळूच्या खड्यांची रत्ने होतात आणि गारांना चिंतामणीचे रूप प्राप्त होते. ।।९१|| हे देवी, तू या भवसागराचे भय दूर करणारी, भक्तांचे सदैव रक्षण करणारी, त्यांचे पालनपोषण करणारी, त्यांचे मन उत्साहित करणारी आहेस. तू वेदवंद्या, विप्रप्रिया असून, ब्रह्मादिकांनाही तुझ्या ध्यानातच मन्न होऊन राहायला आवडते. ।।९२।। हे त्रिपुर सुंदरी, तू त्रिदोषांचे आणि त्रिविध तापांचे निवारण करणारी आहेस. जे भक्त भाविक तुझे श्रद्धायुक्ता अंतकरणाने ध्यान चिंतन करतात, त्यांना तू जडसूक्ष्म आणि कारण ह्या तिन्ही देहांतून मुक्ती देतेस. ।। ९३ ।। भगवान शिवाच्या मनरूपी सरोवरात विहार करणाऱ्या हंसिनी, तुझ्यातच ज्ञान आणि विज्ञानाचा सुरेख संगम आहे. तू विद्वान रूपा आहेस. सर्वसाक्षी, सर्व व्यापी हे जगदेश्वरी अंबिके, तुझा जयजयकार असो. ।।९४।। त्या दोघांनी केलेली ती देवीची स्तुती ऐकून देवी प्रसन्न झाली आणि म्हणाली, मागा काय वर हवा? तेव्हा देवीस नम्र अभिवादन करीत नैधृव ऋर्षीनी देवीस शारदेची सर्व कहाणी सांगितली. ||९५|| त्यानंतर ते देवीस प्रार्थना करून म्हणाले, “हे देवी, माझ्या मुखातून तिला जो आशीर्वाद गेला आहे, तो खरा व्हावा हीच माझी इच्छा आहे.” ।।९६|| तेव्हा देवी मृडाणी सांगू लागली, हे ऋषिवरा, ही शारदा म्हणजेच पूर्वीची द्रवीड देशातील विप्रकन्या होय. तिचे त्या जन्मीचे नाव ओते भामिनी. ।।९७||


इच्या भ्रतारासी स्त्रिया दोघीजणी ।। ही धाकुटी प्रिया मृदुभाषिणी ।। इणें वर वश करोनी ।। वडील कामिनी बिघडविली ॥९८ ॥ शेजारीं एक जार होता ।। तो ईस बहुत दिवस जपत असतां ।। एकांत पाहोनि इच्या हाता ।। धरिता झाला दुर्बुद्धी ॥९९ ॥ इणें नेत्र करोनि आरक्त ॥ झिडकारिला तो जार पतित ।। मग तो होवोनि खेदयुक्त ॥ गृहासी गेला दुरात्मा ॥१००॥ इचें त्यास लागलें ध्यान ।। सुरत आलिंगन आठवून ।। इच्या ध्यासेंकरून ।। तो जार मृत्यु पावला ॥१०१ ॥ ईस विधवा हो म्हणून ।। इच्या सवतीनें शापिलें दारुण ।। मग तीही पावली मरण ।। इच्या दुःखेंकरूनियां ।।१०२।। मग हेही काळें मृत्यु पावली ।। तेचि शारदा हे जन्मली ।। पूर्वीच्या जारें ईस वरिली ॥ ये जन्मीं जाण निर्धारं ॥ १०३ ॥ तोचि पद्मनाभ ब्राह्मण ।। गेला इसीं दावा साधून ।। इचा पूर्वजन्मींचा भ्रतार जाण ।। द्रविडदेशीं आहे आतां ।॥१०४।॥ तीनशेंसाठ योजन ॥ येथोनि दूर आहे तो ब्राह्मण ॥ स्त्रीहीन इचें स्वरूप आठवून ॥ तळमळीत सर्वदा ।।१०५ ॥ तो ईस स्वप्नामध्यें नित्य येवोन ॥ भोग देईल प्रीतीकरून । जागृतीहूनि विशेष जाण ।। सुख होईल इयेतें ।। १०६ ।।

हिला एक सवत होती. भामिनी ही तिच्या पतीची धाकटी बायको, ती त्याला अत्यंत प्रिय होती. हिने आपल्या सद्गुणांनी आणि सद्वर्तनाने आपल्या पतीचे मन जिंकून घेतले आणि नकळत थोरलीबद्दल त्याचे मन दूषित केले. ।।९८।। हिच्या घराशेजारी राहणारा एक पुरुष हा हिच्यावर फिदा होता. एके दिवशी त्याने संधी साधली आणि हिचा हात धरला. ।।९९ तेव्हा सुशील भामिनीने त्यास पूर्णतः झिडकारले, तेव्हा तो काहीसा क्रोधित होऊन तिच्यापासून दूर निघून गेला. ।।१००|| त्यास हिचे इतके वेड लागलो की, तो तिच्या सहवासासाठी वेडापिसा झाला. त्याने तिचा ध्यास घेतला. तो तिला मनोमन आलिंगन देऊ लागला. भामिनीचा त्याच्या मनास विलक्षण ध्यास लागलेला असतानाच तो दुराचारी मरण पावला. ।।१०१।। तिकडे हिच्या सवतीने तिला तू विधवा होशील असा शाप दिला. आपल्याला पती सुखापासून दूर करणाऱ्या सवतीस कोसत कोसत तीसुद्धा मरण पावली. ।।१०२।। पुढे कालांतराने हिचाही मृत्यू झाला आणि ती या शारदेच्या रूपाने या जन्मी जन्मास आली. त्या गतजन्मीच्या दुराचारी माणसानेच या जन्मी तिच्याशी विवाह केला. ।।१०३|| तोच पूर्वजन्मीचा दुराचारी हा पद्मनाभ रूपाने या जन्मी तिच्यावर सूड उगवून गेला. तर हिचा त्या जन्मीचा पती हा सध्या द्रविड देशात आहे. ।।१०४।। इथून तीनशे साठ योजने दूर असलेला तो ब्राह्मण हा अजूनही हिच्या प्रेमासाठीच तळमळतो आहे. ।।१०५।। हे ऋषिवर, तुझा आशीर्वाद खरा होण्यासाठी तो हिला स्वप्नात येऊन अंगसंग देईल की, शारदा हे सुख स्वप्नात भोगेल. ।।१०६।।


ऐसे लोटतां बहुत दिवस ।। पुत्र एक होईल शारदेस ॥ शारदानंदन नाम तयास।। लोकीं विख्यात जाण पां ॥१०७॥ ईस नित्यभोगीं होईल जो हरिख ॥ तैसाच विप्र पावेल सुख ॥ स्वप्नानंदें विशेष देख ।। तृप्ति होईल निर्धारें ।॥१०८ ॥ ऐसें तयासी सांगोन ।। अंबा पावली अंतर्धान ।। त्यावरी शारदा नित्य स्वप्न ।। देखती झाली तैसेंचि ।।१०९ ।। तंव ती झाली गरोदर ।। जन निंदा करिती समग्र ।। दीर भावे सासू श्वशुर ।। आप्त सोयरे सर्व आले ॥११०॥ देवीचें करणें अघटित ।। खदखदां जन हांसत ।। म्हणती हैं केवीं घडे विपरीत ॥ अंबा ईस भेटली कधीं ॥११॥ एक म्हणती कर्ण नासिक छेदून ।। बाहेर घाला खरारोहण करून ।। तों आकाशवाणी बोले गर्जेन ।। सत्य गर्भ शारदेचा ॥१२ ।। जन परम अमंगळ ॥ म्हणती हे कापट्यवाणी सकळ ॥ त्यातं एक वृद्ध होता पुण्यशीळ ॥ वदता झाला तें ऐका ॥१३॥ ईश्वरी मायेचें अगम्य चरित्र ॥ अघटित घडवी निर्धार ॥ स्तंभेवीण धरिलें अंबर ॥ कुंभिनी तरे जळावरी ॥१४॥

कालांतराने खरोखरच या शारदेस एक पुत्र होईल. तो शारदानंदन या नावाने जगात मोठे नाव कमवील. ।।१०७|| ज्याप्रमाणे शारदेस इकडे स्वप्नात तो आनंद अनुभवण्यास मिळेल, तसेच त्या विप्रासही हिच्याशीच अंगसंग केल्याचे सुखसमाधान हे स्वप्नात लाभेल. त्यामुळे दोघेही सुखी होतील. ।।१०८।। हे असे भाकीत वर्तवून ती देवी भवानी अदृश्य झाली आणि त्या दिवसापासून शारदा रात्री आपल्या त्या पतीच्या भेटीची स्वप्ने पाहू लागली. ।।१०९।। आणि जसे अंबेने सांगितले असे स्वप्नात पतीसुख लाभल्याने जेव्हा शारदा गरोदर राहिली तेव्हा मात्र तिचे मातापिता, भाऊबंद आणि आप्तेष्ट ह्यांना मोठे आश्चर्य वाटले, तसेच ते तिची त्याबद्दल निंदा करू लागले. ।।११०।। देवीची करणी ही जरी अद्भुत आणि अतर्क्स असली तरी शारदाचे गरोदरपण हा लोकनिंदेचा विषय झाला. लोक तिची कुचेष्टा करू लागले. हे असे कसे घडू शकते? हिला देवी खरंच भेटली का? त्या देवीला या दोघांशिवाय अन्य कोणी पाहिले का? असे म्हणून तिच्याच चारित्र्याचा संशय घेऊ लागले. ।।१११|| तेव्हा त्या लोकनिंदकांपैकी एकजण तर असेही म्हणाला की, ‘या पापिणीस विद्रूप करून तिची गाढवावरून गावात वरात काढायला हवी.’ ।।११२|| तो हे असले काही बोलतो न बोलतो तोच तिथे आकाशवाणी झाली की, थांबा, शारदेवर असा कोणताच कलंक लावू नका. तिचा गर्भ खरा आहे. तेव्हा ज्यांची मने ही दूषित होती, कपटी होती, स्वतः पापी होत ते लोक त्या आकाशवाणीसच असत्य म्हणू आणि ठरवू लागले. तेव्हा त्यांच्यामधला एक पुण्यवंत वयोवृद्ध त्या लोकांना म्हणाला, ।।११३।। अरे बाबांनो, ती ईश्वराची माया मोठी अद्भुत आहे. तिच्या किमयेनेच खांबाविना आकाश पेलले आहे ना? तिच्या सत्तेनेच ही पृथ्वी जड असूनही ती पाण्यात न बुडता पाण्यावर तरंगते आहे ना? ।।११४।।


ग्रहगण भगणें दिवाकर ।। यांस आहे कोणाचा आधार ॥ सर्वदेहीं व्यापक परमेश्वर ।। परी शोधितां ठायीं न पडे ॥१५॥ परस्परें पंचभूतांसी वैर ।। तीं एकरूपें चालती कौतुक थोर ॥ जननीगर्भी जीव समग्र ।। रक्षितो कैसा पहा हो ॥१६॥ काय एक न करी जगन्नाथ ।। राजा पूर्वी यूपकेत ।। त्याचें जळीं पडलें रेत ।। तें जळ प्राशीत वेश्या एक ॥ १७ ॥ तितुकेनि झाली ते गर्भिणी ॥ पुत्र प्रसवली उत्तम गुणी ।। विभांडकाचें रेत जळीं पडोनी ।। तें जळ हरिणी प्राशीत ॥१८ ।। तोचि झाला ऋषिश्रृंगी ।। तेणें ख्याती केली दशरथयागीं ।। सौराष्ट्रराजा स्पर्शतां करें मृगी ।। दिव्य पुत्र प्रसवली ॥१९॥ सत्यवती मत्स्यगर्भसंभूत ।। तो मत्स्य राजपुत्र होत ।। महिषासुर दैत्य ।। महिषीगर्भी जन्मला ॥१२०॥ कित्येक ऋषि करुणावंत ।। वचनमात्रे गर्भ राहत ।। । रेव रेवतीरमण जन्मत ।। रोहिणीपोटीं कैसा पां ॥ २१ ॥ सांबाचे पोटीं मुसळ झालें ।। तें कोणीं कैसें घातलें ।। कुंतीपोटीं पांडव जन्मले ।। पांच देवांसमागमें ॥ २२ ॥ ऐसें बोलती वृद्धजन ।। तरी निंदा करिती दुर्जन ।। मागुती देववाणी झाली पूर्ण ॥ ऐका वचन मूर्ख हो ।॥२३॥

आकाशा, फिरणाऱ्या चंद्र, सूर्यत ग्रह, नक्षत्रे, तारे ह्यांना कोणाचा आधार आहे का? तो परमात्मा हा आपल्या सर्वांच्या देहात निवास करून आहे; पण तो शोधून तरी सापडतो का? ।।११५।। अरे बाबांनो, पंचमहाभूते ही खरी तर एकमेकांच्या विरोधातली, पण तीसुद्धा त्या प्रभू सत्तेने एकत्र कार्य करतात ना? बाबांनो, मातेच्या गर्भात त्या जिवाचे नऊ महिने रक्षण कोण करतो ? ।।११६ ।। अरे बाबांनो, तो ईश्वर काय अद्भुत करत नाही? पूर्वी युपकेत राजाचे रेत पाण्यात पडले. ते पाणी एका वेश्येने प्राशन केले. ।।११७|| त्या जलाने ती गर्भवती राहिली आणि तिने पुढे उचित समर्य। एका बालकास जन्मही दिला. तसेच विभांडक नावाच्या एका ऋषीचे रेत पाण्यात पडले, ते एका हरिणीने प्राशन केले, तिला जो बालक झाला तोच शृंग ऋषी नाही का? ।।११८।। या शृंग ऋषीनेच राजा दशरथाचा यज्ञ केला ते तर माहीत आहेच ना? सौराष्ट्रातील एका राजाने एका हरिणीस केवळ हात लावताच ती गर्भिणी राहिली व तिने एका पुत्रास जन्म दिला. ।।११९।। सत्यवतीचा जन्मही मत्स्यगर्भातूनच झाला, तिचा मत्स्यबंधू हा पण एक राजपुत्रच होता ना? त्या महिषासुराचा जन्मसुद्धा एका म्हशीच्या पोटी झाल्याचे तुम्ही वाचले आहेच ना? ।। १२० ।। अरे बाबांनो, कित्येक ऋषी हे इतके प्रभावी आणि तपोश्रेष्ठ होते की, केवळ त्यांच्या शब्दाने गर्भधारणा होत असे. रोहिणीच्या पोटी बलराम हा कसा जन्मास आला बरे ? ।।१२१।। द्वापार युगात सांबाच्या पोटी मुसळ जन्मास आले? हा चमत्कार कोणी घडविला? एका कुंतीने पाच देवांशी संग केल्यानेच तिच्या पोटी पांडवांचा जन्म झाला ना? ।।१२२।। वयोवृद्ध व्यक्ती हे दाखले देतच होती अन् तिकडे दुर्जन हे त्या शारदेची, देववाणीची निंदाही करत तोते. तेवढ्यात पुनःश्च एक देववाणी घुमली. ।।१२३॥


शारदेस कोणी असत्य म्हणती ।॥ तरी जिव्हा चिरोनी किडे पडती ॥ ऐसें ऐकतां सात्विक सुमती ।। सत्य सत्य म्हणती त्रिवाचा ॥२४॥ कित्येक दुर्जन पुन्हां बोलत ॥ हें सर्वही कापट्य असत्य ॥ तों जिव्हा चिरोनि अकस्मात ॥ किडे गळों लागले ॥२५॥ हें देखोनि सर्व जन ॥ शारदेसी घालिती लोटांगण ।। म्हणती माते तूं सत्य पूर्ण ॥ जानकीरेणुकेसारिखी ॥ २६ ॥ मग तीस पुत्र झाला सतेज ।। लोक म्हणती शारदात्मज ॥ वाढत जैसा द्विजराज ॥ शुद्ध द्वितीयेपासूनी ॥२७॥ उपनयन झालिया पूर्ण ।। आठवे वर्षों वेदाध्ययन ॥ चारी वेद षट्शास्त्रं जाण ॥ मुखोद्गत पुराणें ॥२८॥ नवग्रहांत जैसा वासरमणी ॥ तेवीं पंडितांत अग्रगणी ॥ जेणें अनुष्ठानें पिनाकपाणि ॥ प्रसन्न केला सर्वस्वें ॥२९॥ यावरी शारदा पुत्रसमवेत ॥ लक्षूनि शिवरात्रिव्रत अद्भुत ॥ गोकर्णक्षेत्राप्रति जात ॥ यात्रा बहुत मिळाली ॥१३० ॥ तों द्रविडदेशींचा ब्राह्मण ।। तोही आला यात्रेलागून ॥ परस्परें पाहून ॥ कष्टी होती अंतरीं ॥३१ ॥ परस्परां कळली खूण ॥ पूर्वी देवी बोलिली वचन ।। उमामहेश्वरव्रताचें पुण्य ॥ अर्थ देई पतीसी ॥३२॥

ती देववाणी लोकांना सांगू लागली की, जर तुमच्यापैकी कोणी शारदेची निंदा करेल तर त्याचे तोंडात किडे पडतील. त्याच्या जिभा चिरल्या जातील. तेव्हा ज्ञानी व अनुभवी लोकांनी इतरांना ही देववाणी खरी असल्याची पुष्टी दिली. ।।१२४।। पण त्याच्याही पुढे जाऊन जेव्हा काही दुर्जनांनी आपली जीभ शारदेची निंदा करीत पुढे रेटली, तेव्हा त्यांच्या जिभा चिरल्या गेल्या, त्यांच्या मुखातून कीडे खाली पडू लागले.।।१२५।। हा चमत्कार प्रत्यक्ष पाहिला आणि अनुभवला तेव्हा लोकांनी क्षमा मागत शारदेचे पाय धरले. ते तिची खरी पतिव्रता आहेस. म्हणून स्तुती करू लागले. ।।१२६।। पुढे काही कालांतराने तिला जेव्हा मुलगा झाला तेव्हा सर्वांनी त्या बालकाचे शारदानंदन असे नामकरण केले. तो बालक चंद्राच्या कलेप्रमाणे दिसामासांनी वाढू लागला. ।।१२७।। वयाच्या आठव्या वर्षी त्याचा व्रतबंधन विधी करून त्यास वेदाभ्यासास पाठविले. तेव्हा त्याने सर्व वेदशास्त्रे आणि पुराणे ही मुखोद्गत केली. ।।१२८ ।। ज्याप्रमाणे नवग्रहात सूर्य चमकतो, तसा हा शारदानंदन पंडितांच्या सभेत शोभू लागला. तसे याने अनेक शिव अनुष्ठाने करून सदाशिवासही प्रसन्न करून घेतले. ।।१२९ ।। त्यानंतर एका महाशिवरात्रीच्या पर्वणीस शारदा आपल्या पुत्रास सोबत घेऊन गोकर्ण क्षेत्रास शिवदर्शनास गेली. ।।१३०।। त्यावेळी दैवयोगाने तो द्रविड देशी असलेला शारदेचा पती देखील तिथे यात्रा करीत करीत आला. त्या दोघांची तिथे भेट झाली. परस्परांना पाहून त्यांना मनात फार कष्ट झाले. ||१३१।। तेव्हा शारदेस देवीच्या वचनाची आठवण झाली. देवी तिला त्याची भेट होताच आपल्या व्रताचे अर्धे पुण्य आणि पुत्र पतीला देऊन टाक असे सांगितले होते. ।।१३२।।


पुत्र देईं त्याचा त्यास ॥ तूं त्यापासीं राहें चार मास ।। समागम न करीं निःशेष ।। शिवपदासी पावसी ॥३३॥ मग शिवरात्रियात्रा करून ।। भ्रतारासी केलें नमन ॥ म्हणे हा घ्या आपुला नंदन ।। म्हणोनि करीं दिधला ॥३४॥ उमामहेश्वरव्रत ।। त्याचें अर्थपुण्य देत ॥ मग शारदा सर्वे जात ॥ द्रविडदेशाप्रती तेव्हां ।॥ ३५ ॥ शारदा व्रतस्थ पूर्ण ।। दुरून पतीचें घे दर्शन ।। विख्यात झाला शारदानंदन ।। महापंडित पृथ्वीवरी ॥ ३६ ॥ तप आचरला अपार ।। मातृपितृभजनीं सादर ।। माता भवानी पिता शंकर ।। हेचि भावना तयाची ॥ ३७ ॥ जो न करी जनकजननींचें भजन ।। धिक् त्याचें तप ज्ञान ॥ धिक् विद्या धिक् थोरपण ॥ धिक् भाग्य तयाचें ॥ ३८ ॥ घरीं सांठवी स्त्रियेचें गोत ।। आणि मायबापां शिणवीत ।। अन्न नेदी बाहेर घालीत ।। शब्दबाणें हदय भेदी ॥ ३९ ॥ तो जरी पढला षट्शास्त्र ।। परी अनामिकाहूनि अपवित्र ।। तयाचें न पहावें वक्त्र ॥ विटाळ कदा न व्हावा ॥ १४०॥ यद्यपि झाला स्पर्श जाण ॥ तरी करावें सचैल स्नान ।। महादोषी तो कृतघ्न ।। यम दारुण गांजीत ॥४१॥ यावरी शारदेचा भ्रतार ॥ महातपस्वी योगीश्वर ।। शरीर ठेवोनि परत्र ।। पावला तो शिवपदा ॥४२॥

तसेच तू तुझ्या पती भेटीनंतर त्याच्यासोबत चार महिने राहा, त्या काळात तू त्याच्याशी अंगसंग करू नकोस. तसे केले तरच तुला त्यानंतर शिवपदाची प्राप्ती होईल, असे तिला देवीने सांगितले होते. ।।१३३|| त्यानुसार त्या शिवरात्र यात्रेत पतीची भेट होताच, परस्परांना ओळख पटताच शारदेने त्याचे चरण धरले. त्यास सारा वृत्तांत सांगितला आणि शारदानंदनास त्याचे हवाली केले. ।।१३४।। आपल्या वरातले अर्धे पुण्य तिने पतीस दान दिले. ती पतीबरोबर त्या द्रविड देशी गेली. ॥१३५॥ तिथे शारदा ही पूर्ण व्रतस्थपणे राहिली. ती दुरूनच पतीचे दर्शन घेत असे. देवीच्या वरदानाप्रमाणे शारदेचा तो पुत्र जगात खरोखरच मोठा नावलौकिक मिळवता झाला. ।।१३६।। तो आपल्या मातापित्यांची सेवा ही साक्षात शिव पार्वतीचीच आपण सेवा करतो आहोत असे मानून करीत असे. ।।१३७।। जो मातापित्यांची सेवा करीत नाही त्याचे ज्ञान, त्याची विद्या ही धिक्कारण्यासारखीच आहे.।।१३८।। जो घरात पत्नीच्या माहेरच्या लोकांचा गोतावळा गोळा करतो, आणि इकडे आपल्या मातापित्यास मात्र दूर लोटतो, त्यांना अन्नपाणी देत नाही, त्यांच्याशी नीट वागत नाही अशा पाप्याचे तोंडही पाहू नये. ।।१३९|| त्याने कितीही शास्त्राभ्यास केलेला असला तरीही तो पाप्याहून पापी, दुराचारी आहे. अशाचे तोंडही पाहू नये. ।।१४०।। समजा की चुकून जरी त्याचा स्पर्श झाला तर स्नान करावे, अशी व्यक्ती ही महादोषी असते. त्यास पुढे अनेक यमयातना भोगाव्या लागतात. ।।१४१|| पुढे काही काळाने शारदेच्या पतीचे निधन झाले, तो परमभाग्याने आणि पदरी असलेल्या पुण्याईने शिवपदास गेला. ||१४२।।


शारदाही चिंतून मदनदहन ।। करी विधियुक्त सहगमन ।। पतीसमवेत कैलासभुवन ॥ पावोनि सुखें राहिली ॥४३ ।। शिवलीलामृत सुरस पूर्ण ॥ किंवा हें दिव्य रसायन ।। भवरोगी सेवितां जाण ।। आरोग्य होऊन शिव होती ॥४४॥ जे मृत्यूनें कवळिले सहज ॥ त्यांसी नावडे हा रसराज ॥ ज्यांचीं सुकृतें तेजःपुंज ।। तेचि अधिकारी येथींचे ॥४५॥ ब्रह्मानंदें श्रीधर ॥ श्रोतयां विनवी जोडोनि कर ।। शिवलीलामृत निर्जर ॥ तुम्ही सेवा आदरें ।॥ ४६ ॥ पुढील अध्यायीं सुरस कथा ॥ पावन होय श्रोता वक्ता ।। मृडानीसहित शिव तत्त्वतां ।। पाठी राखी सर्वार्थी ॥ ४७ ॥ शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड ।। स्कंदपुराण ब्रह्मोत्तरखंड ।। परिसोत सज्जन अखंड ।। दशमाऽध्याय गोड हा ।।१४८ ।।

।। श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु ।।

त्यावेळी शारदेनेही त्याचेसोबतच सहगमन केले. तिलाही कैलासपद प्राप्त झाले. ते उभयता शिवचरणाशी सुखाने राहू लागले. ।।१४३।। श्रीधर कवी म्हणतात की, श्रोतेजनहो, हे शिवलीलामृत अत्यंत सुरस असे आहे. त्याच्या सेवनाने त्या शिवनामाच्या दिव्य रसायनाने सर्व प्रकारचे रोग हे दूर होतात. उपासकास उत्तम आरोग्य प्राप्त होते. ।।१४४।। जे या मृत्युलोकीच्या मायेने भ्रमले आहेत त्यांना हा सुधारस आवडत नाही, जे खरे भाग्यवंत, पुण्यवंत आहेत तेच या अमृताचे रसपान करतात. तेच या रसपानास खऱ्या अर्थाने पात्रही असतात. ।।१४५।। म्हणूनच ब्रह्मानंदाचा श्रीधर हा श्रोत्यांना नम्र विनवणी करतो की, तुम्ही हे शिवलीलामृत जिवाच्या आवडीने श्रवण करा. ।।१४६।। ते असेही म्हणतात की, यापुढच्या अध्यायातील कथा ही यापेक्षाही अत्यंत सुंदर आणि सुरस अशी आहे. त्याच्या श्रवण आणि पठणाने वक्ता आणि श्रोता दोघांचेही शिवकृपेने कल्याण होते. ।।१४७॥ स्कंद पुराणातील ब्रह्मोत्तर खंडातील शिवलीलामृताचा हा दहावा अध्याय भाविक भक्तजन मोठ्या प्रेमादराने श्रवण करोत. ।।१४८।।

।। श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु ।।


अधिक माहितीसाठी आमच्या सोशल मीडिया ला फॉलो करा.

मराठी रसिक या आमच्या इंस्टाग्राम अकाउंट ला लाईक करा सुब्स्क्राईब करा. येथे तुम्हाला Shree Shivleelamrut Adhyay Aathava संपूर्ण माहिती मराठी मध्ये मिळते.


Shree Shivleelamrut Adhyay Satava
Shree Shivleelamrut Adhyay Satava
Shree Shivleelamrut Adhyay Aathava
Shree Shivleelamrut Adhyay Aathava
Shree Shivleelamrut Adhyay Navava
Shree Shivleelamrut Adhyay Navava
Scroll to Top