बे एक बे, बे दुने चार,
शेत माझे हिरवे हिरवे गार.
बे सक बारा, बे नवे अठरा.
शेतावर आला गार गार वारा.
बे एक बे बे दाही वीस,
उडत आले चिमणीचे पीस.
शेतात पडले चिमणीचे पीस.
घरटे बनवायला चिमणीने उचलले पीस.
चिमणीचे घरटे बनले झाडावर,
चिव चिव करते पिल्ले शेतावर.
मनोहर, कोकण तू पाहिलास का?
आमचे कोकण हिरवेगार व छान आहे.
तेथे नारळ, पोकळी व हापूसची खूप झाडे आहेत.
कोकणचा हापूस फारच छान असतो.
कोकणात काजू ही खूप येतात.
अबोली सोनचाफा, मोगरा, सायली, चमेली, बकुळी यासारख्या सुंदर फुलांनी कोकण बहरून गेले आहे.
तेथे आजोबा सागर किनारी नेतात.
भरती ओहोटी दाखवतात.
बोटीत बसवतात.
सकाळची शोभा पाहायला नेतात.
आजी कोकणचा मेवा खायला घालते.
मोहन, रोहन, रोहिणीताई, तू व मी कोकण पाहायला जाऊ याल ना?
आपण कोकणची सैर करायला जाऊ याल ना? खूप मजा येईल
असेच अजुन गोष्टी बघण्यासाठी आमच्या इंस्टाग्राम पेज ला follow करा.
चिमणी आणि क्रुर हत्ती
एक जंगल होत. त्या जंगलात एका मोठ्या झाडावर एका चिमणीचं छोट्टस घरटं होतं. त्या घरट्यामध्ये चिमणीची अंडी होती. चिमणी अंड्यांची राखण करायची, आणि सुख समाधानाने राहायची.
एक दिवस, एक मोठ्ठा हत्ती त्या झाडापाशी आला. तो गर्मिने हैराण झाला होता. त्या झाडाची दाट सावली पाहून तो त्या झाडाखाली थांबला. हत्तीने ती फांदी जोराने हलवायला सुरुवात केली, ज्या फांदीवर चिमणीचं घरटं होतं. कारण ती फांदी हालवल्यावर त्याला गार वारं मिळत होतं. जशी ती फांदी जोरा जोरात हलायला लागली, तर त्यावर जे घरटं होतं, ते पण जोर जोरात हलू लागलं. ते पाहून चिमणी घाबरली.
चिमणी म्हणाली: हत्ती दादा, हत्ती दादा, नका हालवू ही फांदी. माझं घरटं आहे त्यावर ते पडून जाईल.
हत्ती म्हणाला: ते काय मला माहित नाही. हि फांदी हलवल्यामुळे मला थंडगार वारं मिळतंय. त्यामुळे मी असंच करणार. चल जा इथून.
असं म्हणून तो ती फांदी जोरजोरात हलवू लागला. शेवटी जे व्हायचं तेच झालं. ती फांदी तुटून जमिनीवर पडली. आणि त्या फांदी बरोबर ते घरटं पण जमिनीवर पडलं. त्या घरट्यात जी अंडी होती ती पण फुटली. हे पाहून चिमणी खूप उदास झाली. आणि जोर जोरात रडू लागली.
चिमणी म्हणाली: हं हं हं. माझी मुलं जन्माला येयच्या आधीच मेली. अं अं अं. माझं घरटं.
चिमणीचं रडणं ऐकून एक सुतार पक्षी तिथे आला.
सुतार पक्षी म्हणाला: असं रडून तर तुझी अंडी परत येणार नाहीत. त्यामुळे जे झालंय त्याबद्दल रडून काही फायदा नाही.
चिमणी म्हणाली: अरे… तुझं म्हणणं तर बरोबर आहे. पण त्या दुष्ट हत्तीने माझी अंडी फोडली. माझं घरटं मोडलं. त्याला अद्दल घडवलीच पाहिजे. तु जर माझा खराखुरा मित्र असशील तर त्या दुष्ट हत्तीला मारायचा काहीतरी उपाय सांग मला.
सुतार पक्षी म्हणाला: आता बघ माझं डोकं कसं चालतं. एक मधमाशी माझी मैत्रीण आहे. आपण तिच्याकडे जाऊ. तिच्या मदतीने आपण त्या हत्तीला मारू शकतो.
चिमणी म्हणाली: चल, मी पण येते तुझ्या बरोबर.
मंग ते उडत उडत त्या मधमाशीकडे गेले. सुतार पक्षाने मधमाशीला सगळं काही सांगितलं.
मधमाशी म्हणाली: त्या दुष्ट हत्तीला तर मारलाच पाहिजे. एक बेडूक माझा चांगला मित्र आहे. या कामात आपण त्याची पण मदत घेऊया.
मंग ते सगळे त्या बेडका कडे गेले. मधमाशीने बेडकाला सर्व काही सांगितले.
बेडूक म्हणाला: हम…. असं आहे तर. मला असं वाटतंय त्या हत्तीला गर्व चढलाय. पण जर आपण सर्व एकत्र आलो तर त्या हत्तीला चांगलाच धडा शिकवू शकतो. चला …..
खूप विचार करून त्या चौघांनी हत्तीला मारायची योजना आखली.
ते सगळे जिथे हत्ती होता तिथे जाऊन पोहोचले. पोटभर जेऊन हत्ती आरामात पहुडला होता.
मंग मधमाशी एक सुंदर गाणे गाऊ लागली. ती गुणगुणत गुणगुणत हत्तीच्या काना जवळ गेली. तिचं ते गोड गाणं ऐकण्यात हत्ती अगदी रमून गेला होता. अगदी डोळे मिटून तो ऐकत होता. सुतार पक्षी याचीच वाट पाहात होता. तो पटकन हत्ती जवळ आला. आणि त्याने आपल्या चोचीने हत्तीचे डोळे फोडले. हत्ती जोरजोरात ओरडू लागला.
हत्ती म्हणाला: अरे हे काय झालं. माझ्या डोळ्यांची खुप जळजळ होतेय. मला तर काहीच दिसत नाहीये. आआआआ हे काय झालं.
तिथे जवळच एक मोठा खड्डा होता. त्याच्या काठावर बसून बेडूक ओरडायला लागला. ओरडून ओरडून हत्तीच्या घशाला कोरड पडली होती. बेडकाचं ओरडणं ऐकून हत्तीला वाटलं कि नक्कीच जवळपास एखादं तळं असणार. आणि तळ्यात पाणी तर असणारच. मंग पाणी पिण्यासाठी बेडकाच्या आवाजाच्या दिशेने हत्ती तळ्या जवळ जाऊ लागला. आणि तो त्या मोठ्या खड्यात धपकन पडला. त्या खड्यातून बाहेर येयचा त्याने खूप प्रयत्न केला. पण त्याला बाहेर येताच आलं नाही. अशा प्रकारे अन्न पाणी न मिळाल्यामुळे तो बिचारा हत्ती त्या खड्यातच मरण पावला.
अशा प्रकारे मधमाशी, बेडूक, चिमणी, सुतार पक्षी या छोट्या प्राण्यांनी मिळून त्या मोठ्या हत्तीचा वध केला.
म्हणूनच म्हटलंय मुलांनो, “एकी, हेच बळ“.