सूत पुढे सांगु लागले सज्जनहो ! अशा प्रकारे शिवपार्वतीचा विवाह होऊन कार्तिकस्वामी जन्माला आले व गजाननासह ते सहकुटूंब कैलास पर्वतावर राहु लागले व दोघा पुत्राचे बाळलिला पाहुन मनोरंजन करू लागले. एके दिवशी शंकर पार्वती सारीपाट खेळत असता अकस्मात नारद आले. हे पणाशिवाय खेळतांना पाहुन नारद म्हणाले काही तरी पण लावून खेळा ! जो जिंकेल त्यांनी आपल्या जवळील वस्तु द्यायची पण ठरला. एकामागे एक डावात पार्वतीने शंकराकडील व्याघ्रांबर, गजचर्म, आयुधे भूषणे आदि सर्व जिंकून शंकर डिगंबर झाले. हे पाहुन नारद हासले व शंकर रूसले आणी लपून बसले. त्यांचा पत्ता कोणासही सापडेना पार्वतीनेही खुप शोधले अनेक दिवसाच्या शोधा नंतर पार्वतीला ध्यानस्थ बसलेले दिसले. समोर जावे तर रागावतील म्हणून तीने भिल्लीणीचे रूप घेतले व नृत्यगायन करून शंकराचे ध्यान भंगले. ते तिच्याकडे पाहुन मोहीत झाले. आपले तप विसरून तू माझ्याशी विवाहर कर अशी मागणी केली. तेंव्हा तीने पार्वतीचा विषय काढला तेंव्हा ते तिच्यावर रागावले व तीचे मला तोंडही पहायचे नाही तेंव्हा ती म्हणाली देवा ! तुम्हाला माझ्याशी लग्न करावयाचे असेल तर माझे घरी या म्हणून चालू लागली. असे भूलवित तीने शंकरास कैलासावर आनले व आपले रूप प्रगट केले पाहून दोघांनाही हसु आले हे तीचे प्रेम पाहुन त्यांनी प्रेमाने आपल्या जवळ घेतले. नंतर सुताने पूढील कथेस प्रारंभ केला. ते म्हणाले एकदा नारदाने शिवपार्वतीकडे कांतिनगरचा श्रियाळ राजा याची उदारते बद्दल फार स्तुती केली. हे ऐकून शंकराने त्याची परीक्षा घेण्यासाठी अतिथीचे घाणरडे रूप घेवून दारात उभा राहुन हाक मारली. श्रियाळ व त्याची पत्नी चांगुना यांनी त्याचे स्वागत केले हे पाहुन त्याने मला इच्छाभोजन द्या नाहीतर तुमचे सत्व घेऊन जाईल त्याची पुजा करून इच्छा विचारली तेंव्हा त्यानी मला नरमांसाचे भोजन हवे आहे तेही तुमच्या पांच वर्षाच्या श्रियाळ बाळाचे व तेही काही शोक दुःख न करता पाहीजे आहे हे अतिथीचे वचन ऐकून सर्व थःक झाले तरी पण धिर धरून सर्व दुःख सावरून व भोजन देण्यासाठी चांगुणेने चिलयास हांक मारली व सर्व हकीकत सांगितली हे ऐकून तोही अतिथीला संतुष्ट करण्यासाठी मरणास तयार झाला. चांगुणेने श्रियाळ बाळास ठार करून स्वयंपाक तयार केला व अतिथीला भोजणास राजासह बसविले. पंरतु मी निपुत्रिकाचे घरचे अन्न घेणार नाही म्हणुन उठला. तेव्हा दोघेही त्याची विनवणी करू लागले त्याने श्रियाळ बाळास हाक मारण्यास सांगितले. तिने बाळास हाक मारली तोच काय चमत्कार बाळ धावत आला नंतर शंकराने आपले रूप पालटून प्रगट झाले सर्वांना हृदयाशी धरले. दिव्य विमानी बसवून शिवपदास नेले.
Shree Shivleelamrut Adhyay Chaudava (14) | श्री शिवलीलामृत : अध्याय चौदावा
श्रीगणेशाय नमः ।। भस्मासुरहरणा भाललोचना ।। भार्गववरदा भस्मलेपना ।। भक्तवत्सला भवभयहरणा ।। भेदातीता भूताधिपते ॥१ ॥ भवानीवरा भक्ततारका ।। भोगिभूषणा भूतपालका ।। भाविकरक्षका भवभयहारका ।। भक्तरक्षका भवशोषणा ।। २ ।। त्रितापशमना त्रिदोषहारका ।। त्रिगुणातीता त्रिपुरांतका ।। त्रिभुवनजनका त्र्यंबका ।। त्रयीरक्षका त्रिकांडवेद्या ।। ३ ।। तुझ्या कृपाबळें समस्त ।। त्रयोदश अध्यायपर्यंत ।। कथिलें शिवलीलामृत ।। आतां कळसाध्याय चौदावा ।।४ ।। तेराव्या अध्यायीं शिवगौरीलग्न ।। सांगितलें स्वामिकार्तिकाचें जनन ।। यावरी शौनकादिकांलागून ।। सूत सांगे नैमिषारण्यीं ।॥५ ॥ सिंहावलोकनें तत्त्वतां ।। परिसा गजास्यषडास्यांची कथा ।। दोघेही धाकुटे असतां ।। जगदंबा खेळवी प्रीतीनें ।। ६ ।। गजतुंडा ओसंगा घेऊन ।। विश्वजननी देत स्तनपान ।। शुंगा दंडेकरून ।। दुग्ध ओढीत गजास्य ॥ ७ ॥ अंबेच्या पृष्ठीवरी प्रीतीं ।॥ शुंडा फिरवीत गणपती ।। शुंडेंत पय सांठवूनि षष्मुखाप्रती ।। बोलतसे तेधवां ।।८ ॥
श्री गणेशाला, श्री सरस्वतीला, श्री सद्गुरूनाथांना आणि भगवान श्री सांबसदाशिवास नमस्कार असो. श्रीधर कवी म्हणतात की, हे भस्मासुराचा नाश करणाऱ्या देवा, हे भाललोचना, हे भार्गववरदा, तू भक्तवत्सल आहेस, तू भेदातीत आहेस. तू सर्व भूतगणांचा अधिपती आहेस. ।।१।। तू भवानीचा वर, भक्तांचा तारक, सर्व भूतमात्रांचा पालक आहेस. तू भक्तांचे रक्षण करणारा, त्याची भवभय भीती दूर करणारा आहेस. ।।१।। तू त्रितापांचे, नाना दोषांचे, महापातकांचे निवारण करणारा आहेस, तू त्रिभुवनाचा जनक, त्र्यंबक, वेदरक्षिता आणि असुरांचा संहार करणारा असा आहेस. ।।३।। हे सदाशिवा, तुझ्या कृपेनेच तेराव्या अध्यायापर्यंतचे हे शिवलीलामृत कथन करून झाले आहे. आता या ग्रंथाचा हा चौदावा म्हणजे कळसाध्याय आहे. ।।४।। तेराव्या अध्यायात आपण शिवपार्वतीचा विवाह, कार्तिकेयाचा जन्म हा कथाभाग ऐकला. आता सूत पुढे कोणता भाग निवेदन करतात ते ऐकूया. ।।५।। सूत एकदा श्रोत्यांच्या समोर मागील कथाभागाचा धावता आढावा घेतात. ते या अध्यायात श्री गणेश आणि कार्तिकय हे दोघे लहान असतानाचा काही कथाभाग सांगतात. ते सांगतात की, माता पार्वती ही गणेश आणि षडानन ह्या दोघांनाही मोठ्या प्रेमाने खेळवीत असे. ।।६।। जेव्हा माता पार्वती ही बाल गणेशास स्तनपान देत असे तेव्हा तो त्याच्या सोंडेने दूध पित असे. ।। ७।। तो काय करायचा. आईच्या पाठीवर प्रेमाने सोंड फिरवायचा, दूध आपल्या सोंडेत साठवून ठेवायचा आणि तो कार्तिकयास म्हणायचा. ।।८।।
म्हणे हें घेई कां अमृत ।। ब्रह्मादिकां जें अप्राप्त ।। स्कंद बोले क्रोधयुक्त।। उच्छिष्ट तुझें न घे मी॥९॥ षडानन म्हणे चराचरजननी ।। लंबनासिक मजलागुनी ।। उच्छिष्ट दुग्ध देतो पाहें लोचनीं ।। सांग मृडानी कांहीं यातें ॥१० ॥ शुंडेसी धरूनियां खालें ।। पाडूं काय ये वेळे ।। माते याचें नासिक विशाळ आगळें ॥ कां हो ऐसें केलें तुवां ॥११॥ इंद्र चंद्र मित्र निर्जर ।। मूर्ति प्रसवलीस मनोहर ।। परी हा लंबनासिक कर्ण थोर ।। दंत एक बाहेर दिसतसे ।। १२ ।। ऐसा कां प्रसवलीस बाळ ।। ऐकतां हांसे पयः फेनधवल ।। धराधरेंद्रनंदिनी वेल्हाळ ।। तिसीही हास्य नाटोपे ॥ १३ ॥ स्कंद म्हणे जननी पाहीं ।॥ यासी उतरीं मज स्तनपान देईं ।। मग जगदंबेनें लवलाहीं ।। विघ्नेशा खालीं बैसविलें ।॥ १४ ॥ षण्मुख आडवा घेवोनी ।। स्तन जों घाली त्याच्या वदनीं ।। पांचही मुखें आक्रंदोनी ।। रडों लागलीं तेधवां ॥१५ ॥ तें देखोनि गणनाथ ।। पोट धरोनि गदगदां हांसत ।। म्हणे अंबे तुझा हा कैसा सुत ।। हांक फोडीत आक्रोशें ॥१६॥ एक स्तन घातला याचे वदनीं ।। आणीक पांच आणसी कोठूनी ॥ ऐसें ऐकतां पिनाकपाणी ।। काय हांसोनि बोलत ।।१७।।
‘घे हे दूध पी. अरे हे अमृत आहे. ते ब्रह्माविकांनाही मिळत नाही”. त्यावर कुमार त्यास म्हणायचा, “जा मी नाही तुझे उष्टे दूध पिणार.” ।।९।। आपल्या मातेकडे त्याची तक्रार करीत षडानन म्हणायचा, “आई, हा लांबनाक्या बघ मला त्याचे उष्टे दूध पी म्हणतो. तू त्याला काहीतरी सांग.”।।१०।। का मीच याची ही लांब सोंड धरून यास खाली पाडू? आई, ह्याचे हे असे नाक इतके लांब कसे गं? तू हे असे का केलेस? ।।११।। चंद्र, सूर्य, इंद्र यांच्यासारखे देव बघ. ते किती सुंदर आणि हा कसला असा मोठ्या कानांचा आणि लांब नाकाचा आणि त्याचा एकच दात बघ कसा बाहेर आलेला आहे. ।।१२।। तू या अशा विचित्र पोराला असा कसा जन्म दिलास? हे ऐकताच भगवान शंकरांना मोठे हसू येत असे, तेव्हा भवानीपण हसत असे. ।।१३।। एकदा स्कंद मातेस म्हणायचा, “आई, याला खाली ठेव आणि मला दूध दे, ” तेव्हा मातेने गणेशास खाली बसविले. ।।१४।। तिने नास मांडीवर घेतले आणि ती त्यास दूध पाजू लागली, तेव्हा त्याची इतर पाच मुखे रडू लागली. ।।१५।। ते पाहून गजानन पोट धरून हसू लागला. तो म्हणाला, माते, अगं असा कसा तुझा मुलगा, हाका मारून आक्रोश करणारा ? ।।१६।। एक स्तन तर तू त्याच्या एका मुखात दिलास, आता आणखी पाच स्तन तू कुठून आणशील? हे ऐकून शंकर हसून म्हणाले, ।।१७।।
काय म्हणतो गजवदन ।। ऐसा कां प्रसवलीस नंदन ।। यावरी अपर्णा सुहास्यवदन ।। प्रतिउत्तर देतसे ॥१८॥ म्हणे हा तुम्हांसारिखा झाला नंदन ।। तुम्ही पंचमुख हा षण्मुख पूर्ण ।। ऐकतां हासला त्रिनयन ।। पुत्र पाहोन सुखावे ।।१९ ॥ यावरी षण्मुख आणि गणपती ।। लीलाकौतुकें दोघे क्रीडती ।। विनोदें कलह करिती ।। अंतरीं प्रीति अखंड ॥ २० ॥ दोघेही रडतां ऐकोनी ।। धांवोनि आली जगत्रयजननी ।। वक्रतुंडासी हृदयीं धरोनी ॥ म्हणे बाळा काय झालें ॥२१॥ तंव तो म्हणे स्कंदें येवोन ।। अंबे धरिले माझे कर्ण ।। बोलिला एक कठिण वचन ।। तुझें नयन सान करि ।। २२ ।। जगदंबा मग हांसोन ।। अग्निसंभूताप्रति बोले वचन ।। गजवदनासी कठिण भाषण ।। ऐसें कैसें बोललासी ॥२३॥ स्कंद म्हणे तर्जनी उचलोन ।। येणें मोजिले माझे द्वादश नयन ।। यावरी हैमवती हांसोन ।। एकदंताप्रति बोलत ॥ २४ ॥ म्हणे हें तुवां अनुचित केलें ।। कुमाराचे नयन कां मोजिले ।। यावरी नागानन बोले ।। ऐक माते अन्याय याचा ।। २५ ।। माझी गुंडा लंबायमान ।। येणें मोजिली चवंगे घालून ।। अन्याय हा थोर त्रिभुवनांहून ।। करीं ताडण अंबे यासी ॥ २६ ॥
हा गजानन काय म्हणतो ते ऐकलं का? तू या अशा मुलाला कसा काय जन्म दिलास, त्यावर भवानी हसून म्हणाली. ।।१८।। अहो, त्यात नवल ते काय? तुम्ही पंचमुखी तर हा मुलगा षड्मुखी! हे ऐकून भगवान हसत आणि आपल्या त्या दोन्ही पुत्रांना पाहून सुखावीत असत. ।।१९।। याप्रकारे दोघेही कधीकधी मजेत खेळत, कधी ते एकमेकांची चेष्टामस्करी करीत, तर कधी चिडवाचिडवी, पण त्यांचे एकमेकांवर मात्र खूप प्रेम होते. ।।२०।। एकदा पार्वती गणेशाचे रडणे ऐकून धावत बाहेर आली आणि तिने त्यास उचलून कडेवर घेतले. ती त्यास विचारू लागली, “बाळा गणेशा, काय झाले, तू का रडत होतास?”।।२१।। त्यावर तो तक्रार करीत म्हणाला, “आई, या स्कंदाने माझे कान धरले आणि तो मला विचारू लागला की, तुझे हे कान असे सुपासारखे मोठे आणि डोळे मात्र असे बारीक का?” ।।२२।। तेव्हा आई हसायची आणि ती रागावून स्कंदास विचारायची की, “तू गणेशास असे का बोललास?”।।२३।। त्यावर स्कंद आपल्या हाताचे बोट उंचावून म्हणायचा, “आई, हा पण काही कमी नाही. ह्याने माझे बारा डोळे मोजले.” त्यावर पार्वती गणेशासही म्हणायची. ||२४|| “गणेशा, तुझे पण हे वागणे बरोबर नाही. तू त्याचे डोळे का बरं मोजलेस?” त्यावर गणेश म्हणायचा. “आई आधी तू त्याचा अपराध काय ते तर ऐक.”।।२५।। अन् हा स्कंद माझी सोंड बोटे घालून मोजतो, हे चूक नाही का? तू त्याला चांगलेच मारायला हवेस.”।।२६।।
यावरी स्वामी कार्तिक बोलत ।। अंबे माझे येणें मोजिले हस्त ।। बावरी करिमुख बोलत ।। मैनाकभगिनी ऐक पां ॥२७॥ याचा अन्याय एक सांगेन ।। ऐकतां तूं यासी करिसील ताडण ।। नगात्मजा आणि ॐ त्रिलोचन ।। सावधान होऊन ऐकती ॥ २८ ॥ इभमुख म्हणे भेडसावून ।। मज बोलिला हा न साहवे वचन ।। तुझें पोट कां थोर पूर्ण ।। मोदक बहू भक्षिले ॥ २९ ॥ ऐसें ऐकतां मृडानी ।। दोघांसी हृदयीं धरी प्रीतीकरूनी ।। दोघांसी प्रिय वस्तु देऊनी ।। समजाविलें तेधवां ॥३०॥ यावरी मदनांतक पाहे ।। सिंहासनीं बैसला आनंदमयें ।। जगदंबा मुखाकडे पाहे ।। हास्यवदन करूनियां ।। ३१ ।। यावरी विरुपाक्ष बोलत ।। कां हो हास्य आलें अकस्मात ।। यावरी त्रैलोक्यमाता म्हणत ।। नवल एक दिसतसे ॥ ३२ ॥ तुमच्या जटामुकुटांत ।। ललनाकृति काय दिसत ।। तुमची करणी अद्भुत ।। पद्मजबिडौजां समजेना ॥३३॥ कैलासपति म्हणे इभगमने ।। हरिमध्ये मृगशावकनयने ।। मस्तकीं जळ धरिलें वरानने ।। बिंबाधरे पिकस्वरे ।। ३४॥ यावरी चातुर्यसरोवरमराळी ।। हेरंबजननी म्हणे कपाळमौळी ।। जळांतरीं स्त्रीचें वदन ये वेळीं ।। दिसतें मज भालनेत्रा ।। ३५ ।।
त्यावर कार्तिकय म्हणायचा की, “आई, याने माझे हात मोजले.” तेव्हा पुन्हा गणेश आपल्या मातेस म्हणाला. ||२७|| “माते, याचा जर आणन्त्री एक अपराध मी तुला सांगितला तर नक्कीच तू याला चांगलाच चोप देशील”. तेव्हा आता गणेश काय सांगणार हे शिव पार्वती सावध होऊन ऐकू लागले. ।। २८ ।। गणेश म्हणाला, ‘पिताजी, माताजी, हा जे काही मला म्हणाला ते मला सहन होणारे नाही. हा मला असे म्हणाला की, तू खूप मोदक खाल्ले आहेस, म्हणून तुझे पोट इतके मोठे आणि गोल गरगरीत झाले आहे. “||२९|| हे ऐकताच त्या मृडानीने आपल्या दोन्ही बालकांना मोठ्या प्रेमाने जवळ घेतले. त्यांना प्रिय असणारी वस्तू दिली आणि त्यांची तिने गोड शब्दात समजूत काढली. ||३०|| असो, एकदा असे घडले की, भगवान शंकर हे आसनावर विराजमान असताना त्यांच्याकडे पाहता पाहता पार्वती अचानक हसू लागली. ||३१|| तेव्हा शंकरांनी तिला हसण्याचे कारण विचारले. ती म्हणाली, “अहो, आज मी एक नवल पाहिले”. ||३२|| ते काय हे सांगत तिने सांगितले की, मला तुमच्या जटाभारात एका स्रीचा चेहरा दिसतोय. खरंच तुमची करणी अद्भुत बरं! ती देवादिकांनाच काय, पण प्रत्यक्ष ब्रह्मदेव, इंद्र ह्यांनाही कळायची नाही. ||३३|| तेव्हा कैलासपती म्हणाले, “हे गजगामिनी, हे सिंहकटी, हे हरिणाक्षी, अगं मी तर डोक्यावर जल धारण केले आहे.” ||३४|| त्यावर चतुर अंबा त्यांना म्हणाली, “भगवन, पण मला तर तिथे एका स्त्रीचे मुख दिसते आहे हे कसे?”।।३५।।
यावरी बोले कैलासराज ।। विद्रुमाधरे मुख नव्हे तें वारिज ।। शोभायमान सतेज ।। टवटवीत दिसतसे ।। ३६ ।। यावरी सजलजलदवर्णा ।। स्कंदमाता म्हणे पंचदशनयना ।। कुरळकेश व्याघ्रचर्मवसना ।। कृष्णवर्ण दिसताती ॥ ३७ ॥ यावरी बोले पंचवदन ।। कमळीं मिलिंद घे सुगंध बैसोन ।। नसतेंचि पुससी छंद घेवोन ॥ रमारमण-सहोदरी ॥३८॥ यावरी बोले भुजंगत्रिवेणी ।। कमळासी भोंवयां कां खट्वांगपाणी ।। तुमच्या मायेची विचित्र करणी ।। आम्नाय श्रुती नेणती ॥३९॥ यावरी बोले हिमनगजामात ॥ भुकुट्या नव्हे पाहें त्वरित ।। सलिललहरी तळपत ।। दृष्टि तरळली तुझी कां हो ।।४० ।। यावरी सकळ प्रमदांची स्वामिनी ।। बोले कंबुकंठी कमंडलुस्तनी ।। म्हणे कैरवास नेत्र पिनाकपाणी ।। कां हो दिसती आकर्ण तें ॥४१ ।। यावरी शफरीध्वजदहन बोलत ।। कमळाभोंवतें नीर बहुत ।। नेत्र नव्हेत मीन तळपत ।। हंसगमनें निरखीं बरें ॥ ४२ ॥ जे अनंतगुणपरिपूर्ण वेल्हाळ ।। त्रिपुरहरसुंदरी बोले प्रेमळ ।। म्हणे राजीवा स्तनयुगुळ ।। कमंडलु ऐसे दिसती कां ॥४३ ॥ यावरी बोले त्रिशूळपाणी ।। ऐकें वसुधाधरनंदिनी ।। ते स्तन नव्हेती दोन्ही ।। विलोकूनि पाहें बरें ।॥४४ ।।
त्यावर भगवान शंकर म्हणाले, “प्रिये, ते कुणा स्त्रीचे मुखकमळ नाही, तर डोक्यावरच्या जलातले ते खरोखरच एक कमळ असेल. “||३६|| तेव्हा पार्वती म्हणाली, “देवा, पण मला तर त्या स्त्रीचे केस चांगले काळेभोर दिसत आहेत.” ||३७|| त्या तिच्या शंकेचे निरसन करताना भगवान म्हणाले, अगं, त्या कमळावर भुंगा सुगंध लुटण्यासाठी बसला असेल, तू उगाच नाही त्या शंका घेऊ नकोस. ||३८|| तेव्हा ती अंबा भवानी म्हणू लागली की, तसे जर असेल तर मग त्या कमळाला भुवया कशा, डोळे कसे, नासिका कशी, ओठ कसे? ।।३९।। तेव्हा शिवांनीही त्या भुवया नाहीत, तर ते कमळाभोवतालचे पाणी आहे. तुझी नजर तरळली तर नाही ना? ।।४० ।। तेव्हा ती सौंदर्यवती शिवसुंदरी म्हणाली, पण मग त्या कमळाला कानापर्यंत लांब अए नेत्र कसे असतील ! ।।४१।। त्यावर तो मदनांतक म्हणाला, देवी, ते पाण्यातले मासे आहेत. हंस आहेत. हवं तर तू पुन्हा नीट निरखून पाहा. ।।४२।। तेव्हा काहीसे हसत ती अनंत गुणांची स्वामिनी म्हणाली, नाथ, त्या तुमच्या कमळाला कमंडलूसारखी स्तनांची जोडी कशी काय आहे बरं? ।।४३।। या तिच्या शंकेचे निराकरण करताना त्रिशूलपाणी म्हणाले, हे भवानी, अगं तू नीट निरखून बघ, तुला दिसतात ते तिचे दोन स्तन नाहीत. ।।४४।।
गंगादाचे दोन्ही तीरीं ।। चक्रवाकें बैसलीं साजिरीं ।॥ दुर्गा म्हणे मदनारी ।। बहुत साहित्य पुरवीतसां ।।४५ ।। एकाचें अनेक करून ।। दाखविलें हैं त्रिभुवन ।। तुमचें मौनेंच धरावें चरण ।। बोलतां अप्रमाण न म्हणावें ॥४६॥ मग मांडूनियां सारीपाट ।। खेळती दाक्षायणीनीळकंठ ।। ज्याचे खेळ ऐकतां वरिष्ठ ।। भक्त होती त्रिजगीं ॥ ४७ ॥ दोधें खेळतां आनंदघन ।। तों आला कमलोद्भवनंदन ॥ ब्रह्मवीणा वाजवून ॥ करी स्तवन अपार ॥ ४८ ॥ मग क्षण एक स्वस्थ होऊनी ॥ खेळ विलोकी नारदमुनी ।। म्हणे पण केल्यावांचूनी ।। रंग न ये खेळातें ॥४९ ॥ दोघांसी मानलें तें बहुत ।। मग पण करूनियां खेळत ।। जिंकील त्यासी एक वस्त ।। आपुली द्यावी निर्धार हा ।। ५० ।। तों प्रथम डाव तेच क्षणीं ।। जिंकिती झाली मेनकानंदिनी ।। व्याघ्रांबर घेतलें हिरोनी ।। नारदमुनि हांसतसे ।।५१ ।। दुजाही डाव जिंकितां भवानी ॥ घेतलें गजचर्म हिरोनी ।। एकामागें एक तेच क्षणीं ।॥ दहाही आयुधें घेतलीं ॥५२ ।। जो तो डाव जिंकी भवानी ।। सर्व भूषणें घेतलीं हिरोनी ।। शेवटीं कौपीनही सांडोनी ।। शंकर झाला दिगंबर ॥५३॥
अगं ती गंगेच्या काठावर बसलेली गोजिरवाणी चक्रवाके आहेत. तेव्हा ती म्हणाली, वा देवा, तुम्ही खूप काही माहिती पुरवली बरं. ॥४५॥ एकाचे वर्णन करताना तुम्ही अनेकांचे दर्शन घडविलेत. बरं तुमच्या पुढे बोलायचे तरी कास्य? त्यापेक्षा आपलं मौन धरलेच चांगलं कारण तुम्ही जे म्हणता ते असत्यही म्हणता येत नाही. ।।४६।। मग शिव आणि पार्वती हे दोघे सारीपाट मांडून खेळू लागले. ज्यांच्या खेळी ऐकून भक्त चकित होतात. त्या खेळाचे वर्णन ऐकणारे जगी श्रेष्ठ ठरतात. ।।४७।। ते दोघे त्या सारीपाटाचा खेळ खेळत असताना अचानक तिथे नारदांची स्वारी आली आणि ते शिवस्तुती गाऊ लागले. ।।४८ || नारदांनी थोडा वेळ तिथे उभे राहून तो शिवपार्वतीचा खेळ पाहिला आणि ते म्हणाले, हे काय, खेळात कसली तरी बोली लावल्याशिवाय त्या खेळाला रंगत येत नाही. ।।४९ ।। नारदांचे ते बोलणे ऐकले आणि मग शिव-पार्वती हे पण लावून तो सारीपाटाचा खेळ खेळू लागले. ॥५०॥ जो जिंकेल त्याला दुसऱ्याने आपली वस्तू द्यायची असे निश्चित झाले.।।॥५१।। खेळ पुढे सुरू झाला. भवानीने पहिलाच डाव जिंकला. तेव्हा तिने शिवाचे व्याघ्रांबर काढून घेतले. ते पाहून नारदांना हसू आले. ।।५२।। दुसरा डाव झाला तोही भवानीने जिंकला आणि तिने यावेळी शिवाकडून त्यांचे गजचर्म आणि दहा आयुधेही काढून घेतली. ।॥५३॥ होता होता असं घडत गेले की, खेळलेला प्रत्येक डाव हा भवानीच जिंकत गेली आणि तिने शंकराकडून सर्व काही काढून घेतले, शेवटी तर तिने त्यांना अगदी दिगंबर केले. ।।५३।।
सुरभिपुत्र जिंकिला ।। तोही देवीनें आपुला केला ।। नारद गदगदां हांसिन्नला।। काय बोलिला शिवासी ॥५४॥ म्हणे स्त्रीनें जिंकिलें पण करून ॥ गेला तुझा महिमा पूर्ण ।। सृष्टि अवघी मायाधीन ।। तूं निर्गुण निर्विकार ॥ ५५ ॥ चराचर आहे मायाधीन ।। तुज इणें दिधलें सगुणपण ।। येरवीं तूं अव्यक्त पूर्ण ॥ तुज कोण पुसत होतें ॥ ५६ ॥ एवं तूं मायाधीन झालासी पूर्ण ।। आतां भक्तांसी कैसे दाविसी वदन ।॥ ऐसें ऐकतां कतां भाललोचन ।। गेला रुसून घोर वना ॥५७॥ इतुकें कृत्य करून ॥ गेला तेथूनि ब्रह्मनंदन ।। शंकरें सर्वसंग टाकून ॥ निरंजनीं वास केला ॥ ५८ ॥ शोधितां न पडे कोणासी ठायीं ।। योगी ध्याती सर्वदा हृदयीं ।। न कळे मूळाग्र कोठें कांहीं ।। जाति कुळ नसेचि ।।॥५९ ।। नामरूपगुणातीत ।।गोत्रवर्णआश्रमविरहित ।। चहूं देहांसी अतीत ।। कोणा अंत न कळेचि ॥ ६० ॥ असो जगदंबा सख्या घेवोनियां ।। वनासी चालिली शोधावया ।। गिरिकंदरीं मठ गुहा शोधूनियां ।। भागली बहुत जगदंबा ।।६१ ॥
पुढच्या डावात तिने त्यांच्याकडून त्यांचे वाहन जो नंदी तो पण काढून घेतला. तेव्हा नारदांना हसू अनिवारं झाले. ते म्हणाले. ।।५४।। अहो देवाधिदेवा, काय हे एका स्त्रीने तुमचे सर्वस्व जिंकावे! अहो, कुठे गेला तुमचा महिमा? ही सर्व सृष्टी तुझ्या मायेआधीन ना? तू निर्गुण, निराकार श्रेष्ठ असे परब्रह्म ना?।।५५।। अरे हे सर्व चराचर हे मायाधीन आहे हे खरे; पण हिने तुला सगुण रूप दिले, तुला व्यक्त रूपात हिने आणले नाहीतर तू काय अव्यक्त की नाही तर मग तुला कोण विचारते? ।।५६।। हे महादेवा, तू आता पूर्णपणे या मायेच्या आधीन झाला आहेस. तुला हिने पूर्ण नागविले आहे. आता तू तुझ्या भक्तांना तरी कसे तोंड दाखविणार? नारदाचे हे बोलणे ऐकले आणि भोलेनाथांना मोठा क्रोध आला. ते रागाच्या भरात रुसून दूर वनात निघून गेले. ।।५७।। हे असे कळ लावण्याचे कार्य अगदी चोख करून नारद निघून गेले. आपण एका स्त्रीकडून पराभूत झालो या गोष्टीचा शिव शंकरांना मोठा विषाद वाटला. ते तिथून दूर दूर निरंजन वनात निघून गेले. ।।५८ ।। त्यांचा शोध घेऊनही ते कोणाास सापडेनात. योग्यांनी ध्यान लावून पाहिले तर ज्याला आदि अंत नाही तो शिव कोणासही कोठेही सापडेना, कारण त्याला जातकुळच नाही ना! ।।५९।। अहो, जो नामरूप गुणातीतं आहे, जो गोत्र, वर्ण, आश्रमाच्याही पलीकडला आहे, जो चारी देहांच्याही पलीकडचा आहे, तो शिव कोणास आणि शोधून तरी कसा व कोठे सापडणार. ।।६०।। असो, तरीही पार्वती आपल्या सख्यांना घेऊन शंकरांचा शोध घेण्यासाठी गिरीकंदरात फिरू लागली. तिने अनेक गुहा, मठ, कडेकपारी शोधल्या, ती त्यांचा शोध घेऊन पार थकून गेली.।।६१।।
सर्वही तीर्थे शोधिलीं सवेग ।। बहुतांसी पुसिला त्याचा मार्ग ।। जो शोधितां अष्टांगयोग ।। योगियां ठायीं पडे ना ॥६२॥ पंचाग्निसाधन धूम्रपान ।। जटाधारी नग्न मौन । एकीं सदा झांकिले नयन ।। एक गगन विलोकिती ॥ ६३ ॥ एक उभेचि निरंतर ।। एक घेती वायूचा आहार ।। त्यांसही पुसतां श्रीशंकर ।। कोठें आहे न बोलती ।॥६४॥ एक करिती सदा यज्ञ ।। एक करिती हिंसा बलिदान ।। परी तेही धुरें डोळे भरून ॥ कष्टी होती सर्वदा ॥ ६५ ॥ एक चौसष्ट कळा दाविती ॥ एक चौदा विद्या मिरविती ।। एक वादविवाद निगुती ।। करितां बहुत भागले ॥ ६६ ॥ एक सांगती पुराण ।। एक नाचती उड्या घेऊन ॥ लोकांस सांगती उपदेशज्ञान ॥ परी उमारमण दुरावला ॥ ६७ ॥ एक नाशिती कुश मृत्तिका उदक ॥ म्हणती आम्ही इतुकेनि पावन देख ।। त्यांसही पुसतां कैलासनायक ।। न पडे ठायीं तत्त्वतां ॥६८॥ जे आदिमाया विश्वजननी ।। अनंतशक्तींची स्वामिनी ।। ते श्रमली नाना साधनीं ।॥ इतरांची कहाणी काय तेथें ॥६९॥ ठायीं पडावया शिवस्वरूप ।। क्षीराब्धिजापति करी तप ।। मघवा द्रुहिण करिती साक्षेप ।। निशिदिनीं याचिलागीं ॥७० ।।
शिवाच्या शोधात तिने तीर्थक्षेत्रे पाहिली, अनेकांकडे कोणी शिवास कोठे पाहिले का म्हणून चैकशी केली. अष्टांग योग्यांनाही शिवाचा ध्यान लावून शोध घेण्यास सांगितला. ।।६२।। पंचाग्निसाधन, धूम्रपान उपासक, जपीतपी, नग्न आणि मौनधारी साऱ्यासाऱ्या कधी उघड्या डोळ्यांनी, तर कधी डोळे मिटून त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करीत आकाशाकडे डोळे लावले होते. ।।६३।। कोणी अखंड एकाच पायावर उभे होते, कुणी केवळ वायू भक्षण करीत होते, पण त्या कुणासही विचारून त्यांना काही भगवान शिव कोठे आहेत ते सांगता येत नव्हते. ।। ६४ ।। यज्ञयागाची आणि वलिसमर्पणाच्या उपाधीत अडकलेल्यांना त्यांच्या डोळ्यात यज्ञाचा धूर गेल्याने शिवाचा ठावठिकाणा दिसत नव्हता. ।। ६५।। कोणी चौदा विद्या आणि चौसष्ट कला याचा टेंभा मिरवित होते, तर काहीजण तर्कवितर्काचा वाद घालीत होते. ।।६६।। कोणी पोथ्या पुराणे सांगत होते, कोणी स्वानंदात नाचत होत, ओणी इतरांचा उपदेशामऋत पाजत होते, पण तो शिव कोठे आहे हे कोणासच सांगता येत नव्हते. ।।६७।। कोणी कुश, माती आणि पाणी यांची नासाडी करीत होते, तर काहीजण आम्हीच पावन म्हणून मिरवित. पण त्यांनाही शिव सापडत नव्हता, त्याचा कोणासच ठाव ठिकाणा लागत नव्हता. ।।६८।। जिथे ती आदिशक्ती साक्षात भवानीही प्रयत्न करून तिलाच जर तिचा देव सापडत नव्हता, तर इतरांचा पाड तो काय लागणार ? ।।६९।। तिकडे तर स्वतः लक्ष्मीचा पती नारायण हासुद्धा ध्यान लावून शिव शोध घेत होता, तर ब्रह्मदेव, इंद्रही रात्रदिवस त्या शिव शोधाच्या कामात होते. ।।७०।।
ऋग्वेद स्थापित कर्म ।। यजुर्वेद बोले ज्ञान निःसीम ।। उपासनामार्ग उत्तम ।। अथर्वण स्थापीतसे ।।७१ ।। सामवेद सांगे गायन ।। न्यायशास्त्रीं भेद गहन ।। म्हणती ईश्वर समर्थ जीव सान ।। त्यांचे पद न पावती ते ॥७२॥ मीमांसक स्थापिती कर्ममार्ग ।। सांख्य प्रकृति पुरुषविभाग ।। पातंजली सांगती योग ।। शब्दविभाग व्याकरणीं ॥७३॥ सर्व निरसूनि उरलें उत्तम ।। वेदांती म्हणती तेंचि ब्रह्म ।। तो शिव ब्रह्मानंद परम ।। वेदशास्त्रां अगम्य जो ॥ ७४ ॥ त्या शिवाचें नाम घेवोनि ।। जगदंबा बाहे घोर वनीं ।। सकळ अभिमान टाकुनी ।। वल्लभा मी शरण तूंतें ॥ ७५ ॥ सकळ तत्त्वें शोधितां साचार ।। शेवटीं होय साक्षात्कार ।। तैसा हिमाचळीं त्रिपुरहर ।। विलोकिला जगदंबेनें ॥ ७६ ॥ तो स्वात्मसुखीं झाला तल्लीन ।। झांकिले असती पंचदश नयन ॥ देवी म्हणे श्वशुरगृहीं येऊन ।। रहिवास केला असे ॥ ७७ ॥ अपर्णा मनीं विचारी ।। याचि रूपें जवळी जाऊं जरी ।। तरी मजवरी ये अवसरीं ।। क्रोधायमान होईल ।।७८ ।।
ऋग्वेद कर्माची, यजुर्वेद ज्ञानाची, अथर्ववेद उपासनेच्या मार्गाची स्थापना करतात. ||७१|| सामवेद हा गायन करती न्यायाची शाखे गहन भेदाची उकल करताना सांगतात की तो परमात्मा हा समर्थ आहे, जीव हा लहान आहे असमर्थ आहे म्हणून न्यास ईश्वराचा ठावठिकाणा लागत नाही॥७२॥ मीमांसक हे कर्ममार्गाचा पुरस्कार करतात, सांख्यशास्त्रवादी पुरुष प्रकृती हा भाग मांडतात. पातंजली योगमार्गाचे प्रतिपादन करतात, व्याकरण है शब्दांची विविध रूपे सांगतात. ॥ ७३ ॥ या सर्वांचे निराकरण करून खाली जे निव्वळ शिल्लक उरते ते ब्रह्म असे वेदांती म्हणतात. तो स्वानंद सुख देणारा शिव हा वेद शास्रनाही अनाकलनीय असा आहे. ॥७४॥ अशा त्या दुरावलेल्या आपल्या पती परमेश्वरासाठी आर्त हाका मारीत फिरू लागली. हे प्राणनाथ, तुम्ही कोठे आहात, मी तुम्हास शरण आले आहे, असे ती म्हणात होती. ॥७५॥ ज्याप्रमाणे सर्व तत्वे शोधून पाहिल्यावर अखेरीस आत्मतत्त्वाचा साक्षात्कार होतो, त्याप्रमाणे सर्वत्र शोध घेतल्यावर सती पार्वतीस तिची प्राणनाथ हे शेवटी हिमालयाच्या परिसरात सापडले. ।। ७६|| ते आपल्याच समाधी सौख्यात मग्न होते. त्यांनी आपले डोळे झाकून घेतले होते. त्यांना पाहून देवी पार्वती मनातल्या मनात म्हणाली, “अच्छा, म्हणजे यांनी इथे सासूरवाडीस येऊन मुक्काम केलेला दिसतोय. ॥७७॥ तेव्हा एकदा असाही विचार केला की, मी या रूपात त्याच्यासमोर जाणे इष्ट ठरेल का? का तो परत मला पाहून रागावेल ? ।। ७८।।
मग भिल्लीचा वेष धरून ।। मयूरपिच्छांचें केलें वसन ।। अनुपम वेष धरून ।। मुरहरभगिनी चालिली ॥७९॥ अनंत कमळभवांडमाळा ॥ त्रिभुवनसुंदरी गुंफी हेळा ॥ तिनें स्मरहर मोहिला ।। नृत्यगायनें करूनियां ॥ ८० ॥ अनंत शक्ती भोंवत्या विराजती ।। विमानीं अष्टनायिका तन्मय होती ।। किन्नर गंधर्व आश्चर्य करिती ।। गायनरीती ऐकूनियां ॥ ८१ ॥ वैरभाव वनचरें विसरती ।। आहार त्यजिला तन्मय होती ।। नद्यांचे जलप्रवाह खुंटती ॥ पक्षी विसरती देहभाव ॥ ८२ ॥ निश्चळ झाला पवन ।। विधुकुरंग गेला वेधोन ॥ कुंभिनीभार सांडून ।। फणिपति वरी येऊं पाहे ॥८३॥ आंगींचा सुटला दिव्य आमोद ।। देव पाहती होवोनि षट्पद ।। नृत्य करितां भाव विविध ।। दावी नाना प्रकारींचे ॥८४॥ शीतलत्व दाहकत्व सांडोन ॥ वाटे ताटंक झाले विधुचंडकिरण ॥ देवललना म्हणती ओंवाळून ।। इजवरून जावें समस्तीं ।॥ ८५ ॥ आदिजननीचें अपार लाघव ॥ नेणती शक्रादि कमलोद्भव ।। दिव्य हिरेखाणींचें वैभव ।। दंततेजें झांकिलें ॥८६॥ दंतपंक्तींचा झळकतां रंग ॥ खडे ते हिरे होती सुरंग ॥ तनूचा सुगंध अभंग ।। नभ भेदूनि वरी जाय ॥८७॥
मग तिने काहीसा मनाशी विचार केला आणि तिने एका सुंदर अशा भिल्लीनीचे रूप धारण केले आणि ती विष्णूची बहीण त्यांच्यापुढे जाण्यास निघाली. ।।७९।। जिने स्वसामर्थ्याने अनंत ब्रह्मांडाच्या माला सहज गुंफल्या आहेत, ती त्रिभुवन सुंदरी त्या धानस्थ शिवासमोर त्या रूपात गेली आणि तिने अद्भुत नृत्यगायन करून त्यास मोहित केले. ।।८० ।। त्यावेळी तिचे ते नृत्य पाहण्यासाठी आकाशात अष्टनायका गोळा झाल्या होत्या, तर तिचे गायन ऐकून गणगंधर्वही तटस्थ झाले होते. ।॥८१॥ पार्वतीचा तो नृत्याविष्कार पाहून वनातले प्राणी वैरभाव विसरले. कोणी कोणी तर अन्नापाणी ही घ्यायचे विसरले, नद्यांचे प्रवाह बदलले, पक्षी देहभान विसरले.।॥८२॥ वारा निश्चल झाला, चंद्ररूपी हरीण मोहित झाले, पृथ्वी शेषनागाच्या फण्यावर डोलू लागली. ॥८३॥ तिच्या अंगीचा दिव्य सुवास घेण्यासाठी देव भुंगे होऊन तिथे गुंजारव करू लागले. तिने नृत्य करताना अनेक मोहक हावभाव केले.।।८४।। चंद्रसूर्याची किरणे त्यांचे स्वभाव विसरून तिच्या कानीची कर्णफुले झाले. देवस्त्रिया म्हणू लागल्या की, हिच्या रूपावरून काय बरं ओवाळून टाकावे ? ।।८५ ।। त्या आदिजननीचे रूप ते काय सांगायचे. ते देवदेवता आणि ब्रह्मदेवासही आकळत नव्हते. ।।८६।। तिच्या दंतपंक्तीच्या प्रकाशाने खडेही हिऱ्यासारखे चमकत होते. तिच्या अंगीच्या सुवासाने सारा आसमंत सुगंधित झाला होता. ।।८७।।
पदमुद्रा जेथें उमटत ।। सुवास कमळे तेथें उगवत ।। जेथींच्या परागास वेधोनि वसंत ।। प्रदक्षिणा करी प्रीतीनें ।।८८ ।। अनंतविद्युल्लताकल्लोळ ।। तैसें स्वरूपतेज निर्मळ ।। नेत्र उघडोनि जाश्वनीळ ।। पाहता झाला तेधवां ।।८९ ।। पायीं पैंजण नूपुरें रुणझुणती ।। त्यांत क्षुद्रघंटा रसाळ गर्जती ।। करींचीं कंकणें झणत्कारती ।। नृत्यगतीसरसींच ॥ ९० ॥ भ्रूलताचाप चढवूनी ।। कामशत्रु विंधिला नयनकटाक्षबाणीं मनकुरंग पाडिला धरणीं ।। सुरवरां करणी न कळेचि ॥ ९१ ॥ दिव्य स्वरूप विलोकितां पूर्ण ।। पंचबाणें व्यापिला पंचवदन ।। तप ध्यान विसरून ।। वृत्तांत पुसे तियेतें ॥९२ ॥ म्हणे तूं नारी कोठील कोण ॥ कामानळ शांतवीं वर्षोनि घन ।। तुझें स्वरूप लावण्य ।। त्रिभुवनीं ऐसें दुजें नाहीं ।। ९३ ।। तुझा वदनइंदु विलोकून ।। चकोर झाले माझे नयन ।। आतां वरीं मजलागून ।। तुजआधीन मी झालों ।॥९४।॥ यावरी बोले भिल्लिणी ।। उमेऐसी ललना टाकूनी ।। कां बैसलासी घोर वनीं ।। कैलासभुवन त्यजोनियां ॥९५ ॥ मी तों परनारी निश्चित ।। न वरीं न घडे कदा सुरत ।। तुवां मन जिंकिलें नाहीं यथार्थ ।। तरी तपस्वी कैसा तूं ॥९६ ॥
तिच्या पायाचे ठसे उमटणाऱ्या जागी कमळे उगवत होती. वसंत ऋतू तिच्याभोवती प्रदक्षिणा घालीत होता. ।। ८८ ।। असंख्य विजांचे तेज एकवटावे असे तिचे सौंदर्य असल्याने त्याच्या तेजाने शिवानेही आपले नेत्र उघडले आणि एकवार तिच्याकडे पाहिले. ।। ८९ ।। तेव्हा तिच्या पायातील पैजणांची रुणझुण, तिच्या कमरेच्या पट्ट्यातील घंटांचा मंजूळ स्वर, काकणांची किणकिण आणि तिचा नृत्याविष्कार सर्वच अलौकिक असे होते. ।।९० ।। तिच्या नेत्रकटाक्षांनी शिवाच्या मनरूपी हरिणास घायाळ केले. ते समाधीतून खाली आले, ही त्या आदिशक्तीची करणी सर्वांनाच अनाकलनीय अशीच होती. ।।९१।। तिचे ते दिव्य रूपसौंदर्य पाहून शिवाचे चित्त विचलित झाले, त्यास आपल्या वैराग्याचा, तपाचा विसर पडला आणि तो मोहित होऊन तिची विचारपूस करू लागला. ।।९२|| त्याने तिला विचारले, “हे सुंदरी, तू कोण आहेस? तू कोठून आलीस? तुझ्या रूपसौंदर्याने मी वेडा झालो आहे. तू माझे मन शांत कर.”।।॥९३।। तुझा मुखचंद्रमा पाहून माझे नेत्र चकोर वेडे झाले आहेत. मी तुझ्यावर मोहित झालो आहे, तू माझा स्वीकार कर. मी तुझ्या आधीन झालो आहे. ।।९४।। त्यावर ती भिल्लीण त्यास म्हणाली, “अरे सदाशिवा, पण तुला ती उमेसारखी सुंदर पत्नी असताना तू हा असा सर्वसंगपरित्याग करून इकडे वनात येऊन तप काय करीत बसला आहेस ? ।।९५।। अरे मी तर परस्त्री आहे. मला आपलेसे करून तू माझ्याशी कामक्रीडा कशी काय करू शकतोस? अरे ज्याने आपले काम, क्रोध जिंकले नाही तो कसला योगी? तो कसला तपस्वी? ।।९६।।
बावरी बोले पिनाकपाणी ॥ मी दुर्गेवरी आलों रुसोनी ॥ तिचें मुख न पाहें परतोनी ।। नांव स्वप्नीं न बेंचि ॥९७॥ यावरी भिल्लिण बोलत ।। पति माझा रागिष्ठ अत्यंत ॥ हे त्रिभुवन जाळील क्षणांत ।। अणुमात्र गोष्ट कळतांचि ॥९८॥ यावरी बोले जगन्नाथ ।। ती बहुकाळाची कठिण अत्यंत ।। दक्षयागी उडी घालीत ।। क्रोध अद्भुत तियेचा ॥९९॥ पुढे गेली पर्वताचे पोटीं ।। मागुती तिसी वरीं मी धूर्जटी ।। परी ती कौटाळीण मोठी ॥ अतिकपटी मी जाणें ॥१००॥ भिल्लिण म्हणे ऐकिलें कानीं ।। तूं कपटी आहेसी तिजहूनी ।। शिरीं ठेविली स्वर्धनी ॥ भोळी भवानी अत्यंत ।।१०१।।॥ दुर्गेऐसी पट्टराणी ।। टाकूनि कां हिंडसी बनीं ।। परललना देखोनि नयनीं ।॥ गळां येवोनि पडों पाहसी ॥१०२॥ मागुती बोले कैलासनाथ ॥ क्षणांत सृष्टी घडामोड करीत ॥ शुंभनिशुंभादि दैत्य ॥ युद्ध करूनि मर्दिले तिणें ॥१०३॥ ती जरी येथे आली धांवोन ॥ उदंड प्रार्थना केली पूर्ण ॥ तरी मी नच जाय परतोन ॥ कैलासासी निश्चयें ॥१०४॥
त्यावर भगवान शिव तिला म्हणाले, “हे प्रिये, अगं मी त्या माझ्या पत्नीवर रागावून इकडे आलो आहे, आता मी कधीच तिचे तोंडही पाहणार नाही. तिचे स्वप्नातसुद्धा नावही घेणार नाही.”।।॥९७॥ त्यावर ती भिल्लीण थोडीशी पुढे होत म्हणाली, “अरे पण माझा पती फार रागीट आहे. त्याला जर आपल्या या खेळाचा जरा जरी सुगावा लागला तर तो सारे त्रिभुवनच जाळून भस्म करील.” ||९८|| तेव्हा तो विश्वनाथ तिला म्हणाला, “अगं प्रिये, तुला काय सांगू! माझी ती पत्नी फार कठोर होती, तिने माझे सांगणे ऐकले नाही, तिने रागाच्या भरात पित्याच्या घरच्या यज्ञकुंडात उडी घेतली. असली ती रागीट आणि अविचारी आहे. ।।९९।। पुढे ती हिमालयाच्या पोटी जन्मास गेली, त्यावेळी मी पुन्हा तिच्याशी विवाह केला. पण ती अत्यंत कपटी आहे, फार फार वाईट आहे. ।।१०० ।। त्यावर ती भिल्लीण शिवास म्हणाली, “मी असे ऐकले आहे की, तू पण काही कमी कपटी नाहीस. तूसुद्धा तुझ्या डोक्यावर एक स्त्री बसवून ठेवली आहेस. आमची भवानी बिचारी भोळी आहे.” ।।१०१।। “अरे दुर्गेसारखी तुला सुंदर प्रिय अशी पत्नी घरी असताना इकडे माझ्यासारख्या परनारीची तू का अपेक्षा धरतो आहेस?”।।१०२।। तेव्हा कैलासनाथ म्हणाले, “अगं ती काही सामान्य नाही. तीच सारी उलथापालथ घडवून आणते. तिनेच शुभ निशुंभ दैत्यांचा वध केला आहे.” ।।१०३॥ हे बघ ती जरी आता आपणहून माझ्याकडे धावत जरी आली; माझी कितीही मनधरणी करू लागली तरी मी काही तिच्याबरोबर परत घरी जाणार नाही. ।।१०४।।
तिसीं मी न करीं संभाषण ।। तूंचि वरीं मी झालों तुजआधीन ।। जिकडे नेसील तिकडे येईन ।। वचनार्ध तुझ्या मी ॥१०५॥ यावरी बोले गोरटी ॥ भवानी बैसली तुझ्या पाठीं ।॥ दोन वेळां वरिला धूर्जट तिची गति हे केली ॥१०६॥ मग माझा पाड काय तुज ॥ केव्हां टाकोनि जाशील न कळे मज ॥ पण खेळतां सहज ।। तुझें त्वांचि हारविलें ॥१०७॥ न बोलेचि मदनदहन ।। भिल्लिणी मागुती व नृत्यगायन ।। मग उठिला पंचदशनयन ॥ तिसि आलिंगन द्यावया ॥१०८ ॥ अंबा चालिली सत्व दीर्घशब्दें बोले त्रिपुरहर ।। मुखशशी दावीं सुंदर ॥ भाक घेईं पैं माझी ॥१०९॥ तूं मज माळ घा येऊन ।। मी न जाय तुज टाकोन ।। मग जगदंबा बोले हांसोन ॥ यावें भुवना माझिया ॥ ११० ॥ = तुमची होईन कामिनी ।। अवश्य बोले खट्वांगपाणी ।। मदनांतक वेधोनी ।। कैलासासी ने तेधवां ॥ १११ ॥ सिंहासनीं बैसवून ।। षोडशोपचारें केलें पूजन ।। देवीनें दृढ धरिलें चरण ।। कंठीं मा घातलीं ॥११२॥ देवी आपुलें स्वरूप प्रगट करी ॥ तटस्थ पाहे त्रिपुरारी॥ मग हांसती परस्परीं एकमेकांपाहोनि ॥११३॥
मी तिच्याशी एका शब्दाने बोलणारही नाही. तू असे कर तूच माझ्याशी विवाह कर. तू मला जिकडे नेशील तिथे मी आनंदाने तुझ्या सोबत येईन. मी तुझ्यात फार गुंतलो आहे. ।।१०५|| तेव्हा गौरी शिवास म्हणाली, “अरे तू तर तिच्याशी दोन वेळा विवाह केलास आणि तू तिला सोडून दिलेस. ।।१०६।। मग माझं तर काय? मी नवखी, परकी. तू मलाही केव्हा सोडून देशील त्याचा काय नेम?” ।।१०७|| त्यानंतर ती भिल्लीण जेव्हा पुन्हा नृत्य करू लागली तेव्हा तिला प्रेमालिंगन देण्यासाठी प्रभू जागेवरून उठले. ।।१०८ ।। तेव्हा त्यांच्याकडे पाठ फिरवून अंबा निघाली. तेव्हा शिव म्हणाले, “प्रिये, मागे फिर. मला तुझा मुखचंद्रमा दाखव, तुला माझी शपथ आहे’. ।।१०९।। हे सुंदरी, तू माझ्या गळ्यात वर माला घाल. मी तुला कधीही टाकून जाणार नाही. असे शिवाने म्हणताच ती त्यांना म्हणाली, बरं तर तू माझ्या घरी चल. ।।११०।। मग मी तुझी पत्नी होईन. तेव्हा अवश्य, असे म्हणून सदाशिव तिच्या मागोमाग निघाले. तेव्हा तिने त्यांना झुलवत झुलवत कैलासास आणले. ।।१११।। त्यांना एका आसनावर बसवून त्यांची षोडशोपचारे पूजा केली. त्यांच्या गळ्यात मोठ्या भक्तिभावाने माळ घातली. ।।११२।। त्यावेळी जगदंबेने तिचे खरे स्वरूप प्रकट केले आणि ती पार्वतीच्या रूपाने त्यांच्यसमोर उभी राहिली. तेव्हा विस्मित झालेले प्रभू हे त्या आदिमायेकडे आश्चर्यचकित होऊन पाहातच राहिले. ।।११३।।
शिव म्हणे धन्य भवानी ।। त्वांचि आणिलें मज समजावोनी ।। सूत शौनकादिकांलागोनी ।। कथा सांगे विचित्र ॥११४॥ करीं वीणा घेऊनि ब्रह्मसुत ।। शिवाजवळी आला अकस्मात ।। हे विश्वंभर विश्वनाथ ।। तुझे भक्त देखिले बहू ॥ ११५ ॥ परी कांतिनगरीं श्रियाळ ॥ धीर गंभीर उदार सुशील ।। कीर्तीनें भरलें दिग्मंडळ ॥ सात्त्विक केवळ क्षमावंत ।। ११६ ।। तेणें घातलें अन्नसत्र ।। झालीं वर्षे दहा सहस्र ।। इच्छाभोजन दान पवित्र ॥ अतीतांप्रति देतसे ॥११७॥ अवनी जे अगम्य वस्त ।। भोजनीं मागितली अकस्मात ।। ती प्रयत्नें आणोनि पुरवीत ॥ शिवभक्त थोर तो ॥११८॥ ऐसें नारद सांगतां वर्तमान ।। त्याच्या गृहाप्रति पंचवदन । कुश्चळ अतीतवेष धरून । येता झाला ते समयीं ॥११९॥ आंगणीं उभा ठाकला येऊन । परम कोपी जेवीं दावाग्न ।। दुष्टवचन बोले कठिण ।। रूपही संपूर्ण कुश्चळचि ॥१२०॥ म्हणे मज देईं इच्छाभोजन ।। नातरी जातों सत्त्व घेवोन ॥ श्रियाळ चांगुणा येवोन ॥ पाय धरती सद्भावें ॥१२१॥
तेव्हा तिचे मोठे कौतुक करीत शिव भवानीस म्हणाले, “खरंच तू धन्य आहेस. अखेर तूच मला समजावून परत आणलेस”. यानंतर सूत शौनकादिक ऋर्षीना आणखीन एक अद्भुत अशी कथा निवेदन करतात. ती अशी की ।।११४।। एकदा नारदमुनी हे वीणावादन करीत करीत आणि हरिनामाचा गजर करीत भगवान शिवाकडे आले आणि त्यांची स्तुती करीत म्हणाले, हे महादेवा, तू आणि तुझ्यापेक्षाही तुझे भक्त हे फार श्रेष्ठ आहेत. पण, ।।११५।। तो कांतीनगरीचा श्रीयाळ राजा हा खरोखरच अतिश्रेष्ठ असा भक्तराज आहे. तो उदार, सुशील आहे. त्याची कीर्ती सर्वत्र दुमदुमते आहे. ।।११६।। देवा, गेल्या दहा वर्षांपासून तो आपल्या नगरीत अन्नसत्र चालवीत आहे. त्याच्याकडे येणाऱ्या अतिथीची तो इच्छापूर्ती करतो. पवित्र दाने देतो. ।।११७।। तो अतिथीने भोजन समयी कोणताही पदार्थ मागितला तरी हरप्रयत्नाने तो त्यास देऊन त्याचे मन संतुष्ट करतो. प्रभू, तो तुमचा भक्त आहे.।।११८॥ नारदांनी ही अशी श्रीयाळ राजाची स्तुती करताच, भगवान शिव हे त्या राजाकडे एका ओंगळ अशा अतिथीच्या रूपात आले. ।।११९|| तो अतिथी त्या राजाचे दारी येऊन उभा राहिला. तो अत्यंत कोपिष्ट दिसत होता, त्याची मुद्रा उग्र होती, तो अमंगळ, ओंगळ दिसत होता. ।।१२०|| तो दारी आलेला अतिथी श्रीयाळ राजा आणि राणी चांगुणा ह्यांना म्हणाला, “मला इच्छा भोजन द्या, नाहीतर मी तुमचे सत्त्व हरण करीन.”।।१२१।।
आणोनि बैसविला आसनीं ।। त्याचीं क्रोधवचनें सोसुनी ।। षोडशोपचारें पूजा करोनी ।। कर जोडोनि ठाकती पुढें ।॥१२२ ।। मागा स्वामी इच्छाभोजन ।। येरू म्हणे नरमांस देईं आणोन ॥ तूं चोर आणिसी धरून ।। त्याचें मांस न घे मीं ॥ १२३ ॥ धरूनि माझा उद्देश ॥ विकत आणिसील मनुष्य ।। तें न घे मी निःशेष ।। सत्य सत्य त्रिवाचा ॥ १२४ ॥ चांगुणा म्हणे कर जोडून ॥ मी आपुलें मांस देतें करीं भोजन ।। श्रियाळ म्हणे मानेल पूर्ण ॥ माझें मांस देतों मी ॥ १२५ ॥ येरू म्हणे तुम्ही पवित्र तत्त्वतां ।। परी सर्व याचकांचे मातापिता ।॥ तुम्हां दोघांसी भक्षितां ॥ अन्नसत्र खंडेल ॥ १२६ ॥ तरी तुमचा एकुलता एक स्नेहाळ ।। पांच वर्षांचा चिलया बाळ ॥ बत्तीसलक्षणी वेल्हाळ ॥ तो मज देई भोजना ॥१२७॥ ऐसें ऐकतां वचन ।। मायामोहजाळ दूर करून ।। म्हणती अवश्य जा घेवोन ।। मग सदाशिव बोलत ॥ १२८ ॥ मी काय आहें वृक व्याघ्र रीस ।। भक्षू तव पुत्राचें मांस ।। उबग न मानूनि विशेष ।। पचवूनि घाली मज आतां ॥१२९ ।।
तेव्हा त्या दोघांनी त्या अतिथीस आसनावर बसविले, त्याचे चरण वंदन केले. त्याची भक्तिभावाने षोडशोपचारे पूजा केली आणि ते दोघे हात जोडून त्याच्यासमोर उभे राहिले. ||१२२|| स्वामी, आपली कोणत्या इच्छाभोजनाची इच्छा आहे ते सांगा. असे म्हणताच तो म्हणाला, मला नरमांसाचे भोजन हवे आहे, पण त्यासाठी तू कोणाणा चोरास धरून, त्यास मारून मला ते मांस देऊ नकोस. मी ते घेणार नाही. ।।१२३।। तू माझ्यासाठी कोणा माणसास विकत घेतलेस तर तेही मला चालणार नाही. मी ते मांस खाणार नाही. ।।१२४ ।। तेव्हा विनम्रभावाने हात जोडीत चांगुणा पुढे होत म्हणाली, “महाराज, तसे असेल तर मी माझे मांस तुम्हास देते.” तेव्हा श्रीयाळ राजाही पुढे येत म्हणाला, “तिचे नको असेल तर मी माझे मांस आपल्याला देतो.” ।।१२५।। तेव्हा तो अतिथी त्यांना म्हणाला, “अरे राजा तसे करून कसे चालेल, तुम्हा दोघांना जर मी खाल्ले तर तुमचे अखंड चालू असलेले हे अन्नसत्र बंद पडणार नाही का? त्या पेक्षा.” ।।१२६।। त्यापेक्षा काय? असे विचारताच तो अतिथी म्हणाला, “तुम्ही असे करा, तुम्ही मला तुमच्या प्रिय बाळाचे, गोजिरवाण्या चिलया बाळाचे मऊ मांस द्या.”।।१२७।। अतिथीची ती मागणी ऐकून ते दोघे म्हणाले, अवश्य. तुम्ही त्या चिलयास घेऊन जा. ।।१२८ ।। तेव्हा एकदम रागावून तो त्या दोघांना म्हणाला, “अरे तुम्ही मला काय लांडगा, वाघ, अस्वल समजलात का? मी तुमच्या पुत्राचे मांस तसेच कसे खाऊ. त्यापेक्षा तुम्हीच ते शिजवा आणि मला जेऊ घाला” ।।१२९।।
मायामोह धरून ।। कोणी कराल जरी रुदन ।॥ तरी मी जाईन उठोन ॥ सत्त्व घेवोन तुमचें ॥ १३०॥ अवश्य म्हणोनि पतिव्रता ।। उभी ठाकोनि बाहे निजसुता ।। म्हणे बाळा चिलया गुणवंता ॥ खेळावया कोठें गेलासी ॥१३१ ॥ तुजलागीं खोळंबला अतीत ।। बाळा माझ्या येईं धांवत ।। ऐसें ऐकतां अकस्मात ।। बाळ आला धांवोनी ॥ १३२ ॥ अतीतासी करूनि नमन ।। मातापितयांचे धरी चरण ।। माता म्हणे तुझें पिशितदान ।। अतीत मागतो राजसा ॥१३३॥ बाळ बोले स्नेहेंकरून ।। हा देह म्यां केला शिवार्पण ॥ अतीत होतां तृप्त पूर्ण ।। उमारमण संतोषेल ॥१३४॥ ऐसें ऐकतां झडकरी ॥ बाळ घेतला कडियेवरी ।। पाकशाळेभीतरीं ।। घेवोनि गेली वधावया ॥ १३५ ॥ चिलयासी चुंबन देऊन ।। हृदयीं धरिला प्रीतीकरून ।। बाळ म्हणे पुढती येईन ।। तुझ्या उदरा जननीये ॥ १३६ ॥ मायाजाळ सर्व सोडून ।। मन केलें वज्राहूनि कठिण ।। चिलयाचें शिर छेदून। काढिलें मांस आंगींचें ॥ १३७॥ आपणांसी पुत्र नाहीं म्हणोनियां ।। शिरकमळ ठेविलें पहावया ।। शरीराचा पाक करूनियां ।। उठवी भोजना अतीतातें ।॥ १३८ ॥ अतींद्रियद्रष्टा श्रीशंकर ।। अनंतब्रह्मांडींचा समाचार ।। सर्व ठावुक सूत्रधार ।। कळलें शिर ठेवलें तें ॥१३९ ॥
पुढे तो अतिथी त्यांना असेही म्हणाला की, जर तुम्ही पुत्रवियोगाने रडणार असाल तर मी तुमचे सत्त्वहरण करीन अन् निघून जाईन ।। १३०।। तेव्हा चांगुणा निश्चयाने उभी राहिली आणि पुत्रास हाक मारीत म्हणू लागली. चिलया बाळा, इकडे ये. तू कुठे खेळायला गेला आहेस? ।।१३१ ।। अरे बाळा, तुझ्यासाठी दारी आलेले अतिथी थांबल आहेत, लवकर ये. असे म्हणून तिने हाक मारताच चिलया बाळ तिथे धावत आला. ।।१३२।। त्याने प्रथम त्या अतिथीस वंदन केले आणि मग मातेजवळ उभा राहिला. तेव्हा ती म्हणाली, बाळा, या अतिथीस तुझे माम्स अन्नदानाच्या रूपात हवे आहे. ।।१३३।। तेव्हा बाळ चिलया म्हणाला, “माते, अगं हे तर फारच उत्तम. कारण मी तर हा देह कधीच शिवर्पण केला आहे. जर अतिथी तृप्त झाला तर माझे भगवान शंकरही माझ्यावर संतुष्ट होतील.” ।।१३४।। असे त्याचे बोलणे ऐकताच तिने त्यास प्रेमाने कडेवर घेतले आणि ती पाकगृहात गेली. ।।१३५।। तिने मोठ्या वात्सल्याने त्याच्या अंगावरून हात फिरविला, त्याचे प्रेमाने चुम्बन घेतले, त्यास कवटाळून धरले, तेव्हा तो म्हणाला “आई! मी पुन्हा तुझ्याच पोटी जन्मास येईन.” ।।३६।। तेव्हा चांगुणाने मन कठोर केले आणि चिलयाचे शिर छेदून त्याच्या अंगाचे मांस काढले. ।।१३७।। आपल्याला जेवढा एकच अपत्य म्हणून तिने त्याचे शिर तेवढे राखले आणि शरीराच्या इतर मांसास शिजवून अतिथीस भोजनास बोलाविले. ।।१३८ ।। श्री शंकर अतेंद्रिय असल्याने त्यांना चांगुणाने बाळाचे शिर बाजूस काढून ठेवले आहे ही गोष्ट अंतर्ज्ञानाने समजली. ।।१३९।।
उठोनि चालिला तात्काळ ।। धांवती चांगुणा श्रियाळ।। येरू म्हणे कळलें सकळ ।। शिरकमळ ठेविलें ।।१४० ।। सर्व गात्रांत शिर प्रधान ।। तेंचि कैसें ठेविलें वंचून ।। तंव तीं दोघे धरिती चरण ।। तेंही पचवूनि घालितों ।॥१४१॥ क्षोभ न धरावा अंतरीं । नेणतपणें चुकलों जरी ॥ तरी सर्वज्ञा तूं क्षमा करीं ।। सत्त्व आमुचें राखावें ॥ १४२ ॥ मग बैसला आसनीं येऊन ।। म्हणे शिर येईं बाहेर घेऊन ।। उखळांत घालूनि कंडण ।। मजदेखतां करीं आतां ॥१४३॥ अश्रु आलिया तुझ्या नयनीं ।। कीं कष्टी झालिया अंतःकरणीं ।। तरी पुत्र गेला सत्त्वास हानी ।। करूनि जाईन तुमच्या ॥१४४॥ अवश्य म्हणे नृपललना ।। शिर आणोनि करी कंडणा ।। सत्त्व पाहे कैलासराणा ।। अंतरीं सद्गद होऊनी ॥४५॥ निजसत्त्वाचें उखळ ।। धरिलें धैर्याचें करीं मुसळ ॥ कांडीत बैसली वेल्हाळ ॥ निर्धार अचळ धरूनियां ॥१४६॥ अतीत म्हणे परम मंगळ।। गीत गाय रसिक सुढाळ ॥ खंती करितां पयः फेनधवल ।। दुरावेल जाण पां ।॥१४७॥ ते सद्भावसरोवरविलासिनी ।। कोमलहृदय नृपकामिनी ।। कीं निश्चळ गंगा भरूनी ॥ जात मर्यादा धरूनियां ॥१४८ ।।
तेव्हा त्या भोजनाचा स्वीकार न करता अतिथी उठून चालला. उभयतांनी कारण विचारताच तुम्ही बाळाचे शिर का राखून ठेवलेत? असे अतिथीने विचारले. ।।१४०।। अतिथी म्हणाला. “सर्व शरीरात शिरच तर मुख्य असते, ते कसे वगळलेत?” तेव्हा ते म्हणाले, “महाराज, क्षमा असावी, थांबा तेही शिजवून घालतो. ।।१४१।। आपण मनात राग धरू नका, आम्हास क्षमा करा, आमच्या सत्त्वाचे रक्षण करा.” ।।१४२|| मग अतिथी पुन्हा आसनावर बसला. तो म्हणाला, असे करा. ते शिर बाहेर घेऊन या, ते उखळात घाला आणि माझ्यासमोर कांडण करा. ।।१४३।। लक्षात ठेवा, ते करीत असताना जर का तुमच्या डोळ्यांत एक जरी अश्रू आला किंवा तुमचे मन व्यथित झाले तर मी ते मांस भक्षण करणार नाही. तुमचा पुत्र गेला आहेच, वर सत्त्वही जाईल. ।।१४४।। तेव्हा जशी आज्ञा असे म्हणून चांगुणाने ते शिर बाहेर आणले आणि ती निश्चयात्मक भावाने त्या शिराचे कांडण करू लागली. इकडे कैलासराणा खरंतर संतुष्ट होत आपल्या भक्तांचे मनोधैर्य सत्त्व पाहू लागला. ।।१४५।। सत्त्र्वाचे उखळ आणि धेर्याचे मुसळ करून चांगुणेने बाळाचे अतिथीसाठी कांडण केले. ।।१४६।। तेव्हा तिची परीक्षा पाहात अतिथीने तिला त्या कांडणाबरोबरच एक चांगले गाणे गा, अशीही आज्ञा केली. वर तिला असेही बजावले की, तू जर दःखित झालीस तर भगवान शिव हे तुला अंतरतील. ।।१४७|| तेव्हा त्या कसोटीच्या क्षणीसुद्धा राजपत्नी चांगुणाने आपले सत्त्व पणास लावले. तिने माया नदीला निश्चयाचा बांध घातला. ।।१४८।।
तिचें पाहतां निजवदन । काळवंडला रोहिणीरमण ।। मृगशावाक्षी गुणविधान ।। उपमा नाहीं स्वरूपातें ॥१४९ ॥ म्हणे कोमलांगा बाळा सुकुमारा ॥ सुलक्षणा सुशीला नृपकिशोरा ।। सुहास्यवक्त्रा राजीवनेत्रा ।। येवोनि उदरा धन्य केलें ॥ १५० ॥ तूं सुकुमार परम गुणवंता ।। माझे निष्ठुर घाव लागती माथां ।। तुजविण परदेशी आतां ॥ दुबळी भणंग झालें मी ॥ १५१ ॥ कुचंकमंडलीं अतिसुंदरा ।। कंचुकीबाहेर फुटल्या दुग्धधारा । कीं भूलिंगासी एकसरा ॥ गळत्या लाविल्या तियेनें ।॥१५२॥ म्हणे अतीत जेवोनि अवधारीं ।॥ जाऊं दे राजद्वाराबाहेरी ।। देह त्यागीन ये अवसरीं ।॥ यावरी धीर न धरवे पैं ।॥१५३ ।। कैलासपंथ लक्षून ॥ सखया एकला जातोसी मज टाकून ।। तुझे संगतीं मीं येईन ।। उभा राहें क्षणभरी ॥१५४॥ तूं मोक्षद्वीपाचें केणें भरून ॥ जासी कैलासराजपेठ लक्षून ।। तुझे संगतीं मी उद्धरेन ।। मज टाकूनि जाऊं नको ॥१५५॥ उदकाविण जैसा मीन ॥ तैसी मी त्नमह्या तुजविण ॥ माझें हृदय निर्दय कठिण ।। लोकांत वदन केवीं दायूं ॥१५६ ॥ तुझी माउली मी म्हणता ॥ लाज वाटे रे गुणवंता ।। तुवां आपुली सार्थकता ॥ करूनि गेलासी शिवपदा ।।१५७ ॥
तिचा चेहरा पाहून चंद्रही काळवंडला. ती मृगनयना धैर्यवती राणी चांगुणा ही सद्गुणांची खाण होती. तिच्या रूपाइतकीच तिच्या धैर्यालाही सीमा नव्हती. ।।१४९।। ती इकडे गीत म्हणत होती, पण मनातून ती म्हणत होती, बाळा, तू माझ्या पोटी जन्म घेऊन मला धन्य केलेस. ||१०५० ।। राजकुमारा, तू सुकुमार, गुणवंत, तुझ्यावर हे घाव घालताना माझं मातृत्व दुबळे झाले आहे. तुझ्या वाचून मी भणंग झाले आहे. ।।१५१|| बाळा, तुझ्यासाठी माझ्या स्तनांतून दुधाच्या धारा ओसंडत आहेत. ।।१५२।। बाळा, जरा थांब. हा अतिथी संतुष्ट होऊन जाऊ दे. मी लगेच माझा देह त्यागून तुझ्याकडे येते. ।।१५३॥ सख्या चिलया, अरे मला मागे टाकून तू एकटाच कैलासास जाऊ नकोस, मी पण तुझ्यासोबत येते. जरा थांब. ।।१५४।। बाळा, तू मोक्षद्विपाचा ठेवा घेऊन चालला आहेस, पण थांब ना, मी पण तुझ्यासोबत येते. तू मला असे एकटीला सोडून जाऊ नकोस. ।।१५५।। बाळा, पाण्यावाचून मासा जगू शकत नाही, तशी तुझ्यावाचून मी कशी जगू? मी लोकांना माझे हे तोंड कसे दाखवू? ।।१५६।। आज तर मला तुझी आई म्हणवून घेताना स्वतःचीच लाज वाटते आहे. बाळा, तू मात्र जन्मसार्थकता साधून कैलासास गेला आहेस. ।।१५७। ।
हें त्रिभुवन शोधितां सकळ ।। तुजऐसा न दिसे बाळ ॥ मग तें पचवूनि तात्काळ ।। उठा अतीतातें ।।१५८ ।। अतीत म्हणे अवनीपती ।। उठा तुम्ही यजमान माझें पंक्ती ॥ ऐसें ऐन श्रियाळनृपती ।। झाला चित्तीं संकोचित ॥१५९॥ चांगुणा म्हणे नृपनाथा ।। सत्त्व राखावें सत्वर आ विन्मुख जाऊं न द्यावें अतीता ।। मनीं चिंता न धरावी ॥ १६० ॥ नव मास वाहिला म्यां उदर तुम्हांस जड नव्हे चौप्रहरांत ।। पोटींचा पोटीं घालितां सुत ।। चिंता काय नृपश्रेष्ठा ।। १६१ ॥ राव बै पंक्तीसी ।। ताट वाढोनि आणिलें वेगेंसीं ।। अतीत म्हणे चांगुणेसी ।। तूंही येईं सवेग ॥ १६२ ॥ अ म्हणोनि झडकरी ।। येवोनि बैसली नृपसुंदरी ।। यावरी अतीत म्हणे तुमच्या मंदिरीं ।॥ अन्न न घ सर्वथा ।। १६३ ।। निपुत्रिकाचें न पहावें वदन । मग तेथें कोण घेईल अन्न ।। दीपेविण शून्य सव पुत्राविण तेवीं तुम्ही ॥१६४॥ नासिकेवांचोनि वदन । कीं वृक्ष जैसा फळाविण ।। कीं बुबुळां जैसे नयन ।। शून्य सदन तुमचें तेवीं ।॥ १६५ ॥
बाळा, अरे सारे त्रिभुवन शोधले तरी तुझ्यासारखा पुत्र लाभणार नाही. असे म्हणत तिने ते शिर कांडले, शिजविले आणि ती अतिथीस भोजनास उठवू लागली. ।।१५८।। तेव्हा तो अतिथी त्यांना म्हणाला, राज तुम्ही दोघे ही माझ्या सोबत भोजन पंक्तीस बसा. ।।१५९।। तेव्हा चांगुणा आपल्या पतीस म्हणू लागली, हे नृपनाथ, तुम्ही भोजनास बसा, सत्त्वाचे रक्षण करा. मनात कोणतीही शंका आणू नका. अतिथीला रागावून विन्मुख जाऊ देऊ नका. ।।१६०।। महाराज, अहो ज्याला मी नऊ महिने पोटात वाढवला, त्याला तुम्हास बारा तासांसाठी पोटात घालणे काही जड आहे का? तेव्हा आता चिंता सोडा आणि भोजनास बसा. ।।१६१॥ शेवटी नाइलाजाने सत्त्व रक्षणासाठी रावही पानावर बसला. तेव्हा तो अतिथी चांगुणेस तूसुद्धा आमच्यासोबतच भोजनास बस, असे म्हणाला. ।।१६२।। शेवटी तर राणी चांगुणा हीसुद्धा सत्त्वरक्षणासाठी काळजावर दगड ठेवून पानावर येऊन बसली. तरीसुद्धा अतिथी म्हणायला लागला की, नाही. मला तुमच्या घरी अन्न घेता येणार नाही. ।।१६३।। त्याचे कारण देत तो म्हणाला, शास्त्र तर असे सांगते की, निपुत्रिकाचे तोंडही पाहू नये. तेव्हा आता मी तुमच्या घरचे अन्न तरी कसे सेवन करू, कारण आता तुमच्या घरी वंशाचा दिवा नाही, तुम्हास पुत्र नाही. ।।१६४।। नाकाशिवाय चेहरा, फळाशिवाय वृक्ष, दृष्टीशिवाय नेत्र अशी तुमची अवस्था आहे. तुमचे घर हे कुलदीपकाशिवाय शून्य आहे. ।।१६५।।
तंव तीं दोघे बोलती सद्गदित । एक होता तो अर्पिला सुत ।। चांगुणा म्हणे गेलें सत्त्व ॥ अतीत विन्मुख जाईल आतां ॥ १६६ ॥ एक बाळ तो दिधला भोजनासी ।। आतां महाराजा सत्त्व किती पाहासी ।। ऐसें बोलतां चांगुणेसी ॥ अद्भुत गहिंवर दाटला ॥ १६७ ॥ म्हणे सत्त्वही बुडालें सकळ ॥ वृथा गेलें माझें बाळ ॥ मग कंठ मोकळा करूनि स्नेहाळ ॥ हांक फोडी चांगुणा ॥ १६८ ॥ नयनीं चालिल्या प्रेमाश्रुधारा ।। म्हणे आहा शिव कर्पूरगौरा ।। दीर्घस्वरें बाहे उमावरा ।। पाव सत्वरीं या आकांतीं ॥१६९॥ आहा झाले वंशखंडण ॥ न देखों पुढती पुत्रवदन ।॥ ऐसें ऐकतां अतीताचे नयन ॥ स्रवों लागलें प्रेमभरें ।।१७० ।। बाहेर फुटली मात ॥ वळसा होत थोर नगरांत ॥ लोक दुःखें वक्षःस्थळ पिटीत ॥ राजकिशोर आठवूनी ॥ १७१ ॥ विमानीं दाटले सुरवर । म्हणती धन्य पतिव्रता सत्त्वधीर ।। ईस प्रसन्न होवोनि श्रीशंकर ।। काय देईल तें न कळेचि ॥१७२॥ अतीत म्हणे चांगुणेसी ।। जें प्रिय असेल तुझे मानसीं ।। तें मजसीं माग सद्गुणरासी ।। यावरी सती काय बोले ॥१७३ ॥
तेव्हा मात्र ते राजा-राणी दोघेही अत्यंत दुःखीकष्टी झाले आणि धीर करून म्हणाले, महाराज, एकुलता एक पुत्र जो आम्हास होता तो तुम्ही मागताच आम्ही तुम्हास दिला. आता पुत्रही गेला आणि सत्त्व जाणार. आता तुम्हीही विन्मुख जाणार. ।।१६६।। तेव्हा गहिवरलेली, चांगुणा म्हणाली, “महाराज, काहो असा आमचा अंत पाहता. जो पुत्र होता तो तुम्हाला अर्पण केला. तरीही तुम्ही आम्हाला निपुत्रिक कसे ठरविता?”।।१६७।। असे म्हणत ती दुःखावेगाने रडू लागली, आपले सत्त्व गेले म्हणून शोक करू लागली. अहो, माझे बाळ गेले की हो, असे म्हणून तिने चिलयाबाळाच्या नावाने टाहो फोडला. ।।१६८।। तिच्या लोचनांस प्रेमाश्रूची धार लागली. ती भगवान शिवास हाक मारून त्यास म्हणू लागली, “हे कर्पूरगौरा, आता तूच सांग. आम्ही आमच्या सत्त्वाचं रक्षण कसं करायचं? तुझ्याशिवाय आम्हास कोण त्राता आहे ।? ।।१६९।। आमचा वंश खंडित झाला, आता मला माझा पुत्र डोळ्यांस दिसणार नाही, मी काय करू? देवा, मी काय करू? तिचे ते शब्द ऐकले आणि इकडे अतिथीरूपी शिवासही तिची करुणा आली. ।।१७०।। तोवर ही वार्ता अवघ्या नगरीत पोहोचली आणि दुःखी प्रजानन हे राजपुत्रवियोगाचे दुःख करीत तिथे गोळा झाले. ।।१७१|| आता तिथे काय घडणार हे पाहण्यासाठी आकाशात देवतांनी दाटी केली. ते त्या दोघांचे कौतुक करू लागली. आता भगवान शिव त्यांना कोणते वरदान देतात याची त्यांना उत्सुकता लागली. ।।१७२|| तेव्हा काहीसा शांत आणि गंभीर झालेला तो अतिथी चांगुणेस म्हणाला, हे राणी, तुला जे काही प्रिय असेल ते मागून घे. ।।१७३॥
मज निपुत्रिक म्हणतील लोक ॥ हा धुवोनि काढीं कलंक ॥ ऐसें ऐकतां कैलासनायक।। बोला म्हणे पुत्रासी ॥१७४॥ सत्य मानूनि अतीतवचना ।। दीर्घ हांका फोडीत चांगुणा ॥ म्हणे चिल्ल * गुणनिधाना ।। येईं स्नेहाळा धांवोनि ॥ १७५ ॥ अतीत तुजविण न घे ग्रास ।। कोठें गुंतलासी खेळावयास माझें तान्हें तूं पाडस ।। सत्त्व राखें येवोनियां ॥१७६ ।। तूं न येसी जरी धांवोन । तरी माझा जाऊं प्राण ॥ दशदिशा विलोकून ॥ चांगुणा पाहे तेधवां ॥१ ७७ ॥ मागुती हांक फोडी वेल्हाळ ॥ तों प उगवे मित्रमंडळ ।। तैसा धांवतचि आला बाळ ॥ पाहे श्रियाळ स्नेहभरें ॥ १७८ ॥ अतीतस्वरूप टाकून शिव प्रकटला निजरूप पूर्ण ।। दशहस्त पंचवदन ।। दीनोद्धारण जगद्गुरू।। १७९ ।। चिलया शिवें हृव धरिला ॥ निज अंकावरी बैसविला ॥ श्रियाळ चांगुणा ते वेळां ।। पायांवरी लोळती ॥१८०॥ सुर सुमनें वर्षती अपार ।। दुंदुभिनादें कोंदलें अंबर ।। आनंदमय झालें नगर ।। धांवती लोक पहावया ॥१८१।। शिवें आणविलें दिव्य विमान ।। श्रियाळ चांगुणा दिव्यरूप होऊन ।। चिलयासी सिंहासनीं स्थापून छत्र धरिलें तयावरी ।।१८२ ।।
तेव्हा राणी चांगुणा त्या अतिथीस म्हणाली, महाराज, एका मातेला तिच्या पुत्राशिवाय अन्य प्रिय ते काय असणार? तेव्हा अतिथी म्हणाला, होय ना. मग तुझ्या पुत्रास आता हाक मार. ।।१७४।। अतिथीच्या त्या बोलण्यावर राणीने आर्त स्वरात राजपुत्रास हाक मारली. बाळा चिलया, ये धावत ये. बाळा, अतिथी तुझ्यावाचून भोजनास थांबले आहेत. धावत ये. ।।१७५।। “बाळा, तू कुठे खेळण्यात गुंतला आहेस का? इथे अतिथी थांबून राहिले आहेत. ये सत्वर ये माझ्या बाळा आणि आपल्या सर्वांच्या सत्त्वाचे रक्षण कर. ।।१७६ || ती असेही म्हणू लागली की बाळा, तू जर आला नाहीस तर मी माझे प्राण या इथेच आणि या क्षणीच सोडीन.” ।।१७७॥ राणीची ती करुण अवस्था पाहून राजाही गहिवरला आणि तोही पुत्रास हाक मारू लागला. सारेजण आता काय होणार म्हणून पाहू लागले. त्याबरोबर राजपुत्र धावत तिथे आला. ।।१७८ ।। राजा-राणीने अतिथीकडे पाहिले तर त्यांना त्याच्या जागी साक्षात भगवान शिवशंकरांचे दर्शन झाले. ।।१७९ ।। पुढे आलेल्या चिलया बाळास शिवांनी प्रेमाने जवळ घेऊन आपल्या मांडीवर बसविले. राजा श्रीयाळ आणि राणी चांगुणाही त्या शिवचरणांवर लोळण घेऊ लागले. ।।१८० ।। तेव्हा आकाशातून देवतांनी त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली, मंगल वाद्ये वाजू लागली. सर्वत्र शिवनामाचा जयजयकार घुमू लागला. ते अलौकिक असे दृश्य पाहून लोकही सद्गदित झाले. ।।१८१।। तेव्हा शिवांनी एक दिव्य विमान आणले. त्यात त्या तिघांनाही बसवून ते त्यांना शिवलोकी घेऊन निघाले. ।।१८२।।
सचिवांस निरवोनि राज्यभार ॥ विमानीं बैसलीं सत्वर ।। निजपदीं जगदुद्धार ।। श्रीशंकर स्थापी तयां ॥१८३॥ कांतिनगरीं सौख्य अगाध ।। त्रिभुवनीं न माये आनंद ।। श्रीधरस्वामी तो ब्रह्मानंद ।। अभंग न विटे कालत्रयीं ।॥ १८४ ॥ शिवलीलामृत ग्रंथ ।। झाला चतुर्दश अध्यायापर्यंत ।। चौदा भुवनांचें सार यथार्थ ।। चौदा अध्याय निर्मिलें ।।१८५ ।। कीं चौदा विद्यांचें सार ।। चौदा गांठींचा अनंत परिकर ।। कीं चौदा पढ़ें निरंतर ।। गयावर्जन घडे हैं ।। १८६ ।। कीं चतुर्दश रत्नांचा प्रकाश ।। येथेंचि झाला एकरस ।। कीं चौदा चक्रे निःशेष ।। प्रिय चौदाही लोकांतें ।॥ १८७ ॥ कीं चौदा कांडें वेद ।। कीं चौदा कोहळीं द्रव्य प्रसिद्ध ।। कीं चौदा कोठड्या शुद्ध ।। शिवमंदिर निर्मिलें ॥ १८८ ॥ श्रवण पठण लेखन ।। निदिध्यास अनुमोदन ।। परम प्रीतीं करितां ग्रंथरक्षण ॥ फल समान सर्वांसी ॥१८९॥ इतुक्यांसही शिव होऊनि माउली ।। करील निजांगाची साउली ।। आयुरारोग्य ऐश्वर्य सकळी ।। ग्रंथश्रवणें प्राप्त होय ॥ १९०॥
तेव्हा कृतार्थ झालेल्या श्रीयाळ राजाने आपला राज्यकारभार सचिवाचे हाती सोपविला आणि तो विमानी बसला. भक्तरक्षक भोलेनाथ हे त्यांना निजपदी घेऊन गेले आणि त्यांना चरणाशी स्थान दिले. ।।१८३।। या झालेल्या घटनेने त्या कांतिनगरात पुढे शिवकृपेने अगाध सौख्य अवतरले. सर्वांचा आनंद गगनात मावेना. श्रीधर कवि म्हणतात की, तो शिवकृपेचा सागर आहे. ब्रह्मानंदाची अक्षय ठेव आहे. तो अभंग आहे शाश्वत आहे. । ।१८४।। ते पुढे असे म्हणतात की, श्रोतेजनहो ! अशाप्रकारे हा श्री शिवलीलामृत ग्रंथ हा या चौदाव्या अध्यायापर्यंत आला आहे. चौदा भुवनांचे यथार्थ सार म्हणूनच याचे चौदा अध्याय निवेदन केले आहेत. ।।१८५।। हा ग्रंथ म्हणजे चौदा विद्यांचे सार आहे, चौदा गाठींचा समूह आहे. यास चौदा पदे असल्याने तो गयाक्षेत्रीचा आचार आहे. ।।१८६|| किंवा चौदा रत्नांचा प्रकाश हा इथे या ग्रंथरूपाने एकवटलेला आहे. ही लोकप्रिय अशी चौदा चक्रे आहेत. ।।१८७॥ किंवा वेदांची ही चौदा कांडे असून, जणूकाही हे रत्नांनी भरलेले चौदा कोहळे आहेत. हा ग्रंथ म्हणजे जणू चौदा कोठड्यांचे एक भव्यदिव्य असे शिव मंदिर आहे. ।।१८८ || श्रीधर कवी म्हणतात, या ग्रंथाच्या श्रवण, पठण, लेखन, निवेदन, ध्यास आणि अनुमोदन ह्या कोणत्याही स्वरूपात सेवा केली तरी त्याचे शिवोपासकास समान फल प्राप्त होते. ।।१८९ ।। भगवान शिव हे सर्व भक्तांवर मातेप्रमाणे कृपासावली धरतात. या गृहपठण श्रवणाने आयुष्यवर्धन, सौख्य, संतती, संपत्तीची प्राप्ती होते. ||१९०।।
आधि व्याधि जाय निरसोन ॥ वंध्याही पावे पुत्रसंतान ॥ ग्रामा गेला बहुत दिन ।। पिता बंधु भेटेल ॥१९१॥ घरीं संपत्ति दाटे बहुत ।। ऋणमोचन होय त्वरित । शत्रुक्षय यथार्थ ।। दक्षिणमुखें वाचितां ॥९२॥ शत आवर्तनें करितां भक्तियुक्त ॥ पोटीं होय शिवभक्त सुत ।। ज्याच्या घरीं असेल हा ग्रंथ ।। पिशाच भूत न रिघे तेथें ।॥९३ ।। त्रिमास करितां नित्य आवर्तन ।। सर्व संकटें जाती निरसोन ।। भावें प्रचीत पाहावी वाचोन ।। नाहीं कारण अभाविकांचें ॥९४॥ सोमवारीं ग्रंथ पुजून ॥ अथवा प्रदोषकाळ शिवरात्रि लक्षून ।। शुचिर्भूत होवोनि करावें शयन ।। स्वप्नीं प्रकटोनि शिव सांगे ॥९५॥ जें जें पडेल संकट ।। तें तें निवारील नीलकंठ ।। चौदा अध्यायांचें फळ वरिष्ठ ॥ वेगळालें लिहिलें असे ।।९६ ।। प्रथमाध्यायीं मंगळाचरण ।। दाशार्हरायाचें आख्यान ।। कलावतीनें पति उद्धरिला पूर्ण ।। हेंचि कथन निर्धारं ।। ९७ ।। द्वितीयाध्यायीं निरूपण ।। शिवरात्रि कर्मविपाककथन ।। तिसऱ्यांत गौतमें कथा सांगोन ।। कल्माषपाद उद्धरिला ।।९८ ।। चौथ्यांत महाकाळलिंगार्चन ।। गोपबाळ गेला उद्धरून ।। पांचव्यांत उमेनें पुत्र पाळून ॥ राज्यीं स्थापिला शिवप्रसादें ।॥९९ ॥
शिवकृपेने सर्व प्रकारची मानसिक रोगव्याधी दूर होते. वंध्येस संतती लाभते. दुरावलेल्या आप्तांची पुनर्भेट घडते. ।।१९१।। या ग्रंथ उपासकाचे घर सुखसौख्याने, वैभवाने भरून जाईल. त्याची त्वरित ऋणमुक्ती होईल. हा ग्रंथ दक्षिण दिशेस तोंड करून वाचल्यास शत्रूक्षय होईल. ।।१९२।। या ग्रंथाची शत पारायणे केली असता सर्व संकटांचे निराकरण होते. ज्या घरात हा ग्रंथ असेल तिथे भूत, प्रेत, पिशाच्च बाधा होणार नाही. ।।१९३।। या ग्रंथाचे तीन महिने सतत वाचन केल्यास सर्व संकटांचा नाश होतो. भाविकांनी याबाबत स्वतः सेवा करून अनुभव प्रचिती घ्यावी. अभाविकांचे इथे काही काम नाही. ।।१९४।। सोमवार, प्रदोषकाळ वा शिवरात्रीस शुद्ध भक्तिभावाने ग्रंथाचे पठण केले असता भगवान शिव हे स्वप्न दृष्टांत देतील. ।।१९५।। या ग्रंथाच्या प्रत्येक अध्यायाचे वेगवेगळे असे फलित आहे. आता आपण ग्रंथाचे सिंहावलोकन करूया।. १९६।। या ग्रंथाच्या पहिल्या अध्यायात दाशार्हरायाचे आख्यान आणि राणीने केलेला पतीचा उद्धार हा भाग आला आहे. ।।१९७|| दुसऱ्या अध्यायात शिवरात्रीचे महत्त्व आणि कर्मविपाककथनाचे निरूपण सांगितले आहे. तिसऱ्या अध्यायात कल्माषपाद राजाच्या उद्धाराची कथा आली आहे. ।।१९८।। चौथ्या अध्यायात चंद्रसेन राजाची महांकाळेश्वराची पूजा, गोपीपुत्र श्रीकराचे शिवपूजन आणि त्यास प्राप्त झालेली शिवकृपा याकथा आल्या आहेत. पाचव्यात उमेने सांभाळलेल्या राजपुत्राची कथा व त्यास शिवकृपेने राज्यप्राप्ती हा कथाभाग आला आहे. ।।१९९।।
सहावा अध्याय अतिरसिक ।। सीमंतिनी आख्यान पुण्यकारक ।। सातवा आठवा सुरस कौतुक ।। भद्रायुरायाचें कथन पैं।॥ २०० ॥ नवमांत वामदेवाचें आख्यान सुरस ।। दुर्जय राजा झाला राक्षस ।। जन्मदुःखें कथिलीं बहुवस ।। अतिसुरस अध्याय तो ।।२०१ ।। दहाव्यांत शारदा आख्यान ।। अकराव्यांत रुद्राक्षमहिमा पूर्ण ।। महानंदा गेली उद्धरोन ॥ भद्रसेनराव तरला ।। २०२ ।। बाराव्यांत विदुरबहुलाउद्धार ।। विष्णूनें मर्दिला भस्मासुर ।॥ तेराव्या अध्यायांत समग्र ।। शिवगौरीविवाह पैं ।॥२०३॥ चौदाव्यांत शिवअपर्णाविनोद ।। गौरी भिल्लिणी झाली प्रसिद्ध ।। पुढें श्रियाळचरित्र अगाध ।। चौदावा अध्याय संपूर्ण हा ॥२०४॥ श्रीधरस्वामी ब्रह्मानंद ।। आनंदसांप्रदाय परम अगाध ।। क्षीरसागरीं गोविंद ।। आधीं उपदेशी कमलोद्भवा ॥२०५॥ तेथूनी अत्रिऋषि प्रसिद्ध ॥ पुढें पूर्णब्रह्म दत्तात्रय अगाध ।। त्यापासूनि सदानंद ।। रामानंद यती तेथोनि ।। २०६ ।। तेथोनि अमलानंद गंभीर ।। मग ब्रह्मानंद उदार ।। त्यावरी कल्याणीं राहणार ।। सहजानंद यतींद्र पैं ।॥२०७॥ तेथोनि पूर्णानंद यती शुद्ध ॥ त्यापासाव पितामह दत्तानंद ॥ पिता तोचि सद्गुरू प्रसिद्ध ।। ब्रह्मानंद यतींद्र जो ॥२०८ ॥
सहाव्यात सीमंतिनीचे आख्यान निवेदन केले आहे. तर ग्रंथाच्या सातव्या आणि आठव्या अध्यायांत भद्रायूची कथा सांगितली आहे. ।।२०० || नवव्या अध्यायात वामदेवाचे आख्यान, राक्षसाचा उद्धार ह्या कथा आल्या आहेत. ||२०१|| दहाव्यात शारदा आणि तिच्या पुत्राची कथा, अकराव्यात रुद्राक्षमहिमा व भद्रसेन राजाच्या पुत्राची कथा हे भाग आलेले आहेत. ||२०२|| ग्रंथाचा बारावा अध्याय हा बहुलेचा, तिच्या पतीचा उद्धार कसा झाला ते सांगतो, तर तेराव्या अध्यायात शिवगौरी विवाहाचे आख्यान वर्णन केलेले आहे. ||२०२।। तर चौदाव्या अध्यायात गौरी भिल्लीण झाल्याची कथा आलेली आहे. तसेच या अध्यायात श्रीयाळराजा, चांगुणा आणि चिलया बाळाची कथा सांगितलेली आहे. ||२०३।। अशाप्रकारे स्कंद पुराणातील ब्रह्मोत्तर खंडातला शिवलीला सांगणारा श्री शिवलीलामृत हा ग्रंथ इथे पूर्ण होतो. ।।२०४।। त्यानंतर या ग्रंथाचा समारोप करताना श्रीधर कवी हे आपली गुरुपरंपरा सांगतात. ते म्हणतात की, ब्रह्मामंद यांचा संप्रदाय हा आनंद संप्रदाय आहे. क्षीरसागरात महाविष्णूंनी प्रथम ब्रह्मदेवास उपदेश केला. ।।२०५।। त्यानंतर प्रसिद्ध अत्री मुनी, दत्तात्रय, सदानंद आणि रामानंद अशी परंपरा चालत आली आहे. ।।२०६।। त्याच परंपरेत अमलानंद, ॐ ब्रह्मानंद, कल्याणनिवासी सहजानंद यतींद्र ह्यांचा समावेश आहे. ।।२०७|| त्यांच्यापुढे ही परंपरा यती पूर्णानंद, माझे आजोबा दत्तानंद, माझे सद्गुरू ॐ ब्रह्मानंद आणि माझ्यापर्यंत चालत आली आहे. ।।२०८।।
पंढरीहूनि चारी योजनें दूरी ।। नैर्ऋत्यकोणीं नाझरें नगरी ।। देशलेखक निर्धारीं ।। पूर्वाश्रमीं ब्रह्मानंद ।।२०९।। पुढें पंढरीसी येऊन । केलें तेथें संन्यासग्रहण ।। तेथेंचि समाधिस्थ होऊन ।। अक्षय वस्ती केली पैं ॥२१० ।। तो ब्रह्मानंद माझा पिता ।। सावित्री नामें माझी माता ।। वंदूनि त्या उभयतां ।। शिवलीलामृत ग्रंथ संपविला ॥२११॥ शके सोळाशें चाळीस ।। विलंबीनाम संवत्सरास ॥ शुद्ध पौर्णिमा फाल्गुन मास ।। रविवारीं ग्रंथ संपविला ।। २१२ ।। ब्रह्मकमंडलूच्या तीरीं ।। द्वादशश्मती नाम नगरी ।। आद्यंत ग्रंथ निर्धारीं ।। तेथेंचि झाला जाणिजे ॥२१३॥ शिवलीलामृत ग्रंथ आद्यंत ।। चतुर्दश अध्यायपर्यंत ।। जय ॐ जय शंकर उमानाथ ।। तुजप्रीत्यर्थ हो कां सदा ॥२१४॥ अपर्णाजीवना कर्पूरगौरा ।। ब्रह्मानंदा ॐ जगदुद्धारा ।। श्रीधरहृदयाब्जभ्रमरा ।। अक्षर अभंग दयानिधे ॥२१५॥ शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड ।। स्कंदपुराण ब्रह्मोत्तरखंड ।। सदा परिसोत सज्जन अखंड ॥ चतुर्दशाध्याय गोड हा ॥२१६ ।। ओंव्या एकंदर संख्या ।। २१७।।
श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु ।। शुभं भवतु ।।
माझे पिता अर्थात सद्गुरू हे पंढरीपासून चार योजने नैर्ऋत्य दिशेस असलेल्या नाझरे गावचे एक अधिकारी. ।।२०९।। त्यांनी पुढे पंढरीस येऊन संन्यास ग्रहण केला, चंद्रभागेच्या तीरावरच ते समाधिस्थ झाले. ।।२१०|| श्री ब्रह्मानंद हे माझे पिता, तर सावित्री ही माझी माता. त्या मातृपितृ देवतेस वंदन करून मी हा ग्रंथ येथे संपूर्ण करतो. ।।२११।। प्रस्तुत ग्रंथ हा शके सोळाशे चाळीस मध्ये विलंबीनाम संवत्सरी फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेस रविवारी लिहून पूर्ण झाला. ।।२९२।। ब्रह्मकमंडलू क्षेत्र, कन्हा नदीच्या काठावर द्वादशमती नावाच्या नगरीत हा ग्रंथ पूर्ण झाला.।।२१३।। श्रीशिवलीलामृत ग्रंथ हा मूळ चौदा अध्यायांचा आहे. हे कैलासनाथा, हे उमानाथा, तुझा जयजयकार असो. ||२१४|| अपर्णेचे जीवन असलेल्या, कापरापेक्षाही शुभ्र असलेल्या, ब्रह्मानंदाची आय थेव असलेल्या, हे जगदुद्धारका, माझ्या हृदयी नित्य निवास करणारा तू सदाशिव हा सत्य, अक्षय, अनंत आणि अविनाशी आहेस. ।।२१५।। स्कंद पुराणातील ब्रह्मोत्तरखंडात वर्णन केलेल्या श्रीशिवलीलामृत ह्या ग्रंथाचा हा चौदावा आणि कळसाध्याय शिव भक्त भाविक हे अखंडपणे श्रवण करोत. भगवान शिवाच्या कृपेने सर्वांचे कल्याण होवो.।।२१६।।
||श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु ।।
अधिक माहितीसाठी आमच्या सोशल मीडिया ला फॉलो करा.
मराठी रसिक या आमच्या इंस्टाग्राम अकाउंट ला लाईक करा सुब्स्क्राईब करा. येथे तुम्हाला Shree Shivleelamrut Adhyay Terava संपूर्ण माहिती मराठी मध्ये मिळते.





