Shree Shivleelamrut Adhyay Pahila (1) | श्री शिवलीलामृत अध्याय पहिला (१)

Shree Shivleelamrut Adhyay Pahila

श्री शिवलीलामृत अध्याय पहिला (सार) । Shree Shivleelamrut Adhyay Pahila (Saar)

पूर्वकाळी नैमिषारण्यात वेदव्यासशिष्य ‘सूत’ यांना शौनकादिकांनी विनंती केली की आम्हाला शिवभक्तीचा महिमा सांगावा तेव्हा ते सांगत होते की, या शिवभक्तीचा महिमा अगाध आहे. जो श्रद्धेने श्रवण मनन करेल त्याचे सर्व पापे नष्ट होऊन तो सर्व दुःख मुक्त होईन.शिव मंत्र जपल्याने इष्टफळ प्राप्ती होऊन त्या योगे सर्व व्रत केल्याचे महत् पुण्य लाभते. असे सांगुन पुढे एक कथा सांगीतली. ऐका पूवीं यदुवंशी दाशार्ह नावाचा राजा मथुरा नगरीत राज्य करित होता. तो श्रेष्ठ व पराक्रमी असून काशीराजाची मुलगी कलावती बरोबर त्याचा विवाह झाला होता. एकदा राजाने तीला आपल्या महालात बोलाविले. ती आली नाही म्हणून राजा स्वतः तीचे महालात गेला व न येण्याचे कारण विचारले.

ती म्हणाली ‘नाथ’ मी व्रतस्थ असून शंकराची उपासना करित आहे. मला क्षमा करा ! तरी पण राजाने तीला बळे मिठी मारली तोच राजाचे अंग भाजले. हा काय प्रकार राजाने विचारले. ती म्हणाली नाथ! मी महामुनी दुर्वासाकडून शिवभक्तांची दिक्षा घेतली आहे त्यामुळे मी पवित्र आहे. परंतु आपणाकडून जपतपादिकाहीचं घडले नसुन अनेक पापे आपल्या हातुन घडली आहेत. त्यामुळे आपले शरीर अपवित्र झालेले आहे. आपणास नरक यातना भोगाव्या लागतील. हे ऐकून त्याला कृतकर्माचा पश्चाताप होऊन त्याने तिला शिवमंत्र देण्याविषयी विनंती केली. पत्नीने मंत्र देणे योग्य नाही म्हणून गर्गमुनीकडे नेले.

त्याचा दृढनिश्चय पाहून गर्गमुनीनी दिक्षा देवून शिवमंत्र उपदेशीला. त्या मंत्र सामर्थ्याने राजाच्या शरीरातून पापरूपी काक होरपळत बाहेर पडू लागले व तो निष्पाप झाला. मी पावन झालो म्हणून गर्गमुनीचे पाय धरले व आज माझ्या जन्माचे सार्थक झाले. मी धन्य झालो म्हणून वदन केले व कलावतीसह आपल्या नगरात परत आला. पुढे राजा शिवभजन करू लागला प्रजाही त्याचे अनुकरण करू लागली त्या योगे राज्यातील सर्व अनिष्ट जावून सर्वत्र सुख शांती समृद्धी नांदु लागली.


श्री शिवलीलामृत : अध्याय पहिला

श्रीगणेशाय नमः॥ श्रीसरस्वत्यै नमः ।। श्रीगुरुभ्यो नमः ।। श्रीसांबसदाशिवाय नमः ।। ॐ नमोजी शिवा अपरिमिता ।। आदि अनादि मायातीता ।। पूर्णब्रह्मानंदा शाश्वता ।। हेरंबताता जगद्गुरो ।।१ ।। ज्योतिर्मयस्वरूपा पुराणपुरुषा ।। अनादिसिद्धा आनंदवनविलासा ।। मायाचक्रचाळका अविनाशा ।। अनंतवेषा जगत्पते ॥२॥ जय जय विरूपाक्षा पंचवदना ॥ कर्माध्यक्षा शुद्धचैतन्या ।। विश्वंभरा कर्ममोचकगहना ।। मनोजदहना मनमोहन जो ॥३॥ भक्तवल्लभ तूं हिमनगजामात ।। भाललोचन नीलग्रीव उमानाथ ।। मस्तकीं स्वर्धनी विराजित ।। जातिसुमनहारवत जी ॥४॥ पक्षिरथप्रिय त्रिपुरांतक ।। यक्षपतिमित्र प्रतापार्क ।। दक्षमखविध्वंसक मृगांक ॥ निष्कलंक तव मस्तकीं ॥५॥ विशाळभाळ कर्पूरगौरवर्ण ॥ काकोलभक्षक निजभक्तरक्षण ।। विश्वसाक्षी भस्मलेपन ।। भयमोचन भवहारक जो ।।६।।

श्रीगणेश देवता, सरस्वती माता, सद्‌गुरूनाथ आणि माता पार्वतीसह श्री भगवान सदाशिवास माझा नमस्कार असो. हे सदाशिवा, मी तुला नमन करतो. तुझे रूप ओळखणे हे अशक्य आहे, तू या सर्व विश्वाचा आदिकारण आहेस. तू आदिरहितही आहेस. तू मायेच्या पलीकडला, पूर्ण शाश्वत आणि ब्रह्मानंद देणारा आहेस. हे देवा, तू श्री गणेशाचा पिता आणि सकल विश्वाचा गुरू आहेस. ।।१।। तुझे स्वरूप हे ज्योतिर्मय असून, तू अनादि सिद्ध आणि पुराणपुरुष आहेस. तू अनादि सिद्ध असून, आनंदवनात निवास करणारा आहेस. हे मायेचे चक्र चालविणारा तू अविनाशी असून, नाना रूपे धारण करणारा तू या विश्वाचा स्वामी आहेस. ||२|| हे विरुपाक्षा, हे पंचवदना, तूच सर्व कर्मांचा अधिष्ठाता असून, तू चैतन्यरूप आहेस. तू कर्मफलातून मुक्ती देणारा, मनमोहन आहेस. हे देवा, तुझा जयजयकार असो.।।३।।

प्रभू, तू भक्तप्रिय आहेस, तू हिमालय पर्वताचा जावई आहेस. तू त्रिनेत्रधारी, ज्याचा कंठ निळा आहे असा निलकंठ, उमेचा पती आहेस. तुझ्या मस्तकावरील गंगा ही जणूकाही त्या जाईजुईच्या फुलांच्या माळेप्रमाणे शोभत आहे. ||४|| गरुडवाहन श्री नारायणासही तू अत्यंत प्रिय असून, त्रिपुरासुराचा वधकर्ता, कुबेराचा सखा, पराक्रमाचा सूर्य तू आहेस. तूच दक्षाच्या यज्ञाचा विध्वंस करणारा आहेस. तुझ्या मस्तकावरची चंद्रकोर ही अत्यंत खुलून दिसते आहे.।।५।। ज्याचे कपाळ हे विशाल आहे. ज्याने अंगी भस्मलेपन केलेले आहे, जो निज भक्तांच्यासाठी कालकुटाचे प्राशन करणारा आहे, जो निज भक्तांचे या संसार भयापासून रक्षण करणारा आणि त्यांना भयमुक्त करणारा आहेस. ।।६।।


जो स्वर्गस्थित्यंतकारण ॥ त्रिशूलपाणी शार्दूलचर्मवसन।। स्कंदातात सुहास्यवदन। मायाविपिनदहन जो ॥७॥ जो सच्चिदानंद निर्मळ । शिव शांत ज्ञानधन अचळ। जो भानुकोटितेज अढळ।। सर्वकाळ व्यापक जो ।।८।। सकलकलिमलदहन कल्मषमोचन ।। अनंतब्रह्मांडनायक जगरक्षण ।। पद्यजतातमनरंजन ।। जननमरणनाशक जो ॥९॥कमलोद्भुव कमलावर ॥ दशशतमुख दशशतकर। दशशतनेत्र सुर भूसुर ।। अहोरात्र ध्याती जया ॥१०॥ भव भवांतक भवानीवर ।। स्मशानवासी गिरां अगोचर ॥ जो स्वर्धुनीतीरविहार ।। विश्वेश्वर काशीराज जो ॥११॥ व्योमहरण व्यालभूषण ॥ जो गजदमन अंधकमर्दन ॥ॐकार अमलेश्वर आनंदघन ।। मदनगर्वभंजन अज अजित जो ॥१२॥ अमितगर्भ निगमागमनुत ।। जो दिगंबर अवयवरहित ।। उज्जयिनीमहांकाळ कालातीत ॥ स्मरणे कृतांतभय नाशी ॥१३॥ दुरितकाननवैश्वानर ।। जो निजजनचित्तचकोरचंद्र ।। वेणुनृपवरमहत्पापहर ।। घृष्णेश्वर सनातन जो ॥१४॥

तू उत्पत्ती स्थिती आणि लय या अवस्थांचे कारण आहे. तू व्याघ्रांबर परिधान करणारा, त्रिशूल हाती धारण करणारा, मायारूपी अरण्याचे दहन करणारा, सुहास्य वदना असा स्कंद पुत्राचा पिता आहेस. ।।७।। हे देवा, तू सच्चिदानंद रूपा, शिवस्वरूपा, शांत, प्रसन्न, पवित्र, आनंदमयी आहेस. तू कोटि सूर्यासम तेजस्वी असून, तूच अवघे विश्व व्यापून उरलेला आहेस. ||८||

तू कलिमल दहन करणारा, भक्तांना सकल पाप ताप दोषातून मुक्त करणारा आहेस. तू अनंत ब्रह्मांडाचा नायक असून, विश्वाचे पालन रक्षण करणारा आहेस. तू ब्रह्माचा पिता आणि नारायणाचे मन रंजन करणारा आहेस. या विश्वात चालणारा जन्ममृत्यूचा सारा खेळ हा तुझाच आहे. ।।९।। कमळातून उत्पन झालेला ब्रह्मा, लक्ष्मीचा पती आहे, सहस्र हातांचा सूर्य, सहस्र नेत्रांचा चंद्र आणि सकल देवदेवता आणि ब्राह्मण हे ज्याचे रात्रंदिन ध्यान करतात तो देवांचाही महादेव तूच आहेस. ।।१०।।

हे देवा, तू भवानीचा पती आहेस. तू भवाचे भय नाश करणारा आहेस. तू जसा स्मशानवासी आहेस, तसाच तो पुण्यपावन अशा गंगातीरावरील काशी नगरीचा रहिवासी आहेस. ||११|| ज्याच्यामध्ये सर्व महातत्त्वे सामावली आहेत, ज्याने सर्पाच्या माळा गळ्यात धारण केलेल्या आहेत. ज्याने गजासुराचा माज उतरवला आहे, जो अज्ञानाचा अंध:कार दूर करणारा आहे असा ॐकार स्वरूप, महाबलशाली, आनंददाता, मद आणि अहंकार गर्व मोडून काढणारा अजिंक्य असा देव तूच आहेस. ||१२|| हे शिवा, तू दिगंबर असून, निरावयवरूप आहेस. तूच उज्जैनीच्या महाकालरूपी आहेस. तुझ्या या रूपाच्या दर्शनाने यमाचे अर्थात मृत्यूचेही भय राहात नाही. ।।१३।। पापरूपी अरण्याचे दहन करणारा अग्नी तू आहेस. आपल्या भक्तांच्या मनास आल्हाद देणारा चंद्र तूच आहेस. वेणू राजाची अनेक महापापे नाहीशी करणारा, त्यास पुण्य प्रदान करणारा घृष्णेश्वर तूच आहेस.।।१४।।


जो उमाहृदयपंजरकीर ।। जो निजजनहृदयाब्जभ्रमर ।। जो सोमनाथ शशिशेखर ।। सौराष्ट्रदेशविहारी जो ।।१५।। कैरवलोचन करुणासमुद्र ।। रुद्राक्षभूषण रुद्रावतार ।। भीम भयानक भीमाशंकर ।। तपा पार नाहीं ज्याच्या ।।१६ ॥ नागदमन नागभूषण ।। नागेंद्रकुंडल नागचर्मपरिधान ।। ज्योतिर्लिंग
नागदमन नागभूषण ।। नागेंद्रकुंडल नागचर्मपरिधान ।। ज्योतिर्लिंग नागनाथ नागरक्षण ।। नागाननजनक जो ॥१७॥ वृत्रारिशत्रुजनकवरदायक। बाणवल्लभ पंचबाणांतक ।। भवरोगवैद्य त्रिपुरहारक ।। वैजनाथ अत्यद्भुत जो ॥१८॥ त्रिनयन त्रिगुणातीत ।। त्रितापशमन त्रिविधभेदरहित ।। त्र्यंबकराज त्रिदोषानलशांत ।। करुणाकर बलाहक जो ॥१९॥ कामसिंधुरविदारक कंठीरव ।। जगदानंदकंद कृपार्णव ।। हिमनगवासी हैमवतीधव ।। हिमकेदार अभिनव जो ॥२०॥ पंचमुकुट मायामलहरण ।। निशिदिन गाती आम्नाय गुण ॥ नाहीं जया आदि मध्य अवसान ।। मल्लिकार्जुन श्रीशैलवासी ॥ २१ ॥ जो शक्रारिजनकांतकप्रियकर ।। भूजासंतापहरण जोडोनि कर॥ जेथे तिष्ठत अहोरात्र ।। रामेश्वर जगद्गुरु ।। २२ ।।

सती उमेच्या हृदयात निवास करणारा राघू तूच आहेस. भक्तांच्या हृदयात रमणारा भ्रमर तूच आहेस. सौराष्ट्रामधला सोमनाथ म्हणून प्रसिद्ध असणारा महादेवही तूच आहेस. ।।१५।। हे प्रभू, तुझे नयन कमळासारखे आहेत. तुझ्या हृदयात करुणेचा अथांग सागर आहे. तू रुद्राक्षाची भूषणे धारण केलेला रुद्रावतारी श्री भीमाशंकरही तूच आहेस. ।।१६।। तूच नागासुराचा वध करून नागाचीच भूषणे अंगी धारण केलेली आहेत. नागाची माळ, नागेंद्राची कुंडले, नागाच्या कातड्यांचे वस्त्र हे तू परिधान केलेले आहे. तसेच नागांचे रक्षण करणारे तुझे नागनाथ हे ज्योतिर्लिंग प्रसिद्ध आहे. तू नागासारखे मुख असणाऱ्या श्री गणेशाचा जनक आहेस, पिता आहेस. ।।१७।।

तू इंद्राचा शत्रू असलेल्या इंद्रजीताचा पिता अर्थात रावण ह्याला वर देणारा, बाणासुराला प्रिय असलेला, मदनाचाही अंत करणारा तुझ्या सर्वसामान्य भक्तांचे प्रापंचिक आप-ताप हरण करणारा असा वैजनाथ आहेस. ||१८|| हे देवा, तू त्रिनेत्रधारी, त्रिगुणातीत, त्रिविध ताप हारक तसेच त्रिदोष अर्थात कफ पित्त वात हे दूर करणारा आहेस. तूच करुणेची बरसात करणारा कृपामेध आहेस ।।१९।।

कामवासना रूपी गजाचे हनन करणारा वनराज सिंह तूच आहेस. तू स्वानंद सुखाचा सागर आहेस. तू हिमकन्या पार्वतीचा पती परमेश्वर आहेस. तू हिमालयात निवास करणारा हिमकेदार आहेस. ||२०|| हिमालयाची पाच उंच शिखरे ही जणू तुझ्या मस्तकावरील मुकुट आहेत. तू मायेचा पटल दूर करणारा, वेदशास्त्रांनी पुराणांनी ज्याची स्तुती करावी असा देव तू आहेस. तुला आदि, मध्य किंवा अंत काही नाही. श्री शैल्यपर्वतावर निवास करणारा श्री मल्लिकार्जुन तूच आहेस. ||२१|| तू शक्र अर्थात इंद्राचा शत्रू जो इंद्रजीत. त्याच्या पित्याचा वध करण्यासाठी नारायणाने जो श्री राम अवतार घेतला, त्या रामाचे तू उपास्य दैवत आहेस. रामाचा शीण दूर करणारा, त्यास सुखविणारा रामेश्वररूपी ईश्वर ही तूच आहेस. ॥२२॥


ऐसिया शिवा सर्वोत्तमा ।। अज अजित ब्रह्मानंदधामा ।। तुझा वर्णावया महिमा । निगमागमां अतक्य॥ २३॥ ब्रह्मानंद म्हणे श्रीधर ।। तव गुणार्णव अगाध थोर ।। तेथें बुद्धि चित्त तर्क पोहणार ।। न पावती पार तत्त्वतां ।। २४ ।। कनकाद्रिसहित मेदिनीचें वजन ।। करावया ताजवा आणूं कोठून ।। व्योम सांठवे संपूर्ण ।। ऐसें सांठवण कोठूनि आणूं ॥ २५ ॥ मेदिनीवसनाचें जळ आणि सिकता ।। कोणत्या मापें मोजू आतां ।। प्रकाशावया आद मेदिनीवसनाचें जळ आणि सिकता ।। कोणत्या मापें मोजू आतां ।। प्रकाशावया आदित्या ।। दीप सरता केवीं होय ॥ २६ ॥ धरित्रीचें करूनि पत्र ॥ कुधर कज्जल जलधि मषीपात्र ॥ सुरद्रुम लेखणी विचित्र ॥ करूनि लिहीत कंजकन्या ॥२७॥ तेही तेथे राहिली तटस्थ ।। तरी आतां केवीं करूं ग्रंथ ।। जरी तूं मनीं धरिसी यथार्थ ।। तरी काय एक न होय ॥ २८ ॥ द्वितीयेचा किशोर इंदु ।। त्यासी जीर्ण दशी वाहती दीनबंधु ।। तैसें तुझे गुण करुणासिंधु ॥ वर्णीतसें अल्पमती ।। २९ ।। सत्यवतीहृदयरत्नमराळ ॥ भेदीत गेला तव गुणनिराळ ॥ अंत न कळेचि समूळ ॥ तोही तटस्थ राहिला ॥३०॥

अशाप्रकारे त्या श्री सदाशिवाचे गुणवर्णन करून श्रीधर कवी म्हणतात की, हे सदाशिवा, तू जन्मरहित, अजिंक्य आणि ब्रह्मानंद दाता आहेस. तुझा महिमा वर्णन करण्यास वेदशास्त्रे, पुराणेही मागे पडतात असा तुझा महिमा अगम्य आणि अतर्क्य आहे. ।।२३।। अशा या ब्रह्मानंद रूप शिवास श्रीधर स्वामी म्हणतात की, तुझा गुणसागर हा अथांग आहे. त्या सागरावर वृत्ती, बुद्धी आणि तर्काचे अनेक तरंग उठत असतात, पण तरीही कशानेही तुझा मात्र थांग लागत नाही. ।। २४।॥

हे देवा, अरे सुवर्णाच्या साठ्याने भरलेल्या धरणीचे वजन करू शकेल असा ताजवा कोठून आणावा संपूर्ण आकाश ज्यात सामावून घेता येईल असे विशाल पात्र कोठून आणावे? तसेच तुझे गुणवर्णन हे मी पामराने काय आणि कसे करावे? ।।२५।। या सकल भूमीवरचे पाणी आणि वाळूचे कण मोजण्यासाठी कोणते बरे माप वापरावे? सूर्योदय झाला आहे हे कोणत्या दीपाने शोधावे बरे ? ।।२६।।

स्वतः सरस्वती ही जरी पृथ्वीचा कागद, सागराची शाई, कल्पतरूंची लेखणी करून तुझे गुणवर्णन लिहू लागली तरी तिलाही जिथे मध्येच थांबावे लागते. ||२७|| तीदेखील तुझे यथार्थ वर्णन करू शकत नाही, तिथे माझ्यासारख्या पामराने हे तुझे लीलामृत काय आणि कसे बरे ग्रंथित करावे? पण केवळ तूच हे मनात आणलेस तर काय बरे होऊ शकणार नाही रे? ।। २८ ।। हे देवा, ज्याप्रमाणे द्वितीयेच्या चंद्रकोरीस सामान्य लोक जुन्या वस्त्राचा धागा प्रेमभराने अर्पण करतात, तसाच हे करुणासागरा, मी तुझे गुणवर्णन करण्याचा हा अल्पमतीने प्रयत्न करीत आहे. ||२९|| हे सदाशिवा, अरे जिथे साक्षात सरस्वतीचा हृदय हंस व्यास बाल देखील तुझे यथार्थ वर्णन करू शकला नाही, तर त्याचीही मती कुंठित झाली ।।३०।।


तेथे मी मंदमति किंकर । केवीं क्रमूं शकें महिमांबर ।। परी आत्मसार्थक करावया साचार ।। तव गुणार्णवीं मीन झालों ॥ ३१ ॥ ऐसें शब्द ऐकतां साचार ।। तोषला दाक्षायणीवर ।। म्हणे शिवलीलामृत ग्रंथ परिकर ।। आरंभीं रस भरीन मी ॥३२॥ जैसा धरूनि शिशूचा हात ।। अक्षरें लिहवी पंडित ।। तैसें तव मुखें मम गुण समस्त ।। सुरस अत्यंत बोलवीन मी ॥ ३३ ॥ श्रोतीं व्हावें सावधचित्त ।। स्कंदपुराणीं बोलिला श्रीशुकतात ।। अगाध शिवलीलामृत ग्रंथ ।। ब्रह्मोत्तरखंड जें ॥ ३४ ॥ नैमिषारण्यीं शौनकादिक सुमती ।। सूताप्रति प्रश्न करिती ।। तूं चिदाकाशींचा रोहिणीपती ।। करीं तृप्ति श्रवणचकोरां ॥३५॥ तुवां बहुत पुराणें सुरस ।। श्रीविष्णुलीला वर्णिल्या विशेष ॥ अगाध महिमा आसमास ।। दशावतार वर्णिलें ॥ ३६ ।। भारत रामायण भागवत ॥ ऐकतां श्रवण झाले तृप्त ।। परी शिवलीलामृत अद्भुत । श्रवणद्वारें प्राशन करूं।। ३७ ।। यावरी वेदव्यासशिष्य सूत ।। म्हणे ऐका आतां देऊनि चित्त ॥ शिवचरित्र परमाद्भुत ।। श्रवणें पातकपर्वत जळती ॥३८॥

तिथे माझ्यासारख्या सर्वसामान्य बुद्धीच्या पामराला तुझा अगाध लीलावर्णन हे कसे करता येणार? तरीही माझ्या जिवाचे कल्याण व्हावे, जिवाशिवाची भेट घडावी, जन्म सार्थकी लागावा ह्यासाठी मी या तुझ्या गुणसागरातील मासा झालो आहे. ||३१|| श्रीधर कवींनी केलेली ही सर्व स्तुती ऐकल्यावर स्वतः भगवान शिव हे त्यांच्यावर प्रसन्न झाले. त्यांना भगवान म्हणाले, “बा श्रीधरा, मी तुझ्या ह्या स्तवनावर प्रसन्न झालो आहे. आता तू माझ्या शिवलीलीमृत कथनास प्रारंभ कर. त्यात मी स्वतः सुंदर रस भरेन. ।।३२।। ज्याप्रमाणे पंडित पुत्राचा हात धरून त्यास लिहिता करतो तसे मी तुझ्या मुखातून मी ही शिवलीला वर्णन करवून घेईन.” ।।३३।। ह्या अभिवचनानंतर स्फूर्ती लाभलेले श्रीधर कवी श्रोत्यांना म्हणतात की, हे श्रोतेजनहो, शुक पिता व्यास ह्यांनी स्कंद पुराणात सांगितलेल्या ब्रह्मोत्तर खंडातील शिवलीलामृताच्या ग्रंथ श्रवणास आता आपण सादर व्हा. ।॥३४॥

नैमिषारण्यात शौनकादिक आर्त जाणकार मंडळी ही सूतास विनंती करतात की, हे चितस्वरूप आकाशातील पूर्ण ज्ञानचंद्रा तू आर्त चकोर रूपी आम्हा आर्ताची श्रवण इच्छा पूर्ण कर. ।।३५।। हे ज्ञानवंता, तू आजवर आम्हास भगवान महाविष्णूंच्या, त्यांच्या दशावताराच्या अनेक कथा मोठ्या रसाळपणे वर्णन करून सांगितल्या आहेस. ||३६|| तुझ्या मुखातून त्या रामायण, महाभारत आणि भागवताच्या रसाळ कथा ऐकून आमचे कान आणि अंत:करण पूर्ण तृप्त झाले आहेत. आता आमच्या श्रवणास तुझ्या अमृतमय वाणीतून ती भगवान शिवांचे लीलामृत ऐकण्याची आर्त इच्छा आहे. ती तू पूर्ण कर. ।।३७॥ त्यावेळी वेदव्यासपुत्र सूत हा त्या समोरच्या आर्त जिज्ञासू श्रोत्यांना म्हणाला, हे भक्तांनो, आता मी तुम्हास त्या अत्यंत अद्भुत असलेल्या शिवचरित्राचे आणि त्याच्या लीलांचे वर्णन करतो. त्याच्या श्रवणाने तुमच्या अनंत पापांच्या राशी जळून भस्मसात होतील. ।।३८।।


आयुरारोग्य ऐश्वर्य अपार ।। संतति संपत्ति ज्ञानविचार ।। श्रवणमात्रे देणार ।। श्रीशंकर निजांगें ॥३९॥सकळतीर्थव्रतांचें फळ ॥ महामखांचें श्रेय केवळ ॥ देणार शिवचरित्र निर्मळ ।॥ श्रवणें कलिमल नासती ।।४० ।। सकल यज्ञांमाजी जपयज्ञ थोर ॥ म्हणाल जपावा कोणता मंत्र ।॥ तरी मंत्रराज शिवषडाक्षर ।। बीजसहित जपावा ॥ ४१ ॥ दुजा मंत्र शिवपंचाक्षर।। दोहींचें फळ एकचि साचार ।। उतरी संसारार्णव पार ।। ब्रह्मादिसुरऋषी हाचि जपती ॥४२ ।। दारिद्र्य दुःख भय शोक ।। काम क्रोध द्वंद पातक ।। इतुक्यांसही संहारक ।। शिवतारक मंत्र जो ॥४३ ।। तुष्टिपुष्टिधृतिकारण ।। मुनिनिर्जरांसी हाचि कल्याण ।। कर्ता मंत्रराज संपूर्ण ।। अगाध महिमा न वर्णवे ।।४४ ।। नवग्रहांत वासरमणि थोर ।। तैसा मंत्रांत शिवपंचाक्षर ।। कमलोद्भव कमलावर ॥ अहोरात्र हाचि जपती ।॥ ४५ ॥ शास्त्रांमाजी वेदांत ।। तीर्थांमाजी प्रयाग अद्भुत ।। महास्मशान क्षेत्रांत ।। मंत्रराज तैसा हा ॥ ४६ ॥ शस्त्रांमाजी पाशुपत ।। देवांमाजी कैलासनाथ ।। कनकाद्रि जैसा पर्वतांत ।। मंत्र पंचाक्षरी तेवीं हा ।।४७ ॥ केवळ परमतत्त्व चिन्मात्र ।। परब्रह्म हेंचि तारक मंत्र । तीर्थव्रतांचे संभार ॥ ओंवाळूनि टाकावे।।४८।।

भगवान शिवाच्या कृपेने श्रवणकर्त्यास संतती, संपत्ती, सुख, आरोग्य आणि ज्ञान या गोष्टी स्वतः भगवान शिव हे प्रदान करतील. ।। ३९ ।। सर्व तीर्थांचे आणि व्रतांचे फळ पदरी देणारे, महायज्ञाचे पुण्य देणारे असे जे शिवलीलामृत आहे; त्याच्या श्रवणाने तुमचे कलियुगातील सर्व प्रकारचे दोष हे नष्ट होतील. ।।४० ।। सर्व यज्ञांत जपयज्ञ हा सर्वश्रेष्ठ असून, जपातला श्रेष्ठ जप कोणता, असे जर तुम्ही विचाराल तर ॐ नमः शिवाय हा शिवाचा षडाक्षरी मंत्र हाच अत्यंत श्रेष्ठ असा मंत्र आहे. ।।४१।।

दुसरा मंत्र हा पंचाक्षरी म्हणजेच नमः शिवाय हा आहे. यापैकी कोणताही मंत्र जरी उपास काने जपला तरी त्याचे फळ हे सारखेच आहे. या भवसागरातून तरून जाण्यासाठी ब्रह्मादिक ऋषी, मुनी, जपी, तपी आणि शिवभक्त हे ह्याच मंत्राचा जप करतात. ।।४२।। दारिद्रय, दुःख, भय आणि शोक तसेच काम, क्रोध, द्वंदीक पातकांचाही या शिवतारक मंत्राने नाश होतो. ।।४३।।

हा मंत्र उपासकास तुष्टी, पुष्टी आणि धारणा प्राप्त करून देणारा आहे. कल्याणकारी या मंत्राचे महात्म्य अगाध आहे. ।।४४।। ज्याप्रमाणे नवग्रहांत सूर्य हा श्रेष्ठ तसा मंत्रातला हा मंत्र अतिश्रेष्ठ आहे. प्रत्यक्ष भगवान महाविष्णू आणि ब्रह्माजीसुद्धा ह्याच मंत्राचा नित्य जप करतात. ।।४५|| ज्याप्रमाणे सर्व शास्त्रांमध्ये वेदशास्त्र, तीर्थांच्या मध्ये प्रयागतीर्थ, क्षेत्रांमध्ये काशी क्षेत्र हे पवित्र आहेत; तसा सर्व मंत्रांतला हा पवित्र असा मंत्र आहे. ।।४६।। जसे शस्त्रात पाशुपास्त्र, देवांमध्ये महादेव, पर्वतांमध्ये मेरू पर्वत हेच अद्वितीय असे आहेत, तसा मंत्रांमधला अद्वितीय असा मंत्र हा हाच शिवमंत्र आहे. ।। ४७।। हा मंत्र तारक मंत्र आहे. तो चित्शक्तीने युक्त आहे. तो श्रेष्ट आहे. ज्याच्यावरून सर्व तीर्थे आणि व्रते ओवाळून टाकावीत असा हा पवित्र आणि श्रेष्ठ असा मंत्रराज आहे. ॥४८॥


हा मंत्र आत्मप्राप्तीचीं खाणी ॥ कैवल्यमार्गीचा प्रकाशतरणी ।। अविद्याकाननदाहक ब्रह्मात्री ।।सनकादिक ज्ञानी हाचि जपती ॥४९ ।। स्त्री शूद्र आदिकरूनी ।। हाचि जप मुख्य चहूं वर्णी ।। गृहस्थ ब्रह्मचारी आदिकरूनी ।॥ दिवसरजनीं जपावा ।। ५० ।। जागृतीं स्वप्नीं येतां जातां ।। उभे असतां निद्रा करितां ।। कार्या जातां बोलतां भांडतां ।। सर्वदाही जपावा ॥ ५१ ॥ शिवमंत्रध्वनिपंचानन ।। कर्णी आकर्णितां दोषवारण ।। उभेचि सांडिती प्राण ।। न लागतां क्षण भस्म होती ॥५२ ।।न्यास मातृकाविधि आसन ।। नलगे जपावा प्रीतीकरून ॥ शिव शिव उच्चारितां पूर्ण ॥ शंकर येऊनि पुढे उभा ।।५३।। अखंड जपती जे हा मंत्र ।। त्यांस निजांगें रक्षी त्रिनेत्र ।। आपल्या अंगाची साउली करी पंचवक्र ॥ अहोरात्र रक्षी तयां ।।५४ ।। मंत्रजपकांलागुनी ।। शिव म्हणे मी तुमचा ऋणी ।। परी तो मंत्र गुरुमुखेंकरूनी ।। घेईजे आधीं विधीनें ॥५५॥ गुरु करावा मुख्यवर्ण ॥ भक्ति वैराग्य दिव्यज्ञान ।। सर्वज्ञ उदार दयाळू पूर्ण ।। या चिन्हेंकरून मंडित जो ॥५६ ॥ मितभाषणी शांत दांत ।। अंगीं अमानित्व अदंभित्व ।। अहिंसक अतिविरक्त ।। तोचि गुरु करावा ।।५७ ।।

हा मंत्र आत्मलाभाची खाण मिळवून देणारा, कैवल्य मार्ग दाखविणारा, अविद्येचे अरण्य जाळणारा ब्रह्मज्ञानाग्नी आहे. त्यामुळेच सनकादिक ऋषीमुनी, ज्ञानी लोक हे याच मंत्राचे श्रद्धायुक्त पठण करतात. ।।४९।। हा मंत्र चारी वर्णांतील कोणासही जपता येणारा आहे. तसेच तो स्री शुद्रांनाही जपता येण्यासारखा आहे. हा मंत्र गृहस्थाश्रमी, ब्रह्मचारी, जपीतपी, सिद्धसाधक ह्यापैकी कोणीही रात्रंदिवस केव्हाही जपावा असा सिद्ध मंत्र आहे. ।।५०।। हा शिवमंत्र कोणी केव्हाही अगदी जागेपण, स्वप्नात, येताजाता, उठताबसता, चालताबोलता, इतकेच नव्हे तर अगदी भांडताना, वाद करतानाही जपावा. ।।५१।।या शिवमंत्राचा उच्च आवाज ऐकताच ज्याप्रमाणे सिंहनादाने भयभीत होऊन हत्ती प्राणत्याग करतात. त्याप्रमाणे पापे पलायन करतात किंवा जळून भस्मसात होतात. ।।५२|| हा मंत्र जप करतो, त्याचे पुढ्यात साक्षात शिव भगवान येऊन उभे राहतात. ।॥५३॥

जे हा मंत्र जपतात, त्याचे रक्षण स्वतः त्रिनेत्रधारी भगवान करतात. ते आपल्या अशा जपकर्त्या भक्तांवर स्वतःच्या देहाची नित्य कृपासावली धरतात. ।।५४।। जे या मंत्राचा जप करतात, त्यांचा मी ऋणी आहे असे भगवंत म्हणतात. मात्र हा असा मंत्र उपासकाने विधियुक्त आणि तोही गुरूमुखातून घेणे हे त्याच्या दृष्टीने अधिक हिताचे असते. ।।५५।। आता हा गुरू कसा असावा? तर तो उच्च वर्णाचा, ज्ञानी, उदार, दयाळू आणि स्वतः अनुभवसंपन्न अस असावा. ।।५६।। जो मितभाषी, शांत स्वभावाचा, निगर्वी, निरहंकारी, विरक्त, परोपकारी, अहिंसक आहे असा असावा. ॥५७॥


वर्णानां ब्राह्मणो गुरुः ।। हा वेदवचनें निर्धारु ।। हा त्यापासोनि मंत्रोच्चारु ।। करोनि घ्यावा प्रीतीनें ।।५८ ।। जरी आपणासी ठाउका मंत्र ।। तरी गुरुमुखें घ्यावा निर्धार ।। उगाचि जपे तो अविचार ।। तरी निष्फळ जाणिजे ॥५९॥ कामक्रोधमदयुक्त ॥ जे कां प्राणी गुरुविरहित ॥ त्यांनी ज्ञान कथिलें बहुत ।। परी त्यांचें मुख न पहावें ॥६०॥ वेदशास्त्रं शोधून ॥ जरी झालें अपरोक्षज्ञान ॥ करी संतांशीं चर्चा पूर्ण ॥ तरी गुरूविण तरेना ॥६१॥ एक म्हणती स्वप्नीं आम्हांतें ।। मंत्र सांगितला भगवंतें ।। आदरें सांगे लोकांतें ।। परी तो गुरूविण तरेना ।। ६२ ।। प्रत्यक्ष येऊनियां देव ।। सांगितला जरी गुह्वाभाव ।। तरी तो न तरेचि स्वयमेव ।। गुरूसी शरण न रिघतां ॥ ६३ ॥ मौंजीबंधनाविण गायत्रीमंत्र ॥ जपे तो भ्रष्ट अपवित्र ।। वराविण वऱ्हाडी समग्र ।। काय व्यर्थ मिळोनी ॥ ६४ ॥तो वाचक झाला बहुवस ।। परी त्याचे न चुकती गर्भवास ।। म्हणोनि सांप्रदाययुक्त गुरूस ।। शरण जावें निर्धारें ॥ ६५ ॥ जरी गुरु केला भलता एक ।। परी पूर्वसांप्रदाय न प्ते ठाऊक ॥ जैसें गर्भाधासी सम्यक ॥ वर्णव्यक्त स्वरूप न कळेचि ।। ६६ ।।

सर्व वर्णामध्ये ब्राह्मण हा श्रेष्ठ मानलेला असून, अशा विप्राकडून, बह्मोपासकाकडून मंत्रदिक्षा घेणे हे अधिक हितकारक आहे. ।।५८|| केवळ आपल्याला ठाऊक आहे म्हणून असा मंत्र जपू नये. त्याचा उपयोग होत नाही. तर मंत्र हा गुरुमुखातूनच आलेला असावा. ।।५९|| जो काम, क्रोध, मद, मत्सर, अहंकारी आहेत, ज्यांनी गुरू केलेला नाही, अशांचे तोंडही पाहू नये. ।। ६० ।।

कोरड्या वेदाध्ययनाने जरी अपरोक्ष ज्ञान झाले तरी त्यास प्रत्यक्ष संताशी संवाद साधता येत नाही, त्याचे ते पढत ज्ञान अपुरे पडते. एका सद्‌गुरू आणि त्याच्या कृपेशिवाय खरी ज्ञानप्राप्ती होत नाही. ।।६१।। काही लोक मोठ्या फुशारकीने देवाने आम्हास स्वप्नात येऊन हा मंत्र सांगितला असे फुशारकीने सांगतात. पण त्यांनादेखील सद्‌गुरूशिवाय तरणोपाय मिळत नाही. ||६२।|प्रत्यक्ष देवाने जरी येऊन मंत्रोपदेश केला, तरी तो मंत्र गुरुकृपेशिवाय फलद्रूप होत नाही. ।। ६३ ।।

ज्याप्रमाणे एका नवरदेवाशिवाय अन्य सर्व वऱ्हाडी मंडळी ही जशी निरर्थक ठरतात, तसा मुंज झालेली नसताना केलेला गायत्री मंत्राचा जप हा भ्रष्ट, अपवित्र आणि निरुपयोगी ठरतो. ||६४ ।। उपासक, साधक हा किती जरी वाचक असला, तरी एका गुरूशिवाय त्याचा गर्भवास चुकत नाही. जिवाच्या कल्याणासाठी त्याने सांप्रदायिक सद्‌गुरूलाच शरण जाण्यात त्याचे खरे कल्याण असते. ।। ६५ ।। जर कोणी योग्य अशा गुरूची निवड केली नाही, तर त्याची अवस्था ही जन्मतःच अंध असलेल्या व्यक्तीसारखी होते. त्यास रंग, रूप, आकार कशाचेच दर्शन घडत नसते. ।।६६ ।।


असो त्या मंत्राचें पुरश्चरण ।। उत्तमक्षेत्रीं करावें पूर्ण ।। काशी कुरुक्षेत्र नैमिषारण्य ।। गोकर्णक्षेत्र आदिकरूनि ॥६७ ।।शिवविष्णुक्षेत्र सुगम ।। पवित्र स्थळीं जपावा सप्रेम ।। तरी येचिविषयीं पुरातन उत्तम ।। कथा सांगेन ते ऐका ॥ ६८ ॥ श्रवणीं पठणीं निजध्यास ।। आदरें धरावा दिवसेंदिवस ।। अनुमोदन देतां कथेस ।। सर्व पापांस क्षय होय ॥ ६९ ॥ श्रवण मनन निजध्यास ।। धरितां साक्षात्कार होय सरस ।। ब्रह्मघ्न मार्गघ्न तामस ।। श्रवणें पावन सर्व होती ॥ ७० ॥ तरी मथुरानाम नगर ।। यादववंशीं परमपवित्र ।। दाशार्हनामें राजेंद्र ।। अति उदार सुलक्षणी ॥ ७१ ॥ सर्व राजे देती करभार ।। कर जोडोनि नमिती वारंवार ।। त्यांच्या मुकुटरत्नकिरणें साचार ।। प्रपदें ज्याचीं उजळलीं ॥७२॥ मुकुटघर्षणेंकरूनी ।। किरणें पडलीं दिसतीं चरणीं ।॥ जेणें सत्तावसन पसरुनी ॥ पालाणिली कुंभिनी हे ॥७३॥ उभारिला यशोध्वज ।। जेवीं शरत्काळीचा द्विजराज ।। सकल प्रजा आणि द्विज ।॥ चिंतिती कल्याण जयाचें ।।७४ ।।जैसा शुद्धद्वितियेचा हिमांश ।। तेवीं ऐश्वर्य चढे विशेष ।। जो दुर्बुद्धिदासीस ।। स्पर्श न करी कालत्रयीं ।॥७५ ।। सद्बुद्धिधर्मपत्नीसीं रत ।। स्वरूपाशीं तुळिजे रमानाथ।।दानशस्त्रें समस्त।।याचाकांचें दारिद्र्य निवटिलें।।७६।।

या मंत्राचा जप हा काशी, कुरुक्षेत्र, नैमिषारण्य, गोकर्ण महाबळेश्वर अशा पवित्र स्थानी केला तर सार्थ होतो. ।। ६७॥ भगवान शिव आणि विष्णु ह्यांच्या वास्तव्याने पुनित झालेल्या स्थानी हा जप केला तर त्याचे कोणते फळ मिळते; यासंदर्भात मी तुम्हास एक पुरातन कथा सांगतो ती ऐका. ।।६८।। या कथेचे श्रवण, मनन अन् ध्यास धरल्यास त्या कथेस अनुमोदन दिल्यास जिवाच्या सर्व पापांचा नाश होतो. ।। ६९।।

या कथेच्या श्रवणाने ब्राह्महत्येचेोहरी पाप दूर होते. वाटमारी करणारा, क्रोधी असा मनुष्यही या श्रवणाने पावन होतो. ।।॥७०।। मथुरा नावाच्या नगरीत एक यादव कुळात जन्मलेला दशाई नावाचा राजा राज्य करीत होता. हा राजा शुद्ध पवित्र अशा आचार आणि विचारांचा होता. तो उदार आणि शुभलक्षणी होता. ।।७१।।इतर सर्व राजे त्यास खंडणी देत, त्याचा आदर करीत. ते या दशार्हराजाच्या चरणी नतमस्तक झाले की, त्यांच्या मुकुटातील रत्नकिरणांनी राजाचे चरण उजळून निघत असत. ।।७२।।

त्याचा मुकुट हा इतका प्रकाशमान होता की, त्यामुळे त्याचे चरण उजळून जात. या राजाने आपल्या राजसत्तेचे वस्त्र जणू धरित्रीस पांघरविले होते. ।॥७३॥ त्याच्या यशाचा ध्वज सर्वत्र फडकत होता. सर्व प्रजाजन आणि राज्यातला ब्रह्मवृंद हा नेहमीच राजाचे कल्याण चिंतित असे. ।॥७४॥ द्वितीयेच्या चंद्रकोरीप्रमाणे राजाचे ऐश्वर्य हे दिसामासांनी सतत वाढत होते. तो दुर्बुद्धीस कधीच आपल्या जवळही करील नसे. ॥७५॥ हा राजा आपल्या धर्मपत्नीशी रत होत असे. तो नाना प्रकारची दाने देऊन आपल्या प्रजाजनांचे दैन्य हरण करीत असे. ।।७६।


भूभुजांवरी जामदग्य ।।॥ समरांगणीं जेवीं प्रळयाग्न ।। ठाण न चळे रणींहून ।। कुठारघायें भूरूह जैसा ॥७७॥ चतुर्दश विद्या चौसष्टी कळा ॥ आकळी जेवी करतळींचा आंवळा ॥ जेणें दानमेघें निवटिला ।। दारिद्र्यधुरोळा याचकांचा ॥७८ ।। बोलणें अतिमधुर ।। मेघ गर्जे जेवीं गंभीर ।। प्रजाजनांचें चित्तमयूर ।। नृत्य करिती स्वानंदें ।॥ ७९ ॥ ज्याचा सेनासिंधू देखोनि अद्भुत ।। जलसिंधु होय भयभीत ।। निश्चळ अंबरीचा ध्रुव सत्य ।। वचन तेवीं न चळेचि ॥ ८० ॥त्याची कांता रूपवती सती ।। काशीराजकुमारी नाम कलावती ।। जिचें स्वरूप वर्णीं सरस्वती ।। विश्ववदनेंकरूनियां ।।८१ ।। जे लावण्यसागरींची लहरी ।। खंजनाक्षी बिंबाधरी ।। मृदुभाषिणी पिकस्वरी ।। हंसगमना हरिमध्या ॥८२॥ शशिवदना भुजंगवेणी ।। अलंकारां शोभा जिची तनु आणी ।। दशन झळकती जेवीं हिरेखाणीं ।। बोलतां सदनीं प्रकाश पडे ॥८३॥ सकलकलानिपुण ।। यालागीं कलावती नाम पूर्ण ।। जें सौंदर्यवैरागरींचें रत्न ॥ जे निधान चातुयँ भूिमीचें ॥८४॥ आंगींचा सुवास न माये सदनांत ।। जिचें मुखाब्ज देखतां नृपनाथ ।। नेत्रमिलिंद रुंजी घालीत ।। धणी पाहतां न पुरेचि ॥८५॥

तो इतर राजांच्या समोर जमदनी पुत्र परशुरामासारखा, समरांगणात प्रलयाग्नीसारखा, अंगावर कुन्हाडीचे घाव पडत असतानाही निश्चल उभा राह‌णाऱ्या वृक्षासारखा नेहमी रणसंग्रामात अटळ उभा राहात असे. ।। ७७|| त्यास चौदा विद्या आणि चौसष्ट कला ह्या तळहातावरील आळ्याप्रमाणे हस्तगत होत्या. तो आपल्या दानरूपी मेघवर्षावाने लोकांचे दारिद्रय धुवून काढीत असे. ॥७८॥ राजाचे बोलणे हे मोठे मधुर, घोरगंभीर असे असल्याने त्यांच्या श्रवणाने प्रजेचे मनमयूर हे आनंदून नृत्य करीत. ॥७९॥ राजाचा प्रचंड सेनासागर पाहून प्रत्यक्ष जलसागरही मयभीत होत असे. राजाचे दिलेले वचन हे आकाशातील ध्रुवताऱ्यासारखे अटळ होते. ।।८० ।। अशा या राजाची पत्नी, काशीराजाची कन्या कलावती ही होती. ती इतकी रूप आणि गुणवान होली की, तिचे वर्णन हे केवळ ती देवी सरस्वतीच करू जाणे. ।।८१।।

ती लावण्य सागरातील सुंदरशी लता होती. तिच्या डोळ्यांची हालचाल ही पक्ष्यांच्या शेपटीसारखी नयनमनोहर होती. तिचे चालणे हे हंसाच्या चालीसारखे होते. तर तिची कंबर ही सिंहकटीप्रमाणे होती. ॥८२॥ तिचा मुखचंद्रमा हा चंद्रासारखा मोहक, तिची वेणी नागासारखी सळसळती, तिचे दात हिऱ्यासारखे चमचमते, असे होते. ॥८३॥ ही राणी नावाप्रमाणेच अनेक बलानिपुण होती. ती म्हणजे सौंदर्यरूपी खाणीतले एक दिव्य रत्न होते. तशीच ती चतुर आणि मृदुषी होती. ॥८४॥ तिच्या अंगीचा सुवास हा राजवाड्यात सर्वत्र दरवळत असे. राजाचे दोन्ही नेत्र हे तिच्या मुखकमलाभोवती सदैव रुंजी घालत असत. तिच्या दर्शनाने सुखावणाऱ्या राजास अत्यंत सुख आणि समाधान होत असे. ।।८५।।


नूतन आणिली पर्णून ।। मनसिजें आकर्षिलें रायाचें मन ।। बोलावू पाठविलें प्रीतीकरून ।। परी ते न येचि प्रार्थितां ।।८६ ।। स्वरूपश्रुंगारजाळे पसरून ।। आकर्षिला नृपमानसमीन ।। त्यालागीं दाशार्हराजा उठोन ।। आपणचि गेला तिजपाशीं ।॥ ८७ ॥ म्हणे श्रृंगारवल्ली शुभांगी ।। मम तनुवृक्षासी आलिंगीं ।। उत्तम पुत्रफळ प्रसवसी जगीं ॥ अत्यानंदें सर्वांदेखतां ॥८८॥ तंव ते श्रृंगारसरोवरमराळी । बोले सुहास्यवदना वेल्हाळी ॥ म्हणे म्यां उपासिला शशिमौळी ॥ सर्वकाळ व्रतस्थ असें ॥८९॥ जे स्त्री रोग जे स्त्री रोगिष्ट अत्यंत ।। गर्भिणी किंवा ऋतुस्नात ॥ अभुक्त अथवा व्रतस्थ ।। वृद्ध अशक्त न भोगावी ॥९०॥ स्त्री-पुरुषें हर्षयुक्त ।। असावीं तरुण रूपवंत ॥ अष्टभोगेंकरूनि युक्त ॥ चिंताग्रस्त नसावीं ॥९१ ॥ पर्वकाळ व्रतदिन निरसून ।। उत्तमकाळीं षड्रस अन्न भक्षून ॥ मग ललना भोगावी प्रीतीकरून ।। राजलक्ष्मी सत्य हैं।॥९२॥ राव काममदें मत्त प्रचंड ॥ रतिभरें पसरोनि दोर्दंड। आलिंगन देतां बळे प्रचंड ॥ शरीर त्याचें पोळलें ॥९३॥ लोहार्गला तप्त अत्यंत ।। तैसी कलावतीची तनू पोळत ।। नृप वेगळा होऊनि पुसत ।। कैसा वृत्तांत सांग हा ॥९४॥

एकदा असे झाले की, या नवीन लग्न करून महाली आणलेल्या राणीच्या भेटीसाठी राजाचे मन अत्यंत कामविवश झाले. त्याने राणीस आपल्याकडे बोलावणे पाठविले, पण ती काही आली नाही. ।॥८६॥ तिच्या सौंदर्यावर, रूपावर आशिक झालेला राजा हा शेवटी न राहवून स्वतःच तिच्याकडे गेला. ।॥८७॥ तिच्याकडे जाऊन राजा तिला म्हणाला, “हे शृंगारवेली, तू माझ्या देहरूपी वृक्षास आलिंगन दे. त्यामुळे तुला पुत्ररूपी फलाची प्राप्ती होईल. तुझ्या पोटी जन्मास आलेल्या पुत्रास पाहून सर्वांनाच आनंद होईल”. ।।८८ ।। तेव्हा त्या राजापासून काहीशी दूर होत ती राणी म्हणाली, “हे प्राणनाथ, आता मी भगवान शिवाची आराधना, उपासना करीत आहे. सध्या मी व्रतस्थ आहे.”।।८९।।

हे राजन, स्त्री ही जर रोगग्रस्त असेल, गर्भवती असेल, रजस्वला असेल, उपाशी किंवा ती जर एखादे व्रत करीत असेल तर अशा स्त्रीबरोबर शरीरसंबंध करू नये असे शास्त्र सांगते. ।।९०।। स्त्री आणि पुरुष हे दोघेही तरुण असताना, ते रूपसंपन्न परस्पर अनुरूप असताना, आनंदी असताना त्यांनी अष्ट प्रकारे जरूर उपभोग घ्यावा. ।।९१।। मात्र अशा संगाचे वेळी पर्वकाळ, व्रताचे दिवस असू नयेत. तर योग्य अशा दिवशी सुंदर सुग्रास भोजन करून, तृप्त समाधानी मनाने स्त्री-पुरुषांनी हा आनंद भोगावा. ।।९२।।

राणी हे सांगत होती. पण राजा दशार्ह हा इतका कामातुर झाला होता की, त्याने संयम न राखता तिला बळेच आपल्या बाहुपाशात ओढली. तेव्हा राजाचे शरीर हे पोळून निघाले. ||९३।। तप्त लोहाचा स्पर्श होताच तनु पोळून निघावी असे झाल्याने राजाने तिला आज हे असे का घडले असे विचारले. ।।९४।।


श्रृंगारसदनविलासिनी ।। मम हृदयानंदवर्धिनी ।। सकळ संशय टाकुनी ।। मुळींहूनि गोष्टी सांग ॥९५ ।। म्हणे हे राजचक्रमुकुटावतंस ।। क्रोधें भरों नेदीं मानस ।। माझा गुरु स्वामी दुर्वास ।। अनुसूयात्मज महाराज ।। ९६ ।। त्या गुरूनें परम पवित्र ॥ मज दिधला शिवपंचाक्षरी मंत्र ।। तो जपतां अहोरात्र ।। परम पावन पुनीत मी ॥ ९७ ॥ ममांग शीतळ अत्यंत ।। तव कलेवर पापसंयुक्त ।। अगम्यागमन केलें विचाररहित ।। अभक्ष्य तितुकें भक्षिलें ॥ ९८ ॥ मज श्रीगुरुदयेंकरून ।। राजेंद्रा आहे त्रिकाळज्ञान ।। तुज जप तप शिवार्चन ॥ घडलें नाहीं सर्वथा ॥९९॥ घडलें नाहीं गुरुसेवन ॥ पुढें राज्यांतीं नरक दारुण ।। ऐकतां राव अनुतापेंकरून ।। सद्गदित जाहला ॥१००॥म्हणे कलावती गुणगंभीरे ॥ तो शिवमंत्र मज देई आदरें ।॥ ज्याचेनि जपें सर्वत्रं ॥ महात्पापें भस्म होती ॥१०१ ॥ ती म्हणे हे भूभुजेंद्र ॥ मज सांगावया नाहीं अधिकार ।। मी वल्लभा तूं प्राणेश्वर ।। गुरु निर्धारा तूं माझा। ॥१०२॥ तरी यादवकुळींगुरु वरिष्ठ ।। गर्गमुनि महाराज श्रेष्ठ ।। जो ज्ञानियांमाजी दिव्यमुकुट ॥ विद्या वरिष्ठ तयाची ॥१०३॥

तसेच हे राजन, तुम्हास आजवर गुरू लाभलेला नाही. त्याची सेवा घडलेली नाही, त्यामुळेच की काय; पण पुढे मात्र तुम्हास अत्यंत दारुण असा नरकवास भोगावा लागणार आहे. राणी कलावतीचे हे बोलणे ऐकून राजास स्वतःच्या आजवरच्या कृत्याचा पश्चात्ताप होऊ लागला. तो सदगदित झाला. ।।१००।। तेव्हा तो राजा राणीस म्हणाला, “हे प्रिये, ज्या मंत्राच्या जपाने सर्व पापांचा क्षय होतो तो मंत्र तू मला दे. ” ।।१०१।। तेव्हा मोठ्या विनयाने राणी कलावती म्हणाली, “महाराज, मी तुमची पत्नी आहे, मला तुम्हास मंत्रोपदेश करण्याचा अधिकार नाही. मी तुमची गुरू होऊ शकत नाही. उलट पती या नात्याने तुम्हीच माझे गुरु आहात.” ।।१०२|| तरी हे राजन तुम्ही आपल्या यादव कुळातील श्रेष्ठ अशा गर्गमुनीवरास शरण जावे. गर्ग मुनी हे ज्ञानवंतांत श्रेष्ठ आणि वंदनीय आहेत. ।।१०३।।


जैसे वसिष्ठ वामदेव ज्ञानी ।। तैसाचि महाराज गर्गमुनी ।। त्यासी नृपश्रेष्ठा शरण जाऊनी ।। शिवदीक्षा घेईजे ।।१०४।। मग कलावतीसहित भूपाळ ।। गर्गाश्रमीं पातला तत्काळ ।। साष्टांग नमूनि करकमळ ।। जोडूनि उभा ठाकला ॥१०५ ॥ अष्टभावें दाटूनि हृदयीं ।॥ म्हणे शिवदीक्षा मज देई ।। म्हणूनि पुढती लागे पायीं ।। मिती नाहीं भावार्था ॥ १०६ ॥ यावरी तो गर्गमुनी ।। कृतांतभगिनीतीरा येऊनी ।। पुण्यवृक्षातळीं बैसोनी ।। स्नान करवी यमुनेचें ॥१०७ ॥ उभयतांनी करूनि स्नान ।। यथासांग केलें शिवपूजन ।। यावरी दिव्य रत्नें आणून ।। अभिषेक केला गुरूसी ।। १०८ ।।दिव्याभरणें दिव्य वस्त्रं ।। गुरु पूजिला नृपें आदरें ।। गुरुदक्षिणेसी भांडारें ।। दाशार्हरायें समर्पिलीं ॥१०९॥ तनुमनधनेंसीं उदार ॥ गर्गचरणीं लागे नृपवर ।। असोनि गुरुसी वंचिती जे पामर ।। ते दारुण निरय भोगिती ॥११० ॥ श्रीगुरूचे घरीं आपदा ।। आपण भोगी सर्व संपदा ।। कैंचे ज्ञान त्या मतिमंदा ।। गुरुब्रह्मानंदा न भजे जो ॥१११॥ एक म्हणती तनुमनधन ।। नाशिवंत गुरुसी काय अर्पून ।। परम चांडाळ त्याचें शठज्ञान ।। कदा वदन न पाहावें ॥११२॥

तेव्हा आपण वसिष्ठ आणि वामदेवाप्रमाणेच श्रेष्ठ ज्ञानी असलेल्या गर्ग मुनींनाच शरण जावे आणि त्यांनाच गुरू करावे. त्यांच्याकडूनच ही शिव मंत्र दीक्षा घ्यावी असे मला वाटते. ।।१०४|| राणीचे हे उद्बोधक बोलणे ऐकून राजा दशार्ह हा राणी कलावतीसह गर्ग ऋर्षीच्या आश्रमात गेला. राजाने गर्गमुनींना विनम्रभावे वंदन केले आणि तो हात जोडून त्यांचे समोर उभा राहिला. ।।१०५|| गर्गमुनींना सन्मुख पाहून राजाच्या मनातले अष्टभाव जागे झाले. तो त्यांच्या चरणी लीन होऊन गुरुवर, मला शिव मंत्र दीक्षा द्या, अशी प्रार्थना करू लागला. ।।१०६ || तेव्हा त्या राजा-राणीस सोबत घेऊन गर्गमुनी हे यमुना नदीच्या काठी आले. गर्गमुनी हे एका पुण्यवृक्षाखाली विसावले. त्यांनी राजा राणीस यमुनेचे पवित्र स्नान करून येण्यास सांगितले. ।।१०७||

तेव्हा त्या उभयतांनी यमुनेचे स्नान करून गर्गमुर्नीच्या मार्गदर्शनाप्रमाणे प्रथम शिवपूजन केले. त्यानंतर राजाने गर्गमुनींना दिव्या अशा रत्नांचा अभिषेक घातला. ||१०८|| राजाने मोठ्या भक्तिभावाने गर्गमुनींचे गुरुदेव म्हणून पूजन करून त्याच्यासाठी मोठे द्रव्य भांडार मुत्त केले. ।।१०९।। राजाने गुरू चरणांवर तन, मन आणि धन समर्पित केले. तो त्यांचे चरणी लीन झाला. श्रीधर कवी सांगतात की, ज्याच्याकडे अपार धन असूनही जो जीव गुरूची उपेक्षा करतो तो पुढे घोर नरकयातना भोगतो. ।।११०।।

तिकडे आपला गुरू हा अडचणीत असताना इकडे मात्र जो स्वन अमाप संपत्तीचा सुखाने उपभोग घेतो, अशा जिवास त्या ब्रह्मानंदाचा लाभ का आणि कसा बरे व्हावा? ।।१११।। काही लोक तर असेही म्हणतात की, नाशवंत गुरूस तन मन आणि धन अर्पण करून काय फायदा? असा विचार करणारा माणूस हा चांडाळ समजून त्याचे तोंडही पाहु नये.।।११२॥


धिक् विद्या धिक् ज्ञान ।। धिक् वैराग्यधिक साधना ।। चतुर्वेद शास्त्रे आला पढून ॥ धिक् पठण तयाचें ॥११३॥ जैसा खरपृष्ठीवरी चंदन ।। षड्रसीं दर्वी व्यर्थ फिरून ॥ जेवीं मायें तंदुल मोजून ।।इकडून तिकडे टाकिती ॥ ११४ ॥ घाणा इक्षुरस गाळी ।। इतर सेविती रस नव्हाळी ।। कीं पात्रांत शर्करा सांठविली ।। परी गोडी न कळे तया ॥११५ ॥ असो ते अभाविक खळ ।। तैसा नव्हे तो दाशार्हनृपाळ ।।षोडशोपचारें निर्मळ ॥ पूजन केलें गुरूचें ॥ ११६ ॥ उभा ठाकला कर जोडून ॥ मग तो गर्गे हृदयीं धरून ।। मस्तकीं हस्त ठेवून ।। शिवषडक्षर मंत्र सांगे ॥११७॥ हृदयआकाशभुवनीं ।॥ उगवला निजबोधतरणीं ।। अज्ञानतम तेचि क्षणीं ।। निरसूनि नवल जाहलें ॥११८॥ अद्भुत मंत्राचें महिमान ।। रायाचिया शरीरामधून ।। कोट्यवधि काक निघोन ॥ पळते झाले तेधवां ॥११९॥ कितीएकांचे पक्ष जळाले ।। चरफडितचि बाहेर आले ॥ अवघेचि भस्म होऊनि गेले ॥ संख्या नाहीं तयांतें ॥१२०॥ जैसा किंचित् पडतां कृशान ॥ दग्ध होय कंटकवन ॥ तैसे काक गेले जळोन ।। देखोनि राव नवल करी ॥ १२१ ॥

अशा व्यक्तीच्या ज्ञानाचा, त्याच्या कोरड्या विद्याभ्यासाचा, वेदशास्त्र पठणाचा धिक्कार असो. ||११३।। अशी व्यक्ती म्हणजे पाठीवर चंदनाचे ओझे दिलेले गाढव, षड्स अन्नात फिरविलेली पळी किंवा मापट्यांनी कितीही तांदूळ इकडेतिकडे केले तरी मापटे हे रिकामे ते रिकामेच अशीच याची अवस्था असते. ।।११४।। घाण्यातून काढलेल्या उसाची गोडी ही इतरांना मिळते, चरकाला मिळत नाही. तसेच भांड्यात साखर जरी ठेवली तरी ते भांडे काही गोड होत नाही, तशी या माणसाची अवस्था असते. ।।११५।। अशाप्रकारे गुरुद्रोह करणारी माणसे ही अभाविक आणि दुर असतात. पण दशाई राजा हा मात्र असा नव्हता तर तो आपल्या गर्गमुनीदेवाच्या ठायी अत्यंत नम्र आणि लीन होता. त्यामुळेच राजा त्याचे भक्तिभावाने पूजन करीत होता. ।।११६।।

तेव्हा सन्मुख हात जोडून उभ्या असलेल्या दशार्ह राजास गर्गमुनींनी पुढे होऊन मोठ्या प्रेमाने आलिंगन दिले आणि त्याचे मस्तकावर आपला कृपा वरदहस्त ठेवला. त्यांनी राजास त्या दिव्य पंचाक्षरी शिवमंत्राची दीक्षा दिली. ।।११७।। त्याबरोबर राजाच्या हृदयाकाशात ज्ञानसूर्याचा उदय झाला. त्याच्या ठायी असलेल्या अज्ञानरूपी अंध:काराचा नाश झाला. त्याचवेळी आणखीही एक नवल घडले. ।।११८।। गर्गमुनींनी दिलेल्या त्या शिवमंत्राचा जप तो राजा करीत असताना अचानक राजाच्या शरीरातून कोट्यवधी कावळे बाहेर पडू लागले. ||११९|| त्यापैकी कित्येक कावळ्यांचे पंख जळालेले होते, काही चरफडत होते, काहींचे तर जळून भस्म झाले होते. ।।१२० ।। ज्याप्रमाणे एका छोट्याशा ठिणगीने वाळलेले रान जळून जाते त्याप्रमाणे राजाच्या शरीरातून ते तसे कावळे बाहेर निघताना पाहून स्वतः राजासही मोठे आश्चर्य वाटले. ।।१२१।।


गुरुसी नमूनि पुसे नृप ।। काक कैंचे निघाले अमूप ।। माझे झालें दिव्य रूप ।। निर्जरांहूनि आगळें ।। १२२॥गुरु म्हणे ऐक साक्षेपें ।॥ अनंत जन्मींचीं महापापें ।। बाहेर निघालीं काकरूपें ।॥ शिवमंत्रप्रतापें भस्म झाली ।। १२३ ।। निष्पाप झाला नृपवर ।। गुरुस्तवन करी वारंवार ॥ धन्य पंचाक्षरी मंत्र । तूं धन्य गुरू पंचाक्षरी ॥१२४॥ पंचभूतांची झाडणी करून ॥ सावध केलें मजलागून ॥ चारी देह निरसून ।। केलें पावन गुरुराया ॥ १२५ ॥ पंचवीस तत्त्वांचा मेळ ।। त्यांत सांपडलों बहुत काळ ।। क्रोधमहिषासुर सबळ ।। कामवेताळ धुसधुसी ।। १२६ ।। आशा मनशा तृष्णा कल्पना ।। भ्रांति भुली इच्छा वासना ।। या जखिणी यक्षिणी नाना ।। विटंबीत मज होत्या ॥ १२७ ॥ ऐसा हा अवघा मायामेळ ।। तुवां निरसिला तात्काळ ।। धन्य पंचाक्षरी मंत्र निर्मळ ॥ गुरु दयाळ धन्य तूं ॥ १२८ ॥ सहस्रजन्मपर्यंत ॥ मज ज्ञान झालें समस्त ।।पापें पळालीं असंख्यात ।। काकरूपें देखिलीं म्यां ॥ १२९ ॥ सुवर्णस्तेय अभक्ष्यभक्षक ॥ सुरापान गुरुतल्पक ।। परदारागमन गुरुनिंदक ॥ ऐसीं नाना महत्पापें ॥१३०॥

तेव्हा राजाने हात जोडून श्री गर्गमुनींना गुरुदेवा, हा काय प्रकार आहे? ह्याचा नेमका अर्थ काय? असे विचारले. ।।१२२।। तेव्हा गर्गमुनी राजास म्हणाले, “राजन, आता मी काय सांगतो ते नीट ऐक. राजा, तू जो शिवमंत्र जपत होतास त्या मंत्राच्या प्रभावाने तुझी अनंत जन्मांची पाये ही या कावळ्यांच्या रूपाने तुझ्या शरीरातून बाहेर पडली आहेत, आता तू शुद्ध आणि पवित्र झाला आहेस, पापरहित झाला आहेस.” ।।१२३॥

अशा रीतीने तो दशाई राजा जेव्हा पापमुक्त झाला तेव्हा तो मोठ्या कृतज्ञतेने त्या सिद्धमंत्राचा आणि गर्गमुनींचा जयजयकार करू लागला. त्यांची मुक्तकंठाने स्तुती करू लागला. ।।१२४|| राजा म्हणू लागला, हे गुरुदेवा, आज आपण पंचमहाभूतांची झाडणी करून मला सावध केलेत, खऱ्या अथनि जागविले.मी धन्य झालो. हे गुरुदेवा, तुमच्या कृपेमुळेच आज माझा देह हा पावन झाला आहे. पापांचा नाश होऊन त्यास पावित्र्य प्राप्त झाले आहे. ।।१२५।।

राजा म्हणाला, “हे गुरुराया, पंचवीस तत्त्वांच्या गराड्यात मी मोठा काळ घालविला, माझ्या शरीरात क्रोधरूपी महिषासुर आणि कामरूपी वेताळ हे थैमान घालीत होते. ।।१२६|| आशा, मनीषा, तृष्णा, कामना, वासना, भ्रांती, भुली आणि कल्पना या जाखिणी आणि यक्षिणी माझी नाना प्रकारे विटंबना करीत होत्या. ।।१२७॥ हे गुरुराया, तू तुझ्या कृपेने आणि या सिद्ध शिवमंत्र प्रभावाने माझ्या दृष्टीसमोरचा मायापटल दूर केला आहे. है कृपावंता, तू आणि तुम्ही दिलेला हा मंत्र दोन्ही गोष्टी अत्यंत श्रेष्ठ आहेत.।।१२८ ।। हे गुरुराया, मला सहस्र जन्मांचे ज्ञान झालेले आहे. माझ्या काकरूपी सर्व पापांचा क्षय झाला आहे. ती पापे ह्या सिद्धमंत्राने जळून भस्मसात झाली आहेत. ।।१२९।। सुवर्णाची चोरी, अभक्ष्य भक्षण, गुरूहत्या,वीरजनांचा छळ, गुरूपत्नीशी गैरवर्तन, परस्त्रीगमन, गुरुनिंदा ह्यासारखी निंदनीय जी पापे आहेत. ।।१३०।।


गोहत्या ब्रह्महत्या धर्मलोपक ।। स्त्रीहत्या गुरुहत्या ब्रह्मछळक ।। परनिंदा पशुहिंसक ।। वृत्तिहारक अगम्य स्त्री-गमन ॥१३१ ॥ मित्रद्रोही गुरुद्रोही ।। विश्वद्रोही वेदद्रोही ।। प्रासादभेद लिंगभेद पाहीं ।। पंक्तिभेद हरिहरभेद ॥ १३२ ॥ज्ञानचोर पुस्तकचोर पक्षिघातक ।। पाखंडमति मिथ्यावादक ।। भेदबुद्धि भ्रष्टमार्गस्थापक ।। स्त्रीलंपट दुराचारी ॥ १३३ ॥ कृतघ्न परद्रव्यापहारक ।। कर्मभ्रष्ट तीर्थमहिमाउच्छेदक ।। बकध्यानी गुरुछळक ।। मातृहतक पितृहत्या ॥ १३४॥ दुर्बलघातुक कर्ममार्गघ्न ।। दीनहत्यारी पाहती पैशुन्य ।। तृणदाहक पीडिती सज्जन ।। गोत्रवध भगिनीवध ॥ १३५ ॥ कन्याविक्रय गोविक्रय ।। हयविक्रय रसविक्रय ।। ग्रामदाहक आत्महत्या पाहें ।। भ्रूणहत्या महापापें ।।१३६ ॥हीं महापापें सांगितलीं ।। क्षुद्रपापें नाहीं गणिलीं ।॥ इतुकीं काकरूपें निघालीं ।॥ भस्म झालीं प्रत्यक्ष ॥१३७॥ कांहीं गांठीं पुण्य होतें परम ।। म्हणोनि नरदेह पावलों उत्तम ।। गुरुप्रतापें तरलों निःसीम ।। काय महिमा बोलूं आतां ॥१३८॥ गुरुस्तवन करूनि अपार ।। ग्रामासी आला दाशार्ह नृपवर ।। सवें कलावती परमचतुर ॥ केला उद्धार रायाचा ।।१३९ ॥

गोहत्या, ब्रह्महत्या, धर्मभ्रष्टता, स्त्रीहत्या, पशु हत्या, परस्त्रीशी संग करणे अशी पापकर्मे, ।।१३१।। गुरुद्रोह, विश्वद्रोह, वेदद्रोह, लिंगभेद, पंक्तिभेद, हरी आणि हर ह्यांच्याबद्दल दुजाभाव राखणे. ।।१३२।। ज्ञानाची, धनाची, पुस्तकाची चोरी करणे, निष्पाप पक्ष्यांची हत्या करणे, असत्य भाषण करणे, कुमार्गास जाणे, स्त्रीलंपटपणा करणे, दुराचारी होणे. ।। १३३।। कृतघ्नपणा करणे, परद्रव्याचा अपहार करणे, कर्मभ्रष्ट होणे, तीर्थक्षेत्रांचे पावित्र्य खराब करणे, गुरूचा छळ करणे, मातृपितृ हत्या करणे अशी घोर पातके, ।।१३४।। दुर्बलांचा घात करणे, दीनदुबळ्यांचा छळ करणे, संतांना पीडा करणे, गवताच्या गंज्या पेटविणे, गोत्रजांचा घात करणे, ।।१३५।। कन्या, गाय, गोरस, घोडे ह्यांची विक्री करणे, गावे जाळणे, आत्महत्या करणे, निरपराध जिवांची हत्या करणे, छोट्या अभ्रकांचा जीव घेणे ही एकापेक्षा एक अशी महान पापे आहेत. ।।१३६।।

या शिव अन्य लहानसहान पापांची तर मोजदादच करता येत नाही. पण हे गुरुदेवा, तुमच्या कृपाशीर्वादाने ती सर्व पापे ही माझ्याच शरीरातून असंख्य काकरूपाने बाहेर पडताना मी माझ्या डोळ्यांनी पाहिली आहेत. ती पापे माझ्यासमोर भस्म झाली आहेत. ।।१३७|| हे गुरुदेवा, खरोखरच माझ्या गाठी कसलेसे थोडेफार पुण्य होते म्हणूनच मला हा नरदेह मिळाला. तुमची भेट झाली, शिवमंत्राची दीक्षा मिळाली आणि त्यानेच माझे सर्वार्थाने उद्धरण झाले आहे. हे गुरुदेवा, मी तुमची महती ती काय आणि कोणत्या शब्दांनी गाऊ? ।।१३८ ।। अशाप्रकारे गुरूंची अगाध महती गान, त्यांचा कृपाशीर्वाद घेऊन कृतार्थ झालेला दशाई राजा हा आपला उद्वार घडवून आणणाऱ्या त्या सती कलावती राणीस सोबत घेऊन आपल्या नगरीस परत आला. ।।१३९।।


जपतां शिवमंत्र निर्मळ ।। राज्य वर्धमान झालें सकळ ।। अवर्षणदोष दुष्काळ ।। देशांतूनि पळाले ।।१४० ।। वैधव्य रोग आणि मृत्य ।। नाहींच कोठें देशांत ।। आलिंगितां कलावतीसी नृपनाथ ।। शशीऐसी शीतळ वाटे ॥ १४१ ॥ शिवभजनीं लाविलें सकळ जन ।। घरोघरीं होत शिवकीर्तन ।। रुद्राभिषेक शिवपूजन ।। ब्राह्मणभोजन यथाविधि ॥ १४२ ॥ दाशार्हरायाचें आख्यान । जे लिहिती ऐकती करिती पठण ।। प्रीतीकरूनि ग्रंथरक्षण ।। अनुमोदन देती जे ॥१४३॥ सुफळ त्यांचा संसार ॥ त्यांसी निजांगें रक्षी श्रीशंकर ।। धन्य धन्य तेंचि नर ।। शिवमहिमा वर्णिती जें ।॥ १४४ ॥ पुढें कथा सुरस सार ।। अमृताहूनि रसिक फार ।। ऐकोत पंडित चतुर ।। गुरुभक्त प्रेमळ ज्ञानी जे ॥ १४५ ॥ पूर्ण ब्रह्मानंद शूळपाणी ।। श्रीधरमुख निमित्त करूनी ।। तोचि बोलवीत विचारोनी ।। पाहावें मनीं निर्धारें ॥ १४६ ॥ श्रीधरवरद पांडुरंग ।। तेणें शिरीं धरिलें शिवलिंग ।। पूर्णब्रह्मानंद अभंग ।। नव्हे विरंग कालत्रयीं ॥ १४७ ॥ शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड ।। स्कंदपुराण ब्रह्मोत्तरखंड ॥ परिसोत सज्जन अखंड ॥ प्रथमोध्याय गोड हा ॥१४८॥

गर्गमुनींकडून लाभलेल्या त्या सिद्ध पंचाक्षरी शिवमंत्राच्या नित्य पठणानेच राजाच्या राज्याची मोठी भरभराट झाली. त्याच्या राज्यातून अवर्षण, दुष्काळ, परचक्र ह्यासारख्या संकटांनी काढता पाय घेतला. ।।१४०।। त्याच्या राज्यात वैधव्य, रोग, अपमृत्यू यासारख्या गोष्टी उरल्या नाहीत. आता जेव्हा राजा आपल्या प्रिय पत्नीस प्रेमालिंगन देत असे तेव्हा त्यास चंद्राच्या शीतलतेचा अनुभव प्रत्ययास येऊ लागला. ।।१४१।। यथा राजा तथा प्रजा या न्यायाने राजाप्रमाणेच त्याची सर्व प्रजाही शिवोपासना करू लागली. घरोघरी शिव आराधना, रुद्राभिषेक, पूजा आणि वीर भोजनाचे कार्यक्रम होऊ लागले. ।।१४२।।

श्रीधर कवी म्हणतात की, श्रोतेजनहो, जे कोणी हे दशार्हराजाचे आख्यान, श्रवण करतात, पठण करतात, जे ह्या ग्रंथास अनुमोदन देतात, त्याचा श्रद्धेने स्वगृही संग्रह करतातः ।।१४३॥ त्यांचा प्रपंच हा सुखासमाधानाचा होतो. भगवान शिव हे स्वतः त्यांचे सर्वतोपरीने रक्षण करतात. जे हे शिव माहात्म्य वर्णन करतात ते खरोखरच धन्य होत. ।।१४४।। पुढे असेही म्हणतात की, आता यापुढे अत्यंत सुरस, मधुर अशा कथा येणार असून, त्या मी तुम्हा शिवभक्तांना सादर करणार आहे.।।१४५।। पूर्ण ब्रह्मानंदरूप असलेले श्री भोलेनाथ हेच केवळ माझ्या मुखाचे निमित्त करून त्यांच्या अद्भुत शिवलीला तेच कथन करणार आहेत. ।।१४६।।

या श्रीधरास वरदान देणाऱ्या त्या पंढरीनाथाने आपल्या मस्तकावर शिवलिंग धारण केलेले आहे. हा ब्रह्मानंद अभंग आणि अक्षय आहे. त्याचा तिन्ही काळात विसर होत नाही. ।।१४७।। श्री शिवलीलामृत हा ग्रंथ प्रचंड मोठा असून, तो स्कंद पुराणातील ब्रह्मोत्तर खंडात आलेला आहे. त्या ग्रंथाचा हा पहिला अध्याय इथे संपूर्ण होतो.।।१४८।।


Shree Shivleelamrut Adhyay Dusara
Shree Shivleelamrut Adhyay Dusara
Shree Shivleelamrut Adhyay Tisara
Shree Shivleelamrut Adhyay Tisara
Shree Shivleelamrut Adhyay Chautha
Shree Shivleelamrut Adhyay Chautha

अधिक माहितीसाठी आमच्या सोशल मीडिया ला फॉलो करा.

मराठी रसिक या आमच्या इंस्टाग्राम अकाउंट ला लाईक करा सुब्स्क्राईब करा. येथे तुम्हाला संपूर्ण माहिती मराठी मध्ये मिळते.

Scroll to Top